Wednesday 22 March 2023

कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः । ऋग्वेद - १०|१२९|६

 










को अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑च॒त्कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः । अ॒र्वाग्दे॒वा अ॒स्य वि॒सर्ज॑ने॒नाथा॒ को वे॑द॒ यत॑ आब॒भूव॑ ॥

भावार्थ - ही विविध सृष्टी कोणत्या निमित्तकारणाने आणि कोणत्या उपादानकारणाने उत्पन्न झाली, या गोष्टींस कुणी विरळा असा विद्वानंच यथार्थरुपामध्ये जाणु शकतो, कारण सर्वच विद्वान् हे सृष्टी उत्पन्न झाल्यापश्चातचे आहेत. अर्थात् कोणी तत्त्ववेत्ता योगीच हिला समजु शकतो आणि हिचं प्रवचन करु शकतो...!

ऋग्वेदातल्या नासदीय सूक्ताचा हा सहावा मंत्र. आज चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा अर्थात सृष्टीच्या नवसंवत्सरारंभाचा दिवस ! सर्वप्रथम सर्वांना नवसंवत्सराच्या अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्त हार्दिक अभीष्टचिंतन ! हे अखिल सृष्टीचं नवसंवत्सर आहे, केवळ मराठी किंवा हिंदु नवसंवत्सर किंवा नववर्षारंभ नव्हे...! अर्थात‌ हिंदुधर्म हा अनादि अनंत‌ सत्य सनातन अशा स्वरुपाचा असल्याने तसं म्हटलं तरी चालेल. या नासदीय सूक्ताचा अत्यंत विचित्र नि विकृत अर्थ काही लोक काढतात. काहींनी तर यात‌ नास्तिकता आहे असे मत मांडलंय. कीव येते खरी. वास्तविक वेदमंत्रांची शैली माहिती नसणाऱ्यांना या‌ सूक्तामधली प्रश्नार्थक शैली पाहून असा नास्तिकतेचा भ्रम होणं स्वाभाविक आहे पण नीट पाहिलं तर इथे नास्तिकतेचा गंधही नाहीये. असो कधीतरी या‌ सूक्तावर भाष्य करुच.

ही चराचर सृष्टी कुणी निर्माण केली, कशी केली, का केली, कधी केली, केंव्हा केली, कुठून केली हे सर्व प्रश्न आपल्याला कधी ना कधी तरी आयुष्यांत पडले असतीलंच की. भले त्यांचे समाधान शोधण्याची संधी आपणांस प्राप्त झालीही नसेल पण प्रश्न तरी निश्चित पडले असणारंच की...! मग त्याचे उत्तर देणार कोण? कुठे मिळायची?? कुठे शोधायची???

त्यामुळे याचा विचार करताना हे उत्तर सापडते की ही सृष्टी निर्माण झाली, तेंव्हा आपल्या प्राचीन ऋषिमुनींना जे सत्वगुणविशिष्ट योगज शक्तिसंपन्न परावरज्ञ होते, ज्यांना वेद हे साक्षात् होते, जे आपल्या उपासनेने सिद्ध झालेल्या दिव्य मानसिक शक्तीने या चराचर जगतातल्या परमाणु पासून ते परम महत्तत्वापर्यंतच्या समस्त पदार्थांना हस्तामलकवत् प्रत्यक्ष करु शकत होते, त्यांना ह्या चराचर ब्रह्मांडाचे रहस्य सहजबोध्य होते. याचे प्रमाण आपल्याला निम्नलिखित प्राप्त होते..

पुरा खलु अपरिमितशक्तिप्रभाववीर्यायुरारोग्यसुखैश्वर्यधर्म- सत्त्वशुद्धतेजसः पुरुषा बभूवुः। तेषां क्रमादपचीयमानसक्त्वानामुपचीयमानरजस्तमस्कानां लोभः प्रादुरभवत्‌.....!

(भट्ट उत्पल कृत वराहमिहीराची बृहत्संहिता टीका, पृष्ठ १२ वर उद्धत, सोबत पृष्ठ जोडलंय)




त्यावेळी वेद सोडून अन्य कोणतेही शास्त्र, पंथ, धर्म, उपासना, मार्ग अस्तित्वातंच नव्हता. परंतु पुढे पुढे जेंव्हा उत्तरकाळामध्ये मानव क्रमशः सत्त्वहीन, रजोगुण आणि तमोगुणाने युक्त होऊन अल्पमतीधारक झाले, उपदेशाद्वारासुद्धा वेदमंत्रांमध्ये विद्यमान विविध विद्यांना जाणण्यांस असमर्थ झाले, त्यावेळी या सर्व अल्पमेधावाल्या मनुष्यांसाठी विविध विद्यांचे ज्ञान देण्यासाठी विविध शास्त्रांचे प्रवचन महर्षींनी केलं.

हाच शास्त्रावताररूप इतिहास भगवान् महर्षि श्रीयास्कमुनींनी निरुक्तामध्ये 'साक्षात्कृतधर्माण ऋषयो...' या वचनात सांगितला आहे, तिथे पहावा.

भगवान् श्रीयाज्ञवल्क्यही म्हणतात

'दुर्बोधं तु भवेद्यस्मादध्येतुं नैव शक्यते।
तस्मादुद्धृत्य सर्व हि शास्त्रं तु ऋषिभिः कृतम्।।
बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति १२।२॥

ज्यांच्यासाठी हे ज्ञान दुर्बोध झालं आणि जे वेदांचे अध्ययन करु शकले नाहीत, त्या सर्वांसाठी वेदामधले ज्ञान घेऊन ऋषि महर्षि लोकांनी सर्व शास्त्रे बनवली.

महाभारत शांतिपर्वामध्ये २८४।९२ येथे भगवान् श्रीवेदव्यास लिहितात- 'वेदात् षडङ्गान्युद्धृत्य', अर्थात् 'वेदांवरूनंच वेदाङ्गांची रचना केली गेली.

मागील वर्षी याच पाडव्याच्या तिथींस आह्मीं 'अघमर्षण सूक्त' नावाने ऋग्वेदातील सृष्टीनिर्मितीच्या सुक्तासंबंधीचं काहीसं विवेचन केलं होते. मागील वर्षीचा लेख 

https://pakhandkhandinee.blogspot.com/2022/04/blog-post.html?m=1

इथे प्राप्त होईलंच. 

सृष्टीनिर्मितीचं रहस्य हेच वेदांचं मुख्य प्रयोजन...

आह्मीं यापूर्वीही अनेकवेळा लिहिलंय की वेदांमध्ये चराचर सृष्टीच्या निर्मितीचं ज्ञान अत्यंत सूक्ष्मरुपाने बीजरुपाने विद्यमान आहे. वेदांना मनुस्मृतीमध्ये 'सर्वज्ञानमयो हि स:|' हे उगाचंच म्हटलं नाहीये. वेद हे अभ्युदय-नि:श्रेयसाबरोबरंच सृष्टीनिर्मितीचं‌ रहस्य सांगण्यासाठीही प्रकट झालेत हा सिद्धांत आमचा मनगढंत नसून प्रत्यक्ष वेदांचाच आहे. निरुक्तकार महर्षि यास्काचार्यांचे मतही तेच आहे. कारण सृष्टी निर्माण होतेवेळी किंवा त्याआधी आपल्यापैकी कुणीच मानव उपस्थित नव्हता व असणं संभवही नाही. मग ते सृष्टीनिर्मितीचं रहस्य कळणार कसं? पृथ्वीवर जेंव्हा मानव प्रथम प्रकट झाला असेल, आधुनिक डार्विनप्रणीत विकासवादी वैज्ञानिक काय मानतात हा विषय वेगळा, पण अगदी त्यांचाही विचार केला तरी या मानवांस हे सर्व विश्व का निर्माण झाले, कसे झाले वगैरे प्रश्न पडलेच असणार आहेत. त्याचे उत्तर त्याला वेदांनी प्रकट झाले. कारण वेद हे मानवसृष्ट्यारंभी म्हणजे मानवोत्पत्ती पृथ्वीवर झाली, त्यावेळी चार ऋषींच्या अंत:करणी प्रकाशित झाले. याविषयी सविस्तर अनेकवेळा लिहिलंय, पुनरुक्ती करत नाही. वेद का प्रकट झाले याचं उत्तरंच या प्रश्नामध्ये आहे. वेदांच्या मुख्य प्रयोजनामध्ये धर्मज्ञानाबरोबर सृष्टीरहस्यही मुख्य आहेच.‌ कारण वेदांशिवाय हे ज्ञान असंभव आहे.

वेदा: यज्ञार्थमभिप्रवृत्ता:|

मधील काळात वेद हे केवळ यज्ञीय कर्मकांडासाठीच आहेत, त्यांचे अन्य कोणतंही प्रयोजन नाही असा एक अत्यंत संकुचित सिद्धांत उपरोक्त वचनाचा अधिदैविक गुढार्थ न आकळल्याने, रुढ झाला. आजही काही परंपरावादी स्वमतांधग्रस्त लोक वेद हे केवळ यज्ञीय कर्मकांडासाठीच आहेत, वेदांमध्ये केवल कर्मकाडंच आहे, त्यांचे अन्य कोणतंही प्रयोजन नाही व खरं ज्ञान तर उपनिषदांमध्येच(ज्ञानकांड) आहे असंच मानतात.‌ हे मत का चुकीचं आहे यावर सविस्तर कधीतरी भाष्य करेन. वास्तविक उपरोक्त मंत्रामध्ये यज्ञ हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलाय हे पहायला हवं. ही चराचर सृष्टी, हे सकल ब्रह्मांड हेच मूळात एक यज्ञ आहे. गीतेमध्ये ४|२८ इथे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ नि ज्ञानयज्ञ असे यज्ञाचे प्रकार सांगितले आहेतंच. यातल्या केवळ द्रव्य यज्ञाचा विचार करुयांत. कात्यायन श्रौतसूत्रामध्ये निर्दिष्ट २१ यज्ञप्रकार जिज्ञासूंनी पूर्वमीमांसा शाबर भाष्यात पहावेत.

देवतोद्देशेन द्रव्यस्य त्यागो यज्ञ:| 

विशिष्ट देवतेंस काही द्रव्य देण्याचं नाव यज्ञ आहे.

ही यज्ञ शब्दाची व्याख्या केवळ द्रव्य यज्ञाशी संबंधित आहे. यज्ञ शब्दाचे विविध धात्वर्थ महर्षि भगवान पाणिनींनी सांगितले आहेत, तिथे पहावेत.

मूळात यज्ञ नावाची ही संकल्पना का आली असेल??? मूळात यज्ञ संस्था का निर्माण झाली असेल??? 

ब्रह्मांड आणि अध्यात्माची रचना समजण्यासाठीच यज्ञसंस्थेचा उदय...

सर्वसामान्य मनुष्याला पिंड आणि ब्रह्मांडाचे यथार्थ ज्ञान होण्याची योग्यता प्राप्त नसल्याने त्याला ते ज्ञान व्हावं ह्या हेतुनेच या द्रव्ययज्ञांची निर्मिती किंवा मांडणी करण्यांत आली. यातून सृष्टीनिर्मितीचं रहस्य आकळावं हाही हेतु होताच, इतर अन्य हेतु होतेच पण मुख्य प्रयोजन हेच. अधिदैविक अर्थानेच ही सर्व प्रक्रिया जाणून घेण्यासारखी आहे. 

यज्ञवेदीचा संबंध हा पृथ्वीनिर्मितीशीच आहे...

यज्ञवेदीनिर्माण आणि पृथ्वी-सर्ग किंवा सृजन

आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ती पृथ्वी कशी निर्माण झाली, तिचा दृष्टांत कळावा या हेतुनेच ही वेदी निर्माण केली गेला. वैदिक यज्ञांमध्ये जी‌ यज्ञवेदी निर्माण केली जाते, तिची प्रक्रिया आपण पूर्वमीमांसेतून किंवा वेदांवरची व्याख्याने असे ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे आरण्यके आणि श्रौतसूत्रादि कल्प साहित्यातून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे कळते की यज्ञवेदी निर्माणाचे साम्य हे पृथ्वीनिर्माणाच्या प्रक्रियेशी आहे. यज्ञामध्ये अग्न्याधानामध्ये जी प्रक्रिया आहे ती पाहिली तर पृथ्वीच्या निर्मितीचीच प्रक्रिया तिथून स्पष्ट होते. कशावरून? तर याचे प्रमाण यजुर्वेदामध्ये प्राप्त होते. यजुर्वेद २३|६२ येथे इ॒यं वेदिः॒ परो॒ऽअन्तः॑ पृथि॒व्याऽ| ही वेदी नि पृथ्वीची साम्यता दर्शवणारी श्रुती आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये ६|१|१|१३ येथे 

'स श्रान्तस्तेपान: फेनमसृजत्| इथून ते तेनेमां पृथिवीं प्राच्छादयत्|' इथपर्यंत पृथ्वीच्या ९ प्रकारच्या सृष्टीचे म्हणजे स्थितींचे वर्णन करता करता हा विस्तार केला आहे जो अगदी यज्ञवेदीच्या निर्मितीप्रक्रियेशी साम्य दाखवणारा आहे. यावर सविस्तर कधीतरी येऊ. थोडक्यात इथे पृथ्वी कशी निर्माण झाली ते तिच्या प्राथमिक सलील अवस्थेपासून ते अंती तिच्यावर औषधी-वनस्पति, पशु निर्माण होईपर्यंतची प्रक्रिया लक्षात येते. पुरुषसूक्तामध्येही ही प्रक्रिया‌ सांगितली आहेच. हे सगळं कधी घडलं हे पाहताना आपण कुणी होतो का? नाहीच. 

म्हणून तर आपल्या ऋषिमुनींनी हा इतिहास शब्दबद्ध करून ठेवला. कारण वेदमंत्रांचे हे अर्थ व ही सर्व प्रक्रिया कळणं सर्वसामान्याचे काम नाही. किंबहुना या दृष्टीने वेदांकडे पहावं ही कल्पनाही आमच्यातल्या बव्हतांशाना सहन होत नाही. अगदी आधुनिक काळात ज्यांच्या पिढ्यान्पिढ्या वेदाध्ययनामध्ये गेल्यात‌ त्यांनाही. ह्याचा अर्थ आह्मीं जे मांडतोय ते काही नवीनंच किंवा क्रांतिकारी नसून

फोडिलें भांडार, धन्याचा हा माल| ह्याच‌ हेतुने आहे. प्राचीन शास्त्रकारांनी 

पशुयज्ञ हे मूळात सृष्टीयज्ञ आहेत...

वैदिक यज्ञामध्ये अनेक पशुयज्ञ आपल्याला आढळतात ज्यात पुरुषमेध(नृमेध), अश्वमेध, गोमेध, वगैरे सापडतात.‌ वास्तविक ह्यांचा अर्थ हा अधिदैविक भावनेने सृष्टीनिर्मितीशीच आहे हे इथे सांगणं क्रमप्राप्त आहे. कारण ब्राह्मणग्रंथ-कल्पादि साहित्य हेच उच्चरवाने उद्घोषून सांगतात. अधिदैविक पदार्थांसाठीच इथे पशु शब्दाचा‌ विचार केला गेला आहे.

अ॒ग्निः प॒शुरा॑सी॒त् तेना॑यजन्त॒...| वा॒युः प॒शुरा॑सी॒त् तेना॑यजन्त॒...| सूर्यः॑ प॒शुरा॑सी॒त् तेना॑यजन्त॒...|
शुक्ल यजुर्वेद - २३|१६

या मंत्रांमध्ये हाच भाव आहे.

संक्षेपांत काय तर वेदांमधलं सृष्टीनिर्मितीचं रहस्य कळण्यासाठी ऋषिमहर्षींनी पुढे षड्वेदांगे, षड्दर्शने, स्मृत्या, पुराणे वगैरेंचा विस्तार केला. कारण सर्वसामान्य मनुष्याला ते सर्व कळावं म्हणून. म्हणूनंच वेदांमध्ये सृष्टीनिर्मितीचं रहस्य असणं यात अप्रस्तुत काहीच नाही किंबहुना त्यांचे प्रयोजनंच त्यासाठीच आहे. अर्थात हे कळायसाठी वेदांकडे पहायची आर्ष दृष्टी हवी. ही आर्षदृष्टी म्हणजे ऋषिप्रणीत ग्रंथांच्या, सत्शास्त्रांच्या अध्ययनाने, संप्रदायपूर्वक वेदाध्ययन केल्याने नि योगसाधना केल्याने प्राप्त होईल. अन्यथा केवळ वेदमंत्रांचे कुणीतरी केलेले अनुवाद वाचून काहीही कळणार नाही. त्यातही गत दोनशे वर्षात जगभरात वेदांवर व्यक्त होणाऱ्या मेकॉलेपुत्रांची वाढंच वाढ‌ झाल्याने अशांची पुस्तके वाचून सत्यार्थ आकळायपेक्षा भ्रमंच भ्रम अधिक होण्याचा‌ संभव आहे. म्हणून सत्य जाणण्याची इच्छा असणाऱ्यांनी सावध रहावे...!

आपल्या नित्याच्या संकल्पामध्ये पृथ्वी कधी निर्माण झाली नि आपण कधीपासून पृथ्वीवर आहोत हे आमच्या मागील वर्षीच्या लेखामध्ये आह्मीं विस्ताराने मांडलंय त्यामुळे पुनरुक्ती न करता केवळ संकल्पाचा निर्देश करून लेखणींस‌ विराम देतो...

(सृष्ट्यादिसंवत्-संवत्सर-अयन-ऋतु-मास-तिथि -नक्षत्र-लग्न-मुहूर्त)       🔮🚨💧🚨 🔮

ओं तत्सत्-श्रीब्रह्मणो द्वितीये परार्द्धे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे 【एकवृन्द- सप्तनवतिकोट्ये कोनत्रिंशल्लक्षैकोनपञ्चाशत्सहस्र-  पञ्चविंशशत्यधिकशततमे ( *१९७२९४९१२५* ) सृष्ट्यब्दे】【 अशीत्युत्तरद्विसहस्रतमे ( *२०८०* ) वैक्रमाब्दे】  *पिङ्गल*- संवत्सरे *उत्तरायणे- वसन्त ऋतौ* मासानां मासोत्तमे *मधु मासान्तर्गते* *चैत्र शुद्ध प्रतिपदायां, तिथौ* उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे मीन- लग्नोदये *शिव*- मुहूर्ते भूर्लोके जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे आर्यावर्तान्तर्गते.......

सृष्टी संवत् - १,९७,२९,४९,१२५
त्यानंतर मानवसृष्टीसंवत् - १,९६, ०८,५३, १२४ वर्षे
कलियुग - ५१२५
विक्रमाब्द - २०८०
शालिवाहन शक - १९४५

अलमतिविस्तरेण बुद्धिवमद्वर्य्येषु|

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#गुढीपाडवा_चैत्रशुद्धप्रतिपदा_संवत्सर_सृष्टीनिर्मिती_वेदभगवान_वैदिकधर्म_यज्ञसंस्था


No comments:

Post a Comment