Wednesday 8 January 2020

*अश्वमेध यज्ञ, भारतीय संस्कृती कोश आणि काही सोशल मीडियावीरांची बौद्धिक दिवाळखोरी !*


तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते ।
जगद्गुरु तुकोबाराय

आपल्याला ज्या विषयांतले काही कळत नाही, त्यावर भाष्य करायचं नि स्वत:चे हसु करून घ्यायची सवय काहींना असते. ऊचं ढुंगणही कळत नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मनसोक्त उपभोगणे हे तर आजच्या तथाकथित बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठी, चिकीत्सकवृत्ती म्हणविणार्या ह्या विचारधारेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ना वैदिक व्याकरण आपल्याला कळतं, ना संस्कृत कळतं ना वैदिक साहित्याचा आपल्याला काही परिचय. पण कौप्या करून काही मुलं जशी परीक्षा उत्तीर्ण होतात, तसंच कुणाचेतरी कौप्या करून स्वत:च्या अंगरख्याची मान वर करून आम्ही कशी जिरविली म्हणून मिरविणारे असतातच.अशांसाठी हा लेखनप्रपंच !

*मुख्य आक्षेप*

काय तर म्हणे आमचे पूर्वज वैदिक अश्वमेध यज्ञांत घोडा मारायचे, त्याचा होम यज्ञांत करायचे व राजपत्नी त्या घोड्याशी एक रात्रभर समागम करायची म्हणे?

आणि संदर्भ कुणाचा ? तर भारतीय संस्कृती कोशाचा ! 😂😂😂😂

कडक गांजा नि वड पाचची संघटनेचे अध्यक्ष नि त्यांचे कार्यकर्ते !

महर्षि दयानंदांनी दीडशे वर्षांपूर्वीच ह्या आक्षेपांचं सप्रमाण खंडन त्यांच्या *ऋग्वेदादिभाष्यभमिका* ह्या अजरामर ग्रंथात केलेलंच आहे.वेदमहर्षी सातवळेकरांनीही ह्यावर सविस्तर भाष्य केलंच आहे. वास्तविक पाहता खूप पूर्वीच ह्यावर लेखन केल्यामुळे पुन्हा लेखनाची आवश्यकता नव्हती. पण गुर्वादेशामुळे लिहिता झालो. अस्तु !

*अश्वमेध शब्दाचा अर्थ*

अश्व शब्दाची व्युत्पत्ती

वैदिक शब्दांचे अर्थ आकळण्यासाठी त्यांची व्युत्पत्ती पहावी लागते.

निरुक्तकार लिहितात.

*अश्व: कस्मात् । अश्नुतेsध्वानम् । महाशनो भवतीति वा । तत्र दधिका इत्येतद् दधत्क्रामतीति वा ।*

यास्ककृत निघण्टु - २.२७

अर्थ - *अश्व का ? कारण तो मार्गक्रमण करतो नि तेही खूप वेगाने धावतो म्हणून.तो खुप खाणारा आहे अर्थात कुणालातरी धारण करून पुढे पाऊल टाकणारा आहे.म्हणजेच मनुष्य किंवा वस्तु वाहून नेणारा आहे.*

ही अश्व शब्दाची व्युत्पत्ती आहे.

*आता यज्ञ शब्दाची व्युत्पत्ती पाहुयांत.*

माझ्या मागील पंडित युधिष्ठिर मीमांसकांवरील लेखांत लिहिल्याप्रमाणे वैदिक शब्द धातुज आहेत अर्थात प्रत्येक शब्दाची धातु नि व्युत्पत्ति पाहिल्याशिवाय त्याचा यथार्थ बोध होत नाही. कौपी पेस्टांना हे झेपणार नाही ही गोष्ट वेगळी. असो.

यज्ञ हा शब्द *यज्ञ देवपुजासंगतिकरणदानेषु* (पाणिनी धातुपाठ - १।७२८) ह्या धातुपासून बनत असून महाभाष्यानुसार (३।३।९०) यज् धातुंस *यजयाचयतविच्छप्रच्छरक्षो नङ ।* हा नङ प्रत्यय लागून हा शब्द तयार होतो.

*आता मेध शब्दाचा अर्थ पाहुयांत*

मेध शब्दाचे तीन अर्थ आहेत धातुपाठानुसार.

बुद्धिवर्धन, संगतीकरण आणि हिंसाही. पण हिंसा अर्थ अभिप्रेत होऊच शकत नाही हे आम्ही विस्तृत विवेचन निम्नलिखित केलंच आहे. बुद्धीला म्हणूनच मेधा म्हणतो. एखादी व्यक्ति मेधावान आहे म्हणजेच बुद्धिवान आहे असा अर्थ असतो.

आता अश्वमेधाची प्रक्रिया पाहुयांत.

कात्यायन श्रौतसुत्रामध्ये अध्याय २०व्या मध्ये अश्वमेध यज्ञाविषयी विस्तारपूर्वक उल्लेख आहे. शतपथांतही दिलाय हे संस्कृती कोशात लेखक लिहितातच. अस्तु !

*आता संस्कृती कोशकारांचे आक्षेप पाहुयांत.*

संस्कृती कोशाचे लेखक म्हणतात की म्हणे ह्या यज्ञांत एक कुत्रा मारला जातो म्हणे. आता कुत्र्याचा संबंध ह्यात कुठून आला हे त्यांनी दिलेलंच नाही. अस्तु ! तरीही कुत्राच काय कुठल्याच प्राण्याची हिंसा वैदिक यज्ञांत संमत नाही हे आजपर्यंत आम्ही अनेकवेळा आमच्या लेखांतून सिद्ध केलेलंच आहे.

माझे उघड आव्हान अर्थात ओपन चैलेंज आहे की चतुर्वेद संहिताभागांत पशुहत्येची संमती देणारा एकतरी मंत्र ह्या पढतमूर्खांनी दाखवावा. ह्याउलट कोणत्याही प्राण्याची हिंसा करुच नका असे शेकडो मंत्र मी आपणांस सादर करेन. आधीही अनेकवेळा केलेलेच आहे. ब्लौगवर वाचावे.

अश्वमेध यज्ञांत अश्वाची हिंसा करण्याची आज्ञा वेदांत असती तर वेदांत निम्नलिखित मंत्र आलाच नसता. अनेकवेळा हा मंत्र सादर केलाच आहे.

यदि नो गां हंसि यद्यश्वं यदि पुरुषम् ।
त्वं त्वा सीसेन विध्यामो यथा नोsसो अवीरहा ।
अथर्ववेद - १/१६/४

अर्थ - जर तु आमच्या गाय, घोडे व पुरुषांची हत्या केलीस तर आम्ही तुला शीस्याने (शीसगोळीने)विद्ध करु. ज्यामुळे तु आमच्या वीरांचा वध करु शकणार नाहीस !

हे काय आहे ? की ओढला गांजा व लिहिलं सोशल मीडियावर ? कौपी पेस्ट बहाद्दर लोक्स इथे लक्ष देतील का?

*अथर्ववेदांत ११.७.७ येथे अश्वमेधाविषयी एक मंत्र स्पष्टपणे त्याच्या हत्येचा निषेध करणारा आहे.*

*राजसूयं वाजपेयमग्निष्टोमस्तदध्वरः। अकार्श्वमेधावुच्छिष्टे जीव बर्हिममन्दितमः।।*

अर्थ - *राजसूय, वाजपेय, अग्निष्टोम, अर्कमेध, अश्वमेध हे सर्व अध्वर अर्थात हिंसा रहित यज्ञ आहेत, जे प्राणीमात्रांस बुद्धी-सुख-शांती प्रदान करणारे आहेत.*

*सर्व वैदिक यज्ञ हे अध्वरच आहेत.*

ऋग्वेदाची प्रथमच सूक्ताची चौथीच ऋचा *अग्ने यं यज्ञमध्वरं* असे सांगते. यज्ञ हा अध्वर आहे.

*अध्वर म्हणजे काय ? ध्वरिति हिंसा कर्म - तत्प्रतिषेध: - निरुक्त ।*

*ध्वर म्हणजे हिंसा व त्याचा जिथे निषेध आहे तो अध्वर.*

आता आणखी काय प्रमाण पाहिजे ?

बरं आता कोशलेखकांनी सत्याषाढ श्रौतसूत्रासंबंधी केलेलं विधान पाहुयांत.

सत्याषाढ श्रौतसूत्र हे कृष्ण यजुर्वेदाच्या श्रौतसूत्रांपैकी एक आहे ज्यांस आम्ही वेदच मानत नाही. पण क्षणभर तो मानला तरी प्रत्यक्ष वेदभगवान काय सांगतो ते आम्ही वर दिलंच आहे. संस्कृती कोशकार लिहितात की म्हणे ह्या श्रौतसूत्रानुसार अश्वमेधयज्ञाविषयी अनेक पशुंचे हनन करायचे असते.

कशावरून ? काहीही विधान करायची. बरं त्यांनी प्रमाण काय दिलंय? मोघम नि बाष्कळ विधाने करायची. हे शोभतं तुम्हाला ???बरं ह्या सत्याषाढाच्या १४ व्या प्रश्नांतच अश्वमेधाविषयी जे काही लिहिलंय ते संस्कृत कोशकारांनी वाचलंय का ? संदर्भ तरी दिलेत का नीटसे ?

त्यांनीच नाही दिले तर हे कौपी पेस्ट बहाद्दर कुठून देणार ?

कोशकार लिहितात की यज्ञाच्यावेळी ती राजपत्नी त्या अश्वांस उद्देश्यून काही अश्लील व ओंगळवाणे शब्द उच्चारते.

हे कुठून लिहिलंत हो ? काही प्रमाण वैदिक साहित्यातले?

*कोशकारांची अक्षम्य चूक नि गोंधळ*

पुढे तर लिहितात की म्हणे ह्या यज्ञांत मृत घोडा (अश्व) व राजपत्नीचे मैथुन विहित आहे. आणि ह्यासाठी ते संदर्भ देतात तो  कात्यायन श्रौतसूत्र २०.६.१५-१६ चा.

काय दिवाळखोरी आहे. मृत अश्वाशी मैथुन कसे संभव आहे? हे संस्कृती कोशकारांनी लिहिताना आपली बुद्धी गहाण टाकली होती का ? मृत व्यक्तीशी किंवा प्राण्याशी मैथुन कसं संभव आहे ? कैच्या काय ? तरीपण तो मूळ संदर्भ पाहुयांत.

अश्वशिश्नमपुस्थे कुरुते वृषा वाजीति । १५।
उत्सक्थ्याsत्यश्वं यजमानोsभिमन्त्रयते ।१६।

इथे अश्वशिश्नमुपस्थे शब्द आला की लगेचच ह्यांनी त्याचा अर्थ विकृत काढून मोकळे झाले. वाह धन्य आहात.

आता ह्याचा वास्तविक अर्थ काय आहे ते पाहुयांत.

*शिश्न: सूर्यप्रकाश: (धातो:षस्य शकारादेशश्छान्दस:) तं प्रकाशं राजमहिषी उपस्थे कुरुते ।*

इथे अश्वाचे शिश्न म्हणजे मृत अश्वाचे शिश्न नसून सूर्यप्रकाश ह्या अर्थाने ते आहे. तो प्रकाश ती राजमहिषी आपल्या उपस्थांत धारण करते अर्थात सूर्यप्रकाश धारण करते. प्रकाशांत येते असा ह्याचा भावार्थ आहे.

पण व्यवस्थित वाचायचंच नाही, पूर्ण प्रकरण पहायचंच नाही, तेवढ्यापूरतं पहायचं व द्यायचं ठोकून. विद्वानांनी तरी अशा गोष्टी करु नयेत हो. अस्तु।

मूळातच हा आरोपच तथ्यहीन आहे कसे ते पाहुयांत.

*यज्ञासाठी ब्रह्मचर्याची दीक्षा*

बरं सर्वप्रथम तर हे महत्वाचंय की कोणत्याही वैदिक यज्ञात नैष्ठिक ब्रह्मचर्याची दीक्षा पती-पत्नींस घ्यावीच लागते. त्याचे प्रमाण आम्ही आमच्या ब्लौगवरील प्रथमच लेखांत दिलंय. शतपथ ब्राम्हणामध्ये मांस भक्षण करण्याचा नि मैथुनाचा अधिकार पूर्णत: नाकारलेला आहे :-

 *न मांसमाश्रीयात् ! यन्मासं माश्रियात् यन्मिप्रानमुपेथादिति नेत्वेवैषा दीक्षा ।*
(शतपथ ६:२.२.३९)

*अर्थात मनुष्याने मांस भक्षण करता कामा नये. जर त्याने मांस भक्षण केले किंवा मैथुन केले तर त्याला यज्ञ दीक्षेचा अधिकार नाही.*

आता बोला. यज्ञाची दीक्षा घेणार्याला मैथुनाचा अधिकारच नाही. तरी ही संस्कृत कोशकार लिहितात की मृत अश्वाबरोबर राजपत्नीचे मैथुन ?

बापरे !

*वाल्मीकि रामायणांतील अश्वमेध*

कोशकार असा आक्षेप घेतात की बालकांडात म्हणे १४ व्या अध्यायांत ३४ व्या श्लोकांत राणी एक रात्र त्या अश्वाजवळ काढते म्हणे.

जर कोशकारांच्या मते तो अश्वच मारला गेलाय तर त्याच्याजवळ तिने रात्र घालवायचा विषयच येतो कुठे ? एकतर मूळात ह्या श्लोकाचा अर्थच हा होत नाही. तरीही कोशकार ओढून ताणून अर्थ का काढतात हे त्यांचे त्यांनाच माहिती.ते मूळ दोन श्लोक पाहुयांत.

*बालकांड - वाल्मीकि रामायण*

*कौसल्या तं हयं तत्र परिचर्य समंततः ।*
*कृपाणैर्विससारैनं त्रिभिः परमया मुदा ॥ ३३ ॥*

अर्थ - राणी कौसल्येने तेथे प्रोक्षण आदिच्या द्वारा सर्व बाजूंनी त्या अश्वाचा संस्कार करून मोठ्या प्रसन्नतेने तीन तलवारींनी त्याला स्पर्श केला॥ ३३ ॥

इथे स्पर्श केला एवढंच लिहिलंय. मारलं असे नव्हे. कारण पूर्वमीमांसेतही स्पर्श एवढाच अर्थ अभिप्रेत आहे. आता पुढे कोशकारांचा संदर्भ पहा.

*पतत्त्रिणा तदा सार्धं सुस्थितेन च चेतसा ।*
*अवसद् रजनीमेकां कौसल्या धर्मकाम्यया ॥ ३४ ॥*

अर्थ - तदनंतर कौसल्या देवीने सुस्थिर चित्ताने धर्मपालनाची इच्छा ठेवून त्या अश्वाच्या निकट एक रात्र निवास केला. ॥ ३४ ॥

इथे शेजारी झोपणे म्हणजे समागम करणे असा अर्थ थोडीच होतो ?ही कोशकारांची कुठली संस्कृती आहे?

*ऋग्वेदाचा संदर्भ पाहुयांत आता*

ऋग्वेदाच्या ज्या प्रथम मंडलाच्या १६२ व १६३ व्या सूक्ताचा संदर्भ संस्कृती कोशकारांनी दिलाय त्याचा संबंध हा सृष्टीरचनेशी आहे. शब्दश: अर्थ घेणार्यांना तो कळणं संभव नाही. तसंही कोशकारांनी दिलेला अर्थ कुणाचा आहे हे कळायला मार्ग नाहीये. तो कोशकारांचा अर्थ जसा उपरोक्त आमच्या सर्व विवेचनाला सोडून तर आहेच, तसाच एकुण वेदांच्या अंत:साक्षीलाही सोडूनच आहे. त्यामुळे तो कदापि ग्राह्य नाही. त्यात अश्वाला कापण्याचे व त्याचा वध करण्याचा जो विकृतार्थ कोशकारांनी केलाय तो तथ्यहीन नि अवास्तव तर आहेच पण भयंकरही आहे.

कोशकार पुढे म्हणतात की वेदोत्तर कालांत हा अश्वमेध कमी झाला व पुढे त्याला अध्यात्मिक रुप दिलं गेलं म्हणून उपनिषदांमध्ये म्हणे त्याची अलंकारिक वर्णन आले म्हणे.

मूळात कोशकारांना हे तरी कळायला हवं की उपनिषदे ही वेदांवरची व्याख्यानरुपी ग्रंथ असलेल्या ब्राह्मणग्रंथांची एक भाग आहेत. सनातनी परंपरेमध्ये तर उपनिषदांनाही वेद संबोधायचा प्रघात आहे. क्षणभर तो मान्य केला तरी काही परस्परविरोध सिद्ध होत नाही. कोशकारांनी बृहदारण्यकाच्या १.१.१ चा संदर्भ देऊन तिथे अश्वमेध हा कसा अलंकारिक आहे हे वर्णन दिलंय. ह्यावरूनच सिद्ध होते की वैदिक मंत्रातही हेच वर्णन अपेक्षित आहे जे आम्ही वर सृष्टिनिर्मितीच्या संबधाने मांडलेलं आहे. अस्तु ।

शेष, कोशकारांनी पुढे दिलेला भाग फारसा समीक्षा करण्यासारखा नसल्यामुळे लेखणींस विराम देतो. अंतिम क्षणी पुनश्च हेच ठासून सांगायचे आहे की अश्वमेध, नरमेध, गोमेध आदि यज्ञांमध्ये कुठेही कोणत्याही प्राण्याची हिंसा अभिप्रेतच नाही.

ह्याविषयी आम्ही कुणाशीही शास्त्रार्थ करण्यांस उत्सुक आहोत. कधीही, कूठेही.

उर्ध्वबाहुर्विरोम्येष ।

*आणि हो जाता जाता !*

*वेदांमध्ये मांस खाणार्याला राक्षस म्हटलेलं आहे*

क्रव्याद,पिशाच,असुतृप, गर्भाद,अण्डाद, मांसाद, कौणप:, आशर:, कर्बुर:

असे मांस खाणार्यांसाठी शब्द योजिले आहेत.

*त्यामुळे पढतमूर्खांनी परंपरेतून वेदाध्ययन करावं व मगच वेदांविषयी आपली बुद्धी पाजळावी.*

*स्वयंघोषित बुद्धिप्रामाण्यवाद्यांची दिवाळखोरीच पहा*

एकीकडे आम्ही बुध्दिवादी आहोत, शब्दप्रामाण्यवादी नाही अशी टिमकी वाजविणारे हे लोक्स सोयीस्कर कुणाचेही भाष्य प्रमाण मानतात नि आपल्या वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करतात. संस्कृती कोशकार त्यांनी लिहिलं व ह्यांनी प्रमाण मानलं. म्हणजे इथे सोयीस्कर शब्दप्रामाण्यवाद बरंका. बुद्धिवाद गेला चुलीत. आहे की नाही गंमत ? असो.

हेच आक्षेप नरमेध, गोमेध विषयीही आहेत, त्याचेही निराकरण कधीतरी करुच. मूळात ते वरच झालंय व आधीही अनेकवेळा केलंचंय म्हणा. तरीहीे

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#अश्वमेध_यज्ञ_हिंसा_वेद_अहिंसा_समागम_अश्लीलतानिषेध_भारतीयसंस्कृतीकोश_दिवाळखोरी_बुद्धिवाद_शब्दवाद

1 comment:

  1. अप्रतिम खंडन. यजुर्वेदातील काही मंत्रांचे असेच विकृत लिखान काही जण फिरवत आहेत. त्यांना मी माझ्याकड़ील ग्रंथातील मंत्र आणि त्याचा अर्थ दाखवला तर यावर शास्त्रार्थ कर म्हणत आहे की लाज वाचवण्यासाठी तुम्ही लोकांनी आता अर्थ बदललेत

    ReplyDelete