Sunday 24 September 2017

वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक एक - वेदपरिचय



शारदीय नवरात्रोत्सवामित्त लेखमाला

वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक एक - वेदपरिचय
यः पा॑वमा॒नीर॒ध्येत्यृषि॑भिः॒ संभृ॑तं॒ रसं॑ ।
सर्वं॒ स पू॒तम॑श्नाति स्वदि॒तं मा॑त॒रिश्व॑ना ॥
पा॒व॒मा॒नीर्यो अ॒ध्येत्यृषि॑भिः॒ संभृ॑तं॒ रसं॑ ।
तस्मै॒ सर॑स्वती दुहे क्षी॒रं स॒र्पिर्मधू॑द॒कं ॥
ऋग्वेद - ९.६७.३१-३२
जो परमेश्वरस्तुतीरुप ऋचांचे पठण करतो तो मंत्रद्रष्ट्याऋषींपासून स्पष्ट झालेल्या ब्रह्मरसास (ब्रह्मानंदांस) भोगतो आणि समग्र वायुंनी स्वादुकृत पवित्र पदार्थांचे भोग घेतो. त्यांस जणु सरस्वती किंवा ब्रह्मविद्या साक्षात् मातेसमान दुध, तुप, मध आणि नानाप्रकारच्या रसांचे दोहन करून ते प्राप्त करून देते !( हे वर्णन अलंकारिक आहे)
श्रुण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा: !
वेदभगवान सर्वांस अमृताचे पुत्र अशी उद्घोषणा करतो. व हाच वेद भगवान आम्हांस
ओ३म् इन्द्रं॒ वर्ध॑न्तो अ॒प्तुर॑: कृ॒ण्वन्तो॒ विश्व॒मार्य॑म् । अ॒प॒घ्नन्तो॒ अरा॑व्णः ॥
ऋग्वेद - ९.६३.५
म्हणजे सर्वविश्वांस आर्य अर्थात निरुक्तकारांनी म्हटल्याप्रमाणे "आर्य्य: ईश्वरपुत्र:" म्हणजेच ईश्वराचे किंवा अमृताचे पुत्र किंवा पुत्री व्हा अशी आज्ञा देतो. हाच ऋग्वेद आम्हांस
मनुर्भव अर्थात मनुष्य बन अशी आज्ञा देतो व हाच ऋग्वेद ह्याच वेदांमध्ये सर्वत्र एकांच परमात्म्याचे अर्थात त्या ईश्वराचे चिंतन आहे असे सांगताना
ओ३म् इन्द्रं॑ मि॒त्रं वरु॑णम॒ग्निमा॑हु॒रथो॑ दि॒व्यः स सु॑प॒र्णो ग॒रुत्मा॑न् । एकं॒ सद्विप्रा॑ बहु॒धा व॑दन्त्य॒ग्निं य॒मं मा॑त॒रिश्वा॑नमाहुः ॥
ऋग्वेद - १.१६४.४६
ईश्वर एकच आहे परंतु त्यांस विद्वांन अनेक नावांनी ओळखतात हीच आज्ञा देतो. अशा ह्या साक्षात् ईश्वरकृत वेदवाणीचा प्रथम परिचय देण्यासाठी हा आरंभी लेखनप्रपंच !
ह्या वैदिक स्त्री-दर्शन लेखमांलेस आम्ही नाव दिल्याप्रमाणेच वेदांमध्ये स्त्रीविषयी काय चिंतन आहे हेच स्पष्ट करणार आहोत. वेद ही संज्ञा आम्ही आमच्या आधीच्या अनेक लेखांत सांगितल्याप्रमाणे केवळ चार मंत्र संहिता अर्थात मंत्रभागांसाठीच आहे. वेदांचा अभ्यास करताना मूळ संहिता भाग, त्यावरचे भाष्य ग्रंथ असे ब्राह्मणग्रंथ, त्यांचाच अंतिम भाग असे उपनिषदे व आरण्यके असे चार साहित्य अभ्यासावी लागतात. त्यापैकी अनेक लोक चारींनाही वेद अशी संज्ञा देतात की जे पूर्णत: सैद्धांतिक दृष्ट्या चूक व अप्रमाण आहे. काही लोक ब्राह्मणग्रंथांनासुद्धा वेद ही संज्ञा देतात ज्यासाठी हे लोक कातंयायन ऋषींच्या "मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामध्येयम्" ह्या परिशिष्टांतला संदर्भ देऊन त्यांनाही वेद ही संज्ञा देतात की जे सर्वस्वी विरुद्ध व अप्रमाण आहे. येंविषयी सविस्तर भाष्य आम्ही कधीतरी करुच. पण तत्पूर्वी वेद ही संज्ञा केवळ नि केवळ चारी मंत्रसंहितांनाचा असून चार वेदांच्या संहिताभाग हाच तो केवळ अपौरुषेय अर्थात ईश्वरकृत भाग अर्थात वेद असून इतर सर्व ग्रंथ, म्हणजे सर्वच्या सर्व परवर्ती ग्रंथ हे ऋषिकृत किंवा मनुष्यकृत असल्याने ते सर्व जितके वेदानुकूल तितकेच ग्राह्य मानतो. पण ह्या लेखमालेंत केवळ चार संहिताभागांचाच विचार होणार असल्याने इतर ग्रंथांची चर्चा करण्याची आवश्यकता नसली तरी आरंभी नेमकी भूमिका प्रकट करणे आवश्यक असल्याने हा लेखनप्रपंच ! ह्या लेखमालेंत वादविवादासाठी आम्हांस रस नसल्याने ज्यांना वेदांविषयी आशंका आहेत त्यांना आमची भूमिका स्पष्ट व्हावी म्हणूनच हे लिहितोय. असो !
कोणताही ग्रंथ अपौरुषेय कसा काय असु शकतो, तो मानवकृत का असु शकत नाही, वगैरे वगैरे वादांसाठी स्वतंत्रपणे संवाद करता येईल. त्यासाठी आम्ही कधीही तयार असलो तरीही प्रस्तुत लेखमालेसाठी तो भाग तूर्तास आम्हांस संवादासाठी नको असल्याने ह्या विधेयांवर सांप्रत तरी वाद नको आहेत. स्वतंत्रपणे ही चिकीत्सा कधीही करता येईल ही विनंती.
तेंव्हा हा प्रथम लेख हा केवळ भूमिका मांडायसाठी लिहिला असून स्त्रीदर्शनाचे दिग्दर्शन व चिंतन पुढील लेखांपासून आरंभ होईल. नेमके किती लेख होतील ह्यांची आम्ही काही निश्चिती केलेली नसल्यामुळे जे काही सुचतंय त्यानुसार त्या ईश्वरेच्छेने लिहिण्याचा प्रयत्न ह्यांत करणार आहोत. आमच्या हातून अनुवादांस काही त्रुटी राहिल्यांस विद्वानांनी आमचा कान धरावा ही विनंती ! पण तेही केवळ प्रमाण देऊनच हेही न सांगणे लगे !
शेवटी जाताजाता हे सांगणे आवश्यक आहे हे सर्व लिहिण्यामागे आमची स्वत:ची काडीमात्र विद्वत्ता, बुद्धी किंवा व्यासंग वगैरे काहीही नसून जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत
फोडिले भांडार, धन्याचा हा माल !
मी तों हमाल, भार वाहें !
हीच भूमिका राहणार आहे व शेवटपर्यंत राहीन. अनेक वेदवेत्त्या महर्षींपासून ते आत्ताच्या महर्षि दयानंद, महर्षि कात्यायन, भगवान पाणिनी, महर्षी पतंजली, सर्व वैदिक षड्दर्शनकार महर्षि, महर्षि सातवळेकर ह्या सर्वांच्या अभ्यासाने मला जे काही कळलं ते मांडायचा प्रयत्न करणार आहे. मी अल्पज्ञ व शुद्र व अज्ञानी आहे तरी ही सेवा गोड मानावी ही विनंती !
अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !
भवदीय,
©तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

No comments:

Post a Comment