Thursday 12 January 2017

दत्तप्रसाद दाभोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद नि गोसंरक्षण - खंडण नि मंडण

आज राष्ट्रीय युवा दिन अर्थात विश्वमानव स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त एक विशेष लेख ! दीड दोन वर्षांपूर्वीच लिहिलेला लेख पण अद्याप प्रकाशित न केलेला. 👇🏻



दत्तप्रसाद दाभोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद नि गोसंरक्षण - खंडण नि मंडण


एखाद्या राष्ट्रपुरुषाच्या साहित्याचे समग्र आकलन करणं हे तितकंसं सोप्पं काम नाही. त्याने प्रकट केलेली मते ही त्याकाळच्या मर्यादा लक्षात घैऊनच अभ्यासावीत. पण आजकाल मात्र महापुरुषांच्या वाक्यांचा तोडूनमोडून प्रचार करून आपला स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती बळावत चाललीय. केवळ इतकेच नव्हे तर त्यातला एखादा केवळ आपल्या स्वार्थास सिद्ध करणारा तेवढाच एक विचार घेऊन त्यावर भाष्य करणे ह्या त्याहूनही अधिक बुद्धिवादी (???) असल्याचा विचारप्रवृत्तीचा ज्यांना रोग लागला आहे त्यातले एक स्वयंघोषित विचारवंत (की जंत) म्हणजे श्री. दत्तप्रसाद दाभोलकर ! स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला पण त्यांनी अशीच स्वमतांधतेला पुष्टी करणारी स्वामीजींची वाक्ये तोडूनमेडून प्रकट करून आपला धर्ममत्सर नि पुरोगामित्व प्रकट केले होते. काही दिवसापूर्वी पुन्हा तोच प्रकार त्यांनी केला असल्याने नि ह्या विषयांवर एकदाच पडदा पडावा अशी इच्छा असल्याने हा लेखनप्रपंच !

शोध स्वामी विवेकानंदांचा - दत्तप्रसाद दाभोलकर

ह्या ग्रंथात दाभोलकरांनी स्वत:च्या सोयीनुसार विवेकानंद मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना जागोजागी साम्यवादी दर्शविण्याचा एक बालिश प्रयत्न केला आहे. ग्रंथ विवेकानंद साहित्याच्या संदर्भाने पुरेपूर असला तरी काढलेले निष्कर्ष मनगढंत अर्थात सोयीनुसार आहेत. काही निष्कर्ष तर अगदी पिंडीला पाय लावणारे आहेत. स्वतंत्रपणे त्यांच्या ग्रंथाला प्रतिवाद करण्यासाठी ग्रंथनिर्मितीच आवश्यक असली तरीही तूर्तास त्यातल्या काही महत्वाच्या विधेयांचे प्रस्तुत लेखात खंडण नि मंडण करुयात.

सावरकरांनी खरंच गोहत्येचं समर्थन केलंय का???

दाभोलकर हे किती खोटारडे आहेत हे ह्याचं पहिलं उदाहरण ! ते म्हणतात की वीर सावरकर म्हणालेत, 'गाय हा एक उपयुक्त पशु. ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे. एक समर्थ राष्ट्र उभे करावयाचे असेल तर भाकड गाय अवश्य कापा.' (?????)

भाकड गाय कापा??? सावरकरांनी अशी स्पष्ट आज्ञा कुठेही दिलेली नाही. ज्यांनी सावरकरांचा तो लेख मुळातून वाचला असेल त्यात त्यांना कुठेही भाकड गाय अवश्य कापा असा शब्दप्रयोग आढळणार नाही. वस्तुत: सावरकरांच्या ह्या लेखाचा इतका विपर्यस्त अर्थ काढला जातो की सावरकरांना गोहत्येचा समर्थक म्हणण्यापर्यंत लोकांची मजल जाते. कारण अनेकांनी तो लेख मुळातून पूर्ण वाचलेला नसतो नि त्यातही दाभोलकरांसारखे स्वयंघोषित विचारवंत तोडूनमोडून असे संदर्भ देत असल्याने तर वाचकांचा फारच गोंधळ होतो. ह्या संदर्भात आम्ही आमच्या एका लेखात आमचं चिंतन सटीप, साधार नि तर्कशुद्ध रीतीने प्रकट केलंय. जिज्ञासुंनी ते अवश्य आमच्या ब्लाॅगवर वाचावं. विस्तारभयास्तव जास्ती बोलत नाही.


स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातुन धर्मचिंतन - दाभोलकरी मत्सराचे खंडण

दाभोलकर विवेकानंदांना धर्मद्रोही, हिॅदुद्रोही व ब्राह्मणद्रोही ठरविण्यांस टपलेले आहेत. म्हणून आपल्या सोयीनुसार ते आपली टीपिकल विचारधारा लादण्यासाठी विवेकानंदांच्या साहित्यातले काही संदर्भ देताना म्हणतात की विवेकानंद हे आपली रणनीती आपला भाऊ महेंद्रनाथ यांना सांगताना म्हणाले होते, 'धर्मवेडासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही. मी धर्माचे वेड पांघरलेला एक विचारवंत आहे.'

असं वाक्य त्यांनी नक्की नेमकं कुठे वाचलंय हे दाभोलकरांनी द्यावं. दुसरं असं की ह्याचा अर्थ असा घ्यायचा की विवेकानंद हे धर्मविरोधी होते??? जर तसा अर्थ दाभोलकरांना अभिप्रेत असेल तर त्यांना विवेकानंद समग्र वांग्मय पुन्हा वाचायची आम्ही विनंती करतो. कारण ह्या एका वाक्यावरून जर तसा निष्कर्ष काढायचा ते प्रयत्न करत असतील नि अर्थात त्यांचा तोच दुष्टहेतु आहे हे उघड असल्याने आम्ही त्यांस विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचं समग्र वांग्मय पुन्हा वाचावं नि मगच आपली मतं प्रकट करावीत ही विनंती !

स्वामीजी नि गोहत्या - दाभोलकरांचं खंडण

दाभोलकर असे दर्शविण्याचा नि पटवण्याचा प्रयत्न करतात की विवेकानंदांनी गोहत्येचं जणु एक प्रकारे समर्थनच केलंय. ह्यासाठी त्यांनी दोन संदर्भ दिलेत. पहिला संदर्भ हा स्वामी विवेकानंद ग्रंथावली खंड तृतीय पृष्ठ क्रमांक सात-आठ चा आहे. ज्यात स्वामीजींनी एक गोसंरक्षक मंडळाच्या प्रचारकाबरोबर केलेली चर्चा आहे. दाभोलकरांनी लिहिलेली चर्चा पण तोडून मोडून नि बरीच खोटी लिहिलेली असल्याने त्यांचा खोटारडेपणा उघडा पडतो. चर्चेचा मुळ सारांश असा की एक गोप्रचारक स्वामीजींकडे गोसंरक्षणासाठी आर्थिक मदत मागायला येतो नि त्याचवेळी स्वामीजी त्याला मध्य भारतातल्या भयंकर दुष्काळामध्ये मेलेल्या लक्षावधी लोकांना मदत करण्याचे आवाहन करतात. ते नाकारून तो गोप्रचारक कर्माच्या सिद्धांताची चुकीची मांडणी करतो नि त्यामुळे स्वामीजी संतापतात नि त्याची निर्भत्सना करतात. ह्या संपूर्ण संवादातली मुळ वाक्येच दाभोलकरांनी गाळलेली असुन स्वत:चीच मनाची वाक्ये टाकली आहेत ज्यातून त्यांचा खोटारडेपणा दिसतो.  स्वामीजी त्या प्रचारकाला शेवटी स्पष्ट म्हणतात

"हें बघा, मी तर असा संन्यासी, फकीर. तुम्हांला ध्यावयाला माझ्यापाशी कुठून बरें पैसा येणार? आणि यदाकदाचित माझ्या हातीं पैसा आलाच तर तो मी मी आधी माणसांच्या सेवेसाठी खर्च करीन. प्रथम वांचवायला हवा माणुस - आधी त्याला ध्यावयाला हवें अन्नदान, विद्याधान, धर्मदान. हें सारें करून जर माझ्या हातीं कांही शिल्लक राहिले तर मी तुमच्या संस्थेला कांही देऊं शकेन."

आता ह्यावरून स्पष्ट होते की स्वामीजी हे तत्कालीन परिस्थिती बघुनच वक्तव्ये करत होते. त्यावेळी गाईपेक्षा माणसे वाचविणे आवश्यक वाटणं तसं अप्रस्तुत असं काहीही नाही. ते अन्नदान, विद्याधान नि धर्मदान ह्या महत्वाच्या शब्दांचा प्रयोग करतात हे लक्षात घेणं आवश्यक आहें कारण माणसालाच अन्न जर नसेल तर प्राणिमात्रांचं काय???   पण पण पण....

दाभोलकरांना मात्र ह्यातून वेगळाच अर्थ अभिप्रेत आहे नि तो म्हणजे विवेकानंद हे गोहत्येचे समर्थक होते असा भासविणे होय. किती दुर्दैवी नि तर्कहीन नि बाष्कळ प्रयत्न आहे हा??? वस्तुत: आपला दुष्ट हेतु साध्य करण्यासाठीच केलेला हा प्रयत्न आहे.

खोटं बोलायचं तेही रेटून बोलायचं !

दाभोलकर विवेकानंदांच्या नावाखाली आपलीच स्वत:चीच वाक्ये टाकताहेत. वस्तुत: त्यांनी टाकलेली काही वाक्ये मुळ समग्र विवेकानंद ग्रंथावलीमध्ये कुठेही नाहीत. तरीदेखील विवेकानंद असे म्हणाले असं ते धादांत खोटं सांगतात.




दाभोलकरांचा पुढचा आक्षेप नि खंडण

दाभोलकर हे गोहत्येचं समर्थन करण्यासाठी विवेकानंदांच्या आणखी एका महत्वाच्या व्याख्यानाचा संदर्भ देतात. मदुराई इथल्या मानपत्रास उत्तर देताना स्वामीजी एकदा म्हणाले होते की,

"आणि रुढी म्हणजेच खरा धर्म, अशी अज्ञानी लोक जी समजूत करुन घेतात, त्यातच त्यांची मोठी चूक आहे. एखादी क्षुद्र सामाजिक रुढी बदलली म्हणजे काही तुमचा धर्म बुडत नाही, मुळीच बुडत नाही. लक्षात ठेवा, की रुढी या नेहमीच बदलत आल्यात. याच भारतात असा एक काळ होता, की गोमांस खाण्यावाचून ब्राम्हण हा ब्राम्हण राहू शकत नसे; वेदांत तुम्हाला आढेळल, की जेव्हा एखादा संन्यासी, राजा किंवा थोर पाहुणा घरी येई तेव्हा उत्तम बैल मारण्यात येत असे. नंतर पुढे लोकांच्या लक्षात आले, की आपला देश कृषीप्रधान आहे. म्हणून उत्तम बैलांची हत्या केल्याने, शेतीचे नुकसान होईल, म्हणून ही रुढी बंद पडली. गोहत्या निषिद्ध मानली गेली."

आता इथे स्वामीजी म्हणतात की पूर्वी गोहत्या केली जायची कारण वेदांत तशी आज्ञा आहे. पण माझा स्पष्ट प्रश्न आहे की ह्याला पुरावा काय??? वेदांतल्या कोणत्या ऋचेमध्ये गोहत्या करावी असे सांगितलंय हे दाभोलकरांनी सांगावं! आज विवेकानंद तर हे सांगायला हयात नाहीत मग अंधपणाने का विश्वास ठेवायचा? केवळ विवेकानंद सांगतात म्हणून ते प्रमाण मानणं हे केवळ अंधभक्तीचं उदाहरण होईल. विवेकानंदांनी दिलेलं उदाहरण वेदांत कुठेही नाहीच. कारण वेदांत वस्तुत: कुठेही गोहत्या नाही हे महायोगी अरविंदांनी नि स्वामी दयानंद सरस्वतींनी साधार नि सप्रमाण न तर्कशुद्ध पद्धतीने केंव्हाच सिद्ध केलंय.

मग विवेकानंदांचे उपरोक्त गोहत्येचं मत प्रमाण मानावं काय???

तर अजिबात नाही. माझं हे विधान धाडसाचे आहे पण मी अभ्यासाअंतीच हे बोलतोय. कारण विवेकानंदांनी वर केलेलं वक्तव्य हे त्यांच्या मॅक्स्मयुलरच्या अभ्यासावरून केलेलं वक्तव्य आहे.  सायणाचार्यांची जी वेदांवरची टीका आहे त्यावरूनच वेदांचा अर्थ काढला जातो की जो मुळात चुकीचा आहे. मॅक्सम्युलरला विवेकानंदांनी सायणाचार्याची उपमा दिलीय. त्याच्याबद्दल विवेकानंद हे कमालीचे श्रद्धा बाळगत. मुळचा ज्यु असलेला परंतु ब्रिटीशसेवेत रुजु झालेला हा मॅक्सम्युलर ज्या भारतीय धर्मशास्त्रांचा अनुवाद नि विपर्यास करण्यासाठी आला होता त्याचं हे कार्य बघून विवेकानंद त्याच्यावर अतिशय भाळले होते. त्यांनी ज्याप्रकारे त्याची स्तुती केलीय ते वाचून तर हेच मत बनतं. कारण एक पाश्चिमात्य भारतात येऊन आपलं सगळं आयुष्य वेदोपनिषदांच्या नि धर्मग्रंथांच्या अभ्यासासाठी घालवतो हे पाहून विवेकानंद अतिशय भावनाविवश झाले होते. म्हणूनच त्याने केलेल्या भाष्यावरूनच त्यांनी हे वरल मत प्रकट केलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. किंवा सायणाचार्याच्या टीकेलाच प्रमाण मानून त्यांनी हे वक्तव्य केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.टिळकही मॅक्सम्युलरवर किती भाळले होते हे त्यांचे ग्रंथ वाचल्यावर लक्षात येते.


आणि दुर्दैवाने विवेकानंदांनी कुठेही संदर्भासाठी तशी ऋचा किॅवा वेदांतलं सुक्त इथे सांगितलेलं नाही. त्यामुळे नक्की कोणत्या वेदांत नि कोणत्या ऋचेमध्ये किॅवा सुक्तांमध्ये गोहत्या आहे हे कसं सांगता येणार आहे हे दाभोलकरांनी स्पष्ट करावं. दाभोलकरांना स्वत: वेदांचा कितपत अभ्यास केलाय हे त्यांचे त्यांनाच माहितीय ! तो त्यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. केवळ विवेकानंदांच्या मतावर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. आपण एक स्वयंघोषित वैज्ञानिक आहात. पुराव्याशिवाय नि आधार असल्याशिवाय बोलणं हे आपल्यासारख्या ज्येष्ठ विचारवंताला नि वैज्ञानिकाला शोभत नाही. वेदांतल्या नक्की कोणत्या ऋचेत गोहत्या करावी हे सांगितलंय ह्याचं विवेचन त्यांनी करावं ही नम्रतेची विनंती !

वेदांमध्ये खरंच गोहत्या आहे का???

ह्या विषयांवर आम्ही स्वतंत्रपणे अनेक लेखही लिहिलेच आहोत. त्याविषयी आमच्या पाखण्ड खण्डिणी नामक ब्लाॅगवर जिज्ञासूंनी शोध घ्यावा. तूर्तास तरी सांगु इच्छितो की वेदांत गोहत्याच काय कोणत्याही प्राणिमात्राच्या हत्येचा पुसटसा लवलेशही नाही.

पाश्चिमात्यांनी केलेली वेदांची भाषांतरे ही विश्वासार्ह्य नाहीतच !


कारण पाश्चिमात्य पंडितांना संस्कृत भाषेचा फारसा गंध नि पुढे त्यावरचे प्रभूत्व असण्याचा संभवच नसल्याने त्यांनी केलेल्या भाषांतरांस कितपत प्रमाण मानायचं हे सुज्ञांनी ठरवायचं. त्यातही त्यांनी केलेल्या त्या भाषांतरामागे त्यांचा काय दुष्ट हेतु होता हे त्यांनीच स्वत: सांगितलं असल्याने शंकेला वावच राहत नाही. कारण ख्रिश्चन पंथाचा प्रचार करण्यासाठीच हे भाषांतराचं काम करण्याचं त्यांनी ठरवलेले असल्याचे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत. मॅक्सम्युलरने त्याच्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात तर तो आपला दुष्ट हेतु स्पष्टपणे सांगतो. इतकंच काय तर सर विल्यम जोन्स ह्याने तत्कालीन गव्हर्नर जनरल सर वाॅरन हेस्टिंग्जला लिहिलेल्या पत्रात तर वेदांच्या नि इतर संस्कृत वांग्मयाच्या विकृत अनुवादाचा हेतु स्पष्ट पणे सांगितलाय. १७८४ च्या त्या पत्रात तो म्हणतो

“As to the general extension [spreading] of our pure faith [Christianity] in Hindoostan [India] there are at present many sad obstacles to it… We may assure ourselves, that Hindoos will never be converted by any mission from the church of Rome, or from any other church; and the only human mode, perhaps, of causing so great a revolution, will be to translate into Sanscrit… such chapters of the Prophets, particularly of ISAIAH, as are indisputably evangelical, together with one of the gospels, and a plain prefatory discourse, containing full evidence of the very distant ages, in which the predictions themselves, and the history of the Divine Person (Jesus) is predicted, were severally made public and then quietly to disperse the work among the well-educated natives.” (Asiatic Researches Vol. 1. Published 1979, pages 234-235. First published 1788).

आता ह्यापेक्षा आणखी पुराव्याची आवश्यकता हवीय का??? तरीदेखील ज्यांचं समाधान झालं नसेल त्यांनी आमच्या लेखमाला आमच्या ब्लाॅगवर पहावी. सविस्तर खंडण तिथे केलेले आहे. किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी पालीवालांचे "मैक्सम्युलर द्वारा वेदोंका विकृतीकरण क्यौ और कैसे" हा ग्रंथ वाचावा. ओनलाईन पीडीएफ स्वरुपात प्राप्त होईलच.

दाभोलकरांच्या तर्कवादाचे खंडण

दाभोलकर पुढे तर्कवादाचा संदर्भ देताना सांगतात की 'धर्म - त्याच्या पद्धती आणि उद्देश' या विषयावर भाषण देताना स्वामीजींनी जे सांगितले ते स्वामी विवेकानंद ग्रंथावलीच्या सातव्या खंडात पृष्ठ वर येते. स्वामीजी म्हणतात,

"धर्मग्रंथात सांगितलय म्हणून विश्वासच ठेवायचा असेल, तर आपल्याला तर्कबुद्धी कशाला दिली आहे? तर्कबुद्धीच्या विरुद्ध एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे ही फार मोठी ईश्वरनिंदा नव्हे काय? ईश्वराने दिलेल्या या श्रेष्ठतम देणगीचा उपयोग न करावयाचा आपल्याला काय हक्क आहे? मला खात्री आहे, की जो माणूस आपल्या तर्कबुद्धीचा उपयोग करतो पण त्याचा विश्वास नाही त्याला ईश्वर क्षमा करील. पण जो माणूस ईश्वराने दिलेल्या शक्तीचा उपयोग न करता अंधपणे विश्वास ठेवतो त्याला ईश्वर क्षमा करणार नाही. अंधळेपणाने विश्वास ठेवणारा माणूस स्वत:चा अध:पात करुन घेतो, पशूंच्या पातळीवर उतरतो, स्वत:च्या इंद्रियशक्तीचा अध:पात करतो आणि नष्ट होतो.'

आता स्वामीजींनी नेमके ह्याचा उलट मत त्यांच्या साहित्यात नोंदविले आहे ते पाहुयांत.


पृष्ठ क्रमांक २३८ खंड दुसरा राजयोग मध्ये स्वामीजी स्वत:च म्हणतात.

"तर्क विचाराच्या पलीकडे त्यापरीस कितीतरी श्रेष्ठ अवस्था आहेत. वास्तविक पाहता बुद्धीचे शिवार ओलांडल्यानंतरच धर्मराज्यांत आपले पहिले पाऊल पडत असते. बुद्धीच्या अतीत गेल्यावरच खरोखर धर्मजीवनाला प्रारंभ होत असतो. माणुस जेंव्हा बुद्धीच्या, तर्काच्या पलीकडे जाईल तेव्हाच तो परमेश्वराप्रत पोहोचण्याची पहिली पायरी चढला असे म्हणतां येईल. आणि तोच खर्या जीवनाचा प्रारंभ होय."

थोडक्यात काय तर सगळ्याच गोष्टी तर्कावरच अवलंबून नसतात. तर्काच्या पलीकडे जाऊन पाहिलं तरच धर्मज्ञान होऊ शकते. कारण बुद्धीला शेवटी मर्यादा आहेतच. जे सुक्ष्मज्ञान आहे ते इंद्रियातीत असल्याने तर्काने किंवा बुद्धीने ते जाणणं शक्यच नाही."


 राजयोगामध्ये अनेक ठिकाणी स्वामीजींनी तर्कवादाचं खंडण केलंय. पदोपदी ते तर्काला सोडूनच ईश्वरशरणता प्राप्त करा असं सुचवितात.

तर्काला हिॅदुधर्मात प्रमाण आहे पण न्यायशास्त्रांत !

आमच्या धर्मातली षड्दर्शने जी आहेत तीपैकी न्यायदर्शन हे पूर्ण तर्कावरच आधारलेले आहे. पण त्यालाही काही मर्यादा आहेत हेदेखील मान्य करणे आवश्यक आहे. तर्क एका विशिष्ट मर्यादेपर्यंत काम करतो पुढे नाही. म्हणून स्वामीजी त्याची मर्यादित उपयुक्तताच त्यांच्या साहित्यात उद्धृत करतात. पण दाभोलकरांना विवेकानंद सोयीनुसार हवेत म्हटल्यावर काय करायचे???


ईश्वरप्राप्तीत तर्क फारसा काम करत नाही. कारण तर्काने ईश्वर जाणता येत नाही. म्हणूनच नुसते तर्क कुतर्क करून नरकात जाउ नये. तुकोबाराय म्हणतात की

तुका म्हणे नाशी कुतर्क्याचे कपाळी !

तर्काने वस्तुची सिद्धी होतच नसते व तर्क नेहमी अस्थिर असते. तर्क करणार्याचा त्याच्याच स्वत:च्या तर्कावरच विश्वास नसतो कारण त्याच्या विरुद्ध दुसरा एखादा बलवान असा नवीन तर्क आला की पहिला तर्क मरतो. म्हणूनच देवर्षी नि महर्षी मुनिश्रेष्ठ नारद म्हणतात,

तर्को अप्रतिष्ठानात् ! अचिंत्या खलु ये भावा: न तान् तर्केषु योजयेत् !
 - नारदभक्तीसुत्रे !
(तर्क भक्ती क्षेत्रात अप्रमाण आहे. ज्या गोष्टी मनुष्याच्या अकलेच्या बाहेरच्या आहेत, त्यात तर्क वितर्क करु नयेत)



शेवटची एक विनंती !

आदरणीय दाभोलकरांना विनंती की त्यांनी समग्र साहित्य वाचूनच मग आपली मते मांडावीत. आणि आपल्या स्वार्थाला केवळ पूरक अशी मतं मांडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये हीच नम्रतेची विनंती !


© तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

1 comment:

  1. ह्या संदर्भात आम्ही आमच्या एका लेखात आमचं चिंतन सटीप, साधार नि तर्कशुद्ध रीतीने प्रकट केलंय. जिज्ञासुंनी ते अवश्य आमच्या ब्लाॅगवर वाचावं. विस्तारभयास्तव जास्ती बोलत नाही.

    हे कोणत्या लेखात आहे

    ReplyDelete