Saturday 22 April 2023

श्रीपरशुराम होणं तरी कुठं सोप्पंय ???

 


आरंभी घोर तपश्चर्या करत पिनाकपाणीपासून ४६ अस्त्रे प्राप्त करत, पुढे पितृआज्ञेसाठी मातृहत्येचं पातक(टीका) माथी घेताना त्याला काहीच‌ वाटलं नसेल का हो? उद्या इतिहास माझी अवज्ञा मातृहत्यारा म्हणून करेल हा विचार क्षणभरही त्याच्या मनी आलाच नसेल‌ काय? भले पित्याकडून मातेला त्याचे स्मरण न राहण्याचे वरदान घेतलं तरी इतिहासाचं जाऊदे पण जन्मदातीवरंच शस्त्र उचलण्याचे साहस कोण करेल हो? कल्पना तरी? पण पितृआज्ञेसाठी ते पातक त्याने माथी धरलंच ना?


प्रत्येक गोष्टीला अवतारवाद, दैवी लीला वगैरे वेडेपणा करायची मला तरी सवय नाही. कारण मी एक अल्बबुद्धीधारक आहे. श्रीजमदग्नींच्या क्रोधाचं‌ समर्थन होऊ शकतं? ब्राह्मणाला एवढा क्रोध शोभतो? अन्यथा स्कंदपुराणकारांनीच 


पुत्रेणापि पिता शास्या: शिष्येणापि गुरु: स्वयं क्षत्रियै: ब्राह्मणा: शास्या: श्रुतिराह सनातनी|

उन्मार्गगामिनं श्रेष्ठं अपि वेदान्तपारगं नीचै: अपि प्रशास्यिता श्रुतिराह सनातनी|


असे का म्हटलं असते? उपनिषदांनीही 'यान्यस्माकं सुचरितानि' का म्हटलं असतं? 


इतिहासाकडे वस्तुनिष्ठ डोळ्यांनी पहायचं की भगवंतांची लीला म्हणत आंधळ्यासारखं स्वत:ची गोड समजुत घालायची? तो ईश्वरी अवतार असेलही पण आपण मनुष्यंच आहोत की...


अर्थात ह्या प्रसंगानंतर त्यांचा‌ क्रोध कायमचाच शांत झाला असा इतिहास‌ सांगतो...


सहस्त्रार्जुनाने कामधेनु पळवल्यावर त्याच्या पत्नीने मनोरमेने त्याला ती परत करा, हे अपहरण योग्य नाही हे सांगूनही व पुढे चारही भावंडांबरोबर स्वत: श्रीभार्गवरामांनी त्यांस‌ वारंवार कामधेनु परत कर असे विनवूनही त्याने ती न केल्याने उलट युद्धाचे आवाहन दिल्याने अंती निरुपायाने त्याबरोबर युद्ध करत त्याला त्याच्या अधर्माचरणासाठी ठार करत पुन: त्याच्या पुत्रांनी पितृवधाचा सुड घेण्यासाठी आपल्या‌ वडिलांचा सारा आश्रम उध्वस्त करत पित्यावर २१ वार करत‌ त्यांची हत्या केल्यानें आईवरही वार झाल्याने अंती त्याच मातृआज्ञेसाठीच २१ युद्धं करत उन्मत्त क्षात्रसंहाराचे पाप (टीकाही) माथी घेत, शरण आलेल्या क्षत्रियांना अभय देत, जे सदाचरणी आहेत त्यांनाही कुठेच हात न लावता, संपूर्म पृथ्वी कुठेही नि:क्षत्रिय न करता, त्या युद्धांचेही पृथ्वीवर कधीही रात्री न विश्राम करण्याचं यथोचित प्रायश्चित्त घेत, पुनश्च भृगु ऋषींच्या‌ सहाय्याने अकृतव्रणाबरोबर शिल्पवेदाची निर्मिती करत, धनुर्वेदाची संहिताही प्रोक्त करत, सप्तकोंकणाची अर्थात अपरान्हाची निर्मिती करत ती भूमी सुजलाम सुफलाम करणारा हा सृजनकर्ता महर्षि श्रीजमदग्निनंदन...!


ज्याची आई म्हणजे श्रीरेणुकामाताच ही प्रत्यक्ष ईक्ष्वाकुवंशातली होती, त्याच ईक्ष्वाकुवंशातल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रासमोर पुढे आपलं तेज विसर्जित करत, त्याचा जयजयकार करत, पुढे द्वापरांती श्रीयोगेश्वरांस सुदर्शन प्रदान करत आणि आपल्याच शिष्यासमोर म्हणजे श्रीभीष्माचार्यांसमोर पराभव पत्करत शिष्याचाही गौरव वाढविणारा असा हा क्षत्रियप्रिय पुरुषश्रेष्ठ श्रीरेणुकानंदन..!


इतकंच काय पण कोळी समाजाला ब्राह्मण करत जातीअंताचा‌ पहिला लढा देणाराही हाच...!


म्हणूनंच म्हणतोय सोप्पं नाही परशुराम होणं...


२१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय हे मूळातंच अतिरेकी विधान आहे. मागेही ह्यावर विस्ताराने लिहिलंय पुनरुक्ती करत नाही. पण केवळ तेवढंच उचलत ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वाद पेटवायचा आपला नेहमीचा मार्क्सप्रणीत क्लास स्ट्रगलचा अर्थात वर्ग-संघर्षाचा अजेंडा राबवत रहायचा फोडा आणि राज्य कराच्या भेदनीतीचा प्रयत्न कुणी डावे किंवा भारत विखंडन शक्ती किंवा काही राजकारणी खुशाल करोत...


जर हा ब्राह्मण-क्षत्रिय वाद असता तर मध्ययुगीन कालखंडातल्या अनेक राजांनी आपली तुलना श्रीभार्गवरामाशी का केली असती, तसे संदर्भही उपलब्ध आहेत. जो सहस बाह पर राम द्विजराज हैं हे पुण्यश्लोक छत्रपति श्रीशिवरायांनी तरी का मान्य केलं असतं? ते तरी चिपळुणला का गेले असते???


आमच्या दृष्टीने श्रीभार्गवराम होणं सोप्पं तर नाहीच...


कारण केवळ तपाने चिरंजीवी होणं तर दूरंच पण काहीवेळा अप्रिय गोष्टी करूनही तो कटुपणा माथी घेत जगणं हे सोप्पं नाही...!


अंती एकंच...


उपासना, उपासना, उपासना, उपासना|


कशाची? 


तर ब्राह्मतेजाची म्हणजे वेदाध्ययनाची, क्षात्रतेजाची म्हणजे बलसंपन्नतेची, समाजधारणेची म्हणजेच धर्मरक्षणाची, राष्ट्रीयत्वाची म्हणजेच हिंदुत्वाची...!


आजच्या व्याख्यानाचा संक्षेपात सारांश...!


भवदीय...


#अक्षय्यतृतीया_श्रीभगवानपरशुरामजयंती_अपरान्ह_कोंकणनिर्मिती_धनुर्वेद_शिल्पविद्या_सृजनकर्ता

No comments:

Post a Comment