Friday 9 August 2019

*#काश्मीर_स्वातंत्र्यवीर_सावरकर_हिंदुमहासभा_आर्य समाज_ रास्वसंघ* - लेखांक प्रथम



सर्वप्रथम सर्व भारतीयांचे अभीष्टचिंतन ! आदरणीय पंतप्रधान श्री. मोदीजी, केंद्रीय गृह मंत्री श्री. अमित शहाजी नि सर्व मंत्रीमंडळ, भारत सरकार नि सर्वांचेच अभीष्टचिंतन नि आभार !

हिंदुजगताची, हिंदुहिताची नि पर्यायाने अखंड हिंदुराष्ट्राची अविरत चिंता वाहणार्या हिंदुराष्ट्रपती श्री विनायक दामोदर सावरकरांचे काश्मीरविषयी मत काय होते हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच. सावरकरांनी काश्मीरविषयक नेमकं काय कार्य केलं हे पाहण्यासाठी हा लेखनप्रपंच.

१३ डिसेंबर, १९३७ मध्ये नागपूरात तात्यारावांनी पापस्तानच्या योजना उधळून लावण्यासाठी आवाहन करताना काश्मीरमधल्या हिंदुंच्या दुःस्थितीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होते. पुढे तात्याराव काश्मीरच्या प्रवासांस निघाले तो वृत्तांत...

*आता जीवनांत काश्मीरचा शेवटचा प्रवास मी करत आहे...इति सावरकर

१९३७ ह्या संवत्सरामध्ये स्थानबद्धतेतून मूक्त होताच अखिल भारत हिंदुसभेचा अध्यक्ष ह्या नात्याने स्वा. सावरकरांनी अखंड भारताचा प्रवास केला. ठिकठिकाणी त्यांचे अत्यंत हर्षभरित स्वागत नि त्यांस त्यांची भाषणात्मक उत्तरे प्राप्त झाली. सहस्त्रोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत. अधिक अध्ययनासाठी अ स भिडे लिखित *"Savarkar's Whirlwind Propaganda"* अर्थात सावरकरांचा झंझावाती प्रचार हा ग्रंथ जिज्ञासूंनी अभ्यासावा. पीडीएफ आहे. ह्या प्रवासाच्या अंती तात्याराव काश्मीरांस गेले.

*९ जुलै १९४२ यादिवशी तात्याराव काश्मीरला जाण्यांस निघाले.* १० जुलैंस ते दिल्लीस पोहोचले. तिथे प्रचंड जनसमुदायासमोर भाषण करताना तात्याराव म्हणाले की
*"तुम्ही मुर्दाबाद नि जिंदाबाद हे परकीय उर्दु शब्द त्यागून नाश हो, अमर रहे, जय हो आदि घोषणा द्यावांत."*
श्रीशिवछत्रपतींच्या भाषाशुद्धीच्या नि स्वभाषा अभिमानाच्या विचारांचे नि कृतीचे सत्यनिष्ठ कृतिशील संवाहक सावरकरंच होते ह्यात यत्किंचितही संदेहंच नाही. आणि म्हणूनंच त्यांच्या सूचनेनुसार तिथल्या प्रचंड जनसमुहाने *"अखंड भारत अमर रहे, पाकिस्तान नाश हो, स्वा. सावरकर की जय"* वगैरे घोषणांचा उद्घोष केला. मीरत, अंबाला, लुधियाना, अमृतसर, गुजराणवाला आदि स्थानके करत  *अंबाला स्थानकांवर विमान दलाचे युवक नि रा.स्व. संघाचे स्वयंसेवक तात्यांना भेटण्यांस आले* नि उपरोक्त उद्घोष करते झालें.

*गांधींची वैचारिक दिवाळखोरी*

ह्याकालावधीतंच कथित महात्मा गांधींनी आपल्या ब्रिटीशनिष्ठेचे प्रदर्शन करीत...

*ब्रिटीशांना इथून निघून जाऊद्या पण त्यांचे सैन्य मात्र इथेच राहुद्या...*


असे बाष्कळ विधान केले होते. आयुष्यभर ख्रिस्तप्रणीत अहिंसेची टिमकी वाजविणारा हा कथित महात्मा ही अत्यंत वैचारिक दरिद्रतेची घोषणा करतो ह्यापेक्षा दुर्भाग्य ते काय?ज्या ब्रिटीशांनी सैन्याच्या सहाय्यानेच आपल्यावर राज्य केले त्यांचे सैन्य इथेच राहु द्या असले भंपक नि अव्यवहार्य तत्वज्ञान मांडणारा हा राष्ट्रपिता म्हणावा काय ह्याचा विचार प्रस्तुत लेखकांस करावासा वाटतोच. वाचकांनी ठरवावे काय योग्य नि अयोग्य ते...
*दिनांक १४ जुलैच्या काँग्रेस कार्यकारिणीने संमत केलेल्या ठरावांत हे अत्यंत परस्परविरोधी विधान आहेच.* कुणीही पाहु शकतं ज्यांना प्रमाण हवंय ते निम्नलिखित पाहु शकतात


Gandhiji had repeatedly made it clear that “Quit India”demand meant only the removal of the British power and not the physical removal of British officers, administrators and army personnel. All of them, including the armies of Britain and the Allies, would continue to stay here—only under an agreement with us and not against our will as at present. 

संदर्भ - Collected Works Of Mahatma Gandhi - Volume Eighty-three : (Jun 7, 1942 - Jan 26, 1944)





एकीकडे पाकिस्तान पाप आहे असे म्हणायचे नि दुसरीकडे पापस्तानला स्वयंनिर्णयाची मान्यता द्यायची. तद्वतंच ब्रिटीश गेले तरी सैन्य इथेच ठेवा ह्यासारखा भोंगळ गांधीवादी गोंधळ जगांत कुठेच पहायला प्राप्त होणार. ह्यासाठी प्रतिकार म्हणून सावरकरांनी त्यांस प्रत्युत्तर देताना लाहोर मध्ये तात्यांनी गांधींची ही घोषणा किती बाष्कळपणाची आहे हे सांगितले आणि

*हिंदुंनी राजनीतीचे हिंदुकरण नि हिंदुंचे सैनिकीकरण करावे*

ही घोषणा दिली जी तात्याराव ह्याआधीही अनेकवेळा देत आले होते...

*११ जुलैला तात्याराव दुपारी ४ वाजता जम्मुंस पोहोचले...*

तिथे खड्गधारी शीखांनी त्यांस मानवंदना दिली. अनेक सुवासिनींनी त्यांस ओवाळले. १५-२० सहस्त्रांच्या संख्येत त्यांची मिरवणुक निघाली होती.. मानपत्रे, पानसुपारी, अत्तरांचा सडा नि त्याचा घमघमाट, छोटी छोटी भाषणे असा हा कार्यक्रम सुरु होता.

*पुढे १२ दिनांकास हरी चित्रपटगृहात 'अखंडभारत' ह्या विषयांवर तात्याराव दीड तास* बोलत होते. त्यात त्यांनी काँग्रेसचा राष्ट्रद्रोह, ब्रिटीशांची कुटनीती, मूस्लिमांची घातकी प्रवृत्ती, गांधीगोंधळ ह्या सर्वांपासून परावृत्त होण्याची कळकळ व्यक्त केली.

*पुढे तात्याराव श्रीनगरला गेले.* राजा नरेंद्रनाथांनी त्यांचे उत्साहांत स्वागत केले. मानपत्र, हारतुरे, मिरवणुकींस उत्तर देताना तात्यारावांनी एका तासाच्या भाषणामध्ये

*"आर्य येथे कसे आले, त्यांनी इथे मुक्तसंचार कसा केला, राज्ये कशी स्थापन केली, ती कशी लढविली ह्याचा धावता चित्रपट माझ्या अंतःचक्षुंपुढे उभा आहे."*

या भाषणांत तात्याराव स्वतः नि श्रोते इतके रंगले की ते मान डोलवायला लागले, हसत होते, टाळ्यांचा गडगडाट करत होते. त्यानंतर प्रचलित देशांतील प्रश्नांसाठी संवाद करून त्यांनी आणखी दोन सभांमध्ये भाषणे दिली, ज्यातली एक सभा महिलांची होती. ह्या उत्साहाने भारावून जाऊन तिथल्या लोकांनी त्यांची दुसर्या दिवशी पुन्हा मिरवणुक काढली व चाळीस सहस्त्रांच्या समोर ती सभा वितस्ता नदीच्या काठी सभेत रुपांतरित झाली.

एखाद्यांस वाटेल की ते आर्याक्रमण सिद्धांताचे पुरस्कर्ते होते की काय पण उपरोक्त वचनांतून हा अर्थ निघत नाही हे त्यांच्या समग्र साहित्याच्या अध्ययनाने आपणांस पटण्यासारखं आहेच. त्यांच्या मते आर्य बाहेरुन आलेले नसून ते मूळचे इथलेच होते. त्यांनी कुठेही आर्याक्रमणाचे समर्थन साहित्यात केलेले नाहीच.

ह्या सभेचे एका तत्कालीन वार्ताहराने केलेलं वृत्तवर्णनही उत्तम आहे. तो लिहितो...

*"ह्या दृश्याने सावरकरांची वाग्देवी सुप्रसन्न न होती तरच आश्चर्य. कधा ललित नृत्य तर कधी तांडव नृत्य अशा प्रकारे सर्व श्रोत्यांची मने तिने आकर्षून घेतली...त्यावेळी सावरकरांच्या पायाला स्पर्श करून त्यांना वंदन करण्यासाठी स्त्री-पुरुष मुलांनी दाटी केलेली होती."*

*पुढे तात्याराव १७ दिनांकास रावळपिंडीस पोहोचले. रा स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी व इतरांनी* त्यांचे स्वागत केलं. ह्या प्रवासाच्या आरंभीच तिथल्या मुस्लिमांनी तात्यारावांना एक निवेदन दिलं होते ते असे

*"तुम्ही लोकशाहीवादी, तर्क शुद्ध विचारांचे, निर्भीड नि व्यवहारी आहात. काश्मीरमध्ये तर ७५ प्रतिशत मुसलमान असतानादेखील त्यांना त्यांच्या अधिकाराच्या पन्नास प्रतिशत जागाही प्राप्त होत नाहीत. आपण ह्या मागण्यांचा विचार करावा नि आम्हांला न्याय द्यावा."*

तात्यारावांनी त्यांच्या भाषणांतून ह्यांस उत्तर तर दिलेच होते पण महाराष्ट्रांत परत आल्यावर त्यासंबंधी एक पत्रकही काढले, ज्याचे संपूर्ण वृत्त *"Historic Statements - ऐतिहासिक निवेदने"* ह्या ग्रंथामध्ये वाचण्यांस प्राप्त होईल. पुढील लेखांकांत आपण ते सविस्तर पाहुयांत...

*एक महत्वाचे*

ह्या *संपूर्ण प्रवासांत अमर हुतात्मा पंडित नथुराम गोडसे तात्यारावांबरोबर अगदी छायेसारखे होते बरंका. त्यांचे कार्य, व्याख्याने ह्याविषयी पुढील लेखांकात त्याविषयी सविस्तर लिहुच.*


भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandined.blogspot.com