Friday 9 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्तविचार: । - लेखांक प्रथम



सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥२॥
तुका म्हणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥३॥

जगद्गुरु श्रीतुकोबाराय

आज यमद्वितीया अर्थात भाऊबीज. दीपावलीचा शेवटचा दिवस. पद्मपुराण उत्तरखंड नि भविष्यपुराण उत्तरपर्व ह्या पुराणांतरी आलेल्या कथेनुसार आज यमाची बहीण यमुना ह्या दोघांसाठी ही भाऊबीज साजरी होते. पुराणांतल्या ह्या कथेचे मूळ ज्या ऋग्वेदाच्या दशम मंडलाच्या दशम सूक्तामध्ये (१०.१०) आहे, त्या सूक्तामध्ये आश्चर्याने किंवा सुदैवाने म्हणा पण यमुनेचा साधा उल्लेखही नाही. पण *इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृहंयेत* ह्या महाभारत वचनाचा आधार घेऊन इथल्या पुराण शब्दांवरून लगेचच व्यासरचित किंवा संकलित तथाकथित अष्टादश पुराणांचा ह्या सूक्ताशी संबंध जोडून वेदार्थ प्रतिपादन करणार्यांनी ह्या ऋग्वेदातल्या यम-यमीलाही भाऊ-बहीणच मानून वेदार्थ प्रतिपादन केलंय का अशी शंका येते. पुराणांतल्या कथांशी ह्या लेखमालेचा संबंधच नाही नि आमचा तो हेतुही नाही. आम्ही पुराणं पूर्णत: नाकारतही नाही नि ते पूर्णत: स्वीकारतही नाही. तो ह्या लेखमालेचा विषयच नाही. पण ऋग्वेदाच्या ह्या यम-यमी सूक्तामध्ये असलेले हे यम-यमी हे नेमके कोण आहेत, ते ऐतिहासिक स्त्री-पुरुष किंवा खरंच भाऊ-बहिण आहेत का की ते पती-पत्नी आहेत की अन्य काही आहेत? हा प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे. ते भाऊ-बहिण तर आमच्या मते निश्चितच नाहीतच. मग ते नेमके काय आहेत हाच विचारपूर्वक ठाम सिद्धांत मांडायचा हा प्रयत्न आहे.

निरुक्तादि षड्वेदांगांच्या आणि सर्व प्राचीन भाष्यकारांच्या परामर्शाने आणखी विस्तार करण्यासाठी नि गेली दीड वर्षे हा विषय चित्तांस अस्वस्थ करत असल्यामुळे प्रस्तुत लेखनप्रपंच !

अथ ऋग्वेद परिचय

ऋग्वेदामध्ये एकुण दहा मंडले असून त्यात एकुण १०२८ सूक्ते आहेत. त्यातलं दहावं मंडल हे प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे, ज्यातले हे दहावं सूक्त आहे.

ऋग्वेदाच्या ह्या दशम मंडलाविषयी पाश्चात्यांनी प्रसृत केलेले भ्रम नि त्यांच्या अनुयायी अशा आधुनिक एतद्देशीयांनी ह्या मंडलाविषयी केलेले विपर्यस्त लेखन नि त्याची समीक्षा हा प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे. ऋग्वेदाच्या ज्या दशम मंडलातील दशम सूक्तामध्ये हा उपरोक्त यम-यमी संवाद येतो, त्या सूक्ताविषयी सायणाचार्य प्रभृति प्राचीन एतद्देशीय ऋग्वेदभाष्यकारांनी केलेल्या भाष्याचीही समीक्षा करण्याचा इथे विचार आहेच. हा लहानतोंडी मोठा घास असला तरी त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेऊनच.

*मूळात आदरणीय सायणाचार्यांच्या आधी ऋग्वेदांवर द्वादश अर्थात १२ भाष्यकार होऊन गेले आहेत हे आमच्या गावीही नसते ही शोकांतिका आहे. ह्यामध्ये परमहंस श्रीमच्छंकराचार्यशिष्य हस्तामलक, सहाव्या शतकांतले श्रीस्कंदस्वामी(ज्यांचे निरुक्तभाष्यही उपलब्ध आहे), नारायण, उद्गीथ, वेङ्कटमाधव, लक्ष्मण, धानुष्कयज्वा, आनंदतीर्थ, जयतीर्थ, नरसिंह, राघवेंद्रयति, आत्मानंद ही सूची आहे. ह्यातले स्कंदस्वामी,उद्गीथ नि वेङ्कटमाधवांचे भाष्य सुदैवाने पीडीएफ उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते इथे पहावे.*

https://archive.org/details/RigVeda31/page/n3

ह्या धाग्यांवर ते प्राप्त होईल.

उपरोक्त भाष्यकारांचे संदर्भ - *वैदिक वाङ्मय का इतिहास - भाग द्वितीय - वेदोंके भाष्यकार - लेखक पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कौलर, बी ए*

ह्या सूक्ताविषयी अनेकानेक भ्रम मधील काळात प्रसृत झालेले आहेत. मग ते अज्ञानातून असोत किंवा हेतुपुरस्सर दुष्ट हेतुने असोत. आता ह्या सूक्तावर घेतलेल्या आक्षेपांचे चिंतन पाहुयांत.

१. म्हणे हे सूक्त यम-यमी नामक भावा बहिणीचे आहे म्हणे - इति सायणाचार्य नि तदनुयायी सर्व सनातनी परंपरेतले वेदभाष्यकार नि त्यांचे अनुयायी नि धर्मप्रेमी विद्वान. सर्व पाश्चात्य नि तदनुयायी एतद्देशीय विद्वान.

२. म्हणे ह्या सूक्तामध्ये यमी नामक बहिणीने आपल्या यम नामक भावांस प्रणययाचना केली असता यमाने ती धिक्कारून तिचा निषेध केला आहे.

३. म्हणे ह्यावरून त्याकाळी भावा बहिणींत विवाह होत किंवा शरीरसंपर्क होत असा विकृत कुतर्क काही लोक करताना दिसतात. ह्यांच्या मते हे सूक्त रचायच्या आधी हे सर्व प्रकार चालत. पण ह्या सूक्तानंतर अशा भावा-बहिणींच्या संपर्कांस प्रतिबंध घातला म्हणे. (काहीही)

४. म्हणे वेद कुणीतरी रचले आहेत कारण असे संवाद आहेत म्हणून.

५. म्हणे ह्यावरून ह्या सूक्तामध्ये इतिहासपक्ष असून त्यावरून त्या वेदकाळचा भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास सिद्ध करता येतो म्हणे.

६. हे ऋग्वेदाचे दशम मंडलच प्रक्षिप्त असून ते नंतरहून जोडलं गेलंय म्हणे - इति मैक्डौनेल व कीथ व त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीय विद्वान(???).

सर्वसाधारण आक्षेपांची मांडणी आम्ही इथे केली आहे. विस्तारपूर्वक ह्या लेखमालेत ह्याविषयी सप्रमाण नि ससंदर्भ खंडनात्मक विवेचन आम्ही करणारच आहोत.

*पुराणांतला कथाविस्तार*

भविष्यपुराण उत्तरपर्व अध्याय १४ येथे व पद्मपुराण उत्तरखंड अध्याय १२२ येथे सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा पण यमाची बहीण ही यमुना दाखविली आहे. यमीचा उल्लेखही इथे नाहीये. तरीही उपरोक्त ऋग्वेद सूक्तामध्ये यम-यमी भाऊ बहिण का मानले जातात हीच शोकांतिका आहे.

*व्याकरणशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर सर्वप्रथम हे आपल्या लक्षात यायला हवं की जेंव्हा कधी पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी शब्दांत रुपांतरण होते, तेंव्हा प्राय: त्या शब्दांस एकतर ई-कारान्त प्रत्यय लागतो किंवा आ-कारान्त. उदाहरणार्थ - ब्राह्मण-ब्राह्मणी किंवा मयुर-मयुरी, रजक-रजकी, कृष्ण-कृष्णा इत्यादि. तेंव्हा, ह्या नियमानुसार पुंल्लिंगी यमाचे स्त्रीलिंगी यमीच होणार. त्यामुळे यमी ही यमाची पत्नीच सिद्ध होते, बहीण नव्हेच.*

*भाष्यकारांमध्ये दुर्दैवाने ह्यांविषयी एकवाक्यता नाही.*

अनेक भाष्यकारांची भाष्ये अभ्यासली की ही गोष्ट लक्षात येते. काही जण तिला भाऊ-बहीण मानतात तर काही पती-पत्नी. काही ऐतिहासिक पक्ष मानतात तर काही नित्यपक्ष मानताना त्यांस दिवस-रात्रीचे रुपक मानतात. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की अशावेळी कुणाचे भाष्य प्रमाण मानावं ? येंविषयीच प्रस्तुत लेखमालेंत विस्तारपूर्वक चिंतन करायचे आहे.

*मी तंव हामाल भारवाही*

अगदी आरंभीसच सांगितल्याप्रमाणे आम्ही केवळ हमालाचे कार्य करत आहोत. ह्यात आमची स्वत:ची प्रज्ञा काहीही नाही. जे प्राचीन परंपरेतून आकळलं तेच मांडायचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जे सत्य तेच सांगणं, मग ते करताना कुणाचीही भीडमूर्वत न बाळगणं.

*धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडन ।*
*हे चिं आम्हां करणे काम । बीज वाढवावें नाम ।*

श्रीतुकोबाराय

अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_भाऊबीज_यमद्वितीया_वेदकालीन_विवाहसंस्था_भाऊबहीण_पतीपत्नी_वास्तव_विपर्यास*

No comments:

Post a Comment