Monday 13 January 2020

उदीच्यै दिशे सोमाय च नम: ।




आम्ही हिंदु आमच्या नित्याच्या संध्येमध्ये जे दशदिशांस दिग्वंदन करतो, त्यात उत्तरदिशेंस उपरोक्त शीर्षक मंत्रांने अभिवादन करतो. आमच्या प्राचीन ऋषिमूनींनी आम्हा हिंदुंना तो विश्वदिग्विजयाचा वारसा प्रदान करताना दशदिशांचे हे दिग्वंदन ऋग्वेदाच्या कृण्वन्तो विश्वमार्यम् ह्या मंत्राज्ञेने दिला. आणि म्हणून तो वारसा नित्याच्या संकल्पांत आम्ही सानंद गातो.

भगवान वेदप्रणीत विश्वदिग्विजयाची आकांक्षा उरी बाळगणारे नि तदनुसार सर्व विश्वभर संचार करणारे हिंदु मधील काळातल्या बौद्ध नि जैनांच्या आत्यंतिक अहिंसेच्या रेट्यामुळे ह्या सत्वस्वाभिमानांस विस्मृत झाले आणि षंढ नि आत्मघातकी अहिंसेची भोंगळ गप्पाष्टके गात बसले. क्षात्रतेजाने हीन झालेला हा हिंदु समाज म्हणूनच अडीच सहस्त्र वर्षे ग्रीक(यवन), शक, कुशाण, हुण, म्लेंच्छ, मुसलमान, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच ह्या सर्वांस रणी धुळींस मिळवत आलाच हेही तितकंच सत्य.

ह्याच मधील काळात धर्मांध म्लैंच्छ अर्थात मूस्लिमांच्या परकीय आक्रमणांस पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या, श्रीशंभुछत्रपतींच्या खड्गाच्या धारेने जे हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेने तेजस्वी प्रत्युत्तर दिलं, त्याच स्वराज्याचं साम्राज्यात रुपांतर करून थोरल्या श्रीमंत बाजीरावांनी हा वारसा पुढे मराठ्यांना हस्तांतरित केला.

तो वारसा म्हणजेच पानिपत...!

*पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या दक्षिणदिग्विजयापश्चात उत्तर दिग्विजयाचे स्वप्न पूर्ण करण्यांस उदीच्येंस प्रस्थान करणारे तेजस्वी नि रणधुरंधर मराठे नि त्या विजीगीषु परमोज्ज्वल इतिहासाचा तो क्षण म्हणजेच पानिपत !*

त्या आधी एक वर्ष...

*बचेंगे तो और भी लढेंगे ।*

*दत्ताजी शिंदे रणामाजी विद्ध्य...*
रचना - परमादरणीय श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी 

१० जानेवारी, १७६०

महाभारतातला एक प्रसंगय. धनुर्धर वीरश्रेष्ठ अर्जुनाच्या श्रीकृष्णभगिनी सुभद्रेपासून जन्मलेल्या अभिमन्यु नामक वीरांस कौरवांनी सर्वांनी मिळून युद्धनियमांच्या विरुद्ध जाऊन रणी धूळींस मिळवलं. तरीही त्या तेजस्वी युवकाच्या मुखातून त्यावेळी जे शब्द पडले असावेत पण जे इतिहासाला नि भारतकारांना ज्ञात असावेत; परंतु ते शब्दबद्ध झाले नसावेत, त्यापरीची ती प्रेरणा तरी तीच असावी, तसेच हे दत्ताजींचे उपरोक्त शब्द.

त्यादिवशी त्या रणधुरंदर दत्ताजी शिंदेंच्या त्या देहांस गिलच्यांनी धरतांच दत्तांजींस तो प्रश्न केला.

*क्यौं पटेल और लढोगे ?*

तेंव्हा वारस होऊ अभिमन्युचे असा तेजस्वी बाणा अंगी धारण केलेल्या त्या दुध आईचे तेजप्रवाही नसांतूनी सळसळणार्या त्या दत्ताजींनी तितक्याच बाणेदारपणे त्यांस उत्तर दिलें.

*हाँ बचैंगे तो और लढेंगे ।*

ज्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कौरव पांडवांचे पंचेचाळीस लक्षांचे देह संगरी शोणितांस प्राप्त झाले, त्याच भूमींस तो उत्तरदिग्विजय पुढे एक वर्षांनी मराठ्यांनी त्याच पानपतांवर साकार केला.

*लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या, आणि चिल्लरखुर्दा किती गेल्या ह्याची गणतीच नाही.*

काय आवश्यकता होती मराठ्यांनाच पानपतांवर जायची ? काय आवश्यकता होती लाख बांगडी फोडायची ? का ? कोण तो अब्दाली ? कुठली ती दिल्लीतली खिळखिळी झालेली पातशाही ? तिच्या संरक्षणासाठी नि अब्दालीचे संकट मोडण्यासाठी काय कारण म्हणून मराठ्यांनी स्वराज्य सोडून पानपतांवर जायचं ?

ह्याचे उत्तर आम्ही हिंदु मराठे म्हणून जेंव्हा स्वत:स विचारु, तेंव्हाच आमच्या ह्या परमोज्ज्वल इतिहासाचे दिग्दर्शन आम्हांस प्राप्त होईल.

*ते उत्तर आहे महाराष्ट्रधर्म ह्या शब्दांत.*

इथे मराठा ही वृत्ती आहे, जात नव्हे. देव, देश नि धर्माच्या रक्षणासाठी भगवा ध्वज हाती घेऊन उरी नि मुखांत तो हर हर महादेवाचा मंत्र घेऊन स्वराज्यरक्षण नि वृद्धीसाठी दिगदिगांतात भ्रमण करणारा तो तेजस्वी मराठा.

*बहोत लोक मेळवावें, एक विचारें भरावें ।*
*कष्टें करुन घसरावें, म्लेंच्छावरिं ।*

ह्या समर्थोक्तीप्रमाणे नि

*आमुचा स्वदेश ।*
*भुवनत्रयामध्ये वास ।*

ह्या जगद्गुरु तुकोक्तीप्रमाणे सर्व विश्वसाम्राज्य संपादन करण्याची अभिलाषा अंत:करणांत धारण करणारा तो हिंदु मराठा !

*इतिहासाचार्य वि का राजवाड्यांच्या भाषेत सहिष्णु हिंदुंस जयिष्णु करणारा तो मराठा नि त्याचा तो विजीगीषु असा महाराष्ट्रधर्म !*

पानपत समजून घ्यायचे असेल तर मागेच म्हटल्याप्रमाणे इतिहासाचार्य वि का राजवाड्यांचा *मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड एक - १२७ पृष्ठांची द्वादश प्रकरणात्मक प्रस्तावना* नि त्यानंतर रियासतकार सरदेसाईंची *मराठी रियासत : मध्य विभाग ३: पानिपत प्रकरण (१७५०-१७६१)* आणि शंकर नारायण जोशींचे  *भाऊंच्या वीरकथा व पानिपत कुरुक्षेत्र वर्णन* हेही वाचनीय आहे. अभ्यासायला हवं. आणि शेवटी श्री उदय कुलकर्णींचे *सौल्स्टिस एट पानिपत* हे मूळ आंग्ल किंवा त्याचा मराठी अनुवाद तरी.

हे ग्रंथ पानपत आकळण्यासाठी अत्यावश्यकच आहेत.

इतिहासाचार्य लिहितात.

*गिलच्यांच्या धिप्पाड आणि अर्बुद शरीरांपुढे मराठ्यांच्या लहान व वामन मूर्तीचा टिकाव लागला नाही म्हणून एक आक्षेप आहे. गिलच्यांच्या लांबी रुंदी पेक्षा मराठ्यांच्या शरीराचें क्षेत्रफळ कदाचित लहान असेल परंतु लढाईत या क्षेत्रफळावर मोठी भिस्त असते असे नाही. कर्नाटकातील राठ आणि धिप्पाड शेतकरी, मथुरावृंदावनातील गलेलठ्ठ बैरागी, पंजाबातील उंच धिप्पाड व ठिसुळ शीख, रजपुतान्यातील रुंद छाताडाचे व भरगच्च मासाचे राठोड,  या सर्वांना लहान्या परंतु काटक मराठ्यांनी वेळोवेळी चीत केले होते. त्या मराठ्यांना अर्बुज गिलचांचे किंवा पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही मनुष्याचे भय मागे कधीं वाटले नाही व पुढे कधीं वाटणारही नाही.*

पृष्ठ क्रमांक ९१ - मईसा खंड प्रथम - प्रस्तावना

*पानपत आपण खरंच हरलो का ?*

शं ना जोशींनी पानपताविषयी जे अंतिम मत उपरोक्त ग्रंथात व्यक्त केलंय ते पाहुयांत.

*पानिपतचा हा संग्राम मराठ्यांची कीर्ति यावच्चंद्रदिवाकरौ उज्ज्वल राखील; कितीही राज्यक्रांत्या किंवा घडामोडी झाल्या तरी या पानिपतच्या आठवणीनें मराठ्यांच्या बाहूंस स्फुरण चढेल, आणि कोणत्याही देशाचे राज्य करण्यांस मराठे सर्वथैव लायक आहेत याची खात्री हा प्रसंग निरंतर पटवीत राहील यात तिळमात्र शंका नाही.*

एवंच ह्या इतिहासांस वंदन करून नि त्या सर्व नररत्नांस त्यांच्या असीम त्यागासाठी नि अपरिमित शौर्यासाठी दंडवत करून लेखणींस विराम देतो !

जयोस्तु हिंदुराष्ट्रम् !
जयोस्तु महाराष्ट्रधर्म !
जयोस्तु राष्ट्ररक्षक मराठा !

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#पानिपत_राष्ट्ररक्षकमराठे_जयिष्णुहिंदु_महाराष्ट्रधर्म_राजवाडे_उत्तरदिग्विजय

1 comment:

  1. सलाम त्या योद्ध्यांना व वीरांना. पण आजची तरुणायी मोबाईल गेम्स व घरबसल्या टीका करणे व आराम करणे याबाहेर जात नाही हा खेद आहे.

    ReplyDelete