Saturday 9 November 2019

संकल्प श्रीवाल्मीकि रामायणाच्या अध्ययनाचा!






*यावत्स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महितले।*
*तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति।*
बालकांड - २।३६-३७

आज श्रीराममंदिराचा निर्णय झाला. आपल्या सर्व हिंदुंची मनोकामना पूर्ण झाली. त्या आनंदाने एक श्रीरामभक्त म्हणून नि हिंदु म्हणून श्रीरामचंद्राचे प्रामाणिक चरित्र असे महर्षि श्रीवाल्मीकिरचित रामायण अभ्यासण्याचा संकल्प आपण सर्व हिंदुंनी करण्यांस कोणताही प्रत्यवाय नाही.

रामायण वाचावे तर महर्षि श्रीवाल्मीकिंचेच ह्यात संदेहच नाही. अन्य कुणाचेही रामायण वाल्मीकिंच्या अनुकूल तितकेच प्रमाण मानावं हाही एक शास्त्रमान्य सिद्धांत आहे. त्यामुळे वाल्मीकि रामायणाचा अभ्यास म्हणजे नेमकं काय ह्याचा विचार करणे प्रस्तुत लेखाचा विषय आहे.

श्रीवाल्मीकि रामायणाची रचना

*चतुर्विंशति सहस्त्राणि श्लोकानामुक्तवान् ऋषिः।*
*ततः सर्गशतान् पञ्च षट् काण्डानि तथोत्तरम्।*
बालकाण्ड - ४।२

ह्या श्लोकानुसार रामायणांत २४,००० श्लोक असायला हवेत व पाचशे सर्ग व सहा काण्ड हवेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड अशी सहा कांड रचना हवी.

पण पण पण...

सांप्रत रामायणाच्या कुठल्याही प्रतीत सात कांड आढळतात, २५,००० हून अधिक श्लोक आढळतात व ६५८च्या समीप सर्ग आढळतात.

ह्यावरूनंच वाल्मीकि रामायणांत मधील काळांत प्रचंड प्रक्षेप झालेले आहेत हे सिद्ध आहे. अर्थात ज्याला सत्य स्वीकारायची मानसिकता आहे, त्यालाच हे कळेल.

*व्याकरणशास्त्र दृष्ट्या रामायणाची समीक्षा*

महर्षि वाल्मीकिंनी अनुष्टुप छंदामध्ये रामायणाची रचना केलीय. सांप्रतच्या रामायणाच्या कोणत्याही प्रतींत शेकडो श्लोक असे आहेत की जे अनुष्टुप छंदाचे नियमंच पाळत नाहीत. असे सर्व श्लोक प्रक्षिप्त समजावेत असे ज्यांची जन्मशताब्दी ह्यावर्षी आहे असे नागपूरचे महामहोपाध्याय श्रीबाळशास्त्री हरदास त्यांच्या 'रामायण नि महाभारतकालीन राज्यव्यवस्था' ह्या ग्रंथांत म्हणतात. त्यांची ही भूमिका अत्यंत मान्य होण्यासारखी आहे.

ह्यात उत्तरकांडही सातवे कांड म्हणून जोडलं गेलंय. उपरोक्त श्लोकातल्या उत्तर शब्दावरून उत्तरकांडाचा बोध घेणं व्याकरणशास्त्रांसही धरून होत नाही. ह्यावरूनंच मूळ वाल्मीकि रामायणांत सहाच कांड अर्थात युद्धकांड इथपर्यंतंच रामायण होते हे सिद्ध होते. एरवी प्रक्षेप शब्द उच्चारला की ईंगळी डसल्याचा अनुभव करणार्या काही सनातनी विद्वानांनी मात्र हा उपरोक्त श्लोकही प्रक्षेप ठरविण्याचा अट्टाहास केला आहे. उत्तरकांड प्रक्षिप्त आहे की नाही ह्यावर अत्यंत विस्ताराने चिंतन अपेक्षित आहे. हे एका लेखाचं किंवा लेखमालेचं किंवा एका ग्रंथाचंही काम नाही. ह्यावर खंडच्या खंड लिहिता येतील इतका विस्ताराचा विषय असल्याने आणि त्यासाठी काळही तितकाच हवा असल्याने भविष्यांसाठी हा विषय इथेच सोडतो...

वाल्मीकि रामायणाचे भारतात सांप्रत चार पाठ प्रचलित आहेत. पश्चिमोत्तर शाखा, वंग शाखा गोरेशियाचे संस्करण (Gorresio's edition), दाक्षिणात्य संस्करण (कुम्भकोणम् संस्करण) आणि उत्तर भारताचे (काश्मीरि) संस्करण. यात दाक्षिणात्य तथा औदिच्य संस्करण एकजुळते असून अगदी नाममात्राचाही फरक नाही. पश्चिम-पूर्व संस्करणामध्ये अध्यायांचे अंतर व श्लोकांचेही आहे पण त्यावर कोणतीही संस्कृत टीका मिळत नाही. वंग शाखेवर केवळ एकमात्र (लोकनाथ रचित मनोरमा) टीका मिळते. म्हणून दाक्षिणात्य संस्करणाचाच (म्हणजे औदिच्य) सर्वत्र प्रचार आणि प्रामाण्य मानलं जातं. ते मानावं की नाही हा विषय वादाचा आहे.

*श्रीवाल्मीकि रामायणावरील आतापर्यंतचं प्रमुख संस्कृत भाष्य किंवा संस्कृत टीका*

वाल्मीकि रामायणावर ज्या तीन प्रमुख संस्कृत टीका आजपर्यंत झाल्या आहेत त्यात.

१. राम ह्या भाष्यकाराने केलेली तिलक टीका
२. शिवसहाय ह्याने केलेली रामायण शिरोमणी
३. गोविंदराज ह्याची भूषण ही टीका

ह्यापेक्षा अधिक आहेतंच पण मूळ अध्ययनाच्या दृष्टीने प्रमाण मानाव्यांत अशातल्या ह्या तीन प्रमुख आहेत.

गत काही वर्षांत श्रीमद्वाल्मीकि रामायणाच्या ह्या अध्ययनाच्या दृष्टीने आमच्या पाहण्यात आलेले काही निम्नलिखित ग्रंथ

१. वाल्मीकि रामायणावरील उपरोक्त तीन संस्कृत टीका
२. १९६० मध्ये बडौद्याच्या सयाजीराव गायकवाड प्राच्यविद्या संशोधन केंद्राने २००हून अधिक अशा विविध भाषांतल्या नि विविध लिपींतल्या प्रतींचे चिकीत्सक अध्ययन करून प्रकाशित केलेली वाल्मीकि रामायणाची सप्तखंडात्मक चिकीत्सक प्रत - संपादक - जी एच भट्ट (Critical Edition of Valmiki Ramayana)
३. गौरेशियाचे अर्थात वंगशाखीय वाल्मीकि रामायण
४. पश्चिमोत्तर वाल्मीकि रामायण - पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कॉलर व विश्वबंधु व राम लभय्या ह्यांनी दयानंद एंग्लो-वैदिक महाविद्यालयीन मालिकेतून प्रकाशित केलेलं (North-Western Recension)
५. गीताप्रेस गोरखपूरने प्रकाशित केलेली वाल्मीकि रामायणाची द्विखंडात्मक संस्कृत हिंदी प्रत
६. वेदमहर्षि श्रीपाद दामोदर सातवळेकर ह्यांनी दहा खंडात प्रकाशित केलेली संस्कृत मराठी प्रत - समालोचना सहित
७. वैदिक विद्वान वाईचे कृष्णशास्त्री लेले उपाख्य महाराष्ट्रीय नावाचे ह्यांनी केलेले संस्कृत मराठी भाषांतर व समालोचनाचे खंड
८. चतुर्वेदी द्वारिकाप्रसाद शर्मा कृत वाल्मीकि रामायण समग्र संस्कृत हिंदी भाष्य
९. विदर्भ मराठवाडा बुक एंड कंपनीने प्रकाशित केलेलं पंचखंडात्मक संस्कृत मराठी भाष्य व समालोचना

उपरोक्त सर्व साहित्य सुदैवाने पीडीएफही आहे. त्यातलं शेवटचं विदर्भचे मात्र टंकलिखित आहे.

उपरोक्त सूची आमच्या अल्पाध्ययनांस प्राप्त झालेली आहे. ह्यापेक्षाही अधिक चिकीत्सक नि अभ्यसनीय प्रती कुणाच्या पाहण्यांत असतील तर त्या आमच्या निदर्शनांस आणून द्याव्यांत ही नम्रतेची विनंती.

आम्ही चिकीत्सक अभ्यासाच्या दृष्टीनेच हा लेख लिहिला असून हिंदुंनी निदान एक तरी प्रत अभ्यासासाठी उद्युक्त व्हावं हीच प्रामाणिक इच्छा आहे.

संभव झाल्यांस रामायणाच्या दोन सर्गांचे तरी प्रत्यही अध्ययन करावं. ज्याने वर्षभरांत संपूर्ण रामायण अर्थासहित अभ्यासून पूर्ण होईल.

हा संकल्प ज्यांना घ्यायचाय त्यांनी अवश्य घ्यावा.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्राच्या चरणी कृतानेक साष्टांग दंडवत!

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#वाल्मीकिरामायण_अध्ययन_प्रक्षेपानुसंधान_श्रीराममंदिर_सातवळेकर_संस्कृत_गीताप्रेस_वैदिकधर्म

No comments:

Post a Comment