Friday 14 May 2021

*भगवान भृगुनंदन श्रीपरशुराम आणि वेद*



अथर्ववेदाच्या पंचम कांडाच्या अठराव्या सूक्तामध्ये वेदविद्येच्या रक्षणाचा उपदेश केला आहे. ह्या संपूर्ण सूक्तामध्ये ब्राह्मण आणि राजन्य अर्थात क्षत्रियांच्या कर्तव्याचा उपदेश केला आहे. ब्राह्मण अर्थात ब्रह्म अर्थात वेदाध्ययन करणारे व अध्यापन करणारे जे आहेत व क्षतात् त्रायते इति क्षत्रियः, जे संकटापासून रक्षण करतात असे क्षत्रिय यांचे चिंतन करताना वेदमंत्रांनी जे काही प्रकट झाले ते भगवान श्रीभार्गवरामांच्या जयंतीदिनी पाहणं आवश्यक आहे. इथे राजन्य हा शब्द क्षत्रियांसाठीत योजिला आहे. कारण काही भारत विखंडन शक्ती राजन्य नि क्षत्रिय दोन्हीं वेगळे आहेत असे मांडण्याचा दुष्ट प्रयत्न करताहेत, आह्मीं मागेच त्यांचं षड्यंत्र हाणून पाडलं होते ही गोष्ट वेगळी. सावध रहावे ही विनंती. अस्तु।


भगवान श्रीभार्गवरामाचे वर्णन हे अग्रतश्चतुरो वेदाः असे केलं जातं. चारही वेद वेदाङ्गांसहित ज्यांच्या अग्रभागी आहेत, असे श्रीभार्गवराम. त्याचबरोबर पृष्ठतः सशरं धनुः म्हणजे ज्यांच्या पाठी शरासहित भाता आहे. असे ब्राह्मतेज नि क्षात्रतेज धारण करणारा हा अवतारश्रेष्ठ वेदमंत्रांच्या आधारे चिंतन करण्यांस युक्त आहे. वेदभगवान अशा क्षत्रिय नि ब्राह्मणाची मांडणी करताना म्हणतो की ब्राह्मण हा वेदतत्वाच्या आधारे चालणारा असेल तरंच तो महाप्रबल असतो. अन्यथा नाही. म्हणजे वेदाध्ययनहीन ब्राह्मण हा वेदांस मान्य नाही. 


*ओ३म् जि॒ह्वा ज्या भव॑ति॒ कुल्म॑लं॒ वाङ्ना॑डी॒का दन्ता॒स्तप॑सा॒भिदि॑ग्धाः। तेभि॑र्ब्र॒ह्मा वि॑ध्यति देवपी॒यून् हृ॑द्ब॒लैर्धनु॑र्भिर्दे॒वजू॑तैः ॥*


५।१८।८


*[ब्राह्मणाची] (जिह्वा) जीभ (ज्या) धनुष्याची प्रत्यंचा (असते), (वाक्) वाणी (कुल्मलम्) बाणाचा दंड (भवति) असते आणि [त्याची] (नाडीकाः) गळ्याचा भाग (तपसा) अग्नीने (अभिदिग्धाः) तापलेल्या (दन्ताः) बाणाच्या दातांसमान म्हणजे अग्रासमान असतो. (ब्रह्मा) ब्राह्मण (हृद्बलैः) हृदय तोडणाऱ्या (देवजूतैः) विद्वानांनी पाठविलेल्या (तेभिः) त्या (धनुर्भिः) धनुष्यांनी (देवपीयून्) विद्वानांस सतावणाऱ्यांस (विध्यति) छेदतो. ॥८॥*


हे अलंकारिक वर्णन भार्गवरामांस किती यथार्थ लागु होते.




पुढील मंत्रामध्ये तर आणखी बहारीचे वर्णन आहे. वेदभगवान म्हणतो...


*ओ३म् ती॒क्ष्णेष॑वो ब्राह्म॒णा हे॑ति॒मन्तो॒ यामस्य॑न्ति शर॒व्या॑३ न सा मृषा॑ । अ॑नु॒हाय॒ तप॑सा म॒न्युना॑ चो॒त दु॒रादव॑ भिन्दन्त्येनम् ॥*


अथर्ववेद - ५।१८।९


*(तीक्ष्णेषवः) तीक्ष्ण बाण असणारे, (हेतिमन्तः) वज्रासमान शस्त्र धारण करणारे (ब्राह्मणाः) ब्राह्मण लोक (याम्) ज्या (शरव्याम्) बाणांच्या समुहांस (अस्यन्ति) सोडतात, (सा) ती (मृषा) मिथ्या (न) नसते. (तपसा) तपाने (च)आणि (मन्युना) क्रोधाने (अनुहाय) पाठलाग करत (दूरात्) दुरूनंच (उत) ही (एनम्) ह्या वैरींस (अव भिन्दन्ति) छेदतात॥९॥*


म्हणजे इथे केवल तपानेच ब्राह्मण शत्रुंस पराभूत करतो हे सांगितलं आहे.


ह्या मंत्रांच्या आधीच्या मंत्रांमध्ये क्षत्रियाचे वर्णन असून तेही क्षात्रतेज अंगी धारण केलेल्या श्रीभार्गवरामांस लागु पडणारे आहेच. भगवान श्रीभार्गवरामांचे वर्णन करणारे अनेक श्लोक पुराणांतरी, रामायण-महाभारतीं असतील, पण ह्या वेदमंत्रांचे चिंतन पाहता इतके सुंदर वर्णन त्यांस लांगु होईल ह्यात काही संदेहंच नाही. 


*भगवान श्रीभार्गवरामांचे चरित्रचिंतन महाभारतादि ग्रंथांमधून पाहता त्यांच्या आजोबांस म्हणजे ऋचिकांस धनुर्वेद प्रत्यक्ष प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. तर यांच महाभारताच्या आरण्यकपर्वामध्ये प्रत्यक्ष धनुर्वेदंच श्रीजमदग्नींसमोर चार अस्त्रांच्या सह प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. अन्य ठिकाणी आहे. श्रीभीष्माचार्यांशी अंबेसंबंधी युद्ध करतानाही वर्णन आहे. संक्षेपांत धनुर्वेदाची किंवा विद्येची परंपरा श्रीभार्गवरामांस कशी प्राप्त झाली ते महाभारत सांगताना आपल्याला दिसते.*


*पण आश्चर्य म्हणजे परशुच्या विनियोगासंबंधी फारंच त्रोटक माहिती आहे. त्यामुळे शंकेस वाव आहे. अर्थात हा स्वतंत्र चिंतनाचा विषय असल्यामुळे हा विषय इथेच सोडतो...*


*अर्थात इथे जाता जाता सांगणं आवश्यक आहे की हे वर्णन केवल अलंकारिक म्हणून सांगितलं आहे. म्हणजे काही लोक ह्या वेदमंत्रांमध्येच श्रीभार्गवरामांचे वर्णन आहे असा कुतर्क करतील व वेदांमध्ये अवतारवाद शोधण्याचा किंवा इतिहास शोधण्याचा बालिशपणा करतील. हा प्रयत्न अर्थातंच लैदिक सिद्धांताना छेद देणारा असल्यामुळे आह्मीं त्यांचा संबंध भार्गवरामांशी जोडण्याचे कारण केवळ नि केवळ त्यांचे क्षात्रतेज नि ब्राह्मतेज दर्शविण्यासाठी जोडलेला आहे. कर्णपर्वात वर्णन आहे.*


कुणीही यावरून ह्या वेदमंत्रांमध्ये अवतारवाद शोधतील तर ते वडाची साल पिंपळाला जोडण्यासारखेचं होईल.


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।


भगवान श्रीभार्गवरामांस त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#भगवान_श्रीभार्गवराम_श्रीपरशुराम_भृगुनंदन_ब्राह्मणक्षत्रियराजन्य_महाभारत_परशु_धनुर्वेद

No comments:

Post a Comment