Wednesday 11 March 2020

जगद्गुरु श्रीतुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन - व्याकरणशास्त्रदृष्ट्या काही विचार




*वेदानिंदी चांडाळ, भ्रष्ट सुतकिया खळ।*
जगद्गुरु श्रीतुकोबाराय

वेदनिंदकांना चांडाळांची उपमा देणार्या जगद्गुरु श्रीतुकोबारायांची आज सदेह वैकुंठगमन तिथी...! जगद्गुरुंच्या वेदनिष्ठेंवर भविष्यांत कधीतरी लिहीनंच. आज तिथीने जन्मांस येणें हे आमच्या दृष्टीनेही परमभाग्यंच. प्रतिवर्षी श्रीतुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनासंबंधी काही चिंतन करतोच, सांप्रतही काहीसं. *ऐतिह्य प्रमाणांचा विचार करता रामायण-महाभारतकालापासून सदेह स्वर्गगमनाचे उल्लेख आहेत. श्रीतुकोबारायांचे चरित्रकार श्रीलक्ष्मण रामचंद्र पांगारकरांनी श्रीतुकोबारायांच्या चरित्रामध्ये हे उल्लेख सविस्तर दिलेले आहेत.* जिज्ञासूंनी तिथे अभ्यासावेंत ही विनंती.

हे स्वर्ग-नरक-वैकुण्ठादि लोक स्थानविशेष आहेत का ह्यासंबंधी एकवाक्यता आढळत नाही. हे स्थानविशेष नाहीत असे निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्यांचे नि शबर स्वामी आदि पूर्वमीमांसकांचे मन्तव्य आहे. वेदमहर्षि श्रीपाद दामोदर सातवळेकर आदिंनी स्वर्गादि लोक हिमालयापलीकडील भाग आहे असे सांगितलं आहे. ह्या वादांत पडण्याचे हे स्थान नव्हे. प्रस्तुत लेखासंदर्भांत केवळ *वैकुण्ठ शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी विचार करता हा शब्द प्रथम ऋग्वेदाच्या दशम मंडलांमध्ये प्राप्त होतो* हे आपणांस. त्याविषयी...

*इन्द्र नि वैकुण्ठ शब्दाचा अर्थ...*

*ऋग्वेदाच्या दशम मंडलामध्ये ४८-५० ही तीन सूक्ते आहेत, ज्यांचा ऋषि नि देवता हा इन्द्र-वैकुण्ठ आहे. ह्या सूक्तांमध्ये इन्द्र शब्दाने प्रत्यक्ष परमात्म्याचे अर्थात ईश्वराचे ग्रहण आहे.* सूक्ताच्या विस्तारांत जाण्याचे हे स्थल नसल्याने इन्द्र शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी इतकंच सांगणं आवश्यक आहे की ह्या शब्दाच्या अनेक निरुक्ती किंवा व्युत्पत्त्या देता येतील. *इन्द्र शब्दाचे धात्वर्थाने पाहता ११ अर्थ होऊ शकतात. आमच्या आधीच्या अनेक लेखांत आह्मीं सिद्ध केल्याप्रमाणे वैदिक शब्द हे धातुज असल्याने एकापेक्षा अनेक धातुंनी त्यांची सिद्धी करणे संभव आहे.* विस्तारांत जाणे नाही.

*वैकुण्ठ ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार करता निरुक्तकारांनी "विगताः कुण्ठाः यस्य सः।" 'ज्यांच्या सर्व कुण्ठा अर्थात दुःखादि विकारांचा नाश झालेला आहे, असा तो.' किंवा "विकुण्ठमप्रतिहतं पदं मोक्षधाम तस्य स्वामी इन्द्र-वैकुण्ठः।"*

*'जिथे सर्व दुःखादि विकार समाप्त होतात, त्या मोक्षधामाचा स्वामी इन्द्र-वैकुण्ठ आहे. अर्थात परमात्म्याचे नाव इन्द्र-वैकुण्ठ आहे. कारण ईश्वराच्या ठिकाणी सर्वच दुःखादि विकारांची समाप्ती आहे.'*

श्रीतुकोबाराय वैकुंठास गेले ह्याचाच अर्थ त्यांच्या सर्व कुण्ठा समाप्त झाल्या. आत्मानंदाने परिपूर्ण असे ते आत्मस्वरुपांस प्राप्त झाले. हा विचार वैकुंठादि लोक स्थानविशेष न मानणार्यांसाठी आहे. क्षणभर हे मन्तव्य सत्य मानलं तरी श्रीतुकोबारायांचे वैकुंठगमन उपरोक्त निर्वचनांच्या आधारे सिद्ध होते. आणि जरी ते स्थानविशेष मानलं तरी ते सिद्ध होतंच. *वारकरी संप्रदायांतल्या अनेक अधिकारी सत्पुरुषांनी श्रीतुकोबारायांच्या वैकुंठगमनावर भाष्य केलंच आहे. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीलक्ष्मण रामचंद्र पांगारकर, वारकरी संप्रदायाचे विद्यमान भीष्माचार्य श्रीनिवृत्ती महाराज वक्ते बाबा, हभप श्री रामकृष्णबुवा लहवीतकर, मंगेश रामचंद्र टाकी वगैरे वगैरे.*

*योगसामर्थ्यानेही श्रीतुकोबारायांचे वैकुंठगमन संभव आहे. पातंजल योगदर्शनामध्ये योग्यांस प्राप्त होणार्या अनेक सिद्धींचे वर्णन आहेच. जिज्ञासूंनी अधिक अध्ययनासाठी महर्षि श्रीपतंजलींच्या योगसूत्रांवरील श्रीव्यासकृतभाष्य नि त्यावरील भोजराजाची वृत्ति अभ्यासावी. पीडीएफ आहे. वामनकवींनी 'योगाची सिद्धि हे तुकारामीं' असे म्हटलंच आहे.*

*वैकुंठगमनासंबंधी शिवकालीन संदर्भ*

जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनासंबंधी *प्रत्यक्ष श्रीशंभुछत्रपतींनी पुढे श्रीतुकोबारायांच्या चिरंजीवांस म्हणजे श्रीमहादोबांस वर्षासनाची सनद दिल्याचा उल्लेख श्रीसंभाजीकालीन पत्रसारसंग्रह मध्ये आहे. भाद्रपद शुद्ध पंचमी, शके १६०२चं आहे.* ते पत्र आह्मीं जोडलं आहेच.


जगद्गुरुंचे चरित्रकार श्रीलक्ष्मण रामचंद्र पांगारकरांनीही *श्रीशाहु छत्रपतींच्या संबंधीनेही सदेह वैकुंठगमन केल्याचे वर्णन केल्याचा एक उल्लेख केलाय. श्रीतुकोबारायांचे सुपुत्र श्रीनारायणबोवा ह्यांना श्रीशाहु छत्रपतींनी तीन गावं इनाम दिली आहेत. राज्याभिषेक शके ३० मध्ये.* तो संदर्भ निम्नलिखित

*"राजश्री तुकोबा गोसावी सत्पुरुष यांचे पुत्र नारोबा गोसावी याणी किले प्रसिद्धगडचे मुकामी आपले शिष्य सखोबा गोसावीं याबरोबर पत्र पाठवले तेथें लिहिलें की तुकोबा गोसावीं सत्पुरुष हे मौजे देहु उर्फ हवेली प्रांत पुणे भगवतकथा करिता अदृश्य झालें ही गोष्ट विख्यात आहे. त्याचे हाती पुज्या श्रींच्या देवाची मूर्तीची होत होती ती पूजा चालवींत आहे."*


आता प्रत्यक्ष दोन्ही छत्रपतींनीच वैकुंठगमन मान्य केल्यावर अन्यांचा प्रश्नंच येत नाही.

*तेंव्हा आजच्या पवित्रदिनी श्रीतुकोबारायांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन नि शिरसाष्टाङ्ग दंडवत!*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#जगद्गुरु_श्रीतुकोबाराय_सदेह_वैकुंठगमन_शंभुछत्रपती_शाहुछत्रपती_वारकरीसंप्रदाय

No comments:

Post a Comment