Sunday 2 May 2021

मृत्युंजयाचा अंदमानविजय

 




मृदनन् मृत्स्नां पुनरपि पुनर्हस्तजानुप्रहारैः, 

चक्रभ्रान्ति-व्यवसितकरोऽताडयन् मुद्गरीभिः।

निक्षिप्याग्नावदहदनिशं चेन्धनैः कुम्भकारः, 

सोऽहं धन्यो यदुपकृतये जीवनं धारयामि।


२ मे, १९२१...


पंचवीस नि पंचवीस वर्षांची अशा दोन काळ्या पाण्याची ठोठविलेल्या शिक्षा सहन करण्यासाठी २७ वर्षांचा एक तरुण त्या अंदमान नामक मृत्युच्या दाढेत शिरला. बैरिस्टर झालेला प्रज्ञावंत युवक


त्वत्स्थंडिली ढकलली गृहवित्तमत्ता 


म्हणत त्या काळ्या पाण्याच्या प्राशनासाठी उद्युक्त झाला. रामायणकाली श्रीरामांस ज्याप्रमाणे वनवासामध्ये त्याच्या कनिष्ठ सौमित्राने क्षणन्क्षण सहवास केला, तद्वतंच

 

त्वत्स्थंडिली अतुलधैर्य वरिष्ठ बंधु, 

केला हविं परमकारुणपुण्यसिंधु 


म्हणत त्याचा ज्येष्ठ बंधुही तिथेच त्याच अंदमानात सहबंदीवान म्हणून काळ कंठित होता. ज्यांचे समग्र जीवन क्रांतिप्रवण होते नि ज्यांचे विचार क्रांतिगर्भ होते, अशा स्वातंत्र्यवीरांच्या ज्येष्ठ बंधुंच्या, त्यांच्या पाठी पित्यासमान असलेल्या एका अतुल धैर्य वरिष्ठ बंधुंच्या, ज्यांचं समग्र जीवनंच उपेक्षित अंधाऱ्या कारावासांत नि अप्रसिद्धीच्या गुहागुंफात संपून गेले, ज्यांचे जीवन म्हणजे अमूल्य रत्नांची खाणंच आहे नि ज्यांत उदात्त अन् उज्ज्वल प्रसंगांचे कोहिनूर ठासून भरलेले आहेत, ज्यांनी सोसलेल्या नरकयातना ह्या तात्यारावांइतक्याच, किंबहुना अधिक आहेत, ज्यांचे समग्र जीवन हिंदुराष्ट्राच्या नि हिंदुत्वाच्या नि हिंदुसमाजाच्या उत्कर्षासाठीच वाहिलेले होते, अनेक गुप्त क्रांतिकारी संघटनांचे जे उद्गाते नि अनेक तरुण क्रांतिकारकांचे जे मार्गदर्शक असे अंदमानदंडित क्रांतिवीर श्री गणेश दामोदर उपाख्य श्रीबाबाराव सावरकर...



ह्या दुष्टचक्रांतही तो वीर श्रीविनायक नि ते श्रीबाबाराव तिथल्या सहबंदिवानांस संघटित करत, त्यांना सुशिक्षित करत, त्यांच्यातला आत्मविश्वांस दृढ करत, त्यांची धर्मनिष्ठा बलिष्ठ करत, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत, त्यांच्यासाठी सहस्त्रो ग्रंथांचे ग्रंथालय निर्माण करत त्यांच्या बौद्धिक विकासांस हातभार लावत होतेच. पण इतकं करूनही तो महाकवी बालपणी पाहिलेलं आपलं महाकाव्याचे स्वप्न पूर्ण करण्यांस हाच काळ योग्य आहे म्हणून खिळ्यांच्या नि भिंतींच्या सहाय्याने आपले कमला, विरहोच्छवास, गोमांतक आदि हे दहा सहस्त्र ओळींचे काव्य निर्मीत होता. ह्या महाकवीच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेच्या आस्वादाचे चिंतन करण्यांस कुणी प्रतिभावंतांनेच पुढे व्हावं. आमची ती योग्यता नाही.

अंदमानाची ती कालकोठरी ही बंदिवानासाठी जणु मृत्युच ठरणारी होती. इतकं कार्य करूनही हा युवक आपल्या ज्येष्ठ बंधुसह त्या जन्मठेपेतून बाहेर आला. जणु तो मृत्युवर विजय प्राप्त करता झाला. मृत्युंजयाचा तो आत्मयज्ञ २ मे, १९२१ या दिवशी पूर्ण झाला तो एका नूतन प्रवासासाठी. अंदमानपर्वाची ती समाप्ती त्या दोन्हीं मृत्युंजयवीरांस दिगदिगांतांत कीर्ती प्रदान करतीं झाली.

ह्या दोन्हीं वीरांस अंदमानपर्वाच्या त्या समाप्तीच्या शतकमहोत्सवानिमित्त कोटी कोटी अभिवादन नि शिरसाष्टाङ्ग दंडवत...!


लेखाच्या आरंभी योजिलेल्या श्लोकाचा अर्थ


मातीला पुनः पुनः हातांच्या नि गुडघ्यांच्यां प्रहारांनी तथा चक्राच्या भ्रमणाने हात लाऊन कुंभाराने जणु आह्मांस प्रहार केला. तत्पश्चात अग्नीमध्ये आह्मांस निरंतर जाळलं. इतकी कठिणता सहन करून आह्मीं धन्य झालो. कारण ह्या परोपकाररुपी पिपासुंची पिपासा क्षमविण्यासाठी आह्मीं ह्या जीवनांस अर्थात जलांस धारण करत आहोत.


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#सावरकर_अंदमानपर्व_शताब्दी_महोत्सव_बाबाराव_काळेपाणी_क्रांतिवीर

No comments:

Post a Comment