Friday 28 May 2021

प्लेग, सावरकर आणि सद्यःस्थिती

 




*पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसानसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल ह्रदयांत अपार करुणा असणारे सहस्त्रो युवक नि युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मूक्ती, सेवा आणि सामाजिक पुनरुत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या सामाजिक समानतेचे आवाहन करतील नि हा देश पुन्हा पौरुषाने मुसमुसून उठेल.*


स्वामी विवेकानंद


आज सर्वत्र कोरोना नामक वैश्विक आपत्तीने अक्षरशः सर्व मानवजातींस जणु धारेंवर धरले आहे. अर्थात हे सर्व षड्यंत्र आहे. पण तरीही अशा अत्यंत विपन्नावस्थेमध्ये समाजासाठी, राष्ट्रासाठी, मानवतेसाठी कार्य करणाऱ्या हातांची आवश्यकता आहे. इतिहासांत काही पुरुषश्रेष्ठांनी अशाच जीवघेण्या आपदेमध्ये समाजाला सहाय्यतेचा आधार देऊन स्वकर्तव्यनिष्ठेचे पालन केले आहे. वर ज्यांचे उद्धरण दिलं आहे, त्या विश्वमानव श्रीमत्स्वामी विवेकानंदांनीही एक संन्यासी असूनही बंगालमध्ये जेंव्हा अशीच रोगाची साथ आली होती, तेंव्हा आपल्या सर्व संन्यासी गुरुबंधुंसह पूर्ण सामर्थ्यानिशी सेवाभावनेने सहाय्यता केली होती. जीवाची कोणतीही पर्वा न करता. त्याच काळांत...


इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात, ते काही खोटे नाही. त्यांच्याच प्रमाणे आज ज्यांची जयंती आहे, अशा हिंदुराष्ट्रपति श्री स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचीही एक घटना इथे प्रसंगोचित आहे.


*प्लेगचा कहर...*


आजपासून अगदी जवळ एकशे सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत प्लेगची साथ आली होती. चाफेकर बंधुंची कथा सर्वांस ज्ञात असेलंच. ज्या नाशकांत स्वातंत्र्यवीर अगदी लहानाचे मोठे होत होते, तिथेही प्लेगने अक्षरशः थैमान घातले होते. आज कोरोनाची जी अवस्था आहे तीपेक्षाही अधिक भयाण अवस्था तींकाळी होती. आणि सावरकरांनी ती प्रत्यक्ष अनुभवली होती. त्यांनी त्यांच्या 'माझ्या आठवणी' ह्या आत्मचरित्रपर ग्रंथामध्ये ह्यासंबंधींच्या आठवणी दिल्याहेत. ते लिहितात की 


*"घरात एक माणसू प्लेगने लागला की देखोदेखी बायका-मुले, माणसे, घरचे घर एखाद्याआगीत भस्म व्हावे त्याप्रमाणे पटापट मृत्युमुखीपडून नष्ट व्हावें. एकेका घरात पाच-पाच, सहा-सहा प्रेतएकामागून एक पडलेली. कोणाचे प्रेत कोण उचलणार! वाड्याचा वाडा, पेठांच्या पेठा, घरोघर कण्हणेकिंकाळ्या, प्रेते, पळापळ, रडारड चाललेली, जे दुसऱ्याचे प्रेत आज उचलीत, तेच उद्या त्या संसर्गारशीप्लेगने लागनू परवा त्यांची प्रेते त्याच मार्गाने तिसऱ्यांस न्यावी लागत.तिथे कोण कोणाचे प्रेतउचलणार, मुलेें आई-बापाची प्रेते टाकून पळत, आई-बाप मुलांची प्रेते सोडून पळत; कारण घरात प्रेत आहे असे कळताच सरकारी अधिकाऱ्यांच्या आडदाडं सोजिराशी गाठ पडे! घर शुद्ध करण्यासाठी म्हणून उध्वस्त करणार. सामानाची जाळपोळ, लुटालुट होणार आणि उरलेले कुटुंबचे कुटुंब वनवासात नेऊन“सेग्रिगेशन"च्या अटकेत पडणार. पण तिथेही प्लेग, घरी प्लेग, दारी प्लेग! दैवी प्लेग, राजकीय प्लेग, ती भयंकर वर्णने वाचताना अंगावर अगदी शहारे उठत."*


त्या काळचे सेग्रिगेशन म्हणजेच आजचं क्वारण्टाईन...


पुढे सावरकर लिहितात की 


*आमच्या कुटुंबावरंही प्लेगचे संकट शेवटी कोसळलेच*


एकेदिवशी आमच्या कुटुंबावरही ते प्लेगचे संकट कोसळलेच. थोरले बंधु श्रीबाबाराव नि जन्मदाते पिताश्री दोघेही प्लेगला बळी पडले. धाकटे भाऊही. पुढे ते सगळे दोन तीन महिन्यांत बरेही झाले. त्यापूर्वी नाशिकांतले त्यांचे एक सहकारी श्रीरामभाऊ दातार म्हणून होते, ज्यांना प्लेगची लागण होताच, स्वतः सावरकरांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबांला जीव धोक्यांत घालून सहकार्य केले होते. म्हणजेच इतरांसाठी आपला जीव संकटांत घालण्याची सावरकर कुटुंबाची परंपरा ही अशी होती.


मधील काळांत दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचे देहावसानही झाले. घरांवर आर्थिक संकटही कोसळले.


*नाशकांतले त्यांचे एक परिचित असे उपरोक्त श्रीरामभाऊ दातार हे ह्याची जाण ठेऊन पुढे सावरकर कुटुंबाच्या सहकार्यांस तर धाऊन आलेच पण सावरकरांनी स्वतः आता भीड मोडून नि योग्य ती काळजी घेऊन प्लेगने गांजलेल्या समाजासाठी काही कार्य करायचे ठरवले. या कामी त्यांनी त्यांच्या गुप्त संघटनेचे स्वयंसेवकांचे एक पथक बनविले. कारण या काळातंच सावरकरांनी एका गुप्त मंडळाची स्थापना त्यांचे मित्र श्री म्हसकर नि श्री पागे नि प्लेगमधून सुटून आलेले त्यांचे दोन बंधु यांच्या मदतीने केली होती.*


*मित्रमेळ्याची स्थापनाही यांच काळात.*


भविष्यांत जिने अभिनव भारत ह्या संघटनेचे स्वरुप धारण केले, ती मित्रमेळाही ह्याच काळांत स्थापिली गेली. आश्चर्य म्हणजे सावरकरांना मात्र प्लेगची लागण त्यांच्या सौभाग्याने झाली नाही. यद्यपि त्यांना देवी लागण येऊन गेली होती. अर्थात ते योग्य ती काळजी घेतंच होते. पुढे त्यांनी त्या स्वयंसेवकांच्या संघाच्या वतीने प्लेगनिवारणाचे कार्य आरंभ केले. ते लिहितात


*प्रेते जाळणारे स्वयंसेवक पथक*


*"पुढे कधीकधी असंभाव्य वाटणारी बाबांची (बाबाराव सावरकर) ही सहनक्षमता, परोपकारता, मनोधैर्य तेंव्हा देखील निरनिराळ्या स्वरुपांत का होईना पण मधूनमधून प्रकट होई. त्यात सन १९००व्या आणि १९०१व्यावर्षाच्या मध्यंतरी नाशकास प्लेगची वार्षिक फेरी पुन्हा एकदा आली. आह्मीं मंडळी आता प्लेगला अगदीनिढार्वलो होतो. प्लेग येताच पळापळ होणाच्या जागी आह्मीं गावातंच राहावे. इतकेच नव्हे, तरनिराश्रित अशा प्लेगच्या रोग्यांची शुश्रुषा स्वतः करून शेवटी त्यांची प्रेते स्वतः खांद्यावर वाहून न्यावी. या कामी पुढाकार म्हणजे बाबांचा (थोरल्या बंधुंचा) आणि रामभाऊ दातारांचा. स्मशानाच्या वाऱ्या रात्रीबेरात्री आह्मीं जीवाची चिंता सोडून इतक्यांदा केल्या, की स्मशानाचे भय असे न उरता ते एखाद्या गजबजलेल्याजगतातल्या चौकासारखे बैठकीचा अड्डा वाटावे."*


म्हणजे आज जसे काही जण कोरोना योद्धे म्हणून समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करून जीव संकटांत घालून सेवावृत्तीने लोकशुश्रुषेचे नि प्रसंगी प्रेत वहायचे काम करताहेत, तद्वतंच त्याकाळीही सावरकरांसारखे युवकही जणु 'प्लेग योद्धे' म्हणून समाजासाठी शुश्रेषेचे, प्रेत उचलायचे व ते जाळायचेही काम करत. एक स्वयंसेवक म्हणून हे कार्य करणं वाटतं तितकं सोप्पं नव्हे. कारण प्लेगची साथ इतकी भयानक होती की प्रेत उचलून नेणाराच दुसऱ्या दिवशी त्याच साथीने जायचा. म्हणून आजच्या कोरोना नामक वैश्विक संकटामध्ये सावरकरांचे हो निष्काम लोकसेवेचे उदाहरण अगदी वंदनीय ठरते...


ह्या समाजक्रांतिकारकांस त्यांच्या आजच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#स्वातंत्र्यवीर_सावरकर_प्लेग_मृत्यु_शव_कोरोना_स्वयंसेवक_समाजसेवक

No comments:

Post a Comment