Wednesday 12 February 2020

वेदोद्धारक ऋषिश्रेष्ठ महर्षि श्रीमद्दयानन्द सरस्वति जयंतीविशेष...



भगवान पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्य, मीमांसक श्रीकुमारिल भट्ट, मीमांसक श्रीउदयनाचार्य ह्यांच्या परंपरेमध्ये ज्या आदित्य बालब्रह्मचारी-उर्ध्वरेतस्-ब्रह्मवर्चसी अशा ऋषिश्रेष्ठाचे स्मरण व्हावं अशा योग्याची आज जयंती...भगवान श्रीपरशुरामवत् अन्यायसंहारी, श्रीबृहस्पतिवत् वेदवक्ता, श्रीवसिष्ठवत् वेदप्रचारक, सत्यवक्ता, निर्भीड, दीर्घदर्शी, समदर्शी, वाग्मी, जितेंद्रिय, सुवक्ता असा निर्म्मल, निर्विकार, समुद्रवतगंभीर, पृथ्वीवत् क्षमाशील, अग्निवत् दैदिप्यमान, पर्वतवत् कर्तव्यस्थिर, सदैव ब्रह्मपरायण असा हा ऋषिश्रेष्ठ...

काय लिहावं ह्या महापुरुषाविषयी? अनेक महापुरुषांची जीवनचरित्रे अद्यापपावेतो अभ्यासली पण ह्या योग्याचे चरित्र काही निराळंच आहे.

*सविकल्प समाधी अवस्था प्राप्त करूनंच मग वेदार्थ प्रकट करणारा हा ऋषिश्रेष्ठ वेदोद्धारक...

निरुक्तकारांनी भारतवर्षाच्या युद्धापश्चांतचं चित्र रेखाटताना तत्कालीन परिस्थितीचे वर्णन करताना *"को नः ऋषिर्भवति"* ह्या प्रश्नाचे उत्तर देताना जे म्हटलंय ते अगदी सार्थ आहे. *तर्क हाच ऋषि. ह्या तर्क नावाच्या ऋषीचा अर्थात उहेचा विनियोग ज्याने आपल्या बृहस्पतिसमान प्रगल्भ बुद्धीने केला,त्या ऋषिश्रेष्ठाची आज जयंती...*

प्रत्येक वेदमंत्रांचे किंवा तत्संबंधित सूक्ताचे भाष्य करण्यापूर्वी तासन्तास समाधी लाऊनंच मगंच वेदार्थ प्रकट करणारा हा वेदभाष्यकार...

*"मला चारीही वेदांचे समग्र भाष्य करायला चारशे वर्षे लागतील..."*

असे सांगणारा हा वेदानुशीलनकर्ता...

ह्या ऋषिश्रेष्ठाचे वेगळेपण ते काय की त्याची इतकी स्तुती करावी???

*स्त्रियांना व शुद्रांनाही वेदांचा अधिकार जो पूर्वी होताच, तो मागील काळांत नाकारला गेला, तो वेदांच्या अंतःसाक्षीच्या आधारेच सर्व मानवज्ञातींस प्रदान करणारा हा समदर्शी अखिलमानवहितकर्ता...*

*आर्ष ग्रंथांचा उद्धारकर्ता...*

अनार्ष ग्रंथांमुळे वैदिक धर्मांस आलेल्या ग्लानींस दूर करण्यासाठी नि विशुद्ध वैदिक मताच्या पुनर्संस्थापनेसाठी ज्याने आर्ष अर्थात ऋषिप्रणीत ग्रंथांचाच आयुष्यभर पुढाकार केला नि त्यांचाच निर्भयपणे प्रसार केला असा हा सत्यनिष्ठ ऋषि. *कौमुदी, चंद्रिका, सारस्वत, मुग्धबोध, आशुबोध, मनोरमा आदि अनार्ष व्याकरण ग्रंथांनी वैदिक व्याकरणाविषयी नि वेदार्थ प्रतिपादनाविषयी जो काही गोंधळ मधील काळांत निर्माण झाला, तो धातुपाठ, अष्टाध्यायी नि व्याकरण महाभाष्याच्या अध्ययनाने अर्थात आर्ष ग्रंथांच्या अध्ययनाने नि प्रसाराने ज्याने दूर केला नि वेदार्थाची वाट सूकर केली, अशा व्याकरणसूर्याची आज जयंती. ज्याचे वर्णन व्याकरणसूर्य नि महान वैय्याकरणी असंच करावं लागेल असा हा वैय्याकरणी. काशीच्या ज्या शास्त्रार्थांस यावर्षी १५० वर्षे पूर्ण झाली, त्या शास्त्रार्थांत ज्यांनी पातंजल महाभाष्यांतली कल्म संज्ञा सनातनी विद्वानांना विचारतांच जे निरुत्तर झाले, ज्याने संस्कृत व्याकरण अतिशय सुलभ केलं आणि ज्याच्या परंपरेतल्या "पदवाक्यप्रमाणज्ञ वारावारिणः" अशा ब्रह्मदत्त जिज्ञासु नि युधिष्ठिर मीमांसकजींसारख्या वैय्याकरणींनी ही पदवी सार्थ केली, असा तो वैय्याकरणसूर्य...*

हिंदुंना अर्थात आर्यांना विशुद्ध वैदिक मत प्रदान करताना ज्याने अन्य अवैदिक मतांचीही समीक्षा अत्यंत तर्ककठोर नि अभ्यसनीय पद्धतीने केली नि ज्यामुळे अनेक मूळच्या हिंदु असलेल्या परंतु परपंथांत गेलेल्या लक्षावधींनी वैदिक धर्माचा स्वीकार केला, अशा *सत्यार्थ प्रकाश* नामक एका अद्वितीय ग्रंथांचा जो रचयिता... *एकीकडे सर्वधर्म एकाच ईश्वराप्रती जातात असा भोंगळ सिद्धांत मांडणारे एतद्देशीय भलेभले विद्वान असावेंत, अशांच्या मांदियाळींत सर्व पैशाचपंथांची चिकित्सा तर्काच्या नि वैदिक मताच्या आधारे करणारा हा धर्माचा पुनर्संस्थापनकर्ता...*

*शास्त्रार्थ महारथी...*

वैदिक हिंदुंची अत्यंत प्राचीन अशी शास्त्रार्थ परंपरा ज्याने पुनरुज्जीवित केली नि अनेक शास्त्रार्थांमध्ये पैशाचपंथींसहच स्वकीय अशा काही भरकटलेल्या मतानुयायींनाही ज्याने शास्त्रार्थांत पराभूत करून वैदिक पथांवर आरुढ केलं, अशा लेखारंभी उल्लेखिलेल्या शास्त्रार्थ महारथींच्या रांगेत बसणारा हा प्रखर वेदनिष्ठ...

*स्वातंत्र्याचा उद्गाता...*

लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे स्वराज्य ही संकल्पना सर्वप्रथम महर्षि दयानंदांनीच मांडली. इतकं पुरेसंय.

*हिंदुसमाजाचा सत्यनिष्ठ उद्धारकर्ता...*

तत्कालीन सर्व अनिष्ठ रुढी नि प्रथांना प्रखर विरोध करणारा नि सर्व हिंदुंचे संघटन करणारा उद्धारकर्ता...

*ह्या सर्व लोकोद्धाराच्या महान कार्यासाठी ४४ वेळा प्राणहरणाचे कष्ट सहन केलेला, ज्यातले सतरा प्रयोग हे विषपानाचे आणि इतकं होऊनही सर्वांस क्षमा करणारा क्षमाशील...*

काय नि किती लिहावं...

*लेखणी बोथट होते, वाणी हिंपुटी होते...*

ह्या ऋषिवर्यांस जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन....!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#ऋषिश्रेष्ठ_महर्षिश्रीदयानंद_जयंतीविशेष_वेदोद्धारक_आर्यसमाज_सत्यार्थप्रकाश

No comments:

Post a Comment