Sunday 29 October 2023

कविर्जयति श्रीमद्वाल्मीकिः।

 



पठ रामायणं व्यास काव्यबीजं सनातनम्।

यत्र रामचरितं स्यात् तदहं तत्र शक्तिमान्।

बृहद्धर्मपुराण १।३०।४७


पौलस्त्यवध नावाचं एक सनातन काव्यबीजरुपी वाङ्मय, एक आर्षमहाकाव्य ज्या आद्यकवीच्या वाणीतून स्फुरलं, त्या महर्षींची काल कोजागरीची जयंती ! मानवीजीवनाच्या सर्वोच्च आदर्शांचे प्रस्फुटीकरण ज्या आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत वाङ्मयात आपणांस प्रथमंच दृष्टिगोचर होते, त्या अखंडप्रजाजनरंजनमूर्ती रघुकुलटिळक भगवान श्रीरामचंद्रांचं परमपावन चरित्र ज्या संस्कृतसाहित्याचा अरुणोदय ठरला, त्या श्रीमद्वाल्मीकिय रामायणाच्या रचनाकाराची कालची जयंती! आर्यावर्त्ताच्या, भारतवर्षाच्या, हिंदुराष्ट्राच्या समग्र इतिहासाचा प्रतिनिधीरुप, सर्वांचा अजस्र असा प्रेरणास्त्रोत ज्या श्रीसीतापतीच्या रुपाने आह्मांस प्राप्त झाला, त्या चरित्रकाराची कालची जयंती ! केवळ भारतवर्षातच नव्हे तर इंडोनेशिया, थाईलेंड, मलाया आदि देशांचं राष्ट्रीय काव्य ठरलेल्या या ऐतिह्य महाकाव्याचा निर्माता असलेल्या कविर्मनीषीची कालची कोजागरीची जयंती !



खरंतर काव्य हा शब्द अथर्ववेदामध्येही आला आहे व तिथे प्रत्यक्ष वेदांनाही काव्यंच म्हटलं आहे, इतकंच काय त्या परमात्म्यालाही कविर्मनीषी म्हटलंय वेदांमध्ये, त्यामुळे या अनुष्टुप छंदांमध्ये असलेल्या महर्षींच्या कृतींस आदिकाव्य का म्हणावं असा प्रश्न पडत असेल तर त्याचे साधं उत्तर हेच आहे की हे वेद हे प्रत्यक्ष ईश्वरनिर्मित असल्याने ते अनादि अपौरुषेय आहेत, वेदांमध्ये अनेक मंत्र अनुष्टुप छंदांमध्ये आहेत, इतकंच काय तर वेदांपश्चातचा प्रथम ग्रंथ म्हणजे प्रक्षेप नसलेली विशुद्ध मनुस्मृति ही सुद्धा अनुष्टुप छंदातच आहे, मग श्रीरामायणाला आदिकाव्य का म्हणायचं? तर त्याचे उत्तर हे आहे की याच्यापूर्वीचे उपरोक्त सर्वग्रंथ हे धर्मग्रंथ असल्याने ते अनुष्टुपादि अन्य छंदांमध्येही असले तरीही ते इतिहासग्रंथ नव्हते, पण श्रीरामायण हे ऋषिनिर्मित प्रथम ऐतिह्य काव्य म्हणून ते आदिकाव्य म्हटलं जाते इतकंच याचे तात्पर्य आहे, यावर आणखी विस्तार भविष्यात कधीतरी करेन.


काय आणि किती लिहावं???


ऐतिह्यदृष्ट्या जर या चतुर्युगातलं धरलं तर न्यूनतम ११,८३,००० वर्षांचा इतिहास असलेल्या व वायुपुराणातल्या ७०व्या अध्यायतल्या या ४८व्या श्लोकानुसार २४व्या चतुर्युगातलं धरलं तर न्यूनतम १,८१,४९,०७० अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या या सर्वादर्श चरित्राची गाथा ज्या आद्यकवींनी आपणांस दिली, त्या वाल्मीकि रामायणाचे जनक भगवान महर्षि वाल्मीकिंची काल जयंती झाली. ज्याने आयुष्यात एकदा तरी श्रीरामायण नि श्रीमहाभारत ही दोन आर्ष महाकाव्ये प्रत्यक्ष वाचली आहेत, त्याला या ग्रंथश्रेष्ठांचे महत्व वेगळं पटवून घेण्याची आवश्यकता नाही.


श्रीवाल्मीकिय रामायणावरच्या ३० संस्कृत टीका 

मागेच लिहिलंय की ज्या चरित्रचंद्राच्या उपरोक्त महाकाव्यांवर संस्कृत भाषेत ३० संस्कृत टीका झाल्यात, ज्यावर अन्य भारतीय व विदेशी भाषांमध्येही ३००च्या समीप साहित्यकृती निर्माण झाल्याहेत, इतकं ज्याला जगाने डोक्यावर घेतलं, तो मर्यादापुरुषोत्तम साक्षात् धर्माचा विग्रह असा श्रीराम ज्या महर्षींनी आपल्या दिव्य वाणी नि छंदोबद्ध सिद्धहस्त लेखणीने सिद्ध केला, त्या श्रीवाल्मीकिंविषयी लिहिताना वाणी हिंपुटी व लेखणी बोथट होणार नाही तर काय ???

अर्थात त्या लोकोत्तर महनीय ऋषिश्रेष्ठाला अभिवादन करताना एक खंत मात्र व्यक्त करावीशी वाटते ती अशी की ही मूळ आर्ष कलाकृती मधील काळात किती विकृत झाली हे त्यांचे त्यांनाच माहिती !

ज्या भगवान श्रीरघुनंदनांस आह्मीं आमच्या जीवनाचा सर्वोच्च आदर्श पुरुष व आप्तोत्तम मानतो, त्याचे चरित्र मधील काळात पुटंच पुटं चढत जितकं विस्फारलं नि विस्तारलं गेलं, तितकंच ते काहीअंशी विकृतीसही पोहोचलं. अगदी काहीअंशी का होईना!

एकीकडे आपल्याला जे पटत नाही ते सरसकट प्रक्षेप म्हणून धिक्कारणारे आधुनिक पाश्चात्यमतानुयायी मैकॉलेपुत्र आहेत तर दुसरीकडे वेदाभिमान बाळगून वैदिक साहित्याचे सत्शास्त्रांचे सांगोपांग अध्ययन करून आपली सैद्धांतिक बैठक पक्की करून प्रामाणिक हेतुने चरित्रचिकीत्सा करणारे आहेत, तर तिसरीकडे आह्मीं सर्वकाही म्हणजे वाट्टेल ते प्रमाणंच मानतो असा अट्टाहास असणारेही आहेत, वास्तविक पाहता उपरोक्त ३० संस्क‌ृत टीकाकारांनीही जागोजागी प्रक्षेपानुसंधान केलंच आहे, त्यामुळे ही काहीतरी नवीनंच प्रेरणा आहे अशातलाही भाग नाही, पण तरीही या परमश्रद्धेय चरित्रचंद्रांच्या चिंतनाचा मोह सुटत नाही.

आज उपलब्ध असलेलं वाल्मीकि रामायण प्रत्यक्ष महर्षींचे कितपत आहे हे मान्य करण्यांस आमचं भक्तह्रदय तरी तयार होत नाही. श्रीरामनामाचा प्रत्यही सहस्रावधी जप करूनही अंतरात्मा कुठेतरी सांगतो व अट्टाहासाने त्या परमात्म्याला विनंती करायला लावतो की

पुनः त्या महर्षींनी जन्म घ्यावा व खरं श्रीरामचरित्र पुनः जगासमोर मांडावं !

ते परमपुण्य श्रीरामनाम आह्मींही नित्य जपतोच, तो भगवान श्रीराम आमचाही उपास्यंच आहे, होता नि राहील म्हणूनंच ही भावना !

अर्थात तो श्रीरामंच आता त्याचे विशुद्ध चरित्र सांगेल इतकीच त्या ब्रह्मचैतन्याच्या चरणी प्रार्थना ! ते या जन्मातंच घडेल इतकीच त्याला प्रार्थना ! 

आह्मांस आमचा उपास्यदेव प्रदान करण्यासाठी त्या महर्षींच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत!

जाता जाता सांगतो की श्रीरामायण आधी घडलंय व महर्षींनी ते समकालीन असल्याने पश्चात् शब्दबद्ध केलंय बरंका ! काहीजण ते महर्षींनी आधीच रचलं व श्रीरामचंद्र त्यानुसार वागले असा मिथ्या प्रलाप करतात की जो अत्यंत अप्रमाण आहे. अर्थात तो अर्थवाद आहे इतकंच.

अलम्। 


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीमद्वाल्मीकिय_रामायण_महर्षि_वाल्मीकि_भगवानश्रीरामचंद्र_आर्षमहाकाव्य_इतिहास_भारतवर्ष_कोजागरीपौर्णिमा_शरदपौर्णिमा

No comments:

Post a Comment