Saturday 30 October 2021

आज ऋषिश्रेष्ठ महर्षि श्रीमद्दयानंद सरस्वति ह्यांचे आङ्ग्ल दिनांकाने पुण्यस्मरण

 



तिथीने येत्या अमावस्येस दीपावलीत


त्यानिमित्त 'स्वदेशी जागर' नावाच्या दीपावली विशेषांकामध्ये गतवर्षी प्रकाशित झालेला हा अगदी अल्पसा लेख


महर्षि दयानंदांना ब्रिटीशांचे एजंट ठरविण्यापर्यंत आमच्यातल्या काहींची बुद्धी पोहोचली. म्हणूनंच त्यांच्या स्वदेश चिंतनावर विस्ताराने लिहिता येईल परंतु विस्तारभयास्तव हा लेख......


आजच्या दिवशीच ३० ऑक्टोबर, १८८३ साली 


एकोणिसाव्या शतकांतला एक महर्षि, आर्षधर्माचा द्रष्टा, अद्वितीय धर्माचार्य आणि संशोधक, महान समाजोद्धारक, संस्कारक तथा राष्ट्र नि अखिल मानवजातीचा सर्वविधपरिपूर्ण मंगलकामनाकर्ता हा आज महासमाधींस प्राप्त झाला. त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो महात्मा त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. महर्षि मनु, महर्षि व्यास, महर्षि याज्ञवल्क्य, महर्षि जैमिनी, परमहंस भगवान पूज्यपाद श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या प्रोज्वल परंपरेंचा तो प्रतोस्ता ऋषि, भारतीय नवजागरणाचा पुरोधा आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला. सायंकाळी सहा च्या सुमारांस.


*इ॒दं नम॒ ऋषि॑भ्यः पूर्व॒जेभ्यः॒ पूर्वे॑भ्यः पथि॒कृद्भ्यः॑ ॥*

ऋग्वेद - १०.१४.१५

 

सृष्टीनिर्मितीपासूनचा मूळचा विशुद्ध असा ईश्वरप्रणीत वैदिक धर्म महाभारत कालापर्यंत तरी ह्या प्राचीन हिंदुराष्ट्रांस(आर्यावर्तांस) विश्वगुरुच्या पदावर आरुढ ठेवता झाला. महाभारताच्या त्या लक्षावधींच्या व त्यातल्या श्रेष्ठाश्रेष्ठ पुरुषांच्या, रथीमहारथींच्या, ऋषीश्रेष्ठांच्या, वीरांच्या पतनानंतर ह्या राष्ट्रांस ज्या अवैदिक पंथांनी ग्रासले व परकीय आक्रमकांच्या टोळधाडींस इथल्या शूरवीरांनी दिलेल्या प्रत्युत्तरानेदेखील जो इथला धर्म ग्लानींस प्राप्त झाला, त्याच वैदिक धर्मांस पुनश्च ते विशुद्ध स्वरुप भगवान पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्य, श्रीकुमारिल भट्टादिंनी आपल्या जाज्वल्य वेदनिष्ठेने  दिलंच. पण ते कार्य करूनही पश्चातच्या म्लैच्छादिंच्या व आंग्लांच्या परदास्यतेतून मुक्तीसाठी पुनश्च एकदा तेच वेदोद्धाराचे व राष्ट्रोद्धाराचे कार्य दोन शतकांपूर्वी करण्यासाठी ह्या भारतभूमीवर एका नररश्रेष्ठाने ह्याच वेदनिष्ठेसाठी सौराष्ट्र प्रांतात (गुजरात) टंकारा ह्या ग्रामी अवतरण केलं. मूल शंकर ह्या नावाने हेच बालक पुढे वेदोद्धारक महर्षि दयानंद सरस्वती नावाने विख्यात झालं. त्याच ऋषीश्रेष्ठ महर्षि श्रीमद्दयानंदांच्या स्वदेशी चिंतनाचा विचार प्रस्तुत लेखामध्ये करायचा आहे. 


सत्यार्थ प्रकाश ह्या आपल्या अजरामर ग्रंथामध्ये सर्वप्रथम स्वराज्याचा प्रकट उद्घोष करताना हा पुरुषोत्तम म्हणतो 


"कोणी काही म्हंटले तरी ही गोष्ट निर्विवाद आहे की स्वदेशी राज्य असणे हे सर्वात श्रेष्ठ व उत्तम आहे. तेच सुखदायक आहे."


पुढे १८५७ मध्ये इंग्रजांनी द्वारिकेच्या श्रीकृष्ण मंदिरावर आक्रमण केले, त्याचे उदाहरण देऊन ते ह्याच ग्रंथाच्या अकराव्या समुल्लासात लिहितात


"बाघेर लोक इंग्रजांच्या विरुद्ध प्रचंड शौर्याने लढले परंतु त्या वेळेस श्रीकृष्णासारखा कोणी महापुरुष असता तर त्याने इंग्रजांची धूळधाण उडविली असती व ते सैरावैरा पळत सुटले असते."


ज्या ऐतिहासिक महापुरुषांनी ह्या भारतमातेसाठी त्याग केला, त्या सर्वांविषयी महर्षींना आत्यंतिक आदर होता. सत्यार्थ प्रकाशच्या भूमिकेचा अंत त्यांनी 'महाराणाजीका उदयपूर' असा करून श्रीमहाराणा प्रताप ह्यांच्याविषयी अत्यादरच प्रकट केलाय. त्यांना स्वराज्याची आवश्यकता तीव्रतेने जाणवत असल्याने त्यांनी जोधपूर येथे इस्लामचं खंडन केल्यावर तिथले मंत्री मियाँ खान म्हणाले कि आज मुस्लिमांचे राज्य असते तर तुम्ही असे इस्लामचे खंडन करणे कठीण गेले असते. त्यावर महर्षि निर्भीडपणे उद्गारले कि, "मी मुस्लिमशासन काळातही असेच बोललो असतो. औरंगजेबासारख्याने माझे काही बरंवाईट करायचा प्रयत्न केला असता तर मी शिवाजी, दुर्गादास किंवा राजसिंह ह्यांसारख्या एखाद्या क्षत्रियाचा धावा केला असता आणि मग त्यांनी त्याची चांगली खोड मोडली असती."


तत्कालीन गव्हर्नर जनरलच एजंट कर्नल ब्रुक ह्यांनी महर्षींना इंग्रजी राज्याचे लाभाचे वर्णन आपल्या व्याख्यानात करायचे सुचवल्यावर महर्षींनी त्याला तात्काळ नकार देत उद्गार काढले, "इंग्रजांचे राज्य टिकावे अशी प्रार्थना मी कदापि करणार नाही. याच्या उलट इंग्रजांचे राज्य लौकरात लवकर संपुष्टात येवो अशी प्रार्थना मी ईश्वराजवळ करतो."


किती दुर्भाग्य आहे पहा. 


इंग्रजांचे राज्य ईश्वरी वरदान म्हणणारे लोक भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात महात्मा गणले जातात आणि त्याला शत्रूराज्य म्हणून धिक्कारणारे महर्षि मात्र उपेक्षिले जातात.


समाजसुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्य दोन्ही एकाच वेळी


ह्या दोन्ही विषयांचा आग्रही पुरस्कार एकाचवेळी करणारी केवळ बोटावर मोजता येईल इतकीच मंडळी तत्कालीन भारतामध्ये होती आणि महर्षि त्यांमधले अग्रगण्य होते. त्यांचा उल्लेख त्यांचे एक चरित्रकार श्रीपाद जोशींनी “समग्र क्रांतीचे अग्रदूत” असाच यथार्थ केला आहे. एकेकाळी विश्वगुरुच्या पदांवर आरुढ असलेल्या भारतवर्षाच्या ह्या पतनाची कारणमीमांसा करताना महर्षि म्हणतात कि ब्रिटिशांच्या आधीपासून एक सहस्त्रवर्षे आमच्यामध्ये काही दोष शिरले, ज्यामुळे आमचे पतन झाले. त्यात प्रामुख्याने मूर्तीपूजेचा अतिरेक, अवतारवाद, तज्जन्य दैववाद, कलियुगाची चुकीची करून घेतलेली कल्पना, फलज्योतिष, बालविवाह, समाजाचं विभाजन करणारी जातीव्यवस्था, व्यक्तिगत स्वार्थ, आपसांतील फूट आदि ! त्यांच्या मते शारीरिक दास्याच्या आधी मानसिक दास्य पारतंत्र्यांस कारण ठरते. सत्यार्थच्या द्वितीय समुल्लासामध्ये त्यांनी ह्याची मांडणी केली आहे. 'सत्ययुग, कलयुग ही केवळ कालगणनेची परिमाणे आहेत. त्यांचा मानवी कर्मांशी काही संबंध नाही. आमच्या संकटांचे कारण आमचे कर्म आहे. कलियुग नव्हे.'


इतिहासाच्या विकृतीकरणाला प्रखर विरोध


ब्रिटिशांनी भारतीयांना कायमचे बौद्धिक परदास्यात ठेवण्यासाठी भारतीय इतिहासाचे जे काही हेतुपुरस्सर विकृतीकरण केले, त्याला प्रखर विरोध करत महर्षींनी भारतीयांना आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून दिली. आर्याक्रमण सिद्धांताचे महर्षि हे प्रथम नि प्रखर विरोधक होते. मॅक्सम्युलरची त्यांनी केलेली निर्भर्त्सना विख्यात आहे. एकीकडे ह्याच ख्रिस्ती मिशनरी असलेल्या मॅक्सम्यूलरला विवेकानंद आणि टिळक प्रभृती लोक अगदी सायणाचार्यांचा अवतार म्हणून वंदन करत होते आणि काशीची पंडितसभा ह्या नीच मनुष्याला पंडित म्हणून गौरवीत होती तर तिकडे राष्ट्रोद्धारक महर्षि दयानंद ह्याच मैक्सम्युलरची पूर्ण कानउघाडणी करत त्याची सगळी षड्यंत्रे हाणून पडत होते. आणि आश्चर्य म्हणजे महर्षींची ही ह्या भारतद्वेष्ट्या पाश्चात्यमत खंडनाची परंपरा पुढे आर्य समाजाने अखंडपणे सुरु ठेवली. आर्य समाजी विद्वानांनी पाश्चात्यांची बव्हतांश मते सप्रमाण खोडून काढली आहेत. ती आम्ही सर्व अभ्यासली आहेत. 


भाषा आणि लिपीचा स्वाभिमान


महर्षि हे स्वदेशी भाषा आणि स्वकीय लिपी ह्यांचे प्रखर समर्थक होते. देवनागरी लिपीचे ते पुरस्कर्ते होते. ते गोरक्षणाचे आग्रही होते ज्यातून ते राष्ट्राचे आर्थिक हित साधू इच्छित होते.  राष्ट्राच्या एकात्मतेसाठी त्यांनी हिंदी हीच राष्ट्रभाषा व्हावी असा विषय मांडला होता.


राष्ट्रं वा अश्वमेध:।


महर्षींनी वैदिक यज्ञसंस्थेची मांडणी करताना अश्वमेध ह्या अत्यंत महत्वाच्या यज्ञाचीही संगती राष्ट्राच्या उद्धाराशीच लावली. कारण शतपथ ब्राह्मण ह्या ग्रंथाच्या उपरोक्त वचनाप्रमाणे अश्वमेध यज्ञाचा मुख्य उद्देश्य राष्ट्रनिर्मिती आणि उद्धार हाही आहे. महर्षींच्या आधी ह्या यज्ञविषयी अत्यंत विकृत मते प्रचलित होती, जी महर्षींनी वैदिक साहित्यातल्या प्रमाणांनीच त्यांच्या भाष्यामध्ये खोडून काढली.


अशा प्रकारे महर्षींचे स्वदेशी नि राष्ट्रीय चिंतन त्यांच्या आचरण आणि लेखणीच्या आधारे आपण पहिले.

अशा ह्या युगद्रष्ट्या सिंहहृदयी वेदोध्दारक आणि राष्ट्रोद्धारक पुरुषश्रेष्ठांच्या चरणी कृतानेक साष्टांग दंडवत !


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षिदयानंद_पुण्यस्मरण_स्वदेशी_चिंतन_वेदोद्धार_ब्रिटीश_इस्लाम_भगवानश्रीकृष्ण