Wednesday 15 February 2023

उपासनेचा मोठा आश्रयो| उपासनेवीण निराश्रयो|

 



उपासनेचा मोठा आश्रयो| उपासनेवीण निराश्रयो|

उदंड केले तरी तो जयो| प्राप्त नाही|

दासबोध - १६|१०|२९


श्रीदासनवमी अर्थात राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदास पुण्यस्मरण...


उपासनेने काय होऊ शकतं याचं प्रत्यंतर सर्वच संतांप्रमाणे ठोसरांच्याही कुटुंबात येतं. श्रीमहिपतींच्या संतविजयात म्हटल्याप्रमाणे समर्थांचे पिताश्री श्रीसूर्याजीपंत वयाच्या १२ व्या वर्षापासून पुढे २४ वर्षे सूर्योपासक होते. त्यांची नित्याची गायत्र्योपासना ही


बारा सहस्त्र जप नित्य, करित असे एकाग्र चित्त|

बारा वर्षे लोटता सत्य, साक्षात् आदित्य भेटला|

संतविजय - १|२७


नित्य गायत्रीचा १२,००० इतका जप ! या जोडीलाच १००० सूर्यनमस्कार. इतकी साधना ठोसरांची न्यूनतम १२ वर्षे (काही ठिकाणी २४ वर्षे) सुरु होती. 


त्या सूर्यप्रभावें, पुत्र झाला दैदिप्यमान|

म्हणोनिं नाम नारायण, ठेविलें तयाचें|

श्रीदासगणु महाराज


ठोसरांच्या वंशात पिढ्यान्पिढ्यांच्या सुर्योपासनेने जो सूर्यासारखा दैदिप्यमान तेजस्वी पुत्र नारायणाच्या रुपाने जन्मांस आला, त्या नारायणाने चिंता करितों विश्वाची म्हणत तत्कालीन पतित अशा भारतवर्षाचा उद्धार करण्याच्या हेतुने तत्कालीन देशकालवर्तमान चिंताग्रस्त होऊन व्यक्तिगत संसारसुखावर लाथ मारून द्वादश वर्षे गोदातटाकीं त्याच रविकुळटिळकाच्या प्राप्तिस्तव


आचरुनि तपश्चर्येला रघुनंदन आपुला केला ताटकीं| प्रगटला पुढें श्रीराम सुजनविश्राम विमलसुखधाम अहल्योद्धारी| हे भवभयसंकटवारी ताटकीं| - पू. श्रीदासगणु महाराजांची रचना.


तेरा कोटी श्रीरामनामाचा जप नि गायत्रीची कैक पुरश्चरणं केली..! श्रीसमर्थांच्या जीवनाचं‌ सार श्रीसमर्थांनी स्वत:च जे सांगितलंय, ते या एकाच शब्दांत


उपासना, उपासना, उपासना, उपासना|


मध्येच आहे. रामसोहळ्यामध्ये श्रीमेरुस्वामींनी म्हटल्याप्रमाणे


नित्य विध्युक्त प्रात:स्नान, काळत्रय संध्यावंदन|सहस्त्र गायत्री उच्चारोन, आराध्यमंत्र जपिजे| 

४८|३८


श्रीसमर्थांनी तपकाळात गायत्रीची कैक पुरश्चरणे केली होती, जींत नित्य १००० किंवा १२०० इतकी गायत्र्योपासना होतीच. आपल्या सर्व प्राचीन शास्त्रकारांनी नित्य संध्योपासनेमध्ये किंवा अगदी स्वतंत्र असा १२०० इतका गायत्रीचा जप सर्वश्रेष्ठ उपासना म्हणून सांगितला आहेच. यावर प्रमाणासहित स्वतंत्र विवेचन कधीतरी करेन. आता हा लगेचंच इतका कुणाला जमेल की नाही म्हणून अधिकारभेदाने अन्य मंत्रांची उपासनाही सांगितलीय. श्रीसमर्थांनी तर गायत्रीबरोबर उपास्यदैवत श्रीरामनामाची उपासनाही केलीय. दोन्ही एकत्र का केलं असावं असा प्रश्न साहजिकंय. वास्तविक गायत्री नित्य १२०० केला तर अन्य कुठल्या मंत्राची उपासना करावीच कशाला असा प्रश्न स्वाभाविकंय. पण ह्याचे उत्तर समर्थांनी स्वत: दिलंय दासबोधामध्ये. श्रीसमर्थ म्हणतात


नाना पुरश्चरणें करावी| नाना तीर्थाटणें फिरावी|

नाना सामर्थ्यें वाढवावी| वैराग्यबळें| 

दासबोध - १०|७|१३


सकाळी एकदाच गायत्री केली की काम भागलं असे नव्हे तर दिवसभर पुन्हा नामानुसंधान रहावं म्हणून उपासना सांगितलीय. चित्तशुद्धीसाठी हे सर्व आवश्यक आहे.


सर्व संतांनी नामंच घ्यायला का सांगितलंय???


कुठल्याही संतांचे चरित्र उघडून पाहिलं तरी हाच उपदेश दिसतो की नाम घ्या.


आता प्रश्न असा पडतो की नामस्मरण का करावं, जप का करावा? नामजपाने काय फल प्राप्त होतं? या‌सर्व प्रश्नांची उत्तरे षट्दर्शनांनीच प्राप्त होतात.  त्याशिवाय शंका समाधानंच होत नाही. म्हणून तर आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी षट्दर्शने रचली. महर्षि भगवान पतंजली योगदर्शनामध्ये म्हणतात


तज्जपस्तदर्थभावनम्| योगदर्शन - १|१|२८


प्रणवाचा जप करणे म्हणजे प्रणवाने दाखविला जाणारा जो ईश्वर आहे त्याची भावना करणे. ज्याचा जप आपण करतो, त्याची भावना आपण करतो. कारण नाम नि नामी अभिन्न असल्याने नामाच्या निर्देशाने त्या नामीचाच बोध होते व आपल्याला त्याची भावना होते.


त्याचे आणखी फल काय? योगदर्शनकार पुढे म्हणतात


ततः प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च।।१|२९


परमेश्वराच्या चिंतनाने व्याधि, संशय इत्यादि विघ्ने निर्माण होत नाहीत, स्वरुपाचे दर्शन होते, मनाला त्रास उत्पन्न करणारी एकुण ९ विघ्ने आहेत ती पुन्हा केंव्हातरी अभ्यासु. तूर्तास चित्तांस निर्माण होणारी प्रक्षुब्धता, अस्वस्थता, अस्थिरता, सर्व दोष हे सर्व नामस्मरणाने दूर होतात. म्हणून सर्व संतांनी पुन: पुन: नाम घ्यायला सांगितलंय.


खरंतर षट्दर्शने अभ्यासली तर हे सर्व कळेल.पण ती अभ्यासायला तितका वेळ आपल्याला नसतो नि तसा योग्य गुरुही शिकवायला नसतो. म्हणूनंच 'वेदमार्ग मुनी गेले, करु संती केलें तें|' या श्रीतुकोबारायांच्या वचनाप्रमाणे संतांनी सांगितले व केले, तेच आपण करावं कारण त्यांना त्याची प्रचिती असल्याने. आपली अक्कल जास्त चालवु नये. अतितर्काने माती होते. उपसानेच्या दृढाश्रयानेच समर्थ होता येतं. श्रीसमर्थाच्या जीवनाचे आणखी मर्म म्हणजे


समर्थे समर्थ करावें|


आपणांसही ते समर्थ व्हायचं असेल तर ही उपासना हीच एकमेव तारणहार आहे. आज श्रीसमर्थांच्या पुण्यस्मरणी इतकंच...


असो ऐसें सकळहि गेलें, परंतु येकचिं राहिलें| 

जे स्वरुपाकारी जाहलें, आत्मज्ञानी|

दासबोध


भवदीय...


#श्रीसमर्थ_दासनवमी_पुण्यतिथी_सज्जनगड_रामदासीसंप्रदाय_उपासना_षट्दर्शने_वैदिकहिंदुधर्म

Tuesday 14 February 2023

महर्षि दयानंद सरस्वति जन्माला आलेच नसते तर...


 

१. स्त्रीशुद्रौ नाधीयतामति| स्त्री शुद्रांनी अध्ययन करता कामाच नये. वेद तर लांबंच, त्यांनी संस्कृतही शिकता‌ कामा नये. इति काही मध्यकालीन स्मृती व त्यालाच प्रमाण मानणारे आमचे धर्ममार्तंड विद्वान... स्वामी विवेकानंदांनीही मात्र ह्या मध्ययुगीन वचनांचा निषेध करून सर्वांना वेदाधिकार दिला आहे बरंका...

२. बाबा वाक्यं प्रमाणं| आमच्या पंढरीतले धर्मसिंधुकार बाबा पाध्ये यांनी धर्मसिंधु तृतीय परिच्छेद पूर्वार्ध भाग तिसरा पृष्ठांक ३९१ वर म्हटल्याप्रमाणे आमच्या हिंदु मुलींचे विवाह हे वयाच्या ६व्या किंवा ८व्या वर्षी झाले असते, जास्तीतजास्त ११व्या वर्षी, कारण अष्टवर्षा भवेत्कन्या ही स्मृती आह्मांला प्रमाण मानावी लागली असती. सोबत पुरावा जोडला आहे बरंका धर्मसिंधुचा. हे धर्मसिंधुसारखे काही ठिकाणी, सर्वच नव्हे, तर काही ठिकाणी वेदविरुद्ध अनार्ष ग्रंथ आह्मांला प्रमाण मानावे लागले असते. त्यातलं सगळंच काही त्याज्य नाहीये बरंका नाहीतर पुन्हा माझ्या नावाने शिमगा...स्त्रियांचे‌ विवाहाचे वय किती यावर आह्मीं मागे वैदिक प्रमाण देऊन सविस्तर लेख लिहिला आहे...


३. विधवा पुनर्विवाह निषेध - इतक्या लहान वयात विवाह होऊन समजा त्या विधवा झाल्या तर न्युनतम आमच्या ब्राह्मणसमाजात तरी त्या कायमच्या केशपवन करीत तशाच विधवा राहिल्या असत्या. कारण ही प्रथा केवळ ब्राह्मणांपुरतीच होती, इतर समाजात पुनर्विवाह व्हायचे. भले ब्राह्मणांमधली ती अत्यंत विकृतंच प्रथा होती जिला कुठलाही शास्त्राधार नाही पण आमचे लोक तसे अजुनही मानतात. एखादी विधवा स्त्री सकेशा समोर दर्शनाला किंवा आशिर्वाद घ्यायला आली तर तिला हाकलून लावणारे थोर महात्मे झाले आहेत आपल्यात. अजुनही आहेतंच...शास्त्रात् रुढीर्बलीयसी...

४. विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह कधीच झाले नसते. फारतर सती गेल्याची उदाहरणे आजही दिसली असती. कारण वेदमंत्रांमध्ये स्पष्टपणे पुनर्विवाहाचा अधिकार असताना तो धिक्कारणारे आहेतंच...

५. अस्पृश्यता आजही तितकीच भयंकर असती..

६. पूर्वास्पृश्य बांधवांना मंदिर प्रवेश कधीच मिळाला नसता.‌ यात सावरकरांचेही व इतर अनेकांचेही योगदान आहेच. पण मूळ प्रवर्तक महर्षि दयानंद. पण आजही मंदिरप्रवेश नाकारणारे आहेतंच काही...

७. कपाळावर टिळा आडवा लावायचा की उभा लावायचा, तो कशाने लावायचा ह्यावरही भांडत बसलो असतो आह्मीं. आजही ते‌ सुरु आहेच की. माझा कपाळावर टिळा लावायला मूळीच विरोध नाहीये, उलट मी टिळ्याचा समर्थकंच आहे पण निरर्थक वादाचा विरोधक आहे...

८. रामायणात श्रीसीतामातेचा विवाह ६व्या वर्षी झाला हा वेदविरुद्ध नि ऐतिह्यविरुद्ध नि प्रत्यक्ष‌ रामायणाशी विरुद्ध असा अपसिद्धांत रुढ झाला असता. अजुनही तसं मानणारे पुष्कळ जण आहेतंच...

९. वैदिक यज्ञांमध्ये पशुहिंसा सर्रास होतंच राहिली असती. जी आजही होतेच म्हणा. भले कलिवर्ज्याने ती वर्ज्य ठरवली असली तरी. तसा‌ संन्यासही कलिवर्ज्य ठरवला आहे तरी घेतातंच सगळे परंपरावादी. याबाबतीत यांच्यायांच्यातंच मेळ नाहीये ही गोष्ट वेगळी. शूsssक बोलायचं नाही...

१०. अश्वमेध म्हणजे घोड्याची हिंसा व त्या मृत अश्वाशी राणीचा संभोग(याचं सप्रमाण खंडन मी मागे केलंय), नरमेध म्हणजे मनुष्यबळी, गोमेध म्हणजे गायीचा बळी असे विकृत नि घाणेरडे अर्थ ग्रहण करण्यासारख्या विकृत प्रथा प्रमाण मानत असतो व त्यालाच खरा वैदिक धर्म समजत असतो.‌ ह्या अश्वमेध, नरमेध, गोमेध ह्यांचा वास्तविक अर्थ फार दिव्य आहे पण तो इतका विकृत केला गेलाय. जर महर्षि दयानंद न‌सते तर तोही पुन्हा वैदिक प्रमाणांच्या आधारे सत्यार्थाने आह्मांला कळला नसता..

११. वेदांमध्ये म्हणजे मंत्रसंहितांमध्ये इतिहास, भूगोल, वर्तमान, भविष्य, नद्या गंगा-सिंधु-यमुना, पर्वते, आर्य इकडून आले, तिकडे गेले, वाट्टेल ते अवतार, वाट्टेल ते ऐतिहासिक महापुरुष, वाट्टेल ते रामायण-महाभारत, वाट्टेल ते ऐतिहासिक शोध घेतले गेले असते. कुणी वेदांमध्ये कबीर शोधले असते, कुणी आपले गुरु, कुणी वर्धमान महावीर शोधले असते, कुणी भगवान बुद्ध नि कुणी आणखी काही. आजही तसा शोध घेणारे व त्यावर पुस्तके खरडणारे आहेतंच म्हणा आणि अशांना आपण विद्वान म्हणतो...

१२. वेदांमध्ये कृष्ण शब्द दिसला, राम शब्द दिसला जोड त्याचा शब्द श्रीराम नि श्रीकृष्णाशी. गंगा शब्द दिसला जोड त्याचा शब्द विद्यमान भारतकालीन गंगा नदीशी. वाट्टेल ते शोध घेत राहिलो असतो व वेदांचा विकृत अर्थ‌ काढत भारतीय इतिहासाची हेळसांड होत राहिली असती...आजही होतेच आहे...

१३. षट्दर्शने परस्परविरोधी आहेत, एक दर्शन दुसऱ्याला खोडतं ,पूर्वमीमांसा केवळ यज्ञंच सांगते, ईश्वर नाकारते, उत्तरमीमांसा पूर्वमीमांसेला जागोजागी खोडते, सांख्यदर्शन निरीश्वरवादी आहे वगैरे वगैरे अनेक अपसिद्धांत रुढ झालेले महर्षींनी नाकारले व दर्शनशास्त्राची यथोचित भूमिका स्पष्ट केली. ते नसते तर विचार करा काय झालं असतं...

१४. धर्मजिज्ञासेत वेदंच सर्वोच्च‌ प्रमाण आहेत हे  प्रत्यक्ष मनुमहाराजांपासून सर्व प्राचीन शास्त्रकारांनी ओरडून सांगितलं असूनही मध्ययुगात निर्माण झालेल्या स्मृतींना प्रमाण मानून वेदांनाही पायदळी तुडवायच्या विकृत परंपरा निर्माण झाल्या त्या धिक्कारायचं‌ सामर्थ्य केवळ दयानंदांमुळेच पुन्हा आह्मांला प्राप्त झालं. त्यामुळेच दयानंदांनी काही नवीन मत प्रस्थापित केलं असे आपल्याला वाटायला लागतं जे असत्य आहे...

१५. देवनागरी ही आद्यलिपी आहे, वेद अनादि व नित्य आहेत, ते ईश्वरकृत आहेत, मनुष्यकृत किंवा ऋषिमुनीकृत नाहीत, त्यांची रचना क्रमाक्रमाने झाली नाहीये, चारही वेद एकाच वेळी चार ऋषींच्या अंत:करणात प्रकट झाले हे सिद्धांत कधीच कळले नसते...वास्तविक महाभारतकालापर्यंत तरी वेदांविषयी हे सिद्धांत सर्वांना मान्य होतेच अगदी भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यपर्यंत तरी त्यांच्या‌ साहित्यात...पण मधील काळात हे सर्व नाकारण्यात आलं व वाट्टेल ते सिद्धांत निर्माण झाले जे महर्षि दयानंदांनी आधुनिक काळात साधार नि सप्रमाण खोडले आहेत...

१६. पृथ्वीवर मानवसृष्टी आह्मां सर्व हिंदुंच्या परंपरागत नित्याच्या संकल्पात म्हटल्याप्रमाणे १९६ कोटी वर्षांपूर्वी झाली हे सिद्धांताने पक्कं कळलं नसतं आह्मांला...

१७. डार्विनचा विकासवाद नि तदाधारित मानवविकासाची कल्पना किती थोतांड आहे ह्याची कल्पना आली नसती...

१८. अनेकेश्वरवाद म्हणजे वाट्टेल तितके ईश्वर आपण शोधले असते. अर्थात ईश्वरी अवतार मानणारे अनेक जण आपल्या वादासाठी एका मर्यादेनंतर पुढे जाऊन ब्रह्मासाठी ईश्वरही नाकारतातंच म्हणा. सगळं सोयीस्कर...

१९. ब्रिटीशांनी मांडलेला भेदकारी, विध्वंसकारी आर्याक्रमण सिद्धांत अजुनही रुढंच असता. जो अजुनही भारतीय‌ विद्वानांना पाश्चात्यांच्या आत्मघातकी अंधानुकरणामुळे सोडता आला नाहीये. अजुनही वेदांमध्ये वाट्टेल तो इतिहास‌ शोधणारे पढतमूर्ख आहेतंच नि राहतील. कारण सत्य न स्वीकारण्याची मानसिकता...

२०. ब्रिटीशांनी व पुढे डाव्यांनी केलेलं भारतीय इतिहासाचे पद्धतशीर विकृतीकरण अजुनही तसंच पुढे सुरु राहिलं असतं जे सर्वप्रथम महर्षि दयानंद नि त्यांच्या पं. भगवद्दत्त वगैरै अनुयायांनी खोडून काढलंय. इतरही विद्वानांचे योगदान आहेच...

२१. दयानंद नसते तर धर्मशास्त्रात नि दैनंदिन जीवनातही काय नि कुणाला प्रमाण मानावं, आप्त कुणाला मानावे हा विवेक आह्मीं निश्चित गमावून बसलो असतो, उपासना नेमकी काय नि कशी करावी हे कळलं नसते...

२२. दैनंदिन नित्य अशा पंचमहायज्ञांचे वास्तविक स्वरुप काय ते कळलं नसतं...

२३. संस्कृत व्याकरणशास्त्राची मूळची भगवान महर्षि श्रीपाणिनीकृत आर्ष परंपरा जी मधील काळात लुप्त झाली ती पुनरुज्जीवित झाली नसती...

२४. आह्मीं नेमके कोण आहोत, आमचं नेमकं स्वरुप काय, आमचं मूळ नेमकं काय आहे हे सांगणारे अनेक जण इतिहासात झाले असले तरी श्रीदयानंदांनी ज्या पद्धतीने आमचं मूळ आह्मांला सैद्धांतिकदृष्ट्या वेदांच्या आधारे ठामपणे सांगितलं, ते कधीच आह्मांला समजलं नसतं...

काही जणांना वाटेल की ह्यातलं काही कार्य इतरही महापुरुषांनी करून ठेवलंच आहे की.‌ मग दयानंदांचं इतकं कौतुक का? तर आह्मांस सर्वच महापुरुषांविषयी‌ समान आदर आहे हे आह्मीं वरही सांगितलंच आहे, प्रत्येकाचे योगदान मान्य आहेच, पण तरी महर्षि दयानंदांनी या सगळ्याची जोड वेदांशी घातली ती महत्वाची आहे...

ह्याचा अर्थ असा नाही की दयानंदांना आह्मीं आंधळ्यासारखे सर्वोच्च प्रमाण मानतो. मूळीच नाही. उलट दयानंदांचे काही सिद्धांत आह्मांस पटत नाहीत ते तेवढ्यापुरतं आह्मीं अमान्य करतो व ठामपणे तसं लिहितोही. अंधभक्ती मूळीच‌ नाही. कुठल्याच‌ महापुरुषाची नाही...

श्रीसमर्थांच्या भाषेत..

उत्तम नि भव्य तेचिं घ्यावें, मिळमिळीत अवघेचिं टाकावें| नि:स्पृहपणें विख्यात व्हावें, भूूमंडळी|

प्रत्येक महापुरुषाचे चांगलं ते घ्यावं, त्याज्य ते‌ त्यागावं. जे व्यष्टी नि समष्टीला अनुकूल व हितावह अशी निवड करावी. हीच‌ समन्वयात्मक भूमिका असावी. सर्वांविषयी समान आदर ठेऊन. सर्वच परंपरांविषयी समान आदर ठेऊन...

ह्या जन्मद्विशताब्दीनिमित्तचा हा अंतिम लेख...

भवदीय...

पाखण्ड खण्डिणी
pakhandkhandinee.blogspot.com

#महर्षिदयानंद_सरस्वती_आर्यसमाज_वैदिकसिद्धांत_वेदापौरुषेयत्व_भारतीयइतिहास_धर्मशास्त्र