Monday, 20 July 2026

'अल्ला दिलावे' अभंग आणि जगद्गुरु श्रीतुकोबारायांचे इस्लामीकरण

 


आजच्या साप्ताहिक हिंदुस्थान पोस्ट यामध्ये प्रकाशित झालेला हा वारीच्या निमित्ताने विशेष लेख ! मूळ लेख हा इथे पाठवला आहे कारण शब्द मर्यादेअभावी प्रकाशकांनी आमच्या अनुज्ञेने अगदी महत्त्वपूर्ण तितकाच छापला आहे, म्हणून आह्मीं मूळ लेख येथे देताहोत. धन्यवाद साप्ताहिक हिंदुस्थान पोस्ट! 


The most effective way to destroy people is to deny and obliterate their own sense of understanding their history. 

George Orewell


कुठलाही समाज, कुठलंही राष्ट्र, कुठलाही धर्म नष्ट करायचा असेल, तर त्याचा इतिहास सर्वप्रथम नष्ट करावा लागतो किंवा ते संभव नसल्यांस तो विकृत तरी करावा लागतो. गेली दोनशेहून अधिक वर्षे भारतवर्षाचा इतिहास विकृत करून आपली धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक इत्यादि सर्व प्रकारची एकात्मता व अखंडता नष्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने भारत विखंडन शक्तींकडून सुरु आहे. हे करत असताना आपली श्रद्धास्थाने नष्ट करणं किंवा त्यांचा इतिहास किंवा सैद्धांतिक भूमिका नष्ट किंवा विकृत करणं हेही त्यातलंच एक षड्यंत्र आहे. अशाच एका महत्वपूर्ण पण घातुक अशा षड्यंत्राचा परामर्श घेण्यासाठी हा लेखनप्रपंच! 

सांप्रत सर्वत्र आषाढी वारी सुरू असल्याने गेल्या आठशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायातल्या ह्या अमुल्य वारश्याचं विकृतीकरण करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न गेली काही दशके सुरु आहे, तो म्हणजे जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या अभंगांचे अत्यंत विपर्यस्त अर्थ काढून त्यांना विधर्मी किंवा निधर्मी किंवा इस्लामप्रेमी दाखवण्याचा क्षुद्र प्रयत्न!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीपंढरीशाच्या दर्शनार्थ निघालेल्या वारीमध्ये व एरवीही जगद्गुरु श्रीतुकोबारायांचा गाथ्यातले काही अभंग सोयीस्करपणे अर्धवट पद्धतीने मांडून त्यांना इस्लामप्रेमी किंवा निधर्मी दाखवण्याचा अत्यंत निंदनीय प्रयत्न गेली काही वर्षे होतो आहे. वारकरी संप्रदायात प्रमाण असलेल्या देवडीकर गाथेप्रमाणे ४०९२ अभंगांचा श्रीतुकोबारायांचा गाथा हा समस्त वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयींपैकी एक असून त्याला अगदी पंचमवेद हे ही गौरवास्पद नाव आहे. याच गाथ्यातली काही निवडक हिंदी पदे निवडून ती सोयीस्कर अर्धवट मांडून बुद्धिभेद केला जातो, तो असा


देवडीकर गाथा अभंग क्रमांक ३९२५


अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारु अल्ला खिलावे। अल्ला बिगर नहीं कोय। अल्ला करें सोहि होय।१।। सब रसोंका किया मार। भजनगोली एकहि सार। इमान तो सबहि सखा। थोडी तोभी लेकर ज्या। जिन्हो पास नीत सोय। वो हि बसकर ते रोवे। सांतो पांचो मार लगावें। उतार सो पीछे खावें। मेरी दारु जिन्हें खाया। दिदार दरगां सो हि पाया। 


मूळ अभंग थोडा मोठ्ठा असून त्यातली काहीच पदे दिली आहेत. 


मूळात या अभंगात अल्ला हा शब्द आहे, अल्लाह नव्हे. इस्लाममध्ये जो अल्लाह शब्द आहे, त्यापेक्षा हा अल्ला शब्द वेगळाच आहे. त्याहीपुढे सांगायचं तर गाथेमध्ये हा अभंग ज्या प्रकरणाखाली दिलेला आहे, ते प्रकरण हिंदी पदे व वैद्यगोळीचे अभंग या नावाने प्रसिद्ध आहे. वैद्यगोळी म्हणजे औषध या अर्थाने.जर तसं नसतं तर तुकोबाराय देवाने दारु दिल्याचं समर्थन करतील का? उपरोक्त अभंगात आलेला दारु शब्द हा औषध अर्थानेच घेणं क्रमप्राप्त आहे. 


अल्ला शब्द आई अर्थाने

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळाने प्रकाशित केलेल्या ‘मराठी व्युत्पत्तिकोश' यामध्ये अल्ला शब्दाचा अर्थ आई असा दिला आहे, व तो शब्द संस्कृत व देशी दोन्हींमध्ये त्याच अर्थाने आहे असे सांगितलं आहे.

संपादक - प्रा. कै. रामदास डांगे

कार्यकारी संपादक - डॉ. सुप्रिया महाजन 

प्रथमावृत्ती २०२२ 


अर्थ - यामध्ये श्रीतुकोबाराय 'अल्ला' नामक औषधाचा विचार मांडतात, इस्लामच्या अल्लाहचा नव्हे. ते म्हणतात की अल्लाच म्हणजे देवंच आपल्याला सर्व काही देतो, दारु म्हणजे औषध देतो, तोच खाऊ घालतो…तेंव्हा शृंगारादि सर्व रसांचा व अमृतादि रसांचा अर्क(सार) काढून आह्मीं ही ‘हरिभजन’ नामक गोळी तयार केली आहे. तुम्हाला विश्वास असेल तर ही हरिभजनाची गोळी घ्या. ही गोळी सात धातु व पंचभूतात्मक शरीरावर हल्ला चढवून भवरोगाचा उतार करते. माझी भजनगोळी ज्यांनी खाल्ली, ते देवाच्या परमधामाला प्राप्त होतात.’ 


उपरोक्त अभंगात स्पष्टपणे 'भजनगोळी' असे शब्द आहेत. भजन हा प्रकार केवळ आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात आहे व त्याचाच एक संप्रदाय असलेल्या वारकरी संप्रदायातही. संतांनी प्रमाण मानलेल्या नवविधा भक्तीमध्ये भजनाला अनन्यसाधारण स्थान आहे. तुकोबाराय स्वत: दुसऱ्या एका ठिकाणी 


तुका ह्मणें येथें भजन प्रमाण।

अभंग १५७३

असेही म्हणतात. म्हणजेच भजनाचं महत्व काय आहे ते कळतं. 


उपरोक्त अभंगात 'अल्ला' हा शब्द दिसला म्हणून त्याचा संबंध मुस्लिमांना एकमेव 'ईबादत' म्हणून प्रिय असलेल्या अल्लाहशी जोडून जणु काही श्रीतुकोबाराय इस्लामच्या अल्लाहचीच उपासना करायला सांगताहेत असा कांगावा केला जात आहे. अशांना आमचा साधा प्रश्न आहे की इस्लाममध्ये हरिभजन हा प्रकार आहे का? किंवा भजन करणे हा प्रकार तरी आहे का? 


श्रीतुकोबाराय ज्या हरिभजनाची गोळी घ्यायला सांगतात, ती इस्लाममध्ये चालते का? मुसलमान त्यांच्या कुराणातला सांगितलेला 'अल्लाह' सोडून अन्य कुठल्याही देवी-देवतांना प्रिय किंवा उपास्य मानत नाहीत हे त्यांच्याच कुराणानुसार स्पष्ट असताना श्रीतुकोबारायांच्या आदेशानुसार ते हरिभजन करणार आहेत का? 

माझ्या हरिभजनाच्या गोळीने तु परमधामाला प्राप्त होशील असे म्हणणारे श्रीतुकोबाराय "केवळ अल्लाहला 'ईबादतसाठी' एकमेव प्रिय मानणाऱ्या मुस्लिमांना" मान्य होतील का??? 

याचे उत्तर मुस्लिमांनी देणं आवश्यक आहे. कारण त्यांचे कुराण त्यांना तशी अनुमती देईल का हे त्यांनी पटवून द्यायचे आहे, आह्मीं नव्हे.

उपरोक्त अभंगात सात धातु व पंचभूतात्मक शरीराचा उल्लेख आहे. इस्लामला, अल्लाह मानणाऱ्या मुस्लिमांना हे मान्य आहे? इस्लाममध्ये ह्या सात व पाच या संकल्पना तरी आहेत का? असतील तर दाखवाव्यांत. 


आणखी एक महत्वाचा अभंग ज्याचा बुद्धिभेद केला जातो... 


आवल्ललनाम अल्ला बडा लेते भूल न जाये। इलाम त्या कालजमुपरताही तुंब वजाये ।।१।। अल्ला एक तुं नबी एक तुं। काटतें सिर पावों हात नहीं जीव डराये ।।२।। आगले देखे पिछले बुझे। आप हजुर आए तो।।३।। 

अभंग क्रमांक - ३९२६

अर्थ - देवाचं नाव सर्वात श्रेष्ठ आहे तरी ते घेण्यास विसरू नकोस.  देवाचे नाव मनापासून प्रेमपूर्वक वीणा वाजवीत मुखाने घे. देवा, तूच आमचा एक स्वामी आहेस, तूच एक संरक्षक आहेस. तुझे नाम घेताना कोणी एखाद्या दुष्टाने आमची मान, हात, पाय जरी कापले, तरी पण तो देव आमचा रक्षक असल्यामुळे आमचा जीव मुळीच भिणार नाही. पुराणातल्या काही घटना पहा आणि त्यावर समजून जा की नामावर आपली श्रद्धा असले की देव आपल्यासाठी धावून येतो. 


यामध्ये 'अल्ला' व 'नबी' हे दोन शब्द पाहून त्याचा संबंध इस्लाममधल्या अल्लाह व नबीशी जोडणाऱ्या मुर्खांसाठी हा अर्थ झेपणार आहे का? इस्लाममध्ये देव आपल्यासाठी धाऊन येतो ही कल्पना तरी आहे का? त्याचे नाव घेताना कुणी आमचे हात पाय कापले तरी आह्मीं भिणार नाही ही जगद्गुरुंची निष्ठा नेमकी कशावर आहे???


थोडक्यात काय तर यातल्या एकाही अभंगात इस्लामच्या अल्लाहशी किंवा नबीशी श्रीतुकोबारायांना संबंध जोडायचा नसून श्रीतुकोबारायांची हिंदु धर्मात अभिप्रेत असलेल्या देव या संकल्पनेवरंच सारी भिस्त आहे. 

पण असे असून सुद्धा या अभंगांचा मोडून तोडून अर्थ सांगून बुद्धीभेद का केला जात आहे तर त्याचे उत्तर सरळ आहे की सगळ्या जगाला मुसलमान करण्याची इस्लामची जी मूळ प्रेरणा आहे, जी त्यांची मूळ महत्वाकांक्षा आहे, ती प्रत्येक मुसलमानाला प्रमाण आहे. दिवसातून पाच वेळा नमाज पढणाऱ्या मुसलमानांना आता ससोयीस्करपणे श्रीतुकोबारायांचे अभंग रेटावेसे वाटतात, यात त्यांचे श्रीतुकोबारायांवरचे प्रेम नसून त्यांचा इस्लामीकरणाचा छुपा अजेंडा आहे, यातच त्यांचा स्वार्थ दिसून येतो, हे स्पष्ट आहे. 


आता इस्लाम नाकारणारा श्रीतुकोबारायांचा एक महत्वाचा अभंग पाहु


संता नाही मान। देव मानी मुसलमान। 

ऐसे पोटाचे मारिले। देवा आशा विटंबिले। 

घाली लोटांगण। नंदी नीचाचे चरण। 

तुका ह्मणें धर्म। न कळे माजल्याचा भ्रम। 

अभंग १६००

अर्थ - संतांना मान देत नाही आणि मुसलमानांना मात्र देवासारखे मानून त्यांची चाकरी करतो. असे लोक पोटाने मारलेले असल्यामुळे पोटाकरिता वाटेल ते करण्यात प्रवृत्त होतात. हे देवा, आशेमुळे हे लोक फजित पावतात. नीच्याच्या पुढे लोटांगण घालतो आणि त्याच्या पाया पडतो. श्रीतुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांना धर्म-अधर्म काही कळत नाही कारण त्या उन्मत्तांना ‘मी फार शहाणा आहे’ असा भ्रम झालेला असतो. 


आता वाचकांना माझा प्रश्न आहे की जर अल्ला शब्द असलेले अभंग खरे मानायचे तर मग वरच्या अभंगाचं काय करायचं? वरच्या अभंगात तर श्रीतुकोबारायांनी इस्लाम स्पष्टपणे नाकारला आहे, मुसलमानांना नाकारलं आहे, तेही स्पष्ट नाव घेऊन. 

मग आता ठरविणार का त्यांना इस्लामप्रेमी? 

बर हेच तुकाराम महाराज इतर अनेक अभंगांमध्ये की जे सहस्रोंच्या संख्येने गाथेत उपलब्ध आहेत, त्यात म्हणतात की

आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या ।

एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥

आम्हां विष्णुदासां एकविध भाव ।

न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥

शतखंड माझी होईल रसना ।

जरी या वचना पालटेन ॥२॥

तुका म्हणे मज आणिका संकल्पें ।

अवघींच पापें घडतील ॥३॥

अभंग - १६००

अर्थ - एका पांडुरंगावाचून इतरांची स्तुती करणे म्हणजे आम्हास ब्रह्महत्या केल्यासारखे वाटते कारण आह्मां हरिभक्तांची एकनिष्ठ भक्ती असते. त्यामुळे आह्मीं पांडुरंगावाचून इतरांस देव म्हणणार नाही. जर मी या वचनाला बदलेन तर माझ्या जिभेचे शतशः तुकडे होतील. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की एका पांडुरंगावाचून माझ्या मनात इतरांचा संकल्प असेल तर माझ्या हातून सर्वच्या सर्व पापे घडल्यासारखे होतील. 


आता बोला - श्रीतुकोबाराय हे इस्लामच्या अल्लाहला मानणारे मानायचे का? 


आणखी एक अभंग पहा 


पतिव्रता नेणें आणिकांची स्तुति। सर्वभावें पति ध्यातीं मनी। तैसें माझे मन एकविध झालें। नावडे विठ्ठलाविणें दुजें। सूर्यविकासिनी नेगे चंद्रकळा। गाय ते कोकिळा वसंतेसी। तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचें। बोल आणिकाचे नावडती। 

अभंग १६२७

अर्थ - पतीव्रता स्त्री तिच्या पती वाचून इतरांची स्तुती करण्याचे जाणत नाही कारण ती काया-वाचा-मनाने तिच्या पतीशीच अतिशय अनुरक्त झालेली असते; आणि तिच्या ध्यानात व मनात तिचा पतीच असतो. त्याचप्रमाणे माझे मन एकनिष्ठ झाले असून त्याला विठ्ठलावाचून दुसरे काही आवडत नाही. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने विकसित होणारी कमले चंद्रकिरणांचा स्पर्श झाला तरी ते विकसित होत नाहीत अथवा कोकिळा वसंत ऋतू मध्येच गायन करतात, येह्रवी नाही. म्हणून शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की लहान मूल आई पुढेच कौतुकाने नाचते, आई वाचून इतरांचे बोलणे सुद्धा त्याला आवडत नाही, तसेच माझे आहे. 


बोला आता - असे श्रीतुकोबाराय 'अल्ला देवे' अभंगात मुस्लिमांच्या अल्लाहची स्तुती करतील का??? 

आता एखादा माणूस प्रश्न करेल की मग असं असेल तर श्रीतुकोबारायांनी तो ‘अल्ला देवेचा’ अभंग रचलाच का? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की  


अधिकार तैसा दावियेला मार्ग। 

संत हे ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार त्याला उपदेश करत असतात. समोरचा एखादा हिंदी भाषिक असेल तर त्याला त्याच भाषेत उपदेश करतील. किंवा समोर एखादा मुसलमान बसला असेल तरी त्याला तसाच उपदेश करतील. 

यावरही दुसरा एखादा प्रश्न विचारेल की मग अशी परस्पर विरोधी वचने संत साहित्यात कशी काय येतात? त्याचे उत्तर असं आहे की मुळात यामध्ये परस्पर विरोध नसून यातला समन्वय आपल्याला कळत नाही. तेवढा आपला अधिकार नाही. तो कळण्यासाठी थोडंसं न्यायशास्त्राचं किंवा पूर्वमीमांसादि दर्शनशास्त्रांचे अध्ययन करावं लागतं. वरवरपाहता परस्परविरोधी वाटणाऱ्या वचनांचा तात्पर्यार्थ कसा लावायचा हे सांगताना महर्षि श्रीजैमिनी म्हणतात, सिद्धांत असा आहे की


विरोधेत्वनपेक्ष्यंस्यात्, असति ह्यनुमानं। 

पूर्वमीमांसा १।३।३


जिथे विरोध आहे असे वाटतं, तिथे अनुमानाने काम घ्यावं लागतं. 

म्हणजेच विठ्ठल सोडून अन्य दैवत भजणारंच नाही म्हणणारे श्रीतुकोबाराय, संता नाही मान, देव मानी मुसलमान म्हणणारे श्रीतुकोबाराय हे अल्लाहला भजणं असंभवंच आहे हेच अनुमान काढावे लागते. 


शेवटी जाता जाता. . . 


जगद्गुरु तुकोबारायांच्या सर्व अभंगांमध्ये श्रीविठ्ठलालाच एकमेव प्रमाण म्हणून त्याची पूजा, त्याचे भजन, कीर्तन, त्याचे नामस्मरण, मूर्तीपूजा, अवतारवाद, पुनर्जन्म या सर्व हिंदू धर्मातल्या संकल्पनाच सांगितल्या आहेत. श्रीतुकोबाराय वेदप्रामाण्यही ठळकपणे मान्य करतात. इस्लामला किंवा मुस्लिमांना यातली एकही संकल्पना मान्य नाही. मग श्रीतुकोबाराय त्यांच्या अल्लाहचे भजन करतील का हो? त्यामुळे इथून पुढे तरी वाचकांनी आपला बुद्धिभेद न करून घेता बुद्धीभेद करणाऱ्यांना प्रतिवाद करावा आणि त्यांचे षडयंत्र हाणून पाडावे हीच विनंती! 


बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल। 

श्रीज्ञानदेव तुकाराम। 

पंढरीनाथ महाराज की जय। 

माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। 

सब संतन की जय।


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#जगद्गुरुश्रीतुकोबारायांचे_इस्लामीकरणाचे_षड्यंत्र_अल्लादिलावेअभंग_इस्लाम_बुद्धिभेद_वारकरीसंप्रदाय

Wednesday, 31 December 2025

इतिहासाचार्यांची स्मृतिशताब्दी...

 


इतिहासाचार्यांचा अपमान यापेक्षा मोठ्ठा असुच शकत नाही पण....

आज इतिहासाचार्य वि का राजवाडे यांचं पुण्यस्मरण! त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षाला आरंभ. इंडियन हिस्टरी काँग्रेस (IHC) म्हणजे नावातच काँग्रेस असलेल्या संस्थेने राजवाड्यांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार ईर्फान हबीब सारख्या वामपंथी इतिहासकाराला देणं यात नवल असं काहीच नाही म्हणा. देश स्वातंत्र्य झाल्यापासून चुकीच्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा कायम राखण्यात आपण तसेही 'उज्ज्वल' आहोत. अर्थात ७७ वर्षात आह्मां उजव्यांना अर्थात राष्ट्रनिष्ठांना अर्थात हिंदुत्वनिष्ठांना शैक्षणिक क्षेत्रातली डाव्यांची मक्तेदारी अद्यापही मोडीत काढता आलं नाही हे आमचं अपयश आहे. आर्यसमाजी विद्वानांची परंपरा सोडली तर उजव्यांना इतक्या वर्षात स्वर्गीय सीता राम गोयलांशिवाय एकही विद्वान इतिहासकार निर्माण करता आला नाही पण याच गोयलांना आडवाणींनी व संघ-भाजपाने काय वागणूक दिली यावर मागे लिहिलंच आहे, त्यामुळे ही शोकांतिका आहेच. हाँ आमचे हिंदुसभाई जीवन कुलकर्णी काही अंशी पाखंड खंडणकर्ते होते पण हे नावही आजच्या बव्हंशी हिंदुत्ववाद्यांना माहिती नसेल, (लवकरंच कळेल ते) पण ते असे दिग्गजही नव्हते. किंबहुना सावरकरांच्या वेळीच संपलेल्या आमच्या हिंदुसभेला जीवनजींना पोसताही आलं नाही. कारण संघ-भाजपाला नावं ठेवण्याशिवाय व गोळवलकरांच्या नावाने विलाप करण्याशिवाय आमच्यातल्या बव्हंशी हिंदू महासभायांना दुसरं जमलंय तरी काय? मीही त्यातलाच म्हणा 🤭 !


एकुणंच अपयश...

देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे होत आली तरी सुद्धा हिंदुत्वनिष्ठ म्हणविणाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविणारा एकही इतिहासकार निर्माण करता आला नाही हे हिंदुत्वनिष्ठांचं अपयश आमच्या स्वत:च्या कधी लक्षात येणार आहे कुणांस ठाऊक? गेली ७८ वर्षे शिक्षणसंस्थांवर मार्क्सवादी वेटोळे घालून बसलेल्या या लाल पावट्या सर्पांची नांगी ठेचणारे प्रा. माख्खन लाल, प्रा. शंकर शरण यांची नावे गेली १५-२० वर्षे व सांप्रतही चर्चेत असली (किती हिंदुत्ववाद्यांना ही नावे माहिती आहेत???) तरीही यांच्या योगदानाचं चीज न होणं हे सरकारी पातळीवर सत्तेत ५६ ईंच असो नाहीतर अन्य कोणी, maintain the status quo हे ठरलेलं असतंच. यातही मास्टरस्ट्रोक असेल म्हणा काहीतरी, कुणांस ठाऊक? माझ्यासारख्या अतिउजव्या हिंदुसभाई अडाण्याला तो काय कळणार?  प्रा. शंकर शरणजींवर मागे लिहिलंय, गेली दोन दशके राष्ट्रीय पातळीवर ते उत्तम लेखन करताहेत पण संघ-भाजपाचे सेक्युलर दोष दाखवत असल्याने त्यांनाही उपेक्षा आहेच. ती पाचवी पुजलीच आहे...

शेष, IHC तशीही पहिल्यापासून डाव्यांचीच आहे, आणि राजवाडेही तसे उत्तरायुष्यात थोडेसे डावीकडे झुकल्यासारखे, भरकटल्यासारखे वाटावेत असे लेखन करतात, पण म्हणून ते डावे ठरत नाहीत हेही तितकंच खरं. विवाहसंस्थेचा इतिहास पाहिला तरी लक्ष्यीं येईल. त्याची कारणमीमांसा स्वतंत्रपणे कधीतरी!

पण ग्रँट डफसारखे इंग्रज व एकूणंच इंग्रज आमच्या इतिहासाचं, त्यातही आपल्या तेजस्वी नि विजीगीषु अशा मराठेशाहीच्या इतिहासाचं पद्धतशीर वाटोळं करत असताना त्यांचे ते षड्यंत्र हाणून पाडणाऱ्या राजवाड्यांचं नाव हे म्हणूनंच आमचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे ह्यावर अन्य कुणी व्यक्त होईल न होईल, आमचं काम आहे. आमच्या शिवरामपंत कार्लेकरांचा लेख दै. सकाळला आलेला आहे सुदैवाने, तो जोडलाय.


साधनसिद्ध इतिहास...

खरंतर इतिहास हा डावा आणि उजवा, हिंदुत्ववादी किंवा मार्क्सवादी, काँग्रेसी किंवा भाजपाई, पू-रोगामी किंवा प्रतिगामी, संघी किंवा हिंदुसभाई, ब्राह्मणी, मनुवादी किंवा ब्रिगेडी असा कधीच नसतो. इतिहास हा इतिहास असतो. पण या बाबतीत उजव्यांची एकुणंच प्रगती विचार करत असताना काही गोष्टी लक्ष्यात येतात

१. उजव्यांचं आंग्ल भाषेवर प्रभूत्व नसणं ही मुख्य घोडचूक
२. उजवेच उजव्यांना पाय घालून पाडताना दिसणं हे तर आजकाल अधिक होतेय
३. उजव्यांना इतिहास संशोधन हे घर जाळून कोळशाचा व्यापार करताना दिसणं - डाव्यांना जसं पोसलं जातं, तसं उजव्यांचं होताना दिसतंच नाही, ना शिष्यवृत्ती ना अन्य काही.
४. हिंदुत्ववादी संघटना किंवा पक्ष असं प्रामाणिक संशोधन करणाऱ्या उजव्यांना कुठल्याही प्रकारची मदत करताना तर अजिबात दिसत नाहीत, व्यासपीठ सुद्धा उपलब्ध करून देत नाहीत, उलट ब्रिगेड्यांना व्यासपीठे मिळताहेत.
५. सर्वात शेवटी, मूलमें भूल हैं।

बाकी जाता जाता...

इतिहास संशोधन हा विषय आजकाल विनोद, छद्म अभिमान व जातीय अभिनिवेशाचा झाला आहे; तो प्रामाणिक जिज्ञासेचा, चिकीत्सेचा नि प्रेरणेचा राहिलाच नाही. आजकाल कुणीही उठतंय, काहीही लिहितंय, कारण इतिहास हे चलनी नाणं आहे. कुठलीही विचारसरणी असो, डावे काय अन् उजवे काय, सगळे एकाच माळेचे मणी झालेत. त्यातून जातीय अभिनिवेश भयंकर वाढत चाललाय. त्यामुळे हा विषय जगासमोर मांडायला तरी आजकाल नकोसा वाटतोय, नकोच. हाँ, व्यक्तिगत अध्ययनासाठी व स्वत:ची ज्ञानपिपासा किंचित् शमविण्यासाठी तो मरेपर्यंत चिंतनीय आहेच पण केवळ स्वत:पुरता, इतिहासाचा प्रामाणिक विद्यार्थी म्हणून काही लेखन करावं व जगासमोर मांडावं असे आजकाल वाटत नाही. तरीही अंत:करणातली उर्मी शांत बसु देत नाही.

निदानभूत: इति ह एवमासीत् इति य उच्यते सेतिहास:।
निरुक्त

इतिहास पुराणं च पंचमो वेदोच्यते।
श्रीमद्भागवत

पुराणमितिवृत्तमाख्यायिकोदाहरणं धर्मशास्त्रमर्थशास्त्रं चेतीतिहास:।
कौटिल्य

धर्मार्थकाममोक्षाणामुपदेशसमन्वितम्। पूर्ववृत्तंकथायुक्तमितिहासम् प्रचक्षते।

आमच्या शास्त्रकारांनी इतिहास हा पांचवा वेद सांगितल्याने या वेदोनारायणाची सेवा करणं हे आमचं कर्तव्य असल्याने...

बुडतें हे जन देखवेना डोळां।

असो!

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#इतिहासाचार्य_विकाराजवाडे_पुण्यस्मरण_स्मृतिशताब्दी_इतिहासलेखन_मार्क्सवादी_डावे_हिंदुत्ववादी


Thursday, 25 December 2025

ख्रिसमस साजरा करणाऱ्या हिंदुंसाठी...

 

जो येशु ख्रिस्त मूळात अस्तित्वात नव्हता, ज्या ख्रिसमसवर युरोपमध्ये बंदी घातली गेली होती, ज्या ख्रिस्त्यांनी आपल्या पूर्वज हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याच्या शुभेच्छा??? नोव्हेंबर, १९९९ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय भारतभेटींस येतो व Planting The Cross in Asia म्हणजे संपूर्ण आशिया ख्रिस्तमय करायचा आहे असे जाहीर बोलतो. मागे यावर सविस्तर लेख लिहिला आहे. 

आता कुणीतरी म्हणेल अहो हा सगळा इतिहास कशाला उकरून काढता? याने समाज बिघडेल. 

हो का? मग तथाकथित ब्राह्मणांनी तथाकथित बहुजन समाजावर हजारो वर्षे अत्याचार केले हा धादांत खोटा, समाजविघटनकारी आणि फेक नेरेटिव्ह गेली दोनशे वर्षे २४ तास सातत्याने मांडत असताना लाज वाटत नाही का? याने समाज बिघडत नाही का?? मनं कलुषित होत नाहीत का??? 

या उलट शुद्र जेंव्हा राजे झाले, तत्कालीन गुणकर्माधिष्ठित वर्णव्यवस्थेनुसार सत्ताप्राप्त कर्ते झाले, तेंव्हा ब्राह्मणांची कुठलीही चूक नसताना या शुद्रांनीच ब्राह्मणांवर अत्याचार केले म्हणून ब्राह्मणांनी त्यांचे उपनयन बंद केलं असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांच्या शुद्र कोण होते या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये स्पष्टपणे मान्य केलेलं आहे. या ग्रंथामध्ये इतरही अनेकदा म्हणजे दोन ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे हेच मान्य केलेलं आहे. दुर्दैवाने आजकाल एकही आंबेडकरवादी किंवा आमचे हिंदुत्ववादीही ही गोष्ट सांगत नाहीत, कारण सामाजिक समरसता धोक्यात येते ना. असो, आजचा हा विषय नसल्याने मूळ विषयाकडे वळु. 

कुठलाही धर्म नष्ट करायचा असेल तर त्या धर्माचा पुरोहित वर्ग पहिल्यांदा नष्ट करावा लागतो हे साधं सोपे गणित ख्रिस्त्यांना कळलं होतं म्हणून तर महाराष्ट्रात आणि पर्यायाने हिंदुस्थानात ब्राह्मणद्वेषाचं मूळ याच ब्रिटिशांनी म्हणजेच ख्रिस्त्यांनी रोवलं, जे आजही घट्ट होऊन उभं आहे. ब्राह्मण तो बहाना हैं, हिन्दु धर्म असली निशाना हैं असे आमचे विवेकानंदांच्या व्याख्येतले बौद्धिक क्षत्रिय (Intellectual Kshatriya) धर्मबंधु सचिन पाटील जे म्हणतात, ते त्रिवार सत्य आहे. Divide & Rule...! 

ख्रिस्त्यांनी आपल्यावर किती अत्याचार केले याला गणनाच नाही, तरीही वानगीदाखल काही पाहुयांत. ज्या कुणाला हे सर्व खोटं वाटतंय त्यांच्यासाठी निम्नलिखित माहिती 👇👇👇

तथाकथित येशू खिस्ताच्या मृत्युनंतर त्याच्या काही शिष्यांनी युरोपात स्थलांतर केले व युरोपमध्ये आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न चालू केला. ज्यू लोकांना बाटविण्यासाठी त्यांचा छळ करणे इ. गोष्टी इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांमध्ये सुरू झाल्या. पुढे या गोष्टी पोर्तुगालमधून हिंदुस्थान व गोव्यात आल्या. ७ मे, १४९८ ला पोर्तुगीज गोव्यात आले व त्यांनी सन १९६१ पर्यत हिंदुस्थानात चाचेगिरी निर्भयपणे केली. अल्फान्सो अल्बुकर्क याने सप्तकोटेश्वराचे देऊळ पाडून तेथे चर्च उभे केले. अनेक अन्यायकारक गोष्टी घडत गेल्या. गोव्यातील हिंदू बांधवांनी त्याला फार सोशिकपणाने तोंड दिले. पुढे पोर्तुगीजांनी वसई, ठाणे, तारापूर, वांद्रे, माहीम, मुंबई येथे सत्ता स्थापन केली. दीव घेतले. दमण घेतले. गोवा, दीव, दमण यांवर त्यांची सत्ता आली. इन्क्विझिशनचा छळवाद संपूर्ण जगात चालू होता. हिंदु-नवख्रिस्ती लोकांवर अनेक निर्बंध लादले गेले. त्याविरुद्ध तक्रार ऐकली जात नसे. इ.स.१८२१ पर्यंत हा “'छळवाद' चालू होता. मराठी व संस्कृत ग्रंथांची यामुळे राख झाली. पोर्तुगीज भाषेची सक्ती झाली. पाद्री लोकांचे साम्राज्य झाले.




या ख्रिस्ती पोर्तुगीज राजकर्त्यांचे खालील हुकूम वाचले म्हणजे ख्रिस्ती पोर्तुगीजांचे जुलूम हे किती तीव्र होते हे लक्षात येईल.

इ.स. १५४६ - गोव्यातील पाखंडमत नष्ट करा. देवळे व मशिदी नष्ट करा. लाकूड, माती, धातूच्या मूर्ती करण्यास बंदी. असे करणाऱ्यास कडक शासन करा. (पोर्तुगालचा राजा दो जुवांव याचा आदेश) 

इ.स, १५४८ - हिंदूंची धार्मिक पुस्तके फाडून टाका. 

इ.स. १५५७ - हिंदूंची सरकारी नोकरीतून हकालपट्टी. 

इ.स. १५५९ - हिंदूंच्या व त्यातही ब्राह्मणांच्या वतीने कामे करू नयेत. मृत हिंदूंच्या स्रियांच्या वारशांना ख्रिस्ती झाल्यास वारसा मिळावा.

इ.स. १५६० - ब्राह्मणांना हद्दपारीचा हुकूम. स्थावर मालमत्ता ख्रिस्त्यांना विकून १० दिक्सांच्या आत बहेर जा. 

इ.स. १५६१ - लोकांना परत येण्याचा हुकूम. 

इ.स. १५६३ - परत हद्दपारीचा कायदा जारीने अंमलात आणण्याचा हुकूम. 

इ.स. १५६६ - कुलकर्णीपण हिंदूंकडे नसावे. वतने ख्रिस्त्यांना विकावी. 

इ.स. १५६७ - हिंदुंना धर्मपुस्तके बाळगण्यास बंदी. नवख्रिस्ती प्रार्थनेला न आल्यास त्यांच्या तळहातावर मारण्याचा पाद्र्यांना अधिकार. 

इ.स. १५६९ - बारदेश प्रांतातील देवळांचा समूळ नाश करण्याचा आदेश. 

इ.स. १५७१ - हिंदूंवर होणाऱ्या जुलमांची चौकशी करण्याचा हुकूम. 

इ.स. १५७४ - ब्राह्मण पंडितांना घोड्यावरून, डोलीतून, पालखीतून जाण्यास बंदी, त्याकरिता दंडाची योजना. 

इ.स. १५७५ - इतरांनासुद्धा वरील बाबींची बंदी. 

इ.स. १५८७ - हिंदूंना जानवे घालण्यास बंदी, विवाहसंस्कार बंद. 

इ.स. १५९२ हिंदू न्हाव्यांकडून ख्रिस्त्यांना हजामत करण्यास व हिंदू नोकर ठेवण्यास बंदी. 

इ.स. १५९५ जुलमाचा कळस झाला. शेती-व्यवसाय बंद पडला. 

इ.स. १५९८ हिंदू कारागीरांनी ख्रिस्त्यांना शिकविण्यास बंदी. 

इ.स. १६६० फिलीप राजाचे पत्र - हिदूंना न्यायसत्तेचा फायदा नाही. त्यांनी गोव्यात किंवा आसपासच्या मुलुखात आल्यास सर्वनाशाची शिकवण. 

इ. स. १६७८ - गोव्यात हिंदूंना विवाह करण्यास परवानगी दिली. पंरतु होमहवन करण्यास बंदी. विवाहसमारंभात कडक पहारा. 

इ.स. १६८१. पोरक्या मुलांचा ताबा घेऊन त्यांचे सक्तीने धर्मांतर. 

इ.स. १६८४ पोतुगीज भाषेची सक्ती. पोर्तुगीज शिकण्यास वर्षांची मुदत. या मुदतीत भाषा न आल्यास शिक्षा. कलावंत स्त्रियांवर बंदी. 

इ.स. १७०५ शेंडी-कर म्हणजे शेंडी ठेवल्यांस त्यावर कर

इ.स. १७१५ भोयांना हिंदुंचे मचवे चालविण्यास बंदी. 

साष्टीमधील रायतूरच्या चर्चमध्ये असलेल्या किल्लेदाराच्या थडग्यावरील खालील मृत्युलेख आढळतो - रायतूरचा किल्लेदार दि योग रूद्रिगिश, ज्याने ह्या प्रांतातील सारी देवळे पाडून टाकली, त्याचे हे कबरस्थान आहे. (२१ एप्रिल, १५६७)

ही केवल गोव्यातली काही वानगीदाखल उदाहरणे आहेत. केरळचा उल्लेख तर मी केलाच नाही. इतर प्रांतातला तर नाहीच... 

असो! सर्वधर्मसमभाव पाळायला आह्मीं काही मूर्ख नाही आहोत. तो आह्मांला कुणी शिकवुही नये! 


संदर्भग्रंथ 


१. गोमांतक परिचय - बाबा सावर्डेकर - पीडीएफ 

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/bd/%25E0%25A4%2597%25E0%25A5%258B%25E0%25A4%25AE%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A4%25E0%25A4%2595_%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BF%25E0%25A4%259A%25E0%25A4%25AF.pdf&ved=2ahUKEwiw8pPtidiRAxXXyDgGHcA-FFkQFnoECCYQAQ&usg=AOvVaw02mgU27GzygB5tAjnjgWd8


२. शुद्र कोण होते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर - पीडीएफ उपलब्ध 👇👇👇

https://www.banaengp.com/contact-us/

आंबेडकर साहित्य मराठी नागपूर प्रबुद्ध भारत प्रकाशन


३. Planting the cross in Asia 👇👇

https://www.vatican.va/content/john-paul-ii/en/apost_exhortations/documents/hf_jp-ii_exh_06111999_ecclesia-in-asia.html


४. ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिवराव शिवदे 


भवदीय... 

पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#येशुख्रिस्त_ख्रिश्चनिटी_ख्रिसमस_बायबल_नाताळ_हिंदुधर्मांतर_गोवा

Wednesday, 26 November 2025

भारतीय संविधानाचे खरे शत्रु कोण???

 

आज २६ नोव्हेंबर अर्थात भारतीय संविधान दिनाची ७५री आहे म्हणजेच अमृतमहोत्सव आहे. गेली चार-पाच महिने मी भारतीय संविधानावर जवळजवळ ८-१० व्याख्याने दिलेली आहेत. बव्हतांशी इंग्रजी भाषेमध्ये, अगदी एक दोन मराठी भाषेमध्ये. सुदैवाने मी नुकताच अधिवक्ता झालेलो आहे, २०१३ सालीच विधीज्ञ पदवीधर झालेले असलो तरी सनद विलंबाने घेतली, असो. त्यामुळे भारतीय संविधानावर बोलणं हा माझ्यासाठी गौरवाचा विषय आहे... 

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व घटना सदस्यांनी ज्या भारतीय राज्यघटनेचा हा अलौकिक वारसा आपणा सर्वांना दिला, त्या संविधानाचे पालन करणे आणि रक्षण करणे हे आपणा सर्वांचे एक भारतीय म्हणून कर्तव्य आहेच. परंतु गेली काही वर्ष हेतुपुरस्सर याच भारतीय संविधानाविषयी भ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाची सत्ता देशात आल्यापासून सुरू झालेलं आहे. म्हणजेच ज्यांनी भारतीय संविधान कधीच मानलं नाही असे डाव्या विचारसरणीचे लोक आज स्वतःला 'भारतीय संविधानाचे आह्मींच कसे संरक्षक' म्हणून मोठ्या दिमाखाने मिरवीत आहेत. यावर पुस्तके सुद्धा लिहिली गेली आहेत डाव्यांकडून. २०२४च्या लोकसभेवेळीचा प्रचार पहा. 

म्हणूनच आपल्याला आज भारतीय संविधानाचे खरे शत्रू कोण हे ओळखणे आवश्यक झालं आहे. 

आपलं सुदैव इतकं आहे की स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच भारतीय संविधानाचे खरे शत्रू कोण हे त्याचवेळी मांडून ठेवलेलं आहे. दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी भारताचे संविधान संमत झाले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे २५ नोव्हेंबर, १९४९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो, यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले. त्यात बाबासाहेबांनी संविधानाला सुरुवातीपासून कुणाचा विरोध आहे हे स्पष्ट करताना म्हटलं आहे की 

"साम्यवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष या दोन घटकांकडून संविधानावर मोठया प्रमाणात नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. ते संविधानाच्या प्रती नापसंती का व्यक्त करतात ? खरोखर संविधान वाईट आहे म्हणून ते नापसंती व्यक्त करतात काय ? निश्‍चितपणे नाही असे मी म्हणतो. साम्यवादी पक्षाला कामगारांच्या हुकुमशाही तत्त्वावर आधारलेले संविधान हवे आहे. हे संविधान सांसदीय लोकशाहीवर आधारित असल्यामुळे ते संविधानाचा निषेध करतात. समाजवाद्यांना दोन गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट त्यांना हवी आहे ती अशी की, ते जर सत्तारुढ झाले तर मोबदला न देता खाजगी संपत्तीचे राष्ट्रीयीकरण किंवा सामाजीकरण करण्याचे संविधानाने, त्यांना स्वातंत्र्य दिलेच पाहिजे. समाजवाद्यांना पाहिजे असलेली दुसरी गोष्ट अशी की, संविधानातील मूलभूत अधिकार निरपेक्ष आणि कोणत्याही निर्बधाशिवाय असावे, जेणेकरुन त्यांच्या पक्षाला सत्ता प्राप्त करण्यात अपयश आले तर, केवळ अनिर्बंध टीका करण्याचेच नव्हे तर राज्य उलथून पाडण्याचेही स्वातंत्र्य त्यांना हवे. "

संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८, भाग ३ पृष्ठांक १६६

https://archive.org/details/volume-18-1-mar/Volume18_3_Mar/page/n202/mode/1up?q=+%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80




मला नाही वाटत की यापेक्षा स्पष्ट आणखी काय शब्द बाबासाहेबांनी उच्चारायचे होते की ज्यातून त्यांनी भारतीय संविधानाच्या खऱ्या शत्रूंचं वर्णन त्याचवेळी संविधान सभेच्या भाषणातंच करून ठेवलेलं आहे. खरंतर संविधान बचाव नामक खोट्या चळवळीच्या वेळीसंच मी हे सर्व संदर्भ बाहेर काढले होते, असो. 

पण गेल्या ७५ वर्षातला प्रचार याच्या नेमका उलटा आहे... 

ज्यांनी भारतीय संविधानाला पहिल्यापासून विरोध केला, तेच डावे आज स्वतःला भारतीय संविधानाचे फार मोठे संरक्षक म्हणून घेत आहेत आणि जे भारतीय संविधानाला प्रमाण मानतात आणि त्याच्यानुसार आचरण करतात असे हिंदुत्ववादी, त्यांना मात्र संविधानाचे शत्रू म्हणून हेटाळलं जात आहे. 

संविधानाचे आणखी शत्रु कोण? 

इंदिरा गांधींची सेक्युलर आणि सोशालिस्ट काँग्रेस 

भारतीय संविधानाची पूर्वपीठिका म्हणजे प्रिएम्बल भारतीय संविधानाचा आत्मा आहे पण हा आत्मा मारण्याचं काम ज्यांनी केलं, ती इंदिरा गांधी यांची काँग्रेस ! 

आपणा सर्वांना माहिती असेल की देशावर आणीबाणी  लादणाऱ्या इंदिरा गांधी यांनी भारतीय संविधानाच्या पूर्वपीठिकेमध्ये म्हणजेच प्रिएम्बलमध्ये सेक्युलर आणि सोशालिस्ट हे दोन शब्द घुसडवून भारतीय संविधानाच्या मूळ गाभ्यालाच हात घातला, ज्यावर पुढे केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये आव्हान दिले गेल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या १३ न्यायमूर्तींनी जो काही निर्णय दिलाय, तो वाचल्यानंतर ही घटना दुरुस्ती किती वाईट होती हे आपल्या लक्षात येईल. म्हणजेच भारतीय संविधानाची पूर्वपीठिका म्हणजेच सरनामा याची हत्या करण्याचं काम तत्कालीन इंदिरा गांधींच्या सरकारने केलं पण याच विचारधारेचे लोक आज स्वतःला संविधानाचे संरक्षक म्हणून घेत आहेत आणि हिंदुत्ववादी असलेल्या आमच्यासारख्यांना संविधानाचे मारेकरी म्हणून बोंबा मारत आहेत. वास्तविक पाहता जेव्हा घटना दुरुस्ती सुचवली जाते तेव्हा किंवा कोणताही कायदा दुरुस्त करून त्यामध्ये एखादी नवीन संकल्पना किंवा शब्द भर म्हणून घातला जातो, तेव्हा त्याची व्याख्या करणं अभिप्रेत असतं. पण दुर्दैवाने ही घटना दुरुस्ती करत असताना सेक्युलर आणि सोशालिस्ट या दोन्ही शब्दांच्या व्याख्या सुद्धा केल्या गेल्या नव्हत्या, यापेक्षा संविधानद्रोह कोणता? 

२०२४ साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारने ४००सो पारची घोषणा दिली, त्यावेळी हेच लोक मोदी सरकार संविधान बदलणार म्हणून बोंबा मारत होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. मोदी सरकारला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. आणि वरून आरोप काय तर ईव्हीएम घोटाळा? 

वास्तविक पाहता मोदी सरकार जर ईव्हीएम घोटाळा करत असतं तर मोदी सरकारचं ४०० पारचं स्वप्न केव्हाच पूर्ण झालं असतं पण घडलं काय सर्वांना ज्ञात आहे. यालाच डाव्यांची ईकोसीस्टम म्हणतात. 

दुर्दैव असं की आमचे हिंदुत्ववादी या विषयात अजूनही प्रचंड मागे आहेत. आमच्या लोकांना आपल्या विरोधात काय प्रचार चालू आहे याचं भानच नाही. आणि भविष्यात आपल्या विरोधात काय प्रचार आणखी होणार आहे याचं सुद्धा भान नाही, याचा सुद्धा अंदाज घ्यायची शक्ती नाही. 

क्षणभर भाजपा-काँग्रेस या सर्व गोष्टी बाजूला ठेवून विचार केला तरी एवढे तरी मान्य करावे लागेल की भारतीय संविधानाचे खरे शत्रू हे डावेच आहेत की ज्यांनी गेली ७० वर्ष हिंदू समाजाला म्हणजेच भारतीयांना त्यांचा बुद्धिभेद करून मूळ विषयांपासून लक्ष भरकटवून केवळ त्यांच्यात भांडण लावायचं काम केलेलं आहे. या डाव्यांनी म्हणजे संविधानद्रोहींनी आपला स्वार्थ साधण्यासाठी सतत भारतीय इतिहासाचं विकृतीकरण करत हिंदू समाजातल्या अनेक जातींना-जमातींना एकमेकांच्या विरोधात पेटवण्याचं काम केलेलं आहे, यापेक्षा मोठा संविधानद्रोह काय असू शकतो??? 

तुम्ही या देशातल्या कोणत्याही समाजवाद्याचं,  साम्यवाद्याचं, पू-रोगाम्याचं, डाव्या विचारसरणीच्या मनुष्याचं लिखाण, त्याचं वाङ्मय, त्याची भाषा हे सगळं उघडून पहा. आजही तुम्हाला हे लोक समाजामध्ये भांडणे लावताना दिसतील. हे लोक एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात सतत पेटवण्याचे काम करत असतात आणि वरून हे लोक आरोप कोणावर करतात तर हिंदुत्ववाद्यांवर! 

इतिहासामध्ये कोळसा आणि चंदन दोन्ही आहे पण हे लोक सतत कोळसाच उगाळण्याचं काम करतात कारण यांचं लक्ष एकच असतं ते म्हणजे समाजामध्ये सतत वर्ग-संघर्ष म्हणजे क्लास स्ट्रगल पेटवत राहणं; एका समाजाला, एका वर्गाला दुसऱ्या वर्गाच्या विरोधात सतत पेटवत राहणं आणि समाज संघर्षरत ठेवणं. बरं या सगळ्याच्या मुळाशी आहे कार्ल मार्क्सचा मार्क्सवाद! 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यामध्ये या समाजवाद्यांच्या, साम्यवाद्यांच्या, मार्क्सवाद्यांच्या या षड्यंत्राला वेळीच ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये मार्क्सचा अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये निषेध केलेला आहे. दुर्दैव म्हणजे या डाव्यांनी म्हणजे संविधानद्रोह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सोडलेलं नाही. हे लोक बाबासाहेबांच्या प्रकाशित साहित्यामध्ये सुद्धा छेडछाड करताहेत. उदाहरण द्यायचे तर बाबासाहेबांचे 'बुद्ध किंवा कार्ल मार्क्स' हे भाषण सुद्धा दुर्दैवाने आता 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' अशा नावाने छापले जात आहे, यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांशी छेडछाड कोणती? 

बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये सुद्धा त्यांच्या मूळ भाषणामधला अनेक भाग गाळून त्यांचे साहित्य पुन्हा प्रकाशित केलं जात आहे आणि ही गोष्ट मी १३ जानेवारी, २०२४ रोजी विरार येथे जागतिक मराठी साहित्य संमेलनात जाहीरपणे पुराव्यासहित बोललेलो आहे. 

त्यामुळे स्वतःला भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आणि भारतीय संविधानाचे पाईक म्हणणाऱ्या आपणा सर्वांनी आपल्या देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी, संविधानाचे रक्षण करण्यासाठी आपल्या संविधानाचे खरे शत्रू कोण आहेत हे ओळखून सावध झालं पाहिजे.

हिंदू समाज फोडण्यासाठी, हिंदू समाजामध्ये भांडण लावण्यासाठी, प्रत्येक जातीला हिंदू समाजापासून वेगळं करण्यासाठी गेली २०० वर्ष सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि भविष्यात सुद्धा ते सुरू राहणारंच आहेत आपण जर वेळी सावध नाही झालो तर! 

ज्या भारतीय संविधानाची सुरुवात 'We, the People of India' ने होते म्हणजेच आता आपली भारतीय हीच आपली ओळख आहे आणि तीच जपली पाहिजे. त्यामुळेच आजच्या संविधानदिनी आपण सावध होणं आवश्यक आहे! 

संविधानाचे प्रमुख शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व सदस्यांच्या चरणी विनम्र अभिवादन! 


भवदीय... 


#संविधानदिवस_भारतीयराज्यघटना_डॉआंबेडकर_भारतीयत्व_लोकशाही_समाजवादीसाम्यवादी_हिंदुत्ववादी

Tuesday, 12 November 2024

देवशयनी वा देवोत्थापिनी एकादशी?

 


आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी व आजच्या कार्तिक शुद्ध एकादशीला देवोत्थापिनी एकादशी म्हणतात हे सर्वांना ज्ञात आहे. मागील वर्षी मार्गशीर्ष मासाच्या निमित्ताने याविषयी काही चिंतन केलं होतं पण ते विस्ताराने पुढे करू असं सांगितलं होतं, ते आता


देवशयनी व देवोत्थापिनी म्हणजे काय???


अहो देव कधी झोपतो का? देव कधी उठतो का? या वचनांचे तात्पर्य नेमकं काय?


देवशयनी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून वर्षाऋतु आरंभ होण्याने हरि किंवा देव किंवा सूर्य-चंद्रादिंचे शयन होते म्हणजे त्यांचा प्रकाश, तेज हे क्षीण होत जाते, आपली इंद्रियेही या काळात बाह्य वातावरणामुळे क्षीण नि दुर्बल होतात, पचनक्रिया क्षीण होते, म्हणून देवशयनी ! चातुर्मासात पित्त स्वरुप अग्नीही थंडावलेला असल्याने शरीरशक्ती क्षीण असते.

थंडी तशी मागेच सुरु झाली असली तरी आजपासून वर्षा ऋतुही संपल्याने आता पचनक्रिया सुधारतेही, सूर्यचंद्रादि यद्यपि उन्हाळ्यासारखे तेजोमयी नसले तरी वर्षा नसल्याने ते उपयुक्त ठरतात म्हणून देवोत्थापिनी इतकाच साधा अर्थ आहे. आपली इंद्रियेही प्रबळ होतात.

शरीरस्थ विष्णु अर्थात सत्वगुण या काळात दुर्बल होतो व रजो-तमोगुणाची वृद्धी होते म्हणून यास देवशयनीचा काळही म्हणतात.


शेष, या योगनिद्रेचा आणखी योगिक अर्थ सांगायचा तर भगवान महर्षि पतंजलि कृत योगदर्शनामध्ये व त्यावरच्या योगवार्त्तिकामध्ये व मार्कंडेय पुराणामध्ये म्हटल्याप्रमाणे 


योगनिद्रां यदा विष्णुर्जगत्येकार्णवीकृते।

आस्तीर्य शेषमभजत्‌ कल्पान्ते भगवान्‌ प्रभुः इति।

मार्कंडेय पुराण - ८१।४९


कल्पाच्या अंती जेंव्हा सर्व जगत्‌ महासमुद्राकार (सदृश) होते, तेंव्हा भगवान्‌ विष्णु शेषनागाची शय्या करून योगनिद्रेस प्राप्त होतात.


म्हणजेच सृष्टीनिर्मितीचं व प्रलयाचे रहस्य सांगणारीही ही एकादशी आहे. यावर विस्ताराने कधीतरी!


आजपासून भीष्मपंचक व्रतही आरंभ होते


महाभारती शरशय्येवर पडल्यावर श्रीभीष्माचार्यांनी पांडवांना जो उपदेश केला, तो महाभारताच्या शांतिपर्वात आहे, गीताप्रेस गोरखपूरच्या प्रतीनुसार याचे ३६५ अध्याय आहेत व ते सर्व वाचनीय आहे. अलौकिक उपदेश आहे तो श्रीभीष्माचार्यांचा ! पाच दिवसांत सहज वाचून होईल ! गीताप्रेसचं समग्र महाभारत सर्चेबल पीडीएफ इथे आहे. 👇


https://archive.org/details/20221031_20221031_0328


शेष, आज जगाच्या दृष्टीने चातुर्मासाची व दीपावलीचीही अधिकृत सांगता आहे, पण आह्मां पंढरपूरकरांसाठी आमच्या श्रीनामदेवरायांनी म्हटल्याप्रमाणे


श्रीविठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळीं।


असल्याने नित्य दिवाळीच आहे.


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।


भवदीय,


Pakhandkhandinee.blogspot.com


#देवशयनी_देवोत्थापिनी_कार्तिकशुद्धएकादशी_प्रबोधिनी_योगनिद्रा_भगवानविष्णु_सनातनहिंदुधर्म

Tuesday, 27 August 2024

राम की कृष्ण की रामकृष्ण???

 


कालंच लिहिलं होते की राम आमच्या हिंदुतनमनाचा श्वास आहे तर कृष्ण हा प्रश्वास आहे. कारण दोघेही अत्यंत प्रिय आहेत, नाम दोघांचंही येतं हो. पण दोघांचीही काही वैशिष्ट्ये आहेत.


श्रीरामचंद्रांचं चरित्र वाचलं तर त्यांचे  चरित्र हे साधंसरळ आहे, त्यात फारसे चमत्कार नाहीत, अतिरंजित वर्णनं नाहीत, चक्रवर्ती सम्राट असलेल्या रघुवंशातला जन्म असला, राजाधिराज असले तरी त्यांच्या जीवनात ती दिव्यता, भव्यता, कल्पकता, रंजकता वाटत नाही जी योगेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात ठायी ठायी आहे. योगेश्वरांचे चरित्र तर केवळ अलौकिकतेने भरलंय. 


म्हणूनच 'रामादिवत् वर्तितव्यं न कृष्णादिवत्' म्हटलं जातं ते काहीअंशी खरंच आहे, अर्थात दोघेही समतुल्यंच आहेत. यद्यपि रामादिवत् वर्तितव्यं हेही वाटते तितके सोप्पे नाहीच. दोघांच्या योग्यतेत काडीचाही भेद नाही...


पण श्रीरामचंद्र हे असे आहेत की त्यांच्या चरणांवर डोकं ठेवावंसं वाटतं, त्यांना दुरून नमस्कार करावासा वाटतो, त्यांच्या विभूतिमत्वाने दिपून जावंसं वाटतं, पण एक सखा म्हणून, जिवलग म्हणून त्यांना मिठी नाही मारावीशी वाटत, कारण त्यांच्याविषयीचा आदर हा इतका टोकाचा असा आहे की तो नतमस्तकावासाच वाटतो...


पण भगवान श्रीकृष्णांचे काय???


त्यांच्या विश्वरुपदर्शन घडविणाऱ्या चरणांवर जीवनसर्वस्वंच वहावंसं वाटतं हे खरंच, त्यांच्या हिमालयापेक्षाही उत्तुंग व्यक्तित्वाने, विकीर्ण अशा दिव्य आभेने नेत्र दिपले तरी आवश्यकता पडल्यांस त्याच कृष्णाला सखा, प्रिय मित्र, बाळगोपाळ म्हणून त्याला मिठीच मारावीशी वाटते...


रामाला पहिल्याच हाकेत 'ए रामा' म्हणायचं साहस नाही हो होत...


पण कृष्णाला 'ए कृष्णा' पहिल्याच हाकेत म्हणता येतंच. किंबहुना म्हणावंसंच वाटतं.


कारण तो योगेश्वर व पूर्णपुरुषोत्तम असला तरीही तो फार जवळचा वाटतो.


पण श्रीराम आरंभी तितके जवळचे वाटत नाहीत म्हणजे दूरचे वाटतात असे नसून एकेरी हाक मारायसारखे वाटत नाहीत...


असे आरंभी होते ना???


हो सर्वांचं होते...


पण जसाजसा वेळ जातो, तसं हे अंतर राहतंच नाही ही गोष्ट वेगळी.


अगदी संक्षेपांत एका वाक्यात सांगितलं तर राम हा बाप आहे नि कृष्ण ही आई आहे...


आदर दोघांविषयी आहेच, दोघेही जन्मदातेच आहेत, पण ज्याप्रमाणे आपल्या जन्मदात्या पित्याविषयी आपल्या अंतःकरणात कितीही प्रेम, माया, ममत्व असलं तरी त्यांच्याविषयीच्या आदरयुक्त भावनेने काही मर्यादा येतात, पण आईचं तसं नसतं, आईला आपण ए आईच म्हणतो, बापाला काहीही झालं तरी 'ए बाबा' म्हणायचं साहस होत नाही, दोघेही जन्मदाते असले तरीही. हाँ आजकाल काही लोक बापाला 'ए बाबा' तसं म्हणताना दिसतात(लहान मुलांनी म्हणणं वेगळं), अर्थात बापाला एकेरी म्हणणं त्यात काही वाईटंय किंवा लगेचंच अनादर आहे अशातलाही भाग नाही, पण एक सर्वसामान्य नियम हाच की बापाला आपण अहोच म्हणतो, इतकंच...


तसंच राम नि कृष्णाचं आहे इतकंच ! म्हणूनंच राम बाप आहे तर कृष्ण आई आहे असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही...


अर्थात वर म्हटल्याप्रमाणे ही केवळ सुरुवात असते, कारण एकदा सद्गुरुनिर्दिष्ट नामसाधना सुरु झाली की आपलं आपल्याला कळायला लागतं व हे द्वैतही तुटत जातं...


पण श्रीहनुमंतांनी म्हटल्याप्रमाणे 


तु देव मी भक्त ऐसें करीं।


हा दास्यभाव सदोदित राहो हीच प्रार्थना अंतःकरणी असावी. बाकी ते द्वैत, अद्वैत, त्रैत, विशिष्टाद्वैत, विशुद्धाद्वैत वगैरे निरर्थक शब्दजंजाळात अडकून व्यर्थ काथ्याकुट करण्यापेक्षा, कारण ही विद्वानांची कामे आहेत नि आपण अत्यंत अजाण बालक आहोत, त्यामुळे श्रीसमर्थांनीच म्हटल्याप्रमाणे 


अखंड नाम स्मरावेें। परि दुसरीयासी कळों नेदावें।

निदिध्यास लागलिया राघवें। पाविजे तात्काळ।  

कांहीं साक्षात्कार जाहला। तो सांगों नयें दुसरियाला।

जरी आळकेपणें सांगितला, तरी पुन्हा होणार नाही। 

पुन्हा साक्षात्कार कैचा। जाला तरीं वरपांगाचा। 

हा मी आपुले जीवाचा। अनुभव सांगतो।

श्रीसमर्थ रामदास 


आयुष्यात एक वेळ येतेच ज्यावेळी मनुष्याला नामसाधनाच अंतिम वाटते, अन्य सायास नकोच वाटतात. त्या नामातंच अखंडपणे एकरसपणे राहणं हे एवढंच सार आहे...! 


जन्माष्टमीनिमित्त हे सहज सुचलेलं. यात कुठेही काही दर्शवायचा हेतु नाही.


श्रीराम जय राम जय जय राम

जय श्रीकृष्ण 


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com 


#श्रीकृष्णजन्माष्टमी_श्रीरामचंद्र_महाभारत_रामायण_नामस्मरण_नामोपासना_आईबाप

Wednesday, 1 May 2024

महाराष्ट्र शब्दाचा इतिहास....

 


आज महाराष्ट्र दिन ! 

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्री भाषेचा इतिहास नामक लेखात आह्मीं महाराष्ट्री अर्थात मराठी भाषेच्या संबंधाने काही मांडलेलं होते, तरीही पुनश्च महाराष्ट्र शब्दाच्या विस्ताराने!  

ब्रिटीशांनी मांडलेला विभाजनकारी आर्याक्रमण सिद्धांत ते गेल्यावरही पद्धतशीरपणे इतिहासलेखनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात अत्यंत नेटाने होताना दिसतोच, त्यात संस्कृत भाषेविषयीचा द्वेष जसा ठासून भरलेला आहे, तसा कथित मूळनिवाशीवादाचा व परकीय आर्य म्हणजे पूर्वी ब्राह्मण व आता गेल्या काही दशकांत क्षत्रिय व वैश्यही परकीय आर्य आहेत असे रेटण्याचा प्रयत्न सातत्याने भारत विखंडन शक्तींकडून सुरुच आहे, त्याचाच एक प्रयत्न म्हणजे महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती नि इतिहास !

संस्कृत प्राकृतपासून झाली हा विकृत सिद्धांत त्याचेच अपत्य यद्यपि या आरोपाचं सप्रमाण खंडन आह्मीं मागे संस्कृत-दिनाच्या त्रिदिनात्मक फेबु लाईव्ह व्याख्यानमालेत केलंच आहे.

महाराष्ट्र हा शब्द मूलतः संस्कृतंच आहे.

पण भारत विखंडन शक्तींकडून व त्यांच्या विखारवंताकडून महाराष्ट्र हा शब्द महार+राष्ट्र असा तयार झाल्याच्या हास्यास्पद उत्पत्ति दिल्या जातात, त्याचं कारण आमचे हिंदु महार बांधव हे इथले मूळनिवासी आहेत व संस्कृत बोलणारे आर्य बाहेरचे ही छुपी आर्याक्रमण थेअरी रेटण्याचा त्यांचा अजेंडा ! 

डॉ. जॉन विल्सनने त्याच्या मोल्सवर्थ शब्दकोशामध्ये सर्वप्रथम महार राष्ट्र ते महाराष्ट्र अशी अत्यंत खोटारडी व्युत्पत्ती दिली, त्यांनाच बुद्धी गहाण टाकलेल्या राजवाडे, भांडारकर, शं बा जोशी वगैरे भले उजव्या असलेल्यांनी सुद्धा महारठ्ठ पासून संस्कृत महाराष्ट्र झाले असे हास्यास्पद तर्क केले आहेत, राजाराम शास्त्री भागवतांनी तर महारथीपासून महाराष्ट्र अशी व्युत्पत्ति दिलीय जी भले संस्कृत व्युत्पन्न वरवरपाहता वाटत असली तरी चुकीची आहे. शं बा जोशींनी तर कानडी मरहट्ट - झाडीमंडळ पासून महाराष्ट्र झालाय असे लिहिलंय.

भल्या भल्या विद्वानांचे हे लिखाण त्यांच्या संस्कृत भाषेच्या सिद्धांताचं अज्ञान दर्शवितं. 

हे सर्व अभ्यासक का चुकले आहेत ते सिद्ध करण्यासाठीच हा लेख आहे.

आह्मीं मागे लिहिलंय की मूळात वैदिक संस्कृत भाषेचा विस्तार किंवा विकास न होता पुढे अपभ्रंश, ह्रास आदि मार्गांनी ती संकुचित होत जाते हा मूळचा वैदिक सिद्धांत आहे, पण डार्विनच्या विकासवादाने अंध झालेली मागील दोन शतकांतली मेकॉलेपुत्रांची व अभ्यासकांची पिढी, त्यातली काही अपवाद अशी भले आर्याक्रमण नाकारणारी व शुद्ध भारतीय विचारधारेची असली तरीही पाश्चात्य इंडॉलॉजिस्टच्या 'आधुनिक तुलनात्मक भाषाशास्त्राध्ययनाच्या' (कंपेरिटिव्ह फिलॉलॉजी) डार्विनप्रणीत सिद्धांतांना भूललेली असल्याने तिला संस्कृत-प्राकृत भाषेच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचं ज्ञानही नसणं हे स्वाभाविक आहे.

वस्तुतः मागेही लिहिलंय की आपल्या प्राचीन वैदिक नि तत्सम परवर्ती संस्कृत वाङ्मयामध्ये भाषेच्या उत्पत्तीचा, तिच्या विस्ताराचा, ह्रासाचा, संस्कृत-प्राकृत संबंधाचा इतिहास अत्यंत सुस्पष्टपणे नि साद्यंत मांडलेला असूनही आह्मांला तो वाचावासा वाटत नाही, कारण आमची बुद्धी डार्विनने ग्रासली असल्याने ! यासंबंधी कोणतं साहित्य अभ्यासायला हवं असा एक लेख मागे संक्षेपात लिहिलाच आहे, जिज्ञासूंनी तो फेबुवर शोधावा. त्यामुळे इतकं स्फटिकासमान स्वच्छ असं वाङ्मय आपल्याकडे असताना त्याच्याकडे केवळ ते 'ब्राह्मणी साहित्य' आहे अशी भ्रामक समजूत करत त्याची हेटाळणी करून आपला व जगाचा भ्रम वाढविणे हे हिताचं आहे का याचा ज्याचा त्याने विचार करावा!

महाराष्ट्र हा शब्द मूलतः संस्कृतंच आहे आणि पुढेच त्याचा अपभ्रंश महारट्ट आदि शब्दांमध्ये झालेला आहे हे संस्कृत साहित्याचा परामर्श घेतलं की सहज लक्ष्यीं येते, त्यासंबंधीचं आरंभी उल्लेख केलेल्या लेखातलं काही विवेचन !

वैदिक संस्कृतपासून उद्भवलेल्या किंवा विकार पावलेल्या प्राकृतभाषांमध्ये सर्वप्रथम जिचा आविष्कार झाला, ती म्हणजे शौरसेनी प्राकृत. ह्या शौरसेनी प्राकृतचे पुढे जे तीन प्रमुख भेद झाले, त्यामध्ये महाराष्ट्री ही प्रथम असून मागधी नि पैशाची ह्या दोन पश्चातच्या आहेत. प्राकृतभाषांच्या अध्ययनासाठी जो सर्वात प्रथम नि अधिकारी ग्रंथ असा जो उपरोक्त भरतमूनींचा नाट्यशास्त्र नावाने सुपरिचित आहे, ज्याचा कालावधी महाभारतकालाच्या पूर्वीचा आहे, त्या ग्रंथामध्ये १७।४८ येथे नाट्याचार्य श्रीभरतमूनींनी

सर्वास्वेव हि शुद्धासु जातिषु द्विजसत्तमाः।

शौरसेनीं समाश्रित्य भाषां काव्येषु योजयेत्।

असे म्हटलंय. विक्रम संवत पूर्व पांचव्या शतकांतले महान मीमांसक श्रीकुमारिल भट्टपाद हे त्यांच्या तंत्रवार्त्तिक ह्या अत्यंत प्रसिद्ध ग्रंथामध्ये

मागध-दाक्षिणात्य-तदपभ्रंशप्रायासासाधुशब्दनिबन्धिना।

असे म्हणतात. इथे मागधी व दाक्षिणात्यावरून महाराष्ट्री अथवा जैनीचा अभिप्राय श्रीकुमारिलभट्टांस आहे असे लक्ष्यीं येते. अपभ्रंशही आहे.

महाकवी श्रीदंडीचा काव्यादर्श मधील संदर्भ

ज्याचे पदलालित्य प्रसिद्ध आहे, असा श्रीदंडी त्याच्या काव्यादर्श ह्या ग्रंथामध्ये महाराष्ट्री अर्थात मराठीविषयी जे लिहितो  महत्वाचे आहे.

महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः।

सागरः सूक्तिरत्नानां सेतुबन्धादि यन्मयम्।

महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा हींस लोक प्रकृष्ट प्राकृत समजतात. ह्यामध्ये सूक्तीरुपी रत्नांचा सागर आहे ज्यात सेतुबंध नावाचे काव्य रचलं गेलंय.

ह्या सेतुबंधग्रंथाच्या टीकेमध्ये रामदास नामक लेखकाने 'महाराष्ट्रभाषायां' असा शब्दप्रयोग केला आहे. कर्पुरमञ्जिरी ह्या ग्रंथामध्येही शौरसेनी व महाराष्ट्री दोन्हींचा उल्लेख आहे.

प्राकृतभाषेच्या बव्हतांश सर्व वैय्याकरणींनी एकमुखाने महाराष्ट्रींस सर्वोत्तम प्राकृत मानलं आहे आणि मुख्यतः तिचेच नियम दिले आहेत. विस्ताराने ह्यावर पुढे लिहुच.

पुरुषोत्तम नावाच्या व्याकरणकाराने त्याच्या 'प्राकृतानुशासन' नावाच्या ग्रंथामध्ये ११।१ येथे शौरसेनी व महाराष्ट्री अर्थात मराठी दोन्ही एकंच आहेत असे प्रतिपादन केलं आहे. आपल्याला अभिमान हवा की संस्कृतला सर्वांत जवळ भाषा कोणती असेल तर ती मराठी आहे. एक मराठीभाषिक म्हणून, महाराष्ट्रीय म्हणून आपल्या मातृभाषेच्या निर्मितीसंबंधी काहीसं चिंतन आवश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच.

महाराष्ट्र शब्दाचे शिलालेखीय संदर्भ

महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरणगावच्या स्तंभ लेखांमध्ये सापडलेला आहे, त्यामध्ये इसवी सन ३६५ मध्ये श्रीधरवर्म्याचा आरक्षित व सेनापती सत्यनाग याने स्वतःला 'महाराष्ट्रीय' असे संबोधले आहे.

याबरोबरच एक उल्लेख वराहमिहीराच्या बृहत्संहितेमध्ये आढळतो, या ग्रंथांमध्ये 'भाग्ये रसविक्रयिणः पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्राः।' असा आहे.

वराहमिहीराचा काळ काही विद्वान ६वं शतक समजतात पण तो त्याआधीचा आहे. तो इसवी सन पूर्व १लं शतक न्यूनतम आहे.

ऐहोळचा शिलालेख (इसवी सन पूर्व २७)

रविकीर्तीच्या या शिलालेखामध्ये सत्याश्रय पुलकेशीच्या संबंधाने 'त्रि-महाराष्ट्रिका' असे शब्द आहेत. हा शिलालेख न्यूनतम इसवी सन पूर्व २७ असा आहे.

सांगायचं तात्पर्य इतकंच की महाराष्ट्र शब्द मूळ संस्कृतंच असून तो प्राकृतपासून झालेला नाही...!

आज महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!


भवदीय,

पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com

#महाराष्ट्र_शब्दाचा_इतिहास_अर्थ_व्युत्पत्ती_संस्कृत_प्राकृत