Tuesday 26 July 2022

नाम बरवें, नामदेव बरवा| एकत्व बरवा परमात्मा| श्रीपरिसा भागवत

 




भक्तशिरोमणी, भक्ताग्रणी, नामयोगाचा मेरु, नामचिंतामणी, प्रल्हाद-अंगद-उद्धवाचा पुनर्जन्म, श्रीविठ्ठलाचे प्रेमभांडारी संतश्रेष्ठ श्रीनामदेवराय ६७२ वा संजीवन समाधी‌ सोहळा...! 


आषाढ वद्य त्रयोदशींस आजच्यांच‌ तिथींस ६७२ वर्षांपूर्वी श्रीनामदेवरायांसंहित त्यांच्या घरातल्या १५ जणांनी जिवंत समाधी घ्यावी...! संत श्रीजनाबाईही त्यांत होत्या. म्हणजे इतिहासांत श्रीभीष्माचार्यांस त्यांच्या आजीवन अखंड ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेने नि पित्याविषयीच्या निष्ठेने पित्याने त्यांस इच्छामृत्युचं वरदान दिलं होते. त्यापश्चात् प्रत्यक्ष कैवल्यचक्रवर्ती‌ संतसम्राट श्रीज्ञानोबारायांनीही संजीवन समाधी घेऊन जगाचें डोळे दिपविले...! त्याच श्रीज्ञानोबारायांना संजीवन समाधींस घेऊन जाणारे आमचे भक्तशिरोमणी श्रीनामदेवराय त्यांच्याच‌ कुटुंबासहित आमच्या‌ पंढरीत त्या परमात्मा पंढरीशाच्या समोरंच समाधी घेतात...!


शारीरिक व्याधींनी गांजलेले लोक अगदी मरणासन्न असताना मृत्युच्या‌ त्या असह्य वेदना सहन न होऊन अंतिमत: मृत्यु यावा व ह्यातून सुटका तरी व्हावी म्हणून काहीवेळा तळमळताना दिसतात पण‌ तरीही भोग भोगायचे म्हणून त्यांना मृत्यु येत‌ नाही नि त्यांची वेदना तशीच राहते. चांगल्या स्थितींत मृत्यु येणं तर भाग्यवंताचंच‌ लक्षण...!


पण या‌ एकाच‌ कुटुंबातल्या १६ जणांनी एकाचवेळी देहत्याग करावा. श्रीनामदेवरायांचा अधिकार जगाला माहिती आहेच पण कुटुंबांतलेही..? ते इतर १४ जण कोण ह्याची‌ सूची जोडली आहे ती पहावी...!



ते‌ 'संतांचे ते आप्त नव्हे ते‌ संत' हे संतवचन इथेच खोटं ठरावं ह्यापेक्षा आश्चर्य काय? खरंतर संतवचनं कधी खोटी ठरत नाहीत पण अपवाद असे...!


इच्छामृत्युचं वरदान यापेक्षा काय भिन्न असावं?मृत्युवर विजय‌ ह्यापेक्षा वेगळा काय असावा? संतांचा अधिकार ह्यापेक्षा वेगळा काय प्रत्ययांस‌ यावा???


आणि त्यांनी हे सर्व साध्य केलं ते केवळ अनन्यशरण भक्तीच्या सामर्थ्यावर, नामचिंतनाच्या बलावर...!


म्हणूनंच‌ श्रीपरिसा भागवत म्हणतात


कलियुगीं नामा संत‌ साकार, न कळें तो पार ब्रह्मादिक|


श्रीनामदेवराय नि त्यांच्या कुटुबीयांच्या चरणी कोटी प्रणाम...! आमचं भाग्य इतकंच की आमचं घर श्रीनामदेवरायांच्या मंदिरांस चिकटून...! 


पुनरपि जननं पुनरपि मरणं श्रीमन्नामदेवरायमन्दिरसमीपे निवासं| 🙏😇


श्रीनामदेव पायरीचे आजचे छायाचित्र साभार - आमचे बंधु श्री Mahesh Kale 


भवदीय...


#श्रीनामदेव_संजीवनसमाधी_सोहळा_नामदेवपायरी_पंढरपूर

Thursday 14 July 2022

श्रीगुरुपौर्णिमा चिंतन

जो स्वत: मुक्त नाही तो आपल्याला काय मुक्त करणार???


नानक देवांची एक कथा आहे. ते एका राजाकडे गेले. तो‌ राजा साधुसंतांचे आदरातिथ्य करणारा सत्शील राजा होता. त्यावेळचे राजे तसेच होते. तर त्याने नानकदेवांना विचारलं की आपल्यासारखा सत्पुरुष‌ माझ्या राजप्रासादी आला. माझं भाग्य! काय हवं ते मागा. नानकदेव म्हणाले मी मागेल ते तु देऊ शकणार नाहीस. तरीही आग्रह केल्यावर ते म्हणाले मला तुझं राज्य दोन तासांसाठी दे. राजाने नानकांना राज्य देऊन टाकलं.‌ राज्य घेतल्या घेतल्या त्यांनी राजाला बंदी बनवलं व त्या राजाच्या गुरुलाही, पुरोहितालाही सर्वांना बंदी बनवलं. राजाला आश्चर्य वाटलं हे काय घडतंय. नानक देव म्हणाले आता तुझ्या गुरुला तुला सोडवायला‌ सांग. राजा गुरुकडे गेला पण पण तो गुरुच मूळात बद्ध होता, अडकला होता. तो काय मुक्त करणार राजाला?


राजाला बोध प्राप्त झाला. त्याने नानकांचे पाय धरले. 


तात्पर्य काय???


गुरु स्वत: जीवनमूक्त असेल, अधिकारी असेल, तर तो आपल्याला मुक्त करेल. तोच बद्ध असेल तर आपला काय उद्धार व्हायचा???


गुरु कशासाठी करायचा??? 


उत्तर - मोक्षासाठी अर्थात ईश्वरप्राप्तीसाठी. अर्थात जन्म-मृत्युच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी, आत्मज्ञानासाठी...!


आयुष्यांत गुरु अनेक असतातही लौकिकार्थाने. पण परमार्थामध्ये मोक्षगुरु हा मात्र आयुष्यांत एकंच असतो, ज्याला आपण सद्गुरु म्हणतो. आणि हा सद्गुरु कोण तर ईश्वर प्राप्त करून देतो तो. श्रीएकनाथांनी एका ठिकाणी म्हटलंय


मंत्रतंत्र उपदेशितें घरोघरी गुरु आईटें|

जो शिष्यांस मिळवितों सद्वस्तुतें,

सद्गुरु तयातें श्रीकृष्ण मानीं|


गुरु तसे पुष्कळ असतात मंत्र तंत्र देणारे. पण शिष्याला सद्वस्तु प्राप्त करून देतो तोच खरा गुरु, सद्गुरु...! 


आता‌ सद्वस्तु म्हणजे ईश्वर...!


आता असा गुरु जो स्वत: ईश्वरप्राप्ती केलेला असेल तरंच तो आपल्याला प्राप्त करून देईल ना? तोच अडकलेला असेल तर तो आपल्याला काय मूक्त करणार??? म्हणूनंच उपनिषदं म्हणतात


तद्विज्ञार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम्|


श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु करावा..!


म्हणूनंच ईश्वरप्राप्तीसाठी गुरु निवडताना मात्र तो अत्यंत चाणाक्षपणे निवडला पाहिजे. विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांना साडेतीनवर्षे तपासलं नि मगच गुरु म्हणून स्वीकारलं. कारण त्यांना मोक्ष‌ हवा होता, ईश्वर हवा होता आणि तेच योग्य आहे. इथे भोळेपणा चालत नाही. नाहीतर हानीच होते. नाहीतर आपण काय करतो? आपल्याला हा विवेकंच राहिलाच नाहीये. 


कारण आपणंच मूळात मोक्षहेतुने गुरु करतंच नाही. भौतिक लाभासाठी करतो. मला हे हवं, ते हवं. ते लोक लुच्चेगिरीने नवससायास करतात तसंच आपलं झालंय. आणि नेमकं इथेच चुकतो आपण...! 


दुर्दैवाने आजकालही सर्वत्र गुरुत्वाचे स्तोम माजलंय. अक्षरश: ह्याची माळ घाल, त्याची माळ घाल...आणि ती सुद्धा प्रतिष्ठेसाठी. अरे टिंगल वाटते का गुरु-शिष्य परंपरा म्हणजे???


म्हणूनंच गुरुचं नाव घेऊ नये असे‌ सांगताना शास्त्रकार सांगतात की


*आत्मनामगुरोर्नाम नामातिकृपणस्य च|*

*श्रेयस्कार्यो न गृह्णय्यात् ज्येष्ठापत्य कलत्रयो:|*


आत्मनाम म्हणजे मीमी म्हणु नये, गुरुचं नाव घेऊ नये. का? तर मी त्या गुरुचा‌ शिष्य म्हणून माझी लायकी नसतानाही उगाचंच मला प्रतिष्ठा नको व माझ्याहातून काही वाईट घडलं तर माझ्या गुरुंस माझ्या अपकृत्यामुळे अप्रतिष्ठा नको. अतिकंजुस माणसाचं नाव घेऊ नये, थोरल्या मुलाचं नाव घेऊ नये नि बायकोने नवऱ्याचे व नवऱ्याने बायकोचं नाव घेऊ नये...! असं शास्त्र सांगतं. आता असं का इतर‌ स्पष्टीकरण देत बसत‌ नाही. पुन्हा केंव्हातरी...


मग आता प्रश्न असा पडेल की मग हा अधिकारी मोक्षगुरु भेटायचा कसा? असा जीवनमूक्त पुरुष किंवा स्त्री भेटणार कशी? बरं त्याला ओळखायचा कसा??? कारण त्याला ओळखायची आपलीही योग्यता हवी ना...! 


कारण ह्यात फसवणुकही होतेच...!


माझ्यासारख्या सर्वसामान्य मनुष्याला हा प्रश्न पडणं स्वाभाविकंच आहे.  कारण असा जीवनमुक्त पुरुष‌ समजा सभोवताली असला तरी आपण त्यांस ओळखायचं कसं???


कारण आपण काही विवेकानंद नाही आहोत..


मग ह्याचं उत्तर काय??


तर आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण अखंड करत राहणे...


अशाने काय होते???


योग्यवेळ आली की वास्तविक असा जीवनमुक्त गुरुच आपल्याला शोधत येतो...हो...!


अर्थात हा प्रत्येकाच्या अनुभूतीचा विषय आहे. 


आता प्रश्न असा पडेल की आपण एखादा गुरु केलाच असेल नि तो असा जीवनमुक्त नसेल तर? आपली निवड चुकली म्हणून निराश व्हायचं कारणंच नाही. ह्या आधीच्या गुरुने सांगितलेली उपासना निष्ठेने केली तरी योग्य मार्ग मिळु शकतो...


काहीजण म्हणतील की भले आपला तो आधीचा गुरु मुक्त नसेल पण तरीही आपण त्याने दिलेल्या नामावर दृढ श्रद्धा ठेऊन साधना केली तर...?


तरीही वर म्हटल्याप्रमाणे पुढे आपोआप मार्गदर्शन भेटत जाते...!


इथे जाता जाता एक सांगणं...


कैवल्यचक्रवर्ती श्रीमाऊली तर गुरुशिष्याचे हे नाते‌ सांगताना म्हणते 


माझा गुरु माझाच, इतर कुणाचा नाही..


म्हणजे पातिव्रत्यभाव असावा. म्हणजे एकावेळी एकंच गुरु नि एकंच शिष्य. म्हणजे माझ्या गुरुला मी एकंच शिष्य असायला हवा. व मलाही तो एकंच गुरु...! अर्थात हे तोपर्यंतंच जोपर्यंत शिष्य आत्मस्थिती प्राप्त करत नाही तोपर्यंतंच...! हा स्वतंत्र विषय...! अस्तु|


कालच्या गुरुपौर्णिमेनिमित्त काल सहज केलेलं हे चिंतन...! जे सुचलं ते लिहिलं...


#श्रीगुरुपौर्णिमा


भवदीय...