Saturday 20 April 2024

चर्मण्वती/चंबळ नदीचा वास्तविक अर्थ


चर्मण्वती किंवा चंबळ नदीचं नाव गाईच्या चामड्यावरून, गोमांसावरून पडलं आहे काय???

९ वर्षांपूर्वी जेव्हा पाखण्ड खण्डिणी नावाने ब्लॉग सुरू केला, तेव्हाच खरं तर यावर लिखाण करून झालेलं आहे पण पुन्हा पुन्हा हिंदुधर्म, संस्कृती आणि परंपरा यावर आक्षेप घेणाऱ्यांची वावटळ उठते आणि म्हणून ती शांत करण्यासाठी पुन्हा पुन्हा आह्मांस लेखणी हातात घ्यावी लागते....

कुणीतरी लिहिलंय म्हणे की चर्मण्वती किंवा चंबळ नदीचे नाव हे राजा रंतिदेवाच्या यज्ञांमध्ये रोजच्या २००० गाईंच्या आणि २००० अन्य पशुंच्या रोज केल्या जाणाऱ्या हत्येवरून आणि त्याचं मांस किंवा चामडं धुतल्या जाणाऱ्या पाण्यावरून निर्माण झालेल्या नदीरुपाने पडलंय म्हणे!

याचं सप्रमाण खंडन👇👇👇

मूळात व्याकरणानुसार “चर्मण्वती' हे पद 'चर्मन् + वत् + ई असे बनतं.

मराठीत आपण चर्म शब्द चामडं या अर्थाने घेतो हे बरोबर आहे पण संस्कृत शब्दांचे धात्वर्थानुसार एकापेक्षा अनेकार्थ होतात व प्रकरणानुसार ते घ्यावे लागतात यावर मागे अनेकवेळा लिहून झालंय, जुने लेख शोधावेत, त्यामुळे एकच अर्थ घेतल्याने अनर्थ ओढवतो कसा ते पाहुयांत. वस्तुतः आपल्या पूर्वजांना याची जाणीव होती म्हणून त्यांनी फार आधीच या भ्रमाचं निरसन करून ठेवलंय. उणादि कोश या व्याकरणकोशामध्ये चर्म शब्दाचा वास्तविक अर्थ आहे- 

चरति गच्छन्ति येन तत्‌ चर्मः।
( उणादि कोष ८।११५)

ज्याने पुढे जातो, कीर्तींस प्राप्त होतो असं ते चर्म ! इथे चर्म शब्दाचा चामड्याशी किंवा गायीच्या मांसाशी किंवा चामड्याशी किंवा त्याला धुतल्या जाणाऱ्या पाण्याशी काहीही संबंध नाही बरंका !

या विकृत आरोपाचं मूळ कुठंय???

हिंदुद्वेष्ट्या मार्क्सवादी विचारवंत राहुल सांस्कृत्यायनांचे 'व्होल्गा ते गंगा' हे विकृत पुस्तक

ज्या महाभारतातल्या राजा रंतिदेवाच्या संदर्भाने ही गोष्ट सांगितली जाते, तो रंतिदेव नावाचा राजा म्हणे यज्ञामध्ये रोज २००० गायी व २००० अन्य पशु रोज ब्राह्मणांसाठी कापून त्यांचं मांस त्यांना खायला देत असे म्हणे व ते मांस किंवा त्यावरचं चामडं धुताना जे पाण्याचे पाट वाहिले, ती म्हणे चर्मण्वती नदी !

कदाचित राहुलजी व त्यांचे मानसपुत्र आक्षेपक हा प्रसंग रोज पहायला गेले असावेत किंवा समय यंत्र म्हणजे टाईम मशीन असावं त्यांच्याकडे !

दुर्दैवाने हाच आरोप आहे तसा मूळ महाभारताच्या एखाद्या श्लोकाचाही कुठलाही संदर्भ न देता The History and Culture of Indian People खंड द्वितीय पृष्ठांक ५७९वर केला गेला आहे. कुठलाही संदर्भ न देता!

मला एक सांगा रोज २००० म्हटलं तर त्याच्यासाठी पाणी किती लागेल बरं इतकं मांस रोज खाल्ल्यानंतर ते ब्राह्मण लोक किंवा कोणताही माणुस जिवंत राहु शकेल का? कुणी कितीही अट्टल मांसाहारी असला तरी त्याने रोज गोमांस हजारो किलोने खाऊन दाखवावं बघु. राहुलजींसारख्या आक्षेपकांनी रोज किलोभर तरी खावं.

बरं मूळात हा भारतदेश, इथलं वातावरणही पाश्चात्य राष्ट्रांसारखं मांसाहार पचवायसाठी अनुकूल नाही. तिथंही ते कितपत पचत असेल ते मांसाहार करणारेच जाणोत. यात कुठेही मांसाहाऱ्यांची निंदा किंवा तुच्छता अभिप्रेत नाही.

बरं दिवसाला २००० म्हणजे वर्षभरात गोवंश अख्खा आणि पशुवंश पूर्ण नष्ट होऊन जाईल म्हणजे व्यावहारिक दृष्टीने विचार केला तरी हे विधान अत्यंत बालिशपणाचं आणि अत्युक्तीचं वाटतं.

पण 'व्होल्गा ते गंगा' हा ग्रंथ लिहिणाऱ्या मार्क्सवादी विचारवंत राहुल सांस्कृत्यायनजींना याचा थोडाही विवेक सुचला नाही, त्यांनी लिहिलं की ह्मणें

राजा रंतिदेवाकडून अशा दररोजच्या २००० गाईंच्या आणि अन्य २००० पशुंच्या मांसांने किंवा चामड्याने धुतल्या जाणाऱ्या पाण्याने ही चर्मण्वती नावाची नदी तयार झाली म्हणे व तिने रंतिदेवाला कीर्ति प्राप्त झाली म्हणे...

वास्तविक पाहता महाभारतामध्ये रंतिदेवाला कीर्ती म्हणजे नावलौकिक कोणत्या कारणामुळे प्राप्त झाला हे स्पष्ट सांगताना म्हटलेलं आहे की त्याने अनेक ऋषीमुनींना आणि ब्राह्मणांना कंदमुळे, फळे, अन्न, गायी, बैल वगैरे यांचे दान केलं म्हणून तो कीर्तीस प्राप्त झाला, यात कुठेही मांस दिल्यामुळे किंवा गोमांस दिल्यामुळे तो कीर्तींस पावला असे पुसटसंही म्हटलेलं नाही...

तो श्लोक असा आहे

रन्तिदेवेन लोकेष्टा सिद्धिः प्राप्ता महात्मना।
फलपत्रैरथो मूलैर्मुनीनर्चितवांश्च सः।

महाभारत शांतिपर्व अध्याय २९२

इथे रंतिदेवांस प्राप्त झालेली कीर्ती ही त्याने ऋषिमुनींना दिलेल्या कंदमुळे, फलादिंनी झालीय असे स्पष्ट लिहिलंय, इथे कुठेही मांसाचा पुसटसाही उल्लेख नाही. गोमांस तर नाहीच नाही...

तरीदेखील महाभारताच्या श्लोकातल्या काही शब्दांचा सोयीस्कर अर्थ काढून राहुल सांस्कृत्यायन या मार्क्सवादी लेखकाने ही चूक केली व त्यांच्या हिंदुद्वेष्ट्या, वेदद्वेष्ट्या मानसपुत्रांनी म्हणजे सर्व डाव्यांनी, पू-रोगाम्यांनी, समाजवाद्यांनी, सगळ्यांनीच त्यांचीच री ओढत गरळ ओकली व ओकताहेत...गेली अडीचशे वर्षे!

आता महाभारतामध्ये रंतिदेवाचं मूळ चरित्र काय आहे ते पाहुयांत...

अनुशासन पर्व ११५ अध्याय गीताप्रेसच्या प्रतीनुसार श्लोक संख्या ६३ पासून ते ६७ पर्यंत अनेक राजांची नावे घेतली गेलेली आहेत, ज्यांनी कधीही आयुष्यात मांस खाल्लं नाही, त्यामध्ये राजा रंतिदेवाचं सुद्धा नाव आहे, भांडारकर आणि चित्र शाळेच्या प्रतींमध्ये हाच प्रसंग थोड्या वेगळ्या श्लोक संख्या आणि अध्यायाच्या प्रमाणे आहे पण रंतिदेव शुद्ध शाकाहारी होता हेच सांगितलं आहे.

जर राजा रंतिदेव आपल्या रोजच्या यज्ञामध्ये हजारो गाईंची हत्या करून ब्राह्मणांना खायला गोमांस देत असेल तर यज्ञाचा प्रसाद म्हणून थोडं तरी त्याने स्वतः ग्रहण करायला हवं होतं की? काय अडचण होती? पण वर म्हटल्याप्रमाणे त्याचा उल्लेख कधीही मांस न खाल्लेल्या राजांमध्ये आहे, का बरं???

बरं याच महाभारतामध्ये शांतिपर्वामध्ये राजधर्म प्रकरणांमध्ये अध्याय २९ मध्ये महाभारत युद्ध संपल्यावर कुलक्षय झाल्याच्या शोकाने ग्रसित असलेल्या युधिष्ठिराला उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने ज्या प्राचीन राजांची कथा व नावे सांगितली आहेत की ज्यांना आपल्या कर्तुत्वाने अनेक शुभकर्मांनी कीर्ती प्राप्त झाली, नावलौकिक प्राप्त झाला, त्यामध्ये राजा रंतिदेवाचा उल्लेख आहे आणि ही कीर्ती त्यांना अनेक प्रकारचे दान केल्याने प्राप्त झाली असे म्हटले आहे, कुठेही गोमांस किंवा अन्य पशुंचे मांस ब्राह्मणांना किंवा ऋषिमुनींना किंवा याचकांना खायला घातलं म्हणून कीर्ति प्राप्त झाली असं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं नाही.

आलम्भन, आलभ्यन्त आदि शब्दाचा अर्थ स्पर्श करून सोडून देणे आहे, हत्या किंवा हिंसा करणे नव्हे बरंका...

वैदिक यज्ञामध्ये हिंदु लोक पूर्वी अनेक प्रकारच्या पशूंना किंवा गाईंना मारून त्यांचं मांस खायचे असा घाणेरडा आरोप करणारे लोक वेदमंत्रांमध्ये किंवा अन्य संस्कृत साहित्यामध्ये येणाऱ्या पशुयज्ञाच्या संबंधाने आलम्भन या शब्दावरून लगेचंच त्या निर्दोष पशुची हत्या असा विकृत अर्थ काढतात, दुर्दैवाने अनेक सनातनीही तसाच अर्थ काढतात, खरंतर दोषी हे लोक आहेत, कुणाला राग आला, लोभ आला, मी कुणाचा मान राखत नाही....

पण आमच्या पूर्वमामांसाकारांनी स्पष्टपणे आलम्भन शब्दाच्या दृष्टीने विवेचन करून ठेवले आहे

मीमांसा दर्शन २।३।१७ येथील सुबोधिनी टीकेमध्ये

आलम्भः स्पर्शो भवति।

स्पर्श हेच आलंभन आहे असे म्हटलं आहे, म्हणजेच पशुची कोणतीही हिंसा इथे अभिप्रेत नाही. याच पूर्वमीमांसेमध्ये

अपि वा दानमात्रं स्याद्भक्षशब्दानभिसम्बन्धात्।
पूर्वमीमांसा - १०।७।१५

येथे 'भक्ष्य' शब्दावरून खाणे न करता केवळ दान सांगितलं आहे म्हणजेच वैदिक पशुला सोडून देणे...

शांतिब्रह्म संत श्रीएकनाथांनी सुद्धा नाथ भागवतामध्ये आलंभन शब्दाने यज्ञीय पशुला स्पर्श करून सोडून देणे इतकाच अर्थ सांगितला आहे, त्याला मारणे असं नव्हे.

वास्तविक पाहता ९ वर्षांपूर्वीच यावर सविस्तर लिहिलेलं आहे, आमचा ब्लॉग पहावा!

आता सांस्कृत्यायनजींचं संस्कृतचं घोर अज्ञान पहा

द्रोणपर्वाच्या अध्याय ६७ च्या 'यस्य द्विशतसाहस्रा आसन् ।' या श्लोकाचा अनुवाद त्यांनी करताना असे लिहिलंय की राजा रंतिदेवाच्या पाकगृहामध्ये २००० बल्लव म्हणजे स्वयंपाकी लोक गोमांस तयार करायचे.

द्विशतसाहस्राचा अनुवाद २लाख करायचा सोडून २००० केला आहे, ही ह्यांची विद्वत्ता ! संस्कृतचं थोडंफार ज्ञान असलेल्या कुठल्याही शेंबड्या मुलालाही द्विशतसाहस्राचा अर्थ २लाख सोडून २००० करावासा वाटेल का हो? पण या मार्क्सवाद्यांनी वाट्टेल ते लिहायचं, त्यांच्या मानसपुत्रांनी तेच रेटायचं व आह्मींही तेच वाचायचं???

बरं या राहुल सांस्कृत्यायन यांची आणखी विकृती पहा

यांनी महाभारतातल्या अनेक श्लोकांमध्ये मासं असा शब्द गाळून मांसं असा सोयीस्कर श्लोक आपल्या पुस्तकात लिहिलाय व वाट्टेल ते अर्थ काढलेत. आता याला मार्क्सवाद नाहीतर काय म्हणायचं??? मास(महिना) नि मांस दोन्ही शब्द वेगळे आहेत हे सांगायची आवश्यकता आहे???

क्षणभर मांस शब्द योग्य आहे असेही समजुयात....

९ वर्षांपूर्वीच लिहिलंय की शतपथ ब्राह्मण या यजुर्वेदाच्या व्याख्यानरुपी ग्रंथामध्ये

'एतदु ह वै परमान्नाद्यं यन्मांस। (११।७।१।३)

इथे मांसाचा अर्थ परमान्न म्हणजेच अमरकोशानुसार 'परमान्नं तु पायसम् (२।७।२४)' म्हणजे मांस शब्दाचा अर्थ पायस घ्यावा असाच आदेश आहे. आता पायस म्हणजे दुध आणि तांदळाची गोड खीर ! कारण यज्ञाची दीक्षा घेतलेल्याला मैथुन करण्याचा किंवा मांस खाण्याचा अधिकारच नाही, अशी स्पष्ट वेदांची आज्ञा आहे. त्यामुळे पशुचं मांस हा अर्थ कुठेच सिद्ध होत नाही. त्यामुळे वैदिक यज्ञामध्ये हिंदू लोक वेगवेगळ्या प्रकारचे मांस खायचे किंवा त्यांना तशी वेदांची आज्ञा आहे हा आरोप इथेच पूर्णतः निराधार सिद्ध होतो...

पण तरीही आज रोज रोज हेच खोटं रेटलं जातं की हिंदु लोक वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञामध्ये गोमांस मारून खायचे. किती दिवस ही विकृती सहन करायची???

गेली अडीचशे वर्षे हेच सुरु आहे...

बर या सगळ्या मागे या लोकांचा मूळ हेतु काय आहे???

तर हिंदू संस्कृती कशी तुच्छ होती, वाईट होती, असं सिद्ध करण्याचा अट्टाहास !

इतकंच नव्हे तर मुस्लिमांकडून किंवा ख्रिश्चनांकडून जी गोहत्या हत्या केली जाते व आपला गोवंश संपवण्याचा अट्टाहास सुरू आहे, त्याचं समर्थन करण्यासाठी आमच्या हिंदू धर्मशास्त्रांमध्येच कसं गोमांस खायला सांगितलं आहे असं बळंच रेटण्याचा प्रयत्न करणे हे डावं षडयंत्र आहे...

मी मागे लिहिलेलं आहे की एकीकडे हे लोक भारत देश हा बळीराजाचा देश आहे म्हणजेच शेतकऱ्यांचा देश आहे, इथली कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे म्हणून बेंबीच्या देठापासून बोंबलतात आणि दुसरीकडे हेच लोक गोमांस खाण्याचं समर्थन करतात

किती हलकटपणा आहे पहा !

वेळीच सावध व्हा!

विनाकारण बुद्धिभेद करून मूळ विषयापासून लक्ष भरकटविणे हे डाव्यांचे जुने धंदे आहेत!

वैधानिक सूचना - मांसाहार कुठे वाईट आहे, हिंदूंनी मांस खाल्लं तर बिघडतं कुठे अशा प्रकारचा हास्यास्पद युक्तिवाद करणाऱ्या स्वयंघोषित बुद्धिवादी नवहिंदुत्ववाद्यांनी म्हणजे उजव्या समाजवाद्यांनी मला अक्कल शिकवायला इथे येऊ नये, वाईट शब्दांमध्ये पुन्हा एकदा अपमान केला जाईल हे आधीच सांगतो...

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#राजारंतिदेव_चर्मण्वती_नदी_चंबळ_नदी_महाभारत_गोमांसाहार_वैदिकयज्ञसंस्था


No comments:

Post a Comment