Wednesday 25 September 2019

*स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक गुण आहेत - इति मनुस्मृती*



महाराजा मनुंनी केलेली स्त्री-प्रशंसा

हा श्लोक वर्तमान मनुस्मृतीमध्ये कोणत्याही संस्करणामध्ये उपलब्ध नाहीये. मधील काळात तो हटलाही असेल. कारण मनुस्मृतीचे ९व्या शतकांतलं मेधातिथीचे भाष्य १२व्या शतकापर्यंत नष्ट झालं होते हे कुल्लुकभट्टाच्या भाष्यांत आपणांस उल्लेख प्राप्त होतोच. इतरही संदर्भ आहेतंच. परंतु प्रसिद्ध ज्योतिर्विद श्रीवराहमिहीरांनी त्यांच्या संहितेमध्ये हा श्लोक मनुमहाराजांचा म्हणून नोंद केली आहे. पहा.

*प्रब्रूत सत्यं कतरोङ्गानानां दोषोस्ति यो नाचरितो मनुष्यै:।*
*धाष्टर्येन पुम्भि: प्रमदा निरस्ता गुणाधिकास्ता मनुनात्र चोक्तम्।।*

वराही संहिता अध्याय ७४, श्लोक ६वा

अर्थ - *जर आपण विरक्त (निष्पक्ष) आहात तर सांगा की स्त्रियांमध्ये असे कोणते दोष आहेत, जे पुरुषांनी पूर्वी केले नसतील. अर्थात् सर्व दोष पुरुषांमध्ये पूर्वीच होते. पुरुषांनी धृष्टतेने स्त्रींस जिंकलंय, वास्तवांत पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक गुण आहेत असे मनु महाराजांनीच म्हटलंय..*

*मनुनात्र उक्तम्।*

धर्मशास्त्राचे प्रमुख आचार्य श्रीमनुमहाराजांनी हे विधान स्त्रियांविषयी केलंय असे श्रीवराहमिहीर सांगताहेत.

हा बृहत्संहितेचा संपूर्ण ७४वा अध्याय स्त्रीस्तुतीने भरलेला आहे. आता एवढ्यावरून पुरुषांनी मनु महाराजांना किंवा वराहमिहीरांस पुरुषद्वेष्टा म्हणावं का ? नाही ना. मग उगाचच विरोधाला विरोध का???

*स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक गुण आहेत हे मनुमहाराज सांगताहेत ह्यापेक्षा अधिक स्पष्टीकरण त्यांच्या निःपक्षपातीपणाचे काय आहे?*

*आता मग स्त्रीनिंदा करणार्या वाईट श्लोकांचे काय???*

काही जण विचारतील की मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयी गौरवोद्गार काढणारे अनेक श्लोक जसे आहेत किंवा पूर्वी असायचे तसे दुसरीकडे काही ठिकाणी त्यांची निंदा करणारे आक्षेपार्ह श्लोकही आज विद्यमान आहेतंच.

इतका परस्परविरोध एकाच ग्रंथांत कसा काय असु शकतो?

*मनुमहाराजांच्या नावाने त्यांना स्त्रीद्वेष्टा म्हणून चोवीस तास बेंबीच्या देठापासून बोंबलणारे जशी ही गोष्ट लक्षांत घेत नाहीत किंवा घेऊ इच्छितही नाहीत, तद्वतंच मनुस्मृतीत काहीच दोष नाहीत किंवा ती अगदी निर्दोष आहे किंवा तिच्यात काहीच प्रक्षेप विक्षेप झालेले नाहीत असे मानणारे आमचे कथित सनातनी परंपरेचे अंधाभिमानी विद्वान नि धर्मपंडितही ही गोष्ट लक्ष्यीं घेत नाहीत ही शोकांतिका नव्हे तर काय???*

हा मनुमहाराजांवरचा घोर अन्याय नव्हे काय ???

*ज्यांनी मनुस्मृती कोणताही पूर्वग्रहदोष न ठेवता अत्यंत चिकीत्सकपणे नि सुक्ष्मदृष्टीने किंवा अगदी वरवर व्यवस्थित शब्दशः वाचलीय, त्यांना हे कळेलंच की तींत अनेकठिकाणी अनेकविषयांत परस्परविरोध आहे. हा विरोध का आहे त्याची संपूर्ण समीक्षा किंवा कारणमीमांसा करण्याचे हे स्थान नव्हेच. ते भविष्यांत करुच. अनेक विद्वानांनी ते पूर्वी केलंच आहे. पण ज्यांना हे पहायची इच्छाच नाही त्यांची गोष्ट काय करावी म्हणा??? मग ते कुठल्याही विचारधारेचे, संप्रदायाचे, परंपरेचे, मानसिकतेचे असोत. कुठल्याही.*

सर्वांनाच विनंती आहे की वरहामिहीरांच्या ह्या श्लोकासंबंधी तुमचं काय म्हणणं आहे? उपरोक्त श्लोकावरून मनुमहाराजांच्या मनांत स्त्रियांविषयी किती आदर होता हे दिसून येते. ह्यापूर्वीही आमच्या लेखांत आम्ही लिहिलंय की वेदांच्या चार संहिता घनपाठादि अष्टधा विकृतीने संरक्षित असल्याने त्या सोडून अन्य कोणताही ग्रंथ निर्दोष नाही. मनुस्मृतीत मधल्या काळांत प्रक्षेप नि विक्षेप दोन्हीही झाले आहेत. ह्यावर आम्ही आमच्या एका परमादरणीय श्रीभिडेगुरुजींवरील वृत्तपत्रांतील एका लेखांत सविस्तर मीमांसा केलीच आहे.

सांगण्याचा उद्देश्य इतकाच आहे की प्रस्तुत श्लोक वराहमिहीरांच्या वेळी मनुस्मृतीत होता पण आजच्या उपलब्ध एकाही मनुस्मृतीच्या प्रतीत तो नाहीये असा निष्कर्ष काढण्यांस कोणतीही अत्युक्ती आम्हांस वाटत नाही. लेखासह आम्ही संदर्भ जोडलेच आहेत.



ज्यांना ही अत्युक्ती वाटते त्यांनी हे आमचं विधान सप्रमाण खंडन करावं. कारण मनुस्मृतीत अनेक श्लोक असे आहेत की जिथे मनुरवेब्रवीत असे म्हटलंय. म्हणजे हा श्लोक मनुमहाराजांनी सांगितलंय अशा अर्थाची वचने आहेत. आता जर हे श्लोक मनुमहाराजांनी स्वतः रचले असते तर त्यांनी हे 'मनुने म्हटलंय' असे विधान कशाला केलं असतं ??? भले मनुस्मृती ही भृगुप्रोक्त आहे असे काही मतांत मानलं जात असलं तरीही त्यान्यायाने उपरोक्त वराहमिहीरांचा श्लोकही मनुस्मृतीचाच भाग होता हे लक्ष्यीं येते.

पण काही एकदोन अपवाद वगळता आजपर्यंतच्या एकाही मनुस्मृतीभाष्यकारांस ही गोष्टही लक्ष्यीं येऊ नयें ह्यापेक्षा शोकांतिका ती काय???

अर्थात ज्यांना सत्य स्वीकारायचीच मानसिकता नाही त्यांना कितीही घसा खरडून सांगितलं तरी त्यांना हे मान्य होणार नाही ही गोष्ट वेगळी. अस्तु।

*नोलुकोप्यवलोकते दिवा सूर्यस्य किं दूषणम्।*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#मनुस्मृती_स्त्रियांची_स्तुती_प्रशंसा_गुण_पुरुष_वराहमिहीर

1 comment: