Tuesday 12 April 2022

मंदिर समितीचं डोकं ठिकाणावर आहे का???



गुढीपाडव्यापासून दर्शन सुरु होणार म्हणून आह्मां पंढरपूरकरांना विशेष आनंद होता. पण गडबडीत दोन तीन दिवस थांबून ४ एप्रिललाच दोन वर्षांनी दर्शन घेतलं. व्याकुळ अंत:करणाने मंदिरात प्रवेश केला. श्रीविठोबाचे दर्शन घेऊन आईसाहेबांच्या दर्शनासाठी प्रवेश घेतला. खरंतर त्याच‌दिवशीच हे लिहिणार होतो. आईसाहेबांचे दर्शन घेण्यासाठी गर्भगृहात शिरलो अन् पाहतो तर आईसाहेबांच्या चरणकमलांची ही अवस्था...! एकीकडे मुखात श्रीसूक्त होते तर दुसरीकडे मनस्वी संताप, उद्वेग अन् चीड...! 😡


वज्रलेप निघालाय म्हणे...! दर्शन घेण्यासाठी चरणकमलांस स्पर्श केला अन् अक्षरश: अश्रु आले...! आधीच अंत:करण द्रवित होतंच. पण एकुणंच संमिश्र भावना, राग, चीड, संताप, आनंद, समाधान, पराकोटीचं दु:खही अन् उद्वेगही...! जोडलेल्या चित्रात दिसताहेत‌ त्यापेक्षाही आईसाहेबांच्या चरणकमलांची‌ स्थिती विचित्र होती.‌ ती स्पर्श करताना जाणवेलंच...


प्रस्थापितांना निष्कासित करून मंदिराचे सरकारीकरण केलं. ह्यांच्या हातीं कारभार दिला आणि ह्यांनी घाण केला दरबार अशी अवस्था झालीय...! खरंतर हे सगळं गेली ८ वर्षे नित्य अनुभवतो आहोतंच... पण हा आजचा प्रकार अतिरेक झालाय...


खरंतर दोन वर्षे मंदिर बंदंच होते म्हणजे पदस्पर्श दर्शन होण्याचा‌ प्रश्नंच नव्हता. अर्थात काहींना चोरूनही दर्शन दिलं जात होतंच. पण ते अगदी नगण्य म्हणून सोडूनही देऊ. मग जर पदस्पर्श दर्शनंच सुरु नसेल तर आईसाहेबांच्या चरणकमलांची ही अवस्था होऊन वज्रलेप निघतोच  कसा हा साधा प्रश्न आहे...





माझ्या आधीच्या माहितीनुसार खरंतर खूप वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञाने कदाचित दोन्ही मूर्तींच्या वज्रलेपासंबंधी एक अत्यंत अभ्यासपूर्ण मत मांडून समितींस त्याची‌‌ संमती मागितली होती. पण वारकरी संप्रदायानेही त्यांस संमती देऊन काही शंकासमाधान विचारलं होते व ते झालंही होते. अर्थात‌ समितीने त्यावेळी काय पाऊल उचललं सर्वांस ज्ञात आहे. 


टाळेबंदीच्या काळातही वज्रलेप झालाय म्हणे


दोन वर्षांच्या काळात जेंव्हा टाळेबंदी होती, तेंव्हाही एक वज्रलेप करून घेतला आहे असे ऐकण्यांत आलं. जर हे खरं असेल तर आज झालेली दु:स्थिती नेमकी कुणाच्या दायित्वाची असा प्रश्न उभा राहतो...


वराहमिहीराची बृहत्संहिता 


ज्यांचा मूर्तीशास्त्राचा अभ्यास आहे त्यांना ज्ञात असेल की मूर्तीच्या रक्षणासाठी‌, संवर्धनासाठी ज्या प्रकारचे‌ रसायनशास्त्रातले प्रयोग करता येतात, त्यासंबंधी वराहमिहीराच्या बृहत्संहितेमध्ये एका श्लोकामध्ये माहिती आहे. ज्यांनी बृहत्संहिता अभ्यासली असेल त्यांना हे ज्ञात असेलंच. पीडीएफ आंतरजालांवर आहेच. मागे आह्मीं ह्यावर संक्षेपात लिहिलंही होते. अर्थात आह्मीं काही यातले तज्ञ नसल्याने केवळ उल्लेखासाठी हे आता नमुद करताहोत. तज्ञ मंडळी अधिक जाणतात...आह्मीं सर्वज्ञतेचा आव कुठेही आणत नाही आहोत नि आमची तशी इच्छाही नाही...


अंती प्रश्न एकंच आहे...


जे घडलंय त्याचे‌ दायित्व कुणाच्या‌ स्कंधावर? समितीच्या की पुरातत्वखात्याच्या की तत्संबंधित तज्ञांच्या ज्यांनी टाळेबंदीत केलेला वज्रलेप असेल किंवा आधीच्या तत्सम कृत्याचा???


बरं नुसता दोष‌ देऊनही काही होणार नाही. पुढे काय करायचं ह्याचा काही विचार समिती करणार आहे का? की नेहमीप्रमाणे जैसे थे


Maintain the status quo...???


आज चैत्र एकादशी. दोन वर्षांनी आज चैत्री वारी भरलीय. त्यामुळे आज हे लिहितानाही मनाची अवस्था विमनस्क आहे. पण 


बुडतें हे जन देखवेना डोळा...! 


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीविठ्ठलरुक्मिणीमंदिर_पंढरपूर_वारी_मूर्तीसंरक्षण_वज्रलेपदुरावस्था_चैत्रीएकादशी

1 comment:

  1. समिती नावाची जी गोष्ट तिथे स्थापित आहे...त्यांची काही जबाबदारी किंवा भावभावना ह्या सर्वांशी निगडित आहेत का?? की फक्त भत्ते घेणे,मिरवणे व माज करणे, हेच धंदे आहेत??
    अरे ज्याच्या मुळे..ह्या उपाध्या मिरवता.. त्याची तरी निगुतीने काळजी घ्या.!

    हातपाय वाकडे होऊन पडाल रे..!!

    आईसाहेब.. आम्हा लेकरांना माफ करा..!!

    काय करू शकतो आम्ही..??

    ReplyDelete