Friday 19 August 2022

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ|


 



भगवान योगेश्वराच्या चरित्रांतला हा एकंच प्रसंग...एकंच एकंच...


जो अभ्यासताना, वाचताना, लिहिताना, सांगताना अंत:करणाची काय अवस्था होते हे शब्द धजावंत नाहीत व्यक्त व्हायला. मी मूळ महाभारत पूर्ण संस्कृत संहिता व हिंदी अनुवाद पूर्ण अभ्यासलं जेंव्हा होते, तेंव्हाही हा प्रसंग वाचल्यावर काही क्षण अक्षरश: नि:शब्द झालो होतो.‌ डोळ्यांतून अश्रुपात‌ तर होताच पण कंठही अवरुद्ध झाला होता. त्यावेळी अंत:करण योगेश्वराच्या अलौकिक दिव्य आभेने ज्या प्रकारे व्यापून गेले होते, त्याचं शब्दांत वर्णन करणं माझ्याच्याने तरी संभवंच नाही. मागील वर्षी पूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींच्या (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले उपाख्य अप्पा) 'भगवान श्रीकृष्ण एक दर्शनाचे' चिंतन करतानाही ग्रंथाचा अंतंच पूज्यनीय अप्पांनी ह्याच प्रसंगाने केला असल्यामुळे ह्यावर बोलताना प्रचंड रडलो होतो. अप्पांनी हा प्रसंग काय रंगवलाय बापरे...! अप्पांच्या प्रतिभेंस दंडवत...! अप्पा आज जीवित असते तर मी त्यांच्यासमोर हे वाचत वाचत धाय मोकलून रडलो असतो. चारित्र्यनिर्माण काय असतं, प्रसंग असा आहे...


आत्ता हे लिहितानाही कंठ अवरुद्ध आहे...


अश्वमेधिक पर्वातले श्रीकृष्णांचे आणखी एक ब्रह्मचर्याचे उदाहरण


अश्वत्थाम्याने आपल्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेण्याच्या दृष्टीने द्रौपदीच्या पाच पुत्रांची ते पांडवंच आहेत असे समजून रात्रीच्या वेळी झोपेतंच निर्मम हत्या केली. पण ते पांडव नव्हते हे कळल्यावर त्याचा क्रोध शांत व्हायच्या पेक्षा अधिकंच वाढला नि सुडाग्नीने त्याने पांडवांचा वंशंच नष्ट करायचे ठरवले व त्यासाठी त्याच्याजवळ असलेले ब्रह्मशिरास्त्र नामक अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडले. हे तेच ब्रह्मशिरास्त्र आहे जे‌ त्याने पूर्वी भगवान योगेश्वरांस देऊ केले होते व त्याबदल्यात त्यांचे सुदर्शन मागितले होते. आमच्या आधीच्या‌ कैक लेखांमध्ये तो प्रसंग आह्मीं मांडला आहे तेंव्हा पुनरुक्ती करत नाही. त्या जणु विश्वसंहारक अशा अस्त्राने उत्तरेच्या गर्भावर जाताच त्यातून भविष्यांत जन्माला येणारे मुल जे पुढे परीक्षित (विष्णुरात) नावाने ओळखले गेले, ते त्या अस्त्राच्या प्रभावाने मृत म्हणूनच जन्माला आले. श्रीमद्भगवतामध्ये भगवंतांनी गर्भामध्ये जाऊन त्याचे रक्षण केलं म्हणून त्याचे नाव विष्णुरात पडले अशी कथा आहे पण ती निखालस‌‌ खोटी आहे हेच‌ सिद्ध होते. कारण जर‌ परीक्षितीचे रक्षण भगवंतांनी त्या अस्त्राने गर्भातंच केले असते तर बाहेर आल्यावर ते मृत असायला नकोच होते. व पुढील‌ कथाविस्ताराला महाभारती विपर्यास निर्माण होतो. आणि आह्मांस महाभारत अधिक प्रमाण आहे, भागवत नाही. त्यातही भगवंतांचे प्रत्यक्ष शब्द सर्वोच्च...! असो.


परीक्षित ह्या शब्दाच्या अनेक निरुक्त्या व त्यातून निघणारे अनेकार्थ आहेत, त्यावर सविस्तर कधीतरी. मृत बालकांस जीवित कोण करणार? एवढं सामर्थ्य कुणामध्ये ? तेंव्हा पांडवांचा हा वंश खुंटणार की काय ह्या भीतीने सर्व पांडवपक्षातल्या स्त्रिया विलाप करीत असताना द्रौपदी मात्र योगेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या आगमनाची वाट पाहत बसली. कारण तिला माहिती होते‌ केवळ भगवानंच ह्यातून आपणांस सोडवतील. भगवान तिथे येताच ती त्यांस म्हणाली...


“यादवश्रेष्ठा कृष्णा, अरे तु दिलेले वचन पूर्ण करशील ना? तु पराक्रमी, धर्मवेत्ता सत्यप्रतिज्ञ आहेस. त्रिभुवन सारे मृत झाले तरी त्याला जीवित करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. मग भाच्याच्या मुलाला जीवित करण्याचे तुला काय कठीण आहे? तुझे सामर्थ्य ज्ञात असल्यानेच तुझ्यापुढे हे हात जोडून मी मागणे मागत आहे.”


पुढे उत्तरेनेही भगवान श्रीकृष्णांची करुणा भाकल्यावर त्यांनी तिला अभय देताना म्हटले. हे जे श्लोक आहेत ना ते सुवर्णाक्षरांत नोंदवावेत..! भगवान म्हणतात


न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेतद्भविष्यति |

एष सञ्जीवयाम्येनं पश्यतां सर्वदेहिनाम् ||१८||

नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन |

न च युद्धे परावृत्तस्तथा सञ्जीवतामयम् ||१९||

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ |

तथा मृतः शिशुरयं जीवतामभिमन्युजः ||२२||


महाभारत भांडारकर प्रत – अश्वमेधिक पर्व - अध्याय ६८


अर्थ - उत्तरे, माझे भाषण अन्यथा कधी होणार नाही; ते सत्यच होईल...मी आजवर कधी थट्टेनेही असत्य भाषण केले नाही, ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन केले आहे, कधी युद्धांत पाठ दाखविली नाही. तरी त्या पुण्याने हा बालक जीवित होवो ! सत्य आणि धर्म जर माझ्या ठायीं असतील तर हा अभिमन्यूपुत्र जीवित होवो !!!”


अरे चारित्र्य यापेक्षा वेगळं काय असतं? का नाहीत हे प्रसंग शालेय अभ्यासक्रमांत?? का सांगत नाहीत आमचे कथाकार हे प्रसंग???


इथे ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन आणि सत्यनिष्ठा हे शब्द सर्व काही सूचित करणारे आहेत. त्यामुळे आणखी काही संदर्भ द्यायची आवश्यकता मला तरी वाटत नाही ! वाचक सुज्ञ आहेत !!!


विवाहापूर्वी १२ वर्षे‌ स्वपत्नीसह नैष्ठिक ब्रह्मचर्य‌ हिमालयांत पालन केलेला व पुन्हा आयुष्यभर गार्हस्थ्य ब्रह्मचर्याचे पालन केलेला हा भगवान...!


भगवान हा‌ शब्द प्रत्येकवेळी ईश्वरी अवतारासाठीच‌ वापरला जातो असे नव्हे बरंका...! नाही म्हणजे सांगितलेलं बरं...! नाहीतर पुन्हा आह्मांस शब्दांत पकडायला यायचे‌ काहीजण. असो...


अशा योगेश्वराच्या चरित्राचे चिंतन नि अनुकरण कधी करणार आहोत ?


काय तर म्हणे श्रीकृष्णाचे अनुकरण करु नये, अनुसरण करावं ? का? त्यांनी केलेले ब्रह्मचर्य पालन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले वेदाध्ययन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले आजीवन सत्यवचनाचे व्रत आम्ही नाही आचरु शकत ? 


केवळ श्रीकृष्ण कथा करायच्या, जन्माष्टम्या करायच्या, दहीहंडी नाचवायच्या, पण आचरण ???


जन्माष्टमीच्या‌ निमित्ताने एवढी एक कथा आयुष्यभर चिंतनांस ठेवली तरी पुरेसं...!


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com 


#भगवान_श्रीकृष्ण_योगेश्वर_ब्रह्मचर्य_पुराण_महाभारत_जन्माष्टमी_गोकुळाष्टमी_अश्वत्थामा

Thursday 11 August 2022

संस्कृत दिवस संस्कृतसप्ताह - लेखांक प्रथम

 


आज‌ श्रावण पौर्णिमा, नारळीपौर्णिमा, राखीपौर्णिमा अर्थात संस्कृतदिवस...! परवा म्हटल्याप्रमाणे आजपासून संस्कृत भाषेंवर लेखन आरंभ....

*भाषा कशाला म्हणायचं???*

*स्फुटवाक्करणोपात्तो भावाभिव्यक्तिसाधक:|*
*संकेतितो ध्वनिव्रात: सा भाषेत्युच्यतेबुधै:|*
पद्मश्री डॉ. कपिलदेव द्विवेदी

स्फुट वाणीने बनलेली, भाव अभिव्यक्तीचे साधन असलेली, वैविध्यपूर्ण संकेत नि ध्वनी असलेली अशी जी अभिव्यक्ती, तिला विद्वान लोक भाषा म्हणतात.

नामानि सर्वाण्याख्यातजानीति शाकटायनो नैरुक्तसमयश्च| निरुक्त १|१३

नाम च धातुजमाह निरुक्ते व्याकरणे | व्याकरणमहाभाष्य ३|३|१

संस्कृत भाषेमध्ये कुठलाही शब्द हा आख्यातज म्हणजे धातुपांसून निष्पन्न आहे असे निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्यांचं नि श्रीशाकटाचार्यांचे मन्तव्य आहे. उगाचंच रला र आणि टला ट असा काहीही प्रत्यय‌ किंवा अक्षर लावून संस्कृत भाषेमध्ये कोणताही अशास्त्रीय शब्द तयार होतंच नाही. आह्मीं आजपर्यंत कैकवेळा लिहिलं आहे व बोललोही आहोत की संस्कृत भाषेमधला प्रत्येक शब्द हा धातुज असतो. म्हणजेच‌ विशिष्ट धातुंपासून तो प्रक्रिया होऊन निर्माण होतो. म्हणजेच या सर्व शब्दांची मूल प्रकृती म्हणजे धातु आहेत. आणि हे मत आमचं स्वत:चे नसून वर दिलेलं महर्षि श्रीयास्काचार्य नि भगवान महर्षि पतंजलीसदृश दिग्गजांचं आहे. भगवान महर्षि श्रीपाणिनींनी त्याच धातुपाठाचे‌ संकलन केलं असून त्यावर त्यांची अष्टाध्यायी सर्वांना परिचित आहेच. त्यांनी या‌ धातुंचे एकुण ११ गण केलेलं असून त्यावर भगवान महर्षि श्रीपतंजलींचे व्याकरण महाभाष्यही प्रसिद्ध आहे. त्यातलंच प्रमाण वर दिलं आहे.

याच धातुपाठामध्ये भ्वादि गण नावाचा एक गण आहे ज्यामध्ये भाषा हा शब्द 'भाष् व्यक्तायां वाचि|' (१|४०७) ह्या धातुपासून निष्पन्न होतो ज्याचा अर्थ आहे 'भाष्यते व्यक्तवागरुपेण अभिव्यंजते इति भाषा| '. व्यकीच्या वाणीरुपाने अभिव्यक्त होणारी, भाषित होणारी ती भाषा...! म्हणजेच भाषा शब्द हा मूळ धातुज असून त्याचा अर्थ काय होतो हे आपण पाहिले.

आता भाषा कशी निर्माण होते असा प्रश्न पडतो. अनेकांनी अनेक प्रकारे ह्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. पण बव्हतांश जणांनी डार्विनच्या विकासवादावर आधारित‌ मते मांडलेली असल्यामुळे ती मते अत्यंत अशास्त्रीय आहेत. नि म्हणूनंच अग्राह्य आहेत. त्यांच्या मते माणुस हा सर्वप्रथम वनामध्ये जनावरांप्रमाणे अत्यंत अप्रगत अवस्थेत राहत होता.‌ त्याला बोलायचं कसं हेदेखील माहिती नव्हतं म्हणे. मग तो हळुहळु आजुबाजुच्या पशुपक्ष्यांची वगैरे भाषा पाहून, आवाज ऐकून स्वत:चे‌ शब्द, हावभाव, संकेत वगैरे विकसित करु लागला व हळुहळु त्याला बोलायला यायला लागलं म्हणे व त्याने त्या बोलीभाषेतून भाषा‌ विकसित केल्या म्हणे. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी भाषेच्या उत्पत्तीसंबंधी इतके हास्यास्पद नि तर्कहीन सिद्धांत मांडून ठेवले आहेत‌ की बास. म्हणूनंच भाषाशास्त्रासंबंधी नि तिच्या विज्ञानासंबंधी आपल्या प्राचीन शास्त्रकारांनी जी मते मांडली आहेत ती अभ्यासणं महत्वाचं आहे. भाषेच्या अध्ययनाच्या दृष्टीने वैदिक नि तत्सम सर्व प्राचीन संस्कृत वाङ्मयाच्या आलोडनाची जितकी आवश्यकता आहे, तितकी अन्य कशाचीच नाही. आणि तीही शुद्ध भारतीय वैदिक दृष्टिकोनातून. स्फोटायन=कक्षीवान् (द्वापराच्या पूर्वीचा काळ), औपमन्यव, औदुंबरायण(विसं ३१००पूर्व) महर्षि यास्क (विसं ३१००पूर्व), महर्षि वेदव्यास (विसं ३०४४पूर्व), व्याडि(२९०० विसंपूर्व), पतंजलि (विसं१५००पूर्व), भर्तृहरि (विसं ८००पूर्व) ह्या सर्वांनीच भाषेच्या उत्पत्तीचा इतिहास अगदी अनविच्छिन्न स्वरुपामध्ये शब्दबद्ध ठेवलेला आहेच मूळातंच, जो एकमात्र सूक्ष्म तर्क-युक्त, सत्य आणि विज्ञानसिद्ध सिद्धांतारुढ आहे. यात विक्रम संवतापासून तितकी वर्षे पूर्व असा अर्थ अभिप्रेत आहे. आता विक्रम संवत कोणतं ते वाचकांना सांगायची आवश्यकता नसली तरी सांगतो. इसवी सन पूर्व ५६ ला जो विक्रमादित्य राजा सिंहासनारुढ झाला, त्याने त्याचे संवत सुरु केलं. आजचं संवत २०७८ सुरु आहे. आपण हिंदु लोक नित्याच्या‌ संकल्पामध्ये हे गातो.

आता हा इतिहास कळायचा कसा?‌ वर नावे तर सांगितली पण साहित्य कोणतं अभ्यासायचं? त्यासंबंधी निम्मलिखित विस्तार

१. समस्त शिक्षाग्रंथ(पाणिनीय शिक्षा, याज्ञवल्क्य शिक्षा वगैरे) आणि त्यांची व्याख्या किंवा त्यावरील भाष्ये
२. समस्त संस्कृत‌व्याकरणशास्त्र तथा त्यावरील व्याख्या
३. मीमांसा ग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
४. निरुक्तग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
५. वैदिक शाखा, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद
६. प्रातिशाख्य आणि त्यावरील व्याख्या
७. भरत नाट्यशास्त्र नि त्यावरील व्याख्या
८. प्राकृत-पालि-अपभ्रंश व्याकरणावरील ग्रंथ नि त्यावरील व्याख्या

संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी, भाषा विज्ञान अभ्यासण्यासाठी इतकं सर्व अभ्यासणं आवश्यक आहे. आमचं दुर्दैव हे आहे की इतकं सर्व साहित्य आमच्याकडे असतानाही आह्मांस‌ ते अभ्यासु वाटत‌ नाही. आमच्या संस्कृत दिनाच्या तीन व्याख्यानांत संक्षेपाने हा विषय आह्मीं मांडला होता मागील वर्षी. भारतीय इतिहासाकडे विशुद्ध भारतीय दृष्टिकोनातून पाहणं आह्मांला जोपर्यंत जमणार नाही, तोपर्यंत आमच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबणार नाहीच.

आता संस्कृत भाषेचं नामकरण...

महत्वाचा प्रश्न पडतो की संस्कृत भाषेला संस्कृत हेच नाव का दिलं गेलं? अनेकांचा असा भ्रम आहे की संस्कृत ही संस्कार होऊन झालेली भाषा आहे म्हणून तिला संस्कृत म्हणतात. म्हणजे वर विकासवादाचे‌ जे मत मांडलं त्यानुसार आधीच्या अनेक बोलीभाषा किंवा अशुद्ध भाषांवर संस्कार होऊन परिशुद्ध झालेली भाषा म्हणजे संस्कृत होय असा अत्यंत हास्यास्पद नि भ्रममूलक‌‌ सिद्धांत बव्हतांश भाषाविद् मांडताना दिसतात. अगदी आरंभीच‌ सांगायचं तर संस्कृत ही‌ संस्कार होऊन निर्माण झालेली भाषा मूळीच नाही. मग तिला संस्कृत‌ हे नाव का दिलं गेलं? त्याचे उत्तर आहे

संस्कृतं नाव दैवी वागन्वाख्याता महर्षिभि:|
आचार्य दंडी - काव्यादर्श

महाकवी दंडी म्हणतात‌ की संस्कृत‌नामक दैवी वाणी जींवर महर्षींनी अनुव्याख्यान केलं. म्हणजे काय? तर इथे दैवी वाणी म्हणजे प्रत्यक्ष‌ वेद जिच्यापासून आपल्या ऋषि-महर्षींनी मानुषी वाणी निर्माण केली. म्हणूनंच तिला संस्कृत‌ हे नाव दिलं गेलं. वेद स्वत: सांगतो की

दे॒वीं वाच॑मजनयन्त दे॒वास्तां वि॒श्वरू॑पाः प॒शवो॑ वदन्ति|
ऋग्वेद ८|१००|११

अर्थ - देव ज्या‌ दिव्य वाणींस प्रकट करतात, तीच साधारण मनुष्य‌ लोक बोलतात...

इथे पशवो वदन्ति असा शब्द आला आहे.‌ पशवो म्हणजे पशु असा अर्थ नसून मनुष्य प्रजा असा आहे. कारण वैदिक साहित्यामध्ये अनेकठिकाणी पशु शब्द हा मनुष्यासाठी वापरला आहे.

अगदी महर्षि वेदव्यासांनीही श्रीमन्महाभारतामध्ये

*अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा|*
*आदौ वेदमयी दिव्या‌ यत: सर्वा: प्रवृत्तय:|*
शान्तिपर्व २३२|२४ - चित्रशाळा प्रेस संस्करण, पुणे

अनादि अशी जी नित्य अशी वाणी जी स्वयंभु म्हणजे ईश्वराने प्रवृत्त केली, ती आद्य अशी वेदवाणी जिच्यापासून सर्व काही प्रकट झाले आहे. मनुस्मृतीमध्ये हेच सांगताना

सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्|
वेदशब्देभ्य: एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे|

वेदांतल्या शब्दांवरूनंच नंतरच्या काळात सर्व वस्तुंची व्यक्तींची ठिकाणांची संस्थांची नावे दिली गेली कारण वेद हेच सर्वात आरंभीचे ज्ञान आहे. पृथ्वीला पृथ्वी हे नाव वेदांतल्या शब्दांवरूनंच दिलं गेलं. मानवाला मनुर्वभ ह्या वेदमंत्रावरूनंच मानव हे नाव दिलं गेलं इत्यादि. ज्यांना वेदांचा दु:स्वास आहें असात्म्य(एलर्जी) आहे, स्वत:ला मानव म्हणणं बंद करावं.

सर्व प्राचीन ऋषि-महर्षि, शास्त्रकार भाष्यकार सर्वांची एकमुखाने संमती आहे की वेद हे अनादि अपौरुषेय‌ तथा नित्य आहेत.‌ मानवसृष्ट्यारंभी ईश्वराने चार ऋषींच्या अंत:करणांत दिलेलं ज्ञान म्हणजे वेद...! जर वेद सर्वात पहिलं ज्ञान असेल तर स्वाभाविक आहे वेद ज्या भाषेत‌ असतील तीच मानवाची आद्यभाषा असणार. पण विकासवादी हे मानत नाहीत कारण त्यांना हे सत्य स्वीकारायचं साहस‌ नाही. आणि त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीयही हे मान्य करत नाहीत. कारण बव्हतांशांना असं वाटतं की हे मान्य केलं तर आपलं हसु होईल. म्हणजे 

तुज आहे तुजपाशी, परि तु जागा भूललासीं|

हीच आपली अवस्था आहे. विकासवाद का खोटा आहे हे हळुहळु आह्मीं दाखवुच. अस्तु प्रथम लेखांकात इतकंच...!

पुढील लेखासाठी क्रमश:

#संस्कृतभाषा_इतिहास_निर्मिती_वेद_भाषाविज्ञान_विकासवाद_डार्विन_व्याकरणशास्त्र


Sunday 7 August 2022

सचि॒विदं॒ सखा॑यं॒...! ऋग्वेद

 




आधी जे मित्र कमावलेत ते‌ टिकवायला शिका...


एकेकाळी अत्यंत प्रगाढ मैत्रीत असलेले लोक पुढे जाऊन एकमेकांना अंतरतात. मला खरंतर काहीवेळा हसु येतं ह्या लोकांचं आणि काहीवेळा कीवही येते व काहीवेळा आश्चर्यही वाटतं. अर्थात ह्याला तशी कारणं असुही शकतात, नाही असं नाही. पण बव्हतांश वेळाच अगदी क्षुल्लक कारणांवरून लोकांची मैत्री तुटते. केवळ संवादाचा अभाव, अहंकार नि तज्जन्य परस्परांविषयीची अंतराची भावना हीच मैत्री तुटायला कारणीभूत असते. यात‌ संवादाचा अभाव हे मुख्य कारण असतं...


एकमेकांच्या एखाद्या किंवा अनेक गोष्टी न पटायला सुरुवात झाली की संवाद‌ तुटतो व तिथून मैत्री‌ संपत जाते. मूळात एखाद्या‌च्या सर्वच गोष्टी आपल्याला पटायलाच हव्यात हा अट्टाहास‌ तरी का? स्वभाववैचित्र्य असतंच तसं आचारवैचित्र्यही मान्य करावंच लागेल. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना:...! अगदी एकमेकांवर अत्यंत प्रेम असलेले नवरा-बायकोही एकमेकांच्या सर्वच गोष्टी पटणाऱ्या स्वभावाच्या असतात असेही नव्हे पण तरीही त्यांचा‌ संसार होतोच ना? समजून घेणे हा प्रकार असतोच ना?


मग मैत्रीत हे का होत नाही? एखाद्याची एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर त्याला तसं सांगावं पण ते‌ सांगतानाही कळकळ असावी, अहंकार नसावा. भाषा सौम्य असावी व त्यातून त्याला आपली चुक उमजेल हा हेतु असावा. यात भाषा फार महत्वाचं काम करते. पण तरीही काहीवेळा समोरचा खरंच चुकत असेल व त्याच्या भल्याकरिता आपण त्याला तो किंवा ती चुकतोय‌ किंवा चुकतेय हे त्याला प्रामाणिकपणे सांगितलं तरी तो ऐकत नाही. मग ह्यातून दुरावा वाढतो व मैत्रीत अंतर येते.


मग हे थांबवायचं तरी कसं? 


काहीवेळा खरंच‌ पर्याय‌ नसतोच कारण समोरचा ऐकूनंच घेत नसेल तर विषय‌ संपतोच. अशावेळी स्वत: जमत नसेल तरी दुसऱ्याकडून सांगून पहावं पण तरीही जमत नसेल तर मग विषय‌ सोडून द्यावा. पण जर काही उपाय असेल, आशा असेल तर प्रयत्न करून पहावा. आणि ते संवादाच्या अभावाने जमणार नाही. अहंकाराने तर नाहीच. मी का बोलु हा अहंकार मैत्रीत चालत नसतो. तो आला की मैत्री तुटते. बोलायला हवं, स्पष्ट बोलायला हवं पण भाषा मृदु हवी. भले आपली चूक नसली तरी काहीवेळा माघार घ्यायला हवी. तरंच मैत्री टिकु शकते...!


तुट वाद संवाद तो हितकारीं|

समर्थ उगाचंच म्हणत नाहीत.. 


अहंकार हा सर्व गोष्टींचा मारक आहे. शहाणा माणुस त्याला दूरंच ठेवतो. 


ह्यात आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे नि:स्वार्थता...! मैत्रीत‌ स्वार्थ आला की ती फार काळ टिकत नाही. स्वार्थ संपला की ती‌ संपते. मूळात अशा मैत्रीस मैत्री म्हणावं का असा प्रश्न येतो. भले काहीवेळा स्वार्थाने केलेली मैत्रीही टिकत असेलही. पण ते फार अपवादात्मक...! पण भले स्वार्थाने एकत्र आलाही असाल तरीही स्वार्थ‌ संपल्यावर पुढे नि:स्वार्थी मैत्री टिकायला हवी.‌ तरंच त्याला अर्थ आहे...


हेतु कोणताही असो, मैत्री टिकवता आली पाहिजे. त्यासाठी मैत्रीची भावना शुद्ध हवी....!




महाभारतांत वनपर्वामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनांस म्हणतात


ममैव त्वं तवैवाहं ये मदीयास्तवैव ते|


तु माझा आहेस नि मी तुझा आहे.. जे माझं आहे ते तुझं आहे व तुझं ते माझं आहे...


भवदीय...


#मैत्रीदिन_मित्र_सखा_संवाद_भगवान_श्रीकृष्ण_सुदामा_अर्जुन_महाभारत