Sunday 25 April 2021

वर्धमान श्रीमहावीर, श्रीकुमारिल भट्टपाद नि श्रीचित्सुखाचार्य

 



आज वर्धमान श्रीमहावीरांची जयंती! त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन...!


भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांची जी दहा संस्कृत चरित्रे आहेत, ज्यांविषयी आह्मीं गतवर्षीच्या वैशाख शुद्ध पंचमीसंच सविस्तर फेबु लाईव्हमध्ये बोललो आहोत, त्या दहांमधील सर्वात प्राचीन नि प्रामाणिक चरित्र म्हणजे समकालीन अशा पूज्यनीय श्रीभगवत्पादाचार्यांच्या शिष्याने नि बालपणापासूनच्या त्यांच्या मित्राने लिहिलेलं चरित्र म्हणजे श्रीचित्सुखाचार्यांचे बृहत्शंकर विजय...! हे आचार्यांपेक्षा सहा वर्षांनी मोठे व पुढे ८०-९- वर्षांपर्यंत जगले. 


श्रीचित्सुखाचार्यांचा बृहत् शंकर विजय


ह्या अत्यंत समकालीन परंतु फारसं प्रकाशित नसलेल्या किंवा कदाचित हेतुपुरस्सर प्रकाशित न करु दिलेल्या चरित्राविषयी फार बोलण्याचे हे स्थान नसले तरी आजच्या वर्धमान श्रीमहावीरांच्या जयंतीनिमित्त त्या चरित्रामध्ये असलेला त्यांचा नि श्रीकुमारिल भट्टपादांचा उल्लेख हा चिंतनीय आहे. श्रीकुमारिल भट्टपादांनी पूज्यनीय श्रीभदवत्पादांच्या प्रथम नि अंतिम भेटीमध्ये आत्मचरित्र निवेदन करताना महावीरांचा उल्लेख केला आहे, तो महत्वाचा आहे. या चरित्रानुसार नि जैन विजय ह्या जैनांच्याच ग्रंथानुसार श्रीकुमारिल भट्टपाद हे जैन झाले होते, त्यांनी श्रीमहावीरांचे शिष्यत्व प्रथम स्वीकारून त्यांचा लाडका शिष्य म्हणून ख्याती प्राप्त केली इतकी की श्रीमहावीरांचे इतर जैन शिष्य त्यांचा आत्यंतिक द्वेष करु लागले. पण श्रीभट्टपादांनी जैन होऊन त्यांची सर्व रहस्ये जाणून घेतली नि त्यांचा शास्त्रार्थामध्ये पराभव करून त्यांच्या मताचा निरास करून वैदिक धर्माची पुनर्संस्थापना केली.





श्रीचित्सुखाचार्यांच्या मते श्रीकुमारिलभट्टपाद हे पूज्यनीय श्रीभगवत्पादाचार्यांपेक्षा ४८ वर्षांनी मोठे होते. श्रीमहावीरांची इतकी मर्जी श्रीकुमारिल भट्टपादांनी संपादित केली की त्यांचा प्रिय शिष्य म्हणून त्यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम जडले होते. ह्याकारणेच इतर जैन शिष्य श्रीकुमारिलभट्टपादांचा अत्यंत द्वेष करीत आणि त्यांना नामोहरम करायची संधी पाहत.


एकेदिवशी श्रीमहावीरांनी वेदांची नि वैदिक देवतांची केलेली आत्यंतिक निंदा पाहून श्रीकुमारिलभट्टपादांना ते राहवलं नाही नि त्यांच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहु लागल्या. हे पाहून श्रीमहावीरांच्या इतर शिष्यांना शंका आली की हे ब्राह्मण असावेत. म्हणून त्यांनी ती गोष्ट श्रीमहावीरांच्या निदर्शनांस आणून देताच श्रीमहावीरांनी त्यांस सांगितले की हा आपला रहस्य जाणून नि आपल्या पंथातली उणी जाणून उद्या आपल्याच विरोधांत त्याचा विनियोग करेल म्हणून त्याचा त्याला न कळता सहजपणे काटा काढण्यांत यावा. हे सर्व गुप्तपणे करण्यांत यावं असे श्रीमहावीरांनी त्यांस सांगितलं. एकेदिवशी सर्वजण असेच स्वच्छ चंद्रप्रकाशांत त्यांच्या गुरु श्रीमहावीरांच्या महालीच्या अगदी उच्च स्थानी गप्पा मारत असताना श्रीमहावीरांच्या सूचनेने अचानक त्यांनी श्रीकुमारिलभट्टपादांना उचलले व माळवदावरून खाली फेकून दिले.


श्रीकुमारिलभट्टपादांना अचानक आपल्या गुरुंच्या नि गुरुशिष्यांच्या आचरणांत झालेले हे परिवर्तन आश्चर्यकारक होते. त्यांना फेकून दिलं असताना त्यांनी खाली उडी घेताना जे वाक्य उच्चारले ते महत्वाचे आहे. 


*यदि वेदाः प्रमाणं स्युर्जीवेयमिति चेतसः।*


जर वेद प्रमाण असतील तर मी जीवित राहीन. 


इथे त्यांनी यदि म्हणजे जर ही शंका घेतली म्हणून त्यांचा एक डोळा गेला असे चरित्रकार म्हणतात. कारण वेद हे प्रमाणंच आहेत, त्यांच्या प्रणाणत्वाविषयी शंका घेण्याचे कारणंच नाही. काहींना ही कथा अतिशयोक्ती वाटेल. पण स्वतः श्रीचित्सुखाचार्यांनी ही मांडलेली असल्यामुळे महत्वाची आहे. क्षणभर ती अत्युक्ती म्हणून त्याज्य मानली तरी त्यातून श्रीकुमारिलभट्टपादांची जाज्वल्य वेदनिष्ठा दृष्टोत्पत्तींस येते...


या प्रसंगापश्चात श्रीकुमारिलभट्टपादांनी जैनांशी शास्त्रार्थच्या शास्त्रार्थ केले नि त्यांना वादांमध्ये पराभूत करून वैदिक धर्माची पुनर्प्रतिष्ठापना केली. इतके की पुढे सुधन्वा नावाचा जो मूळचा वैदिक राजा जैन झाला होता, जो प्रत्यक्ष श्रीयुधिष्ठिराचा वंसज होता, त्याच्या राजप्रसादामध्ये जाऊन त्याच्या जैन गुरुंशी शास्त्रार्थ करून त्यांना पराभूत करून त्या राजांस वैदिक धर्मावलंबी बनविले नि जैन पंथाचा प्रसार नि प्रसार रोखला.


*युधिष्ठिर वंशज सुधन्वा राजाचे ताम्रपत्रानुशासन*


*ह्याच सुधन्वा राजाने पुढे श्रीभगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांस एक सनदरुपी ताम्रपट अर्पण केला ज्यामध्ये युधिष्ठिर शक २६६३ आश्विनमासाच्या पौर्णिमा तिथीचा उल्लेख आहे. हा ताम्रपट द्वारिकापीठाच्या श्रीशंकराचार्य मठाने विमर्श नामक विशेषांकामध्ये पृष्ठ २९ वर प्रकाशित केला आहे. हे युधिष्ठिर शक २६६३ म्हणजेच इसवी सन पूर्व ४७८ इतका काल येतो. ह्यावरूनंच श्रीमच्छंकराचार्यांचा काल हा ईसवी सन पूर्व पांचवे शतक सिद्ध होतो.*



पण पण पण...

पाश्चात्यांना बुद्धी गहाण टाकलेल्या एतद्देशीय विद्वानांनी ह्या तथ्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याने यद्यपि १०० वर्षांपूर्वीच हा विषय श्री टी एस नारायण शास्त्रींनी उजेडात आणला तरी पुढे आला नाही किंवा आणला गेला नाही. अर्थात ह्या भ्रमाची सविस्तर मीमांसा कधीतरी विस्ताराने करुच. 

हा जो सुधन्वा राजा आहे तो प्रत्यक्ष युधिष्ठिराच्या वंशातला असल्यामुळे पुढे पंडित श्रीकोटा वेंकटाचलम ह्यांनी त्यांच्या एज ओफ महाभारत वॉर या ग्रंथामध्ये हा ताम्रपट प्रकाशित केला आहे. तो आह्मीं इथे संलग्न केला आहे. ह्या ताम्रपटाचे प्रथम प्रकाशन हे श्रीकानुपर्ती मार्कंडेय शर्मा ह्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये १९२८ मध्ये केलं. पुढे मुडिगोंडा वैंकटरमण शास्त्रींनी ते तिथून उचलून पुढे पंडित कोटाजींनी ते त्यांच्या उपरोक्त ग्रंथामध्ये प्रकाशित केलं. त्यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या तीन प्रमुख ग्रंथांमध्ये  हा ताम्रपट प्रकाशित असल्यामुळे आचार्यांच्या कालनिर्णयाविषयी संदेह असण्याचे कारणंच नाही. इतर उल्लेख तर ढीगभर आहेत.


हे सगळं सांगायचे कारण काय ???


श्रीकुमारिलभट्टपादांनी आपल्या जैन गुरुंशी द्रोह केला हे पाहून प्रायश्चित्त म्हणून स्वतःस तुषाग्नीत जाळून घेतलं... ह्याला वैदिक धर्म म्हणतात...


स्वतःला वेगळं सिद्ध करु पाहणाऱ्या जैन बांधवांनी डोळसपणे ह्या कथेकडे पहावं ही अपेक्षा काही व्यर्थ नाही...


जाता जाता...


महाभारतकालापश्चातंच ही जैन नि बौद्धमते का उदयांस आली हे चिंतन महत्वाचे आहे. तो स्वतंत्र चिंतनाचा विषय असल्याने लेखणींस विराम देतो...


आणि हो बौद्ध मत हे जैनांच्या आधीचे आहे हे इथे सांगणं आवश्यक आहे...


अस्तु।


श्रीमहावीर नि श्रीकुमारिलभट्टपाद, श्रीचित्सुखाचार्य नि भगवत्पाद पूज्यनीय श्रीमच्छंकराचार्यांच्या चरणी विनम्र अभिवादन...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीवर्धमान_महावीर_भगवत्पादपूज्यनीय_श्रीमच्छंकराचार्य_श्रीकुमारिलभट्टपाद_युधिष्ठिरशक_सुधन्वा

Friday 23 April 2021

ताटी उघडा बा विठ्ठला...

 





घट्ट मिटलेले डोळे कधी उघडणारंयेस???


श्रीविठोबा, तु आहेस का??? खरंच आहेस का???


आमचा इतका अधिकार नाही की तुला श्रीजनाबाईंप्रमाणे विठ्या मूळ मायेच्या कारट्या वगैरे म्हणावं...


आमचा इतका अधिकार नाही की तुला आमच्या श्रीनामदेवरायांप्रमाणे घास भरवावा...


आमचा इतका अधिकार नाही की श्रीचोखोबारायांप्रमाणे तुला आळवावं...


आमचा इतका अधिकार नाही की तुला श्रीतुकोबारायांप्रमाणे भंडारा डोंगरावर तुलाच भजताना त्यांच्या आवळाईच्या पायात टोचलेला काटा काढण्यासाठी प्रकट करावं...


कुणाकुणाचं अन् किती नाव घ्यावं???


आमचा अधिकार मूळीच नाही.


पण तु भक्तकामकल्पद्रुम आहेस ना? अनाथांचा नाथ आहेस ना...???


समोsहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योsस्ति न प्रियः हे तुझंच ब्रीद आहे ना ???


मग तुझी आर्ततेने भक्ती करणारा एखादा संतसम्राट किंवा भक्तराज असो किंवा आमच्यासारखा यःकश्चित एक अतितुच्छ तुझाच ग्रामनिवासी असो...तुला सगळे सारखेच ना रे???


मग आता का डोळे मिटून बसलायेस???


जगात काय चाललंय ते तुला दिसेनासं झालंय का???


सगळं देवावरंच टाकून विसंबणारा मूळीच नाही. कारण प्रत्येक जीव आपल्या आपल्या कर्मांस बाध्य आहे हे तुझंच तर सांगणं आहे...ते मान्यही आहे...


पण मग तु आहेस ना संकटात धाऊन येणारा आणि पतितांनाही पावन करणारा...


मग आज तुझे डोळे मिटलेत का???


लक्षावधी आज तुझ्याकडे डोळे लाऊन बसलेत...


तु तर द्वारंच बंद करून बसलाय...


असे म्हणायचं का आता???


किती दिवस ही तुझी निद्रा???


आज चैत्र एकादशी...मागच्या वर्षीही तुझं दर्शन नाही नि ह्यावर्षीही नाही. हे किती दिवस???


डोळे उघड नि बघ...उघडशील का???


भवदीय...


#पंढरपूर_श्रीविठ्ठल_दर्शन_चैत्रएकादशी_श्रीरुक्मिणी_संतपरंपरा_वारकरी_संप्रदाय