Monday 30 May 2016

मधुपर्कात गोमांस किंवा मांस खरंच आहे काय??



तुका म्हणे भय न धरी माणसी ! ऐसीयाचे विषी करिता दंड ! 
तुका म्हणे सत्य सांगे ! येवोत रागे येतील ते ! 
गुण अवगुण निवाडा ! म्हैस म्हैस रेडा रेडा ! 
हा तो निवाड्याचा ठाव ! खर्या खोट्या निवडी भाव ! अंगे उणे त्याचे बसे टाळक्यात ! तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी ! धक्का खवंदासी लागतसे !
टाका तार्किकाचा संग ! पांडुरंग नित्य स्मरा हो ! 
भूंकती ते द्यावी भूंको ! आपण ते शिको नयें !

जगद्गुरु तुकोबाराय

सध्या व्हाॅट्सप फेसबुकवर एक संदेश फिरतोय की  एका लग्न समारंभात म्हणे एका ब्राह्मणाला तिथल्या कुणीतरी मंगलाष्टका म्हणतांना "गृह्योक्ते मधुपर्क" ह्या मंगलाष्टकाचा अर्थ विचारला व गाईच्या मांसाचा उल्लेख मधुपर्कात आहे असं ठरवून मारलं म्हणे ! आता हा संदेश कितपत खरा खोटा हा भाग नंतरचा पण हे का ते आपण पाहु ! महाराष्ट्र राज्य सरकारने गोहत्या बंदी विधेयक आणल्यामुळे काही जणांच्या पोटात दुखी निर्माण झालेली आहे. मग ते मुसलमान असोत, ख्रिस्ती असोत, साम्यवादी किंवा पुरोगामी सेक्युलर पिलावळ असो. ह्यांच्या मतानुसार जर वेदांतच गोमांस आहे तर राज्य सरकारने गोहत्याबंदी का करावी असा ह्या पढतमूर्खांचा आक्षेप आहे. असो ! तर आता प्रस्तुत लेखात आपण मधुपर्कात गोमांस किंवा कुठलेही मांस असते काय ते पाहु व नक्की मधुपर्क म्हणजे काय ते समजाऊन घेऊ म्हणजे शंका दूर होईल ! 


मधुपर्क शब्दाचा पहिला संदर्भ 

अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की मधुपर्क हा वैदिक आहे व त्यामध्ये मांस हे अत्यावश्यकच आहे. पण मुळात मधुपर्क हा शब्दच अथर्ववेदांत एकाठिकाणी सोडला तर तसा तो ना ऋग्वेदामध्ये आढळतो ना सामवेद ना यजुर्वेदामध्ये ना तो कोणत्याही उपनिषद किंवा ब्राह्नणग्रंथामध्ये आढळतो. मग तो आहे तरी कुठे नेमका???

तो फक्त एकाच ठिकाणी आढळतो व तो म्हणजे अथर्ववेदात एकाठिकाणी फक्त मधुपर्काचा काय तो उल्लेख मिळतो तो खालीलप्रमाणे ! 

यथा यश: सोमपीथे मधुपर्क: यथा यश: !
(अथर्ववेद - १०.३.२१)
"जसे यश सोमपानात आणि मधुपर्कात आहे, तसे यश मला मिळो."

हा एवढाच त्रोटक व एकमेव उल्लेख आहे.

आता मधुपर्काची व्याख्या काय???

ह्या संदर्भात वेदांमध्ये किंवा ब्राह्नण ग्रंथामध्ये किंवा उपनिषदांमध्ये पुसटसा उल्लेखही नाही. जर तो असता तर निदान हे ठरविता आलं असतं की मधुपर्काची व्याख्या काय किॅवा त्यात काय असतं व काय नसतं ते ! पण अनेक जण हे लक्षातच घेत नाहीत व आरोप करून मोकळे होतात. 

आता मधुपर्क म्हणजे नक्की काय तर पूर्वीच्या काळी एखादा ऋषी, महर्षी किंवा अन्य कुणी अतिथी म्हणून जेंव्हा घरी येतो किॅवा कुठल्याही विवाह समारंभात वराच्या स्वागतासाठी मधुपर्क देण्याची प्रथा असे. आजही ती सुरु आहे. विवाहात पण हा देण्यात येतो. पण ह्या मधुपर्कात मांस आहे हा आरोप तथ्यहीन आहे हे आपण सविस्तर पाहणारच आहोत. 

वेदांमध्ये "मधुपेय" हा शब्द मात्र ऋग्वेदात आढळतो
तो खालीलप्रमाणे
पण मधुपर्क वेगळा व मधुपेय वेगळं ! तरीही तो खालील संदर्भ आपण पाहुयात

वृषाsसि देवो वृषभ: पृथिव्या: वृषा सिन्धुनाम् वृषभस्तियानाम् ! 
वृष्णे तु इन्दुर्वृषभ: पीपाय स्वादु रसो मधुपेयो वराय ! 
ऋग्वेद - ६.४४.२१


आता अनेक जण ह्यावरील ऋचेमध्ये वृषभ असा शब्द आला आहे हे वाचून लगेचच वृषभ म्हणजे बैल असा सोयीस्कर अर्थ काढून मोकळे होतील. खरंतर वेदांतील वचनांचा अर्थ लावणं ही काही सोप्पी गोष्ट नाही. भल्याभल्यांना ते जमत नाही. पण आजकाल कुणीही उठतो व वेदांवर लिहायला लागतो. आणि तेही पढतमूर्खाप्रमाणे ! कारण इथे वृषभ म्हणजे बैल असा अर्थ घेतला तर वेदांतल्या इतर गोसंरक्षक वचनांना बाधा येते. पण हे आक्षेपक लोक समग्र वेद न वाचता केवळ आपल्या सोयीनुसार वेदवचनांचा संदर्भ व अर्थ काढून आपल्या पढतमूर्खतेचे लक्षण प्रकट करतात. असो. 

वेदांतील वचनांचा अर्थ कसा लावायचा?

वेदांतील वचनांचा अर्थ लावण्यासाठी खालील सहा वेदांगांचा अभ्यास करावा लागतो ज्याची पुसटशी माहितीही अनेकांना नसते. अभ्यास करणं तर लांबच राहिलं. ती षडवेदांगे खालीलप्रमाणे

छंद, कल्प, शिक्षा, निरुक्त, ज्योतिष व व्याकरण ! 

पूर्वी दशग्रंथी ब्राह्मण ही जी संज्ञा प्राप्त व्हायची ती ह्याच सहा ग्रंथावरून व्हायची. म्हणजे चार वेद व हे सहा ग्रंथ किंवा वेदांगे असे मिळून दशग्रंथी असं ! ह्या सहा वेदांगांचा सखोल अभ्यास केल्यावरच वेदवचनांचा अर्थ थोडाफार का होईना पण मनुष्यांस कळु शकतो. पण आता किती जणांनी हा अभ्यास स्वत: केलेला असतो? ह्याची नावं तरी अनेकांना माहिती आहेत काय??? पण वाटेल ते ठोकून द्यायची सवयच लागलीय आपल्या लोकांना ! असो ! 


आणि आश्चर्य म्हणजे काही लोक केवळ वेद हे संस्कृत मध्ये आहेत हे पाहून एखादा संस्कृत शब्दकोश समोर धरून अनुवाद करायचं धार्ष्ट्य करतात व इथेच नेमकी गल्लत होते. काहीजण तर पाश्चिमात्यांनी केलेला वेदानुवाद वाचून वेदांवर बोलतात, तेंव्हा तर त्यांच्या अज्ञानाची कीवच करावीशी वाटते. असो आता मुळ विषयाकडे वळु ! 

वरील ऋचेचा अर्थ

"स्वादु रसो मधुपेये" ह्याचा अर्थ गोड रसाचा मधुपेय असा स्पष्ट अर्थ निघतो व तो मान्यही आहे.

पण वरील ऋचेत वृषभ शब्द वापरला आहे व त्याचा अर्थही बैल असा घेऊन लगेचच त्याचा रस म्हणजे मधुपेय असा काढून लोक लगेचच मोकळे होतात. आता आपण हा अर्थ किती चुकीचाय ते पाहु ! 

वृष, वृषभ व वृषकर्मा ह्या तीन शब्दांचा अर्थ

मोनियर विल्यम्स नावाचा आंग्ल-संस्कृत किंवा संस्कृत-आंग्ल कोशनिर्माता हा त्याच्या संस्कृत-आंग्ल शब्दकोशात ह्या तीन शब्दांचा अर्थ स्पष्टपणे सांगतो.

वृष - (i) strong or a potent man ;
(ii) The chief of the class or any thing the most excellent or prominent or best of its kind. 
वृषभ - Bull (in Veda, epithet of various gods, as of Indra),
 वृषपर्वा - Doing manly deeds as Indra (ऋग्वेद)

आता "वृषभ" शब्दाचा अर्थ जरी सर्वसामान्यत: बैल असा होत असला तरी वरील शब्दकोषानुसार वेदांच्या संदर्भात तो बैल असा न घेता (in veda, an epithet of various gods, as of Indra) म्हणजे "वेदांच्या संदर्भात अनेक देवतांचं प्रतीक जसा की इंद्र" असा घ्यायचा असं मोनियर विल्यम्स सारखा पाश्चिमात्यही म्हणतो. आता आपले एतद्देशीय संस्कृत शब्दकोश काय म्हणतात ते पाहु.
भावप्रकाश निघण्टु नावाचा आयुर्वैदिक शब्दकोश ह्या ऋषभ शब्दाचा अर्थ काय सांगतो ते पाहु
जीवकर्षभको ज्ञेयौ हिमाद्रिशेखरोद्भवौ ! 
जीवक: कूर्चकाकार: ऋषभो वृषशृंगवत् ! 
जीवकर्षभको बल्यौ शीतौ शुक्रकफप्रदौ !!
भावप्रकाश निघण्टु - प्र. १
अर्थ - हिमालयावर ऋषभक नावाची वनस्पती असते ही दिसायला अगदी बैलाच्या शिंगाच्या आकाराची असून बलवर्धक व वीर्यवर्धक व कफप्रदायक असून शीत म्हणजे थंड असते. 
अष्टांगह्रदय ग्रंथाचा संदर्भही हाच आहे
अभीरुवीराजीवन्तीजीवकऋषभकै: स्मृतम् ! 
जीवनसांख्यं च चक्षुष्यं वृष्यं पित्तानिलापहम् ! 
अष्टांगह्रदय सूत्र - ६.१६८
अर्थ - अभीरु (शतावरी), वीरा (काकोली), जीवन्ती(हरणवेल), जीवक, ऋषभक या पाच वनस्पतींच्या मुळांना जीवनपंचमुळे असे म्हणतात.
ह्यांचा गुणकर्म असा की ह्या सर्व मधुरसविपाकी, शीतवीर्य आणि वातपित्तनाशक, कफवर्धक, सप्तधातुवर्धक, बल्य, वृष्य आणि चक्षुष्य आहेत.
संदर्भ - द्रव्यगुणविज्ञान खंड १, पृष्ठ क्रमांक २७
थोडक्यात जिथे जिथे बैलवाचक अर्थात वृषभ, उक्षा वगैरे शब्द येतात तिथे ते आयुर्वेदीय वनस्पती असाच अर्थ घ्यायचा आहे हे स्पष्ट आहे. आता असा अर्थच काय घ्यायचा हे खालील पाहु
वेदांत १३६ वेळा गाईला "अघ्न्या" व बैलालाही "अघ्न्य" म्हणजे अवध्य म्हटलंय. 
१३६ वेळा ही काही थोडीथोडकी गोष्ट नाही. विस्तारभयास्तव काहीच उदाहरणे पाहु.
अघ्न्ये ! ते रुपाय ते नम: ! (अथर्ववेद शौ. १०.१०.१ व पै. १६.१०७.१)
अर्थ - हे अघ्न्य म्हणजे अवध्य गौ, तुझ्या स्वरुपांस (मी)नमन करतो.
गवां पतिं अघ्न्य: !(अथर्ववेद शौ. ९.३.१७ व पै. १६.२५.७)
अर्थ - गाईंचा पती म्हणजे बैल अवध्य आहे. 

अन्तकाय गोघातम् ! काण्वसंहिता - ३४.१७
अर्थ - गाईचा वध करणार्यास मृत्यु द्या. 

मा गां अनागां आदितिं वधिष्ट ! 
(ऋग्वेद ८.१०१.१५, तैत्तिरीय आरण्यक ६.१२.१, कौ. ९२.१४, सामवेद मं ब्राह्नण २.८.१५, पारस्कर गृह्यसुत्र १.३.२७, हिरण्यकेशी गृह्यसुत्र १.१३.१२, मान. गृह्यसुत्र १.९.२३.)
अर्थ - (अनागां) निष्पाप व काटण्याय अयोग्य (आ+दितिं) अशा गायीचा वध करु नका. तिला मारु नका. (मां वधिष्ट)
दिती म्हणजे काटण्याय योग्य व आदिती म्हणजे काटण्याय अयोग्य ! थोडक्यात निषिद्ध असलेली.
अघ्न्यौ उपसेरताम् - तैत्तिरीय ब्राह्नण - ३.७.४.१३
अर्थ - अवध्य गाईची सेवा करा.
अघ्न्यौ मा आरताम् ! (ऋग्वेद ३.३३.१३ व अथर्ववेद १४.२.१६)
अर्थ - दोन्हीही अवध्य बैल हे दु:खास प्राप्त होऊ नयेत.  ! 

आता एक भेद लक्षात घेण्यासारखा आहे तो असा की "अघ्न्या" हा स्त्रीलिंगी शब्द आहे व "अघ्न्य" हा पुल्लिंगी आहे म्हणजे गाईला अघ्न्या व बैलाला अघ्न्य म्हटलं आहे वेदांनी ! ज्याचा संस्कृत व्याकरणाचा अभ्यास आहे त्याला हे सहजपणे लक्षात येईल. असो.
आता गाईची, अश्वाची व पुरुषाची हत्या करणार्यास वेदांत सांगितलेला दंड

अनेक दीडशहाणे गोमेध, अश्वमेध, नरमेध ह्या शब्दांचा अर्थ त्यात्याप्राण्यांची हत्या असा काढून मोकळे होतात पण हे किती चुकीचं आहे हे खालील एकट्या ऋचेवरून स्पष्ट होईल. गोहत्या केली तर काय दंड करावा ह्याची वेदांत खालीलप्रमाणे शिक्षा सांगितली आहे.


यदि नो गां हंसि यद्यश्वं यदि पुरुषम् !
त्वं त्वा सीसेन विध्यामो यथा नोsसो अवीरहा ! 
अथर्ववेद - १/१६/४

अर्थ - जर तु आमच्या गाय, घोडे व पुरषांची हत्या केलीस तर आम्ही तुला शीसाच्या (शीसं)गोळीने विद्ध करु ! ज्यामुळे तु आमच्या वीरांचा वध करु शकणार नाहीस ! 

आता काण्वसंहिता काय म्हणते ते पाहु ! 

काण्वसंहिता - ३४/१८

क्षुधि यो गां विकृन्तन्तं भिक्षमाण उपतिष्ठति तम् ! 

जी गोवध करणार्यांशी भिक्षा मागतो, त्याला भूकेनेच मारा ! म्हणजे त्याला उपाशीच मृत्यु येउदे ! 


हे आहेत वेदांचे गोहत्या करणार्यांना शिक्षा ! किती कठोर आहेत हे वेगळं सांगायला नको ! तरीही काही दीडशहाणे वेदांत गोहत्या आहे असा मिथ्या प्रचार करतात ! काय करावं आता ह्यांना???

वेदांत मांसभक्षणाचा व मद्यपानाचाही स्पष्टपणे निषेध

यथा मांसं यथा सुरा यथाsक्षा अधिदेवने ! 
यथा पुंसो वृषण्यत: स्त्रियां निहन्यते मन: !
अथर्ववेद - ६.७०.१

अर्थ - जसे मांस, जसे मद्य व जसे जुगार आहे तसेच पुरुषाचे मन हे स्त्रीमध्ये नि:संदेह मारलं जातं. 

थोडक्यात ह्या चारही ठिकाणी माणसाचं पतन होत जातं अर्थात त्या उपरोक्त चारही क्रिया ह्या मनुष्यांस अत्यंत हानिकारक आहेत असा स्पष्ट अथर्ववेदांतून अर्थ निघतो. तरीही लोक जर वेदांत मांसभक्षण व मद्यपान समर्थनीय आहे असं म्हणत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीवच करायला नको का???

असो आता मधुपर्कावर मांसांचा आरोप का केला जातो ते पाहु. 

वेदांत मधुपर्काच्या घटकद्रव्यांचा (Contents) संदर्भही नाही हे आपण पाहिलं. आता मधुपर्कात मांस आहे हा खोटा आरोप खालील तीन श्लोकांवरून केला जातो तो पाहुयात

पहिला आक्षेप - न त्वेवामांसोsर्घ: स्यात् (पारस्कर गृह्यसुत्र - १.३.२९)

खंडण - आता हेच पारस्कर गृह्यसुत्र  १.३.२७ मध्ये "मां गां अनागां आदितिं वधिष्ट" असे स्पष्ट आदेश देते हे मी वर सांगितलंच आहे. तेंव्हा हा वरील श्लोक प्रक्षेप आहे हे स्पष्ट आहे. कारण हे पारस्कर गृह्यसुत्र अशी आधीच्या श्लोकात मारु नका व नंतरच्या श्लोकात मारा अशी विचित्र आज्ञा कशी देईल???

दुसरा आक्षेप - मधुपर्के चे यज्ञे च पितृदैवतकर्मणि
अत्रैव पशवो हिंसा नान्यत्रेत्यब्रवीन्मनु: !
(मनुस्मृती - ५.४१)

खंडण - अर्थ - मधुपर्क, यज्ञ व पितृश्राद्धांच्या वेळी केलेली पशुहिॅसा ही पशुहिॅसा होत नाही असं मनु म्हणतो. 

मुळात हा मनुचा श्लोक प्रक्षेप आहे हे स्पष्ट आहे हे जिज्ञासूंनी प्रा. डाॅ सुरेंद्र कुमार शास्त्री ह्यांच्या "विशुद्ध मनुस्मृती" नामक ग्रंथाचा अभ्यास करून जाणून घ्यावं किंवा प्रस्तुत लेखकाचा म्हणजे आमचाच "मनुस्मृती नि मांसभक्षण - एक चिकीत्सक अभ्यास" हा लेख वाचावा. 

तिसरा आक्षेप - नामांसो मधुपर्को भवति भवति - आश्वलायन गृह्यसुत्र (१.२४.२६)
(मांसाशिवाय मधुपर्क होऊ शकत नाही नाही असा अर्थ अनेक जण घेतात जो कितपत खराय ते खालील पाहु.)


आता आपण हे किती चुकीचंय ते पाहु.

आश्वलायन गृह्यसुत्रांतला हा संदर्भ देऊन लोक आरोप करतात की मधुपर्कात मांस आहे म्हणे ! पण ह्याच गृह्यसुत्रांत मधुपर्क म्हणजे नक्की कसा असतो ह्याची प्रक्रिया दिली आहे. 

ह्याच आश्वलायन गृह्यसुत्रांमध्ये अतिथींस किॅवा विवाहात वरांस मधुपर्क देतेवळीची प्रक्रिया सांगितलीय ती खालीलप्रमाणे

१. अतिथीचे किॅवा वराचे द्वारावर येणे
२. यजमानाने द्वारावर जाणे व त्यांचा सत्कार करणे
३. सत्कारानंतर त्यांचा आत प्रवेश
४. आसनावर बसविणे
५. पाय धुणे, चंदन, अत्तर व फुलमाळा अर्पण करणे
६. गाय आणणे व त्यांना भेट देणे (गोदान विधी)
७. मधुपर्क देणे, त्याने खाणे व त्याने नंतर हात पाय धुणे
८. पुजा समाप्त करून कुशलप्रश्न विचारणे व पुढची कार्ये करणे.


ही आहे मधुपर्काच्या वेळची प्रक्रिया ! आता ह्यात वर गोदान म्हणलं आहे पण गोहत्या करा असं कुठेही म्हटलेलं नाहीये. 

जर मधुपर्कात गोमांस असतं तर वरील प्रकियेचा अनुक्रम आपण पाहिला तर गोदान म्हणजेच गाय ही सहाव्या क्रमांकावर येते. जर मधुपर्कात गोमांस असतं तर आधीच गाय मारली असती किंवा तिचा संदर्भही अगदी पहिल्याच क्रमांकास आला असता.  पण मधुपर्क देण्याची प्रक्रिया जरी नंतरची असली तरी त्यात गोहत्या करायची असा कुठेच अर्थ प्रतिपादित होत नाही. त्यामुळे हे स्पष्ट होतेय की मधुपर्कात मांसाचा संबंधच नाही. गोहत्येचा तर नाहीच नाही. बरं जर तसा विकृत अर्थ घ्यायचा म्हटला तरी वरील आम्ही दिलेल्या गोसंरक्षणात्मक वेदवचनांनाच बाधा येते. असो.

आता मधुपर्काचे घटक (contents) पाहुयात

आता वरील "नामांसो मधुपर्को" हा आरोप इतर गृह्यसुत्रांनी किॅवा धर्मसुत्रांनी कसा खोटा ठरवलाय ते आपण वर "मां गां अनागां अदितिं वधिष्ट" ह्या श्लोकात व मधुपर्काच्या घटकांत पाहिलेच आहे.

तरीपण ह्याच गृह्यसुत्रांत मधुपर्काचे घटक सांगितले आहेत ते खालीलप्रमाणे पाहुयात म्हणजे शंकानिरसन होईल. 

१. दधिमधुसंसृष्टं मधुपर्क: पयो वा मधुसंसृष्ट: ! अभावे उदक: ! (आपस्तंब धर्मसुत्र २.४.८.८९)

अर्थ - दही व मध मिळून मधुपर्क होतो किॅवा दुध व मध मिळवून. दुधाच्या अभावी उदक म्हणजे पाणी मिळवून ! 

२. दधिसर्पिजलं क्षौद्रं सिताताभैस्तु पंचभि: !
प्रोच्यते मधुपर्कस्तु सर्वदेवोपतुष्टये ! 
(शब्दकल्पद्रुम व कालिका पुराण सप्तम अध्याय)

अर्थ - दही, तुप, दूध, मध, शर्कराखंड (साखर) हे पाच पदार्थ मिळवून मधुपर्क म्हणतात ज्याने सर्व देवता संतुष्ट होतात. 

३. आज्यं दधिमधुमिश्रं मधुपर्के विदुर्बुधा: !
(तंत्रसार - १९३८ - चौखम्बा संस्कृत प्रकाशन मालिका - अध्याय पहिला पृष्ठ क्रमांक ५३)
शब्दकल्पद्रुममध्ये सुद्धा हाच संदर्भ आहे खंड तीन, पृष्ठ क्रमांक ५९९, स्तंभ दोन)

अर्थ - विद्वान लोक मधुपर्कासाठी दही, मध व तुप ह्यांचं मिश्रण सांगतात. 

४. कांस्यपात्रे समायुक्तं दधिमधुघृतैर्युतम् ! 
मधुपर्क: स विज्ञेया मित्रस्य त्वा प्रतीक्षणी !
(याज्ञवल्क्य संहिता - आठवा अध्याय २०२ वा उतारा)

अर्थ - कांस्याच्या भांड्यात दही, मध व तुपाने बनलेला मधुपर्क तु जाणून घे.


५. दधनि मध्वानीय, सपिर्वा मध्वलाभे ! 
(आश्वलायन गृह्यसुत्र - १.२४.५.६)

अर्थ - दही आणि मध मिसळावे व मध नसेल तर तुप ! 

६. आहरन्ति विष्टरं पाद्यं पादार्थमुदकमर्धमाचनीय ! 
मधुपर्कं दधिमधुघृतमपिहितं कांस्ये कांस्यम् !
(पारस्कर गृह्यसुत्र - विवाह विषयक सुत्र १.३.५)

अर्थ - दुसर्या ओळीत मधुपर्काचे घटक सांगताना म्हटलंय की
दही, मध व तुप ह्यांनी मिश्रित कांस्यांच्या पात्रात मधुपर्क बनलेला असतो. 


आता ह्यात कुठेतरी गाईच्या किंवा कोणत्याही प्राण्याच्या मांसाचा उल्लेख आहे काहो??

बरं मोनियर विल्यम्स हा शब्दकोशकार म्हणतो

Meanings of madhuparka in Monier-Williams' Sanskrit-English Dictionary, page 780-
(i) A mixture of honey ;
(ii) An offering of honey and milk 

(iii) A respectful offering to a guest, or to the bridegroom on his arrival at the door of the father of the bride, sometimes consisting of equal parts of curd, honey and clarified butter.
आता एक साधा प्रश्न विचारतो

आम्ही तर मांसाहार करतच नाही पण जे मांसांहार करतात त्यांनी तरी सांगावे की मांसाहाराचे पदार्थ तयार करताना ते त्यात गोड पदार्थांचं मिश्रण म्हणजे मधाचे, दुधाचे, तुपाचे मिश्रण करतात की तिखट किॅवा मसालेदार पदार्थांचे?

साहजिकच मसालेदारच किॅवा तिखट पदार्थ घातले जातात हे शेंबड्या पोराला सुद्धा कळतं. थोडक्यात, मांसाहाराच्या मिश्रणात गोड पदार्थांचा समावेशही नसतो. म्हणजेच तिथे "मधु" अर्थात गोड पदार्थ किॅवा मध हे कधीतरी घातले जाण्याची सूतराम तरी शक्यता आहे काय???

जे मांसाहारी असतील त्यांनी स्वत: ह्याचा विचार करावा की तुम्ही मांस सेवत असताना त्यात मध  कुठेतरी वापरता काय??? 
असो.


आता ह्याच आश्वलायन सुत्राचा आधीचा श्लोक पाहुयात.

आश्वलायन गृह्यसुत्र १.२४.२५ खालीलप्रमाणे म्हणते

माता रुद्राणां दुहिता वसूनाम - इति जपित्वोमुत्सृजतेत्युत्स्रक्षन् !!!

अर्थ - गाय ही रुद्रांची माता व वसूंची कन्या आहे असे म्हणून 

आता इथे संकल्पना अशी आहे की मधुपर्क देताना यजमानाने ऋग्वेदांतली "माता रुद्राणां" ही ऋचा म्हणावी व मगच मधुपर्क द्यावा.ही ऋचा ऋग्वेदांतली ८.१०१.१५ इथली आहे व ती खालीलप्रमाणे

माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानाममृतस्य नाभि: !
प्र नु वोचं चिकितेषु जनाय मा गामनागां आदितिं वधिष्ट !

अर्थ - गाय ही रुद्रांची माता व वसूंची कन्या, आदित्यांची बहीण व अमृताची नाभी आहे. 
ह्या आदिती म्हणजे काटण्याय अयोग्य व निष्पाप अशा गाईंस तुम्ही मारु नका (तिचा वध करु नका)


आता इथे गाईला उद्देश्यून माता म्हटलंय जी रुद्राची माता आहे व वसूंची दूहिता म्हणजे कन्या आहे. बरं ह्यातच पुढे "मां गां वधिष्ट" म्हणजे गाईला मारु नका असा स्पष्ट आदेश आहे. खरंतर असं म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही की वेदमंत्रदृष्ट्या ऋषींना आधीच हे माहिती असावं की भविष्यांत काही दीडशहाणे वेदांत गोहत्या आहे असा खोटा प्रचार करतील म्हणूनच की काय त्यांनी वेदांत अशा स्पष्ट आज्ञा देऊन ठेवल्या आहेत. शेवटी ते द्रष्टे ऋषी ! भूत, भविष्य व वर्तमानाचे द्रष्टे ! 

जसं आज कैवल्यसम्राट चक्रवर्ती ज्ञानोबारायांच्या रेड्यामुखी वेद वदविण्यावर संशय घेतात ! संतांना हे एकविसाव्या शतकातले जन्माला येणारे संशयात्मे आधीच माहिती असावेत म्हणूनच की काय स्वत: संत एकनाथांनी "म्हैसापुत्रे वेद बोलविती" असा स्पष्ट उल्लेख केलाय. कारण भविष्यात लोक "रेडे" हे आडनाव असावं कदाचित असा तर्क काढतीतल म्हणूनच नाथांनी वरील शब्द हेतुपुरस्सर योजिले असावेत. असो. 

जर गाईला मारायचं असतं तर माता का म्हटलं असतं??? आईला मारते का कुणी??? जर मारायचं असेल तर तिला आई कुणी म्हणेल काय???

एका प्रमुख आक्षेपाला उत्तर

आता काही जण म्हणतील की भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे ह्यांच्या आक्षेपांचं काय?? कारण ह्या विद्वतश्रेष्ठाने हिॅदुधर्मशास्त्राचा सखोल अभ्यास कैक दशके करून "History of Dharmashastras" ह्या पंचखंडात्मक ग्रंथांची निर्मिती केली आहे. ह्याच ग्रंथातल्या दुसर्या खंडात त्यांनी मधुपर्कासंदर्भात खालील वक्तव्य केले आहे.

Vol. II, Part I, Chapter 10, page 543, lines 22-23 says-

"the procedure of madhuparka is set out in the Asvalayana-grhya-sutra 1 .24."

आता भारतरत्न काणे स्पष्ट म्हणतात की आश्वलायन गृह्यसुत्र १.२४ मध्ये जी मधुपर्काची प्रक्रिया दिली आहे ती योग्य आहे. तेंव्हा आपण वर पाहिलेलेच आहे की ती काय आहे व त्यात मांसाचा लवलेशही नाहीये. पण दुर्दैवाने ह्याच काणेंनी मात्र पुढे जाऊन ह्याच वरील "नामांसो मधुपर्को भवति भवति" ह्या सूत्राचा संदर्भ देऊन मधुपर्कात मांस आहे असा आरोप केलाय. पण तो अर्थ किती अयोग्य आहे हे आम्ही खाली स्पष्ट करूच. पण त्याआधी 

त्यामुळे आता काहीजण जर असं म्हणतील की काणेंपेक्षा प्रस्तुत लेखक विद्वान आहे काय तर तो आक्षेप चुकीचा ठरेल. काणेंच्या हिमालायएवढ्या उत्तुंग कार्याबद्दल व विद्वत्तेबद्दल आम्हांस नितांत आदरच आहे पण काणेंनी मधुपर्कात मांस आहे असा आरोप करताना ऋग्वेदांतल्या ज्या वरील ऋचेचा संदर्भ घेतलाय व त्यातून जो अर्थ घेतलाय तोच मुळात संशयास्पदच आहे. काणे तिथे पृष्ठ क्रमांक ५४५ वर म्हणतात की 

आचन्तोदकाय गां वेदयन्ते ! 
हतो मे पाप्मा मे हत इति जपित्वां कुरतेति कारयिष्यन् !
आश्वलायन गृह्यसुत्र - १.२३ व १.२४

आता ह्याचा अर्थ करताना काणे म्हणतात 

"When he has sipped water ( आचन्तोदकाय गां वेदयन्ते ), they announce to him the cow(कुरुते). Having muttered the words (इति जपित्वां) 'destroyed is my sin(हतो मे पाप्मा), my sin is destroyed (मे हत)', he says 'Om, do it', if he desired to have the cow killed(?????????) ; if he is desirous of letting her go, he mutters the verse (Rig. VIII, 1 0 1 , 1 5) the mother of Rudras and daughter of Vasus and says 'let her go'," 

आता ते "desired to have the cow killed" हे त्यांनी कशावरून म्हटलं हे ते स्पष्टच करत नाहीत. कारण "कुरुते" अशा निव्वळ शब्दावरून "गोहत्या करा (kill the cow)" असा अर्थ काढणं हे विपर्यास नाही काय??? 

आणि हा मधुपर्क देत असताना ते ऋग्वेदांतली जी ८.११०.१५  ही ऋचा म्हणावं असा सूत्राचाच संदर्भ देऊन सांगतात, ती ऋचा कोणती आहे ते मी वर लिहिलंय. त्यामुळे त्यांनी नेमका अर्थ स्पष्ट केला नसल्याने त्यांचा अर्थ ग्राह्य धरणं आम्हांस आंधळेपणाचे लक्षण वाटतं. 

कारण त्या "माता रुद्राणां दुहिता वसूनाम्" ह्या ऋचेत स्पष्टपणे "मां गां वधिष्ट" असा गोसंरक्षणाचा आदेश आहे असं असताना आदरणीय महामहोपाध्याय काणेंनी कशावरून "desired to have killed the cow" असा अर्थ घेतलाय हे त्यांनी स्पष्ट केलेले नाहीये. 


कदाचित त्यांनी पाणिनीच्या "हन्" ह्या धातुचा संदर्भ घेऊन हे विधान केलेलं असावं.

कारण पाणिनीच्या धातुपाठात "हन्" ह्या धातुचे तीन अर्थ पडतात
जे "हन्, हिंसा, गत्यो:" असे आहेत. निघण्टुनुसारही "गत्यो:" म्हणजे पुढे जाणे असा अर्थ निघतो (२.७४).

ह्यात गत्यो: म्हणजे पुढे जाणे हा अर्थ स्पष्ट होतो जो त्यांनी "desirous of letting her go" ह्या अर्था घेतला आहे जो आम्हांस मान्य वाटतो व अचुकच वाटतो. पण हत्येचा संदर्भ त्यांनी कुठून काढलाय हे मात्र ते स्पष्ट करत नाही. 

आणि तो हत्येचा अर्थ घेणं अयोग्य आहे कारण मग इतर ढीगभर अशा गोसंरक्षक वचनांना बाधा येतें. वेदवचचनांचा अर्थ लावताना नेहमी समग्रपणे अभ्यास करूनच तो लावायचा असतो हे सुज्ञांस सहजपणे कळेल. त्यामुळे आदरणीय काणेंच्या आक्षेपाचं निराकरण झालंय असं आम्ही स्पष्ट करतो. 

आता "नामांसो"शब्दाचा अर्थ नेमका आहे तरी काय??

ज्यांना पाणिनीचं व्याकरण माहिती नाही, ज्यांना अमरकोष माहिती नाही, ते संस्कृत शब्दांचा व वाक्यांचा शब्दश: अर्थ घेऊन आपली मते आंधळ्यासारखे प्रकटतात. पण पाणिनीय व्याकरणशास्त्राचा ज्यांचा सखोल अभ्यास असेल, त्यांना संस्कृत भाषेत संधीविग्रह व संधी करणे हे प्रयोग माहिती असतील किंवा निदान अमरकोष वाचला तरी लक्षात येईल की संस्कृत शब्दांचा अर्थ लावताना व्याकरणशास्त्राचा विनियोग करावाचा लागतो. 

आता "नामांसो" ह्या शब्दाचा संधीविग्रह पाहुयात

न + आमांसो = नामांसो 

इथे "आमांसो" हा शब्द "आ" ह्या पूर्वप्रत्ययापासून (Prefix)पासून सुरु होतोय ज्याचा अर्थ अमरकोषात खालीलप्रमाणे आहे

आंगीषदर्थेsभिव्याप्तो सीमार्थे धातुयोजने ! 
३.३.३९

अर्थ असा आहे की "आ" हा पूर्वप्रत्यय (Prefix) एक मर्यादा किंवा कमतरता किंवा न्यूनता ह्या अर्थाने धातुच्या आधी वापरले जातं.


म्हणजे "आ" ह्या शब्दाने कमतरता प्रतिसुचित होते. ह्याचाच अर्थ "आ" म्हणजे कमतरता किंवा अभाव दर्शवितो.

म्हणजेच आ+मांसो = म्हणजे मांस असलेले असा अर्थ 

पण ह्याच्या आधी पुन्हा "न" हे आलं आहे म्हणजे न+आमांसो = नसलेले मांस असे

म्हणजेच ते वाक्य आता असे होईल

आमांसो मधुपर्को न भवति भवति ! 

थोडक्यात मांसाचा मधुपर्क होतच नाही म्हणजे नाही.


इथे भवति भवति हे दोनदा आलंय ह्याचाच अर्थ ते नकारात्मक आहे. ह्याचा अर्थ मांस नाहीये असं ठासून सांगण्यासाठी आहे हे स्पष्ट आहे.

आता काहीजण म्हणतील की आम्ही आमच्या सोयीनुसार अर्थ घेतोय 

तर अशा संशयखोरांस आम्ही सांगु इच्छितो की आम्ही वेद प्रमाण मानतो. ज्या वेदांत १३६ वेळा गाईंस व बैलांस "अघ्न्या" व "अघ्न्य" म्हटलेले आहे व इतरही अनेक ठिकाणी हत्येचा स्पष्ट निषेध व शिक्षाही आहे, त्याच वेदांत गोमांस किंवा कोणत्याही प्रकारच्या मांसांचा उल्लेख आहे हे आपण कसं म्हणु शकतो??? ह्यात आम्ही स्वसोयीनुसार अर्थ काढत नसून जे वेद बोलतात तेच सांगतो आहे. 

शतपथ ब्राम्हणानुसार आणि अमरकोष ह्या संस्कृत शब्दकोशानुसार मांस शब्दाचा अर्थ !

मांसानि वा आ आहुतय:(श ९,२ )
अर्थ - यज्ञात मांसाची आहुती द्यावी.
इथे मांस ह्या शब्दाचा अर्थ काय आहे खाली स्पष्ट केले आहे –
” मासीयन्ति ह वै जुह्वतो यजमानस्याग्नय:।
एतह ह वै परममान्नघ यन्मासं,स परमस्येवान्नघ स्याता भवति (शतपथ - ११.७.१.३)
“यज्ञात हवन करते वेळी यजमानाची अग्नी मांसाची अपेक्षा राखतात. परमअन्न हेच मांस आहे ! परम अन्नाने आहुति द्या !"

इथे "परमअन्न" असा शब्द प्रयोग केला आहे आणि मांस असते तर अन्न हा शब्द प्रयोग केला नसता. कारण मांसाला अन्न ही उपमा कुठेही नसते.
अमरकोषानुसार “परमान्नं तु पायसम्” (२.७.२४) असा अर्थ दिलेला आहे. म्हणजे पायस ! आता पायस म्हणजे दुध आणि तांदूळ ह्यांची खीर ! म्हणजेच परम अन्न म्हणजेच पायस म्हणजेच मांस !!! म्हणजेच मांस शब्दाचा अर्थ पायस किंवा दुध तांदळाची खीर असाही स्पष्टपणे होतो.

हे का ते मी वर अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे. 

आणि आता शेवटचा आक्षेप व उत्तर

काहीजण म्हणतील की ठीक आहे वेदांत गोमांस नाही पण नंतरच्या काही गृह्यसुत्र, धर्मसुत्र स्मृती वगैरे ग्रंथात आहे त्याचं काय??

ह्याला एकच उत्तर

या वेदबाह्या: स्मृतय: याश्च काश्च कुदृष्टय: !

सर्वास्ता: निष्फला ज्ञेयास्तमोनिष्ठास्तु ता: स्मृता: ! मनु- १२-९६


अर्थ - ज्या स्मृत्या वेदबाह्य आहेत, त्या सर्व कुदृष्टय: म्हणजे वाईट दृष्टीने आलेल्या आहेत, त्या सर्व तमोगुणातून आलेल्या असल्यामुळे सर्वच्या सर्व निरर्थक आहेत !

वेद हेच प्रमाण असल्याने वेदांच्या विरोधात जे बोलते ते सर्व अग्राह्य हे स्पष्ट आहे. संपला विषय ! 

थोडक्यात मधुपर्कात कोणत्याही प्रकारचे मांस नाही हे आता स्पष्टपणे सिद्ध झाले.


एवढं सांगूनही जर कुणाला कळत नसेल तर मग आम्हांस भर्तृहरीचं खालील वाक्य आठवतं

"नोsलुकोsप्यवलोकते दिवा किं सूर्यस्य दूषणम् !"

"म्हणजे घुबड दिवसासुद्धा पाहू शकत नाही त्यात सूर्याचा तो काय दोष???"

चुक घूबडाची आहे सूर्याची नाही हो. 

तसंच ह्या वेदरुपी सूर्याचा प्रखर प्रकाश असताना ते न पाहण्याचं करेटंपण ज्या घुबडांना असेल, त्यांनी त्या मोहनिद्रेत तसंच खुशाल घोरत पडावं. आमचं काही नाही.


जयतु गोमातरम् ! 
जयतु वेद भगवान् !!
जयतु हिन्दुराष्ट्रम् !!!