Thursday 25 November 2021

उर्ध्वरेता भवेद्यस्तु स देवो त नु मानुष: ।



तीन सूर्य एकाच चित्रामध्ये - अवकाशांतला सूर्य, शिवसूर्य नि गुरुसूर्य 

जे उर्ध्वरेतस अर्थात आजीवन अखंड ब्रह्मचारी असतात, ज्यांनी कामिनी अन् कांचन दोन्हींचाही त्याग आयुष्यात केलेला असतो, ज्यांच्या देहाची आसक्ती नष्ट झालेली असते, गीतेतल्या द्वितीय अध्यायांतल्या स्थितप्रज्ञाप्रमाणे ज्यांनी *प्रजहाति यदा कामान् सर्वान मनोगतान्* असे जीवन व्यतीत केलेलं असते, अशी लोकोत्तर व्यक्तिमत्वं ही त्रिकालीही सर्वत्र नि सर्वकाल ही साक्षात देवंच मानली जातात, नव्हे ती देवंच असतात. इथे देव शब्दाचा अर्थ शतपथ ब्राह्मणामध्ये दिल्याप्रमाणे


*विद्वाँसो हि देव:।* असा आहे.


धर्मशास्त्रांतल्या कोणत्याही कार्यक्रमांतल्या किंवा आमच्या नित्याच्या संध्येच्या प्रत्यहीच्या संकल्पांत वर्णन केल्याप्रमाणे १९६ कोटींहून अधिक वर्षांचा दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या ह्या भारतवर्षांस अर्थात हिंदुराष्ट्रांस अनेक दैवी स्त्री-पुरुषांची परंपरा लाभलीय. कवीकुलाचा कुलगुरु असा महाकवी श्रीकालिदास त्याच्या रघुवंश नामक अतिप्रसिद्ध काव्यात लिहितो की


*अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज: ।*

*पूर्वोsपरा: तोयनिधीं वगाह्य पृथिव्यां मानदण्ड: इव स्थित: ।*


उत्तरदिशेंस प्राप्त हिमालय नावाचा नगाधिराज जो असा पर्वतश्रेष्ठ विराजमान आहे, जो पृथ्वीचा पूर्व व पश्चिमेचा मानदंड म्हणून स्थित आहे.


अशा ह्या नगाधिराजाच्या आश्रयांस विसावलेले हे हिंदुराष्ट्र ज्याचे वर्णन विष्णुपुराण करताना म्हणते


*गायन्ति देवा: किल गीतकानि धन्यास्तु ते भारत भूमिभागे।*

*स्वर्गापवर्गास्पदमार्गभूते भवन्ति भूय: पुरुषा: सुरत्वात्।*

*कर्माण्ड संकल्पित तवत्फलानि संन्यस्य विष्णौ परमात्मभूते।*

*अवाप्य तां कर्ममहीमनन्ते तस्मिंल्लयं ये त्वमला: प्रयान्ति ॥*


*साक्षात देवगण निरंतर हेच गान करतात की ज्यांनी स्वर्ग आणि मोक्षाच्या मार्गांवर आरुढ होण्यासाठी भारतवर्षामध्ये जन्म घेतला ते मनुष्य आमच्यापेक्षा अधिक धन्य तथा भाग्यशाली आहेत! जे लोक ह्या कर्मभूमीमध्ये जन्म घेऊन समस्त आशाकांक्षांनी मूक्त होऊन आपली सर्व कर्मे ही परमात्मा अशा श्रीविष्णुंस अर्पण करतात, ते पापरहित होऊन निर्मल अंतःकरणाने त्या परमात्म शक्तीमध्ये लीन होतात.*


विष्णु पुराण - २।३।२४-२५


आपल्या हिंदुधर्मामध्ये राजा हा प्रत्यक्ष विष्णुचा अवतार मानला जातो. प्रत्यक्ष धर्मवीर श्रीशंभुछत्रपतींनी श्रीशिवछत्रपतींना विष्णुचा अवतारंच म्हटलेलं आहे बुधभूषणमध्ये व दानपत्रामध्ये. राज्याभिषेक प्रयोगामध्येही श्रीशिवछ्त्रपतींच्या हाती श्रीविष्णुची मूर्ती दिलेलीच होती. उपरोक्त विष्णु पुराणाचा श्लोक श्री भिडेगुरुजींना तंतोतंत लागु होत नाही असं म्हणायचं आपलं साहस होईल काय???


कारण परमादरणीय श्रीभिडे गुरुजींनीही आपलं जीवनसर्वस्व त्याच विष्णुअवतारासाठी अर्थात भगवान श्रीशिवछत्रपतींसाठी वाहिलं आहे. कर्माण्ड संकल्पित तवत्फलानि संन्यस्य विष्णौ परमात्मभूते।


असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरेल काय???


आज इचलकरंजीमध्ये गुरुजींची सभा झाली त्यावेळी खेचलेली ही प्रतिमा समाजमाध्यमांवर प्राप्त झाली. त्यानिमित्त हे चिंतन


मूळात ह्या सत्पुरुषाविषयी जितकं लिहील, तितकं न्यूनंच आहे...

 

*असितगिरीसमं स्यात्कज्जलं सिन्धुपात्रे....*


अस्तु।


#परमादरणीय_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान_श्रीशिवछत्रपती

Monday 22 November 2021

हिंदुत्व हे स्वयंभु आहे आणि तसेच राहुद्यांत...

 




समोरच्याच्या गोल टोपीवर किंवा क्रॉसवर जर प्रतिक्रिया म्हणून तुमचं जानवं घालणार असाल, शेंडी ठेवणार असाल किंवा कपाळी गंध लावणार असाल तर तुम्हाला हिंदुत्वाची सैद्धांतिक परिभाषाच समजली नाही असे सिद्ध आहे किंबहुना हिंदुत्व आकळलंच नाहीये...


शेेंडी-जानव्याचा अधिकार सर्व हिंदुंना आहे व होताही हे ऐतिह्य प्रमाणांच्या आधारेही स्पष्ट आहे. आणि आह्मीं हट्टाने हे मांडत आलोच आहोत अगदी साधार नि सप्रमाण....कारण अध्यात्मिक उपासनेप्रमाणेच राष्ट्रीय उपासनेमध्येही प्रतीकांची आवश्यकता असतेच असते...


त्यांचे मुसलमानत्व जोपर्यंत आहे, ख्रिश्चनत्व जोपर्यंत आहे, ते त्यांचे 'त्व' सोडत नाहीत तोपर्यंतंच आमचं हिंदुत्व आहे, तोपर्यंत आह्मीं आमचं 'त्व' सोडणार नाही असे म्हणणं हे प्रतिक्रियात्मक हिंदुत्व असल्याचे लक्षण आहे...


किंबहुना अगदी स्पष्ट शब्दांत हे हिंदुत्व स्वयंभु नाहीये आणि ते कामाचंही नाही...


असलं हिंदुत्व मला तरी व्यक्तिशः मान्य नाही.....


कारण माझं हिंदुत्व हे इतरांच्या मुसलमानत्वांवर किंवा ख्रिश्चनत्वांवर अवलंबून मूळीच नव्हतं, नाही नि नसेलही...


पण आजकाल हिंदुत्वाची कुठली व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला जातोय हे कळणं माझ्यासारख्या अल्पबुद्धीधारकाला अवघड चाललं आहे...


हिंदुत्व हे स्वयंभु आहे रे दादांनो...


जेंव्हा अन्य कोणतंही 'त्व' अस्तित्वातंच नव्हतं तेंव्हापासून हिंदुत्व आहे...


त्यामुळे ते इतरांच्या 'त्व'वर अवलंबून खचितंच नाही...


आणि जर ते तसे असेल असे तुम्हाला वाटत असेल किंवा तसं तुम्ही ठसविण्याचा प्रयत्न कळत किंवा नकळत किंवा हेतुपुरस्सर करत असाल तर मग हिंदुत्वाच्या व्याख्येच्या पुनर्विचाराची किंवा पुनर्मांडणीची आवश्यकता आहे... केवळ स्पष्टीकरणासाठी...


पण उगाचंच स्वतःला प्रागतिक किंवा बुद्धिवादी दाखवण्याच्या हेतुने नाही ते 'नेरेटिव्हज सेट' करण्याचा प्रयत्न हिंदुत्वाच्या नावाखाली होत असेल तर अवघडंय हिंदुत्वाचे नि हिंदुत्वनिष्ठांचे...


हिंदुराष्ट्रपति तात्याराव स्वतः असे एका ठिकाणी म्हणालेले आहेत पण त्यांचे ते वक्तव्य एका पत्रकाराला उद्देश्यून आहे ही मर्यादा लक्ष्यीं घ्यावी...


यद्यपि त्यांचे हिंदुत्व हे धर्माला नाकारणारं नसलं आणि ते धर्म त्याचा एक भाग मानणारं असलं तरीही...


ह्यावर लिहिणार नव्हतो पण राहवलं नाही म्हणून...


काही दिवस विश्रांतीपूर्व अंतिम लेख...


एक महिन्याने भेटुच...


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#हिंदुत्व_हिंदुराष्ट्रीयत्व_हिंदुधर्म_इस्लाम_ख्रिश्चनिटी

Friday 12 November 2021

पद्मश्री प्रा डॉ. मीनाक्षी जैन

 




एका प्रामाणिक नि नामवंत इतिहासकाराचा सन्मान


२००६ मध्ये पुण्यात सिंबायोसिस वाणिज्य महाविद्यालयांत प्रवेश घेतल्यांवर ग्रंथालयांत अचानक आमच्या पूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींची (पू. अप्पा) पुस्तके पहायला मिळाली. वै. गुरुवर्य भागवताचार्य वा ना उत्पातांकडून पू. अप्पांविषयी फार ऐकलंच होते पण अप्पांची पुस्तके वाचायची ही पहिलीच वेळ होती. श्रीकृष्ण कथामृत वाचल्यावर सार्थमनुस्मृतीभाष्य वाचायला घेतलं. मोठाच्या मोठा ठोकळा वाचताना परिशिष्टांमध्ये ज्या टीपा होत्या, त्यात मीनाक्षी जैन हे नाव वाचल्याचे स्मरतंय. 


नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याचे कळलं नि मोदीजींविषयी कृतज्ञतेने अंतःकरण भरून तर आलंच पण एका प्रामाणिक इतिहासकारिणीचा योग्य सन्मान झाला ह्याचा मनस्वी आनंद झाला.


मीनाक्षी जैन कोण आहेत???


२००२ साली जेंव्हा माननीय अटलजींचे सरकार होते, माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी राष्ट्रीय अभ्यासक्रमासंबंधी National Curriculum Framework for School Education (NCFSE), 2002) नावाने एक अहवाल प्रकाशित केला होता, त्यान्वये शालेय अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षणाचा आरंभ झाला होता. त्यावेळी मार्क्सवाद्यांनी भारतीय इतिहासाचे केलेलं विकृतीकरण ह्यांस तोंड देण्यासाठी नि भारताचा सत्येतिहास समोर आणण्यासाठी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन आरंभ झालं. आरंभी इयत्ता अकरावीची 'मध्ययुगीन भारत' नि 'प्राचीन भारत' ही दोन पुस्तके पुनर्लिखित करण्यांत आली तींत मध्ययुगीन भारतांवर प्रा. मीनाक्षी जैनांनी नि प्राचीन भारतांवर प्रा. माख्खन लालांनी जी पुस्तके लिहिली, त्यांतला सत्येतिहास पाहून डाव्यांच्या पोटांत अक्षरशः पोटशुळ उठला.


इस्लामप्रिय मार्क्सवाद्यांना भारतीय इतिहासाचे हे वास्तवस्वरुप पाहून पित्त खवळणं स्वाभाविक होते. म्हणूनंच ज्यांची नावे घेणंही आह्मांला पाप वाटतं, अशा चांडाळचौकडीने ह्या प्रामाणिक इतिहासकारांच्या विरोधांत अगदी नेहमीच्या खोटेपणाच्या आवामध्ये 'भारतीय इतिहासाचे भगवीकरण' 'जातीय ध्रुवीकरण'(Communalisation of History Texts Books) वगैरे म्हणत बोंबा मारायला आरंभ केलाच व त्यावर त्याच नावाने त्यांनी एक स्वतंत्र पुस्तिकाही छापली. अर्थात त्याला पुढे मीनाक्षीजींनी व प्रा माख्खन लालांनी राजेंद्र दीक्षितांसह सहलेखनाने (Educating to Confuse and Disrupt) प्रत्युत्तरही दिलं. तीही पुस्तके दिल्लीच्या इंडिया फर्स्ट फाऊंडेशनने प्रकाशित केलीच आहेत. आह्मीं ती २०१२ साली विवेकानंद केंद्रामध्ये वाचली होती. त्यावेळी त्यावर लेखही लिहिला होता. दिल्लीमध्ये ती प्राप्त होतील जिज्ञासुंसाठी. 


सांगायचा हेतु हा की ज्या मीनाक्षीजींनी मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास जो इस्लामी पाशवी अत्याचाराने रक्तरंजित झालेला असल्याने तो प्रमाणासहित पुढे आणला, त्यांचा सन्मान होणं हे अत्यंत आनंदाचे आहे. मीनाक्षीजींची अन्य ग्रंथसंपदा म्हणजे त्यांनी सतीप्रथेवर केलेलं लेखन महत्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी तो ग्रंथ पीडीएफ प्राप्त झाला. त्यांनी श्रीराम मंदिर नि अयोध्याप्रश्नांवरही दोन पुस्तके लिहिली असून मंदिरांवरही त्यांचं एक स्वतंत्र पुस्तक आहेत. सर्व चित्रे सहसंलग्न आहेत.








राजा-मुंजे करार 


मीनाक्षीजींच्या आणखी लेखनापैकी त्यांनी अखिल भारत हिंदुसभेचे तत्कालीन अध्यक्ष धर्मवीर डॉ. मुंजे नि डिप्रेस्ड क्लास मिशनचे एम सी राजा ह्या दोघांमध्ये झालेल्या करारासंबंधी केलेलं लेखन चिंतनीय आहे जे राजा-मुंजे कराराने विख्यात आहे. ह्याचे पीडीएफ सुदैवाने आहे. गांधींनी आंबेडकरांसोबत जो पुणे कराराचा प्रयोग केला, त्याआधी हा करार झाल्याने आंबेडकरांच्या नि एकुणंच भारताच्या सामाजिक क्रांतीसंबंधीचा एक महत्वाचा कागद म्हणून ह्या कराराकडे पाहणं आवश्यक आहे. आश्चर्य म्हणजे आंबेडकरांनी ह्या कराराचे वर्णन Less troublesome and more straight forward असं केलं होते पुणे कराराच्या तुलनेने.


मीनाक्षीजांचा सन्मान ह्यापूर्वीच मोदीजींनी तसा केला आहे


२०१४ साली सत्ता येताच मोदी सरकारने मीनाक्षीजींची नेमणुक  Indian Council of Historical Research च्या सदस्यपदी केलीच आहे जी अत्यंत महत्वाची नेमणुक आहे.


पण आश्चर्य आहे सत्ता येऊन ७ वर्षे झाली तरी अद्याप इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे परिवर्तन अपेक्षित आहे ते दिसेना. असो आशा आहे की पुढे ते येईलंच.


२०२० चा पुरस्कार त्यांना चार दिवसांपूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला ही आनंदाची गोष्ट आहे


एक दोन अपवाद सोडता मोदी सरकार योग्य व्यक्तींनाच पुरस्कार देतंय ही समाधानाची गोष्ट आहे


प्रामाणिक इतिहासकारांचा सन्मान होणं हे केवळ महत्वाचेच नव्हे तर प्रेरणादायीही आहे. 


आदरणीय प्रा. डॉ मीनाक्षी जैन ह्यांना पद्मश्री प्राप्तीहेतु अभिनंदन नि भारत सरकारचेही आभार!


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#भारतीय_इतिहासाचे_पुनर्लेखन_पद्मश्रीपुरस्कार_डॉमीनाक्षी_जैन_मार्क्सवादीविकृती_सतीप्रथा_अयोध्या