Saturday 27 October 2018

पदवाक्यप्रमाणज्ञ महामहोपाध्याय वैदिक विद्वान पंडित श्रीयुधिष्ठिरजी मीमांसक जयंतीविशेष

२२ सप्टेंबर, १९०९ जन्मतिथी आज एका मीमांसकांची नि वैय्याकरणीची जयंती ! आर्यसमाजाने मागील शतकांत जी काही विद्वत्निष्ठांची एक परंपरा निर्माण केली त्यातले एक अग्रगण्य नाव. व्याकरणशास्त्रांपासून ते पूर्वमीमांसेपर्यंत ते न्यायदर्शनापर्यंत ते दर्शनशास्त्रांपर्यंत नि वेद व वेदाङ्गांपर्यंत अगदी सर्वच विषयांत प्रवीण नि निष्णांत असं व्यक्तिमत्व ! विकीपीडियावर पंडितजींविषयी जी काही माहिती हिंदीत आहे, ती वाचनीय आहेच. पण ती सोडून सांगायचे तर पंडितजी वैदिक षड्वेदाङ्गे नि सर्वच वैदिक साहित्यावरील नि विशेषत: व्याकरण व मीमांसेवरील एक उत्तम भाष्यकार झाले. ब्राह्मणेन निष्कारणो धर्म: षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च। हे महर्षी पतंजलींचे वचन प्रत्यक्षात आचरण्यासाठी ज्या षड्वेदांगावर भाष्य करणं आवश्यक आहे, ते भाष्य पंडितजींनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून केलं. त्यांच्या ग्रंथसंपदेचा परिचय विकीपीडियावर आहेच. पण तरीही विशेष अधिक सांगायचे तर पंडितजींचा महाराष्ट्राशी छान संपर्क होता. मराठी भाषेचेही ज्ञान त्यांचं होतं. महर्षि दयानंदांच्या १८७५ साली झालेल्या पुण्यातील १६ व्याख्यानांचा मूळ हिंदीतून मराठीत झालेला अनुवाद व त्या पुन्हा मराठीतून पुन्हा हिंदीत विशुद्धानुवादाचे कार्य त्यांनी केलं. प्रबोधनयुगातील व्याख्यानमाला अथवा उपदेशमंजिरी नावाने हा ग्रंथ प्रकाशित आहे. जिज्ञासूंनी ह्याचा लाभ घ्यावा. मराठीत पीडीएफ आहेच. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी ही महर्षींची व्याख्यानमाला पुण्यात आयोजित केली होती हे विशेष. आईकडूनच गुरुकुलाची आवड पंडितजींचे पूर्वचरित्र सांगायचे तर त्यांच्या मातु:श्रींचीच इच्छा होती की आपल्या मुलाने गुरुकुलांतच वेदाध्ययन करावं. मृत्युसमयी त्यांनी तशी शपथच त्यांच्या पतींस घातली. त्यांच्या त्या अकाली निधनाने पुढे पिताश्रींनी पंडितजींना गुरुकूलात अध्ययनासाठी पाठविलं. धन्य ते मातापिता ! नाहीतर आजचे मातापिता ? असो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी । पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता। उभाभ्यां यस्य सम्भूति: तस्य नोच्चलते मन:। पदवाक्यप्रमाणज्ञ पंडित ब्रह्मदत्त जिज्ञासु व पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कौलर हे त्यांचे प्रमुख गुरुद्वय पंडित ब्रह्मदत्तजींकडे त्यांनी १४ वर्षे व्याकरण शास्त्र नि इतर वैदिक साहित्याचे अध्ययन केलं. दोघांनी मिळून व्याकरणांवर केलेलं अध्ययन ग्रंथरुपाने प्रकाशित आहे. संस्कृत पठनपाठन की सरलतम विधी नावाने दोघांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. पुढे रिसर्च स्कौलर नावाने प्रख्यात अशा पंडित भगवद्दत्तजींनीही त्यांस प्रवृत्त केलं. ह्या दोघांनी वैदिक व्याकरणांवर केलेलं कार्य पाहिलं की थक्क व्हायला होते. संस्कृत व्याकरणशास्त्र का इतिहास - तीन खंड पंडितजींच्या एकुण ग्रंथसंपदेपैकी किंवा त्यांच्या एकुणच जीवनातला सर्वोत्तम ग्रंथराज म्हणून वर्णन करायचे झाले तर हा त्रिखंडात्मक ग्रंथ पहावाच लागेल. संस्कृत व्याकरणशास्त्राचा वेदकाळापासूनच अतिशय विचक्षण नि चिकीत्सक इतिहास तोही तीन खंडात सतराशे पृष्ठांच्याअधिक संख्येत लिहिणं ही कृती त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतेच. ह्या ग्रंथातून त्यांनी संस्कृत भाषेविषयीच्या पाश्चात्य नि तदनुयायी एतद्देशीय विद्वानांच्या आक्षेपांच केलेलं सप्रमाण खंडन जसं चिंतनीय आहे, तद्वतच ते अभ्यासाच्या दृष्टीने अनुकरणीय आहे. विषयाच्या अगदी गर्भापर्यंत जाऊन चिकीत्सा करणे आर्य समाजी परंपरेचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अर्थात चतुर्वेदांविषयीची अक्षुण्ण नि एकमेव निष्ठा हे प्रमुख कारण. ह्याच ग्रंथात पंडितजींनी संस्कृतविषयी जे मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे, ते सर्व भाषाविदांनी लक्षात घेणं आवश्यकच आहे. आमच्या मागील वेदविषय-शंका समाधान लेखांक द्वितीय मध्ये आम्ही ते विस्ताराने दिलंय. तिथे वाचावे ही विनंती ! काशीमध्ये राहूनच त्यांनी सनातनी विद्वानांकडून मीमांसाशास्त्राचे केलेलं अध्ययन पूर्वमीमांसेतला तत्कालीन सूर्य अशी ज्यांची ख्याती होती असे महामहोपाध्याय पंडित अ. चिन्नास्वामी शास्त्री तथा पंडित पट्टाभिराम शास्त्री नामक सनातनी परंपरेतल्या व आर्य समाजाशी काहीविधेयांत तात्विक विरोध असलेल्या विचारधारेतल्या मीमांंसकांकडून ह्या शास्त्राचे गहन अध्ययन केल्यामुळे त्यांचा ह्या शास्त्राविषयीचा अधिकार होता. आश्चर्य म्हणजे याच पंडित अ. चिन्ना स्वामींनी काशीच्या बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये स्त्रियांना वेदांचा शिक्षणाचा अधिकार सनातनी असूनही प्रदान केला होता. काशीमध्ये त्यांच्या ह्या निर्णयाने त्यावेळी गोंधळही उडाला होता. श्रौत यज्ञ मीमांसा परमादरणीय श्री करपात्री महाराजांच्या श्रौत यज्ञ मीमांसा ह्या वेदार्थ पारिजातमधील विभागाची समीक्षा करणारी ही पुस्तिका आहे. अतिशय न्यून मूल्यांत १००/- रुपयेंमध्ये ही उपलब्ध आहे.पीडीएफही आहे. श्रौत यज्ञासंबंधी विस्तृत विवेचन ह्या ग्रंथात आधी संस्कृत नि पश्चात हिंदी असे आहे. चित्र जोडलंच आहे. पंडितजींनी मीमांसेचे केलेले विचक्षण अध्ययन नि विशेषत: महर्षींनी सांगितल्याप्रमाणे मीमांसेवरील शाबरभाष्याचे त्यांनी केलेलं हिंदी भाष्य नि अनुशीलन ह्या सर्वांचा विचार ह्या ग्रंथात आहे. हे शाबरभाष्य मूळ संस्कृत आज सुदैवाने उपलब्ध आहे पीडीएफ. असो. आर्षमतवविमर्शिनी पंडितजींचे शाबरभाष्यांवरील सातखंडात्मक भाष्य ह्याच्या हिंदी अनुवादाचे सात खंड असून त्यावर त्यांची आर्षमतविमर्शिनी नावाची हिंदी टीकाही उपलब्ध आहे. अद्याप आम्हांस ही प्राप्त झालेली नाही. बघुया भविष्यांत होईलच. वैदिक छंदोमीमांसा व वैदिक स्वर मीमांसा पंडितजींचे आणखी दोन महत्वाचे ग्रंथ म्हणजे उपरोक्त. ह्या दोन ग्रंथामध्ये त्यांनी ह्या वेदाङ्गांविषयी केलेलं विस्तृत विवेचन वेदार्थ प्रतिपादनाविषयी अनुकरणीय आहे. छंदोमीमांसेच्या प्रस्तावनेत त्यांनी छन्द:शास्त्र का इतिहास हा ग्रंथ त्यांनी लिहिलाय व तो प्रकाशित होतोय असे लिहिलंय. आर्य विद्वानांना विनंती की हा ग्रंथ प्रकाशित झाला असल्यांस त्याच्या उपलब्धतेविषयी माहिती द्यावी ही विनंती. प्रकाशक संभवत: उपरोक्त दोन ग्रंथांप्रमाणेच रामलाल कपूर न्यासच(ट्रस्ट) असेल ह्यात शंका नाही. तरीही अन्य असेल तरीही सांगावे ही विनंती. मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामध्येयम् महर्षी दयानंदांच्या आधी वैदिक परंपरेत मंत्र नि ब्राह्मण दोघांसही वेद ही संज्ञा म्हणण्याची एक अंधपरंपरा निर्माण झाली होती. वास्तविक सायणाचार्यांनी स्वत: हा भेद स्पष्टपणे ग्रथित केला असूनही केवळ कात्यायन परिशिष्टांवर विसंबून राहून व कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित ग्रंथांवर अवलंबून राहून मंत्र नि ब्राह्मण दोघांनाही वेद ठरविण्याचा अट्टाहास गेली कैक शतके सुरु असताना महर्षींनी सर्वप्रथम त्यावर कठोर प्रहार केला. त्यांच्या ह्या मतांस पुष्टी देण्यासाठी पंडितजींनी हा ग्रंथ रचल्याचे त्यांच्या लेखनांत स्पष्ट होतंय. अस्तु ! ऋक्संख्या ऋग्वेदाच्या मंत्रांची संख्या निश्चित करणारा हा ग्रंथ आहे. कारण वेदमहर्षी सातवळेकरांच्या वेदभाष्यांतही व अन्य आर्य भाषातही काही ठिकाणी ऋग्वेदाच्या मंत्रसंख्येत क्रमभेद व संख्याभेद लक्षात आल्यावर आम्हाला गोंधळ निर्माण जो झाला होता, तो ह्या ग्रंथाच्या वाचनाने दूर झाला. ह्यात पंडितजींनी मंत्रसंख्येविषयी सुंदर चिंतन केलंय. ग्रंथ आमच्या संग्रही आहे. पीडीएफ एक प्रसिद्ध नि अति-महत्वाचा शास्त्रार्थ आर्य समाजी विद्वान वैय्याकरणी नि मीमांसज्ञ पंडित युधिष्ठिरजी मीमांसक विरुद्ध गोवर्धनपीठाचे श्रीशंकराचार्य आणि स्वामी श्रीकरपात्रीजी महाराज ह्यातून स्वत:ला श्रीशंकराचार्य म्हणविणारे नि परमादरणीय श्रीकरपात्रींसारखे लोकही शास्त्रार्थ करताना कसे पतंजली-पाणिनींना सुद्धा स्वत:च्या सोयीसाठी झिडकारतात हे दिसून येते. सत्य स्वीकारण्याची प्रवृत्ती ह्या स्वत:ला सनातनी म्हणविणार्यांमध्ये दुर्दैवाने नाही हे सिद्धय. अन्यथा पाणिनी पतंजलींनाही नकारण्याची प्रज्ञा ह्यांची झालीच नसती ? सर्वच असे आहेत असं मूळीच नाही पण निदान ह्या दोघांविषयी तरी दुर्भाग्य आहे. ह्याचे पीडीएफ आमचे एक ज्येष्ठ भ्रातासदृश विद्वान आचार्य वेदानुरागी विश्वप्रियजी ह्यांजकडून मूलत: नि पश्चात अमेरिकास्थित आमचे मित्र रणजीतजी ह्यांसकडून प्राप्त झाली त्यासाठी त्यांचे आभार ! आजच्या जयंतीदिनी त्यांचा हा शास्त्रार्थ चिंतनीय आहे. गुगल ड्राईव्हवर आम्ही तो संग्राह्य केला आहे. तो इथे प्राप्त होईल. https://drive.google.com/file/d/1wJreMQV4GUF9tbwjW5XZZuVwhQ8yGGpy/view?usp=drivesdk पंडित युधिष्ठिर मीमांसक ग्रंथावली त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित करण्यांत आलेल्या ग्रंथसंपदेतील प्रथम भागाचे अध्ययन करता आले. त्यात त्यांनी वेदार्थ की विविध प्रक्रियाओंकी ऐतिहासिक मीमांसा शीर्षकान्वये आतापर्यंतच्या वेदार्थ परंपरेविषयी उत्तम विवेचन केलं आहे. केवळ ७७ पृष्ठांचा हा ग्रंथ आहे. वेदांतले सर्व शब्द यौगिक अर्थात धातुज आहेत. ह्या ग्रंथात पंडितजींनी एक महत्वाचे प्रतिपादन केलंय, जे महर्षींनीही केलं होते, ते असे की वेदांत ऐतिहासिक अर्थ शोधणारे आधुनिक नि काही प्राचीन सोडले तर सर्वच परंपरांमध्ये प्राचीन काळी वेदार्थ प्रतिपादनांत यौगिक अर्थात धातुज अर्थच घेतला जायचा, ऐतिहासिक घेतला जातच नव्हता. म्हणजेच धातुनुसारच त्या वैदिक शब्दांचा अर्थ घेतला जायचा. कालांतराने वैदिक पदांचे रुढार्थ घेतल्याने योगार्थ बाजूंस पडून वैचित्रमत निर्मिती झाली. हे सांगण्यासाठी ते शर्ववर्मन रचित कालापतंत्र नावाच्या ग्रंथावरील दुर्गसिंह नावाच्या भाष्यकाराचे प्रमाण देताना लिहितात वृक्षादिदवदमी रुढा कृतिना न कृता कृत:। कात्यायनेन ते सृष्टा: विबुधप्रतिपत्तये। संक्षेपांत भावार्थ सांगायचा तर आदिकाळांत वेदार्थ प्रक्रियेत वैदिक शब्दांचे अर्थ हे यौगिकच अर्थात धातु पाहूनच केले जायचे. पण नंतर नंतर ते बंद झाले म्हणून वेदार्थांविषयी इतका गोंधळ मधील काळात निर्माण झालेला आहे. असो. क्षीरतरङ्गिणी नावाचा त्यांचा व्याकरणशास्त्रावरील पूर्ण संस्कृत ग्रंथही आम्हांस प्राप्त झाला परंतु अद्याप आम्ही तो वाचला नाही. पंडितजींची ग्रंथसंपदा निम्नलिखित संकेतस्थळांवरून प्राप्त करु शकता www.vedrishi.com आम्हीही इथूनच केलेली आहे व भविष्यांतही करणारच आहोत. आर्य समाजी विद्वानांची ग्रंथसंपदा ही अतिशय न्यूनातिन्यून मूल्यांत आहे हे विशेष आहे. १९८९ साली त्यांना वाराणशीच्या डॉ. संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाने महामहोपाध्याय ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. असो. वैदिक सिद्धांत मीमांसा - दोन खंड वैदिक सिद्धांत समजून घेण्यासाठी हे दोन खंड चिंतनीय आहेत. पीडीएफ आहेत. वेदाङ्ग प्रकाश - १६ खंड महर्षी दयानंदांनी वेदार्थ प्रतिपादनासाठी वेदाङ्ग प्रकाश नावाने जे १६ खंड लिहिले, त्याच सोळा खंडांवर आणखी विस्तृत भाष्य करून पंडितजींनी हे सर्व खंड पुन्हा संपादित केलेले आहेत. पंडितजींची आणखी काही ग्रंथसंपदा आहे जी विकीपीडियावर उपलब्ध आहे. परंतु आमच्या वाचनांत न आल्याने तींवर काही लिहणं युक्त नसल्याने थांबतो! व्याकरणांवर नि पूर्वमीमांसेवर ह्या विद्ववत्श्रेष्ठाने केलेलं कार्य पाहून ह्यांच्या चरणी कितीही दंडवत घातले तरी न्यूनंच ! अशा ह्या विद्वत्श्रेष्ठांस आज त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! 🙏🙏🙏 अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु । पाखण्ड खण्डिणी Pakhandkhandinee.blogspot.com #पण्डितयुधिष्ठिरजीमीमांसकजयंतीपूर्वमीमांसावेदआर्यविद्वानसंस्कृतव्याकरण_श्रीकरपात्रीमहाराज

No comments:

Post a Comment