Tuesday 15 August 2023

अखंड हिंदुराष्ट्र लेखमाला - लेखांक प्रथम

 


ते - अखंड हिंदुराष्ट्र ही संकल्पना अव्यवहार्य आहे, आत्मघातुकी आहे, व्यवहारशून्यतेचा कळस आहे.


आह्मीं - काय नपुंसका पद्मिनीचें सोहळें। वांझेसी डोहाळें कैचें होतीं। श्रीनाथ


तुमच्यासारख्या गांधीवादी क्लीबांना, ती कल्पना, तो विजिगीषु राष्ट्रवाद हा अव्यवहार्य नि आत्मघातुकाच वाटणार रे! गांधींनी अखंड हिंदुस्थान नाकारून उपकार केलेत ह्मणें! अरे शेतजमिनीचा बांधावरचा एक कोपरा घेतला तर सख्ख्या भावालाही न्यायालयात खेचता आणि इथे तुमची एकतृतीयांश मातृभु त्या पैशाचपंथी इस्लामांधांनी हिसकावून घेतली, ती तुम्हाला परत घ्यावीशी वाटत नाही? किती तो नेभळट गांधीवाद?


ते - अहो हे सगळं भावनिक आहे, आह्मांलाही नकोय का अखंड हिंदुराष्ट्र पण इथले तीस कोटीच आधी झेपेनात, ते आणखी कुठे उरावर घ्यायचे? काय हाल होतील आपले कळतंय का तुम्हाला ? किती दिवस वेडगळ आशेवर जगणार? Be Practical!


आह्मीं - ह्या सर्वाची जाणीव आह्मांस नाहीये का ? आह्मीं बोळ्याने दुध पितो का???


ते - मग आधी इथल्या समस्येचे काय ते तरी सांगा. त्या तीस कोटींचे काय करणार आहात? तुम्ही त्यांना अकारण शत्रु का समजता ? तेही या राष्ट्राचा एक घटक आहेत, त्यांचाही डीएनए एकंच आहे, उपासना पद्धती भिन्न असली तरी त्यांचेही मूळ इथलंच आहे की, मग अकारण शत्रुत्वाची भावना का? 


आह्मीं - कोण त्यांना स्वतःहून शत्रु मानतंय पण? की ते आह्मांस मानतात? सत्य काय ते तुम्हालाही माहितीय की...


ते करतात का कधी विचार १००कोटी हिंदुंचं काय करणार? त्यांना असते का ही भीती??? पण षंढासारखं सारखं सारखं 'त्या तीस कोटींचं करायचं काय' हा विचार तुम्ही आह्मींच करतो ना? अरे त्यांना राष्ट्रीय प्रवाहात यायला कुणी रोखलंय का? दिवसातून पाच वेळा ढुंगण वर करून काफीर हिंदुंच्या 'गझवा ए हिंद'चे विनाशाचं स्वप्न पाहणारे ते कुठे आणि त्यांच्या भीतीने हात पाय गाळलेले तुमच्यासारखे हिंदुत्ववादी म्हणविणारेही कुठे?


ते - अहो पण त्यांच्यातले तरी सगळेच कुठे तसे आहेत ?  


आह्मीं - आह्मीं कुठे सर्वांना तसं म्हणतोय पण मग हे जे 'तसे' नाहीयेत ते का त्यांच्यातल्या 'तसे' असलेल्यांचा धिक्कार करत नाहीत? दाखवा बरं एक तरी उदाहरण ! उलट ते याबाबीतही अल तकिया करतात आणि जो तुमच्यासारख्या बालबुद्धीच्या समान डीएनए वाल्यांना तर समजतंच नाही नि समजून घ्यायची तुमची मानसिकताही नाही


ते - ठीकंय मग ह्यावर उपाय काय काही ठोस कार्यक्रम, काही योजना, काही नियोजन???


आह्मीं - ते सांगण्यासाठी तर हा लेखनप्रपंच आहे कारण आह्मीं कुणी भोळेभाबडे, भावनाविवश झालेले अभिनिवेशी हिंदु नाही आहोत, उलटपक्षी अत्यंत व्यवहारदक्ष नि वास्तवाचे भान असलेले युवक आहोत. आह्मीं संविधानाला प्रमाण मानणारे आहोत....


भारतवर्षासमोर अनेक समस्या आहेत ज्यावर नुकतीच दोन व्याख्याने दिली आहेत, ती सविस्तर मांडणार आहोतंच, त्यापैकी प्रामुख्याने तीन समस्या आहेत, ज्या अगदी वैश्विकही आहेत


१ इस्लाम 

२ ख्रिश्चनिटी 

३ साम्यवाद/समाजवाद/मार्क्सवाद अर्थात समस्त डावे


यातल्या पहिल्या दोन समस्या तर अत्यंत गंभीर आहेत व उघडउघड राष्ट्रघातकी, संविधानद्रोही, हिंदुद्रोही आहेत, तिसरी समस्याही तितकीच समान गंभीर असली तरी पहिल्या दोन्हींचा विचार सांप्रतसमयी अत्यंत निकडीचा आहे. कालच्या अखंड हिंदुस्थान संकल्प दिनानिमित्त नि आजच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ही लेखमाला आरंभ करतो आहे


Stay tuned 


सर्वेभ्यो नमो नमः। स्वतन्त्रता दिवसस्य सर्वेषां कृते हार्दिकं अभिनन्दनम्। 


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#अखंडहिंदुस्थान_हिंदुराष्ट्र_स्वातंत्र्यदिन_भारतमाता_संविधान_संकल्प

Sunday 6 August 2023

महाराष्ट्र पतंजलींची आज जयंती - महामहोपाध्याय श्रीवासुदेव शास्त्री अभ्यंकर




गेली कैक वर्षे जो लेख लिहायचा म्हणत होतो, ती वेळ आज आली, मागे फार अल्पसं लिहिलं होते. महाराष्ट्रात वैदिक व्याकरण हा शब्द ऐकला की जे पहिलं नाव डोळ्यासमोर येते, त्या वैय्याकरणी सत्पुरुषाची आज जयंती ! 


काय योगायोग आहे आज ! तिथी आहे अधिक श्रावण वद्य षष्ठी. नेमकं याच तिथीला आंग्लदिनी ४ ऑगस्ट, १८६३ या वर्षी म्हणजे आज पावेतो १६० वर्षांपूर्वी महामहोपाध्याय श्रीमद् वासुदेव शास्त्री अभ्यंकरांचा जन्म महादेवभट्ट व दुर्गाकाकु या दांपत्याच्या पोटी साताऱ्यात झाला. पुरुषोत्तम मासी हा पुरुषोत्तम जन्मांस आला. ज्येष्ठ चिरंजीव दामोदरपंत, द्वितीय रघुनाथशास्त्री नि तृतीय वासुदेवशास्त्री! बालपणापासून मेधाशक्ती अतितीव्र असल्याने वयाच्या पांचव्या वर्षी 'श्री' हे धुळाक्षर गिरविण्यापूर्वीच या मेधावी बालकाचा पाणिनीय धातुपाठ व समासविग्रह अक्षरशः मुखोद्गत होता. पुढे सातव्या वर्षापर्यंत संपूर्ण अमरकोष व भगवान श्रीपाणिनींची अष्टाध्यायी या मेधावी बालकाने कंठस्थ केली. काय बुद्धी असेल !


आणि हे सर्व कसं तर घरातंच पाठशाळा असल्याने आजोबांकडे जे विद्यार्थी शिकायला यायचे, त्यांचे नित्यपठण श्रवण करूनंच !


वडील अचानक निवर्तल्याने आजोबांनी सांभाळलं. आजोबांचे नाव भास्करशास्त्री. परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी तिन्ही भावंडांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शास्त्रीजींचे शिक्षण पूर्ण झालं ते महर्षि रामशास्त्री गोडबोलेंकडे साताऱ्यातंच. त्यांना महर्षि ही पदवी प्रत्यक्ष न्यायमूर्ती रानडे यांनी दिली होती.


*आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत कोणताही व्यत्यय न येता आपल्या हातून विद्येची उपासना घडावी, या प्रतिज्ञेने जीवनबद्ध झालेल्या शास्त्रीबोवांनी आपल्या गुरुकडे न्याय व व्याकरणशास्त्राचे सखोल अध्ययन केलं. एकुण वीस वर्षांच्या प्रदीर्घ अध्ययनकालात त्यांनी मुख्यतः व्याकरणावरचे कौमुदी-मनोरमा-परिभाषेंदुशेखर आदि अनार्ष ग्रंथ, वेदांताच्या दृष्टीने अद्वैतसिद्धी व ब्रह्मसूत्रशांकरभाष्य, न्यायदृष्टीने तर्कसंग्रहादि ग्रंथ व स्वशाखेचे म्हणजे तैत्तिरीय संहिता व त्याचा ब्राह्मणग्रंथ हे सर्व मुखोद्गत केले.*


वास्तविक पाहता व्याकरणशास्त्राची मूळ परंपरा ही सुत्रक्रमानुसारी होती पण अनार्ष ग्रंथांमुळे ती प्रक्रियानुसारी होऊन प्रचंड कठीण व वेळखाऊ झाली. ही परंपरा मूळ आर्षग्रंथांची म्हणजे पाणिनीय शिक्षा, धातुपाठ, अष्टाध्यायी, काशिका नि महाभाष्य अशी तीन किंवा फारतर पाच वर्षातंच पूर्ण होणारी असली तरी आह्मीं वर ज्या अनार्ष शब्दाने उल्लेख केला, त्या ग्रंथांनी ती बिघडून टाकली म्हणूनंच की काय प्रत्यक्ष शास्त्रीबोवांनाच 'द्वादश वर्षं व्याकरणं श्रुयते' या रुढीप्रिय वचनामुळे एकुण बारा वर्षांचा कालावधी लागला. हा अनार्ष आणि आर्ष प्रकार नेमका काय आहे ह्यावर कधीतरी सविस्तर लिहू.


*आमच्या पंढरीत एक मास वास्तव्य*


शास्त्रीबोवांच्या आजोबांचे एक शिष्य म्हणजे आमच्या भुवैकुंठीचे श्रीविठ्ठलशास्त्री धारुरकर ह्यांची एक संस्कृत पाठशाळा पंढरीत त्यावेळी होती, तींत एक मास शास्त्रीजी अध्यापनासाठी राहिले. परंतु इथे आपला निर्वाह होईल असे न दिसताच ते साताऱ्यांस परत गेले. ह्या धारूरकर कुटुंबाविषयी अनेकांना माहिती असेलच. या विठ्ठलशास्त्रींचा प्रायश्चित्त व्यवहार प्रकाश नावाचा एक उत्तम ग्रंथ उपलब्ध आहे, पीडीएफ आहे.


*पुढे पुण्यातंच कायमचं वास्तव्य*


'अधिष्ठान तथा कर्ता' या गीतोक्तीप्रमाणे शास्त्रीबोवांनी आपल्या आयुष्याचा पुढचा जवळजवळ पन्नास वर्षांचा काळ हा पुण्यात घालविला, तेच त्यांचे कार्यक्षेत्र झालं.  त्यांच्या गुरुने दिलेले पत्र घेऊन ते न्यायमूर्ति रानड्यांकडे येताच त्यांची व्यवस्था तिथे लागली ती कायमचीच. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये १८९२ साली अध्यापनाचे कार्य आरंभ करून पुढे ३६ वर्षे त्यांनी ते सुुरु ठेवले. त्याचबरोबर आपल्या पाठशाळेत ५२ वर्षे संस्कृत अध्यापनाचे कार्य केले. पुण्यामध्ये अभ्यंकर पाठशाळा कुमठेकर रस्त्यावर प्रसिद्ध आहे, तिथे त्यांची ग्रंथसंपदा प्राप्त होते.


*ब्रह्मसूत्रशांकरभाष्याचा मराठी अनुवाद*


शास्त्रीबोवांच्या हातून जी काही ग्रंथसंपदा निर्माण झाली, तींत भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्याचा मराठी अनुवाद हे होय. खरंतर त्यांच्यापूर्वी आचार्यभक्त श्रीविष्णु वामन बापटशास्त्रींनी हे कार्य करून ठेवलंच होते. बापटशास्त्रींविषयी काय लिहावं? सविस्तर कधीतरी येईन. त्यानंतर वाईच्या श्रीलेलेशास्त्रींनीही ब्रह्मसूत्रशांकरभाष्याचा अनुवाद केलाच होता, हे दोन्ही अनुवाद पीडीएफ आहेतच. पण या सर्वांमध्ये शास्त्रीबोवांच्या हातून झालेला हा अनुवाद अत्यंत रसाळ व सर्वसामान्यांस समजेल इतका सोप्पा आहे. यद्यपि हा विषय कठीण असला तरी. कारण भगवान शास्त्री धारूरकरांनी म्हटल्याप्रमाणे दुर्बोध विषय सुबोध करून सांगणे, हीच त्यांची कुशलता होती.


*एकुण चार खंडात हे काम केवळ सव्वा दोन वर्षात पूर्ण केले*


बडोद्याच्या गायकवाड सरकारने श्री. चांदोरकर आणि शास्त्रीबोवा या दोघांना हे काम सोपवलं होतं. आरंभी चांदोरकरांबरोबर एक वर्षात निम्मं काम पूर्ण करून त्यांच्या अकाली देहावसानाने शास्त्रीबोवांनी पुढील एक वर्षात शेष सर्व भाष्य अनुवादित तर केलंच पण त्याचबरोबर बडौद्याच्या गायकवाड सरकारच्या सांगण्यावरून अन्य तीन आचार्यांचे म्हणजे श्रीरामानुजाचार्य, श्रीवल्लभाचार्य व श्रीमध्वाचार्य अशा तीनही आचार्यांच्या भाष्यासोबतचे तुलनात्मक कोष्टक तयार करून चोथा खंडही मुद्रणांस दिला. सुदैवाने हे चारही खंड आंतरजालांवर पीडीएफ स्कैन आहेत. गायकवाड सरकारने हा ग्रंथ इसवी सन १९११साली प्रकाशित केला. भगवान पूज्यपाद श्रीशंकराचार्यांचे केवलाद्वैत अथवा मायाद्वैत, श्रीरामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत, श्रीवल्लभाचार्यांचे शुद्धाद्वैत व श्रीमध्वाचार्यांचे शुद्धद्वैत ही चार मते भारतवर्षामध्ये प्रकाशित आहेत, ज्या सर्वांवर तुलनात्मक भाष्य शास्त्रीबुवांनी चौथ्या खंडामध्ये केलं आहे. शास्त्रीबुवांचा आणखी मोठेपणा म्हणजे या कार्यासाठी मिळालेले पाच सहस्त्र रुपये त्यापैकी निम्मे म्हणजे अडीच सहस्त्र त्यांनी तात्काळ चांदोरकरांच्या पत्नीला देऊन टाकले. याला म्हणतात नि:स्पृहता!



सर्वदर्शनसंग्रहाच्या स्वोपज्ञ 'दर्शनाङ्कुर' नामक टीकेने त्यांचा गौरव संपूर्ण भारतामध्ये महापंडित म्हणून झाला. एकुण १६ दर्शनांचा विचार इथे केला गेला आहे. त्यांच्या अन्य विपुल ग्रंथसंपदेमध्ये श्रीमधुसूदन सरस्वतींच्या सिद्धांतबिंदुवरची त्यांची टीका, तत्कालीन धर्मसंघर्षावर 'धर्मतत्वनिर्णय' नावाचा त्यांचा ग्रंथ, मीमांसान्यायप्रकाश, श्रीगीतेवरील पहिल्या दोन अध्यायांवर 'अद्वैताङ्कुर' नावाची टीका ही त्यांच्या विपुल ग्रंथसंपदेपैकी काही उल्लेखनीय आहेत. आश्चर्य म्हणजे गीतेवर भाष्य करताना त्यांनी भावार्थदीपिकेचा म्हणजे श्रीज्ञानेश्वरीचाच आधार घेतला आहे, हे त्यांनी हेतुपुरस्सर नमुद केलं आहे. ज्ञानेश्वर दर्शन नावाच्या नगर इथून प्रकाशित झालेल्या दोन खंडांमध्ये आरंभी त्यांचा प्रस्तावनारुपी लेख आहेच. नुकताच त्याचे पुनर्प्रकाशन झाले आहे.


*व्याकरणमहाभाष्याचा मराठी अनुवाद - अलौकिक आणि दिव्य कार्य*


आम्हांस व्यक्तिशः वासुदेवशास्त्री हे नाव कऴलं, ते त्यांच्या याच दिव्य कार्यामुळे. होय दिव्यंच! कारण भगवान महर्षि श्रीपतंजलींच्या व्याकरणमहाभाष्याचे मराठीत अनुवाद हे अचाट कार्य आहे. संस्कृत व्याकरणशास्त्राची मूळ पुस्तके ही दोनंच


*अष्टाध्यायी-महाभाष्ये द्वे व्याकरणपुस्तके| अतोऽन्यत् पुस्तकं यत्तुं तत्सर्वं धूर्तचेष्टितम्|*


व्याकरणशास्त्राच्या‌ परंपरेमध्ये आह्मीं वर उल्लेखिल्याप्रमाणे ज्या प्रक्रिया ग्रंथांनी म्हणजे अनार्ष ग्रंथांनी धुमाकूळ घालून आधीचं सुलभ असलेलं आर्ष व्याकरण हे अत्यंत‌ बोजड‌, किचकट व वेळखाऊ करून ठेवलं, ते पुन्हा पूर्वस्वरुपांस प्राप्त करून देण्याचे श्रेय महर्षि श्रीदयानंदांचे गुरु वैय्याकरणसूर्य श्रीविरजानंद दंडी सरस्वती यांस जातं. आता आह्मीं प्रक्रिया ग्रंथांना नावे ठेवतो कारण आह्मीं आर्यसमाजी आहोत, म्हणून आमच्यावर शंका घेणाऱ्यांना आह्मीं सांगु इच्छितो की आर्यसमाजाचा किंवा श्रीदयानंद-विरजानंदांचा जन्मही नव्हता, त्याच्या कैक शतके आधीच पंडितराज जगन्नाथ व अन्यांनी ह्या अनार्ष व्याकरण ग्रंथांचा धिक्कार करणारी ग्रंथसंपदा रचलीय, जी सुदैवाने प्रकाशितही आहे. अप्पय्य दीक्षितांना तर त्यांनी गुरुद्रोही म्हटलंय, यावर कधीतरी सविस्तर येऊ.  त्यामुळे वैदिक व्याकरण मूळचं सुलभ करणाऱ्या दोन ग्रंथांपैकी भगवान महर्षि श्रीपतंजलींचा हा महाभाष्य नावाचा ग्रंथ जो भगवान श्रीपाणिनींच्या अष्टाध्यायीवरील भाष्य ग्रंथ आहे, त्याचा मराठीत सप्तखंडात्मक अनुवाद करणं हे कार्य शास्त्रीबोवांच्या जीवनदर्शनावर कळस चढविणारा अध्याय आहे. हे काम करून शास्त्रीजींनी आमच्यासारख्या वेदादिवाङ्मयाच्या व संस्कृतभाषेच्या विद्यार्थ्यांवर जे काही उपकार करून ठेवले आहेत, ते ऋण कधीही फिटणारे नाही. खरंतर या एकाच कार्यासाठी शास्त्रीबोवांचे आह्मीं सदैेव ऋणी आहोत.



हा अनुवाद शास्त्रीबोवांनी फर्ग्युसनमधील निवृत्तीपश्चात् म्हणजे वयाच्या ६५व्या वर्षी करायला घेतला होता व तो त्यांनी सहा खंडात पूर्ण केला, सातवा खंड हा प्रस्तावना खंड आहे, जो त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे महामहोपाध्याय श्रीकाशीनाथ शास्त्री अभ्यंकरांनी लिहिला आहे.


अशाप्रकारे एकुणंच व्याकरण, वेदांत, योग, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र या विषयांवर जवळजवळ ६००० हून अधिक पृष्ठांचं लिखाण शास्त्रीबोवांनी केलंय. हे कार्य फर्ग्युसनचे अध्यापन व संस्कृत पाठशाळेतलं अध्यापन ही दोन्ही कार्य सांभाळत करणं हे शास्त्रीबोवाच करु शकत. या दीर्घोद्योगी सत्पुरुषाच्या या यशस्वी जीवन कार्यकलापाचे रहस्य कशात आहे, असे विचारल्यावर एकंच उत्तर येईल


*'शुद्ध नैतिक आचरण, ऐहिक सुखाविषयी अगदी मर्यादित अपेक्षा व नित्य कार्यमग्नता ही त्रिसुत्री होय.'*


ज्या गुरू साखरे परंपरेचे आह्मीं शिष्य आहोत, त्या परंपरेतले आमचे आजेआजेगुरु श्रीविनायकबोवा साखरे महाराज हेदेखील शास्त्रीबोवांचेच शिष्य! साखरेवंशविख्यातं ज्ञानदानपरायणं। 


हे कार्य प्रत्यक्ष परमेश्वरानेच त्यांच्याकडून करून घेतले आहे, हे त्यांचे व्याकरण महाभाभाष्याच्या प्रस्तावनेतले उद्गार अक्षरशः सत्य आहेत. अश्विन शुक्ल चतुर्थी, शके १८६४, दिनांक १४ ऑक्टोबर, १९४२ला शास्त्रीजींचे देहावसान झालं. शास्त्रीबोवांचे विस्तृत चरित्र आंतरजालांवर पीडीएफ आहेच. 


https://www.rasik.com/books/MarathiiBooksFromOUDLbyTitle.html


महाराष्ट्राच्या या पतंजलींस जयंतीनिमित्त शिरसाष्टांग दंडवत व कोटी प्रणाम!


#महाराष्ट्रपतंजली_वासुदेवशास्त्री_अभ्यंकर_व्याकरणमहाभाष्य_पुणे_संस्कृतभाषा_ब्रह्मसूत्रशांकरभाष्य