Tuesday 13 February 2024

महर्षि श्रीमद्दयानंदांची जन्मद्विशताब्दी

 


आज आपण जीवित असता तर आपण २०० वर्षांचे असता आणि आह्मींही आमचं जीवन आपल्या चरणी आपल्या संकल्पित वेदभाष्यासाठी निश्चित वाहिलं असतं ! १२ फेब्रुवारी १८२४ ते आज !


गेल्या २० वर्षात जितक्या महापुरुषांचं चरित्र आणि साहित्य अभ्यासलंय, त्यात जे पाच अनुकरणीय नि आदरणीय वाटतात, त्यातला हा चौथा सत्पुरुष! 


युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।


कुठलाही महापुरुष हा १००% निर्दोष नि अचूक कधीच नसतो, अपवाद केवळ भगवान श्रीरामचंद्र नि भगवान श्रीकृष्ण, हे दोन सोडले तर मी माझ्या आयुष्यात कुणालाच अंतिम नि निर्दोष मानत नाही, त्यामुळे महर्षि श्रीदयानंद नामक आपल्या काही मंतव्याशी माझेही काही प्रामाणिक मतभेद अवश्य आहेत नि राहतील, पण तरीही या सर्वांमागची आपली भूमिका निःसंदेह निःस्वार्थी नि निरलस नि विशुद्ध अंतःकरणाची होती ह्यात काहीच शंका नाही. आपल्या पाखंड खंडणाच्या हेतुविषयी माझ्या मनात तरी कधीच शंका नव्हती नि नाही. इतरांचं मला घेणंदेणं नाही, माझ्यापुरता मी ठाम आहे! इतकंच नव्हे तर आपल्या काही मंतव्यांमध्ये बदल करण्यासही मी आपणांस भाग पाडलं असतं कारण मी व्यक्ती पूजक नाही.


इतकं निश्चित आहे की श्रीदयानंदांची वेदांविषयीची भूमिका जी त्यांनी ऋग्वेदादिभाष्यभूमिका या त्यांच्या अमर ग्रंथामध्ये मांडली आहे, तीविषयी मी पूर्ण निश्चित आहे. अर्थात या ग्रंथाचे किंवा श्रीदयानंद प्रणीत मंतव्याचे खंडन करण्याचे कितीतरी प्रयत्न मागील दीडशे वर्षात अनेक विद्वानांकडून झालेले असले तरी व त्याला प्रत्यक्ष महर्षींकडून जीवितपणी व पश्चात् आर्यसमाजातल्या विद्वानांकडून तितकंच प्रत्युत्तर व पुन्हा त्याला इकडून उत्तर असा खेळ बराच झालेला असल्याने व तो सर्व अभ्यासला असल्यानेच मी श्रीदयानंदांच्या वेदांविषयीच्या भूमिकेशी तरी पूर्ण सहमत आहे, कालत्रयीही तींत बदल होईल असे आत्ता तरी वाटत नाही...!


आता प्रामाणिक मतभेदाचे जे दोन चार विषय आहेत, ते कधीतरी निवांत मांडीन ! 


कुठलाही महापुरुष नि त्याचे विचार हा त्याकाळचा उत्पाद असतो, त्यामुळे आज शेकडो वर्षानंतर आपल्या घरी निवांत खुर्चीवर बसून हातात कर्णपिशाच्च घेऊन तत्कालीन महापुरुषांच्या मतांची चिकीत्सा किंवा समीक्षा करणं हे कित्तीही सोप्पं असलं तरी ते करताना आपलीही तितकी लायकी आहे का हे पाहणं आवश्यक आहे, हा विवेक अंगी बाळगला तर बरेच वाद मिटतील.


कारण व्यक्तीपुजेने या राष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण मानव समाजाची जितकी हानी झालेली आहे, तितकी अन्य कशानेही नाही. एकीकडे लाभही झाला आहे हेही तितकंच खरं. पण वेद व्यक्तीपुजेची मान्यता देत नाहीत, हिंदुसमाज हा व्यक्तीपूजक कधीच नव्हता, तो व्यक्तीच्या आदर्शांची, सद्गुणांची, चारित्र्याची पुजा करणारा होता, त्यामुळेच तो एखादा महापुरुष चुकला तर त्याच्या चुकीला चुक म्हणणारा होता. गुरोरप्यवलिप्तस्य। किंवा उन्मार्गगामिनं - स्कंद पुराण


पण हिंदुसमाज हा या वेदमार्गापासून दूर गेल्याने मधील काळात मतमतांतराचा झालेला गलबला हा या व्यक्तीपुजेचाच परिणाम आहे ही गोष्ट कोणत्याही सूज्ञांस नाकारता येणार नाही. आज ही परिस्थिती फारशी काही वेगळी आहा अशातला भाग नाही. आणि म्हणून या मतमतांतराच्या गलबल्याने चिंतित झाल्याने या श्रीदयानंद नामक दिवाकराने सर्व मतांची समीक्षा करण्याचा जो घाट सत्यार्थ प्रकाश या त्यांच्या अमर ग्रंथामध्ये घातला, त्या ग्रंथालाही जितकी खंडणं विद्वानांकडून मागील दीड शतकांत निर्मिली गेली, त्यालाही वाद-प्रतिवाद झाले, आजही होताहेत, तेही सर्व अभ्यासल्यानंतर महर्षींच्या प्रत्येक वाक्याची तपासणी करून मूळ हेतुविषयी शंका घेण्याचं पाप मी तरी करणार नाही. 


मतभेद असणं हे बुद्धी जीवित असल्याचे लक्षण आहे...


आपल्या पूर्वजांनी या मत-मतांतराच्या गलबल्याला कधीही धिक्कारलं नाही आणि श्रीदयानंद यांचा प्रयत्न सुद्धा काही अशा तुच्छ हेतूचा होता अशातलाही भाग नाही.


अर्थात गेल्या १२-१३ वर्षांच्या तुलनात्मक अध्ययनापश्चात् निष्कर्षाला येताना जाताजाता इतकंच सांगणं आवश्यक आहे की


एक दोन-चार गोष्टी सोडल्या तर श्रीदयानंदांची मंतव्ये ही सर्व प्राचीन परंपरेला अनुसरूनंच आहेत, त्यांनी फार काही नवीन मत मांडलंय अशाचा भाग मूळीच नाहीये, वरवरपाहता आपल्याला तसं वाटायला लागतं, अर्थात संप्रदायाभिनिवेशी नि स्वमतांध लोकांना हा समन्वयाचा विवेक असणं संभव नाही नि आमची तशी त्यांच्याकडून अपेक्षाही नाही.


म्हणूनंच आमच्यापुरतं आह्मीं एकीकडे श्रीशंकराचार्य, श्रीज्ञानोबा-श्रीतुकोबांनाही धर्ममजिज्ञासेत आप्त म्हणून प्रमाण मानतो व इकडे त्यांच्या काही मतांची समीक्षा करणाऱ्या श्रीदयानंदांनाही तितकंच मानतो. 


यात काही आक्षेपार्ह आह्मांस तरी वाटत नाही!!! अन्ततोगत्वा सर्व एकंच आहेत !


हा सत्पुरुष आज जीवित असता तर आमचा हा आर्यावर्त, हे प्राचीन हिंदुराष्ट्र निःसंदेह विश्वगुरूच्या पदावर केव्हाच आरुढ झालं असतं! पण दैवदुर्विलास ! अर्थात या सर्व महापुरुषांनी आपल्या स्कंधावर दिलेलं त्यांच्या मार्गावर चालण्याचं दायित्व मात्र शेवटपर्यंत वहन करणं आवश्यक आहे!!!


शेष, वेदांकडे पुन्हा वळणं म्हणजे हिंदू धर्माला किंवा संस्कृतीला, परंपरेला, हिंदुसमाजाला एका पुस्तकापुरतं मर्यादित करणे म्हणजे संकुचित करणं असं ज्या पढतमूर्खांना आणि आजच्या तथाकथित नवहिंदुत्ववाद्यांना वाटतं, त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करण्याची माझी इच्छा मुळीच नाही, कारण त्यांच्यासाठी मला खरंच वेळ नाही! ज्या हिंदुत्ववाद्यांची इतिहासाची सुरुवात ही वेदांमध्ये आमचे आर्य इकडून आले की तिकडून गेले हे मांडण्यातूनंच होते, त्या आंधळ्यांनी मला तरी अक्कल शिकवायला येऊ नये हे नम्रतेची विनंती!


अंतिमतः महर्षींचे स्वतःचे शब्द आहेत ते पाहुयांत...


"बन्धु, हमारा कोई स्वतंत्र मत नही हैं| मैं तो वेद के अधीन हूं और हमारे भारत में पच्चीस कोटी आर्य हैं| कई कई बात में किसी किसी में कुछ कुछ भेद हैं, सो विचार करने से आप ही छूट जायेगा| मैं एक संन्यासी हूँ और मेरा कर्तव्य यही है कि जो आप लोगों का अन्न खाता हूँ इसके पर्यायमें जो सत्य समझता हूँ उसका निर्भयता से उपदेश करता हूँ| मैं कुछ कीर्तिका रागी नहीं हूँ| चाहे कोई मेरे स्तुति करें व निन्दा करें, मैं अपना कर्तव्य समझके धर्म बोध करता हूँ| कोई चाहे माने वा न माने, इसमे मेरी कोई हानि लाभ नहीं हैं|"


वेदंच सर्वोच्च प्रमाण माना म्हणणारं आपलं हे मत पुढे जाऊन आपली ही आर्यसमाजाची विचारधाराच एक स्वतंत्र पंथ किंवा मत किंवा संप्रदाय बनेल ह्याची भीती‌ प्रकट करताना सर्वांना सावध करताना महर्षि श्रीदयानंद म्हणतात...


मी सर्वज्ञ नाही - इति महर्षि दयानंद


"..और मै सर्वज्ञ भी नही हूँ| इससे यदि कोई मेरी गलती आगे पाई जाय, युक्तिपूर्वक परीक्षा करके इसी को भी सुधार लेना| यदि ऐसा न करोगे तो आगे यह भी(आर्य्य समाज विचारधारा) एक मत हो जायेगा और इसी प्रकार से 'बाबा वाक्यं प्रमाणं' करके इस भारत में नाना प्रकार के मत मतान्तर प्रचलित होके, भीतर भीतर दुराग्रह के रख के लढके नाना प्रकार की सद्विद्या का नाश करके यह भारत वर्ष दुर्दशा को प्राप्त हुआ हैं| इसमे यह भी एक मत (आर्य समाजका) का बढ़ेगा| मेरा अभिप्राय तो हैं कि इस भारत वर्ष मे नाना प्रकार के मतमतान्तर प्रचलित हैं वो भी, ये सब वेदों को मानते हैं इससे वेदशास्त्र रुपी समुद्र में यह सब नदी नाव पुन: मिला देने से धर्म ऐक्यता होगी| और धर्म ऐक्यता से सांसारिक और व्यावहारिक सुधारणा होगी और इससे कला कौशल आदि सब अभीष्ट सुधार होके मनुष्य मात्र का जीवन सफल होके अन्त में अपना धर्म बल से अर्थ, काम और मोक्ष मिल सकता है|"


कालच्या २००व्या जयंतीनिमित्त या अत्यंत वंदनीय नि महनीय ऋषिश्रेष्ठाच्या चरणी कोटी अभिवादन !!!


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_देव_दयानंद_आर्यसमाज_जन्मद्विशताब्दी_वैदिकहिंदुधर्म_संप्रदाय_उपासना