Monday 25 November 2019

नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ।




काल कार्तिक वद्य त्रयोदशी ! काल कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्रीज्ञानेश्वर महाराज ह्यांचा संजीवन समाधी सोहळा ! कार्तिक मास किती श्रेष्ठ ! कारण ह्याच मासात भक्तशिरोमणी संतश्रेष्ठ श्रीनामदेवरायांचीही जयंती व तीही कार्तिक शुद्ध एकादशीला ! श्रीनामदेवरायांचे चरित्र ते स्वत:च वर्णिताना म्हणतात

*माझें जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणें। लिहिलें त्याची खुण सारु ऐका । १।*
अधिक ब्याण्णव गणित अकराशतें । उगवता आदित्य रोहिणीसीं ।२।*
*शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार । प्रभव संवत्सर शालिवाहन शके ।३।*
*प्रसवली माता मज मळमूत्री । तेंव्हा जिव्हेवरी लिहीलें देवें ।४।*
*शत कोटी अभंग करील प्रतिज्ञा। नाम मंत्र खुणा वाचुनी पाहे ।५।*
*ऐंशी वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण । नामसंकीर्तन नामया वृद्धि ।६।*

साक्षात परमात्मा श्रीपंढरीशाला घास खाऊ घालणार्या श्रीनामदेवरायांचे चरित्र म्यां पामराने कसे नि काय वर्णावे??? आमचे भाग्य केवळ एवढेच की आमचे घर श्रीनामदेवरायांच्या मंदिराला चिकटूनच!

*जन्मोजन्मीं आम्ही बहु पुण्य केलें | म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ||१||*
*जन्मोनी संसारीं जाहलों त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगीं ||२||*
*आणिका दैवता नेघे माझे चित्त | गोड गाता गीत विठोबाचें ||३||*
*भ्रमर मकरंदा मधाशी ती माशी | तैसें या देवासी मन माझे ||४||*
*भानुदास म्हणे मज पंढरीसी न्या रे | सुखें मिरवा रे विठोबासी ||५|*

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांच्या सख्यत्वांस प्राप्त झालेले श्रीनामदेवराय, श्रीमहाराजांस संजीवन समाधीस नेणारे श्रीनामदेवराय ही ओळख पुरेशी नाही का? परमेश्वराशी प्रत्यक्ष संवाद असुनही श्रीज्ञानोबारायांच्या व श्रीगोरोबाकाकांच्या परिक्षेने गुरुप्राप्तींस निघालेले श्रीनामदेवराय श्रीविसोबांस पाहतात व योग्यतेने भारावून जातात. त्या आत्मस्थित श्रीगुरुंस शरण गेल्यावर श्रीविसोबा जो उपदेश करतात, तो काय बहारीचा आहे रहा !

*जरी म्हणसी देव देखिला ।तरी हा बोल भला नव्हे नाम्या ।१।*
*जोंवरी मी माझें न तुटे । तंव आत्माराम कैसेनि भेटे ।२ ।*
*खेंचर साह्याने मी काहीं नेणें । जीवा या जींव ईतुले मी जाणे ।३।*

एक अभंग तर कळता कळेना !

*दश चत्वार कराचा नव आननाचा । त्रिविंश नयनाचा द्विपुच्छ द्वैश्रृंगाचा ह्मणवी ईश तो तो सरोज शयनाचा ।१।*
*नाशापुट षोडश अठराचा ।करणीं नवांश शिरसीचा ।दहा पदें ही त्याला ।२।*
*कोण असाजी कथाजी सरसाचा । आंगुलांचा भुजा मुळु वदनाचा । उधानू नेत्राचा स्वामि माझा ।३।*
*पोकु वेडावले सेली बोभावले । अन्य थकित झाले । वर्णवेना ।४।*
*केवळ काठीं मुगुट धूर्जेटी । पाय तळवटी चरण ज्याचे ।५।*
*ढकार वदनाचा आला वर्णावया । जिव्हा चिरोनियां झाल्या दोन । ६।*
*अवारु जोडोनी करितो विनवणी । खेचर विसा चरणी विनटला ।७।*

हे दोघेही समकालीन !

*ह्या दोन पुरुषश्रेष्ठांनी त्या बाराव्या शतकात अध्यात्माचा आणि भक्तीचा डांगोरा कसा नि किती पिटविला असेल ह्याची केवळ कल्पनाच आपण करू शकतो ! इतर समकालीन संतांनीही ह्याच भक्तिरसात ह्या महाराष्ट्राला अक्षरशः न्हाउ घातले !*

आनंदगिरींच्या “गीताभाष्यात”एक सुंदर श्लोक आहे.

*आचार्याः सन्ति कुत्राप्यतिविमलधियो वेदशास्त्रागमानां ।* *दुष्प्रापस्तावदास्ते त्रिजगति नितरामात्मतत्वोपदेष्टाः ।*
*एवं सत्यर्जुनस्याद्भुतविकलवती वर्ण्यते किन्तु भाग्यं ।*
*यस्याचार्यस्य हेतोः स्वयमुपनिषदामर्थे आविर्भैभूव ।।६॥*
आनंदगिरी - गीताभाष्य

ज्याच्या कल्याणासाठी, ज्याच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष उपनिषदांचा अर्थच ज्याच्या समोर श्रीकृष्ण रूपाने प्रकट झाला, त्या अर्जुनाचे भाग्य काय वर्णावे ? तद्वतच ह्याच अर्जुनास केलेल्या उपदेशावर आपल्या अलौकिक आत्मप्रतिभेने “भावार्थ दीपिका” लिहिणाऱ्या श्रीज्ञानोबारायांचे भाग्य आज काय वर्णावे ?

*ते हे गोष्टी रम्य । अमृतधाराधर्म्य ।*
*करिती प्रतीति गम्य । ऐकोनि जे ॥*
ज्ञानेश्वरी - १२.२३० 

परमेश्वराचे चरित्र हे गावे तर संतांनीच. संत चरित्रे गावीत तीही संतांनीच ! कारण आमची शब्दप्रतिभा इथे अगदीच थिटी पडते.

*आमुते करावया गोठी । ते झालीच नाही वाग्सृष्टि ।*
*आम्हालागी दिठी । ते दिठीच नोहे ॥*
(अमृतानुभव)

परंतु योग्यता नसतानाही आम्ही संतचरित्रे गातो कारण

*तेणेंसी आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ।*
*परि तयाचें चरित्र । ऐकती जे ॥*
 ज्ञा. १२.२२६ ॥

*तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।*
*जे भक्तचरित्रातें । प्रशंसती ॥*
 ज्ञा. १२.२२७ ॥

श्रीज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा
ह्या सोहळ्याचे वर्णन केले ते श्रीनामदेवरायांनी ! त्यांचा अधिकार अर्थातच मोठा !  ज्ञानोबाराय समाधी घेणार ह्या विचारानेच सर्व महाराष्ट्र आळंदीत लोटला. अनेक संत आणि सत्पुरुष, ज्ञानी, योगी, सर्व सर्व आळंदीत लोटले. आणि का लोटू नये? अवघ्या बावीस वर्षातला एक श्रीज्ञानदेव समाधी घेतो आणि तेही संजीवन समाधी ?

*संतभक्त येऊनी थोर थोर । हरिनामाचा केला गजर ।*
*अहोरात्र दिवस चार । आळंदीक्षेत्र गजबजलें ॥ १ ॥*
*एकादशीसी गजर । नामदेवें केली कथा सुंदर ।*
*द्वादशीसी दोन प्रहर- । पर्यंत घडलें पारणें ॥ २ ॥*
*तेचि रात्री प्रासादिक । हरिदास कान्हु पाठक ।*
*कीर्तन करिती परम भाविक । श्रोते कथेसी रंगले ॥ ३ ॥*

आणि शेवटी तो दिवस उजाडला ! कार्तिक वद्य त्रयोदशी ! श्रीज्ञानोबारायांच्या समाधीस प्रत्यक्ष परमात्मा श्रीपंढरीश जगन्माता प्रकट झाला. होणारच ! निर्गुण निराकार अविनाशी परब्रह्म आपल्या ह्या परमभक्त श्रीज्ञानोबांसाठी सगुण साकार झाले ! इथे तर्क काहीच काम देत नाहीत. संशय तर नाहीच नाही. ज्ञानोबाराय स्वतःच म्हणतात

*म्हणउनि संशायाहुनि थोर ।*
*आणिक नाहीं पाप थोर ।*
*हा विनाशाची वागुर ।*
*प्राणियांची ।*

ज्ञानेश्वरी - ४.२०३ 

म्हणूनच श्रीतुकोबाराय म्हणतात

तुका म्हणे नाशी ।कुतर्क्याचे कपाळी ।
टाका तार्किकाचा संग । पांडुरंग नित्य स्मरा हो ।

मध्यान्ही सूर्य आला असताना श्रीपरमेश्वराच्या आज्ञेने श्रीज्ञानोबाराय आणि साक्षात परमात्मा श्रीपंढरीशाने त्यांस केशराचा मळवट आणि तोच सर्व शरीरास लाऊन त्यांस समाधीकडे नेले. गळ्यात तुळशीचा हार घातलेले ज्ञानोबाराय आत्मसुखात मग्न होते परंतु इतर सर्व मात्र ह्या महायोग्याच्या विरहाने व्याकूळ झाले होते. केवढे ते वय ? अवघे बावीस ? इतकेच काय तर योगाभ्यासाने ज्यांचे नेत्रकमळ, करद्वय, चरणद्वय आणि सर्वांगच योगतेजाने प्रफुल्लित झाले होते, ती दिव्य मूर्ती आता इथून पुढे नेत्रांस दृश्यमान होणारच नव्हती.

*देव निवृत्ति यांनी धरिले दोन्‍ही कर । जातो ज्ञानेश्‍वर समाधीसी ॥१॥*
*नदीचिया माशा घातले माजवण । तैसे जनवन कालवले ॥२॥*
*दाहीदिशा धुंद उदयास्‍तविण । तैसेचि गगन कालवले ॥३॥*
*जाऊनि ज्ञानेश्‍वर बैसले आसनावरी । पुढा ज्ञानेश्‍वरी ठेवियेली ॥४॥*
*ज्ञानदेव म्‍हणे सुखी केले देवा ।  पादपद्मी ठेवानिरंतर ॥५॥*
*तीन वेळा जेव्‍हा जोडिले करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेव ॥६॥*
*भीममुद्रा डोळा निरंजनी लीन । जालें ब्रम्‍हपूर्ण ज्ञानदेव ॥७॥*
*नामा म्‍हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्‍थ ॥८॥*

*शक १२१५, कार्तिक वद्य १३,  दुर्मुखनाम संवत्सर - आळंदी*

जगत्कलाण्यासाठी जीवन कृतार्थ केलेले सत्पुरुष आत्मस्थित परमात्म्याशी एकरूप असल्याने जन्म-मृत्यू बंधनाच्याही पलीकडे गेलेले असतात.

*यदविद्याविलासेन प्रपञ्चोयं प्रतीयते ।*
*तदविद्याविनाशे तु केवलं ब्रह्म जृम्भते ।*

अर्थ - *ज्या अविद्येच्या विलासाने(प्रभावाने) हा प्रपंच प्रतीत होतो, त्या अविद्येचा विनाश झाला असता केवळ ब्रह्मच अवशिष्ट राहते !*

अशा आत्मोपलब्धी श्रीज्ञानोबारायांना संजीवन समाधी घ्यावीशी वाटणार नाहीतर काय ? अर्थात त्यांच्या समाधीने इतरांवर मात्र विरहाचा डोंगरच कोसळला. स्वतः नामदेवरायांची अवस्था काय झाली असेल? म्हणूनच त्यांच्या समाधीवर २५० हून अधिक अभंग रचताना नामदेवराय उद्गारतात 

*ज्ञानदेवासाठी होतसे कासावीस नामदेव*

*मग प्रश्‍न आदरिला । नामा फुंदो जो लागला ।कागा ज्ञानेदवा गेला । मज सांडुनिया ॥१॥*
*कैसा होय तुझा दास । कैसा पाहो तुझी वास ।ज्ञानाकारणे कासावीस । जीव माझा होतसे ॥२॥*
*देव म्हणे नामयासी । तू झणी कासावीस होती ।तू रे तयाते नेणसी । ते कैसे आईक पा ॥३॥*
*ज्ञानदेव ज्ञानसागरु । ज्ञानदेव ज्ञानागरू ।ज्ञानदेव भवसिंधुतारू । प्रत्यक्ष रूपे पै असे ॥४॥*
*ज्ञानदेवी ज्ञानगम्य । ज्ञानदेवी ज्ञानधर्म्य ।ज्ञानदेवी ज्ञाननेम । सर्वथैव पै असे ॥५॥*
*ज्ञानदेवी हाचि देव । ज्ञानदेवी धरीयला भाव ।ज्ञान होईल जीवा सर्व । यासी संदेह नाही ॥६॥*
*ज्ञानदेवी धरीता ध्यान । ध्याता होय समाधान ।जीवी शीवी परिपुर्ण । एके रात्री किर्तन केलीया ॥७॥*
*झणे तू व्याकूळ होसी चित्ते । मनी आठवी गा माते ।नामस्मरणे एकाचित्ते । रामकृष्ण गोविंद ॥८॥*
*नामा म्हणे तू समर्थ होसी । अर्जुनी प्रीती करिसी ।हे सांगीतले व्यासी । एकादशाध्यायी ॥९॥*
*तैस पावे तू विश्वेशा । विश्वरुपा जगन्निवासा ।मी होतसे कासाविसा । ज्ञानदेवाकारणे ॥१०॥*
*तरी तू गा युगानयुगी असशी भक्ताचिंया संगी ।आम्ही विनटलो पांडुरंगी । रंगारंगी विठ्ठली ॥११॥*
*एक वेळ माझा शोक । दुरी जाय हरे विख ।ते करी निर्विशेष । नामा येतसे काकुळती ॥१२॥*

*आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर ।नाहीं आता थार विश्रांतीसी  ।*

श्रीज्ञानोबारायानंतर त्यांच्या इतर भावंडांनी पण समाधी घेतली. नामदेवरायांनी ह्या सर्वांचे वर्णन करताना म्हटले

*गेले दिगंबर ईश्वरविभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥ १ ॥*
*वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानीं । आतां ऐसे कोणी होणें नाहीं ॥ २ ॥*
*सांगतील ज्ञान म्हणतील खूण' । नयेची साधन निवृत्तीचें ॥ ३ ॥*
*परब्रह्म डोळां दाऊं ऐसे म्हणती' । कोणा न ये युक्ति ज्ञानोबाची ॥ ४ ॥*
*करतील अर्थ, सांगतील परमार्थ' । न ये पा एकांत सोपानाचा ॥ ५ ॥*
*नामा म्हणे देवा सांगूनियां कांही । न ये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥ ६ ॥*
*पूर्वी अनंत भक्त जाहले । पुढेंही भविष्य बोलिलें । परी निवृत्ति-ज्ञानदेवें सोडविलें । अपार जीवजंतु ॥ ७ ॥*
*ऐसे ज्ञानेश्वर माहात्म्य अगाध । कथा ऐकतां होईल बाध । तैसाचि उपजेल परमानंद । पातकें हरतील सर्वथा ॥ ८ ॥*

आता कोण उरलेच नाही आम्हांस उपदेश करायला ? आम्ही ऐकायचे तरी कुणाचे ?
काय लिहावे ? शब्दच संपले !

ह्या संजीवन समाधी दिनानिमित्त कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्रीज्ञानोबारायांस आणि भक्तशिरोमणी संतश्रेष्ठ श्रीनामदेवरायांस आणि इतर सर्व संतांस विनम्र प्रणाम !!!

शिरसाष्टांग दंडवत ।

#पाखण्ड_खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#संतश्रेष्ठ_श्रीज्ञानोबाराय_संजीवन_समाधीसोहळा_श्रीनामदेवराय_आळंदी

No comments:

Post a Comment