Wednesday 1 May 2024

महाराष्ट्र शब्दाचा इतिहास....

 


आज महाराष्ट्र दिन ! 

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्री भाषेचा इतिहास नामक लेखात आह्मीं महाराष्ट्री अर्थात मराठी भाषेच्या संबंधाने काही मांडलेलं होते, तरीही पुनश्च महाराष्ट्र शब्दाच्या विस्ताराने!  

ब्रिटीशांनी मांडलेला विभाजनकारी आर्याक्रमण सिद्धांत ते गेल्यावरही पद्धतशीरपणे इतिहासलेखनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात अत्यंत नेटाने होताना दिसतोच, त्यात संस्कृत भाषेविषयीचा द्वेष जसा ठासून भरलेला आहे, तसा कथित मूळनिवाशीवादाचा व परकीय आर्य म्हणजे पूर्वी ब्राह्मण व आता गेल्या काही दशकांत क्षत्रिय व वैश्यही परकीय आर्य आहेत असे रेटण्याचा प्रयत्न सातत्याने भारत विखंडन शक्तींकडून सुरुच आहे, त्याचाच एक प्रयत्न म्हणजे महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती नि इतिहास !

संस्कृत प्राकृतपासून झाली हा विकृत सिद्धांत त्याचेच अपत्य यद्यपि या आरोपाचं सप्रमाण खंडन आह्मीं मागे संस्कृत-दिनाच्या त्रिदिनात्मक फेबु लाईव्ह व्याख्यानमालेत केलंच आहे.

महाराष्ट्र हा शब्द मूलतः संस्कृतंच आहे.

पण भारत विखंडन शक्तींकडून व त्यांच्या विखारवंताकडून महाराष्ट्र हा शब्द महार+राष्ट्र असा तयार झाल्याच्या हास्यास्पद उत्पत्ति दिल्या जातात, त्याचं कारण आमचे हिंदु महार बांधव हे इथले मूळनिवासी आहेत व संस्कृत बोलणारे आर्य बाहेरचे ही छुपी आर्याक्रमण थेअरी रेटण्याचा त्यांचा अजेंडा ! 

डॉ. जॉन विल्सनने त्याच्या मोल्सवर्थ शब्दकोशामध्ये सर्वप्रथम महार राष्ट्र ते महाराष्ट्र अशी अत्यंत खोटारडी व्युत्पत्ती दिली, त्यांनाच बुद्धी गहाण टाकलेल्या राजवाडे, भांडारकर, शं बा जोशी वगैरे भले उजव्या असलेल्यांनी सुद्धा महारठ्ठ पासून संस्कृत महाराष्ट्र झाले असे हास्यास्पद तर्क केले आहेत, राजाराम शास्त्री भागवतांनी तर महारथीपासून महाराष्ट्र अशी व्युत्पत्ति दिलीय जी भले संस्कृत व्युत्पन्न वरवरपाहता वाटत असली तरी चुकीची आहे. शं बा जोशींनी तर कानडी मरहट्ट - झाडीमंडळ पासून महाराष्ट्र झालाय असे लिहिलंय.

भल्या भल्या विद्वानांचे हे लिखाण त्यांच्या संस्कृत भाषेच्या सिद्धांताचं अज्ञान दर्शवितं. 

हे सर्व अभ्यासक का चुकले आहेत ते सिद्ध करण्यासाठीच हा लेख आहे.

आह्मीं मागे लिहिलंय की मूळात वैदिक संस्कृत भाषेचा विस्तार किंवा विकास न होता पुढे अपभ्रंश, ह्रास आदि मार्गांनी ती संकुचित होत जाते हा मूळचा वैदिक सिद्धांत आहे, पण डार्विनच्या विकासवादाने अंध झालेली मागील दोन शतकांतली मेकॉलेपुत्रांची व अभ्यासकांची पिढी, त्यातली काही अपवाद अशी भले आर्याक्रमण नाकारणारी व शुद्ध भारतीय विचारधारेची असली तरीही पाश्चात्य इंडॉलॉजिस्टच्या 'आधुनिक तुलनात्मक भाषाशास्त्राध्ययनाच्या' (कंपेरिटिव्ह फिलॉलॉजी) डार्विनप्रणीत सिद्धांतांना भूललेली असल्याने तिला संस्कृत-प्राकृत भाषेच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचं ज्ञानही नसणं हे स्वाभाविक आहे.

वस्तुतः मागेही लिहिलंय की आपल्या प्राचीन वैदिक नि तत्सम परवर्ती संस्कृत वाङ्मयामध्ये भाषेच्या उत्पत्तीचा, तिच्या विस्ताराचा, ह्रासाचा, संस्कृत-प्राकृत संबंधाचा इतिहास अत्यंत सुस्पष्टपणे नि साद्यंत मांडलेला असूनही आह्मांला तो वाचावासा वाटत नाही, कारण आमची बुद्धी डार्विनने ग्रासली असल्याने ! यासंबंधी कोणतं साहित्य अभ्यासायला हवं असा एक लेख मागे संक्षेपात लिहिलाच आहे, जिज्ञासूंनी तो फेबुवर शोधावा. त्यामुळे इतकं स्फटिकासमान स्वच्छ असं वाङ्मय आपल्याकडे असताना त्याच्याकडे केवळ ते 'ब्राह्मणी साहित्य' आहे अशी भ्रामक समजूत करत त्याची हेटाळणी करून आपला व जगाचा भ्रम वाढविणे हे हिताचं आहे का याचा ज्याचा त्याने विचार करावा!

महाराष्ट्र हा शब्द मूलतः संस्कृतंच आहे आणि पुढेच त्याचा अपभ्रंश महारट्ट आदि शब्दांमध्ये झालेला आहे हे संस्कृत साहित्याचा परामर्श घेतलं की सहज लक्ष्यीं येते, त्यासंबंधीचं आरंभी उल्लेख केलेल्या लेखातलं काही विवेचन !

वैदिक संस्कृतपासून उद्भवलेल्या किंवा विकार पावलेल्या प्राकृतभाषांमध्ये सर्वप्रथम जिचा आविष्कार झाला, ती म्हणजे शौरसेनी प्राकृत. ह्या शौरसेनी प्राकृतचे पुढे जे तीन प्रमुख भेद झाले, त्यामध्ये महाराष्ट्री ही प्रथम असून मागधी नि पैशाची ह्या दोन पश्चातच्या आहेत. प्राकृतभाषांच्या अध्ययनासाठी जो सर्वात प्रथम नि अधिकारी ग्रंथ असा जो उपरोक्त भरतमूनींचा नाट्यशास्त्र नावाने सुपरिचित आहे, ज्याचा कालावधी महाभारतकालाच्या पूर्वीचा आहे, त्या ग्रंथामध्ये १७।४८ येथे नाट्याचार्य श्रीभरतमूनींनी

सर्वास्वेव हि शुद्धासु जातिषु द्विजसत्तमाः।

शौरसेनीं समाश्रित्य भाषां काव्येषु योजयेत्।

असे म्हटलंय. विक्रम संवत पूर्व पांचव्या शतकांतले महान मीमांसक श्रीकुमारिल भट्टपाद हे त्यांच्या तंत्रवार्त्तिक ह्या अत्यंत प्रसिद्ध ग्रंथामध्ये

मागध-दाक्षिणात्य-तदपभ्रंशप्रायासासाधुशब्दनिबन्धिना।

असे म्हणतात. इथे मागधी व दाक्षिणात्यावरून महाराष्ट्री अथवा जैनीचा अभिप्राय श्रीकुमारिलभट्टांस आहे असे लक्ष्यीं येते. अपभ्रंशही आहे.

महाकवी श्रीदंडीचा काव्यादर्श मधील संदर्भ

ज्याचे पदलालित्य प्रसिद्ध आहे, असा श्रीदंडी त्याच्या काव्यादर्श ह्या ग्रंथामध्ये महाराष्ट्री अर्थात मराठीविषयी जे लिहितो  महत्वाचे आहे.

महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः।

सागरः सूक्तिरत्नानां सेतुबन्धादि यन्मयम्।

महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा हींस लोक प्रकृष्ट प्राकृत समजतात. ह्यामध्ये सूक्तीरुपी रत्नांचा सागर आहे ज्यात सेतुबंध नावाचे काव्य रचलं गेलंय.

ह्या सेतुबंधग्रंथाच्या टीकेमध्ये रामदास नामक लेखकाने 'महाराष्ट्रभाषायां' असा शब्दप्रयोग केला आहे. कर्पुरमञ्जिरी ह्या ग्रंथामध्येही शौरसेनी व महाराष्ट्री दोन्हींचा उल्लेख आहे.

प्राकृतभाषेच्या बव्हतांश सर्व वैय्याकरणींनी एकमुखाने महाराष्ट्रींस सर्वोत्तम प्राकृत मानलं आहे आणि मुख्यतः तिचेच नियम दिले आहेत. विस्ताराने ह्यावर पुढे लिहुच.

पुरुषोत्तम नावाच्या व्याकरणकाराने त्याच्या 'प्राकृतानुशासन' नावाच्या ग्रंथामध्ये ११।१ येथे शौरसेनी व महाराष्ट्री अर्थात मराठी दोन्ही एकंच आहेत असे प्रतिपादन केलं आहे. आपल्याला अभिमान हवा की संस्कृतला सर्वांत जवळ भाषा कोणती असेल तर ती मराठी आहे. एक मराठीभाषिक म्हणून, महाराष्ट्रीय म्हणून आपल्या मातृभाषेच्या निर्मितीसंबंधी काहीसं चिंतन आवश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच.

महाराष्ट्र शब्दाचे शिलालेखीय संदर्भ

महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरणगावच्या स्तंभ लेखांमध्ये सापडलेला आहे, त्यामध्ये इसवी सन ३६५ मध्ये श्रीधरवर्म्याचा आरक्षित व सेनापती सत्यनाग याने स्वतःला 'महाराष्ट्रीय' असे संबोधले आहे.

याबरोबरच एक उल्लेख वराहमिहीराच्या बृहत्संहितेमध्ये आढळतो, या ग्रंथांमध्ये 'भाग्ये रसविक्रयिणः पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्राः।' असा आहे.

वराहमिहीराचा काळ काही विद्वान ६वं शतक समजतात पण तो त्याआधीचा आहे. तो इसवी सन पूर्व १लं शतक न्यूनतम आहे.

ऐहोळचा शिलालेख (इसवी सन पूर्व २७)

रविकीर्तीच्या या शिलालेखामध्ये सत्याश्रय पुलकेशीच्या संबंधाने 'त्रि-महाराष्ट्रिका' असे शब्द आहेत. हा शिलालेख न्यूनतम इसवी सन पूर्व २७ असा आहे.

सांगायचं तात्पर्य इतकंच की महाराष्ट्र शब्द मूळ संस्कृतंच असून तो प्राकृतपासून झालेला नाही...!

आज महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!


भवदीय,

पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com

#महाराष्ट्र_शब्दाचा_इतिहास_अर्थ_व्युत्पत्ती_संस्कृत_प्राकृत

No comments:

Post a Comment