Tuesday, 13 September 2022

राष्ट्रीय हिन्दी दिवस पर कुछ चिन्तन...

 



गत कई वर्षोंसे मुख्यरुपसे वैदिक साहित्यका अध्ययन मूलतः संस्कृत एवं हिंदीभाषामें सौभाग्यप्राप्त विषय रहा है। एक समय था मातृभाषा मराठी होनेके कारण जिसकालमें पुणेके सिम्बायोसिस कला एवं वाणिज्य महाविद्यालयमें प्रवेश पश्चात् महाविद्यालयीन अमराठी सहाध्यायीयोंसह हिंदीमें वार्तालाप करनें हम कठिनाईयाँ अनुभव करतें थे। सौभाग्यसे चन्द्रप्रकाश द्विवेदीजीकी चाणक्य नामक धारावाहिकका अवलोकन प्राप्त हुआ उस समयसे हिंदी भाषाके प्रति रुचि निर्माण एवं वृद्धिंगत हुई। हम ऋणी है उस ऋषिश्रेष्ठ यतिवर महर्षि दयानन्द के एवं उनसे स्थापित आर्यसमाज एवं उनके विद्वानोंके जिन्होनें हिन्दीभाषा को पाश्चात्य भाषाओंसे मुक्त कर संस्कृतनिष्ठ मूलस्वरुपता प्रदान करनेका महत्कार्य किया।


आर्यसमाज का हिंदी भाषाको योगदान यह एक स्वतन्त्र विषय है जिसपर किसी एक विदुषीने आचार्यपदप्राप्त हेतु प्रबन्ध का निर्माण किया है। विस्तारसे इस विषयपर भविष्यमें यदि संभव हो तो लेखन करेंगे। *स्वयं स्वातन्त्र्यवीर सावरकरजीने महर्षि के कार्य का गौरव* करते समय लिखा है की 


 "महर्षि दयानन्द द्वारा लिखित सत्यार्थ प्रकाश में जिस हिन्दी के दर्शन हमें प्राप्त हैं, वहीं हिन्दी हमें स्वीकार है। यह सरल, अनावश्यक विदेशी शब्दों से अलिप्त होकर भी अत्यन्त अर्थ वाहक तथा प्रवाही है। महर्षि दयानन्द ही सर्वप्रथम नेता थे, जिन्होंने 'हिन्दुस्तान के अखिल हिन्दुओं की राष्ट्र भाषा हिन्दी है ऐसा उद्घोष व प्रयास किया था."


(सन्दर्भ-वीर वाणी पृष्ठ ६४)


इसका प्रत्यय महर्षीकें ग्रन्थोंका अध्ययन करनेपश्चात् सहजतासे प्राप्त है। उनके पश्चात भारतेन्दु हरिश्चन्द्र, महावीरप्रसाद द्विवेदी, जयशंकरप्रसाद, सुमित्रानन्दन पन्त आदि विद्वानोंको हिन्दी भाषा के विकास एवं वृद्धिकें विषयमें अधिकारी कहना आवश्यक है । 


यहाँ यह कह देना कोई अत्युक्ती नहीं होगी प्रथम वार हम महर्षीके एवं सावरकरजीके कथन से असहमती प्रकट करते है । हम तो संस्कृतभाषा कोही राष्ट्रभाषा का सम्मान प्राप्त करना इच्छुक है, नाकी हिन्दी अथवा अन्य कोई भाषाको । अस्तु वह स्वतन्त्र विषय है । संस्कृतही राष्ट्रभाषा होना आवश्यक है यह डॉ. भीमराव अम्बेडकरजीका भी मन्तव्य था ।


हिन्दी का स्वरुप एवं विकास


पण्डित भगवद्दत्त, रिसर्च स्कॉलर, बीए, उनके "भाषा का इतिहास" इस अभ्यासपूर्ण ग्रन्थमें यह प्रतिपादन करते है की हिन्दीभाषा के ६५% शब्द मूलरुपसे साक्षात संस्कृत अथवा उसके अपभ्रंश रुपसे है। इसकी लिपी देवनागरी जिसमें ५२ अक्षर है, जिसमें १४ स्वर एवं ३८ व्यञ्जन है। गुरु ग्रन्थसाहिब में इस भाषा का नाम बावनी ऐसा लिखा है, हिन्दी नाम पश्चात् का है। इसमें संस्कृत के स्वर स्पष्टरुपसे दर्शित होते है इस कारण हिन्दी का संस्कृतसे घनिष्ट सम्बन्ध स्पष्ट है। यद्यपि हिन्दी भाषापर सबसे अधिक प्रभाव संस्कृत का है तथापि प्राकृत, अपभ्रंश, अवधी, ब्रज, फारसी, तुर्की, अरबी आदि भाषायोंकाभी है। विक्रम संवत १००० से इस भाषा का विनियोग होता आ रहा है। विक्रम संवत १२०० सें इसके साहित्यिक भाषा के प्रमाण प्राप्त होते है। गत दो शताब्दीयोमें इस भाषामें उत्तम परिमार्जन हुआ जिसका श्रेय उपरोक्त विद्वानोंको जाता है।


प्रयास तो यह होना आवश्यक है की हिन्दीभाषामें हुए इन विदेशी एवं भ्रष्ट भाषाओंके आक्रमण को नष्ट कर हिन्दी भाषामें अधिकतम् अधिक संस्कृतोद्भव शब्दोंकाही प्रयोग किया जाएँ। संस्कृतनिष्ठ हिन्दीकाही प्रचार एवं प्रसार हो। 


आज हिन्दीभाषा दिन के उपलक्ष्यमें हम यह दृढ संकल्प करेें की इस भाषा को पुन: उसका गौरव प्रदान करें तथा स्वयं इस भाषा कें संरक्षणमें कृतबद्ध होवें।


हिंदीभाषा भारतवर्ष की सर्वाधिक जनसंख्याकी भाषा होनेके कारण एवं उसका अस्मद् मराठीभाषा के प्रति सहसम्बन्ध के कारण हिंदीभाषामें संवाद करना तथा लेखन करना सौभाग्य का विषय है। जितना संभव हो विशुद्ध संस्कृतनिष्ठ हिंदी का आग्रहही श्रेय है। इसहेतु संस्कृतभाषा का अध्ययनभी हिंदीसह आवश्यक है।


हिंदीभाषा दिनके उपलक्ष्यमें इस राष्ट्रकी सांस्कृतिक एकात्मताहेतु इस भाषा को परकीय भाषाओसें मुक्त करनेका संकल्प हम करें।सांप्रत आङ्ग्ल भाषाके प्रति हो रहा अनाठायी अट्टाहास भारतीय भाषाओंके ह्रास का प्रमुख कारण है। यद्यपि आङ्ग्लभाषाका अध्ययन आवश्यक है, तथापि स्वकीय मातृभाषा एवं संस्कृत तथा तज्जन्य भारतीय भाषाओंके संरक्षण, संवर्धन तथा प्रचार-प्रसार का दायित्व एक भारतीय होनेके कारण प्रत्येक व्यक्तीकें स्कन्धोंपर है।


राष्ट्रीय एकात्मता दृढ करनेहेतु हम संकल्पबद्ध होवें।


भविष्यकालमें इस भाषा की सेवा करनेकी सन्धि ईश्वर हमें प्रदान करें यह प्रार्थना है।


आप सर्व भारतीयोंको हिंदी भाषा दिवस की हार्दिक शुभकामनाएँ।


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#हिंदीभाषादिवस_संस्कृत_अपभ्रंश_सावरकर_हिन्दुमहासभा_आर्यसमाज_राष्ट्रीयएकात्मता_राजभाषा

Monday, 12 September 2022

आप्तस्तु यथार्थवक्ता|



*संप्रदायपूर्वक अध्ययन म्हणजे गुरुमुखातून अध्ययन का महत्वाचं आहे???*


कायंय की शास्त्रवचनांवर, ऋषीमुनींच्या वचनांवर आप्त म्हणून दृढ श्रद्धा ठेवण्यासाठी आपल्याही अंत:करणाची तितकी साधनेने सिद्धता व्हावी लागते. अहंकार तसाही आपल्याला हे करु देतंच नाही. आमच्या वेदोक्त धर्माविषयी आमच्या प्राचीन ऋषिमुनींनी जे काही सिद्धांत मांडून ठेवलेले आहेत ते आधी अभ्यासण्याची नि ते‌ समजून-उमजून घेऊन प्रसंगी अत्यंत डोळसपणे नि तर्कशुद्धपणे त्यांची चिकीत्साही करून योग्यवेळी आपल्या साधनेने आपल्याला त्यांची यथार्थता‌ पटायला लागते ही गोष्ट सहजसाध्य नसते. ती योग्यता यायला वेळंच लागतो. मूळात आपल्या शास्त्रामध्ये कुठल्याही गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवायला सांगितलेलाच नाहीये. अरे जिथे गुरुलाही गुरु मानण्यापूर्वी तपासून घ्यायला सांगितलंय व गुरु केल्यावरही त्याच्याकडून आपण सत्शास्त्रांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक ब्रह्मचर्य्यपूर्वक अध्ययन केल्यापश्चात् समजा तो गुरुच शास्त्रविरुद्ध आचरण करु लागला तर‌ त्यालाही त्याची‌ चूक निदर्शनांस आणून देण्याची आज्ञा जिथे‌ सांगितली आहे (उन्मार्गगामिनं श्रेष्ठं अपि वेदान्त पारगं| स्कन्दपुराण) अशा आपल्या प्राणप्रिय वैदिक हिंदु धर्मामध्ये शब्दप्रामाण्यवादांस अतिरेक आहे व बुद्धिप्रामाण्यवादांस नाकारलं आहे असे समजणं हे किती आततायीपणाचे आहे हे सूज्ञाच्या लक्ष्यीं आल्याशिवाय राहणार नाही.


वेद कधी प्रकट झाले, वेदांचा काळ कोणता, वेदांची लिपी कोणती, वेदांची भाषा‌ कोणती, आपला इतिहास नेमका‌ कधीपासूनचा या सर्व प्रश्नांची उत्तरे जिज्ञासुला जेंव्हा पडायला लागतात, तेंव्हा तो आपल्या आपल्या परीने ह्याचे‌ समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. भारतीय इतिहासाचीच‌ नव्हे तर विश्व इतिहासाची चिकीत्सा करताना, जिज्ञासा शमविताना मनुष्याला वेदांकडे वळावेच लागते. हे वेद समजून घ्यायचे असतील तर वर म्हटल्याप्रमाणे संप्रदायपूर्वक म्हणजे गुरुमुखातून अध्ययन आवश्यक आहे. ते‌ केल्याशिवाय वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान होणं असंभव आहे. आता हे असंच का ह्याचे साधं उत्तर हे आहे की ज्या ज्या शास्त्राचे किंवा ज्ञानशाखेचं आपण अध्ययन करतो, त्यात्या ज्ञानशाखेची जी अभ्यासपद्धती आहे तिचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणूनंच भगवान महर्षि पतंजलींनी 


*ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदोऽध्येयो ज्ञेयश्च इति। पातंजल महाभाष्य - पस्पशाह्निकम्*


ब्रह्म म्हणजे वेद जाणण्याची इच्छा करणाऱ्याने असे का असे न विचारता म्हणजेच निष्कारण सहा वेदांगांसहित वेदाध्ययन करावं. 


ही सहा वेदांगे कोणती ह्यांवर आह्मीं आमच्या दोन वर्षांपूर्वीच्या वेद परिचय‌ नामक फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत परिचयात्मक विस्तारपूर्वक विवेचन केलं आहे. तिथे पहावे. छंद, कल्प, शिक्षा, निरुक्त, ज्योतिष आणि व्याकरण..!


हे एवढं कोण करणार???


करत नाही म्हणूनंच आपली शास्त्रवचनांवर श्रद्धा बसत नाही. आपल्या पूर्वजांची‌ वचने आपल्याला थोतांड वाटायला लागतात. ह्याबाबतीतलं मार्गदर्शक एक द्रष्टव्य उदाहरण म्हणजे आदरणीय लोकमान्यांचे..! 


*लोकमान्यांनी १८९४ मध्ये ओरायन लिहून व पुढे १८९९ मध्ये आर्क्टिक होम लिहून वेदांचा‌ काळ काही सहस्त्रवर्षे‌ मागे नेण्याचा त्यांच्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांचा हेतु शुद्ध होता पण पद्धत का योग्य नव्हती ते पाहुयांत.‌ खरंतर आह्मीं ह्यावर मागे विस्तारपूर्वक हिंदीतून लिहिलं आहे. असो. पुढे‌ ते १९०० मध्ये वाराणसीला परमपूज्य श्रीदक्षिणामूर्ती स्वामी नामक एका सत्पुरुषाला भेटायला गेले, तेंव्हा वेदकालनिर्णय‌ व एकुणंच‌ वैदिक सिद्धांताविषयी त्यांचा स्वामीजींशी संवाद म्हणा शास्त्रार्थ म्हणा झाला. त्यात स्वामींना लोकमान्यांनी वेदांचा काल, त्याची भाषा,‌ त्याची लिपी, त्याचा शब्दनिर्णय, उत्पत्ती वगैरे ज्या काही शंका विचारल्या, त्या‌ सर्वांचे समाधान स्वामींनी करूनही शेवटी लोकमान्य म्हणतें झाले की*


लोकमान्य - *आपण म्हणता त्याप्रमाणें वेदांचें अनादि अपौरुषेयत्व बुद्धींस पटत नाहीं*


स्वामीजी - *संप्रदायपूर्वक शास्त्राध्ययन नाही, हेंच त्याचें कारण*


समग्र लोकमान्य टिळक - खंड ६वा 


हा संवाद काही संक्षेपांत आह्मीं हिंदीमध्ये अनुवादित‌ केला होता. संपूर्ण मूळ मराठी संवाद पुन्हा इथे जोडला आहे...









सांगण्याचं‌ तात्पर्य काय? लोकमान्यांची निंदा करणं? मूळीच नाही. 


मग???


राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्यांसारख्या लोकोत्तर पुरुषाला जर‌ स्वामी असा उपदेश करत असतील‌ तर आपल्यासारख्या अज्ञानी मनुष्याने काय चिंता वहावी? आपण वेदांकडे वळण्यापूर्वी काय करावं?? वेद समजून घेण्यासाठी काय करावं???


गुरुमुखातून अर्थात संप्रदायपूर्वक सहा वेदांगांसहित वेदाध्ययन करावं. पण हे करण्यासाठी न्यूनतम बारा पंधरा वर्षांचा तरी कालावधी लागेल. खरंतर जास्तीच लागेल पण त्यातही न्यूनतम धरलाय. पण मग हे आज संभवंच नसेल तर काय करावं? तर ज्यांनी हे‌ केलंय त्यांनी वेदांविषयी काय लिहून ठेवलंय ते‌ वाचावं. आता असे आप्त नेमके कोण आहेत, त्यांची व्याख्या काय हे पुढे पाहुयांत...!


क्रमश:...


लवकरंच...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#वेदकालनिर्णय_वेदाध्ययन_भाषा_लिपी_उत्पत्ती_संस्कृत_लोकमान्यटिळक

Thursday, 1 September 2022

ऋषि॒: स यो मनु॑र्हितो॒| ऋग्वेद - १०|२६|५

 


*ऋषि॒: स यो मनु॑र्हितो॒|*

ऋग्वेद - १०|२६|५


*जो मनुष्याचे हित करतो, तो ऋषि...!*


आज ऋषिपंचमी...! आपला हिंदुधर्म हा जसा ईश्वरप्रणीत आहे, तसा तो ऋषिप्रणीतही आहे. ऋषि कुणांस म्हणावं? शास्त्रकारांनी अनेक व्याख्या दिल्या आहेत.


*ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।*

व्याकरण महाभाष्य


*आजीवन अखंड ब्रह्मचर्य्य पालन करून सहा वेदाङ्गांसहित वेदांचे नि आर्ष ग्रंथांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक अध्ययन करून, पश्चात् योगसाधनेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून, ईश्वरसाक्षात्कार करून वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान झालेला, अविप्लुत ब्रह्मचर्यावस्था प्राप्त असलेला किंवा विवाह करूनही पुढे ही अवस्था प्राप्त केलेला एखादा ऋषि जेंव्हा वेदार्थप्रतिपादनांस तत्पर होतो, तेंव्हा 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः।' ह्या निरुक्तकारांच्या वचनांस तो ऋषि म्हणून सिद्ध होतो.*


*ऋषी हा शब्द व्याकरणानुसार तुदादि धातू पासून ईन् प्रत्यय लागून निर्माण होतो. “ऋषति गच्छति, प्राप्नोति, जानाति वा स ऋषिः - गतीचे ज्ञान, गमन आणि प्राप्ती” हे तीन अर्थ होतात. निरुक्तकारांनी “ऋषिर्दर्शनात्” ह्या शब्दाने मंत्राच्या अर्थाचा किंवा गुढार्थ ह्याचा द्रष्टा किंवा प्राप्तकर्ता, साक्षात्कार कर्ता असे अर्थ प्रतिपादून किंवा “साक्षात्कृतधर्मा”हाच सिद्धांत सांगितला आहे. महर्षी दयानंदांनी “मंत्रद्रष्टा” ह्याबरोबरच “ईश्वर” असाही अर्थ सांगितला आहे. सायणाचार्य “अतीन्द्रियार्थद्रष्टा” असा अर्थ लावतात. यजुर्वेदाचे भाष्यकार उव्वट हे “मन्त्रव्याख्याता” अशी उपमा देतात. मेधातिथी ह्यांनी 'वेद आणि त्याचा अर्थद्रष्टा' दोघांनाही ऋषि मानले आहे.*


*जो स्वत: आत्मज्ञानी होऊन वेदार्थ प्रतिपादन तर करतोच पण सृृष्टीनिर्मितीचं रहस्यही उलगडतो, तोच खरा ऋषी...! जो अभ्युदय‌ नि नि:श्रेयसाचे परममंगल दान देतो तोच ऋषि...! जो पदार्थविद्येचंही दान देतो तो ऋषि...!*


आपला धर्म ऋषिप्रणीत आहे असे आह्मीं वर का म्हटलं?


*कारण सर्व प्राचीन शास्त्रकारांचे मत हे आहे की वेद हे मानवसृष्ट्यारंभी अग्नि, वायु आदित्य आणि अंगिरा या चार ऋषींच्या अंत:करणांत प्रकट झाले. नि तिथून अष्टधा विकतीने सुरक्षित होत कानामात्राचाही भेद न होता अद्यापवावेतो‌ आहेत व भविष्यांतही राहतील. जगातली ही एकमेव ईश्वरीय वाणी, एकमेवाद्वितीय अशी जी ईश्वराने त्या चार ऋषींना दिली, तीच पुढे आपणांस अन्य ऋषींच्या मंत्रव्याख्यानानेही प्राप्त होत राहिली म्हणून हा ऋषिप्रणीत धर्म...! वेद अनेक ऋषींच्या अंत:करणांत प्रकट झालेले नसून केवळ चार ऋषींच्या अंत:करणांत आरंभी प्रकट झाले. ह्यावर कैकवेळा लिहिलंय, पुनरुक्ती नको.*


महाभारतकाळापर्यंत तरी हा धर्म ऋषिप्रणीत होता म्हणूनंच त‌ो विशुद्ध होता. दुर्देवाने महाभारतसमयीच ऋषींचा ह्रास सुरु झाल्याने सहा वेदांगांपैकी एक निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्य आता आह्मांस मार्गदर्शक कोण ठरणार म्हणून चिंता व्यक्त करताना दिसतात.


*को न: ऋषिर्भविष्यति|*


आता आमचा ऋषि कोण?


देव उत्तर देतात


*तेभ्य: एतं तर्कं ऋषिं प्रायच्छन्|*


आता तर्क हाच आमचा ऋषि....!


आमचं सत्यासत्यतेच्या निर्णयाचं, प्रमाणत्वाचे सगळं न्यायशास्त्र ज्या तर्कावर अवलंबून आहे नि 'यस्तर्केणानुसन्धत्ते स वेद धर्म नेतर:' (जो तर्काने जाणता येतो, तोच खरा धर्म जाण, अन्य नाही) असे प्रत्यक्ष श्रीमनुमहाराजांचे वचन आहे, त्या तर्कालाच आह्मीं इतकं विसरलो, तो इतका आह्मांस त्याज्य झाला की ब्रह्मससूत्रांतल्या 'तर्काsप्रतिष्ठानात्' ह्या‌ सूत्राचा अत्यंत विपरीत अर्थ‌ काढत‌ बसलो व आमच्या वैदिक धर्मामध्ये अत्यंत ग्लानीस आरंभ झाली. अनेक वेदविरुद्ध प्रथा, शास्त्रविरुद्ध अशी कर्मकांड, अनेक कुप्रथा, रुढीपरंपरा निर्माण झाल्या नि आमचा घात झाला...!


आमच्या प्राणप्रिय अशा आर्ष‌ म्हणजे ऋषिप्रणीत साहित्याकडेही पाठ फिरवून आह्मीं अनार्ष साहित्याला डोक्यावर घेतलं नि आमचा घात झाला...! आमच्या वैदिक धर्माच्या पतनाचा हा आरंभ होता. महाभारतकालानंतरच्या अडीच सहस्त्रवर्षांंच्या ह्या‌संघर्षापश्चात् भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी त्यांच्या अलौकिक पुरुषार्थाने नि अपार वेदनिष्ठेने वैदिक धर्मांस पुन्हा आर्षदृष्टी प्रदान करण्याचा दिव्य प्रयत्न केला नि त्यात ते यशस्वीही झाले. पण पुढच्या पिढींनी त्यांचे ते‌ कार्य व तो‌ संदेशही विस्मृतीत टाकला व पुढे ब्रिटीशांपर्यंत ह्या भरतभूमींवर आक्रमणे होत राहिली.‌ सहा सोनेरी पाने आपण पाहतोच. संतांचेही कार्य आहेच. यद्यपि पुन्हा त्याच आर्षधर्माचा उद्धार करण्यासाठी महर्षि देव दयानंदांचा जन्म झाला नि त्यांनी हिंदुंना पुन्हा 'वेदांकडे वळा' म्हणत आर्षधर्मोपदेशकाचे कार्य केलं. पण त्यांनाही आह्मीं विस्मृतीत टाकलं...!


*आज ऋषिपंचमीनिमित्त विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप ह्या‌ सप्तव्याह्रतींचे जसं चिंतन आवश्यक आहेच, त्याबरोबरंच पराशर, व्यास, वाल्मीक्यादि महर्षींचेही स्मरण आवश्यक आहे. षड्वेदांगकार ऋषि व षड्दर्शनकार ऋषींचेही चिंतन, स्मरण, पूजन आवश्यक आहेच. सर्वांचेच नामोल्लेख इथे विस्तारभयास्तव संभव नाहीत त्याविषयी क्षमा...! आपला हिंदु धर्म ह्या सर्व ज्ञात अज्ञात ऋषींचाच संपन्न वारसा आहे, जो आपल्याला पुढे न्यायचा आहे...! त्यासाठी आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत साहित्याचे अध्ययन हेच आपलं कर्तव्य आहे तरंच ती खरी ऋषिपंचमी होईल...!*


*आपलं भाग्य हे आहे की आपण आपलं कुल गोत्र सांगतानाही एखाद्या ऋषीशीच ते जोडतो...! ह्यापेक्षा आणखी गौरवाची गोष्ट काय???*


या ऋषिप्रणीत वैदिक धर्मांस व त्याच्या या सर्व ऋषि नामक प्रणेत्यांस कोटी अभिवादन...!


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

pakhandkhandinee.blogspot.com


#ऋषिपंचमी_ऋषिस्मरण_पूजन_मंत्रद्रष्टा_वेद_शंकराचार्य_दयानंद

Friday, 19 August 2022

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ|


 



भगवान योगेश्वराच्या चरित्रांतला हा एकंच प्रसंग...एकंच एकंच...


जो अभ्यासताना, वाचताना, लिहिताना, सांगताना अंत:करणाची काय अवस्था होते हे शब्द धजावंत नाहीत व्यक्त व्हायला. मी मूळ महाभारत पूर्ण संस्कृत संहिता व हिंदी अनुवाद पूर्ण अभ्यासलं जेंव्हा होते, तेंव्हाही हा प्रसंग वाचल्यावर काही क्षण अक्षरश: नि:शब्द झालो होतो.‌ डोळ्यांतून अश्रुपात‌ तर होताच पण कंठही अवरुद्ध झाला होता. त्यावेळी अंत:करण योगेश्वराच्या अलौकिक दिव्य आभेने ज्या प्रकारे व्यापून गेले होते, त्याचं शब्दांत वर्णन करणं माझ्याच्याने तरी संभवंच नाही. मागील वर्षी पूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींच्या (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले उपाख्य अप्पा) 'भगवान श्रीकृष्ण एक दर्शनाचे' चिंतन करतानाही ग्रंथाचा अंतंच पूज्यनीय अप्पांनी ह्याच प्रसंगाने केला असल्यामुळे ह्यावर बोलताना प्रचंड रडलो होतो. अप्पांनी हा प्रसंग काय रंगवलाय बापरे...! अप्पांच्या प्रतिभेंस दंडवत...! अप्पा आज जीवित असते तर मी त्यांच्यासमोर हे वाचत वाचत धाय मोकलून रडलो असतो. चारित्र्यनिर्माण काय असतं, प्रसंग असा आहे...


आत्ता हे लिहितानाही कंठ अवरुद्ध आहे...


अश्वमेधिक पर्वातले श्रीकृष्णांचे आणखी एक ब्रह्मचर्याचे उदाहरण


अश्वत्थाम्याने आपल्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेण्याच्या दृष्टीने द्रौपदीच्या पाच पुत्रांची ते पांडवंच आहेत असे समजून रात्रीच्या वेळी झोपेतंच निर्मम हत्या केली. पण ते पांडव नव्हते हे कळल्यावर त्याचा क्रोध शांत व्हायच्या पेक्षा अधिकंच वाढला नि सुडाग्नीने त्याने पांडवांचा वंशंच नष्ट करायचे ठरवले व त्यासाठी त्याच्याजवळ असलेले ब्रह्मशिरास्त्र नामक अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडले. हे तेच ब्रह्मशिरास्त्र आहे जे‌ त्याने पूर्वी भगवान योगेश्वरांस देऊ केले होते व त्याबदल्यात त्यांचे सुदर्शन मागितले होते. आमच्या आधीच्या‌ कैक लेखांमध्ये तो प्रसंग आह्मीं मांडला आहे तेंव्हा पुनरुक्ती करत नाही. त्या जणु विश्वसंहारक अशा अस्त्राने उत्तरेच्या गर्भावर जाताच त्यातून भविष्यांत जन्माला येणारे मुल जे पुढे परीक्षित (विष्णुरात) नावाने ओळखले गेले, ते त्या अस्त्राच्या प्रभावाने मृत म्हणूनच जन्माला आले. श्रीमद्भगवतामध्ये भगवंतांनी गर्भामध्ये जाऊन त्याचे रक्षण केलं म्हणून त्याचे नाव विष्णुरात पडले अशी कथा आहे पण ती निखालस‌‌ खोटी आहे हेच‌ सिद्ध होते. कारण जर‌ परीक्षितीचे रक्षण भगवंतांनी त्या अस्त्राने गर्भातंच केले असते तर बाहेर आल्यावर ते मृत असायला नकोच होते. व पुढील‌ कथाविस्ताराला महाभारती विपर्यास निर्माण होतो. आणि आह्मांस महाभारत अधिक प्रमाण आहे, भागवत नाही. त्यातही भगवंतांचे प्रत्यक्ष शब्द सर्वोच्च...! असो.


परीक्षित ह्या शब्दाच्या अनेक निरुक्त्या व त्यातून निघणारे अनेकार्थ आहेत, त्यावर सविस्तर कधीतरी. मृत बालकांस जीवित कोण करणार? एवढं सामर्थ्य कुणामध्ये ? तेंव्हा पांडवांचा हा वंश खुंटणार की काय ह्या भीतीने सर्व पांडवपक्षातल्या स्त्रिया विलाप करीत असताना द्रौपदी मात्र योगेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या आगमनाची वाट पाहत बसली. कारण तिला माहिती होते‌ केवळ भगवानंच ह्यातून आपणांस सोडवतील. भगवान तिथे येताच ती त्यांस म्हणाली...


“यादवश्रेष्ठा कृष्णा, अरे तु दिलेले वचन पूर्ण करशील ना? तु पराक्रमी, धर्मवेत्ता सत्यप्रतिज्ञ आहेस. त्रिभुवन सारे मृत झाले तरी त्याला जीवित करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. मग भाच्याच्या मुलाला जीवित करण्याचे तुला काय कठीण आहे? तुझे सामर्थ्य ज्ञात असल्यानेच तुझ्यापुढे हे हात जोडून मी मागणे मागत आहे.”


पुढे उत्तरेनेही भगवान श्रीकृष्णांची करुणा भाकल्यावर त्यांनी तिला अभय देताना म्हटले. हे जे श्लोक आहेत ना ते सुवर्णाक्षरांत नोंदवावेत..! भगवान म्हणतात


न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेतद्भविष्यति |

एष सञ्जीवयाम्येनं पश्यतां सर्वदेहिनाम् ||१८||

नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन |

न च युद्धे परावृत्तस्तथा सञ्जीवतामयम् ||१९||

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ |

तथा मृतः शिशुरयं जीवतामभिमन्युजः ||२२||


महाभारत भांडारकर प्रत – अश्वमेधिक पर्व - अध्याय ६८


अर्थ - उत्तरे, माझे भाषण अन्यथा कधी होणार नाही; ते सत्यच होईल...मी आजवर कधी थट्टेनेही असत्य भाषण केले नाही, ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन केले आहे, कधी युद्धांत पाठ दाखविली नाही. तरी त्या पुण्याने हा बालक जीवित होवो ! सत्य आणि धर्म जर माझ्या ठायीं असतील तर हा अभिमन्यूपुत्र जीवित होवो !!!”


अरे चारित्र्य यापेक्षा वेगळं काय असतं? का नाहीत हे प्रसंग शालेय अभ्यासक्रमांत?? का सांगत नाहीत आमचे कथाकार हे प्रसंग???


इथे ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन आणि सत्यनिष्ठा हे शब्द सर्व काही सूचित करणारे आहेत. त्यामुळे आणखी काही संदर्भ द्यायची आवश्यकता मला तरी वाटत नाही ! वाचक सुज्ञ आहेत !!!


विवाहापूर्वी १२ वर्षे‌ स्वपत्नीसह नैष्ठिक ब्रह्मचर्य‌ हिमालयांत पालन केलेला व पुन्हा आयुष्यभर गार्हस्थ्य ब्रह्मचर्याचे पालन केलेला हा भगवान...!


भगवान हा‌ शब्द प्रत्येकवेळी ईश्वरी अवतारासाठीच‌ वापरला जातो असे नव्हे बरंका...! नाही म्हणजे सांगितलेलं बरं...! नाहीतर पुन्हा आह्मांस शब्दांत पकडायला यायचे‌ काहीजण. असो...


अशा योगेश्वराच्या चरित्राचे चिंतन नि अनुकरण कधी करणार आहोत ?


काय तर म्हणे श्रीकृष्णाचे अनुकरण करु नये, अनुसरण करावं ? का? त्यांनी केलेले ब्रह्मचर्य पालन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले वेदाध्ययन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले आजीवन सत्यवचनाचे व्रत आम्ही नाही आचरु शकत ? 


केवळ श्रीकृष्ण कथा करायच्या, जन्माष्टम्या करायच्या, दहीहंडी नाचवायच्या, पण आचरण ???


जन्माष्टमीच्या‌ निमित्ताने एवढी एक कथा आयुष्यभर चिंतनांस ठेवली तरी पुरेसं...!


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com 


#भगवान_श्रीकृष्ण_योगेश्वर_ब्रह्मचर्य_पुराण_महाभारत_जन्माष्टमी_गोकुळाष्टमी_अश्वत्थामा

Thursday, 11 August 2022

संस्कृत दिवस संस्कृतसप्ताह - लेखांक प्रथम

 


आज‌ श्रावण पौर्णिमा, नारळीपौर्णिमा, राखीपौर्णिमा अर्थात संस्कृतदिवस...! परवा म्हटल्याप्रमाणे आजपासून संस्कृत भाषेंवर लेखन आरंभ....

*भाषा कशाला म्हणायचं???*

*स्फुटवाक्करणोपात्तो भावाभिव्यक्तिसाधक:|*
*संकेतितो ध्वनिव्रात: सा भाषेत्युच्यतेबुधै:|*
पद्मश्री डॉ. कपिलदेव द्विवेदी

स्फुट वाणीने बनलेली, भाव अभिव्यक्तीचे साधन असलेली, वैविध्यपूर्ण संकेत नि ध्वनी असलेली अशी जी अभिव्यक्ती, तिला विद्वान लोक भाषा म्हणतात.

नामानि सर्वाण्याख्यातजानीति शाकटायनो नैरुक्तसमयश्च| निरुक्त १|१३

नाम च धातुजमाह निरुक्ते व्याकरणे | व्याकरणमहाभाष्य ३|३|१

संस्कृत भाषेमध्ये कुठलाही शब्द हा आख्यातज म्हणजे धातुपांसून निष्पन्न आहे असे निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्यांचं नि श्रीशाकटाचार्यांचे मन्तव्य आहे. उगाचंच रला र आणि टला ट असा काहीही प्रत्यय‌ किंवा अक्षर लावून संस्कृत भाषेमध्ये कोणताही अशास्त्रीय शब्द तयार होतंच नाही. आह्मीं आजपर्यंत कैकवेळा लिहिलं आहे व बोललोही आहोत की संस्कृत भाषेमधला प्रत्येक शब्द हा धातुज असतो. म्हणजेच‌ विशिष्ट धातुंपासून तो प्रक्रिया होऊन निर्माण होतो. म्हणजेच या सर्व शब्दांची मूल प्रकृती म्हणजे धातु आहेत. आणि हे मत आमचं स्वत:चे नसून वर दिलेलं महर्षि श्रीयास्काचार्य नि भगवान महर्षि पतंजलीसदृश दिग्गजांचं आहे. भगवान महर्षि श्रीपाणिनींनी त्याच धातुपाठाचे‌ संकलन केलं असून त्यावर त्यांची अष्टाध्यायी सर्वांना परिचित आहेच. त्यांनी या‌ धातुंचे एकुण ११ गण केलेलं असून त्यावर भगवान महर्षि श्रीपतंजलींचे व्याकरण महाभाष्यही प्रसिद्ध आहे. त्यातलंच प्रमाण वर दिलं आहे.

याच धातुपाठामध्ये भ्वादि गण नावाचा एक गण आहे ज्यामध्ये भाषा हा शब्द 'भाष् व्यक्तायां वाचि|' (१|४०७) ह्या धातुपासून निष्पन्न होतो ज्याचा अर्थ आहे 'भाष्यते व्यक्तवागरुपेण अभिव्यंजते इति भाषा| '. व्यकीच्या वाणीरुपाने अभिव्यक्त होणारी, भाषित होणारी ती भाषा...! म्हणजेच भाषा शब्द हा मूळ धातुज असून त्याचा अर्थ काय होतो हे आपण पाहिले.

आता भाषा कशी निर्माण होते असा प्रश्न पडतो. अनेकांनी अनेक प्रकारे ह्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. पण बव्हतांश जणांनी डार्विनच्या विकासवादावर आधारित‌ मते मांडलेली असल्यामुळे ती मते अत्यंत अशास्त्रीय आहेत. नि म्हणूनंच अग्राह्य आहेत. त्यांच्या मते माणुस हा सर्वप्रथम वनामध्ये जनावरांप्रमाणे अत्यंत अप्रगत अवस्थेत राहत होता.‌ त्याला बोलायचं कसं हेदेखील माहिती नव्हतं म्हणे. मग तो हळुहळु आजुबाजुच्या पशुपक्ष्यांची वगैरे भाषा पाहून, आवाज ऐकून स्वत:चे‌ शब्द, हावभाव, संकेत वगैरे विकसित करु लागला व हळुहळु त्याला बोलायला यायला लागलं म्हणे व त्याने त्या बोलीभाषेतून भाषा‌ विकसित केल्या म्हणे. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी भाषेच्या उत्पत्तीसंबंधी इतके हास्यास्पद नि तर्कहीन सिद्धांत मांडून ठेवले आहेत‌ की बास. म्हणूनंच भाषाशास्त्रासंबंधी नि तिच्या विज्ञानासंबंधी आपल्या प्राचीन शास्त्रकारांनी जी मते मांडली आहेत ती अभ्यासणं महत्वाचं आहे. भाषेच्या अध्ययनाच्या दृष्टीने वैदिक नि तत्सम सर्व प्राचीन संस्कृत वाङ्मयाच्या आलोडनाची जितकी आवश्यकता आहे, तितकी अन्य कशाचीच नाही. आणि तीही शुद्ध भारतीय वैदिक दृष्टिकोनातून. स्फोटायन=कक्षीवान् (द्वापराच्या पूर्वीचा काळ), औपमन्यव, औदुंबरायण(विसं ३१००पूर्व) महर्षि यास्क (विसं ३१००पूर्व), महर्षि वेदव्यास (विसं ३०४४पूर्व), व्याडि(२९०० विसंपूर्व), पतंजलि (विसं१५००पूर्व), भर्तृहरि (विसं ८००पूर्व) ह्या सर्वांनीच भाषेच्या उत्पत्तीचा इतिहास अगदी अनविच्छिन्न स्वरुपामध्ये शब्दबद्ध ठेवलेला आहेच मूळातंच, जो एकमात्र सूक्ष्म तर्क-युक्त, सत्य आणि विज्ञानसिद्ध सिद्धांतारुढ आहे. यात विक्रम संवतापासून तितकी वर्षे पूर्व असा अर्थ अभिप्रेत आहे. आता विक्रम संवत कोणतं ते वाचकांना सांगायची आवश्यकता नसली तरी सांगतो. इसवी सन पूर्व ५६ ला जो विक्रमादित्य राजा सिंहासनारुढ झाला, त्याने त्याचे संवत सुरु केलं. आजचं संवत २०७८ सुरु आहे. आपण हिंदु लोक नित्याच्या‌ संकल्पामध्ये हे गातो.

आता हा इतिहास कळायचा कसा?‌ वर नावे तर सांगितली पण साहित्य कोणतं अभ्यासायचं? त्यासंबंधी निम्मलिखित विस्तार

१. समस्त शिक्षाग्रंथ(पाणिनीय शिक्षा, याज्ञवल्क्य शिक्षा वगैरे) आणि त्यांची व्याख्या किंवा त्यावरील भाष्ये
२. समस्त संस्कृत‌व्याकरणशास्त्र तथा त्यावरील व्याख्या
३. मीमांसा ग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
४. निरुक्तग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
५. वैदिक शाखा, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद
६. प्रातिशाख्य आणि त्यावरील व्याख्या
७. भरत नाट्यशास्त्र नि त्यावरील व्याख्या
८. प्राकृत-पालि-अपभ्रंश व्याकरणावरील ग्रंथ नि त्यावरील व्याख्या

संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी, भाषा विज्ञान अभ्यासण्यासाठी इतकं सर्व अभ्यासणं आवश्यक आहे. आमचं दुर्दैव हे आहे की इतकं सर्व साहित्य आमच्याकडे असतानाही आह्मांस‌ ते अभ्यासु वाटत‌ नाही. आमच्या संस्कृत दिनाच्या तीन व्याख्यानांत संक्षेपाने हा विषय आह्मीं मांडला होता मागील वर्षी. भारतीय इतिहासाकडे विशुद्ध भारतीय दृष्टिकोनातून पाहणं आह्मांला जोपर्यंत जमणार नाही, तोपर्यंत आमच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबणार नाहीच.

आता संस्कृत भाषेचं नामकरण...

महत्वाचा प्रश्न पडतो की संस्कृत भाषेला संस्कृत हेच नाव का दिलं गेलं? अनेकांचा असा भ्रम आहे की संस्कृत ही संस्कार होऊन झालेली भाषा आहे म्हणून तिला संस्कृत म्हणतात. म्हणजे वर विकासवादाचे‌ जे मत मांडलं त्यानुसार आधीच्या अनेक बोलीभाषा किंवा अशुद्ध भाषांवर संस्कार होऊन परिशुद्ध झालेली भाषा म्हणजे संस्कृत होय असा अत्यंत हास्यास्पद नि भ्रममूलक‌‌ सिद्धांत बव्हतांश भाषाविद् मांडताना दिसतात. अगदी आरंभीच‌ सांगायचं तर संस्कृत ही‌ संस्कार होऊन निर्माण झालेली भाषा मूळीच नाही. मग तिला संस्कृत‌ हे नाव का दिलं गेलं? त्याचे उत्तर आहे

संस्कृतं नाव दैवी वागन्वाख्याता महर्षिभि:|
आचार्य दंडी - काव्यादर्श

महाकवी दंडी म्हणतात‌ की संस्कृत‌नामक दैवी वाणी जींवर महर्षींनी अनुव्याख्यान केलं. म्हणजे काय? तर इथे दैवी वाणी म्हणजे प्रत्यक्ष‌ वेद जिच्यापासून आपल्या ऋषि-महर्षींनी मानुषी वाणी निर्माण केली. म्हणूनंच तिला संस्कृत‌ हे नाव दिलं गेलं. वेद स्वत: सांगतो की

दे॒वीं वाच॑मजनयन्त दे॒वास्तां वि॒श्वरू॑पाः प॒शवो॑ वदन्ति|
ऋग्वेद ८|१००|११

अर्थ - देव ज्या‌ दिव्य वाणींस प्रकट करतात, तीच साधारण मनुष्य‌ लोक बोलतात...

इथे पशवो वदन्ति असा शब्द आला आहे.‌ पशवो म्हणजे पशु असा अर्थ नसून मनुष्य प्रजा असा आहे. कारण वैदिक साहित्यामध्ये अनेकठिकाणी पशु शब्द हा मनुष्यासाठी वापरला आहे.

अगदी महर्षि वेदव्यासांनीही श्रीमन्महाभारतामध्ये

*अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा|*
*आदौ वेदमयी दिव्या‌ यत: सर्वा: प्रवृत्तय:|*
शान्तिपर्व २३२|२४ - चित्रशाळा प्रेस संस्करण, पुणे

अनादि अशी जी नित्य अशी वाणी जी स्वयंभु म्हणजे ईश्वराने प्रवृत्त केली, ती आद्य अशी वेदवाणी जिच्यापासून सर्व काही प्रकट झाले आहे. मनुस्मृतीमध्ये हेच सांगताना

सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्|
वेदशब्देभ्य: एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे|

वेदांतल्या शब्दांवरूनंच नंतरच्या काळात सर्व वस्तुंची व्यक्तींची ठिकाणांची संस्थांची नावे दिली गेली कारण वेद हेच सर्वात आरंभीचे ज्ञान आहे. पृथ्वीला पृथ्वी हे नाव वेदांतल्या शब्दांवरूनंच दिलं गेलं. मानवाला मनुर्वभ ह्या वेदमंत्रावरूनंच मानव हे नाव दिलं गेलं इत्यादि. ज्यांना वेदांचा दु:स्वास आहें असात्म्य(एलर्जी) आहे, स्वत:ला मानव म्हणणं बंद करावं.

सर्व प्राचीन ऋषि-महर्षि, शास्त्रकार भाष्यकार सर्वांची एकमुखाने संमती आहे की वेद हे अनादि अपौरुषेय‌ तथा नित्य आहेत.‌ मानवसृष्ट्यारंभी ईश्वराने चार ऋषींच्या अंत:करणांत दिलेलं ज्ञान म्हणजे वेद...! जर वेद सर्वात पहिलं ज्ञान असेल तर स्वाभाविक आहे वेद ज्या भाषेत‌ असतील तीच मानवाची आद्यभाषा असणार. पण विकासवादी हे मानत नाहीत कारण त्यांना हे सत्य स्वीकारायचं साहस‌ नाही. आणि त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीयही हे मान्य करत नाहीत. कारण बव्हतांशांना असं वाटतं की हे मान्य केलं तर आपलं हसु होईल. म्हणजे 

तुज आहे तुजपाशी, परि तु जागा भूललासीं|

हीच आपली अवस्था आहे. विकासवाद का खोटा आहे हे हळुहळु आह्मीं दाखवुच. अस्तु प्रथम लेखांकात इतकंच...!

पुढील लेखासाठी क्रमश:

#संस्कृतभाषा_इतिहास_निर्मिती_वेद_भाषाविज्ञान_विकासवाद_डार्विन_व्याकरणशास्त्र


Sunday, 7 August 2022

सचि॒विदं॒ सखा॑यं॒...! ऋग्वेद

 




आधी जे मित्र कमावलेत ते‌ टिकवायला शिका...


एकेकाळी अत्यंत प्रगाढ मैत्रीत असलेले लोक पुढे जाऊन एकमेकांना अंतरतात. मला खरंतर काहीवेळा हसु येतं ह्या लोकांचं आणि काहीवेळा कीवही येते व काहीवेळा आश्चर्यही वाटतं. अर्थात ह्याला तशी कारणं असुही शकतात, नाही असं नाही. पण बव्हतांश वेळाच अगदी क्षुल्लक कारणांवरून लोकांची मैत्री तुटते. केवळ संवादाचा अभाव, अहंकार नि तज्जन्य परस्परांविषयीची अंतराची भावना हीच मैत्री तुटायला कारणीभूत असते. यात‌ संवादाचा अभाव हे मुख्य कारण असतं...


एकमेकांच्या एखाद्या किंवा अनेक गोष्टी न पटायला सुरुवात झाली की संवाद‌ तुटतो व तिथून मैत्री‌ संपत जाते. मूळात एखाद्या‌च्या सर्वच गोष्टी आपल्याला पटायलाच हव्यात हा अट्टाहास‌ तरी का? स्वभाववैचित्र्य असतंच तसं आचारवैचित्र्यही मान्य करावंच लागेल. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना:...! अगदी एकमेकांवर अत्यंत प्रेम असलेले नवरा-बायकोही एकमेकांच्या सर्वच गोष्टी पटणाऱ्या स्वभावाच्या असतात असेही नव्हे पण तरीही त्यांचा‌ संसार होतोच ना? समजून घेणे हा प्रकार असतोच ना?


मग मैत्रीत हे का होत नाही? एखाद्याची एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर त्याला तसं सांगावं पण ते‌ सांगतानाही कळकळ असावी, अहंकार नसावा. भाषा सौम्य असावी व त्यातून त्याला आपली चुक उमजेल हा हेतु असावा. यात भाषा फार महत्वाचं काम करते. पण तरीही काहीवेळा समोरचा खरंच चुकत असेल व त्याच्या भल्याकरिता आपण त्याला तो किंवा ती चुकतोय‌ किंवा चुकतेय हे त्याला प्रामाणिकपणे सांगितलं तरी तो ऐकत नाही. मग ह्यातून दुरावा वाढतो व मैत्रीत अंतर येते.


मग हे थांबवायचं तरी कसं? 


काहीवेळा खरंच‌ पर्याय‌ नसतोच कारण समोरचा ऐकूनंच घेत नसेल तर विषय‌ संपतोच. अशावेळी स्वत: जमत नसेल तरी दुसऱ्याकडून सांगून पहावं पण तरीही जमत नसेल तर मग विषय‌ सोडून द्यावा. पण जर काही उपाय असेल, आशा असेल तर प्रयत्न करून पहावा. आणि ते संवादाच्या अभावाने जमणार नाही. अहंकाराने तर नाहीच. मी का बोलु हा अहंकार मैत्रीत चालत नसतो. तो आला की मैत्री तुटते. बोलायला हवं, स्पष्ट बोलायला हवं पण भाषा मृदु हवी. भले आपली चूक नसली तरी काहीवेळा माघार घ्यायला हवी. तरंच मैत्री टिकु शकते...!


तुट वाद संवाद तो हितकारीं|

समर्थ उगाचंच म्हणत नाहीत.. 


अहंकार हा सर्व गोष्टींचा मारक आहे. शहाणा माणुस त्याला दूरंच ठेवतो. 


ह्यात आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे नि:स्वार्थता...! मैत्रीत‌ स्वार्थ आला की ती फार काळ टिकत नाही. स्वार्थ संपला की ती‌ संपते. मूळात अशा मैत्रीस मैत्री म्हणावं का असा प्रश्न येतो. भले काहीवेळा स्वार्थाने केलेली मैत्रीही टिकत असेलही. पण ते फार अपवादात्मक...! पण भले स्वार्थाने एकत्र आलाही असाल तरीही स्वार्थ‌ संपल्यावर पुढे नि:स्वार्थी मैत्री टिकायला हवी.‌ तरंच त्याला अर्थ आहे...


हेतु कोणताही असो, मैत्री टिकवता आली पाहिजे. त्यासाठी मैत्रीची भावना शुद्ध हवी....!




महाभारतांत वनपर्वामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनांस म्हणतात


ममैव त्वं तवैवाहं ये मदीयास्तवैव ते|


तु माझा आहेस नि मी तुझा आहे.. जे माझं आहे ते तुझं आहे व तुझं ते माझं आहे...


भवदीय...


#मैत्रीदिन_मित्र_सखा_संवाद_भगवान_श्रीकृष्ण_सुदामा_अर्जुन_महाभारत

Tuesday, 26 July 2022

नाम बरवें, नामदेव बरवा| एकत्व बरवा परमात्मा| श्रीपरिसा भागवत

 




भक्तशिरोमणी, भक्ताग्रणी, नामयोगाचा मेरु, नामचिंतामणी, प्रल्हाद-अंगद-उद्धवाचा पुनर्जन्म, श्रीविठ्ठलाचे प्रेमभांडारी संतश्रेष्ठ श्रीनामदेवराय ६७२ वा संजीवन समाधी‌ सोहळा...! 


आषाढ वद्य त्रयोदशींस आजच्यांच‌ तिथींस ६७२ वर्षांपूर्वी श्रीनामदेवरायांसंहित त्यांच्या घरातल्या १५ जणांनी जिवंत समाधी घ्यावी...! संत श्रीजनाबाईही त्यांत होत्या. म्हणजे इतिहासांत श्रीभीष्माचार्यांस त्यांच्या आजीवन अखंड ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेने नि पित्याविषयीच्या निष्ठेने पित्याने त्यांस इच्छामृत्युचं वरदान दिलं होते. त्यापश्चात् प्रत्यक्ष कैवल्यचक्रवर्ती‌ संतसम्राट श्रीज्ञानोबारायांनीही संजीवन समाधी घेऊन जगाचें डोळे दिपविले...! त्याच श्रीज्ञानोबारायांना संजीवन समाधींस घेऊन जाणारे आमचे भक्तशिरोमणी श्रीनामदेवराय त्यांच्याच‌ कुटुंबासहित आमच्या‌ पंढरीत त्या परमात्मा पंढरीशाच्या समोरंच समाधी घेतात...!


शारीरिक व्याधींनी गांजलेले लोक अगदी मरणासन्न असताना मृत्युच्या‌ त्या असह्य वेदना सहन न होऊन अंतिमत: मृत्यु यावा व ह्यातून सुटका तरी व्हावी म्हणून काहीवेळा तळमळताना दिसतात पण‌ तरीही भोग भोगायचे म्हणून त्यांना मृत्यु येत‌ नाही नि त्यांची वेदना तशीच राहते. चांगल्या स्थितींत मृत्यु येणं तर भाग्यवंताचंच‌ लक्षण...!


पण या‌ एकाच‌ कुटुंबातल्या १६ जणांनी एकाचवेळी देहत्याग करावा. श्रीनामदेवरायांचा अधिकार जगाला माहिती आहेच पण कुटुंबांतलेही..? ते इतर १४ जण कोण ह्याची‌ सूची जोडली आहे ती पहावी...!



ते‌ 'संतांचे ते आप्त नव्हे ते‌ संत' हे संतवचन इथेच खोटं ठरावं ह्यापेक्षा आश्चर्य काय? खरंतर संतवचनं कधी खोटी ठरत नाहीत पण अपवाद असे...!


इच्छामृत्युचं वरदान यापेक्षा काय भिन्न असावं?मृत्युवर विजय‌ ह्यापेक्षा वेगळा काय असावा? संतांचा अधिकार ह्यापेक्षा वेगळा काय प्रत्ययांस‌ यावा???


आणि त्यांनी हे सर्व साध्य केलं ते केवळ अनन्यशरण भक्तीच्या सामर्थ्यावर, नामचिंतनाच्या बलावर...!


म्हणूनंच‌ श्रीपरिसा भागवत म्हणतात


कलियुगीं नामा संत‌ साकार, न कळें तो पार ब्रह्मादिक|


श्रीनामदेवराय नि त्यांच्या कुटुबीयांच्या चरणी कोटी प्रणाम...! आमचं भाग्य इतकंच की आमचं घर श्रीनामदेवरायांच्या मंदिरांस चिकटून...! 


पुनरपि जननं पुनरपि मरणं श्रीमन्नामदेवरायमन्दिरसमीपे निवासं| 🙏😇


श्रीनामदेव पायरीचे आजचे छायाचित्र साभार - आमचे बंधु श्री Mahesh Kale 


भवदीय...


#श्रीनामदेव_संजीवनसमाधी_सोहळा_नामदेवपायरी_पंढरपूर