Wednesday 9 October 2019

धर्मजिज्ञासेंत वेदंच सर्वोच्च प्रमाण


*धर्मजिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः।*
मनुमहाराज

धर्मजिज्ञासेमध्ये श्रुती अर्थात वेद(च) प्रमाण आहे...

हा लेख केवळ नि केवळ धर्मजिज्ञासा ह्याविषयी काय प्रमाण मानावं येविषयीं आहे.

कुणी काय प्रमाण मानावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय पण आमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आम्ही वेदांच्या चार संहिताच सर्वोच्च नि एकमेव प्रमाण मानतो. त्यात यजुर्वेदाचा केवळ शुक्ल यजुर्वेदंच. कृष्ण मूळीच नाही.

आम्ही आमची सैद्धांतिक प्रमाण विचारधारा स्पष्ट करताहोत.
आम्हांस वेद अर्थात श्रुतीच आयुष्यांत सर्वोच्च नि एकमेव प्रमाण आहे.

वेद हे मानवसृष्ट्यारंभी ईश्वराने मनुष्यांस प्रदत्त ईश्वरीय ज्ञान आहे जे संहितारुपी आहे. आमच्या ऋषिमूनींवर आमचा पूर्ण विश्वांस आहे.

ह्या वेदांना आकळणं कठीणांत कठीण असल्याने ह्या अष्टधा विकृतीने संरक्षित अशा अपौरुषेय चतुर्वेदांवर आमच्या प्राचीन ऋषीमूनींनी जे आर्ष ग्रंथ निर्माण केले, त्यामध्ये वेदांवरील व्याख्यानरुपी ग्रंथ असे ब्राह्मणग्रंथ की जे पौरुषेय साहित्य आहे, भले सनातनी परंपरेत त्यांस अपौरुषेय वेद मानण्याची परंपरा असेलही, त्याचं खंडनही झालंच आहे, पण असो. ह्याच ब्राह्मणग्रंथांचा भाग असलेली अशी एकादशोपनिषदे, आरण्यके आदि आर्ष ग्रंथ. तसेच कल्पसाहित्य अर्थात सर्व सूत्र ग्रंथ, सर्वानुक्रमणिका, प्रातिशाख्य ग्रंथ वगैरे वगैरे वैदिक साहित्याशी संबंधित विचार...

ह्यातंच पुढे आली ती षड्वेदाङ्गे नि त्यावरील आर्षग्रंथ, षड्दर्शने नि त्यावरील उपलब्ध व्यास-शबप-वात्सायनादिंची आर्ष भाष्ये...

ह्यात कालक्रमाच्या दृष्टीने मागे-पुढे झाले असेल तर क्षमस्व...

असा एकुण वैदिक साहित्याचा विस्तार आहे.

अन्य सर्व ग्रंथ आर्ष अर्थात ऋषिमूनिकृत की ते जे नि जितके वेदानुकूल आहेत, तितकेच ते आम्हांस प्रमाण आहेत. मग ते कुणाचेही असोत. कुणाचेही. कुणाचेही...!

चार वेद हे स्वतः प्रमाण आहेत हे सर्वच शास्त्रकारांचे मत असल्याने त्यांविषयी काही संदेहंच नाही. त्यामुळे त्यांना इतर प्रमाणांची आवश्यकताच नाही.

अन्य सर्व ग्रंथ हे परतः प्रमाण असल्याने ते वेदानुकूल तितकेच प्रमाण आहेत.

धर्मशास्त्राध्यनाच्या दृष्टीने ही ग्रंथमाला आम्हांस प्रमाण आहे व्यक्तिशः. व्यक्तिशः हा शब्द महत्वाचा आहे.

सुदैवाने ह्या सर्वांचं आमचं अध्ययन गेल्या सहा-सात वर्षांत झालेलं असल्याने नि ते आयुष्यभर अगदी आमरण सुरुच राहणार असल्याने वेदांविषयी आमची निष्ठा ही अशी आहे. ह्यात कालत्रयीही परिवर्तन होणार नाही.

ह्याचा अर्थ धर्मशास्त्रासंबंधी किंवा अध्यात्मासंबंधी उपरोक्त साहित्य सोडून अन्य कोणत्याही ग्रंथांचा आम्ही धिक्कार करतो किंवा त्यांस नाकारतो असे मूळीच नाही. त्या अन्यसर्व ग्रंथांमध्ये किंवा साहित्यामध्ये जे जे वेदानुकूल किंवा वैदिक सिद्धांतांच्या अनुकूल असेल, तितकं आम्ही ग्राह्य समजतो. नाही ते त्याज्य समजतो...!

मग त्या स्मृत्या असोत, रामायण-महाभारतासारखे ग्रंथराज असोत किंवा अगदी पुराणादि साहित्य असो...

हे सर्व वेदानुकूल नि वैदिक सिद्धांतानुकूल तेवढेच आम्हांस ग्राह्य आहे.

ही आमची भूमिका आमरण अशीच राहील...

ह्याची कारणमीमांसा आम्ही पूर्वीही स्पष्ट केलीय तरीही पुनश्च सांगतो...

महाभारतकालापर्यंत तरी हे राष्ट्र वेदांनाच सर्वोच्च प्रमाण मानत होते. महाभारतकाली आज जे परस्परविरोधी संप्रदाय विद्यमान आहेत, त्यातल्या एकाचाही लवलेश आपल्याला दिसत नाही. म्हणजेच महाभारतकालापश्चातंच वेदांचा त्याग झाल्याने हे सर्व विविध संप्रदाय नि विचारधारा उगम पावल्याहेत हे लक्ष्यीं येतं. जर आपण पुन्हा वेदांकडे वळलो तर आपल्यातले सर्व मतभेद नष्ट होऊन एकवाक्यता येईल...
पण दुर्भाग्य असे आहे की कुणालाच हे नकोय...अस्तु।

काही जण शंका घेतील की अशाने हिंदु धर्म अब्राहमिक पैशाच पंथांसारखा एकग्रंथी होईल...

अशांना आम्ही विचारु इच्छितो की वेद हे सर्व मानवजातीसाठीच नव्हे तर विश्वासाठी कल्याणप्रद आहेत. वेदांची तुलना अन्य टुकार ग्रंथांशी करणे ह्यासारखा अविवेक नाही. हिंदुंनी प्रत्येकाचे आपलं वेगळं मत मांडल्याने इतिहासापासून आजपर्यंत काय गोंधळ उडालाय हे आम्ही वेगळं सांगायची आवश्यकता नाही.

आणि हाच न्याय भारतीय राज्यघटनेला लावला तर कसे होईल???

आम्ही भारतीय राज्यघटनाही इतर विषयांत प्रमाण मानतोच पण धर्म जिज्ञासेंत ती काहीच मार्गदर्शक नाही. नाहीच...
आणि हो..स्वयंघोषित कथित अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या बुद्धिवाद्यांनी तर इकडे येऊही नये.

आम्ही केवळ आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे सांगितलं. तुम्हीही हेच मानावं असा आमचा अट्टाहास तर मूळीच नाही. प्रत्येकाचे विचारस्वातंत्र्य...

केवल एकंच विनंती की उपरोक्त साहित्य स्वतः मूळात न अभ्यासता आम्हाला कुणी शिकवायला येऊ नये...यायचंच असेल तर सप्रमाण नि ससंदर्भ या...स्वागतंच आहे...!

हे प्रथम आणि अंतिम...ह्यांस कुणी आमचा अहंकार समजला तरी चालेल... !

यदि वेदाः प्रमाणं स्युः जीवेयं।
श्रीकुमारिलभट्टपाद

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#वेदप्रामाण्य_धर्मजिज्ञासा_उपनिषदेआरण्यके_रामायण_महाभारत_राज्यघटना

No comments:

Post a Comment