Saturday 24 December 2022

हुकलेले गुरु नि हुकलेली शिष्य परंपरा...








ज्या‌ देशांत वेदविद्यायुक्त जितेंद्रिय योगसाधनारत पुरुष जन्माला येत नाहीत नि नेतृत्व धारण करत नाहीत, तिथे नेहमी दुराचारी, पाखंडी, धूर्त नि ठग लोकांकडून सामान्य जनतेंस फसविलें जाते...


इति महर्षि‌ दयानंद सरस्वति


आमच्याकडे वस्त्रांची लक्षावधी वर्षांची नि जगप्रसिद्ध परंपरा असताना आमच्यातले कथित गुरु जेंव्हा स्वत:ला किंवा आमच्या देवीदेवतांना ख्रिस्त्यांचे पोशाख चढवतात, त्यावेळी गत सहस्त्रावधी वर्षे आह्मीं का परदास्यतेच्या शृंखलात बद्ध होतो ह्याची जाणीव होते. अर्थात हिंदुसमाजाची मुख्य समस्या हीच आहे की आमचे मूलभूत सिद्धांत पक्के नाहीत.‌ आह्मांला आमच्या स्वधर्माचेच ज्ञान जिथे नाही, तिथे परधर्माविषयी किंवा पैशाचपंथांविषयी यथार्थता कशी असणार? जिथे अध्यात्मिक गुरु म्हणविणारे लोकंच वैचारिक दृष्ट्या इतके हुकलेले आहेत, तिथे त्यांचा शिष्य परिवार कसा असेल ह्याची‌ कल्पनाच न केलेली बरी. हिंदुंना हिंदुच शत्रु आहेत, वेगळ्या शत्रुंची आवश्यकता काय???

या अध्यात्मिक गुरुंविषयी आमच्या मनात कोणताही अनादर नाही. पण ख्रिस्त्यांचे पोशाख ह्यांनी स्वत: का घालावेत? हे समर्थनीय कसं ठरु शकतं???

आधी रामकृृष्ण मठ, त्यानंतर महायोगी अरविंदांचा पाँडेचरी आश्रम(मी स्वत: २५ डिसेंबरलाच पाहिला आहे), नुकताच रा स्व संघ हे नि असले तथाकथित गुरु नि या‌ सर्व बव्हतांश हिंदुसंघटना म्हणविणाऱ्या २५ डिसेंबर किंवा ईद, मोहर्रम आला की यांना काय सर्वधर्मसमभावाच्या उकळ्या फुटतात कळत नाही. 

ते आमच्याकडे यावेत, ते आमच्याकडे यावेत हे म्हणत आह्मीं कधी त्यांच्याकडे जाऊन सुंता करून घेऊ ह्याचेही भान हिंदुंना राहणार की नाही ह्याची भीती वाटते. अर्थात बोलायची सोयंच‌ राहिली नाही. गोळवलकर गुरुजींना कुणीतरी मुसलमान येऊन मला हिंदु व्हायचं आहे असे म्हणाल्यावर त्यांनी त्याला 'तु हिंदु न होता एक सच्चा मुसलमान बनुन दाखव' असे म्हणणं हे उदाहरण आमचं हिंदुत्व कुठल्या थराला गेलं आहे ह्याचे द्योतक आहे.त्यांनी समाननागरी विधेयकालाही विरोध केला होता हे माहिती असावं हिंदुंना...!  पण त्यांच्याविरोधांत बोलायचं नाही...

पण शूssक बोलायचं नाही... आमच्या नेतृत्वावर शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला??? 


स्वधर्माभिमान तर ह्यांच्यात नाहीच पण त्यातून जी विजीगीषु वृत्ती निर्माण व्हायला तीच नसल्याने हिंदु समाज अशांनाच नेतृत्व मानत असल्याने त्याच्या अस्तित्वाविषयी अंत:करण संदेहाने भरून येतं.

तुम्ही आमच्या शिबीरात या, नुसती‌ सुदर्शन क्रिया केली तर कुंडलिनी आपोआप जागृत होते असे म्हणणारे ह्यांचे अनुयायी पाहता भगवान महर्षि श्रीपतंजलींना योगदर्शन रचून पश्चात्तापाचीच भावना निर्माण व्हायला हवी यात काय संदेह???कुंडलिनी जागृती इतकी सोप्पी कधीपासून झाली???

कलियुगांत गुरुंच्या नावाने ठग निर्माण होतील हे वचन प्रत्यही प्रत्ययांस येणारं आहे. खरंतर आमच्याकडे श्रीज्ञानोबा- श्रीतुकोबा-श्रीनामदेवराय-श्रीचोखोबा-श्रीरामदास या‌ आत्मसाक्षात्कारी संतांची व भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांसारखी इतकी उज्जल नि उदात्त गुरुपरंपरा असताना आमच्या लोकांना हे असले गुरु करावेसे वाटतात यासारखी शोकांतिका काय??? योगेश्वर भगवान श्रीकष्ण, भगवान श्रीरामचंद्रांसारखे मर्यादा पुरुषोत्तम जिथे जन्मांस आले, तिथे ही अवस्था???


पतन आणखी काय असु शकतं एखाद्या राष्ट्राचं नि धर्माचं...??? 


पण आता शिष्यवर्ग एकतर धमक्या द्यायला अंगावर येणार किंवा काहीतरी गोड समर्थन करणार या कृतीचं...! धन्य...


गेल्या दोन दशकांत अनेक सत्पुरुषांचे व त्यातल्या त्यात गत दोन शतकांतल्या महापुरुषांचे चरित्र व साहित्य अभ्यासल्यावर एकंच गोष्ट लक्षात आली ती ही की ज्यांना वैदिक धर्माच्या मूलभूत सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान नाही असे बव्हतांश महापुरुष (मागच्या दोन शतकांतले) हे इस्लाम नि ख्रिश्चनिटीचं यथार्थ आकलन करण्यांत पूर्णत: अपयशी ठरले आहेत. सर्वधर्मसमान आहेत ही विषाची घुट्टी(गुटी) जी हिंदुंना बाळकडु म्हणून सतत पाजण्यांत येते, ती त्यांच्या पेशीपेशीत, नसानसांत अशी काही जाऊन बसते‌ की कितीही नैतिक प्रगती केली तरी ह्या लोकांना त्याची सत्यासत्यता कळत नाही. केवळ तीन चार महापुरुष आहेत ज्यांचा अपवाद आहे की ज्यांनी या दोन्ही समस्यांचे यथार्थ आकलन केलं इतकंच नव्हे तर त्यावर वस्तुनिष्ठ समाधानही सुचवलं. त्यामध्ये अग्रगण नाव महर्षि दयानंदांचे येतं ज्यांनी सर्वप्रथम वैदिक धर्माची विशुद्ध मांडणी करत दुसरीकडे इस्लाम नि ख्रिश्चनिटीची तर्कशुद्घ नि वस्तुनिष्ठ पोलखोल आपल्या सत्यार्थ प्रकाश या अजरामर ग्रंथामध्ये नि अनेक ख्रिस्ती मिशनरी नि मौलवींच्या शास्त्रार्थांमधून केली. त्यांच्या आर्यसमाजी परंपरेतले स्वामी श्रद्धानंद, लजपतरायांसारखे सिंहपुरुष व पश्चात् केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर हेच एकमेव ठरले. आंबेडकरांनीही ही चिकीत्सा केली पण दुसरीकडे आपल्या वैदिक हिंदु धर्माला सुरुंग लावून फोडण्याची भाषा केली. सावरकरांनीही बुद्धिवादाच्या जोरावर सर्वधर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत अशीही विधानं केली, जी अत्यंत अनावश्यक होती. 


भले भले अध्यात्मिक गुरु म्हणविणारे लोक जर असे वागत असतील तर ह्यांची कथित अध्यात्म परंपरा तरी चूक आहे, ह्यांची‌ साधनापद्धती तरी चूक आहे हेच लक्षात आलं पाहिजे किंवा हे लोक लोकैषणेसाठी हे करत असावेत इतकंच सत्य आहे.


त्यामुळे या‌ सर्वांमध्ये केवळ महर्षि दयानंद हेच काय ते वेगळे उठून दिसतात. वाईट ह्याचे की दयानंदांचे सिद्धांत आपल्या प्रचलित सनातन धर्माला जणु काळ आहेत असे समजुन काही सनातन्यांनी इस्लामचे व ख्रिश्चनिटीच्या संस्थापकांची भलामण केली व महर्षींची यथेच्छ निंदा केली. (शास्त्रार्थ पंचक - माधवाचार्य शास्त्री) म्हणजे दयानंद शत्रु पण इस्लामचे नि ख्रिश्चनिटीचं संस्थापक मात्र महात्मा...! रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेली महात्मा येशु व ख्रिस्त ही पुस्तके जिज्ञासूंनी वाचलेलीच असतील. बंगाली लोकांचे इस्लाम प्रेम नवीन नव्हेच म्हणा. मी विवेकानंद समग्र वाचले आहेत.


त्यामुळे अनेक जण आह्मांस विचारतात की आह्मीं सारखे दयानंद दयानंद का करतो तर त्याचे हेच कारण आहे. ज्यादिवशी हिंदु समाज सत्यार्थ प्रकाश हा अमर ग्रंथ समजून घेईल, तो सुदिन असेल...! हिंदुना स्वधर्माचं ज्ञान घेणं जितंक आवश्यक आहे त्याहीपेक्षा अन्य पैैशाचपंथीयांचेही आहे. तुलनात्मक धर्मशास्त्राध्ययन ही काळाची अत्यंत आवश्यकता आहे.



भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#ख्रिश्चनिटी_नाताळ_ख्रिसमस_इस्लाम_सर्वधर्मसमभावाचे_वेड_धर्मचिकीत्सा_संतपरंपरा_अध्यात्म

No comments:

Post a Comment