Monday 13 January 2020

वेद में इतिहास नहीं - प्रियरत्न आर्ष - ग्रंथ परिचय



सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्।
वेदशब्देभ्यः एवादौ पृथक्संस्थाश्च निर्ममे।
मनुस्मृति - १।२१

केवल भारताचाच नव्हे तर विश्वाचा आद्यग्रंथ वेद मानले जातात. अशा वेदांमध्ये इतिहास शोधण्याची प्रवृत्ती स्वाभाविक असली तरी ती स्तुत्य नाही. वेदांमध्ये राम-कृष्ण, विश्वामित्र-वसिष्ठ, सरस्वती-अयोध्या-गांधार आदि शब्द दिसले रे दिसले की लगेचच त्यांचा संबंध इतिहासकालीन व्यक्तींशी, राजांशी, ऋषींशी, नद्यांशी किंवा कोणत्याही स्थानांशी जोडून वेदांचा काळ किंवा निर्मिती सिद्ध करण्याचा अट्टाहास सर्व विद्वान करताना दिसतात. म्हणूनंच वेदांमध्ये इतिहास शोधणार्यांची आम्हांस कीव येते असे आम्हीं आजपर्यंत अनेकवेळा लिहिलं आहे. मानवसृष्ट्यारंभी प्रकट झालेल्या नित्य अशा वेदांमध्ये इतिहास कसा बरं असेल? पण पाश्चात्य तर राहुदेतंच पण त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीय विद्वानही एकवेळ फारतर राहुदेत..पण स्वतःला सनातनी परंपरेतले म्हणविणारे, षड्दर्शने नि षड्वेदाङ्गांसहित संप्रदायपूर्वक वेदाध्ययन केलेले विद्वानही जेंव्हा वेदांमध्ये अवतारवाद, राम-कृष्णाचे उल्लेख, सरस्वती नदीचा शोध, विश्वामित्रादि ऋषींचे उल्लेख आदि आदि इतिहास शोधायचा प्रयत्न करतात, तेंव्हा आम्हांस अत्यंत खेद होतो. अशा सर्वांसाठी वेदांत इतिहास आहे की नाही ह्याविषयी उत्तम समाधान करणारी ही पुस्तिका आहे...

दीड वर्षांपूर्वीच ही अभ्यासली होती. पण मधील काळांत अप्राप्य झाली नि परवा रात्री अचानक प्राप्त झाली म्हणून ग्रंथपरिचयासाठी हा लेखनप्रपंच...

वेदांमधले ऋषि

ह्यावर आम्ही मागेही एक विस्तारपूर्वक लेख लिहिलाच आहे. पण अधिक अध्ययनासाठी प्रस्तुत लेखकाने केलेलं विवेचन अत्यंत उपयुक्त आहे. आणखीही दोन ग्रंथ चिंतनीय आहेत. वेदांमध्ये विश्वामित्र-वसिष्ठादि शब्द आले की लगेचच त्यांचा इतिहासपरक अर्थ काढून रामायणकालाशी किंवा कोणत्या तरी काळाशी त्या मंत्रांचा किंवा सूक्तांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला जातो जो अत्यंत निंदनीय आहे....

चारीही वेदांमध्ये ८६२ पदार्थांचे वर्णन आहे, ज्यामध्ये ३८६ केवळ ऋषी आहेत, ७१ ऋषि देवता आहेत तर अन्य ४०५ केवळ देवता आहेत. प्रस्तुत लेखकाने ह्यावर फार विस्तारपूर्वक चिंतन केलेलं आहे.

वेदांतले सर्व शब्द हे यौगिक आहेत. ते धातुज आहेत. त्यांचा इतिहासकालीन व्यक्तींशी, संस्थांशी, स्थानांशी जो काही संबंध आहे तो लेखारंभी प्रकट केलेल्या श्लोकानुसार आहे. ज्याचा अर्थ हा आहे की वेदांतल्या शब्दांवरून नंतरच्या काळांत सर्व वस्तुंची नि संस्थांची नावे ठेवली गेली आहेत. वेदांतल्या शब्दांचे जे अर्थ प्रकट होतात त्या अर्थाचे ग्रहण करून तशी नावे नंतरच्या काळांत धारण केली गेली आहेत. ह्यावरून वेद हे सर्वात आधी सिद्ध होतात नि मग सर्व इतर वस्तु किंवा व्यक्ती.

पण आपल्या स्वार्थी अट्टाहासासाठी हेतुपुरस्सर वेदांत इतिहास शोधणे नि वेदांविषयी वाट्टेल ते लेखन करणे ही एक विकृत परंपरा आहे. ही परंपरा काही नवीन आहे असे नव्हे....

निरुक्तकार यास्काचार्यांनी इतिहासपक्षाचा उल्लेख केलाच आहे..

निरुक्तकारांच्या काळीही वेदांमध्ये इतिहास शोधणारे लोक होतेच हे ते 'इत्याख्यानम्' किंवा 'इत्यैतिहासिकाः' ह्या शब्दांवरून प्रकट करतातंच. अर्थात त्यांनी त्याचे सप्रमाण खंडणही केलंच आहे. त्यामुळे हा इतिहास शोधण्याचा पक्ष अगदी काही नूतन नसला तरी तो त्याज्य निश्चितंच आहे.

वेदांमध्ये इतिहास का नाही नि ही प्रवृत्ती वेदार्थ प्रतिपादनांत का घातुक आहे हे आम्ही जे अट्टाहासाने मांडताहोत, त्यांत आमचा व्यक्तिगत स्वार्थ काहीच नाहीये. ह्यासाठी आम्ही प्रत्यक्ष वेदांचीच अंतःसाक्षी देण्यांस तयार आहोत. वैदिक साहित्याचीही आहेच. उपरोक्त ग्रंथ त्यादृष्टीने सहाय्यभूत होईल म्हणून हा परिचय...

प्रस्तुत लेखकाने *यम-पितृ परिचय* नावाचा आणखी एक ग्रंथ लिहिला आहे तोही चिंतनीय आहे. त्यावरही आम्ही विस्ताराने येऊच....

उपरोक्त ग्रंथ प्राप्त होण्यासाठी निम्नलिखित धागा

https://drive.google.com/file/d/11yFCTUYyjnjkcyCI8ueEsNNQEuwGWpRc/view?usp=drivesdk

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#वेदांमध्येइतिहास_अपौरुषेयत्व_नित्यअनित्य_भारतीयइतिहास_निरुक्त_रामकृष्ण_ऋषि_सरस्वती

1 comment:

  1. यासंदर्भात काही शंका आहेत, एक एक करून टिप्पणी करत जाईन. आपल्या उपलब्धतेनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.

    १) प्राचीन भारतीय ग्रंथांपैकी अनेक ग्रंथ "हा इतिहास आहे आणि प्रत्यक्ष घटना घडून गेल्यावर काही वर्षांनी त्याची नोंद लिखित स्वरूपात केली गेली" अशा आशयाचे स्पष्ट संदर्भ देतात. तर हे संदर्भ चुकीचे आहेत किंवा नंतर घुसडलेले आहेत, असे आपण मानता का?

    २) अनेक ग्रंथांत त्या त्या वेळची आकाशाची स्थिती, ऋतुमानानुसार होणारे बदल किंवा तापमान याबद्दलचे वर्णन आहे. पृथ्वीच्या परांचंन गतीचा अभ्यास करून तशी परिस्थिती किती हजार वर्षांपूर्वी असेल याचे गणित मांडता येते. त्या गणिताशी जुळणारे समजा इतर काही पुरावे मिळाले तर तशी परिस्थिती अस्तित्वात नव्हती असे म्हणता येईल का?

    आपल्या सवडीनुसार उत्तर द्यावे.

    समीर बर्वे,
    मुंबई

    ReplyDelete