Friday 19 August 2022

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ|


 



भगवान योगेश्वराच्या चरित्रांतला हा एकंच प्रसंग...एकंच एकंच...


जो अभ्यासताना, वाचताना, लिहिताना, सांगताना अंत:करणाची काय अवस्था होते हे शब्द धजावंत नाहीत व्यक्त व्हायला. मी मूळ महाभारत पूर्ण संस्कृत संहिता व हिंदी अनुवाद पूर्ण अभ्यासलं जेंव्हा होते, तेंव्हाही हा प्रसंग वाचल्यावर काही क्षण अक्षरश: नि:शब्द झालो होतो.‌ डोळ्यांतून अश्रुपात‌ तर होताच पण कंठही अवरुद्ध झाला होता. त्यावेळी अंत:करण योगेश्वराच्या अलौकिक दिव्य आभेने ज्या प्रकारे व्यापून गेले होते, त्याचं शब्दांत वर्णन करणं माझ्याच्याने तरी संभवंच नाही. मागील वर्षी पूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींच्या (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले उपाख्य अप्पा) 'भगवान श्रीकृष्ण एक दर्शनाचे' चिंतन करतानाही ग्रंथाचा अंतंच पूज्यनीय अप्पांनी ह्याच प्रसंगाने केला असल्यामुळे ह्यावर बोलताना प्रचंड रडलो होतो. अप्पांनी हा प्रसंग काय रंगवलाय बापरे...! अप्पांच्या प्रतिभेंस दंडवत...! अप्पा आज जीवित असते तर मी त्यांच्यासमोर हे वाचत वाचत धाय मोकलून रडलो असतो. चारित्र्यनिर्माण काय असतं, प्रसंग असा आहे...


आत्ता हे लिहितानाही कंठ अवरुद्ध आहे...


अश्वमेधिक पर्वातले श्रीकृष्णांचे आणखी एक ब्रह्मचर्याचे उदाहरण


अश्वत्थाम्याने आपल्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेण्याच्या दृष्टीने द्रौपदीच्या पाच पुत्रांची ते पांडवंच आहेत असे समजून रात्रीच्या वेळी झोपेतंच निर्मम हत्या केली. पण ते पांडव नव्हते हे कळल्यावर त्याचा क्रोध शांत व्हायच्या पेक्षा अधिकंच वाढला नि सुडाग्नीने त्याने पांडवांचा वंशंच नष्ट करायचे ठरवले व त्यासाठी त्याच्याजवळ असलेले ब्रह्मशिरास्त्र नामक अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडले. हे तेच ब्रह्मशिरास्त्र आहे जे‌ त्याने पूर्वी भगवान योगेश्वरांस देऊ केले होते व त्याबदल्यात त्यांचे सुदर्शन मागितले होते. आमच्या आधीच्या‌ कैक लेखांमध्ये तो प्रसंग आह्मीं मांडला आहे तेंव्हा पुनरुक्ती करत नाही. त्या जणु विश्वसंहारक अशा अस्त्राने उत्तरेच्या गर्भावर जाताच त्यातून भविष्यांत जन्माला येणारे मुल जे पुढे परीक्षित (विष्णुरात) नावाने ओळखले गेले, ते त्या अस्त्राच्या प्रभावाने मृत म्हणूनच जन्माला आले. श्रीमद्भगवतामध्ये भगवंतांनी गर्भामध्ये जाऊन त्याचे रक्षण केलं म्हणून त्याचे नाव विष्णुरात पडले अशी कथा आहे पण ती निखालस‌‌ खोटी आहे हेच‌ सिद्ध होते. कारण जर‌ परीक्षितीचे रक्षण भगवंतांनी त्या अस्त्राने गर्भातंच केले असते तर बाहेर आल्यावर ते मृत असायला नकोच होते. व पुढील‌ कथाविस्ताराला महाभारती विपर्यास निर्माण होतो. आणि आह्मांस महाभारत अधिक प्रमाण आहे, भागवत नाही. त्यातही भगवंतांचे प्रत्यक्ष शब्द सर्वोच्च...! असो.


परीक्षित ह्या शब्दाच्या अनेक निरुक्त्या व त्यातून निघणारे अनेकार्थ आहेत, त्यावर सविस्तर कधीतरी. मृत बालकांस जीवित कोण करणार? एवढं सामर्थ्य कुणामध्ये ? तेंव्हा पांडवांचा हा वंश खुंटणार की काय ह्या भीतीने सर्व पांडवपक्षातल्या स्त्रिया विलाप करीत असताना द्रौपदी मात्र योगेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या आगमनाची वाट पाहत बसली. कारण तिला माहिती होते‌ केवळ भगवानंच ह्यातून आपणांस सोडवतील. भगवान तिथे येताच ती त्यांस म्हणाली...


“यादवश्रेष्ठा कृष्णा, अरे तु दिलेले वचन पूर्ण करशील ना? तु पराक्रमी, धर्मवेत्ता सत्यप्रतिज्ञ आहेस. त्रिभुवन सारे मृत झाले तरी त्याला जीवित करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. मग भाच्याच्या मुलाला जीवित करण्याचे तुला काय कठीण आहे? तुझे सामर्थ्य ज्ञात असल्यानेच तुझ्यापुढे हे हात जोडून मी मागणे मागत आहे.”


पुढे उत्तरेनेही भगवान श्रीकृष्णांची करुणा भाकल्यावर त्यांनी तिला अभय देताना म्हटले. हे जे श्लोक आहेत ना ते सुवर्णाक्षरांत नोंदवावेत..! भगवान म्हणतात


न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेतद्भविष्यति |

एष सञ्जीवयाम्येनं पश्यतां सर्वदेहिनाम् ||१८||

नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन |

न च युद्धे परावृत्तस्तथा सञ्जीवतामयम् ||१९||

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ |

तथा मृतः शिशुरयं जीवतामभिमन्युजः ||२२||


महाभारत भांडारकर प्रत – अश्वमेधिक पर्व - अध्याय ६८


अर्थ - उत्तरे, माझे भाषण अन्यथा कधी होणार नाही; ते सत्यच होईल...मी आजवर कधी थट्टेनेही असत्य भाषण केले नाही, ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन केले आहे, कधी युद्धांत पाठ दाखविली नाही. तरी त्या पुण्याने हा बालक जीवित होवो ! सत्य आणि धर्म जर माझ्या ठायीं असतील तर हा अभिमन्यूपुत्र जीवित होवो !!!”


अरे चारित्र्य यापेक्षा वेगळं काय असतं? का नाहीत हे प्रसंग शालेय अभ्यासक्रमांत?? का सांगत नाहीत आमचे कथाकार हे प्रसंग???


इथे ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन आणि सत्यनिष्ठा हे शब्द सर्व काही सूचित करणारे आहेत. त्यामुळे आणखी काही संदर्भ द्यायची आवश्यकता मला तरी वाटत नाही ! वाचक सुज्ञ आहेत !!!


विवाहापूर्वी १२ वर्षे‌ स्वपत्नीसह नैष्ठिक ब्रह्मचर्य‌ हिमालयांत पालन केलेला व पुन्हा आयुष्यभर गार्हस्थ्य ब्रह्मचर्याचे पालन केलेला हा भगवान...!


भगवान हा‌ शब्द प्रत्येकवेळी ईश्वरी अवतारासाठीच‌ वापरला जातो असे नव्हे बरंका...! नाही म्हणजे सांगितलेलं बरं...! नाहीतर पुन्हा आह्मांस शब्दांत पकडायला यायचे‌ काहीजण. असो...


अशा योगेश्वराच्या चरित्राचे चिंतन नि अनुकरण कधी करणार आहोत ?


काय तर म्हणे श्रीकृष्णाचे अनुकरण करु नये, अनुसरण करावं ? का? त्यांनी केलेले ब्रह्मचर्य पालन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले वेदाध्ययन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले आजीवन सत्यवचनाचे व्रत आम्ही नाही आचरु शकत ? 


केवळ श्रीकृष्ण कथा करायच्या, जन्माष्टम्या करायच्या, दहीहंडी नाचवायच्या, पण आचरण ???


जन्माष्टमीच्या‌ निमित्ताने एवढी एक कथा आयुष्यभर चिंतनांस ठेवली तरी पुरेसं...!


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com 


#भगवान_श्रीकृष्ण_योगेश्वर_ब्रह्मचर्य_पुराण_महाभारत_जन्माष्टमी_गोकुळाष्टमी_अश्वत्थामा

No comments:

Post a Comment