Thursday 14 April 2022

बाबासाहेब समजून घेताना...

 


मला वेदाध्ययनाकडे वळायला लावणाऱ्या महामानवांस जयंतीनिमित्त अभिवादन...!

मला खऱ्या अर्थाने ब्राह्मण बनविणाऱ्यांस, माझ्या कर्तव्याच्या बोधासाठी...

काही जण म्हणतील की ज्या बाबासाहेबांनी जातीव्यवस्था नाकारली त्यांचेच नाव घेऊन तुम्ही जातीयवाद रेटताय... असा विचार करणाऱ्या पढतमूर्खांनी दूर रहावे...! कारण बाबासाहेबांनी स्वत: एकेकाळी जानवी वाटलीत. बहिष्कृत भारत ३ मे, १९२९ व परत महाडला...! मी लिहिलंय मागेच त्यावर...

मागे मी १२ फेब्रुवारींस महर्षि‌ दयानंदांच्या जयंतीनिमित्त लिहिलेल्या लेखामध्ये मांडलं आहे की २०१२ नि २०१५ साली विवेकानंद समग्र नि आंबेडकरांच्या काही खंडांच्या साहित्यपठणाने मी वेदाध्ययनाकडे वळलो. तिथूनंच पाखण्ड खण्डिणीची निर्मिती झाली. ज्या व्यक्तीने मला वेद काय आहेत हे जाणून घ्यायची खरी चिकीर्षा अंत:करणांत निर्माण केली, त्या आंबेडकरांना मी अभिवादन करणार नाही असे‌ कसं होईल?

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।

श्री भास्कराचार्य

मी व्यक्तीपूजक मूळीच नाही. स्वत: बाबासाहेबांनी एकेठिकाणी स्पष्टपणे व्यक्तीपूजेंस कठोर विरोध केला आहे. कोणत्याही महापुरुषाला मानत असताना त्याचे चरित्र पूर्ण अभ्यासून नि त्याने व्यक्त केलेली मते पूर्ण अभ्यासात घेऊनंच व त्याची यथार्थ चिकीत्सा करूनंच ती स्वीकारावी ह्या मताचा आहे. अर्थात हे करत असताना आपण फार भारी आहोत असा कुठेही भाव नसावा. वास्तविक बाबासाहेबांचे समग्र वाङ्मय पूूूूूर्वी २१ खंडांचे होते, जे आता ४०पर्यंत गेलंय. बरंच काही वाचायचं‌ राहिलंच आहे...


बाबासाहेब समजून घेताना

२०१५-१६ च्या दरम्यान मी मोतीबागेत संघांस आंबेडकरांवरची एक प्रदर्शनी करून दिली होती ती‌ संघाच्या अनेक शिबीरांमध्ये लागली होती.

ह्या शीर्षकाने मी खूप वर्षांपूर्वी ह्याच १४ एप्रिलला लाईव्ह आलो होतो. बाबासाहेब समजून घ्यायचे म्हणजे काय करायचं???

मी अस्पृश्यता मानत नाही. कारण माझं वैदिक हिंदु धर्मशास्त्राचे काहीसं अल्पसं का होईना वाचन आहे.‌ वाचन असा शब्द लिहिला आहे. मूळच्या विशुद्ध अशा वैदिक धर्मात अस्पृश्यतेला थारा मूळीच नव्हता हे स्वत: बाबासाहेबांनीही अनेक ठिकाणी प्रांजलपणे मान्य केलंच आहे आणि ते त्यावर शेवटपर्यंत ठामंच होते. त्यामुळे अस्पृश्यता नेमकी किती नि कशा स्वरुपाची होती, ती नेमकी कधी नि कशी आली, ह्यासंबंधी त्यांनी विस्ताराने चिंतन केलं असलं तरी स्वतंत्रपणे तो विषय अभ्यासण्याची माझीही इच्छा असल्याने आता‌ त्यावर काही मतं मांडत नाही. बाबासाहेबांच्या संविधानाने ती त्यावेळीच नाकारली असल्यामुळे आता तिचा विचार करणं हे केवळ हिंदुसमाजाच्या सर्वंकष हिताच्या दृष्टीने आहे, कारण बुद्धिभेद करणारे फार आहेत. बाबासाहेब स्वत: चिकीत्सक अभ्यासक करून सत्य स्वीकारणारे होते, आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करताना इतकं भान तरी राखावं...!

बाबासाहेबांच्या‌ साहित्यामध्ये जो आक्रोश दिसतो तो‌ स्वाभाविक आहे. इतकंच काय‌ त्यांच्या साहित्यामध्ये अनेक ठिकाणी परस्परविरोधही दिसतो अगदी एकाच पुस्तकामध्येही परस्परविरोधी मतंही दिसतात. हे सगळं असलं तरी काही ठिकाणी राष्ट्राविषयीचा ज्वलंत अभिमानही आहे, इतिहासाविषयीचा साद्यंत असा विचारही आहे नि दुसरीकडे काही ठिकाणी अत्यंत‌ प्रक्षोभक अशी अमान्य होतील अशीही मते आहेत जी टोकाची वाटावीत. जशा २२ प्रतिज्ञा किंवा रिडल्स वगैरे किंवा क्रांति विरुद्ध प्रतिक्रांती. म्हणजे १९३५ पर्यंत भगवद्गीतेस हिंदुंचा‌ सर्वोच्च ग्रंथ मानणारे, भगवान श्रीकृष्णांस ईश्वरी अवतार मानणारे, महाडच्या सत्याग्रहावेळी गीता हाच आमच्या सत्याग्रहाचा, संघटनाचा प्रेरणाग्रंथ आहे असे म्हणणारे आंबेडकर पुढे‌ जाऊन क्रांतिविरुद्ध प्रतिक्रांतीमध्ये, रिडल्स मध्ये पूर्वीच्या मतांच्या अगदी विरोधी लेखन करतात. २२ प्रतिज्ञा का लिहितात? असं का घडतं???

एकीकडे ब्राह्मणांनी जातीव्यवस्था निर्माण केली नाही, तो‌ त्यांचा दोष‌ नाही असे म्हणणारे बाबासाहेब दुसरीकडे पुरोगामी ब्राह्मण नि सनातनी ब्राह्मण एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत असे सांगतात. आणि हऱ्या नरक्यासारखे लोक ह्यावरंच भाषणं ठोकत आंबेडकरी समाजाला ब्राह्मणांच्या‌ विरोधात पेटवत‌ राहतात. शेवटी त्याच्या नरक्याच्या पापी पेट‌ का सवाल होता तो..! बरं हेच आंबेडकर दुसरा विवाह एका ब्राह्मण स्त्रीशीच करतात...! बरं हेच आंबेडकर ६००० महार बांधवांना जानवी वाटप करतात...!

आता एवढ्यावरून बाबासाहेब ब्राह्मणद्वेष्टे ठरावेत का? किंवा त्यांचे‌ साहित्य‌ वाचून कुणी ब्राह्मणांना चोवीस तास‌ शिव्या‌ घालाव्यांत‌ का ?

मनुस्मृतीला आधी बापुसाहेब‌ सहस्त्रबुद्धेंच्या हस्ते जाळणारे बाबासाहेब पुढे हिंदु कोड बिलाच्या वेळी तिचाच आधार घेतात व विरोधकांना आव्हान देतात की ते‌ मनुस्मृतीविरोधी म्हणजेच हिंदुधर्मशास्त्राच्या विरोधांत आहे हे सिद्ध करा. 

हेच आंबेडकर एकीकडे वैदिक धर्माला डाईनामाईटने (सुरुंग) फोडावे म्हणतात तर दुसरीकडे त्याच‌ वेदांचा आधी गौरवही करतात..! 

एकीकडे इस्लामची तर्ककठोर चिकीत्सा करतात व लोकसंख्येच्या अदलाबदलीची भूमिका मांडतात...! पाकिस्तानच्या बाबतीत सावरकरांचा प्रस्तावंच‌ सर्वात उत्तम व स्पष्ट आहे असे‌ सांगतात...

सावरकर-आंबेडकर भेटी एकुण दहावेळा झाल्या आहेत बरंका...!

हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांचीही आहे असे ठामपणे सांगतात...

बरं हेच बाबासाहेब कम्युनिस्टांना स्वतःचा कट्टर हाडवैरी मानतात व कम्युनिझमची पूर्ण पोलखोल करतात. संविधानाचे खरे शत्रु आरंभापासून हे साम्यवादी व समाजवादीच आहेत असे ठामपणे संविधानसभेत मांडतात. जाहीरपणे...

हेच बाबासाहेब संविधानाच्या पूर्वपीठिकेत सेक्युलर व सोशालिस्ट शब्दाला कठोर विरोध करतात...

हेच बाबासाहेब संस्कृत हीच राष्ट्राची राष्ट्रभाषा व्हावी असे मांडतात व सभेत संस्कृतमध्ये अस्खलित‌ संवादही करतात (आह्मी त्यावर सविस्तर लेख मागे पुराव्यासहित लिहिला आहेच)

बरं हेच बाबासाहेब धर्म ही अफुची गोळी आहे हा मार्क्सवाद्यांचा सिद्धांत धिक्कारतात व माझ्या तत्वज्ञानाची मूळं ही धर्मात आहेत, राजकारणात नाहीत असे सांगतात...! तरुणांनी धर्मनिष्ठ रहावे असेच सांगतात...

बरं हेच बाबासाहेब अस्पृश्य कोण होते नि शुद्र कोण होते ह्या दोन पुस्तकांमध्ये त्यांनी वेदांवर घेतलेल्या आक्षेपांना आर्यसमाजी विद्वान पंडित शिवपूजनसिंह कुशवाह व धर्मदेव विद्यामार्तंडांनी लिहिलेल्या प्रतिवादांस जो सार्वदेशिक मासिक १९५१ चा अंक, जो मजसंग्रही आहे, तो वाचून पुढील आवृत्तीतून तो आक्षेपार्ह भाग काढून टाकतो असे सांगतात...

इतकंच काय तर धर्मदेव विद्यामार्तंडांनी लिहिलेल्या 'बौद्ध धर्म और वैदिक धर्म का तुलनात्मक अध्ययन' हे पुस्तक वाचून 

'"तुम्ही एका आईच्या ममतेने मला समजाऊन सांगितले. मलाही ते मान्य आहे. पण उच्चवर्णीय समाज मला ह्या मायेच्या ममतेने हे का समजावत नाही, आमचं का ऐकत नाही अशी विनवणीयुक्त तक्रार करतात."

(वरील दोन्ही संदर्भ - आर्यसमाज एवं डॉ अम्बेडकर - पण्डित कुशलदेव शास्त्री - पीडीएफ आहे)

हिंदु कोड बिलासाठी प्रस्तावना लिहिणारे हेच धर्मदेव विद्यामार्तंड जी चौदाव्या‌ खंडात प्रकाशित आहे...भाग द्वितीय मध्ये...!


पाकिस्तान किंवा भारताची फाळणी लिहिणारे हेच बाबासाहेब...

गांधींनी नि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केलं लिहिणारे हेच बाबासाहेब...त्यात गांधींवर सडकूून टीका करणारे...


१९३५ पर्यंतचे बाबासाहेब नि नंतरचे बाबासाहेब ह्यामध्ये बराच भेद दिसून येतो हे खरंच आहे..

मग कुठले बाबासाहेब प्रमाण मानावेत???

हे सगळं लिहिण्याचा उद्देश्य काय???

बाबासाहेबांची निंदा ??? मूळीच नाही...

मग काय???

बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा स्वीकाराव्यांत‌ का?

रिडल्स स्वीकारावे का?? धम्मांतर स्वीकारावे का???

काय स्वीकाराने नि स्वीकारु नये ह्याचा‌ विवेक ज्याचा त्याचा आहे...

स्वत:ला आंबेडकरी म्हणविणारा समाज हा आपलाच धर्मबंधु आहे हे मान्य करूनही मधील काळात निर्माण झालेली दरी व आत्ता काही देशविघातक शक्ती निर्माण करत असलेली दरी कधी संपवणार? इथे आंबेडकरी समाज असा शब्दप्रयोग वेगळ्या अर्थाने केला नसून तो‌ लाक्षणिक आहे...

किती दिवस एकमेकांशी इतिहासावरून भांडत बसणार? 

काही वाईट सोडून जे चांगलं ते घेऊन पुढे कधी जाणार?

इतिहासात कोळसा व चंदन दोन्ही आहे, काय उगाळायचं ते आपण ठरवायचं..!

बाबासाहेबांची विद्वत्ता, व्यासंग, पुस्तकांविषयीची तीव्र आवड हे गुण शिकणार का आपण? 

We are Indians first and foremost

हे वाक्य विसरणार का???

संविधान जीवित ठेवण्याचे‌ दायित्व हिंदुंच्या‌ बहुंसंख्यतेवर आहे हे बाबासाहेबांचे सूचक वक्तव्य लक्ष्यात ठेऊन आचरणार का???

की एकमेकांत भांडत बसणार???

विचार कधी करणार व कृती???

नुसत्या जयंत्या नि पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या की आचरणही करायचं???

बाबासाहेबांचे कैकविध पैलु आहेत जे अद्यापही दुर्लक्षित आहेत, त्यांच्यावर अभ्यास करून देशाला पुढे नेणार? की समाजविघातक डाव्या व तत्सम शक्तींच्या नादी लागून एकमेकांची माथी फोडणार???

महामानवांस अभिवादन करण्यांपूर्वी हा विचार करणार???


भवदीय...!


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महामानव_डॉबाबासाहेब_आंबेडकर_राष्ट्रीयत्व_संविधान_हिंदुधर्म_देशहित_ब्राह्मण_मनुस्मृती

7 comments:

  1. विचारांची अतिशय समतोल मांडणी. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  3. मला आपले लेखन नियमित मिळावे ही विनंती 9767747636

    ReplyDelete
  4. मला आपल्या बरोबर आणखी संवाद साधायचा आहे 8668672500

    ReplyDelete
  5. चिंचणीकर हा नालायक माणूस आहे. बुद्धीभेद करणे हाच या हारामखोराचा उद्योग आहे.

    ReplyDelete