Monday 25 November 2019

नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ।




काल कार्तिक वद्य त्रयोदशी ! काल कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्रीज्ञानेश्वर महाराज ह्यांचा संजीवन समाधी सोहळा ! कार्तिक मास किती श्रेष्ठ ! कारण ह्याच मासात भक्तशिरोमणी संतश्रेष्ठ श्रीनामदेवरायांचीही जयंती व तीही कार्तिक शुद्ध एकादशीला ! श्रीनामदेवरायांचे चरित्र ते स्वत:च वर्णिताना म्हणतात

*माझें जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणें। लिहिलें त्याची खुण सारु ऐका । १।*
अधिक ब्याण्णव गणित अकराशतें । उगवता आदित्य रोहिणीसीं ।२।*
*शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार । प्रभव संवत्सर शालिवाहन शके ।३।*
*प्रसवली माता मज मळमूत्री । तेंव्हा जिव्हेवरी लिहीलें देवें ।४।*
*शत कोटी अभंग करील प्रतिज्ञा। नाम मंत्र खुणा वाचुनी पाहे ।५।*
*ऐंशी वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण । नामसंकीर्तन नामया वृद्धि ।६।*

साक्षात परमात्मा श्रीपंढरीशाला घास खाऊ घालणार्या श्रीनामदेवरायांचे चरित्र म्यां पामराने कसे नि काय वर्णावे??? आमचे भाग्य केवळ एवढेच की आमचे घर श्रीनामदेवरायांच्या मंदिराला चिकटूनच!

*जन्मोजन्मीं आम्ही बहु पुण्य केलें | म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ||१||*
*जन्मोनी संसारीं जाहलों त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगीं ||२||*
*आणिका दैवता नेघे माझे चित्त | गोड गाता गीत विठोबाचें ||३||*
*भ्रमर मकरंदा मधाशी ती माशी | तैसें या देवासी मन माझे ||४||*
*भानुदास म्हणे मज पंढरीसी न्या रे | सुखें मिरवा रे विठोबासी ||५|*

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांच्या सख्यत्वांस प्राप्त झालेले श्रीनामदेवराय, श्रीमहाराजांस संजीवन समाधीस नेणारे श्रीनामदेवराय ही ओळख पुरेशी नाही का? परमेश्वराशी प्रत्यक्ष संवाद असुनही श्रीज्ञानोबारायांच्या व श्रीगोरोबाकाकांच्या परिक्षेने गुरुप्राप्तींस निघालेले श्रीनामदेवराय श्रीविसोबांस पाहतात व योग्यतेने भारावून जातात. त्या आत्मस्थित श्रीगुरुंस शरण गेल्यावर श्रीविसोबा जो उपदेश करतात, तो काय बहारीचा आहे रहा !

*जरी म्हणसी देव देखिला ।तरी हा बोल भला नव्हे नाम्या ।१।*
*जोंवरी मी माझें न तुटे । तंव आत्माराम कैसेनि भेटे ।२ ।*
*खेंचर साह्याने मी काहीं नेणें । जीवा या जींव ईतुले मी जाणे ।३।*

एक अभंग तर कळता कळेना !

*दश चत्वार कराचा नव आननाचा । त्रिविंश नयनाचा द्विपुच्छ द्वैश्रृंगाचा ह्मणवी ईश तो तो सरोज शयनाचा ।१।*
*नाशापुट षोडश अठराचा ।करणीं नवांश शिरसीचा ।दहा पदें ही त्याला ।२।*
*कोण असाजी कथाजी सरसाचा । आंगुलांचा भुजा मुळु वदनाचा । उधानू नेत्राचा स्वामि माझा ।३।*
*पोकु वेडावले सेली बोभावले । अन्य थकित झाले । वर्णवेना ।४।*
*केवळ काठीं मुगुट धूर्जेटी । पाय तळवटी चरण ज्याचे ।५।*
*ढकार वदनाचा आला वर्णावया । जिव्हा चिरोनियां झाल्या दोन । ६।*
*अवारु जोडोनी करितो विनवणी । खेचर विसा चरणी विनटला ।७।*

हे दोघेही समकालीन !

*ह्या दोन पुरुषश्रेष्ठांनी त्या बाराव्या शतकात अध्यात्माचा आणि भक्तीचा डांगोरा कसा नि किती पिटविला असेल ह्याची केवळ कल्पनाच आपण करू शकतो ! इतर समकालीन संतांनीही ह्याच भक्तिरसात ह्या महाराष्ट्राला अक्षरशः न्हाउ घातले !*

आनंदगिरींच्या “गीताभाष्यात”एक सुंदर श्लोक आहे.

*आचार्याः सन्ति कुत्राप्यतिविमलधियो वेदशास्त्रागमानां ।* *दुष्प्रापस्तावदास्ते त्रिजगति नितरामात्मतत्वोपदेष्टाः ।*
*एवं सत्यर्जुनस्याद्भुतविकलवती वर्ण्यते किन्तु भाग्यं ।*
*यस्याचार्यस्य हेतोः स्वयमुपनिषदामर्थे आविर्भैभूव ।।६॥*
आनंदगिरी - गीताभाष्य

ज्याच्या कल्याणासाठी, ज्याच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष उपनिषदांचा अर्थच ज्याच्या समोर श्रीकृष्ण रूपाने प्रकट झाला, त्या अर्जुनाचे भाग्य काय वर्णावे ? तद्वतच ह्याच अर्जुनास केलेल्या उपदेशावर आपल्या अलौकिक आत्मप्रतिभेने “भावार्थ दीपिका” लिहिणाऱ्या श्रीज्ञानोबारायांचे भाग्य आज काय वर्णावे ?

*ते हे गोष्टी रम्य । अमृतधाराधर्म्य ।*
*करिती प्रतीति गम्य । ऐकोनि जे ॥*
ज्ञानेश्वरी - १२.२३० 

परमेश्वराचे चरित्र हे गावे तर संतांनीच. संत चरित्रे गावीत तीही संतांनीच ! कारण आमची शब्दप्रतिभा इथे अगदीच थिटी पडते.

*आमुते करावया गोठी । ते झालीच नाही वाग्सृष्टि ।*
*आम्हालागी दिठी । ते दिठीच नोहे ॥*
(अमृतानुभव)

परंतु योग्यता नसतानाही आम्ही संतचरित्रे गातो कारण

*तेणेंसी आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ।*
*परि तयाचें चरित्र । ऐकती जे ॥*
 ज्ञा. १२.२२६ ॥

*तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।*
*जे भक्तचरित्रातें । प्रशंसती ॥*
 ज्ञा. १२.२२७ ॥

श्रीज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा
ह्या सोहळ्याचे वर्णन केले ते श्रीनामदेवरायांनी ! त्यांचा अधिकार अर्थातच मोठा !  ज्ञानोबाराय समाधी घेणार ह्या विचारानेच सर्व महाराष्ट्र आळंदीत लोटला. अनेक संत आणि सत्पुरुष, ज्ञानी, योगी, सर्व सर्व आळंदीत लोटले. आणि का लोटू नये? अवघ्या बावीस वर्षातला एक श्रीज्ञानदेव समाधी घेतो आणि तेही संजीवन समाधी ?

*संतभक्त येऊनी थोर थोर । हरिनामाचा केला गजर ।*
*अहोरात्र दिवस चार । आळंदीक्षेत्र गजबजलें ॥ १ ॥*
*एकादशीसी गजर । नामदेवें केली कथा सुंदर ।*
*द्वादशीसी दोन प्रहर- । पर्यंत घडलें पारणें ॥ २ ॥*
*तेचि रात्री प्रासादिक । हरिदास कान्हु पाठक ।*
*कीर्तन करिती परम भाविक । श्रोते कथेसी रंगले ॥ ३ ॥*

आणि शेवटी तो दिवस उजाडला ! कार्तिक वद्य त्रयोदशी ! श्रीज्ञानोबारायांच्या समाधीस प्रत्यक्ष परमात्मा श्रीपंढरीश जगन्माता प्रकट झाला. होणारच ! निर्गुण निराकार अविनाशी परब्रह्म आपल्या ह्या परमभक्त श्रीज्ञानोबांसाठी सगुण साकार झाले ! इथे तर्क काहीच काम देत नाहीत. संशय तर नाहीच नाही. ज्ञानोबाराय स्वतःच म्हणतात

*म्हणउनि संशायाहुनि थोर ।*
*आणिक नाहीं पाप थोर ।*
*हा विनाशाची वागुर ।*
*प्राणियांची ।*

ज्ञानेश्वरी - ४.२०३ 

म्हणूनच श्रीतुकोबाराय म्हणतात

तुका म्हणे नाशी ।कुतर्क्याचे कपाळी ।
टाका तार्किकाचा संग । पांडुरंग नित्य स्मरा हो ।

मध्यान्ही सूर्य आला असताना श्रीपरमेश्वराच्या आज्ञेने श्रीज्ञानोबाराय आणि साक्षात परमात्मा श्रीपंढरीशाने त्यांस केशराचा मळवट आणि तोच सर्व शरीरास लाऊन त्यांस समाधीकडे नेले. गळ्यात तुळशीचा हार घातलेले ज्ञानोबाराय आत्मसुखात मग्न होते परंतु इतर सर्व मात्र ह्या महायोग्याच्या विरहाने व्याकूळ झाले होते. केवढे ते वय ? अवघे बावीस ? इतकेच काय तर योगाभ्यासाने ज्यांचे नेत्रकमळ, करद्वय, चरणद्वय आणि सर्वांगच योगतेजाने प्रफुल्लित झाले होते, ती दिव्य मूर्ती आता इथून पुढे नेत्रांस दृश्यमान होणारच नव्हती.

*देव निवृत्ति यांनी धरिले दोन्‍ही कर । जातो ज्ञानेश्‍वर समाधीसी ॥१॥*
*नदीचिया माशा घातले माजवण । तैसे जनवन कालवले ॥२॥*
*दाहीदिशा धुंद उदयास्‍तविण । तैसेचि गगन कालवले ॥३॥*
*जाऊनि ज्ञानेश्‍वर बैसले आसनावरी । पुढा ज्ञानेश्‍वरी ठेवियेली ॥४॥*
*ज्ञानदेव म्‍हणे सुखी केले देवा ।  पादपद्मी ठेवानिरंतर ॥५॥*
*तीन वेळा जेव्‍हा जोडिले करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेव ॥६॥*
*भीममुद्रा डोळा निरंजनी लीन । जालें ब्रम्‍हपूर्ण ज्ञानदेव ॥७॥*
*नामा म्‍हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्‍थ ॥८॥*

*शक १२१५, कार्तिक वद्य १३,  दुर्मुखनाम संवत्सर - आळंदी*

जगत्कलाण्यासाठी जीवन कृतार्थ केलेले सत्पुरुष आत्मस्थित परमात्म्याशी एकरूप असल्याने जन्म-मृत्यू बंधनाच्याही पलीकडे गेलेले असतात.

*यदविद्याविलासेन प्रपञ्चोयं प्रतीयते ।*
*तदविद्याविनाशे तु केवलं ब्रह्म जृम्भते ।*

अर्थ - *ज्या अविद्येच्या विलासाने(प्रभावाने) हा प्रपंच प्रतीत होतो, त्या अविद्येचा विनाश झाला असता केवळ ब्रह्मच अवशिष्ट राहते !*

अशा आत्मोपलब्धी श्रीज्ञानोबारायांना संजीवन समाधी घ्यावीशी वाटणार नाहीतर काय ? अर्थात त्यांच्या समाधीने इतरांवर मात्र विरहाचा डोंगरच कोसळला. स्वतः नामदेवरायांची अवस्था काय झाली असेल? म्हणूनच त्यांच्या समाधीवर २५० हून अधिक अभंग रचताना नामदेवराय उद्गारतात 

*ज्ञानदेवासाठी होतसे कासावीस नामदेव*

*मग प्रश्‍न आदरिला । नामा फुंदो जो लागला ।कागा ज्ञानेदवा गेला । मज सांडुनिया ॥१॥*
*कैसा होय तुझा दास । कैसा पाहो तुझी वास ।ज्ञानाकारणे कासावीस । जीव माझा होतसे ॥२॥*
*देव म्हणे नामयासी । तू झणी कासावीस होती ।तू रे तयाते नेणसी । ते कैसे आईक पा ॥३॥*
*ज्ञानदेव ज्ञानसागरु । ज्ञानदेव ज्ञानागरू ।ज्ञानदेव भवसिंधुतारू । प्रत्यक्ष रूपे पै असे ॥४॥*
*ज्ञानदेवी ज्ञानगम्य । ज्ञानदेवी ज्ञानधर्म्य ।ज्ञानदेवी ज्ञाननेम । सर्वथैव पै असे ॥५॥*
*ज्ञानदेवी हाचि देव । ज्ञानदेवी धरीयला भाव ।ज्ञान होईल जीवा सर्व । यासी संदेह नाही ॥६॥*
*ज्ञानदेवी धरीता ध्यान । ध्याता होय समाधान ।जीवी शीवी परिपुर्ण । एके रात्री किर्तन केलीया ॥७॥*
*झणे तू व्याकूळ होसी चित्ते । मनी आठवी गा माते ।नामस्मरणे एकाचित्ते । रामकृष्ण गोविंद ॥८॥*
*नामा म्हणे तू समर्थ होसी । अर्जुनी प्रीती करिसी ।हे सांगीतले व्यासी । एकादशाध्यायी ॥९॥*
*तैस पावे तू विश्वेशा । विश्वरुपा जगन्निवासा ।मी होतसे कासाविसा । ज्ञानदेवाकारणे ॥१०॥*
*तरी तू गा युगानयुगी असशी भक्ताचिंया संगी ।आम्ही विनटलो पांडुरंगी । रंगारंगी विठ्ठली ॥११॥*
*एक वेळ माझा शोक । दुरी जाय हरे विख ।ते करी निर्विशेष । नामा येतसे काकुळती ॥१२॥*

*आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर ।नाहीं आता थार विश्रांतीसी  ।*

श्रीज्ञानोबारायानंतर त्यांच्या इतर भावंडांनी पण समाधी घेतली. नामदेवरायांनी ह्या सर्वांचे वर्णन करताना म्हटले

*गेले दिगंबर ईश्वरविभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥ १ ॥*
*वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानीं । आतां ऐसे कोणी होणें नाहीं ॥ २ ॥*
*सांगतील ज्ञान म्हणतील खूण' । नयेची साधन निवृत्तीचें ॥ ३ ॥*
*परब्रह्म डोळां दाऊं ऐसे म्हणती' । कोणा न ये युक्ति ज्ञानोबाची ॥ ४ ॥*
*करतील अर्थ, सांगतील परमार्थ' । न ये पा एकांत सोपानाचा ॥ ५ ॥*
*नामा म्हणे देवा सांगूनियां कांही । न ये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥ ६ ॥*
*पूर्वी अनंत भक्त जाहले । पुढेंही भविष्य बोलिलें । परी निवृत्ति-ज्ञानदेवें सोडविलें । अपार जीवजंतु ॥ ७ ॥*
*ऐसे ज्ञानेश्वर माहात्म्य अगाध । कथा ऐकतां होईल बाध । तैसाचि उपजेल परमानंद । पातकें हरतील सर्वथा ॥ ८ ॥*

आता कोण उरलेच नाही आम्हांस उपदेश करायला ? आम्ही ऐकायचे तरी कुणाचे ?
काय लिहावे ? शब्दच संपले !

ह्या संजीवन समाधी दिनानिमित्त कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्रीज्ञानोबारायांस आणि भक्तशिरोमणी संतश्रेष्ठ श्रीनामदेवरायांस आणि इतर सर्व संतांस विनम्र प्रणाम !!!

शिरसाष्टांग दंडवत ।

#पाखण्ड_खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#संतश्रेष्ठ_श्रीज्ञानोबाराय_संजीवन_समाधीसोहळा_श्रीनामदेवराय_आळंदी

Wednesday 20 November 2019

जिहादी टिपुचा मराठाद्वेष - त्याच्याच हस्ताक्षरांतला...





क्रुरकर्मा इस्लामी जिहादी धर्मांध मूसलमान असा टिपु सुलतान सर्व हिंदुंचा आणि त्यातल्या त्यात आम्हां मराठ्यांचा किती द्वेष करायचा ह्याचे त्याच्याच हस्ताक्षरातलं समकालीन प्रमाण उपलब्ध आहे. मराठा ही जात नसून ती एक विजीगीषु वृत्ती आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. टिपुला जी स्वप्नं पडायची, ती तो उठल्यानंतर लगेचच शब्दबद्ध करायचा. टिपुच्या अशाच स्वहस्ताक्षरातल्या शब्दबद्ध स्वप्नांचं एक हस्तलिखित मे १७९९ मध्ये टिपुच्या मुन्शी असलेल्या हबीबुल्लाह नामक व्यक्तीच्या समोरंच सापडलं होते. हे हस्तलिखित ईस्ट इंडिया कंपनीत रुजु असलेल्या कर्नल किर्कपैट्रिक (Colonel Kirkpatrick) नामक एका अधिकार्यांस प्राप्त झालं होतं, ज्यात टिपुची ३७ स्वप्नं असून त्याला त्यानेच लिहिलेली प्रस्तावनाही आहे.* ह्या किर्कपैट्रिकने टिपुंवर आणखी विस्तारपूर्वक ग्रंथनिर्मिती स्वतंत्रपणे केलीच आहे त्यावर पुढे येऊच. पण तत्पूर्वी...ह्यात टिपुने पहिलंच स्वप्न मराठ्यांविषयी लिहिलं असून तेराव्या स्वप्नांत मराठ्यांची आत्यंतिक निंदा करताना अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. एकुण नऊ वेळा त्याने मराठा शब्दाचा उल्लेख सर्व स्वप्नांमध्ये केला आहे.




*टिपुचे तेरावं स्वप्न*

टिपुने मराठ्यांना पुरुषांच्या पोषाखातली स्त्री असे निंदाव्यंजक शब्द वापरले आहेत. सोबत टिपुचं ते पूर्ण स्वप्न व त्याचा पाकिस्तानच्या कराची विद्यापीठातल्या महमुद हुसैन ह्या लेखकाचा अनुवाद जोडला आहे. *हा ग्रंथ पाकिस्तान ऐतिहासिक संस्थेची प्रकाशने क्रमांक ७ (Pakistan Historical Society Publications no.7) ह्या नावाने प्रकाशित असून ह्याची स्कैन्ड प्रत Dreams of Tipu Sultan ह्या नावाने* निम्नलिखित संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 

https://archive.org/details/dreamsoftipusult00tipprich





*ह्यावरूनंच टिपुची आम्हां मराठ्यांविषयीची मानसिकता काय नि कशी नि किती द्वेषाची होती हे लक्ष्यीं येते. जो मनुष्य स्वप्नांतही इतका द्वेष करतो, तो प्रत्यक्षांत काय करत असेल ह्याची कल्पना केलेलीच बरी.. सांप्रत काही बांडगुळं टिपुचं गुणगान गाताना दिसतात, त्यांच्यासाठी हा लेखनप्रपंच...*

*टिपु हा जिहादीच होता व हिंदुंचा आत्यंतिक द्वेष्टाच होता ह्यावर त्याची स्वतःची पत्रं, त्याने केलेल्या मंदिरांचा विध्वंस, लाखो हिंदुंचे बलात्काराने केलेलं धर्मांतरण आदि सर्व समकालीन संदर्भ उपलब्ध आहेतंच.* सविस्तर लेखन अनेक इतिहासकारांनी केलंच आहे.

सविस्तर पुढे येऊच...

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#टिपुसुलतान_इस्लामीजिहाद_स्वप्न_मराठाद्वेष_हिंदुद्वेष_धर्मांतरण_मंदिरविध्वंस

आज थोरल्या श्रीमाधवराव पेशव्यांचे पुण्यस्मरण - कार्तिक वद्य अष्टमी



गत वर्षी देवदेवेश्वर संस्थान पर्वतीवतीने मृत्युंजयेश्वर मंदिर, पुणे येथे थोरल्या श्रीमाधवरावांवर व्याख्यान देण्याचा योग आला होता. हिंदवी स्वराज्याची पानपताने विस्कटलेली पुन्हा सुव्यवस्थित करण्याचे अलौकिक कार्य ज्या पेशव्याच्या हातून घडलं त्याचे आज पुण्यस्मरण...

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा लोकोत्तर पुरुषही ज्याच्यावर सर्व पेशव्यांत थोर पेशवे कोण हा लेख लिहितो ह्यावरून ह्या पेशव्याची योग्यता लक्ष्यीं येते.

*अवघ्या २७ वर्षांच्या आयुर्मानात ह्या पेशव्याने जे काही अभूतपूर्व कर्तृत्व संपादन केलंय, ते केवळ विलक्षण आहे. उत्तर हिंदची मोहिम असेल किंवा कर्नाटकची स्वारी असेल किंवा निजाम-हैदर सारख्यांचा किंवा रोहिल्यांचा निःपात असेल, ह्या पेशव्याने आपल्या चार पिढ्यांच्या स्वराज्यवृद्धीचा संकल्प पूर्ण करून हिंदवी स्वराज्याचा अंमल संपूर्ण हिंदुस्थानभर जो प्रस्थापित केला, तो अत्यंत चिंतनीय आहे. पानपतांवर मराठी राज्याचा अवतार संपला असा शत्रुमित्रांचा झालेला भ्रम श्रीमाधवरावांनी आपल्या पराक्रमाने मोडून काढला हे त्यांचे कर्तृत्व अत्यंत प्रशंसनीय आहे.*

*भेलसा येथे स्वतंत्र तोफ कार्यालयाची निर्मिती*

वेदकाळापासून हिंदुंना तोफनिर्मितीचे ज्ञान होते ह्याविषयी अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. तोप किंवा तोफ हा शब्दंच मूळात संस्कृत धातु तुप् तुफ् ह्या पीडार्थक धातुंपासून निष्पन्न होतो. पंडित शिवपूजनसिंह कुशवाह ह्या आर्यसमाजी विद्वानाने ह्यावर एक स्वतंत्र ग्रंथही निर्माण केला आहे. महर्षि दयानंदांनीही त्यांच्या वेदभाष्यांत ह्याचा निर्देश केला आहे. विस्तारभयास्तव ह्यावर पुढे लिहुच. पण श्रीमाधवरावांचे हे कृत्य द्रष्टेपणाचे होते हे निश्चितंच...

*सर्वांना एकत्र बांधणारा पेशवा...*

पानपतानंतर स्वकीयांमध्ये झालेल्या दुहींस नष्ट करून सर्वांची एकमोट बांधणारा पेशवा म्हणून श्रीमाधवरावांची नोंद करावी लागेल. *शिंदे-होळकरांना दौलतीचे स्तंभ असे गौरवून किंवा नागपूरकर भोसल्यांनाही आपल्याकडे वळवून आणून श्रीमाधवरावांनी हिंदुपतपातशाहीची पुनर्संस्थापना केली हे त्यांचे यश काही अल्प नव्हते. अंतर्गत बंडाळी मोडण्याचे अत्यंत दुष्कर कार्य त्यांना अत्यंत अल्पायुष्यांत करावं लागलं म्हणूनंच विशेष आहे.निजामअलीसारखा मराठ्यांचा कट्टर वैरी श्रीमाधवरावांच्या पराक्रमाने दिपून मराठ्यांचा मित्र बनला. शहाआलम बादशाह हा एवढा बट्टेबाज पण तोही श्रीमाधवरावांच्या कर्तृत्वांवर विसंबून इंग्रजांना सोडून मराठ्यांच्या आश्रयांस आला.*

युद्धकलेंत काय किंवा हिशेबव्यवहारांत काय श्रीमाधवरावांनी आपले तेज सर्वत्र दाखवून दिले. *हरएक प्रकारचे कपट, दुष्टावा, वक्रगामीपणा, यांचे जे पीक महाराष्ट्रांत थैमान घालत होते, त्याचे संपूर्ण उच्चाटन करून न्यायनीतीचे, निष्पक्षपातीपणाचे, सार्वजनिक हिताचे असे एक नवीनंच वातावरण ह्या पेशव्याने राष्ट्रांत उत्पन्न केले.*

*व्यक्तिमत्व*

*निर्मल वर्तन, कर्तव्यनिष्ठा, धाक व लौकिकांतील पूज्यभाव* हे गुण माधवरावांच्या अंगी होते. माधवराव धर्मनिष्ठ होते. चारित्र्यसंपन्न तर होतेच. *बाळाजी विश्वनाथाचे राजकारणी धोरण, बाजीराव पेशव्याची लष्करी धडाडी नि नानासाहेबाची प्रजापालनदक्षता* हे तीन्ही गुण थोरल्या श्रीमाधवरावांत अंगभूत होते.

*श्रीमाधवराव जीवित असते तर इंग्रज भारतावर राज्यंच करु शकले नसते...*

ह्या विधानांत कोणतीही अत्युक्ती नाही. दुर्दैवाने अल्पायुष्य हा आम्हा हिंदुंना शाप आहे की काय कळंत नाही. पुण्यश्लोक श्रीशिवप्रभु असतील, धर्मवीर श्रीशंभुछत्रपती असतील, थोरले श्रीबाजीराव असतील किंवा हे थोरले श्रीमाधवराव असतील. ह्या चौघांना अत्यंत अल्पायुष्य लाभलं. सर्वात न्यून तर ह्याच पेशव्यांस. *अंतिम आयुष्यांत श्रीमाधवरावांनी ब्रिटीशांच्या विरोधांत मोहिम हाती घेतलीच होती हे कागदपत्रांवरून लक्ष्यीं येतंच. सर्व मराठेमंडळी एकवटली असून नजीबखान-अब्दालीसारखे शत्रुही नाहीसे होऊन, दिल्लीचा बादशाहाही अनुकूल होऊन सर्व राष्ट्राच्या परमोच्च बिंदुस प्राप्ती होणार अशी सुचिन्हे दिसू लागताच काळाने ह्या पेशव्यांस वयाच्या २७व्या वर्षी ग्रासावे ही नियतीची क्रूर योजनाच म्हणावी लागेल.*

पण ह्याचे कारण पहायचं तर नियतींस दोष न देता तो आमचाच सर्वस्वी आहे हे सूज्ञांस कळेल. *आमची सामुहिक उपासना न्यून पडते हे त्रिवार सत्य आहे.* हे कुणांस पटो न पटो.

*अंतिम संदेश*

ज्येष्ठ इतिहासकार सरदेसायांनी पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या खालोखाल ह्या पेशव्याची योग्यता वर्णिताना जे विधान केलंय ते रियासतीत वाचण्यासारखं आहे. अंतिम क्षणी श्रीशिवप्रभुंनी जो संदेश दिला, तोच संदेश थोरल्या श्रीमाधवरावांनी दिला, जो हिंदुंना अत्यंत बोधनीय आहे.तो संदेश होता...

*काशी नि प्रयाग मुक्त करा...*

लेखणींस विराम देताना थोरल्या श्रीमाधवरावांविषयी प्रसृत असलेल्या एका आख्यायिकेचं चिंतन करण्याचा मोह टाळता येत नाही. एका संस्कृत सुभाषितांत तो अनुभव आहे

*वृष्टिर्विना पंकमहो विचित्रं स्थलद्वये तिष्ठति सार्वकालं।*
*दानांवुभिर्माधवरायमन्दिरे विप्रस्य बाष्पैः खलु रामशास्त्रिणां।*

ह्या थोर पेशव्यांस पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#श्रीमंत_थोरले_श्रीमाधवराव_पेशवे_पुण्यस्मरण_कार्तिकवद्यअष्टमी_पानिपत_हिंदुपदपातशाही_इंग्रज_निजाम_सावरकर

Tuesday 19 November 2019

स्व. माननीय श्रीएकनाथजी रानडेंचं आज पुण्यस्मरण...



*एक जीवन, एक ध्येय्य!!!*

साम्यवादी विचारधारेच्या राष्ट्रद्रोही मानसिकतेने ग्रस्त नेतृत्वामुळे चीनच्या युद्धापश्चात् भारतवर्षांस आलेल्या आत्मग्लानीमुळे ती पाहून एक आजीवन अखंड ब्रह्मचारी असा युवक, ज्याने रा स्व. संघाच्या माध्यमांतून अवघं जीवन *राष्ट्राय स्वाहा, इदं न मम।* म्हणून समर्पित केले होते, तो राष्ट्राच्या ह्या अवनतीमुळे अंतर्मुख झाला. ह्या परिस्थितींत राष्ट्रांस पुन्हा एका योद्ध्या संन्याशाच्या तेजस्वी अशा पुनरुत्थानाच्या संदेशाची आवश्यकता होती. नुकतीच विश्वदिग्विजयी श्रीमत्स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी साजरी झाली होती.  त्यासाठीच काही मास स्वतःला एकांतवासांत नेऊन समग्र विवेकानंद साहित्याचे पुनःअध्ययन करून एका योद्ध्या युवकाने *'The Rousing Call to a Hindu Nation'* नावाचा विवेकानंदांच्या आव्हानात्मक विचारांचा एक ग्रंथ सिद्ध केला. हा ग्रंथ मराठीत *'हिंदुतेजा, जाग रे!'* नावाने प्रकाशितही आहेच. पण तेवढ्यावरंच त्या युवकाचं समाधान होणार नव्हतं. एका ग्रंथाचे निर्माण तर झालं होते पण त्या संदेशाचे पालन करणारी युवा पिढी निर्माण करणार कोण ह्याच तत्वचिंतनात तो मग्न होता. विवेकानंदांना अपेक्षित तेजस्वी नि राष्ट्रसमर्पित युवक-युवती निर्माण करायच्या कुठून?

आणि ह्यातंच सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा पण दक्षिणसमुद्रातून होणार्या संभाव्य आक्रमणाची शंका लक्ष्यीं येऊन तत्कालीन राष्ट्रसूत्रधारांनी, ज्यात आदरणीय गोळवलकर गुरुजींसारखे लोकही होते, त्यांच्याच आज्ञेने सुदूर दक्षिणेतल्या भारतमातेच्या चरणकमलांचं संवाहन करणार्या त्रिसागरातल्या शिलेवर स्मारक उभारण्याची संकल्पना आली.

*परिव्राजक अवस्थेत सर्व हिंदुस्थान पादाक्रांत करणार्या भावी विश्वदिग्विजयी स्वामीजींच्या अंतिम निवासांत ज्या कन्याकुमारीच्या शिलेवर त्यांचे तीन रात्र (२५-२७ डिसेंबर, १८९२) ध्यान घडलं नि ज्यातून त्यांचा एक पुनर्जन्मंच जणु झाला, त्याच शिलेवर त्यांचेच भव्य स्मारक उभारण्याचे ध्येय्य ह्या युवकाने निश्चित केलं. त्याच शिलेवर जगज्जननी श्रीपार्वती मातेने भगवान श्रीशंकराच्या प्राप्तीसाठी उग्र तपश्चरण केलं होते. तीच पवित्र शिला विवेकानंदांसाठीही जीवनाचे ध्येय्य दर्शविणारी ठरली होती.*

त्रिपादसागरांनी वेष्टित त्या पवित्रशिलेवर स्वामीजींच्या स्मारकाची सर्व सिद्धता करण्यांस हाच युवक योग्य ठरला. आणि प्रत्यक्ष कार्यांस आरंभ केला.

*कथा शिलास्मारकाची...*

योद्ध्या संन्याशाच्या त्या स्मारकाच्या निर्माणाची कथा ज्या ह्या महापुरुषाच्या करकमलांतून सिद्धांस गेली, तींस अभ्यासायचे असेल तर जिज्ञासूंनी उपरोक्त शीर्षक असलेला ग्रंथ अवश्य अभ्यासावांच. विस्तारभयास्तव लिहीत नाही. त्याच्या लेखिका आहेत विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती नि राष्ट्रीय उपाध्यक्षा पद्मश्री सुश्री निवेदिता भिडे दीदी... दीदी आमच्या मित्रसूचीत आहेत हे आमचं भाग्य आहे.

आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांना ह्यासाठीची रोमांचित करणारी प्रक्रिया ज्ञात असेलंच. त्याकाळी एक एक रुपया भारतीयांकडून गोळा करून हे दिव्य स्मारक उभारण्यांत आलं. अनेकजण आज जीवित आहेत हा साक्षात्कार करणारी...

*विवेकानंद केंद्राची संकल्पना...*

केवळ दगटा विटांचे स्मारक पुरेसं नसून जीवित स्मारकं अर्थात मनुष्यनिर्माणाचे कार्य करण्यासाठी स्वामीजींना अपेक्षित असलेले युवक निर्माणाच्या प्रक्रियेत पुढे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ह्या संस्थेच्या स्थापनेची संकल्पना माननीय एकनाथजींच्या अंतःकरणांत आली नि तींस त्यांनी मूर्तस्वरुपही दिली. गेली आठ वर्षे विवेकानंद केंद्राशी व्यक्तिशः संपर्कात असल्याने केंद्राशी घनिष्ठ संबंध आहेच. केंद्राच्या स्थापनेचा इतिहासही केंद्राच्या वतीने प्रकाशित आहेच.

*मनुष्य निर्माण नि राष्ट्रपुनरुत्थान* हे केंद्राचे ब्रीदवाक्य असून गेली चाळीस वर्षे केंद्र त्याहेतुने कार्यरत आहे.
आरंभीच्या शब्दांप्रमाणे एक जीवन, एक ध्येय्य जगलेल्या माननीय श्रीएकनाथजींविषयी माझ्या अल्पबुद्धींस जे सूचलं ते लिहिण्याचा एक प्रयत्न आहे. माननीय एकनाथजींच्या चरित्रचिंतनासाठी उपरोक्त लेखिका दीदींचेच एकनाथजी हे चरित्र चिंतनीय आहे. तद्वतंच आमचे बंधु नि पत्रकार नि वर्गमित्र मित्र श्री सागर सुरवसे ह्यांनी माननीय एकनाथजींचे लिहिलेलं एक चरित्रही अवश्य अभ्यसनीय आहे.

एकनाथजींच्या ग्रंथसंपदेविषयी भविष्यांत कधीतरी लिहुच...

सांप्रत अन्य कार्यामुळे नि अध्ययनामुळे केंद्राच्या कार्यांत पूर्वीसारखा वेळ आम्ही देऊ शकत नाही ह्याची आम्हांस खंत आहे.

पण सर्वांना एक विनंती की उपरोक्त चार ग्रंथ प्रत्येकाने अभ्यासावेतंच असे आहेत.

*माननीय एकथानजींच्या हातून निर्माण झालेल्या विवेकानंद शिलास्मारकाच्या निर्माणाची कथा संक्षेपांत निम्नलिखित चित्रफीतींत आपणांस अभ्यासावयांस प्राप्त होईल.*

*https://youtu.be/eVR-l6T8WZ0*

माननीय श्रीएकनाथजींस विनम्र अभिवादन नि आदरांजली...!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#स्वएकनाथजी_रानडे_पुण्यस्मरण_विवेकानंद_शिलास्मारक_कन्याकुमारी_विवेकानंदकेंद्र

Friday 15 November 2019

न भीतो मरणादस्मि केवलं दूषितं यश: ।



शुद्रकाच्या "मृच्छकटिक" नाटकांत चारुदत्त वसंतसेनेच्या अपहरणाच्या असत्य आरोपांवर प्रत्युत्तर देताना उपरोक्त श्लोक उच्चारतो. तो म्हणतो

*"वसंतसेनेचा धनाचा अपहरणाचा व हत्येचा आरोप मला असह्य आहे. तो मिथ्या कलंक आहे. अरे मरणाचे ते काय? मला फाशी द्याल ! तोही अपराध मी वास्तविक केलेला नाही. पण हा अपहरणाचा कलंक कसला??? मला दु:ख ते आहे की जीवनांत जे काही सत्व, जे कांही तत्व मी सांभाळले, त्या तत्वावरच हा प्रहार आहे. न भीतो मरणादस्मि केवलं दुषितं यश: ।  मला मरणाची भीती नाही पण माझ्या यशास दोष लागेल किंवा माझी अकारण अपकीर्ती द्वेषापोटी होईल ह्याची आहे."*

आजही हे वाक्य पंडित नथुरामजींच्या त्या गांधीवधाच्या कृत्यांस किती समर्पक आहे हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. ही तुलना अर्थातच सर्वथैव व यथार्थ आहे.  वसंतसेनेला मारले या आरोपावरून चारुदत्तावर अभियोग भरला गेला होता. सुविद्य श्रोते शुद्रकाच्या मृच्छकटिकांत जाऊन पोहोचले ते हसत हसतच. कारण धारा तीनशे दोनचा उल्लेख पंडित नथुरामजींनी चारुदत्ताच्या संदर्भात केला होता.

पंडितजी म्हणाले

*"मी अनेक सभा घेतल्या आहेत, गाजविल्या आहेत. माझ्या गळ्यांत फुलांचे हार मी घेतले आहेत. तितक्यांच सहजतेने फाशीचा दोरही मी स्वीकारीन! या देशावर माझे प्रेम केले आहे. मानवजातीवर प्रेम केले आहे. त्या अत्युत्कट भावनेंतूनच मी हत्या केली आहे. अपेक्षा एकच आहे. माझ्या देशभक्तींला कोणी कलंक लावू नये ! पण तो लावला गेलाच तर चारुदत्ताच्या पुढे एक पाऊल टाकून मला म्हणायचे आहे."*

*"देशभक्ती पापच असेल तर ते पाप मी केले आहे ! गळफास आणि ते पापही मी अंगावर वागवीन. देशभक्तीच्या पापापासून दूर राहा, असे, माझ्या जीवनाचे प्रलोभन दाखवूनही कोणी सांगितले तरी मी विचलित होणार नाही !"*

चारुदत्ताच्या काळात हसत हसत गेलेले ते श्रोते आता रडु लागले ! त्यांचे डोळे गळु लागले, मन आक्रंदु लागले. असहायतेची वेदना प्रत्येकाच्या मनावर वावरत होती. त्यांना वाटले, आम्ही एक नरबळी (नरमेधांत हिंसा नसते बरंका. ती पौराणिकांनी उठविलेली हूल आहे, लिहु कधीतरी सविस्तर त्यावर) करणार आहोत ! या देशभक्ताला आम्ही पापाखाली गाडणार आहोत !

"सुख-दु:खे समे कृत्वा लभालाभौ जयाजयौ" ह्या स्थितप्रज्ञाच्या मनोनिग्रहाने नथुरामजींनी आपले भाषण पुढे ठेवले. म्हणूनच सिमला न्यायपीठावरील एक न्यायमूर्ती जीडी खोसला पंडित नथुरामजींच्या निवेदनाचे परीक्षण करताना म्हणतात.

*"न्यायालयातील श्रौतृवर्गाला जर न्यायदानाचे काम दिले असते तर प्रचंड बहुमताने त्यांनी नथुरामला निर्दोष घोषित केले असते."*

१९ मे, १९४८ - पंडितजींचा ३९ वा वाढदिवस

*न्यायमूर्ती भंडारींची कन्या पंडितजींना भेटावयांस आली होती.*

कुणी काहीही म्हणेना पण पंडितजींच्या त्या कृत्याची यथार्थता केवळ ह्याच स्त्रीला आकळली. *स्त्रियांना पुरुषापेक्षा बुद्धी कैकपट जास्तीच असते हे चाणक्यवचनही सार्थच आहे.* म्हणूनच ती त्यांच्या आसनांवर गुलाब वाहते झाली. ती नथुरामजींना भेटताच म्हणाली,

*"आम्हा लोकांसाठी तुम्ही प्राण ओवाळून टाकीत आहात याची मला जाणीव आहे. आम्हा सगळ्यांना जाणीव आहे."*

एवढे बोलून ती थांबली व गहिवरली. तेवढ्यांत पंडितजी उद्गारले

*"आपल्याला जाणीव आहे हे माझ्या जिवंतपणीच मला कळते आहे यातच सर्व काही पावले."*

ती मुलगी पंडितजींच्या अभिवक्तव्याला प्रतिदिनी येत असे. जे एका मूलीला कळलं, ते आम्हाला अद्याप कळलेलं नाहीये. असो.

*गांधीवधाचे नागडे सत्य (नेकेड ट्रुथ)*

गोळ्या तीन की चार???

पंडितजी न्यायालयीन वक्तव्यांत म्हणतात

*"Since I was doubtful about the number of bullets, I did not want Gandhiji's legal autopsy to be carried out at Your Honour's table. I also declined to examine the Doctor. So the benefit of doubt may go to the Prosecution and the sentence to me."*

ह्याला स्थितप्रज्ञता नाहीतर काय म्हणायचे???

अर्थात सरकारने पण गांधीजींची हेतुपुरस्सर शवविच्छेदनाची मागणी केली नाही कारण चौथी गोळी कुणी मारली हे कळु नये म्हणूनच. त्यामुळे संशयाची जागा नेहरु, पटेल व तत्कालीन सरकारवर होती व आहे हे स्पष्ट आहेत. गांधीवाद्यांनी कितीही नाकरले तरी हे नागडे सत्य(Naked Truth) आहे.

*गांधीवध हा गांधीजींच्या ५५ कोटींच्या हेकेखोरीचाच परिणाम आहे - इति सरदार वल्लभभाई पटेल*

पटेलांनी हे वाक्य राजाजींना सांगितले आहे व ते राजाजींनी त्यांच्या *"Gandhiji's Teaching and Philosophy"* ह्या ग्रंथात लिहिले आहे ते खालीलप्रमाणे

*"When on 30th January, 1948, Gandhiji was assassinated by Godse, Sardar Vallabhbhai Patel felt that the conspiracy to kill Gandhiji was due to Hindu anger against him on account of this advise of his to pay a huge sum of money to the Pakistan Government when it was organising and carrying out a wicked military campaign against us."*

Page no. 25-26

ह्याचा आणखी पुरावा
*कपुर कमिटी अहवाल - खंड १*

*पटेलांची आमच्या हिंदुमहासभेला व त्याचेच अपत्य असलेल्या संघाला क्लीन चीट* 👇

पटेल नेहरुंना लिहिलेल्या २७ फेब्रुवारी, १९४८ च्या पत्रात म्हणतात.

*"But beyond this, I do not think it is possible, on the evidence which has come before us, to implicate any other members of the RSS or the Hindu Mahasabha."*

संदर्भ - Sardar Patel's correspondence Volume VI- page no. 56-58 - Ahmedabad

आमच्या प्राणप्रिय हिंदुसभेच्या नावाने २४ तास कंठशोष करणार्यांनी कृपा करून हे पटेलांचे नेहरुंना लिहिलेले पत्र लक्षात घ्यावे. पटेलांनी संघाला काँग्रेस मध्ये येण्याचे आवाहन गांधीहत्येपूर्वीच केलं होते. हिंदुसभेला नाही ही गोष्ट महत्वाची आहे. त्यांचे साहसही होणार नाही ही गोष्ट वेगळी.

६ जानेवारी, १९४८ च्या लखनौ मधल्या एका सभेत पटेलांनी

*"I invite the RSS to join the congress... I realise that they are not actuated by selfish motives but the situation warrants that they should strengthen the hands of the Government."*

संदर्भ - Speeches of Sardar Patel - 1947-50, Publications Division, Government of India, Page no. 56

अर्थात गुरुजींनी हे धुडकावून लावले. गुरुजींचे ते कृत्य योग्यच होते. असो.

*काही षंढ मानसिकतेचे स्वयंघोषित हिंदुत्ववादी मात्र नथुरामजींच्या त्या कृत्याचा धिक्कार करतात. त्यात उजवे समाजवादी आघाडीवर आहेत ही गोष्ट वेगळी सांगायला नको. असों सविस्तर कधीतरी तो विषय घेऊ !*

पण एवढे मात्र खरे की

गांधीहत्येनंतर ब्राह्मणांची सरसकट कत्तल करणार्या व किलोकिलोने जानवी मारणार्या गांधीवाद्यांनी कितीही अहिंसेचा टेंभा मिरवला व पंडितजींना शिव्या घातल्या, तरीही आमच्या ह्रदयांत त्यांचे म्हणजे पंडितजींचे स्थान कायम परमवंदनीयच राहील. त्या आधुनिक दधीचीप्रमाणेच, ज्याने आपल्या अस्थी देवासूरसंग्रामासाठीच अर्पण केल्या होत्या.

माझ्या आजोबांचे घर तर गांधीवाद्यांनी त्याकाळीच जाळले होतेच. शेतीही गेलीच. प्राणप्रिय सिंधु नदी अखंड हिंदुस्थानात यायची ही प्रतिज्ञा आम्ही पूर्ण करण्यांस कटिबद्ध आहोत. आम्हांसा कुणी वेडे म्हणो किंवा अन्य काही !!! कारण वेड लागल्यांशिवाय इतिहास घडतच नाही व वेडी माणसेंच इतिहास निर्माण करतात.

*ज्यांना सावरकर व गांधी ही दोन टोके एकाचवेळी प्रमाण वाटतात, अशा वैचारिक गोंधळ झालेल्या कुणीतरी लिहिलेली मोठी-मोठी पुस्तके वाचून अखंड हिंदुराष्ट्र नाकारणार्यांची कीव करावीशी वाटते. असो.*

सांप्रत हा भ्रम सतत प्रसृत केला जातोय की

*म्हणे गांधी आपल्या मरणाने मरत होते तर त्यांना मारून का मोठ्ठं केल? किंवा गांधीहत्येने हिंदुत्ववादी चळवळ चाळीस वर्षे मागे गेली. इति इति*

ह्यावर सविस्तर काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे द्यावीत सर्वांनी. येत्या काही दिवसांत ती विचारेन.

ज्यांना गांधीच समजले नाहीत, त्यांना गांधीवाद व नथुरामही समजणार नाहीत. त्यातून आजची प्रा. शेषराव मोरेंसारखी मंडळीही त्यांच्या पद्धतीने फाळणीची मीमांसा केल्यामुळे ते ग्रंथ वाचले की मनुष्य फाळणी योग्य मानतो. मूळ विषय आहे गांधीवाद. अनेकांचा भ्रम आहे की नथुरामजींनी केवळ फाळणी डोळ्यांसोमर ठेऊन ते कृत्य केलं. पण हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. एकमेव कारण नाहीये.

प्रश्न गांधीवाद अभ्यासणे हा आहे, त्यानंतर गांधीहत्या किंवा वध योग्य की अयोग्य ह्याचा विचार  करता येईल. त्यानंतर मग संघाच्या मताप्रमाणे हिंदुत्ववादी चळवळीचे झालेले तथाकथित नुकसान ह्याची सविस्तर मीमांसा करता येईल.शेष संघवाल्यांविषयी बोलायचं तर मी आधीही दोन तीनदा लिहिलं होतं की

*"पतत्वेष कायो" म्हणून प्रत्यही भगव्या ध्वजासमोर नित्यप्रार्थना करणारे संघवाले किंवा तत्सम लोक एकीकडे अखंड हिंदुराष्ट्राची स्वप्ने पाहतात, त्याविषयी उत्सव करतात, पण ह्याच अखंड हिंदुराष्ट्रासाठी "ददाम्येष कायो" म्हणून प्रत्यक्ष देह त्यागणारे पंडित नथुरामजी व आपल्या अस्थी सिंधुसाठी तशाच अविसर्जित ठेऊन आपला आत्मा तसाच ठेवणारे पंडित नथुरामजी ह्याच लोकांना माथेफिरु वाटतात.*

त्यामुळे आधी गांधीवाद व त्यानंतर नथुरामजींचे कृत्य ह्याची चिकीत्सा हवी. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे व मूळ वाक्य एका तत्कालीन मूस्लीम पुढार्याचेच असल्याप्रमाणे

*ज्यादिवशी पहिल्या मूसलमालाने ह्या देशांवर पाय ठेविला, त्यांच दिवशी इथली पाकिस्तानची भेदाची बीजे रोविली गेली.*

* पंडित नथुरामजी व डॉ. आंबेडकर*

देशाला स्वातंत्र्य मिळाले ते सावरकरांच्या, सुभाष बाबुंच्या सैनिकीकरणामुळे. माऊंटबैटनचे अंतिम वाक्य सूचक आहे. *पण नथुरामजींना माथेफिरु म्हणणार्यांनी त्यांनी केलेलं हिंदुसंघटन व त्यांनी तात्यारावांच्या आदेशानुसार केलेले शस्त्रसंपन्नतेचे व सैनिकाकरणाचे प्रसाराचे कार्य हे पाहून स्वत: आंबेडकरही भारावले होते. म्हणूनच ते गांधीहत्येचे समर्थक होते व नथुरामजींचे विधीज्ञपत्र घ्यावयांस उत्सुक होते. ही गोष्ट सिंधुताईंना आंबेडकरांच्या स्वीय सचिवांनीच सांगितलीय.*
अर्थात ही गोष्ट आता अनेकांना मान्यही होणार नाही. सविस्तर संदर्भ मी देईनच. कारण

*नामूलं लिख्यते किंचित् नानपेक्षिपतमुच्यते !*

बाकी गांधींजींच्या एकुणच व्यक्तिमत्वाविषयी तत्कालीन सर्व राष्ट्रपुरुषांनी व अगदी काँग्रेसच्या नेत्यांनीही केलेली *औरंग्याचा द्वितीय अवतार* ही वाक्ये वाचली की शंकेस वाव राहत नाही. मग ते ना भा खरे असोत अन्यथा डॉ. मुंजे अथवा पुण्याचे संत शंकरमहाराज असोत.

आधी नास्तिक व पूर्ण ब्रिटीशनिष्ठ वरवरपाहता वाटणारे किंवा तत्समच आचार विचार असणारे पण नंतर कट्टर सशस्त्र क्रांतिकारक व  कारावासातल्या श्रीकृष्णाच्या साक्षात्कारानंतर पुदुच्चैरीत(पाँडेचरी) पूर्ण चाळीस वर्षे साधना करून महायोगी बनलेले महर्षि अरविंदही गांधीजींविषयी काय लिहितात ते पाहणं आवश्यक आहे. 👇

*Many educated Indians consider Gandhi a spiritual man. Yes, because the Europeans call him spiritual. But what he preaches is not Indian spirituality but something derived from Russian Christianity, nonviolence, suffering, etc. The gospel of suffering that he is preaching has its roots in Russia as nowhere else in Europe -  other Christian Nations don't believe in it.*

*परमवंदनीय अमर हुतात्मा पंडित नथुरामजी गोडसे अमर रहे !*
*हिंदुराष्ट्र अजेय व अखंड हो !!*
*जय माँ भारती !!!*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#पंडितनथुराम_गांधीवध_अखंडहिंदुस्थान_छद्महिंदुत्व

Thursday 14 November 2019

मी एक अत्यंत अपयशी राज्यकर्ता - इति जवाहरलाल नेहरु...


*You have before you a statesman who has failed...- Jawaharlal Nehru*

संदर्भ - *Times of India dated 12.10.1992 - Dr. Giesla Bonn*

चीनच्या युद्धापश्चात नेहरुंना अपयशानी ग्रासल्यामुळे अंतिम दिवसांत त्यांच्या तोंडून पडलेले उद्गार त्यांच्या पराभूत मानसिकतेचे प्रदर्शक आहेत. *जिएस्ला बॉन ह्या जर्मन लेखकाने लिहिलेल्या Indian Challenge ह्या ग्रंथामध्ये २७मे, १९६४ च्या नेहरुंच्या मृत्युपूर्वी काही दिवस आधी भेट दिल्याची एक स्मृती सांगितलीय.* त्यांना दिलेल्या अभिव्यक्तीमध्ये(मुलाखत) नेहरुंनी प्रामाणिकपणे मी अपयशी राज्यकर्ता आहे असे मान्य केलंय. ते लेखक लिहितात...

*"I found the once energetic Prime Minister walk with a slow, halting gait.*

नेहरुंना पक्षाघात अर्थात अर्धांगवायु झाला होता हे लिहिताना ते म्हणतात

*"The Paralysis was very evident. He walked as if he was on the age of precipice. His shoulders were bent as if under a heavy burden. But his eyes were clear."*

*"You have before you a statesman who has failed."*

*गांधी एक विक्षिप्त नि ढोंगी म्हातारा - इति नेहरु*

*Gandhi - an awful Old Hypocrite - Nehru*

*१९५९ मध्ये लेस्टर पीअर्सन (Lester Pearson) ह्या कैनेडियन* राज्यकर्त्याशी संवाद करताना नेहरु

ज्या नेहरुंनी आयुष्यभर गांधींवर स्तुतीसुमने उधळली, पंतप्रधानपदासाठी त्यांना ब्लैकमेलही केलं, त्याच गांधींची संभावना नेहरुंनी उपरोक्त शब्दांत केलीय.

संदर्भ - *Gandhi and Nehru by Dr. S C Gangal, Director of Gandhian Studies, JNU*

*Indian Express dated 29.03.1993*

उपरोक्त सर्व संदर्भ टाईम्स ऑफ इंडिया नि इंडियन एक्स्प्रेस ह्या नामांकित वृत्तपत्रांतले आहेत.

अस्तु।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#नेहरु_अपयशीराज्यकर्ता_बालदिन_गांधीनिंदा_चीनयुद्ध_TimesofIndia_IndianExpress_JNU

Saturday 9 November 2019

संकल्प श्रीवाल्मीकि रामायणाच्या अध्ययनाचा!






*यावत्स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महितले।*
*तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति।*
बालकांड - २।३६-३७

आज श्रीराममंदिराचा निर्णय झाला. आपल्या सर्व हिंदुंची मनोकामना पूर्ण झाली. त्या आनंदाने एक श्रीरामभक्त म्हणून नि हिंदु म्हणून श्रीरामचंद्राचे प्रामाणिक चरित्र असे महर्षि श्रीवाल्मीकिरचित रामायण अभ्यासण्याचा संकल्प आपण सर्व हिंदुंनी करण्यांस कोणताही प्रत्यवाय नाही.

रामायण वाचावे तर महर्षि श्रीवाल्मीकिंचेच ह्यात संदेहच नाही. अन्य कुणाचेही रामायण वाल्मीकिंच्या अनुकूल तितकेच प्रमाण मानावं हाही एक शास्त्रमान्य सिद्धांत आहे. त्यामुळे वाल्मीकि रामायणाचा अभ्यास म्हणजे नेमकं काय ह्याचा विचार करणे प्रस्तुत लेखाचा विषय आहे.

श्रीवाल्मीकि रामायणाची रचना

*चतुर्विंशति सहस्त्राणि श्लोकानामुक्तवान् ऋषिः।*
*ततः सर्गशतान् पञ्च षट् काण्डानि तथोत्तरम्।*
बालकाण्ड - ४।२

ह्या श्लोकानुसार रामायणांत २४,००० श्लोक असायला हवेत व पाचशे सर्ग व सहा काण्ड हवेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड अशी सहा कांड रचना हवी.

पण पण पण...

सांप्रत रामायणाच्या कुठल्याही प्रतीत सात कांड आढळतात, २५,००० हून अधिक श्लोक आढळतात व ६५८च्या समीप सर्ग आढळतात.

ह्यावरूनंच वाल्मीकि रामायणांत मधील काळांत प्रचंड प्रक्षेप झालेले आहेत हे सिद्ध आहे. अर्थात ज्याला सत्य स्वीकारायची मानसिकता आहे, त्यालाच हे कळेल.

*व्याकरणशास्त्र दृष्ट्या रामायणाची समीक्षा*

महर्षि वाल्मीकिंनी अनुष्टुप छंदामध्ये रामायणाची रचना केलीय. सांप्रतच्या रामायणाच्या कोणत्याही प्रतींत शेकडो श्लोक असे आहेत की जे अनुष्टुप छंदाचे नियमंच पाळत नाहीत. असे सर्व श्लोक प्रक्षिप्त समजावेत असे ज्यांची जन्मशताब्दी ह्यावर्षी आहे असे नागपूरचे महामहोपाध्याय श्रीबाळशास्त्री हरदास त्यांच्या 'रामायण नि महाभारतकालीन राज्यव्यवस्था' ह्या ग्रंथांत म्हणतात. त्यांची ही भूमिका अत्यंत मान्य होण्यासारखी आहे.

ह्यात उत्तरकांडही सातवे कांड म्हणून जोडलं गेलंय. उपरोक्त श्लोकातल्या उत्तर शब्दावरून उत्तरकांडाचा बोध घेणं व्याकरणशास्त्रांसही धरून होत नाही. ह्यावरूनंच मूळ वाल्मीकि रामायणांत सहाच कांड अर्थात युद्धकांड इथपर्यंतंच रामायण होते हे सिद्ध होते. एरवी प्रक्षेप शब्द उच्चारला की ईंगळी डसल्याचा अनुभव करणार्या काही सनातनी विद्वानांनी मात्र हा उपरोक्त श्लोकही प्रक्षेप ठरविण्याचा अट्टाहास केला आहे. उत्तरकांड प्रक्षिप्त आहे की नाही ह्यावर अत्यंत विस्ताराने चिंतन अपेक्षित आहे. हे एका लेखाचं किंवा लेखमालेचं किंवा एका ग्रंथाचंही काम नाही. ह्यावर खंडच्या खंड लिहिता येतील इतका विस्ताराचा विषय असल्याने आणि त्यासाठी काळही तितकाच हवा असल्याने भविष्यांसाठी हा विषय इथेच सोडतो...

वाल्मीकि रामायणाचे भारतात सांप्रत चार पाठ प्रचलित आहेत. पश्चिमोत्तर शाखा, वंग शाखा गोरेशियाचे संस्करण (Gorresio's edition), दाक्षिणात्य संस्करण (कुम्भकोणम् संस्करण) आणि उत्तर भारताचे (काश्मीरि) संस्करण. यात दाक्षिणात्य तथा औदिच्य संस्करण एकजुळते असून अगदी नाममात्राचाही फरक नाही. पश्चिम-पूर्व संस्करणामध्ये अध्यायांचे अंतर व श्लोकांचेही आहे पण त्यावर कोणतीही संस्कृत टीका मिळत नाही. वंग शाखेवर केवळ एकमात्र (लोकनाथ रचित मनोरमा) टीका मिळते. म्हणून दाक्षिणात्य संस्करणाचाच (म्हणजे औदिच्य) सर्वत्र प्रचार आणि प्रामाण्य मानलं जातं. ते मानावं की नाही हा विषय वादाचा आहे.

*श्रीवाल्मीकि रामायणावरील आतापर्यंतचं प्रमुख संस्कृत भाष्य किंवा संस्कृत टीका*

वाल्मीकि रामायणावर ज्या तीन प्रमुख संस्कृत टीका आजपर्यंत झाल्या आहेत त्यात.

१. राम ह्या भाष्यकाराने केलेली तिलक टीका
२. शिवसहाय ह्याने केलेली रामायण शिरोमणी
३. गोविंदराज ह्याची भूषण ही टीका

ह्यापेक्षा अधिक आहेतंच पण मूळ अध्ययनाच्या दृष्टीने प्रमाण मानाव्यांत अशातल्या ह्या तीन प्रमुख आहेत.

गत काही वर्षांत श्रीमद्वाल्मीकि रामायणाच्या ह्या अध्ययनाच्या दृष्टीने आमच्या पाहण्यात आलेले काही निम्नलिखित ग्रंथ

१. वाल्मीकि रामायणावरील उपरोक्त तीन संस्कृत टीका
२. १९६० मध्ये बडौद्याच्या सयाजीराव गायकवाड प्राच्यविद्या संशोधन केंद्राने २००हून अधिक अशा विविध भाषांतल्या नि विविध लिपींतल्या प्रतींचे चिकीत्सक अध्ययन करून प्रकाशित केलेली वाल्मीकि रामायणाची सप्तखंडात्मक चिकीत्सक प्रत - संपादक - जी एच भट्ट (Critical Edition of Valmiki Ramayana)
३. गौरेशियाचे अर्थात वंगशाखीय वाल्मीकि रामायण
४. पश्चिमोत्तर वाल्मीकि रामायण - पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कॉलर व विश्वबंधु व राम लभय्या ह्यांनी दयानंद एंग्लो-वैदिक महाविद्यालयीन मालिकेतून प्रकाशित केलेलं (North-Western Recension)
५. गीताप्रेस गोरखपूरने प्रकाशित केलेली वाल्मीकि रामायणाची द्विखंडात्मक संस्कृत हिंदी प्रत
६. वेदमहर्षि श्रीपाद दामोदर सातवळेकर ह्यांनी दहा खंडात प्रकाशित केलेली संस्कृत मराठी प्रत - समालोचना सहित
७. वैदिक विद्वान वाईचे कृष्णशास्त्री लेले उपाख्य महाराष्ट्रीय नावाचे ह्यांनी केलेले संस्कृत मराठी भाषांतर व समालोचनाचे खंड
८. चतुर्वेदी द्वारिकाप्रसाद शर्मा कृत वाल्मीकि रामायण समग्र संस्कृत हिंदी भाष्य
९. विदर्भ मराठवाडा बुक एंड कंपनीने प्रकाशित केलेलं पंचखंडात्मक संस्कृत मराठी भाष्य व समालोचना

उपरोक्त सर्व साहित्य सुदैवाने पीडीएफही आहे. त्यातलं शेवटचं विदर्भचे मात्र टंकलिखित आहे.

उपरोक्त सूची आमच्या अल्पाध्ययनांस प्राप्त झालेली आहे. ह्यापेक्षाही अधिक चिकीत्सक नि अभ्यसनीय प्रती कुणाच्या पाहण्यांत असतील तर त्या आमच्या निदर्शनांस आणून द्याव्यांत ही नम्रतेची विनंती.

आम्ही चिकीत्सक अभ्यासाच्या दृष्टीनेच हा लेख लिहिला असून हिंदुंनी निदान एक तरी प्रत अभ्यासासाठी उद्युक्त व्हावं हीच प्रामाणिक इच्छा आहे.

संभव झाल्यांस रामायणाच्या दोन सर्गांचे तरी प्रत्यही अध्ययन करावं. ज्याने वर्षभरांत संपूर्ण रामायण अर्थासहित अभ्यासून पूर्ण होईल.

हा संकल्प ज्यांना घ्यायचाय त्यांनी अवश्य घ्यावा.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्राच्या चरणी कृतानेक साष्टांग दंडवत!

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#वाल्मीकिरामायण_अध्ययन_प्रक्षेपानुसंधान_श्रीराममंदिर_सातवळेकर_संस्कृत_गीताप्रेस_वैदिकधर्म