Friday 17 August 2018

अटलस्य पश्य॒ काव्यं॒ न म॑मार॒ न जी॑र्यति । - लेखांक - प्रथम






अथर्ववेदामध्ये एक मंत्र आहे.

*ॐ अन्ति॒ सन्तं॒ न ज॑हा॒त्यन्ति॒ सन्तं॒ न प॑श्यति । दे॒वस्य॑ पश्य॒ काव्यं॒ न म॑मार॒ न जी॑र्यति ॥*

अथर्ववेद - १०.८.३२

*त्या देवाचे काव्य पहा जे कधीच जीर्ण होत नाही किंवा मरतही नाही. नाश पावत नाही.*

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांनी कवित्वाची लक्षणे सांगताना

*वाचे बरवें कवित्व ।*
*कवित्वीं बरवें रसिकत्व ।*
*रसिकत्वीं परतत्व ।*
*स्पर्श जैसा ।*

ज्ञानेश्वरी - १८-३४७

असे लिहिलंय.

आदरणीय श्री अटलजींच्या काव्यप्रतिभेचे चिंतन करताना ह्या उपरोक्त वचनांचा आधार घेण्याचा मोह टाळता येत नाही.

अगदी स्पष्टच आरंभी सांगायचे तर मला काव्यातलं क'ही कळत नाही. पण तरीही सिंबायोसिस महाविद्यालयांत असताना २००८ मध्ये आदरणीय अटलजींच्या *मेरी इक्यावन कविताएँ* हा काव्यसंग्रह वाचनांत आला. माझं भाग्य हे की आदरणीय अटलजी पंढरीत पंतप्रधान म्हणून आले असताना त्यांना पाहण्याचं भाग्य लाभलं. मी अगदी लहानच अकरा बारा वर्षांचाच होतो. लाडक्या पंतप्रधानाला समोर पाहणं हे खचितच स्वप्नपूर्तीचे लक्षण होतं. त्यावेळी अटलजींच्या कविता फारशा ज्ञातही नव्हत्या. पण पुढे सिंबायोसिस मध्ये त्या वाचल्या.

*अटलजींच्या वाणींस कवित्व, कवित्वांस रसिकत्व व रसिकत्वांस परतत्वाचा संस्पर्श होता. आणि हे परतत्व दुसरे आणखी काय असणार तर हे हिंदुराष्ट्रीयत्वच ! हे राष्ट्रीयत्वच त्यांचे कवित्व, रसिकत्व व परतत्व संस्पर्शत्व होतं.*


*अथ काव्यलक्षणम् ।*

आमच्या प्राचीन शास्त्रकारांनी काव्य शब्दाची मीमांसा करताना अनेक व्युत्पत्या दिल्या आहेत. *साहित्यशास्त्रकार श्री मम्मटाचार्यांनी*

*तददोषौ शब्दार्थौ सगुणौ ।*

अर्थ - *काव्यगुणसंपन्न निर्दोष शब्दरचना, शब्दसंहितारचना म्हणजे काव्य होय.*

तर *संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांनी* ज्ञानेश्वरीच्या आरंभी मंगलाचरणामध्ये वेदस्वरुप सांगताना अर्थात वेदांचे अपौरुषेयत्व सूचित करताना *काव्याचे लक्षण* ही ध्वनित केलंय. ते म्हणतात

*हे शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।*
*जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।*

ह्यात निर्दोष शब्दरचना व लावण्याने नटलेली अर्थ शोभा हे काव्याचे प्रधान अंग सांगितलंय.

ह्याचेच पुढे चिंतन *रसगंगाधरकार श्रीजगन्नाथ पंडितांनी* करताना

*रमणीयार्थं प्रतिपादक: शब्द: काव्यम् ।*

अर्थ - *रमणीय अर्थ प्रतिपादन करणारी शब्द रचना म्हणजे काव्य होय.*

अटलजींच्या काव्यप्रतिभेचे चिंतन करताना *साहित्यदर्पणकार* आचार्य श्रीविश्वनाथाच्या *साहित्यसुधासिन्धु* ह्या ग्रंथाचे स्मरण होतं. तो लिहितो

*जायते परमानन्दो ब्रह्मानन्दो सहोदर: ।*
*यस्य श्रवणमात्रेण तद्वाक्यं काव्यं उच्चते ।*

*काव्य कशांस म्हणावं ? विश्वनाथ लिहितो की ज्याच्या श्रवणमात्रानेच ब्रह्मानंदासह त्याचा सहोदर परमानंदांसही आपण प्राप्त होतो, त्यांस काव्य म्हणावं.*


इथे अटलजींच्या व आम्हा रसिकांच्या दृष्टीनेही जो ब्रह्मानंद व त्याचा सहोदर परमानंद आहे, त्याचा *प्रतिपाद्य विषय हा साक्षात हे प्राणप्रिय हिंदुराष्ट्र, ही भारतमाता आहे.* अगदी सावरकरांच्या भाषेत

*तूंतेचीं अर्पिलीं नवी कविता रसाला ।*
*लेखाप्रति विषय तुंचि अनन्य जाहला ।*

इथे अटलजींच्या काव्याचा चिंतनाचा विषय वर सांगितल्याप्रमाणेच केवळ राष्ट्रच आहे. तोच एक अनन्य विषय आहे.

*काव्ये नवरसात्मक: ।*

काव्य हे रसात्मक आहे. हे रस नऊ आहेत असे वचन आहे. भरतमूनी मात्र त्याच्या नाट्यशास्त्रांत *अष्टौ नाट्ये रसास्मृता* अर्थात आठच रस मानतो. पण ह्यात एका *आणखी दोन रसांची भर आमच्या गुरुदेवांनी परमादरणीय श्री किसन महाराज साखरेंनी घातलेली आहे.* जिज्ञासूंनी त्यांचा *नवरसीं भरवीं सागरु* हा त्यांचा ग्रंथ वाचावा. असो. ह्या रसांचे चिंतन करताना गुरुदेव लिहितात की 

*हा रसभाव पूर्ण विदग्धवृत्तीनें अर्थात ह्रदयांस भिडून त्याचे विवक्षित परिणाम श्रोत्यांवर होतील, अशा शहाणपण लाभलेल्या चातुर्याने वर्णिलें आहेत ज्ञानोबारायांच्या साहित्यात.*



आदरणीय अटलजींच्या काव्यातही हे नऊरसांपैकी काही रस आपणांस दृष्टिपथांत येतातच. त्यांपैकीच काहींचे चिंतन इथे प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे. प्रामुख्याने अटलजींच्या काव्यामध्ये वीर, करुण, अद्भूत, रौद्र, वात्सल्य व शांत रस येतात. ह्यातला वात्सल्य हा आविष्कार श्रीगुरुदेवांचाच आहे. असो.

येत्या लेखमालेंत ह्याचा काहीसा विचार करण्याचा आमचा हेतु आहे.

अगदी आरंभीच म्हटल्याप्रमाणे मला काव्यातलं क ही कळत नाहीच. तरीही गेली दीडच्या समीप दशक ह्या तरल प्रतिभेच्या नि कविमनाच्या अजातशत्रु राष्ट्रनेत्याचे हे काव्यचिंतन श्रवण करतो आहे. म्हणून माझ्या अल्पबुद्धिनुसार ह्या राष्ट्रपुरुषांस एक आदरांजली वाहण्याच्या हेतुने हा लेखनप्रपंच !

पुढील लेखांत भेटुच !

क्रमश: ।

भवदीय,

तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#अटलजी_बिहारीवाजपेयी_पंतप्रधान_राष्ट्रपुरुष_राष्ट्रनेता_कवित्व_रसिकत्व_राष्ट्रीयत्व_हिंदुत्व_नऊरस

No comments:

Post a Comment