Tuesday 31 October 2023

मी महर्षि श्रीमद्दयानंदांना का मानतो???

 


कालच्या ३० ऑक्टोंबरच्या आंग्ल दिनांकाने पुण्यस्मरणानिमित्त (तिथीने दीपावली अमावस्या)

भगवान श्रीरामकृष्णादि अवतार परंपरा, भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यादि आचार्यश्रेष्ठ, श्रीज्ञानोबा-तुकोबादि संतपरंपरा इतक्या उज्ज्वल परंपरा असताना श्रीदयानंद नामक कुणीतरी नवीन आर्यसमाजी मत प्रस्थापित करणाऱ्याच्या भजनी लागायचं काय कारण असावं? तारुण्यात मनुष्याला बऱ्याच वेळा काहीतरी नवीन किंवा वेगळं अशाचं आकर्षण असतं, अशा तारुण्यसुलभ भावनेने आह्मीं महर्षि श्रीदयानंदांचे अनुयायी आहोत काय ??

ज्या श्रीदयानंदांनी वेदांकडे चला म्हणत निम्नलिखित सर्व मते ही वेदविरुद्ध आहेत असे म्हणत हिंदुंची विग्रहपूजा अर्थात मूर्तीपुजा नाकारली, अवतारवाद नाकारला, वैदिक यज्ञांमध्ये पशुहिंसा किंवा बळीप्रथा नाकारली, कपाळावर गंध, माळा आदि कर्मकांड नाकारलं, अस्पृश्यता नाकारली, जन्मजात वर्णव्यवस्था नाकारत ती गुणकर्माधिष्ठित मांडली, फलज्योतिष नाकारलं, संतपरंपरा काहीअंशी नाकारल्या, श्रीमद्भागवतादि पुराणे नाकारली, गंगादि नद्यांचे तीर्थत्व नाकारलं, मध्ययुगीन स्मृत्या नाकारल्या, वेदविरुद्ध प्रक्षेपांच्या नावाने त्यांच्या सैद्धांतिक बैठकीनुसार ते नाकारलं, धर्मसिंधु-निर्णयसिंधु-तर्कसंग्रह-सिद्धांतकौमुदि आदि ग्रंथ अनार्ष म्हणून जितके वेदविरुद्ध तितके नाकारले, एवढा सर्व प्रचलित 'सनातन धर्म' नाकारत एक वेगळीच चूल मांडायचा घाट घातला ते श्रीदयानंद आह्मांला इतके प्रिय कसे???

सायण-महीधरादि आधीचे सर्व वेदभाष्यकार काहीअंशी चुकीचे व मीच तेवढा खरा वेदार्थ जाणणारा ही भावना बाळगणारे किंवा तसे मांडणारे श्रीदयानंद आह्मांस इतके प्रिय कसे???

जे काही प्रचलित आहे ते सर्व वेदविरुद्ध आहे व मी सांगतोय तेच खरं वेदसंमत ही श्रीदयानंदांची साहित्यातून दिसणारी वृत्ती कितपत स्वीकारार्ह्य आहे???

हे सर्व काम त्यांनी ब्रिटीशांच्या प्रभावाने केलं आहे काय?खरंच श्रीदयानंद काहीतरी वेगळीच चुल मांडणारे आहेत काय? आधीच्या बव्हतांश परंपरा व प्रचलित सनातन धर्म नाकारण्यांत श्रीदयानंदांचा खरंच काही दुष्ट हेतु होता का???

कालच्या श्रीदयानंदांच्या आंग्लदिनांकाने पुण्यतिथीनिमित्त या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न हा पूर्वीही खरंतर आमच्या दीडदोन तासाच्या फेबुलाईव्हमध्ये आह्मीं मागेच केला आहे, तरीही पुनः संक्षेपांत विवरण करणं आवश्यक असल्याने हा लेखनप्रपंच...!

मूळात श्रीदयानंद स्वीकारणे म्हणजे आधीच्या सर्व परंपरा नाकारणे असा अर्थ होतंच नाही, त्यामुळे हा भ्रम आधी दूर करणे आवश्यक आहे.

श्रीदयानंदांचा सत्यार्थ प्रकाश हा अजरामर ग्रंथ वाचताना आरंभी आरंभी हे जाणवतं की हा माणुस खरंच आपल्या सर्वच परंपरा नाकारतोय आणि तेही वेदांच्या नावाखाली??? म्हणजे आधीचे सर्व वेडे व हाच एकटा शहाणा? हे कितपत स्वीकारार्ह्य आहे याच प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न...

श्रीदयानंदांचं म्हणणं इतकंच होते की धर्माधर्माचा निर्णय करताना वेदांच्या चार संहिता याच सर्वोच्च प्रमाण आहेत ही प्रत्यक्ष मनुमहाराजांची आज्ञा आहे, त्यामुळे त्याच्या जे अनुकूल तेच ग्राह्य व जे प्रतिकुल ते अग्राह्य ही त्यांची भूमिका होती. ही भूमिका वरवरपाहता अनाठायी वाटत असली तरी श्रीदयानंदांनी तिच्या पुष्ट्यर्थ प्रत्येक ठिकाणी तर्कशुद्ध प्रमाण सादर करूनच आपल्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. आज उपलब्ध असलेला प्रचलित सनातन धर्म हा मूळ वैदिक सिद्धांतापासून बराच दूर गेला आहे हे त्यांचे निरीक्षण, जे आह्मांसही मान्य आहेच, ते त्यांनी अनेक प्रमाण प्रस्तुत करून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांची मते मांडताना व आधीची नाकारताना त्यांनी स्वतः एक कटाक्ष ठेवलेला आहे तो असा की

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।

कुठल्याही महापुरुषाचे वचन हे युक्तीने ग्रहण करावं, केवळ त्याच्या मोठेपणाकडे पाहून नव्हे.

तापाच्छेदाच्च निकषात् सुवर्णमिव पण्डितैः।
परीक्ष्य मद्वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।
भास्कराचार्य

सोनं ज्याप्रमाणे तावून सुलाखून तपासून स्वीकारलं जातं तद्वतंच माझी वचनेही चिकीत्सेने तपासूनंच स्वीकारावीत, केवळ माझ्या मोठेपणाकडे, पांडित्याकडे पाहून नव्हे..





हा विवेक हिंदुंना पूर्वी जो होता तो मधील काळात लुप्त झाला, जो महर्षि श्रीदयानंदांनी पुनः प्राप्त करून दिला. महर्षि स्वतः म्हणतात की

"बन्धु, हमारा कोई स्वतंत्र मत नही हैं| मैं तो वेद के अधीन हूं और हमारे भारत में पच्चीस कोटी आर्य हैं| कई कई बात में किसी किसी में कुछ कुछ भेद हैं, सो विचार करने से आप ही छूट जायेगा| मैं एक संन्यासी हूँ और मेरा कर्तव्य यही है कि जो आप लोगों का अन्न खाता हूँ इसके पर्यायमें जो सत्य समझता हूँ उसका निर्भयता से उपदेश करता हूँ| मैं कुछ कीर्तिका रागी नहीं हूँ| चाहे कोई मेरे स्तुति करें व निन्दा करें, मैं अपना कर्तव्य समझके धर्म बोध करता हूँ| कोई चाहे माने वा न माने, इसमे मेरी कोई हानि लाभ नहीं हैं|"

आज हिंदुस्थानात आपण अनेक मतमतांतरे, संप्रदाय, पंथ पाहतो. अशा परिस्थितीत वेदांनाच सर्वोच्च प्रमाण माना म्हणणारं आपलं हे मत पुढे जाऊन आपली ही आर्यसमाजाची विचारधाराच एक स्वतंत्र पंथ किंवा मत किंवा संप्रदाय बनेल ह्याची भीती‌ प्रकट करताना सर्वांना सावध करताना युगद्रष्टे महर्षि श्रीमद्दयानंद स्पष्टपणे म्हणतात...

"..और मै सर्वज्ञ भी नही हूँ| इससे यदि कोई मेरी गलती आगे पाई जाय, युक्तिपूर्वक परीक्षा करके इसी को भी सुधार लेना| यदि ऐसा न करोगे तो आगे यह भी(आर्य्य समाज विचारधारा) एक मत हो जायेगा और इसी प्रकार से 'बाबा वाक्यं प्रमाणं' करके इस भारत में नाना प्रकार के मत मतान्तर प्रचलित होके, भीतर भीतर दुराग्रह के रख के लढके नाना प्रकार की सद्विद्या का नाश करके यह भारत वर्ष दुर्दशा को प्राप्त हुआ हैं| इसमे यह भी एक मत (आर्य समाजका) का बढ़ेगा| मेरा अभिप्राय तो हैं कि इस भारत वर्ष मे नाना प्रकार के मतमतान्तर प्रचलित हैं वो भी, ये सब वेदों को मानते हैं इससे वेदशास्त्र रुपी समुद्र में यह सब नदी नाव पुन: मिला देने से धर्म ऐक्यता होगी| और धर्म ऐक्यता से सांसारिक और व्यावहारिक सुधारणा होगी और इससे कला कौशल आदि सब अभीष्ट सुधार होके मनुष्य मात्र का जीवन सफल होके अन्त में अपना धर्म बल से अर्थ, काम और मोक्ष मिल सकता है|"

महर्षी स्वत: म्हणताहेत की त्यांच्या प्रत्येक मताची चिकित्सा करावी व मगच ते स्वीकारावे. केवळ ते म्हणताहेत म्हणून नव्हे. जर त्यांचे मत कुठे चुकीचं आहे असे दिसत असेल, प्रमाणांनी, अनुभवाने चुकीचं सिद्ध होत असेल, तर ते सुधरावे...

याउलट आमचंच मत सर्वोच्च आहे, मी सर्वज्ञ आहे, याचा अमुक अवतार आहे, त्याचा तमुक अवतार आहे, इतर सर्व मते तुच्छ आहेत, केवळ आमच्याच मार्गाने या तरंच तुमचं कल्याण होईल ही भावना बाळगणारी व पेरणारी संप्रदायाभिनिवेशी, पंथाभिमानी, मिथ्या दुराग्रह बाळगणारी मतमतांतरे कुठे नि महर्षि श्रीमद्दयानंद कोठे???

इतकी स्वच्छ, तर्कशुद्ध, विवेकी नि समन्वयात्मक भुमिका ठेवणारे श्रीमद्दयानंद आह्मांस नकोसे वाटतात, ह्यापेक्षा आमची शोकांतिका कोणती आहे?? याचा अर्थ असा नव्हे की आपण आधीपासुन पाळत असलेल्या परंपरा सोडून द्याव्यांत. मूळीच नाही. पण विचार करून जे योग्य ते ठेवावं व वाईट ते‌ सोडावं इतकंच...

जाता जाता हे सांगणं आवश्यक आहे की श्रीदयानंदांच्या सत्यार्थ प्रकाश व ऋग्वेदादिभाष्यभूमिका या दोन ग्रंथांची म्हणजेच त्यांच्या मन्तव्याची जितकी खंडणं आजपावेतो उपलब्ध आहेत, तितकी खचितंच अन्य कुठल्या ग्रंथाची कुणी करायचा प्रयत्न केला असावा आणि त्या खंडनांना पुन्हा आर्यविद्वानांकडून दिली गेलेली मंडनात्मक उत्तरेही आहेत, तीही सर्व पठनीय आहेत. सांगायचं तात्पर्य इतकंच की आंधळेपणाने कुणाचंही मत स्वीकारु नयेच हाच आदर्श वस्तुपाठ आहे...



३० ऑक्टोबर, १८८३ या दिवशी विषप्रयोगाने देह त्यागाची वेळ आली त्याच्या काही दिवस आधीच आपली भूमिका या वीतरागी संन्याशाने मांडताना लिहिलं होते की

''मी मेल्यानंतर माझ्या अस्थी कुणालाही न सांगता नदीमध्ये किंवा अज्ञात स्थळी पुराव्यात, अन्यथा काही लोक माझ्याविषयीच्या भोळ्या भक्तीतून त्याची समाधी बनवतील व वेद व ईश्वर सोडून मलाच पूजत बसतील.''

वेदांनुसार संन्याशाचा देहही जाळायलाच हवा, त्याला पुरणं किंवा नदीत विसर्जित करणे हे वेदविरुद्ध आहे, म्हणून श्रीदयानंदांचा देह जाळण्यात आला होता. यावर सविस्तर येईन कधीतरी.

एकीकडे मी गेल्यानंतर माझी समाधी इथेच अमुकतमुक ठिकाणी मांडा असे म्हणणारे आहेत तर दुसरीकडे इतकी निर्गर्वी, निःस्पृह, निरलस, निःस्वार्थ, निर्मम, निर्लेप, शुद्ध भूमिका मांडणाऱ्या विद्वानाला आपण एकदा तरी अभ्यासणं योग्य नव्हे काय??? याला काही अपवाद मीही मानतो, तो वेगळा विषय. 

सर्वांना एक नम्रतेची विनंती की आयुष्यांत एकदा तरी महर्षींचे निम्नलिखित दोन ग्रंथ तरी अवश्य अभ्यासावेत...

१. सत्यार्थ प्रकाश - सत्यनिष्ठ वैदिक मत कोणते हे मांडणारी अमर ग्रंथसंपदा
२. ऋग्वेदादिभाष्यभूमिका -‌ वेदांकडे कसं पहावं, वेदांचे सत्यनिष्ठ स्वरुप नेमकं काय याविषयीची विस्तृत भूमिका

हे दोन्ही ग्रंथ‌ मराठीतून उपलब्ध आहेत...

पीडीएफ धागे

१.https://archive.org/download/in.ernet.dli.2015.484671/2015.484671.Satyarthprakash.pdf

२. https://archive.org/details/foqe_vaidik-dharm-swarup-of-dayanand-saraswati-translation-by-shridas-vidyarthi-1933-

वाचकांनी स्वत: निर्णय घ्यावा...

वेदांकडे वळावे हीच नम्रतेची विनंती...

भवदीय...

#महर्षिदयानंदसरस्वती_पुण्यतिथी_आर्य्यसमाज_वैदिकसिद्धांत_हिंदुधर्म_मतमतांतरे_संप्रदाय_पंथ



No comments:

Post a Comment