Sunday 11 October 2020

*अ॒हमिंद्रो॒ न परा॑जिग्य॒ इद्धनं॒ न मृ॒त्यवेऽव॑तस्थे॒ कदा॑च॒न ।* ऋग्वेद - १०।४८।५


तेरा दिवसांपूर्वी हिंदुराष्ट्रपती श्रीसावरकरांचे चरित्रकार, ज्येष्ठ अभ्यासक, व्याख्याते, भागवताचार्य, हिंदुत्वनिष्ठ अर्थात राष्ट्रनिष्ठ विचारवंत असे श्री वासुदेव नारायण उत्पात उपाख्य वाना हे काळाचे बोट धरून अमरपंथी निर्गमन कर्ते झाले ! एका धगधगत्या यज्ञज्वालेची समिधा मृत्यू नामक वेदीवर अर्पिली गेली. पांडित्याचा महासागर जणु शुष्क झाला. ज्वलज्जहाल नि तितक्याच रसात्मक वाणीचा सूर हरपला आणि मृत्यूच्या स्कंधावर हा पुरुषोत्तम आरूढ झाला.
त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला..आपल्या दिव्य आभेंस विकीर्ण करीत त्या पुढे अस्तमानांस जाणाऱ्या प्रभाकरासमानच महाप्रस्थानासाठी अस्तांस निघता झाला...!
१९६६, २६ फेब्रुवारीस ज्याप्रमाणे मृत्युंजय वैनतेयाच्या प्रायोपवेशनाने सावरकर सदन ओस पडले, तद्वतच भूवैकुंठीचे ते नैऋत्येस असलेले 'राधानारायण सदन' हे आता जणू ओसंच पडले आहे. बुद्धिभेद नि तज्जन्य बुद्धीमांद्याच्या तमास दूर करणारा तो ज्ञानसूर्य आता अस्तास गेला आहे.
ज्याने आपली निष्ठा हिंदुराष्ट्र, पूर्णपुरुषोत्तम योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, त्यांची पत्नी जगज्जननी श्रीरुक्मिणी माता आणि हिंदुह्रदयसम्राट सावरकर ह्या चार दैवतांसच वाहिली होती, त्या आमच्या गुरूश्रेष्ठ व्यक्तिमत्वाचे असणे हे आज नसण्यांत शब्दांकित व्हावे, ह्यापेक्षा यातनामय ते काय ???
सावरकर हा पंचाक्षरी मंत्र आमच्या अगदी बालपणी इयत्ता सातवींत ज्या मुखाग्रातून प्रथम आमच्या कर्णी लागला, त्या गुरुमंत्राची जी उपास्य देवता जिचे त्यांनी आजीवन अखंड अनुष्ठान केले, त्याच तेजोनिधीच्या वादळी जीवनाची सांगता ज्या कृतज्ञतेच्या नि कृतार्थतेच्या मार्गाने झाली, त्याच, अगदी त्याच भावनेने ह्या पुरुषश्रेष्ठाने आपली जीवनयात्रा संपविली असेल.
धन्योऽहम्! धन्योऽहम्! कर्तव्यं मे न विद्यते किंचित्।
धन्योऽहम्! धन्योऽहम्! प्राप्तव्यं। सर्वमद्य संपन्नम्।
ते जणु आप्तकाम झाले, पूर्णकाम झाले...!
पण ते असे रिक्तकाम नको व्हायला हवे होते..कारण ते हवे होते!
ते असायला हवेच होते...एक शिष्य म्हणून माझ्यासाठी तरी त्यांचे गुरु म्हणून अस्तित्व हवेच होते...!
कारण...ज्येष्ठ साहित्यिक भाषाप्रभु श्रीपुभांच्या शब्दांतच सांगायचे तर
*"त्यांचे ते असणेही अत्यंत उपकारक होते, फार प्रेरक होते...!कारण त्यांचे ते असणे नव्हतेच, सूर्याचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही. सागराचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही, अग्नीचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही...!"*
आम्हीं पुभा ऐकले ते अप्पांच्या मुखातूनच. तेही पुभांची जन्मशताब्दी सावरकर क्रांतिमंदिरामध्ये त्यांनीच तीन दिवसीय व्याख्यानमालेत साजरी केली म्हणून.
वयाच्या ८१ मध्येही हा ज्ञानोपासक प्रत्यही १० पृष्ठे शब्दांकित करत होता. त्यांची लेखणी त्यांच्या उपास्यदेवतेप्रमाणे हिंदुत्वाची, हिंदुराष्ट्रीयत्वाची, हिंदुसंघटनाची, पाखण्ड खण्डणाची ज्योत अखंड तेवत ठेवत होती...दुष्टांवर प्रहार व सुष्टांवर स्तवनांजली अर्पण करत होती...!
प्रहार...
स्वधर्माचा, स्वराष्ट्राचा, राष्ट्रपुरुषांचा नि तज्जन्य गौरवशाली इतिहासाचा जाज्वल्य नि सगर्व अभिमान त्यांच्या चित्तांस चेतवीत होता. म्हणूनंच ह्या हिंदुधर्माचे, हिंदुत्वाचे नसलेले रिडल्स(कोडे) पाहणाऱ्यावर त्यांनी अवघ्या हिंदुस्थानात एकट्यानेच प्रतिघात केला होता...हे एकमेव कार्य ह्या विद्वत्श्रेष्ठाच्या संपूर्ण चरित्रांस ललामभूत ठरावं असं आहे...!
मऊं मेणाहुनिं आह्मीं विष्णुदास...
ह्या श्रीतुकोक्तींस त्यांचे जीवन अगदी सार्थ करणारे होते...
हिरण्यमयेन् पात्रेण सत्यस्याऽपिहितं मुखम्।
तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये।
या श्रुतीच्या आदेशान्वये त्या आणीबाणीच्या कारावासापश्चात् पुढे जीवनभर त्यांनी ह्या राष्ट्रधर्माचे यथोचित् पालन आपल्या लेखणीतून केलं. ह्या लेखणीबरोबरंच त्वत्स्थंडिली त्यांची वाणीही त्यांनी सहर्ष अर्पिली. त्यांची वीरश्री, त्यांचा आवेग, त्यांची विजीगीषु वृत्ती, त्यांचे पौरुषत्व सर्वकाही हिंदुत्वाच्या, हिंदुराष्ट्राच्या, देव-देश-धर्माच्या रक्षणासाठीच होते. हिंदुंच्या स्वत्वस्वाभिमानाची मानखंडना करणाऱ्या, त्यांच्या बुद्धीवर पराभूततेचा नि आत्मविस्मृतीचा कलंक लावणाऱ्या त्या राष्ट्रद्रोही दुष्प्रचारांवर त्यांनी आपल्या प्रत्युत्पन्न मतीने केलेला तो प्रहार अचंबित करणारा होता...
कलंक मतीचा झडो...
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् असे म्हणणाऱ्या योगेश्वराच्या श्रीमद्भगवद्गीतेचे ते निःस्सीम भक्त होते. हिंदुधर्मांवर, इतिहासांवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपरुपी कलंकाच्या ग्रहणाचे सावट दूर करून आत्माभिमान जागृत करणारी त्यांची लेखणी होती...!
इतका सर्व विद्याव्यासंग करूनही हा मनुष्य एकीकडे लोकहिताचे राजकारण तर दुसरीकडे कलेचाही तितकाच भोक्ता होता. उत्पातांची लावणीची परंपराही समर्थपणे चालवीत होता. पण त्यांच्या ह्या रसिकतेमध्ये महाकवी कालिदासाचा आल्हाददायक शृंगार होता, बीभत्सता मात्र नव्हती...अश्लीलतेचा तर स्पर्शही नव्हती...!
सूर्यप्रभव वंशाची सत्कीर्तिगीते गाणाऱ्या त्या कविकुलगुरु महाकवि श्रीकालिदासाच्या मेघदुतांवरील त्यांची प्रवचनमालिका, त्यावरील मल्लिनाथीचे त्यांनी अत्यंत सुबोध नि आकलनीय भाषेमध्ये केलेलं चिंतन आमच्या चिरस्मरणांत राहील...!
दुर्बोध विषय अगदी सोप्प्या नि सहजगम्य भाषेत सांगायची त्यांची एक विशेष शैली होती...
मला तर ते नेहमी म्हणायचे कि तु फार जड लिहितोस नि बोलतोस. नको इतकं जड व्यक्त होऊस..आपल्याला किती येतं त्यापेक्षा आपण समोरच्यापर्यंत ते किती सुलभरीतीने पोहोचवितो हे महत्वाचे...
हा माझ्यासाठी मोलाचा उपदेश होता...
धन्यो गृहस्थाश्रमः।
इतकं वादळी जीवन जगूनही उपरोक्त उक्तीप्रमाणे ह्या सद्गृहस्थाने आपला संसार मात्र अगदी धन्य केला. दोन तपांहून अधिक काळ ज्या भागवतश्रेष्ठ शांतिब्रह्म जनार्दनशिष्योत्तम श्रीएकनाथाच्या रुक्मिणीस्वयंवरावर त्यांनी भाष्य केलं, त्याच श्रीनाथांप्रमाणे त्यांनी त्यांचा गृहस्थाश्रमही अगदी उत्तम केला. सर्व संतांमध्ये श्रीनाथांचाच संसार अगदी सर्वोत्तम झाला. अप्पांनीही तेच केलं...
प्रपंच करावा नेटका ह्या राष्ट्रगुरु श्रीसमर्थांच्या वचनांसी त्यांची निष्ठा होती...!
हिंदुत्व नि हिंदुसभा हे सतीचं वाण...
"मला लोक नेहमी विचारतात की तुमचा राजकीय पक्ष कोणता? मी अखिल भारत हिंदुमहासभा हेच छातीठोकपणे सांगतो." इतकं ठणकाऊन सांगणं हे त्यांनाच जमलं. कारण हिंदुसभा नि हिंदुत्व हे सतीचं वाण फार थोड्यांना अंगी बाणवावं वाटतं. किंबहुना ते असिधाराव्रत पेलण्याचे सामर्थ्य फार काहींच्याच अंगी आहे. हे येरागबाळ्याचे कामंच नोव्हें...म्हणून की काय ते मला अधिक प्रिय नि वंदनीय होतेच नि राहतील...!

गर्व से कहों हम ब्राह्मण है।
ब्रिटीशांनी पेरलेल्या जातीद्वेषाला नि विशेषतः ब्राह्मणद्वेषाला, ज्याला पुढे काही कथित महात्म्यांनी भरीस भर घातली, मानवद्रोही डाव्यांनी ज्या ब्राह्मणद्वेषावरंच आपल्या कथित समानतेची बिगुलं नि डफली वाजविल्या, राजकीय पक्षांनीही त्यावर आपली पोळी भाजली, त्या सततच्या गोबेल्स प्रचारामुळे जो ब्राह्मण समाज निष्पाप नि निरपराध असूनही स्वतःला अकारण दोषी मानून आत्मविस्मृतीने नि अपराधी भावनेने ग्रस्त झाला, त्याच ब्राह्मण समाजांस आपल्या आत्माभिमानाचं नि गौरवाचं तेजोमयी ब्रह्मरसपान ज्यांनी आपल्या लेखणीने घडवलं, त्या ब्राह्मणश्रेष्ठाचं ब्रह्मलीन होणं...! आणि हे करताना अन्य कोणत्याही ज्ञातीविषयी एक अवाक्षरही नाही.

तुका ह्मणें सत्य सांगे, येवोत रागें येतील तें।

ही त्यांची पंढरपूरी निर्भीड वृत्ती होती. अरेला कारे म्हणायची. आयुष्यभर सत्याचीच उपासना केला. म्हणूनंच मानियेलें नाहीं बहुमता...!

त्यांच्याच भाषेत ते कुणाच्या बापाला घाबरत नव्हते...!

नाहीतर आज हिंदुत्वाच्या अर्थात राष्ट्रीयत्वाच्या नावाने 'ते आमच्याकडे यावेत' म्हणून त्यांचे वाट्टेल ते लांगुलचालन करून एका ब्राह्मण समाजांस मात्र पूर्णतः आरोपीच्या स्थानी कल्पून आपलं उजवं समाजवादी राजकीय सत्तास्थापनेचे हिंदुत्व रेटण्याची स्पर्धा आहेच...कदाचित ह्या उजव्या समाजवाद्यांच्या मते हिंदुत्वामध्ये ब्राह्मणांना काही स्थान नसावंच...!

पण अप्पा मात्र ह्यांस कधीच बळी पडले नाहीत...!

अप्पा शेवटी पूज्यनीय अप्पांकडे गेले...!

ज्या पूज्यनीय योद्धा संन्यासी स्वामी श्रीवरदानंद भारतींचं त्यांनी शिष्यत्व पत्करलं, त्या पूज्यनीय अप्पांनी आपल्या ह्या शिष्यांसही 'आपणासारिखे करितीं तात्काळ' ह्या उक्तीप्रमाणे असे केलं...अर्थात पूज्यनीय स्वामींचे सर्वच शिष्य अगदी 'आपणांसारिखेंच' आहेत. त्या गुरुश्रेष्ठांसही आपल्या शिष्योत्तमाच्या ह्या चरित्राचं निःसंशय कौतुहलंच नि अभिमानंच असावा...!

असा हा वाना नावाचा तारा हिंदुत्वाची अर्थात राष्ट्रीयत्वाची रेघ मोठी करत, ८१ वर्षे अखंडपणे ती ज्योत तेवत ठेवत, ती आपली उपास्य देवता सावरकर नावाच्या ज्योतीप्रमाणेच आपली प्राणज्योत त्या अनंतात विलीन करता झाला...!

एका तेजाची परंपरा आज खंडित झाली...एक दिवा विझून गेला...!

ह्या नररत्नांस जवळून पाहता आलं, ऐकता आलं, अनुभवता आलं इतकीच ह्या शिष्याच्या नरदेहाची सार्थकता...त्यांनी मला शिष्योत्तम मानलं व वैचारिक वारसदार मानलं इतकंच काय ते त्यांचे माझ्यावरचे न फिटणारं ऋण...!
आयुष्यभर हे दायित्व स्कंधी वाहण्याचं नि त्या गुरुने केलेल्या प्रत्येक सदुपदेशाचे यथोचित अनुकरण नि त्यांस दिलेल्या प्रत्येक शब्दाचं पालन करणं इतकीच आदरांजली मी त्यांस वाहु शकतो...!
काय लिहु????

आज जणु माझ्या लेखणीतले शब्दंच संपलेत, वाणीही हिंपुटी झालीय नि लेखणी अवरुद्धतेने बोथट झालीय...!
आज माझं शब्दभांडार तुमच्या चरणी अक्षरशः रितं केलंय...
अप्पा...

तुमच्या चरणी ह्या तुमच्या शिष्योत्तमाचा हा विनम्र शब्दालंकार...!

*धन्यं यश: सुरभितं विमलं कुलन्ते,*
*धन्य: पिता गुणवती जननी च धन्या ।*
*धन्या च गौरववती खलु जन्म-भूमि:,*
*त्वद्-वर्त्मनोsनुगमने वयमत्र धन्या: ।*

Monday 6 July 2020

लोकमान्यांचे ओरायन आणि आर्क्टिक होम - एक समीक्षात्मक अध्ययन

आज आषाढ कृष्ण प्रतिपदा अर्थात राष्ट्रसूत्रधार परमादरणीय श्रीलोकमान्यांचे पुण्यस्मरण! त्यानिमित्त मागील वर्षी एका विशेषांकासाठी नाकारला गेलेला हा अप्रकाशित लेख ! 

*यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।*
*स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥*

गीता - ३।२१

भारतीय असंतोषाचे जनक, राष्ट्रसूत्रधार परमादरणीय श्रीलोकमान्य टिळकांच्या प्रति कृतानेक साष्टांग दंडवत घालून, त्यांच्याविषयी अपार आदर नि कृतज्ञता व्यक्त करून, लहानतोंडी मोठा घास घेण्याचा एक प्रयत्न ह्या लेखातून आम्ही करताहोत. जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, अपरिमित त्याग, असामान्य बुद्धिमत्ता, तितकीच प्रखर ज्ञानसाधना, विद्वत्ता नि व्यासंग आणि त्याला इंद्रियसंयमाची नि तर्कशुद्धतेची नि प्रगल्भतेची जोड ह्या गुणवैभवांनी संपन्न असलेले व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून नि व्युत्पन्न मतीतून ज्या ग्रंथसंभाराची नि साहित्याची निर्मिती झाली त्यामध्ये वेदकाळासंदर्भातले आणि प्राचीन आर्यांच्या स्थाननिश्चितीसंबंधातले त्यांचे दोन महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजे "ओरायन ऑर दि रिसर्चेस इंटू दि अँटिक्विटी ऑफ दि वेदाज" आणि "आर्क्टिक होम इन दि वेदाज" अर्थात मराठीमधून "मृगशिरस् किंवा वेदांच्या प्राचीनत्वाचा शोध" आणि "वैदिक आर्यांचे उत्तरध्रुवांवरील वसतिस्थान किंवा मूलस्थान" (श्री वि रा सहस्त्रबुद्धे यांनी केलेल्या अनुवादानुसार- टिळक बंधु प्रकाशन) उपरोक दोन्ही ग्रंथ मूळ इंग्रजीतून असून आम्ही मूळ आंग्ल ग्रंथ आणि मराठी अनुवाद ह्या दोन्हींचा विनियोग प्रस्तुत लेखासाठी केला आहे.

लोकमान्यांनी ऑक्टोबर १८९३ मध्ये 'ओरायन' हा ग्रंथ सिद्ध केला आणि मार्च १९०३ मध्ये 'आर्क्टिक होम इन दि वेदाज' हा ग्रंथ सिद्ध केला. प्रथम ग्रंथामध्ये त्यांनी वेदांच्या प्राचीनत्वाचा शोध घेतला तर द्वितीय मध्ये आर्यांच्या मूळ वसतिस्थानाचा. प्रथम ग्रंथामध्ये त्यांनी वेदांचा काळ इसवी सन पूर्व ४५०० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न केला. ह्यासाठी वेदांतील अर्थात वैदिक साहित्यातील म्हणजे मूळ वेदांच्या संहिता, त्यांचे ब्राह्मण ग्रंथ आणि सूत्र ग्रंथ ह्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ज्योतिषविषयक घटनांचा त्यांना वाटणारा उल्लेख पाहून वेदांगज्योतिष ह्या ग्रंथाधारे कालनिर्णय त्यांनी केला. त्यांच्याच शब्दांमध्ये सांगायचे तर त्यांनीच विषय प्रवेशांत म्हटल्याप्रमाणे 

*"आमच्या विवेचनाची सारी भिस्त संहिता आणि ब्राह्मणे यांसारख्या प्राचीन ग्रंथांवर आणि त्यातल्या त्यात सर्वांमध्ये प्राचीन ग्रंथ जो 'ऋग्वेद' त्यावर आहे."*

विषय प्रवेश - पृष्ठ ११ - टिळक बंधु प्रकाशन प्रथमावृत्ती - १ ऑगस्ट, १९९९

लोकमान्यांनी ज्योतिर्गणिताच्या आधारे अर्थात खगोलीय घटनांच्या आधारे आणि त्यांचा संबंध वैदिक साहित्यातल्या संदर्भांशी जोडून वेदकाळ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. *मासानां मार्गशीर्षोsहम्।* ह्या गीतेतल्या वचनावरून त्यांचे लक्ष वेदांकडे ओढले गेले आणि त्यामध्ये त्यांनी वेदांग ज्योतिष ह्या ग्रंथाचा आधार घेऊन चार वर्षांच्या प्रदीर्घ अध्ययनापश्चात हा ग्रंथ सिद्ध केला असे म्हटले आहे.  त्यांनी प्राचीन आर्यांच्या कालमापन पद्धतीच्या दृष्टीने यज्ञ म्हणजेच संवत्सर, वर्षारंभ, वसंत संपात, मकर-संक्रमण, उत्तरायण, दक्षिणायन, कृत्तिका नक्षत्र आणि इतर नक्षत्रांचे स्थान, त्यांचा वैदिक साहित्यातील उल्लेख, तारकापुंज, त्यांचे स्थान, आग्रहायण म्हणजेच मृगशीर्ष नक्षत्र, त्याचे स्थान, ग्रीक साहित्याशी त्याचा संदर्भ, त्याचे ग्रीक साहित्यात ओरायन हे नाव, ऋग्वेदातले ऋभु आणि वृषाकपि हे सूक्त हे सर्व विषय ग्रंथामध्ये विस्ताराने अभ्यासले असून त्यावरून त्यांनी निम्नलिखित कालनिर्णय केला आहे.

ओरायनपूर्व काल - ख्रिस्त पूर्व ६००० ते ४०००

कृत्तिका नक्षत्र काल - ख्रिस्त पूर्व २५०० ते १४००

बुद्धपूर्व काल - ख्रिस्त पूर्व १४०० ते ५००

हा त्यांच्या उपरोक ग्रंथाचा एकूण निष्कर्ष आहे. 

*आता आर्क्टिक होम अर्थात वैदिक आर्यांचे मूल वसतिस्थान अर्थात उत्तरध्रुवांवरील वसाहती ह्या ग्रंथाविषयी पाहुयांत*

पहिल्या ग्रंथापश्चात लोकमान्यांनी आर्यांच्या मूल वसतिस्थानाचा विचार करण्यासाठी हा ग्रंथ रचला. त्यामध्ये लोकमान्यांनी उत्तरध्रुवावरच पाहिल्याने वनस्पती आणि जीवसृष्टीला सुरुवात झाली आहे असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे असे मांडून आर्यांचे मूलस्थान उत्तरध्रुवांवरच आहे ह्या निष्कर्षाप्रत येण्यासाठी ऋग्वेद आणि पारश्यांचा झेंद अवेस्ता ह्या दोन ग्रंथांचा आधार घेतला. त्यांनी पृथ्वीवर मागे आलेले हिमयुग, नवपाषाण युग, धातुयुग, उत्तरध्रुवांवरील परिस्थिती, ऋग्वेदातले दीर्घकालीन रात्र आणि दिवसाचे कथित मंत्रसंदर्भ, देवांची रात्र, वैदिक उषा म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी दिसणारी अवकाशांतली लालिमा, मास आणि ऋतु, इंद्र-वृत्रासूर आदि वैदिक कथा, प्रातःकालिक देवता, अवेस्तामधला संदर्भ, तुलनात्मक गाथाशास्त्र आदि गोष्टींचा विचार उपरोक्त ग्रंथामध्ये करून त्यांच्या आधीच्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेला काळ इसवी सन पूर्व ४५०० वरून मागे नेऊन त्यांनी इसवी सन पूर्व ८००० इतका ठरविला. 

अगदी सारांश ह्या ग्रंथाचा सांगायचा झाला तर वेदांमध्ये दीर्घकालीन दिवस आणि रात्रींचा आणि उषेचा संबंध लोकमान्यांनी उत्तर ध्रुवाशी लावून आर्यांचे अस्तित्व तिथले असा निष्कर्ष काढला.

उपरोक्त दोन ग्रंथांचे लोकमान्य प्रणीत संक्षेपांत विवेचन हे असे आहे.

*आता ह्या दोन ग्रंथांविषयी नि तज्जन्य सिद्धांताविषयीची आमची समीक्षा पाहुयांत*

श्रीलोकमान्यांविषयी पूर्ण आदर ठेवून आम्हांस खेदाने म्हणावेसे वाटते की उपरोक दोन्ही ग्रंथातील संशोधन हे वैदिक सैद्धांतिक दृष्टया अत्यंत निराधार आहे. लोकमान्यांनी वेदांच्या संहितामध्ये अर्थात मंत्रांमध्ये इतिहास शोधण्याचा आणि त्याचा संबंध इतिहासकालीन घटनांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे हे तर अगदी स्पष्ट आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्येही ही गोष्ट वारंवार सांगितली आहे. टिळकांच्या मते वेदांमध्ये आणि वैदिक साहित्यामध्ये प्राचीन आर्यांनी स्वतः पाहिलेल्या, प्रत्यक्ष अनुभवलेल्या घटना ग्रथित करून ठेवल्या आहेत. जसे की उत्तरध्रुवांवरील कथित दीर्घकालीन रात्री आणि दिवस...

आमचा टिळकांशी नेमका मतभेद आहे तो इथेच. 

वेदार्थ लावायचा कसा?

*ब्राह्मणेन निष्कारणो धर्म: षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।*

पातंजल महाभाष्य

सहा वेदांगांसहित वेदांचे अध्ययन ब्रह्म जाणण्याची इच्छा करणाऱ्याने करावे असा शास्त्र सिद्धांत आहे. 

ही सहा वेदांगे कोणती? तर छंद, कल्प, शिक्षा, निरुक्त, ज्योतिष आणि व्याकरण. 

टिळकांच्या प्रतिपादनाविषयी मान्यता का नाही त्याची कारणमीमांसा करण्यापूर्वी इतिहास म्हणजे काय ह्याची व्याख्या पाहुयांत.

*सर्वप्रथम इतिहास शब्दाचा विचार करुयांत*

इतिहास हा शब्द वैदिक संस्कृतमधील असल्याने त्याच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार करणं अत्यावश्यक आहे. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे वेदांच्या अध्ययनासाठी ज्या षड्वेदाङ्गांचे अध्ययन संप्रदायपूर्वक अर्थात गुरुपरंपरेतुनच करावंच लागतं, त्यामध्ये निरुक्त हे एक वेदाङ्ग आहे. ह्यामध्ये वैदिक शब्दांची निरुक्ती अर्थात निर्वचन अर्थात विवेचन किंवा फोड देताना किंवा अर्थ विस्तार करताना निघण्टु ह्या वैदिक शब्दांच्या कोशावरील भाष्यकार महर्षी श्रीयास्काचार्य म्हणतात 

*निदानभूत: इतिह एवमासीत इति य उच्यते स इतिहास: ।*
२।३।१

म्हणजे प्राचीन काली घडून गेलेल्या गोष्टींचे नाव इतिहास ह्या अर्थाने आहे.

*आता इतिहास शब्दाची व्युत्पत्ती पाहुयांत*

*इ+क्तिन् म्हणजे इ अक्षरांस क्तिन् प्रत्यय लागून इति शब्द तयार होतो. आणि पुढे ह+आस् असा इतिहास पूर्ण शब्द बनतो.*

*धर्मार्थकामोक्षाणामुपदेशसमन्वितम् पूर्ववृत्तं कथायुक्तमितिहासं प्रचक्षते ।*

(स्वामी विद्यानंद सरस्वती - भूमिका भास्कर - पृष्ठ ३०७)

अशी एक इतिहास शब्दाची आणखी एक व्याख्या करता येईल की उपरोक्त चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तीचे कथायुक्त असलेले पूर्ववृत्त म्हणजे इतिहास होय.

ह्या अर्थाने इतिहास हा शब्द पाहता येईल. अस्तु।

*वेदांमध्ये इतिहास आहे का?*

उत्तर - मुळीच नाही.

हे कशांवरून? हे आमच्या मनाचे मांडे नाहीयेत. ह्यासाठी आम्ही निम्नलिखित प्रमाण सादर करतो.

*प्रत्यक्ष वेदांची अंतःसाक्षी*

ज्या ग्रंथांचे अध्ययन आपण करत आहोत, लोकमान्यांच्या भाषेमध्ये ज्यांवर आपली सारी भिस्त आहे, त्याच वेदांमध्ये प्रत्यक्षपणे इतिहास नाही असे स्पष्ट सांगितले आहे. इतकंच काय, तर ह्याच वेदांवरील ऋषीमुनिकृत व्याख्यानरूपी असे ब्राह्मणग्रंथ, त्यांचाच भाग असलेली उपनिषदे, आरण्यके, स्वतंत्र असे सूत्र ग्रंथ ह्या सर्व साहित्यामध्ये कुठेही वेदांमध्ये ऐतिहासिक वर्णने आहेत असे म्हंटलेलं नाहीये. इतकेच काय आम्ही वर म्हंटल्याप्रमाणे पतंजलींच्या आदेशाप्रमाणे ज्या षडङ्गो म्हणजे सहा वेदांगांच्या साहाय्याने वेदार्थ प्रतिपादन करणे क्रमप्राप्त आहे, त्या सहा वेदांगमध्येही कुठेही वेदांमध्ये ऐतिहासिक वर्णने आहेत असे म्हंटलेलं नाहीये. आणखी महत्वाचे म्हणजे आपली जी षडदर्शने आहेत, त्यांमध्येही कुठेही वेदांत कुठल्याही ऐतिहासिक कथांचे, स्थळांचे, नद्यांचे, मनुष्याचे, त्यांच्या अनुभवांचे वर्णन आहे असे सांगितले नाही. कारण वेद हे नित्य आहेत. 

वेदांमध्येच वेदांना नित्य म्हटले आहे 

इतिहास हा अनित्य वस्तूंचा, व्यक्तींचा, घटनांचा, प्रदेशांचा, नद्यांचा, राजांचा, राण्यांचा, ऋषींचा, प्राण्यांचा आदिंचा असतो. पण वेदांमध्ये असा अनित्य इतिहास नाहीये.

*तस्मै॑ नू॒नम॒भिद्य॑वे वा॒चा वि॑रूप॒ नित्य॑या । वृष्णे॑ चोदस्व सुष्टु॒तिं ॥*
ऋग्वेद - ८।७५।६

ह्या मंत्रामध्ये वेदवाणींस नित्या म्हटलेले आहे. अगदी महाभारतामध्येही 

*अनाधिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंम्भुवा।*
*आदौ वेदमयी दिव्या यत: सर्वा: प्रवृत्तय:।*

शांतिपर्व - २३३.२४

अर्थ - सृष्टीच्या आरंभी त्या स्वयंभू परमात्म्याने आदि आणि अंत नसलेली अशी नित्य अशी वेदवाणी प्रदान केली ज्यामुळे विश्वातल्या सर्व प्रवृत्तीचा प्रकाश झाला आहे. श्वेताश्वेतर उपनिषदमध्येही

*यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै।*

असं म्हटलंय.

आम्ही वर ज्या षड्वेदांगांचा उल्लेख केला, त्यातले उत्तरमीमांसाकार बादरायणमुनी म्हणतात

*अतएव च नित्यत्वम्।*

१।३।२९ 

ह्या सूत्रातून वेदांचे अनादित्व सिद्ध करतात. वेदांना नित्य सांगतात. स्वतः लोकमान्यांनीच आंग्ल भाषेमध्ये ह्यावर भाष्य केले आहे. त्यांनी स्वतः ब्रह्मसूत्र वर भाष्य केलेलं असताना वेदांमध्ये ते इतिहास शोधतात ही गोष्ट न पटणारी आहे. त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून!

वेद कुणी मनुष्याने किंवा ऋषींनी रचले आहेत काय ह्याचे खंडन करताना म्हणतात

*ब्रह्माद्या ऋषिपर्य्यन्ता स्मारका न तु कारका:।*

ब्रह्मापासून ते सर्व ऋषींपर्यंत वेदांचा कुणीच कर्ता नाहीये, केवळ स्मर्ता आहे. 

वेदांमध्ये कुणा मानवाचा, ऋषींचा इतिहास किंवा भूगोल आहे का ह्याचे खंडण करताना पूर्वमीमांसाकार महर्षि जैमिनी म्हणतात 

*वेदांश्चैके सन्निकर्षं पुरुषाख्या:।*

१।१।२७

पुन्हा हेच पूर्वमीमांसाकार वेदांमध्ये कुणा अनित्य व्यक्तींचा, ऋषींचा रचनाकार म्हणून उल्लेख आलेला आहे का ह्याचे खंडण करताना

*उक्तन्तु शब्दपूर्वत्वम्।*

१।१।२९

सांख्यदर्शनकार महर्षि कपिल वेदांची रचना कोणत्याही मुक्त किंवा बद्ध पुरुषाने किंवा स्त्रीने केलीच नाही असे स्पष्ट नि ठासून सांगताना म्हणतात

*मुक्तामुक्तयोरयोग्यत्वात।*
५।४७

हे सूत्र सांगतात.

अनेकवेळा वेदांमध्ये ऋषींची म्हणजे व्यक्ती विशेषांची, नद्यांची, स्थानांची, पर्वतांची, भौगोलिक प्रदेशांची नावे आहेत असे दिसते, त्याचे काय? 

ह्याचे उत्तर नाही असेच आहे. ते केवळ नामसाधर्म्य आहे . ह्याचे समाधान आम्ही वर अनेक प्रमाण देऊन सिद्ध केलेलेच आहे. तरीही एक महत्वाचा सूत्राने हे सांगतो

*सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्।*
*वेदशब्देभ्य: एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे।*

हे मनुस्मृतीचे २।२१ येथील वचन आहे. ह्याचा अर्थ असा आहे की वेदांतल्या शब्दांवरून नंतरच्या काळात सर्व वस्तूंची, संस्थांची अर्थात सर्व स्थावर जंगमाची नावे ठेवली गेली. म्हणजेच वेद सर्वांच्या आधी आहेत, त्यांना कुणीच रचले नाही. त्यांच्या आधी कुणीच नव्हते.

सर्व प्राचीन षड्दर्शनकारांनी व षड्वेदांगकारांनी स्पष्ट नि ठासून सांगितलंय की सर्व वैदिक शब्द हे योगिक अर्थात धातुज आहेत. ह्याचे प्रमाण प्रत्यक्ष *निरुक्ताचे टीकाकार दुर्गाचार्य १।१, २।१।३, ५।१।३* येथे देतातच. तिथे पहावे ही विनंती.

वेदांमध्ये लौकिक शब्द नाहीत त्यामुळे वेदार्थात लौकिक अर्थ प्रतिपादन होऊच शकत नाही. जे लोक ऐतिहासिक अर्थ वेदांचा घेतात, त्यांना ही गोष्ट मान्य होत नाही ही शोकांतिकाय. 

निरुक्तकारांनी 

*एकार्थमनेकशब्दमित्येतदुक्तम्; अथ यान्यनेकार्थान्येकशब्दानि तान्यतोsनुक्रमिष्याम: ।*

अर्थ - *अनेक शब्दांचा एक अर्थ व एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात असे स्पष्ट सांगितलंय.*

 अगदी पातंजल महाभाष्यकारही 

*बह्वर्था: धातवो भवन्ति - १।३।१*

असे म्हणतातच.

हे लक्ष्यात न घेता व वर मांडलेले सिद्धांत लक्षात न घेता केलेलं भाष्य जर कुणाचे असेल तर ते कसं प्रमाण मानायचे ? 

वेदांमध्ये ऐतिहासिक युध्द वर्णने आहेत काय? 

उत्तर - मुळीच नाही. 

*तत्रोपमार्थेन युद्धवर्णो भवन्ति ।*

असे निरुक्तकार स्पष्ट सांगतात. म्हणजे वेदांतली युद्ध वर्णने ही अलंकारिक उपमार्थाने आहेत, रुपक आहेत. ती ऐतिहासिक नाहीत.

आता कुणी शंका उपस्थित करेल की जर वेदांमध्ये इतिहासच नाही तर मग त्या मंत्रांची ऐतिहासिक वर्णनसदृश रचना का आढळते?

ही शंका अगदी योग्य आहे. त्याचे समाधान निम्नलिखित...

ह्याच वेदांमध्ये वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन शब्दप्रयोगही येतात. त्यांवरून वेदांची रचना आता वर्तमानकाळात होतेय किंवा भविष्यांत होणार आहे असे कुणी म्हणणार आहे का? हे जसे हास्यास्पद आहे तसे इतिहास शोधणेही वैदिक सिद्धांतांस सोडून आहे.

तैत्तिरीयोपनिषदामध्ये वेदार्थाच्या पाच प्रक्रियांचा निर्देश आपणांस प्राप्त होतो. 

*अथात: संहिताया उपनिषदं व्याख्यास्याम: ।पञ्चस्वधिकरणेषु ― अधिलोकम्, अधिज्योतिषम्, अधिविद्यम्, अधिप्रजम्, अध्यात्मम् ।*

१।३।१

ह्यात पाच प्रक्रिया सांगितल्याच आहेत स्पष्ट. लोकमान्यांनी ह्याचा पुसटसा निर्देशही आपल्या दोन्ही ग्रंथामध्ये केलेला नाहीये. असे का ? ह्याचे उत्तर आपणास निम्नलिखित संवादात मिळेल.

*वेदकालनिर्णय ह्याविषयी लोकमान्य आणि परमपूज्य दक्षिणामुर्ती स्वामी संवाद*

इसवी सन १९०० मध्ये आदरणीय लोकमान्य जेंव्हा वाराणसीत गेले, तेंव्हा त्यांचा परमपूज्य दक्षिणामुर्ती स्वामींशी संवाद झाला. त्या संवादाचे लेखन समग्र लोकमान्य टिळक आख्यायिका व आठवणी खंड तृतीय पृष्ठ ९३ वर प्रकाशित आहे. किंवा हाच संवाद समग्र लोकमान्य टिळक वाङ्मय खंड ६ मध्ये पृष्ठ क्रमांक ११३ ते ११७ वर प्रकाशित आहे. ह्यात लोकमान्यांनी वेदांविषयी करून घेतलेल्या स्वमान्य सिद्धांताचे आणि शंका कुशंकांचे सप्रमाण समाधान स्वामींनी केल्याचे आपणांस प्राप्त होते. जिज्ञासूंनी तेथूनच ते वाचावे ही विनंती. आम्हांस विस्तारभयास्तव ते इथे देणे संभव नाही. अगदी संक्षेपांत हा संवाद देतो

*लोकमान्य - आपण म्हणतां त्याप्रमाणे वेदांचे अनादि अपौरुषेयत्व बुद्धीस पटत नाही.*

*स्वामी - संप्रदायपूर्वक शास्त्राध्ययन नाहीं, हेंच त्यांचें कारण.*

मुळात आर्य कुठूनही बाहेरून आलेलेच नाहीयेत.

आर्य्य: ईश्वरपुत्र:।

अशी निरुक्तकारांनी आर्य शब्दाची व्याख्या दिली आहे.

ज्या देशाला नष्ट करण्याचे आहे त्या देशाचा इतिहास नष्ट करायचा असतो ह्या हेतूने ब्रिटिशांनी आपल्यात कलह निर्माण करण्यासाठी आर्याक्रमण सिद्धांत मांडला. ज्या मॅक्सम्युलरने हा सिद्धांत मांडला त्यानेच पुढे जाऊन हा सिद्धांत खोडला. हा मूळचा ख्रिस्ती मिशनरी होता आणि वेदांच्या विकृत अनुवादाचे काम त्याला देण्यात आले होते. त्याने ह्या सर्व गोष्टींची मान्यता त्याच्या पत्रव्यवहारात दिलेली आहे. ज्यांना जिज्ञासा असेल, त्यांनी त्याचे पत्रव्यवहाराचे दोन खंड वाचावेत. पुढे तो बदलला हेही सत्य आहेच. अर्थात त्याचे श्रेय महर्षी दयानंद ह्यांना जाते.अस्तु. त्याने मध्य पूर्व आशियातून आर्य आक्रमक म्हणून आले असा सिद्धांत मांडला होता. लोकमान्यांनी त्यांच्या उपरोक्त 'आर्क्टिक होम' ह्या ग्रंथामध्ये त्याच्या नावाचा ९६ वेळा उल्लेख केला आहे. स्वतः लोकमान्यांना डोंगरीच्या कारावासातून सोडण्यांस त्यानेच सहकार्य केले होते हे टिळकांनीच एका अभिव्यक्तीमध्ये(मुलाखत) मान्य केले आहे जी समग्र लोकमान्य टिळक खंड तृतीय मध्ये पृष्ठ १०६ पासून प्रकाशित आहे. त्यात टिळकांनी आपण आपले मत भविष्यात मागे घेऊ शकतो असे स्पष्ट म्हटले आहे. टिळक म्हणतात

*मी बहुतेक ऋग्वेदाचाच अभ्यास केला, त्यास टीकांची मदत झाली. त्यावरून मी असा तर्क बांधला आहे की, आर्य लोकांचे पूर्वज ज्या ठिकाणी 'दोन महिन्याची रात्र' होती अशा ठिकाणी म्हणजेच उत्तर ध्रुवांजवळच्या मुलखात होते. परंतु हळूहळू ते दक्षिणेकडे येऊं लागले. माझ्या म्हणण्यांस भूशास्त्रवेत्त्यांच्या शोधांचे पाठबळ आहे. तथापि तुरुंगात मला फारशी पुस्तकें मिळाली नाहीत, तीं अद्यापि पहावयाची आहेत. पहिल्यानंतर कदाचित माझे मत फिरण्याचाही संभव आहे.*

आता इथे टिळकांनी ज्या भूशास्त्रवेत्त्यांचा संदर्भ दिला आहे त्या भूशास्त्रानुसारही टिळकांचे मत त्याकाळीच खोडले गेले होते. कसे ते पाहुयांत.

*भारतीय साम्राज्य नावाचे २२ खंड लिहिणारे विद्वान ज्येष्ठ इतिहासकार श्री. नारायणराव भवानराव पावगी ह्यांच्याकडून*

पुण्यातलेच एक विद्वान इतिहासकार श्री पावगींनी लोकमान्यांना भेटून त्यांचे सिद्धांत खोडले होते. त्यांनी "Aryavartic Home" ह्या ग्रंथामध्ये टिळकांच्या आर्य उत्तरध्रुव निवासाचे खंडण केले होते. ते करायच्या आधी त्यांच्या "भारतीय साम्राज्य" नामक ११ खंडांची हस्तलिखिते त्यांनी टिळकांनाच दाखविली होती. इतकंच काय ह्याच पावगींनी  त्यांच्या "Vaidik Fathers of Geology" ह्या ग्रंथामध्ये भूस्तरशास्त्राच्या सहाय्यानेच आर्यांची मूलभूमी भारत हेच सिद्ध केले होते आणि ते टिळकांना दाखविलेही होते. अर्थात टिळकांनी ते मान्य केलेच नाही ही गोष्ट वेगळी. ज्यांना हे सर्व संदर्भ पहायचे आहेत त्यांनी 'लोकमान्य टिळक आख्यायिका व आठवणी खंड द्वितीय' पहावा ही विनंती. पावगींनी ही आठवण त्यात सविस्तर दिली आहे. 

*आणखी एका बंगाली लेखकाचा महत्वाचा संदर्भ*

उमेशचंद्र विद्यारत्न ह्या बंगाली लेखकाने *"मानवेर आदि जन्मभूमि"* हा बंगाली ग्रंथ लिहिला असून त्या ग्रंथाच्या शेवटी स्वतः लोकमान्यांनी दिलेला अभिप्राय आहे, ज्यात ते टिळकांना घरी भेटायला आल्याचे आणि त्यांचा संवाद झाल्याचा संदर्भ आहे. १८ जानेवारी १९१६ चे हे पत्र आहे टिळकांचे. उपरोक्त ग्रंथाची pdf उपलब्ध आहे. लेखाच्या शेवटी धागा दिला आहे. 

*लोकमान्यांनी आपला सिद्धांत मागे घेतला???*

एक वैदिक विद्वान श्रीगणपतीशास्त्री हेब्बार ह्यांनी *"भारतीय लिपीचे मौलिक एकरूप"* हा एक अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित केला आहे. ह्या ग्रंथामध्ये लोकमान्यांच्या समकालीन अशा गीताप्रेस गोरखपूरचे संस्थापक श्री हनुमानप्रसाद पोद्दार ह्यांची आठवण दिली आहे. त्यांचे आत्मचरित्र *"जीवनयात्रा"* नावाने. टिळकांच्या आर्योत्तरध्रुव सिद्धांताच्या मांडणीपश्चात पोद्दार टिळकांना भेटले होते आणि त्यांनी त्यांच्याशी त्याविषयी संवाद केला होता. त्यावर टिळकांनी त्यांना आपला सिद्धांत मागे घेतल्याचे सांगितले होते आणि त्याचे हस्तलिखितही दाखविले होते. पण ते प्रकाशित करायच्या आत टिळक गेले. पुढे पोद्दारांनी त्यांच्या वंशजांशी संपर्क केला पण त्यांना पुढे काहीच माहिती मिळाली नाही असे त्यांनी लिहिले आहे. प्रथमावृत्ती पृष्ठ ४८८ - संपादक श्री गोपीनाथ कविराज

*ह्या सर्व लेखनाचा आमचा हेतु काय?*

दोनशे वर्षांपूर्वी ज्या आर्य सिद्धांताविषयी जगांत कुठेही चर्चा नव्हती, तो सिद्धांत अत्यंत विकृतपणे ब्रिटिशांकडून आम्हा भारतीयांचा बुद्धभेद करण्यासाठी मांडला जातो आणि आजही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून तो सिद्धांत आम्हाला आहे तसाच शिकविला जातो. अनेक भारतीय विद्वानांनी आणि पाश्चात्य विद्वान त्यांनीही हा सिद्धांत गेल्या काही दशकांमध्ये सप्रमाण खोडून काढलेला आहे. तरीदेखील तो पुन्हा पुन्हा रेटला जातो ही आमची शोकांतिकाच नव्हे तर काय?

टिळकांविषयी आमच्या अंतःकरणामध्ये पूज्यभाव आहे हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. स्वतः टिळकांनी आमचे उपरोक्त विवेचन अभ्यासले असते  तरीही त्यांनी काही विचार केला असताच. यद्यपि उपरोक्त विवेचन अत्यंत न्यून असले तरी मार्गदर्शक अवश्य आहे. विस्ताराने लिहायचे झाल्यांस स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करावी लागेल ह्याची आम्हांस निश्चिती आहे. काहीजण शंका विचारतील की आम्ही जी वैदिक आणि तत्सम साहित्यातली प्रमाणे मांडली आहेत ती टिळकांस ज्ञात नव्हतीच की काय? असे आम्हांस मुळीच म्हणायचं नाहीये. कारण स्वतः टिळकांनीच षड्दर्शनापैकी एक असे वेदांतदर्शन अर्थात ब्रह्मसूत्र ह्यावर आंग्ल भाषेत भाष्य केलेच आहे. त्यातलीच प्रमाणे आम्ही वर उद्धृत केली आहेत. असे असताना टिळकांना ती मान्य न व्हावीत असे कसे व्हावे? कदाचित असे असेल की पाश्चात्यांच्या धोरणांस प्रत्यक्ष विरोध न करता द्राविडी प्राणायाम करून त्यांना मत मांडायचे असेल. ह्यावर श्रीगणपती शास्त्री हेब्बरांचे मत सांगतो आणि लेखणींस विराम देतो.

*"वेदातील खगोलशास्त्रीय व प्रदेश परिचायक उल्लेख लोकमान्य टिळक उद्धृत करून आपले प्रतिपादन मांडतात. वास्तविक एखाद्या प्रदेशाचे वर्णन करणारा त्या वर्णनावरून तेथील रहिवासी आहे असा निश्चित निर्णय करता येत नाही. कारण त्या प्रदेशाचा प्रवास करून आलेला मनुष्य ही त्या प्रदेशाचे व तेथील भौगोलिक स्थितीचे वर्णन करू शकतो. दुसरे असे की ग्रहांचे चार पुन्हापुन्हा आवृत्त होणारे असल्याने कोणत्या चक्रास घेऊन कालनिर्णय करावा याविषयी आधाराला कांहीच नाही. अर्वाचीन अभ्यासक जवळचे चक्रास घेतात तें त्यांचें मनानें वा त्यांचे सोयीनुसार आहे. फा हि यान, ह्यू एन स्तंग, अल्बेरुणी, मेगॅस्थेनीस, ट्रॅव्हर्नियर इत्यादिंनी त्यांचे ग्रंथात हिंदुस्थानचे सविस्तर वर्णन केले आहे, तेवढ्यावरून ते हिंदुस्थानचे रहिवासी होतात काय? मुळीच नाही. याच दृष्टिकोनातून वैदिक उल्लेखांचा मागोवा घेतल्यास तेवढ्यावरून आर्यांचे त्या ऋषींचे मूळ वसतिस्थानाचा निर्णय घेता येत नाही हे दिसते. आर्य बाहेरून आले कां येथूनच बाहेर गेले याचा निश्चित निर्णय करण्याजोगे प्रमाण पाश्चात्त्यां जवळ नाही."*

*"वेद हे परमेश्वराचे निःश्वास आहेत...हा सर्व भाग लोकमान्य जाणत नव्हते असे नाहीं, तर त्यांचे लेखन त्यांचे पूर्वीच्या पाश्चात्य लेखकांचे जे मत 'आर्य मध्य आशियातून आले–' यांविषयी संदिग्धता निर्माण करण्याचा उद्देश्य ठेऊन असावे असे आम्हांस वाटतें. अत्यंत परकीय प्रभावाचा निरास सर्वत: विरुद्ध प्रतिपादनाने होत नाही तर परकीय मतांत संदिग्धता निर्माण करून तद्वारा इष्ट मतात हळूंहळूं पर्यवसान करून होतो. याच धोरणी विचारानें लोकमान्यांचे लेखन आहे असें आम्हांस वाटतें."*

इत्यलम्।

भवदीय,

तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com


Thursday 2 July 2020

पंढरीचा श्रीविठ्ठल बुद्ध किंवा बौद्ध, जैन किंवा वीरगळ आहे काय???




*लेखांक प्रथम*

*धर्माचे पालन, करणे पाषांड खंडण।*
*हेचिं आह्मांसि करणे काम, बीज वाढवावें नाम।*
जगद्गुरु श्रीतुकोबाराय  

आमच्या मागील लेखांत आम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या लेखमालेत आमच्या भूवैकुंठाधिपती परमात्मा श्रीपंढरीशाच्या मूर्तींवर नि एकूणच इतिहासांवर गेल्या काही दशकांत जे काही निराधार आक्षेप घेतले गेले आहेत, त्यांचे निराकरण करण्याचे कार्य करणार आहोत. वास्तविक हे कार्य आमच्या पूर्वसूरींनी केंव्हाच करून ठेवलं आहेच. त्यात *वै. हभप. श्री सोनोमामा दांडेकर* असतील, आमच्या पंढरीतले *डॉ. श्री. गोपाळराव बेणारे* असतील, पंढरीतलेच संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आणि *'वारकरी संप्रदायाचा उगम आणि इतिहास'* हा अभ्यासपूर्ण ग्रंथ निर्माण करणारे *श्री भा पं बहिरट* असतील, *ज्येष्ठ इतिहासकार, पुरातत्ववेत्ते आणि मूर्तीशास्त्रज्ञ श्री ग ह खरे उपाख्य तात्या खरे* असतील. ह्या सर्वांनीच भगवान श्रीविठ्ठल मूर्तीवरील निरर्गल नि निराधार वादांचे निराकरण आपल्या प्रगल्भ बुद्धीने, तर्कशुद्ध विवेचनाने, प्रत्युत्पन्न मतीने आणि सप्रमाण ससंदर्भ विवरणाने साडेतीन दशकांपूर्वीच करून ठेवले आहे. त्यामुळे आमची भूमिका केवळ 

*फोडिलें भांडार, धन्याचा हा माल।*
*मी तव हमाल, भारवाही।*

अशीच आहे. ह्या श्रीतुकोक्तीप्रमाणे हा लेखनप्रपंच करताहोत.

गेली अडीच वर्षे हा विषय अंतःकरणात असल्याने येविषयीं लिहिण्याची इच्छा वारंवार व्हायची. मागील वर्षीच ह्या दृष्टीने अध्ययन केल्याने तेंव्हाच लेखन करायचे होते पण ते तसेच कार्यबाहुल्यामुळे राहिले. म्हणूनच आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही दिवस हा प्रपंच करताहोत.

*भारत विखंडन शक्तींचे षडयंत्र*

इतिहासाच्या नि वर्तमानाच्या विकृतीकरणातून समाजाचा किंवा मानवसमूहाचा बुद्धिभेद करणे हा देशविघातक शक्तींचा नेहमीचा प्रयत्न असतो. त्यातूनच मग हे असे प्रयत्न वारंवार केले जातात.

प्रतिवर्षी आषाढी किंवा कार्तिकी आली की समाज माध्यमांवर पंढरीश श्रीविठ्ठलाच्या विषयी वाट्टेल ते लेख प्रसृत व्हायला लागतात. हे एकवेळ ठीक होते. पण हे द्वेषाचे वावटळ इतके उठलं की अडीच वर्षांपूर्वी आमच्या काही नवबौध्द बांधवांनी कोरेगाव भीमाच्या उदात्तीकरणासाठी कोरेगाव ते पंढरी यात्राही सुरू केली. इतकंच काय पण पंढरीतच श्रीविठ्ठल मंदिराभोवती ह्यातल्या काही कथित भिक्षूंनी प्रदक्षिणा घालून विठ्ठल हा आमचाच बुद्ध आहे अशीही खोटीच आवई उठविण्याचा एक बालिश प्रयत्न केला. त्यावेळी श्रीमहाद्वारासमोर दुर्भाग्याने ते दृश्य आम्ही पाहिलं होते. 

*मुळात तत्कालीन भाजप सरकारने मतांच्या लाचारीसाठी जिथे ह्या कोरेगाव भीमासारख्या प्रसंगाचे उदात्तीकरण केलंय, तिथे ह्या आमच्या नवबौध्द बांधवांना आवेशात येऊ वाटणार त्याचे नवल ते काय? सरकारी पाठिंब्यानेच हे सर्व होत असेल तर काय लिहावे? आणि काही कथित उजव्या समाजवाद्यांनीही सामाजिक समरसतेच्या नावाने ह्यांस मूक संमतीही दिलीच होती. शेवटी एकदा पेशव्यांना जातीयवादी घोषित केलं की संपलंच ना. असो तो स्वतंत्र विषय.*

पण जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या भाषेंत

*बुडते हे जन देखवेना डोळा । म्हणोनि कळवळा येतो आम्हां ॥*

*इतर कुणी ह्याविषयी भीतीने किंवा लांगुलचालनाच्या दुष्प्रवृत्तीने मूग गिळून गप्प राहत असतील तर खुशाल राहोत, आम्ही शांत राहूच शकत नाही म्हणून हा अट्टाहास. कारण आपल्यासमोर हा सत्याचा प्रकट अपलाप होताना आपण तो षंढपणे पाहत बसणे ह्यासारखी आत्मवंचना नव्हेच. म्हणूनच...*

ह्याआधी ह्याच श्रीविठ्ठल मूर्तींवर ती जैन असल्याचा, ती वीरगळ असल्याचा तर काही रा चिं ढेरेंसारख्या अभ्यासकांनी तो मूळचा यादव जनजातींचा म्हणजे  आमच्या गवळी-धनगर बांधवांचा लोकदेव असल्याचा आणि पुढे त्याचे वैदिकीकरण केल्याचाही मिथ्या आरोप केला होता. वास्तविक हे आमचे बांधवंच आहेत. त्यामुळे त्यांनी त्यावर अधिकार सांगितला तर त्यात वाईट काहीच नाही. परंतु ह्या वादाला एक वेगळा रंग आहे जो सहजासहजी दिसणारा नाही. 

आणि त्यातही त्यांनी माढ्याची मूर्ती मूळ असाही तर्क केला होता.

*पण सुदैवाने त्याचवेळी उपरोल्लेखित ज्येष्ठ इतिहासकार श्री तात्या उपाख्य ग ह खरेंनी त्यांच्या 'श्रीविठ्ठल आणि पंढरपूर' आणि 'महाराष्ट्रातील चार दैवते' ह्या दोन ग्रंथांमध्ये ह्या आक्षेपांचे साधार नि सप्रमाण खंडण साडेतीन दशकांपूर्वीच केलं आहे. त्याआधी केसरीत त्यांनी लेखमालाही सविस्तर लिहिली होतीच आणि ढेरेंचं सारंच कथित संशोधन खोडून काढले होतेच. दुर्दैवाने ढेरेंचा ग्रंथ प्रकाशितही आहे. त्याचे खंडण झाल्याचेही लोकांस ज्ञात नाही ही शोकांतिका आहे.*

*हभप डॉ. बेणारेंचा विशेष उल्लेखनीय ग्रंथ किंवा पुस्तिका*

पंढरीतल्या श्रीविठ्ठलांस पहाटे वेदमंत्रांनी जागृत करण्याचे कार्य जे बेणारे परंपरेने करत आले होते, त्याच बेणारे वंशातले *ज्ञानेश्वरी वरील मराठी आणि हिंदी भाष्यकार डॉ. श्रीगोपाळराव बेणारे ह्यांनीही "श्रीविठ्ठलमूर्ती वाद नि खंडण" नावाने एक पुस्तिका लिहून उपरोक्त आक्षेपांचे सप्रमाण खंडण केले होते. आश्चर्य म्हणजे पुण्यातल्या प्रथितयश भारत इतिहास संशोधक मंडळ इथे ह्याविषयी एक अभ्यास परिषद किंवा परिसंवाद झाला असताना त्यांस ग ह खरे, प्र. न. जोशी आदि इतिहासक्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि डॉ. बेणारे स्वतः उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रणही करण्यात आले होते.*

*आश्चर्य म्हणा किंवा काहीही म्हणा पण रा चिं ढेरे पुण्यात असूनही नि त्यांना निमंत्रण असूनही ह्या कार्यक्रमात हेतुपुरस्सर ते उपस्थित राहिलेच नाहीत. ह्यावरूनच त्यांच्या कथित संशोधनाची सत्यता आकळते.* ह्यावर ह्या लेखमालेतच सविस्तर आम्ही येणारंच आहोत.

*२१ मार्च १९८१ ह्या दिवशी हा परिसंवाद भारत इतिहास संशोधक मंडळात झाला होता.* म्हणूनच जे कार्य पूर्वसुरीच्या विद्वानांनी करून ठेवलं आहे, तेच पुढं आणायचा हेतु आहे. भूमिका मांडण्यासाठीच हा प्रथम लेख आहे. इथून पुढे प्रथम् बुद्ध किंवा बौद्ध ह्या आक्षेपांचे खंडण करूयांत.

*आमच्या हिंदु नवबौध्द बांधवांना नम्रतेची विनंती !*

*आंबेडकरांच्या नावाखाली काही देशविघातक शक्ती, ज्या भारत विखंडन शक्ती नावाने कार्यरत आहेत, त्या आमच्या हिंदु नवबौध्द बांधवांना अकारण त्यांच्याच बांधव असलेल्या आम्हा शेष हिंदू समाजाच्या विरोधात पेटविण्याचा प्रयत्न करताहेत. नवबौध्द बांधवांनी कृपा करून ह्या राष्ट्रविघातक शक्तींपासून दूर राहावे ही नम्रतेची विनंती !*

एका महत्त्वाच्या शंकेचे निरसन 

*जर श्रीविठ्ठल सर्वांचाच आहे तर त्यावर नवबौद्धांनी केवळ आपला अधिकार सांगितला तर त्यात आक्षेप काय?*

*ह्याचे समाधान मुळात असे आहे की मुळात जे नाहीच ते ठसवायचा प्रयत्न का? श्रीविठ्ठलाच्या भक्तीचा सर्वांना अधिकार आहेच. तुम्हांस भक्ती करायची असेल तर श्रीविठ्ठल म्हणुनच करायला काय अडचण आहे तुम्हांस? त्याला अकारण विठ्ठल नसून बुद्ध किंवा बौद्ध सिद्ध करायचा अट्टाहास का? कारण एकीकडे बुद्धाने देवाचं अस्तित्वच नाकारलं, मूर्तीपूजाच नाकारली, ईश्वराचे अस्तित्वंच नाकारलं असं म्हणायचे आणि दुसरीकडे श्रीविठ्ठल हाच बुद्ध आहे असे म्हणायचे हा कुठला भंपकपणा आहे? ही कसली आंबेडकरी पद्धत आहे संशोधनाची???*

*एकीकडे २२ प्रतिज्ञा उच्चारून सर्व हिंदू देवी देवतांचा द्वेष करायचा आणि दुसरीकडे सर्व देवतांवर आता त्या आमच्याच मूळ बुद्ध आहेत असा वाद निर्माण करायचा? हे कुठले संशोधन?*

*आम्ही तुम्हांस आमचे बंधुच समजतो. पण एकीकडे आपल्याच बांधवांच्या देवतांचा द्वेष करायचा आणि दुसरीकडे सगळे देव आमचेच आहेत अशी टिमकी वाजवायची? हा कुठला न्याय???*

अस्तु।

पुढील लेखांत श्रीविठ्ठल मूर्तीचे बुद्ध किंवा बौद्ध आक्षेप पाहुयांत आणि निराकरण करूयांत.

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com 

#पंढरपूरचा_श्रीविठ्ठल_बुद्धबौद्धजैननाहीच_आंबेडकर_आषाढीवारी_इतिहासाचे_विकृतीकरण

Monday 22 June 2020

स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्री मंत्राधिकार - आक्षेप नि खंडन


वैदिक स्त्री-दर्शन लेखांक पंचम

आमच्या स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्री मंत्राधिकार ह्या लेखांवर आह्मीं दिलेल्या आह्वानाला आमच्या काही सनातनी विद्वान मंडळीकडून प्रतिवाद प्राप्त झालेला आहे, त्याविषयी आह्मीं त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आमच्यासारख्या एका यःकश्चित मनुष्याचे लेख त्यांनी एवढे मनावर घ्यावेत हा त्यांचा आमच्यावरचा स्नेह नि अनुरागंच मानतो आह्मीं. आणि म्हणूनंच त्यांनी केलेल्या प्रतिवादाची नि आक्षेपांची समीक्षा करण्यासाठी नि त्यांना वेदसंमत उत्तर देण्यासाठी आमचा हा लेखनप्रपंच...!ह्यात कुठेही त्यांचा अनादर करण्याचा हेतु नाही किंवा आह्मांला खूप कळतं असे दर्शविण्याचाही हेतु नाही. हा सरळ संवाद आहे.

*धर्म जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः।*

हे वचन मनुस्मृतीचं असलं तरी हे सर्व परंपरांमध्ये सर्वमान्य आहे. *ज्याला वैदिक हिंदु धर्मशास्त्राचे प्रामाणिक अध्ययन करायचं आहे, त्याला श्रुती अर्थात वेदांशिवाय अन्य कोणताच मार्ग नाही. नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ॥ ( यजुर्वेदः ३१-१८)।* ज्यांना अधिक प्रमाण आवश्यक आहे, त्यांनी मनुस्मृतीवरील दहा संस्कृत टीकाकारांच्या टीका तरी अभ्यासाव्यांत. त्यातल्या ९ तरी भारतीय विद्या भवनने प्रकाशित केल्याहेत, ज्या पीडीएफ आंतरजालांवर उपलब्ध आहेत. केवल एका श्रीकुल्लुकभट्टांची टीका पाहुयांत...

 *धर्मं च ज्ञातुमिच्छन्तां प्रकृष्टं प्रमाणं श्रुतिः। प्रकर्षबोधननेच स्मृतिस्मृतिविरोधे स्मृत्यर्थो नादरणीयः इति भावः।* 

*म्हणजे धर्म जाणण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी श्रुति अर्थात वेदंच सर्वोत्तम आहे. जर श्रुति नि स्मृतींमध्ये कुठे विरोध जाणवला तर स्मृतींचा अर्थ आदरणीय नाही अर्थात तो त्याज्य आहे. म्हणजेच अशावेळी श्रुतीच प्रमाण आहे. म्हणजेच स्मृतींपेक्षा श्रुतीच सर्वोच्च प्रमाण आहे.*

पुढे ह्याच श्रीकुल्लुकभट्टांनी प्रमाण सादर केलेलं आहे, ते श्रीजाबालोपनिषदांतलं. ते म्हणतात 

*अतएव जाबालः*-----
*श्रुतिस्मृतिविरोधे तु श्रुतिरेव गरीयसी।*

*जाबाल ऋषि म्हणतात की श्रुति नि स्मृतींच्या परस्परविरोधामध्ये श्रुतीच श्रेष्ठ नि प्रमाण आहे.*

आमच्या एका उपरोक्त श्रीमनुमहाराजांच्या वचनाच्या शीर्षकाधारित लेखामध्ये आमच्या ह्या श्रुतीमान्यतेची व्याख्या आह्मीं स्पष्ट केलेली आहे. जिज्ञासूंनी ती

http://pakhandkhandinee.blogspot.com/2019/10/blog-post_9.html?m=1

इथे अभ्यासावी ही नम्रतेची विनंती! 

वास्तविक आमच्या *पुराकल्पेषु तु नारीणां* ह्या श्लोकातंच आह्मीं कल्प शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. हे जे लोक त्याचा इतिहासपरक असा मागील कल्पातला अर्थ घेतात, त्यांचा तो अर्थ चुकीचा आहे हे आह्मीं सप्रमाण सिद्ध केलंय तेही अनेक प्रमाणांनी. आता त्यांचा हा इतिहासपरक अर्थ क्षणभर प्रमाण जरी मानला तरी त्यातून पूर्वी तो वेदाधिकार स्त्रियांना होता हेच स्पष्ट होते. आता तो अधिकार होता ह्याचाच अर्थ असा श्लोक रचणाऱ्यांना धर्मशास्त्राचे यथोचित ज्ञान होते हे अभिप्रेत आहेच. पुराकल्पेषु ह्याचा अर्थ मागील कल्पांत तो होता असा क्षणभर अर्थ घेतला तरी ह्याचा अर्थ हाच आहे की मागील कल्पांत तसा वेदमंत्र असायलाच हवा...!कारण वेदमंत्राच्या अर्थात श्रुतीच्या आधाराशिवाय असा अधिकार कसा असेल???

आणि हा जगन्मान्य सिद्धांत आहे की आज आपल्याला उपलब्ध असलेले वेद हे मागील कल्पांतलेच वेद आहेत. कारण आमच्या नित्याच्या संध्येमध्ये आह्मीं जो ऋग्वेदांतला मंत्र आसेतुहिमाचल म्हणतो तो असा

*सू॒र्या॒चं॒द्र॒मसौ॑ धा॒ता य॑थापू॒र्वम॑कल्पयत् । दिवं॑ च पृथि॒वीं चां॒तरि॑क्ष॒मथो॒ स्वः॑ ॥*
ऋग्वेद - १०।१९०।३

ह्या ऋग्वेदवचनानुसार ईश्वर अर्थात तो धाता गतकल्पात जशी सूर्यचंद्रपृथिव्यादि सृष्टी निर्माण करतो, तशी ती ह्या कल्पातही आहे तशीच करतो. आणि त्या कल्पातले वेदही त्याच अनुपूर्वीसहित ह्याच कल्पात आहे तसे प्रकट होतात. म्हणजेच आजचे वेद तर मागील कल्पांत जे होते, ते आहे तसेच ह्या कल्पांतही प्राप्त आहेत. म्हणजेच ह्या आज आपणां सर्वांस उपलब्ध असलेल्या वेदांनाच प्रमाण मानणं आपल्या सर्वांना क्रमप्राप्त आहे. ह्याविषयी संदेह असण्याचे काहीच कारण नाही.

जर त्याच कल्पातले वेद ह्या कल्पांतही आहे तसेच प्रकट झाले आहेत, तर ह्या वेदांमध्येच स्त्रियांचा वेदाधिकार सिद्ध करणारे मंत्र असलेच पाहिजेत. 

इथे जाता जाता एक स्मरण 

*आमच्या उपरोक्त *पुराकल्पेषु तु नारीणां श्लोकावरील लेखांवर संवाद करताना एकाने तो श्लोकंच प्रक्षिप्त आहे असे अतिसाहसी विधान केलं. म्हणजे एरवी प्रक्षेप शब्द उच्चारला की ईंगळी डसल्याचा अनुभव करणारे हे लोक सोयीस्कर कशी प्रक्षेप संकल्पना स्वीकारतात ते पहा.*

*आणि हो काही ठिकाणी हा श्लोक पुराकल्पेषुच्या ऐवजी पुरायुगेषु असाही आला आहे. वाटल्यास यावर सविस्तर पुन्हा येईन.*

अस्तु। 

आता स्त्रियांना वेदाधिकार नाकारणाऱ्या ह्या स्वतःस सनातनी म्हणविणाऱ्या आक्षेपकांचा वैचारिक गोंधळ पहा...प्रस्तुत लेखक अर्थात आह्मींही सनातनीच आहोत परंतु काही प्रामाणिक मतभेद आहेत इतकंच. आता ह्यांच्याह्यांच्यातंच ह्या विषयांत किती मतभेद आहेत ते पहावे ही विनंती...!

*एक जण म्हणतो स्त्रियांना मूळीच वेदाधिकार नाही. दुसरा म्हणतो वेदकालीन ऋषिकांनाच तो केवल अधिकार होता की ज्या अत्यंत अधिकारी होत्या. तिसरा म्हणतो की हारित धर्मसूत्रानुसार (२१।२०।२४) ब्रह्मवादिनी नि सद्योवधु असे स्त्रियांचे दोन प्रकार असून केवळ ब्रह्मवादिनी स्त्रियांनाच तो अधिकार आहे. सद्योवधुंना तो नाही. इथे ब्रह्मवादिनी म्हणजे आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या नि वेदाध्ययन करणाऱ्या स्त्रिया. आणि सद्योवधु म्हणजे विवाहसंस्कार करणाऱ्या गृहस्थाश्रमी स्त्रिया. असे ह्यांचे मत आहे. वास्तव काय ते आपण पुढे पाहुच. चौथा असे म्हणतो की उर्वशी आदि अधिकारी स्त्रियांनाच केवळ एकदेशी अधिकार आहे. आता एकदेशी काय हे त्यांचे त्यांनाच ज्ञात. पांचवा म्हणतो की मैत्रेयी आदि स्त्रिया केवल ब्रह्मचिंतनापूरताच अधिकारी होत्या, त्यांनाही वेदाधिकार नव्हता. सहावा म्हणतो विवाहापश्चात स्त्रियांना केवळ काही विशिष्ट मंत्र म्हणण्याचाच अधिकार प्राप्त होतो. पूर्ण वेदांचा अधिकार त्यांना नाही ह्मणें. सातवा म्हणतो आमच्या गुरुचरित्रांत वेदाधिकार नाकारलाय म्हणें. आठवा म्हणतो विवाह हेच स्त्रीचं उपनयन आहे म्हणे. नववा म्हणतो विवाहवेळी यज्ञोपवीताचा अधिकार प्राप्त होतो तो केवळ पतींबरोबर दैनिक नित्य यज्ञ करण्यासाठी. दहावा म्हणतो नाही ते यज्ञोपवीत नसून ते यज्ञोपवीतासारखे वस्त्र नेसतात.*

आता जर ह्यांच्याच मतानुसार स्त्रीला उपनयनाचाच अधिकार नाही, तर तिचा विवाहतरी तिचं उपनयनंच कसं काय सिद्ध होऊ शकतं??? किती गोंधळंय पहा.

आता असे पहा की हे लोक उपनिषदांनाही अपौरुषेय वेद मानतात. मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयं म्हणे. ह्याची तर्ककठोर समीक्षा आह्मीं आमच्या वेदपरिचय चिंतनमालेमध्ये केलीच आहे. लेखमालाही आधी लिहिली आहे. पुढेही करुच पण तो स्वतंत्र विषय आहे. अस्तु। 

*ब्राह्मणग्रंथ-उपनिषदं-आरण्यकांमध्ये वेदमंत्रांचेच भाष्य आहे. आणि स्त्रियांना जर वेदाधिकार नाहीच, तर मग उपनिषदांमध्ये काही स्त्रिया वेदमंत्रोच्चारण करताना कशा काय दिसतात???*

तर ह्यावर ह्या लोकांचे उत्तर वर पांचव्यात दिलंय. हे त्यांचे उत्तर आहे, आमचं नाही.

*ह्यावरूनंच ह्या स्वतःला सनातनी म्हणविणाऱ्यांमध्येच स्त्रियांच्या वेदाधिकारांविषयी कशी एकवाक्यता नाही हे लक्ष्यीं येते...!*

ह्यात कुठेही ह्या लोकांचा अवमान करण्याचा हेतु नाही...!

आता हे ह्यांचे असे वर्तन का होते???

ह्याचे कारण एकंच आहे की हे लोक स्वतःला नुसतंच वेदप्रामाण्यवादी म्हणून मिरवितात परंतु प्रमाण मानताना हे मधील काळांत निर्माण झालेल्या प्रक्षेपांना प्रमाण मानतात जिथे हा निषेध सांगितलेला असतो. आता हे प्रक्षेप कशावरून ते आह्मीं पुढे येणारंच आहोत. पण जेंव्हा आह्मी ह्यांस विचारतो की स्त्रियांचा वेदाधिकार नाकारणारा एक तरी मंत्र वेदांच्या संहितांमध्ये दाखवा. तर ह्यातल्या एकालाही वेदमंत्रांचे सादरीकरण अद्याप एकदाही करता आलेलं नाही नि येणारही नाही.

गेली तीन वर्षे आह्मीं एकंच प्रश्न ह्या सर्वांना विचारत आलो आहोत की 

*स्त्रियांना वेदाधिकार नाकारणारा असा निषेधात्मक एकतरी वेदमंत्र आह्मांस चारवेदांच्या संहितांमध्ये दाखवा...*

*गेल्या तीन वर्षांत एकालाही हा मंत्र अद्याप सादर करता आलेला नाही.*

*तीनंच नव्हे तर गेली दीडशे वर्षे आर्यसमाजाच्या वतीने ह्या कथित सनातनी विद्वानांना हा प्रश्न विचारण्यांत आलेला असूनही ह्या दीडशे वर्षांत एकालाही असा मंत्र सादर करता आलेला नाही.*

*कारण कारण कारण...*

*असा एकही निषेधात्मक मंत्र वेदांच्या संहितांमध्ये नाहीच नाही. अहो असला तर सादर करणार ना???*

*जे नाहीच ते दाखवणार तरी कुठून?*

*आणि म्हणून हे लोक आधार घेतात ते परवर्ती प्रक्षेपयुक्त स्मृतींचा. की ज्या वेदबाह्य असल्याने त्याज्य आहेत. ज्या मनुस्मृतीला हे अगदी प्रमाण मानतात, अगदी प्रक्षेपरहित मानतात, त्याच मनुस्मृतीमध्ये*

*या वेदबाह्याः स्मृतयः याश्च काश्च कुदृष्टयः।*

असे वचन आहे. म्हणजेच ज्या स्मृत्या वेदविरुद्ध आहेत, त्या त्याज्य आहेत असे स्पष्ट मांडलं आहे. ह्या स्मृतीसंदर्भांवर आह्मीं ह्या लेखमालेत स्वतंत्र येणारंच आहोत. पण तत्पूर्वी...

आता ह्यावर हे लोक आह्मांस आवाहन करतात की मग वेदमंत्रांमध्येच स्त्रियांना वेदाधिकार आहे हे दाखविणारा एकतरी मंत्र सादर करा. तर ह्या लोकांच्या ह्या आज्ञेंस ह्मणा की आह्वानांस ह्मणां मान्य करून आता आह्मीं वेदमंत्रांतलेच स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्र्यादि मंत्राधिकार सिद्ध करणारे प्रमाण सादर करणाराहोत. आज सायंकाळपासून लेख येतीलंच.

ह्या आगामी लेखमालेत आह्मीं निम्नलिखित संदर्भ सादर करणाराहोत 

लेखांक क्रमांक ६ - वेदमंत्रांच्या आधारे वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार, गायत्रीमंत्राधिकार 

लेखांक क्रमांक ७ - ब्राह्मणग्रंथ-उपनिषदं-आरण्यकांच्या आधारे...

लेखांक क्रमांक ८ - वेदाङ्गे, षट्दर्शने ह्यांच्या आधारे

लेखांक क्रमांक ९ - श्रौतसुत्रं, गृह्यसूत्रांच्या आधारे 

लेखांक क्रमांक १० - स्मृतिविमर्श 

लेखांक क्रमांक ११ - रामायण-महाभारत-पुराणादि नि अन्य ऐतिह्य संदर्भांच्या आधारे 

लेखांक क्रमांक १२ - उपरोक्त सर्व लेखांवरील शंका समाधान नि समारोप 

अशा प्रकारे ही लेखमाला येणार आहे.

हे सर्व लिहिण्याचा उद्देश्य किंवा अट्टाहास हा कुणाची निंदा करण्याचा मूळीच नाही. सत्यशोधन व्हावं हा हेतु आहे.

भवदीय...

पाखण्ड खण्डिणी 
Pakhandkhandinee.blogspot.com

#स्त्रियांचा_वेदाधिकार_यज्ञोपवीताधिकार_गायत्री_मंत्राधिकार_उपनयन_वेदश्रुतिस्मृतिविमर्श

Sunday 7 June 2020

श्रीशिवराज्याभिषेकांतल्या 'सोमो अस्माकं ब्राह्मणानां राजा' ह्या मंत्राच्या अर्थाचे स्पष्टीकरण...


सांप्रत समाजमाध्यमांवर श्रीशिवराज्याभिषेक प्रयोगातल्या एका मंत्राचा विकृत अर्थ प्रसृत करून आपला छुपा ब्राह्मणद्वेष रेटला जातोय. त्यासाठी हे स्पष्टीकरण !

उपरोक्त मंत्र हा यजुर्वेदाच्या ९व्या अध्यायांतला अंतिम असा ४० वा मंत्र असून त्याच्या चुकीच्या मराठी अनुवादाचे एक छायाचित्र प्रसृत करून हा द्वेष रेटला जातो आहे. सर्वप्रथम तो निम्नलिखित मंत्र काय आहे ते पाहुयांत.


*ॐ इ॒मन्दे॑वा ऽअसुप॒त्नᳯ सु॑वध्वम्मह॒ते क्ष॒त्राय॑ मह॒ते ज्यै॑ष्ठ्याय मह॒ते जान॑राज्या॒येन्द्र॑य॑ । इ॒मम॒मुष्य॑ पु॒त्रम॒मुष्यै॑ पु॒त्रमस्यै वि॒शऽए॒ष वो॑मी॒ राजा॒ सोमो॒ स्माक॑म्ब्राह्म॒णाना॒ राजा॑ ॥*
 
यजुर्वेद ९।४०

ह्या मंत्राचा जो अर्थ त्या चित्रामध्ये दिलेला आहे तो चुकीचा तर आहेच कारण तिथे 'सोमो अस्माकं ब्राह्मणांना राजा' असा एवढाच अर्धवट संदर्भ घेऊन 'सोम हाच आह्मां ब्राह्मणांचा राजा' असा विकृतार्थ काढलेला आहे. वास्तविक पूर्ण मंत्र किती मोठा आहे हे सर्वांस आता कळलंच असेल. आता त्या मंत्राचा शब्दशः अर्थ पाहुयांत 

*महते क्षत्राय ज्यैष्ठ्याय महते जानराज्याय - महान क्षात्रबलासाठी, महान अशा राज्यपदासाठी, महान अशा जनसंख्येंवर राज्य करण्यासाठी*

*इन्द्रस्य इन्द्रियाय, देवाः असपत्नम् इमम् सुवध्वम् - परम् ऐश्वर्यवान इंद्र अर्थात राजाच्या ऐश्वर्यप्राप्तीसाठी, देवगण शत्रुरहित ह्या योग्यपुरुषांस अभिषिक्त करोत*

*इमं अमुष्य पुत्रं अमुष्यै पुत्रं अस्यै विशे - ह्या पित्याचा हा पुत्र, ह्या अमुक मातेचा पुत्र, ह्या प्रजेसाठी (त्याचा) राज्याभिषेक केला जात आहे.*

*अमी - हे अमुक अमुक राजे लोकहो, प्रजे लोकहो*

*वः एषः राजाः सोमः - आमचा आह्मां सर्वांचा हा राजा सोमाच्या समान पवित्र आहे*

*(सः) अऽस्माकं ब्राह्मणानां राजा - तो आह्मां ब्राह्मणांचाही राजा आहे*

आता हाच मंत्र श्रीगागाभट्टांच्या पोथीमध्ये आहे तसा दिला असून तिथे पुढे 

*अत्र सर्वनामस्थाने राजनाम तत्पितृनाम् तन्मातृनाम् गृण्हीयात्*

म्हणजे उपरोक्त मंत्रामध्ये अमुक अमुकच्या ठिकाणी श्रीशिवाजी महाराजांचे, त्यांच्या पिताश्रींचे, त्यांच्या मातुःश्रींचे नाव उच्चारावं असे म्हटलंय.

त्यामुळे इथं सोम ही संज्ञा प्रत्यक्ष राजाला अर्थात श्रीशिवछत्रपतींना वापरली असून तेच आह्मां सर्व ब्राह्मणांचे राजे आहेत असं स्पष्ट विवेचन आहे. परंतु मराठी अनुवादकर्त्याने सोम हाच आमचा राजा आहे असे विकृत अर्थ केला आहे. अनुवादक कोण आहेत ते आह्मांस ज्ञात नाही.

*आता काहींना हा आह्मीं दिलेला मंत्रार्थ खोटा वाटेल त्यांच्यासाठी स्वतः ज्येष्ठ इतिहासकार वा सी बेंद्रेंचा अनुवाद पाहुयांत*

पृथ्वीवरचे साक्षात् तत्कालीन कलियुगीचे ब्रह्मदेव असे वर्णन ज्यांचे केलं केलं, त्या वेदमूर्ती श्रीगागाभट्टांनी जी श्रीशिवराज्याभिषेकाची पोथी रचली, त्याचे प्रथम प्रकाशन आधुनिक काळामध्ये फेब्रुवारी १९६० मध्ये श्री वा सी बेंद्रेंनी संपादनरुपी केलं. त्याला ५९ पृष्ठांची त्यांची प्रस्तावना असून त्यातंच ह्या मंत्राचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे ते पाहूयांत. हा १४१ पृष्ठांचा ग्रंथ आज पूर्ण पीडीएफ आहे. कुणीही अभ्यासु शकता.



आता ज्येष्ठ इतिहासकार श्री वासुदेव सीताराम बेंद्रेंनी पृष्ठाङ्क ४९ व ५० वर ह्या मंत्राचा काय अर्थ केलाय ते पहा....

*Then they took him to the bathing hall saying..'महते क्षत्राय...' Thus making him the king of Brahmins*

म्हणजे *त्या पुरोहितांनी त्यांना (श्रीशिवछत्रपतींना अवभृत स्नानासाठी) स्नानगृहाकडे नेताना तो मंत्र म्हटला व सर्व ब्राह्मणांचा त्यांना राजा केला.*

पुढे हेच बेंद्रे म्हणतात की

*Thus by this special bath, they accepted Shivaji Maharaj as the king of all including the Brahmins.*

 *"ह्या विशेष स्नानाने ते शिवाजी महाराज हे त्या सर्वांचेच ज्यांत ब्राह्मणसुद्धा आले, त्यांचे सुद्धा राजेच झाले."*

म्हणजेच बेंद्रेंच्या इंग्रजी अनुवादानुसार महाराजांना ब्राह्मणांनीसुद्धा आपला राजाच आनंदाने स्वीकारलं आहे.

पण सांप्रत समाजमाध्यमांवर प्रसृत होत असलेल्या मराठी अनुवादाच्या पृष्ठांवर मात्र चुकीचा अर्थ दिला आहे. म्हणजेच मराठी अनुवाद चुकलेला असून उपरोक्त आह्मीं दिलेला अर्थ व श्री बेंद्रेंचा अर्थ दोन्ही एकंच आहेत.

*आणि हो जाता जाता...*

*एरवी हेच वा सी बेंद्रे श्रीशंभुछत्रपतींच्या चरित्रासाठी ह्या आक्षेपकांना प्रमाण असतात बरंका. आता मात्र कदाचित सोयीस्कर अप्रमाण ठरतील. कारण ब्राह्मणद्वेष....!*

ज्यांना आणखी अतंरंगात जाऊन पहायचं आहे, त्यांनी वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी केलेला हिंदी अर्थ पहावा ही विनंती. महर्षि दयानंद सरस्वति ह्यांनी दीडशे वर्षांपूर्वीच करून ठेवलेला अर्थही पहावा ही विनंती. हे सर्व संदर्भ आह्मीं सोबत जोडलेच आहेत. जिज्ञासूंनी पहावेत ही नम्रतेची विनंती.




*अशाप्रकारे महाराष्ट्रांत जातीयवदाचे विष पेरणार्या विकृत लोकांपासून आपण सर्व शिवभक्तांनी सावध रहावे ही नम्रतेची विनंती...!*

तरीही ज्यांना खाजंच आहे, त्यांना आमचं उघड आह्वान आहे की शास्त्रार्थ करावा...!

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी 
Pakhandkhandinee.blogspot.com 

#शिवराज्याभिषेकप्रयोग_मंत्रार्थ_ब्राह्मणद्वेष_वासीबेंद्रे_श्रीगागाभट्ट

Friday 5 June 2020

महायोगी महर्षि श्रीअरविंदांचे सावित्री नावाचे महाकाव्य



आज वटपौर्णिमा अर्थात सावित्री पौर्णिमा...! सत्यवान नि सावित्रीची कथा सर्वांना ज्ञात आहेच. ह्या कथेवर चोवीस सहस्त्र ओळींचं आङ्ग्ल भाषेंतले जगांतलं सर्वात मोठं महाकाव्य रचणार्या महर्षि महायोगी श्रीअरविंदांविषयी नि त्या सावित्री नामक कवितेविषयी हा लेखनप्रपंच!

साक्षात् सरस्वतीच ज्यांच्या जिव्हाग्रांवर नांदत होती, अशा प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांच्या महायोगी अरविंद ह्या ध्वनिफीतीचे श्रवण ज्यांनी केलं असेल नि त्यांनीच लिहिलेलं महर्षींचे चरित्र ज्यांनी अभ्यासलं असेल, त्यांना महर्षि अरविंद हे महान व्यक्तिमत्व ज्ञात असेलंच. मागे आह्मीं त्यांच्यावर एक लेखही लिहिला आहे विस्ताराने. महर्षि महायोगी श्रीअरविंदांची चार तपांची साधना म्हणजे हे महाकाव्य आहे.

*महर्षि हे वेदभाष्यकार होते. निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त केलेल्या ह्या व्यक्तित्वाने 'वेदरहस्य' नामक ग्रंथामध्ये वेदांविषयी केलेलं चिंतन ज्यांनी अभ्यासले असेल, त्यांना महर्षींच्या 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः' ह्या निरुक्तकारांच्या वचनसाक्षित्वाची प्रचिती आलीच असेल. सावित्री नि सत्यवानाच्या ह्या उपाख्यानाचा महायोगी श्रीअरविंदांनी लावलेला यौगिक अर्थ नि त्यातून त्यांनी केलेले हे महाकाव्य हे आङ्ग्ल भाषेंतले एक अद्वितीय लेणं आहे असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही.*

*आपल्या चार तपांच्या अध्यात्मसाधनेने तपःपूत अशा महर्षींच्या साहित्यातली त्यांची अतिमानसाची संकल्पना, त्या अतिमानसाच्या संकल्पनेचे त्यांनी केलेले विवरण, त्यातूनंच पृथ्वीवरंच स्वर्ग निर्माण करण्याची त्यांची मनिषा हे सर्व अक्षरशः चिंतनीय आहे, विलोभनीय आहे.* 

*महर्षींच्या सावित्रीची मूलकथा*

महर्षि हे वैदिक साहित्याचे भाष्यकार होते. *त्यांच्या स्वतःच्या साधनेने त्यांस प्राप्त झालेल्या सिद्धी नि त्यामुळे त्यांच्या अंतःकरणांमध्ये विश्वाच्या गुढ रहस्येविषयी निर्माण झालेली उत्कंठा, अनेक गूढविद्यांचा त्यांना झालेला साक्षात्कार नि त्याविषयीचं चिंतन, त्यांची अतिमानवी शक्तींवरची दृढ विश्वासार्हता, वैदिक तत्त्वज्ञानाचे प्रकटीकरण, मानवाच्या उत्पत्तीपासून नि अद्यापपावेतोचा त्याच्या उत्क्रांतीचा इतिहास, देवदेवता नेमक्या काय आहेत ह्याविषयीचे प्रकटीकरण, चराचर सृष्टीची उत्पत्ती-स्थिती नि प्रलयाविषयीचे चिंतन, सभोवतालचा हा रम्य असा निसर्ग, हे विश्व का निर्माण झाले ह्याची त्यांनी केलेली मीमांसा, ह्याचे भवितव्य काय असेल, मानवाचा भवितव्यकाल या सर्व चिंतनाचा शब्दाविष्कार म्हणजे महर्षींचे हे खंडकाव्य आहे.*

सत्यवान-सावित्रीच्या उपाख्यानाचा अन्वयार्थ विशद करताना ते म्हणतात

 *"‘सत्यवान-सावित्री ही मृत्यूवर विजय मिळविल्याची कथा महाभारतात आहे. तथापि त्यात संकेत असा दिलेला आहे की दैवी सत्य जाणणारा आत्मरूपी सत्यवान हा अज्ञान आणि मृत्यूच्या तडाख्यात सापडलेला आहे. सावित्री ही ज्ञानी सूर्यकन्या त्या दुष्टचक्रातून मानवाला मुक्त करण्यासाठी आली आहे. तिचा पिता अश्वपती हा आध्यात्मिक वाटचालीत उपयुक्त ठरणाऱ्या तपस्येचे प्रतीक आहे. सत्यवानाचे वडील द्युमत्सेन हे अंध झालेले पवित्र मन आहे. अशा मानवी व्यक्तिरेखांद्वारे मर्त्य जीवनापासून दिव्य चैतन्यापर्यंत कसे जाऊन पोहोचायचे, याचे मार्गदर्शन आपल्याला मिळते."*

ज्याप्रमाणे सावित्री आपल्या तपोबलाने त्या सत्यवानांस पृथ्वीवर आणते व स्वर्ग निर्माण करते, तद्वतंच महर्षींना ह्या महाकाव्यातून पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा आहे.

ही कविता आङ्ग्लभाषेत असल्यामुळे नि त्यातही महर्षींचे इंग्रजी हे मूळ लैटिनच्या त्यांच्या प्रभुत्वामुळे नि तत्कालीन पल्लेदार वाक्यांचं दुर्बोध असे इंग्रजी असल्यामुळे शब्दकोशाची आवश्यकता पडतेच. अर्थात ज्यांना महर्षींच्या भाषेचा परिचय आहे, त्यांना हे फार अवघड जाणार नाही. पण तरीही ज्याना हे इंग्रजीतून संभव नसेल तर निदान मराठीतूनतरी अभ्यासायचं आहे, त्यांच्यासाठीही अरविंद आश्रमाने त्याचा मराठी अनुवाद केलाच आहे. अनुवादकार - सौ शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधी 

*आणखी तीन ग्रंथ अभ्यसनीय आहेत.*

महर्षींचे समग्र वाङ्मय मूल आङ्ग्ल ३७ खंडांमध्ये प्रकाशित आहे. त्यात खंड ३३व ३४ हे सावित्रीचे आहेत. सावित्री कवितेविषयी महर्षींनी *VOLUME 27 - LETTERS ON POETRY AND ART* मध्ये चिंतन केलेलं आहे ते अभ्यसनीय आहे. सावित्री वाचण्यापूर्वी महर्षींचे  *'अतिमानव' नि 'पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार'* हे आणखी दोन ग्रंथही चिंतनीय आहेत. सुदैवाने पीडीएफ उपलब्ध आहेत.






*निम्नलिखित संकेतस्थळांवर महर्षि श्रीअरविंदांचे साहित्य मूल आङ्ग्ल व त्याचे काही मराठी व काही हिंदीतून अनुवादही* उपलब्ध आहेत. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी हे अभ्यासावेच.

https://www.motherandsriaurobindo.in/#_StaticContent/SriAurobindoAshram/-09%20E-Library/-01%20Works%20of%20Sri%20Aurobindo/-07%20Marathi

*इंग्रजीभाषेत अतिमानसाची संकल्पना मांडणारे श्रीअरविंद हे प्रथमंच*

संपूर्ण युरोप किंवा अमेरिकेतही इतके इंग्रजी साहित्यिक,महाकवी होऊन गेले पण श्रीअरविंदांच्या भाषेतंच सांगायचं तर ह्यातल्या एकालाही अतिमानसाच्या संकल्पनेस स्पर्श करता आला नाही. श्रीअरविंदांनी स्वतः एका पत्रांत हे म्हटलंय. उपरोक्त खंड २७ मध्ये ते अभ्यासता येईल. सोबत पृष्ठ जोडलंच आहे.


ह्या कवितेचा आस्वाद मूळ आङ्ग्लभाषेतून एकदा तरी घ्यावाच ही विनंती. 

*सत्यवान-सावित्री नि महर्षींच्या चरणी अभिवादन करतो नि लेखणींस विराम देतो...!*

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#सत्यवानसावित्री_वटपौर्णिमा_महायोगीमहर्षि_अरविंद_महाकाव्य_अतिमानव_स्वर्गपृथ्वी

Wednesday 18 March 2020

क्रांतिवीर श्री बाबाराव सावरकर अमृतमहोत्सवी पुण्यस्मरण - सांगली वृत्तांत



त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु।
केला हवीं परमकारुण पुण्यसिन्धु।
हें आपुलें कुलहिं त्यामधि ईश्वरांश।

ज्यांचे समग्र जीवन क्रांतिप्रवण होते नि ज्यांचे विचार क्रांतिगर्भ होते, अशा स्वातंत्र्यवीरांच्या ज्येष्ठ बंधुंच्या, त्यांच्या पाठी पित्यासमान असलेल्या एका अतुल धैर्य वरिष्ठ बंधुंच्या, ज्यांचं समग्र जीवनंच उपेक्षित अंधार्या कारावासांत नि अप्रसिद्धीच्या गुहागुंफात संपून गेले, ज्यांचे जीवन म्हणजे अमूल्य रत्नांची खाणंच आहे नि ज्यांत उदात्त अन् उज्ज्वल प्रसंगांचे कोहिनूर ठासून भरलेले आहेत, ज्यांनी सोसलेल्या नरकयातना ह्या तात्यारावांइतक्याच, किंबहुना अधिक आहेत, ज्यांचे समग्र जीवन हिंदुराष्ट्राच्या नि हिंदुत्वाच्या नि हिंदुसमाजाच्या उत्कर्षासाठीच वाहिलेले होते, अनेक गुप्त क्रांतिकारी संघटनांचे जे उद्गाते नि अनेक तरुण क्रांतिकारकांचे जे मार्गदर्शक, रा स्व संघासारख्या आज हिमालयाएवढ्या उत्तुंग अशा राष्ट्रव्यापी नि विश्वव्यापी संघटनेचे जे उद्गाते, असे अंदमानदंडित क्रांतिवीर श्री गणेश दामोदर उपाख्य श्रीबाबाराव सावरकर ह्यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त सांगलींस जाण्याचा योग नुकताच १६ मार्चला प्राप्त झाला.

महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेचे भूतपूर्व अध्यक्ष, आमच्या पंढरपूर हिंदुसभेचे श्री अभयसिंह कुलकर्णींचा अट्टाहास होता की हे कार्य आपण तरी करायला हवंच. आधीच सावरकर कुटुंबाची घोर उपेक्षा नि त्यातून बाबाराव तर विस्मृतंच. त्यामुळे हे सतीचं वाण हिंदुसभाच पेलु शकते. म्हणून भुवैकुंठ पंढरीतल्या सर्व हिंदुसभायांसह आह्मीं सर्व सांगलीस श्रीबाबारावांना अभिवादन करण्यासाठी निघालो. ह्यावेळी हिंदुसभेचे श्री विवेक बेणारे, विद्यमान अध्यक्ष श्री बाळासाहेब डिंगरे, महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेचे विद्यमान अध्यक्ष श्री अनिल पवार, सोलापूरचे श्री कल्याणी, वारकरी संप्रदाय पाईक संघाची धडाडती )तोफ श्री रामकृष्ण महाराज वीर, पेशवे युवा मंचाची तोफ श्री गणेश लंके आणि श्री महेश भंडारकवठेकर, हिंदुसभेचेच आनंद कुलकर्णी, सुवर्णा पोवार इ. अशी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगलीतलेच हिंदुसभाई श्री अरुण गडचे ह्यांनी भूषविले.


सांगलीत चारच्या दरम्यान पोहोचताच सांगलीतले आमचे पंढरपूरचेच मूळचे स्नेही संस्कृत भाषेंवर प्रभुत्व असलेले आचार्य श्रीरघुवीर रामदासींकडे चहा पाण्याची व्यवस्था झाली. सांगलीतल्या ज्या गावभागांत बंधार्यासमीप श्रीबाबारावांचे स्मारक आहे, तिथून जवळंच ह्यांचा निवास आहे. साडेचारच्या समीप कार्यक्रमस्थळी पोहोचलो. मधील काळांत सांगलीतल्या जलप्रलयाच्या थैमानाने स्मारकाची झालेली वाताहात पाहवंत नव्हती. सुदैवाने पूर्वसूचना दिल्याने काही स्वच्छता होतीच. प्रवेशद्वारांवरंच एका पाटीवर त्या वास्तुच्या तत्कालीन उद्घटनाची अक्षरे कोरलेली दिसली. भूतपूर्व पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी नि बाबारावांचे शिष्य हिंदुसभाई थोर चित्रपटकार श्रीभालजी पेंढारकरांच्या हस्तेच हे उद्घाटन झालं होते. त्यावेळी श्री अटलजींचे झालेलं व्याख्यानही उपलब्ध आहे. कथा क्रांतिवीरांच्या - विश्वास सावरकर

स्मारकांत श्रीबाबारावांची अत्यंत दिव्य अशी हातीं ग्रंथ घेतलेली बैठक असलेली तेजस्वी मूर्ती पाहून धन्यता वाटली. त्या नररत्नांस अभिवादन करण्यासाठी नकळंत हात जोडले गेले. इतक्या जलप्रलयाचा आघात सोसूनही मूर्तीवरचे तेज किंचितही ढळलं नव्हतं.

कार्यक्रमाचा आरंभ श्रीभंडारकवठेकरांच्या वेदमंत्रपठनाने नि श्री रामकृष्ण वीर महाराजांच्या हस्ते मूर्तीपूजनाने झाला. त्यानंतर महाराष्ट्र हिंदुसभेच्या वतीने चैत्र पाडवा पासूनच्या दिनदर्शिकेचे विमोचन झाले. पुढे नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार श्रीतात्यारावांच्या अखिल हिंदु विजय ध्वज गीताने आरंभ होऊन  श्रीअभयसिंह कुलकर्णींचे प्रास्ताविक झालं. त्यानंतर मान्यवरांची व्याख्याने झाली तींत प्रामुख्याने हिंदुसभेचे श्री गांधी, श्री रामकृष्ण महाराज वीर, श्री तुकाराम चिंचणीकर (अस्मादिक) ह्यांचे चिंतन झाले. ह्यात उपरोल्लेखित श्री रघुवीर रामदासी ह्यांनीही संस्कृतमध्ये श्रीबाबारावांवर छानसं चिंतन प्रकट केलं. अंती अध्यक्ष श्री अरुण गडचेंचे ह्यांचे अध्यक्षीय चिंतन झालं.

कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन हे श्री विवेक बेणारे ह्यांनी केले. कार्यक्रमांस उपस्थितांची संख्या जरी न्यून म्हणजे वीस-पंचवीसच्या समीप असली तरी कार्यक्रम उत्साहांत पार पाडला. आटपाडीतले आमचे एक धारकरी मित्र नि बंधु श्री प्रथमेश देशपांडे आमच्या स्नेहाखातर उपस्थित राहिले. सांगलीतले स्थानिक मित्र श्री संदीपजी कुलकर्णीही उपस्थित होते. दुर्दैव इतकंच की अपेक्षेप्रमाणे सांगलीकरांची उपस्थिती फारंच न्यून होती. आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांची उपेक्षाही. अस्तु।

कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष श्री बाळासाहेब डिंगरेंच्या आभारप्रदर्शनाने नि आमच्या वंदे मातरम गायनाने झाली...


ज्या सांगलीत श्रीबाबारावांच्या जीवनांतला अंतिम काळ गेला, त्याच वास्तुंत त्यांना अभिवादन करणे हे आमच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचे लक्षण होते. क्रांतिवीरांना सर्व जग विस्मृतीच पाठवेल पण आह्मीं हिंदुसभाई मात्र हे सतीचे वाण कधीच त्यागणार नाही.

ह्या कार्यक्रमांत आह्मांस त्या भीषण जलप्रलयाने ओलसर झालेल्या काही ग्रंथांचीही प्राप्ती झाली. त्यावर सविस्तर पुढील लेखांत येऊच.

ह्या कार्यक्रमाच्या काही महत्वपूर्ण चित्रफीती

सौजन्य श्री रामकृष्ण महाराज वीर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3037763949621784&id=100001646254878

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3037803272951185&id=100001646254878

आमचं वन्दे मातरम्

https://youtu.be/HAt-Ww5NiHw

सौजन्य श्री प्रथमेश देशपांडे

वि रा करंदीकरांच्या शब्दांतंच लेखणींस विराम देतो..

निज राष्ट्राच्या उदयासाठी
हिंदु जातीच्या विजयासाठी
तुमुल संगरी प्राणपणाने लढलें जे बेभान
मंगल ते बलिदान। त्यांचे। मंगल ते बलिदान।

भवदीय,

पंढरपूर हिंदुसभा

#क्रांतिवीर_बाबाराव_सावरकर_अमृतमहोत्सवी_पुण्यस्मरण_सांगली_अटलबिहारीवाजपायी_भालजीपेंढारकर