Tuesday 11 April 2023

हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम...


 

कन्दर्प अगणित अमित छवि नवनीलनीरद सुन्दरम्...|


तो कसा आहे, कसा दिसतो, कसा हसतो, कसा चालतो हे कुणाला माहितीय? ज्यांना त्याचं दर्शन झालं, त्या श्रीतुलसीदास, श्रीरामदास, श्रीज्ञानोबा-श्रीतुकोबारायांनाच, श्रीनामदेवरायांस, श्रीचोखोबारायांस, श्रीब्रह्मचैतन्यालाच तो कळला, ओळखता आला, पाहता आला, अनुभवता आला, चित्तात साठवता आला...


राम समजून घ्यायचाच असेल तर श्रीतुलसीदास नि श्रीरामदास वाचलेच पाहिजेच...आणि आत्ताच्या काळात तुलसीपीठाधीश्वर श्रीरामभद्राचार्यजी...! 


अनुभव चित्ता चित्त जाणें...!


तो कन्दर्प कोटी कमनीय आहे. अरे पण कन्दर्पाला कुणी पाहिलंय का? ज्याची उपमा द्यायची ते उपमानंच मूळात जिथे माहिती नाही, पाहिलं नाही, अनुभवलं नाही, तिथे त्यावरून उपमेयाची कल्पना कशी येईल? पण मग म्हणून तो नाहीयेच का? 


तो आहे इतकंच निश्चित! ज्याने श्रद्धेने त्याचं नाम घेतलं, त्याला सतत आळवलं, त्याला तो भले लगेचंच दिसणार नाही, पण त्याची जाणीव तरी खचितंच होईल. आपल्या अंतरात्म्यात एकदा शांतपणे डोकावून पाहिलं तर त्याच्या नामात तो प्रचित होईलंच. कारण नाम आणि नामी अभिन्न आहेत. नाम हे सार, ह्रदयी जपा निरंतर| म्हणूनंच तो अनिर्वचनीय आहे. कारण तो त्याच्या नामातंच आहे...


कुठल्याही संतांचं चरित्र पाहिलं तर झाडून सर्व संत एकंच सांगतात 


नाम घ्या...


श्रीमाऊलीं म्हणतें


तें नाम सोपें रें रामकृष्णगोविंद|

वाचेंसीं सद्गद जपें आधीं|

नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा|

वाया आणिका पंथा जाशीं झणें|


नामंच सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे अन्य मार्ग तुच्छ आहेत असं थोडीचंय? मग असं असूनही संत नामंच का सांगत असतील? संतांना महर्षि पतंजलींचा मूळ वेदप्रणीत योगमार्ग माहिती नव्हता? माऊली तर स्वत: नाथपंथी. मग संतांनी नामंच घ्यायला का सांगावं???


अर्थात पुढे जाऊन योगसाधनेनेच अंतिम ईश्वरप्राप्ती होते हे संतसाहित्य बारकाईनं पाहिलं तर खरं कळेलही. पण तो फार पुढचा विषय. त्याच्या आधीचा पाया नाम आहे. कारण त्याने चित्तशुद्धी होते म्हणून. 


जन्माला आल्यावर पुढे कळायला लागलं की आई म्हणते हाच तुझा बाप. तिथे पितृनिर्णयात मातृवाक्य जसे शब्दप्रामाण्य म्हणून अटल प्रबल प्रमाण असतं तद्वतंच धर्मजिज्ञासेंत संतवाक्य, ऋषिवाक्य प्रबल असतंच असतं. तिथे जास्ती शहाणपणा चालत नाही. चालवला तर माती होते.


पण नाम किती घ्यावं?


जन्मभरीच्या श्वासाइतुकें मोजियेलें हरिनाम|


दिवसभराचे २१,६०० श्वास, वर्षभराचे गुणिले ३६५ किती होतील, संपूर्ण आयुष्याचे किती? प्रत्येकाने गणित करावं आणि आपआपला मेळ घालावा. म्हणूनंच जपमाळेची संख्याही १०८च का? दिवस किंवा रात्रभरात २०० माळा झाल्या की २१,६०० आपोआप होतात. म्हणून १०८. अन्यही प्रमाण आहेत पण इतकं सोप्पंय समजायला. आता संतांनी सगळं इतकं सोप्पं गणित मांडून ठेवूनही आपल्याला संदेह असेल तर आपल्यासारखं करंटे कोण असावं? 


बाकी श्रीरामनामाचा किंवा आपल्या कोणत्याही ईष्टदेवतेचा जप ३ कोटी काय अन् १३ कोटी काय ! कोण मोजत बसतंय? एवढा वेळ कोणालाय? मोजणारा तो आहे, तो मोजेल की. ह्रदयस्थ श्रीराम किंवा अंतरात्मा आहे. संख्येत कशाला अडकायचं?


माझा इतका जप झाला, तितका जप झाला, इतका राहिला, तितका राहिला? कशाला हा फुकटचा दंभ? 


त्याच्या नावात जे सुख आहे ते अनुभवणं महत्वाचं नाही का? 


प्रियकर प्रेयसीला किंवा प्रेयसी प्रियकराला किंवा नवरा-बायको एकमेकांना सांगतात का की मी तुला इतक्या वेळा आय लव्ह‌ यु म्हणलो किंवा म्हणाले?


नाम जपतें रहें, काम करतें रहें|


श्रीसमर्थ म्हणतात


अखंड नाम स्मरावें, परीं दुसरीयासी कळों नेदावें|

निदिध्यास लागलिया राघवें, पाविजें तात्काळ|

काही साक्षात्कार झाला, तो सांगु नयें दुसरियाला|

जरीं आळकेपणें सांगितला, तरीं पुन्हा होणार नाही|

पुन्हा साक्षात्कार कैंचा, जाला तरी वरपंगाचा|

हां मी आपुलें जीवाचा, अनुभव सांगतो|


ह्यातली पहिलीच ओळ महत्वाची आहे. अन्य फारशी नाही. कारण काही झालं की सांगायची फार हौस असते.‌ लगेचंच मी कसा साक्षात्कारी, मला किती अनुभव, ह्याचा दृष्टांत त्याचा दृष्टांत वगैरे वगैरे ...


लेखणींस विराम श्रीमाऊलींच्याच शब्दात करतो. म्हणूनंच ती म्हणते,


ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं|

धरोनि श्रीहरीं जपें सदा|


एक तत्व नाम दृढ धरी मना...


तो दिसावा कळावा हाच तर अट्टाहास आहे. कारण तो कसा आहे हे तोच आता सांगेल. 


आमचे आबा श्री. नितिन भानुशाली म्हणतात, तसंच


#भगवंत_ह्रदयस्थ_आहे..


हे सगळं आज‌ लिहायचं कारण कुणीतरी तो कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रकाशित केलेला (एआयचा-Artificial Intelligence) फोटो श्रीरामाचा म्हणून फिरवलाय सर्वत्र. आह्मांस तो मान्य नाहीच इतकंच कारण तो कुठेही श्रीरामचंद्रांच्या वर्णनाशी जुळत नाही. पण ठीकंय, ज्याची त्याची श्रद्धा...!


भवदीय...


#श्रीराम_नामस्मरण_रामोपासना_साक्षात्कार_अध्यात्म_संतवचन


No comments:

Post a Comment