Thursday, 11 August 2022

संस्कृत दिवस संस्कृतसप्ताह - लेखांक प्रथम

 


आज‌ श्रावण पौर्णिमा, नारळीपौर्णिमा, राखीपौर्णिमा अर्थात संस्कृतदिवस...! परवा म्हटल्याप्रमाणे आजपासून संस्कृत भाषेंवर लेखन आरंभ....

*भाषा कशाला म्हणायचं???*

*स्फुटवाक्करणोपात्तो भावाभिव्यक्तिसाधक:|*
*संकेतितो ध्वनिव्रात: सा भाषेत्युच्यतेबुधै:|*
पद्मश्री डॉ. कपिलदेव द्विवेदी

स्फुट वाणीने बनलेली, भाव अभिव्यक्तीचे साधन असलेली, वैविध्यपूर्ण संकेत नि ध्वनी असलेली अशी जी अभिव्यक्ती, तिला विद्वान लोक भाषा म्हणतात.

नामानि सर्वाण्याख्यातजानीति शाकटायनो नैरुक्तसमयश्च| निरुक्त १|१३

नाम च धातुजमाह निरुक्ते व्याकरणे | व्याकरणमहाभाष्य ३|३|१

संस्कृत भाषेमध्ये कुठलाही शब्द हा आख्यातज म्हणजे धातुपांसून निष्पन्न आहे असे निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्यांचं नि श्रीशाकटाचार्यांचे मन्तव्य आहे. उगाचंच रला र आणि टला ट असा काहीही प्रत्यय‌ किंवा अक्षर लावून संस्कृत भाषेमध्ये कोणताही अशास्त्रीय शब्द तयार होतंच नाही. आह्मीं आजपर्यंत कैकवेळा लिहिलं आहे व बोललोही आहोत की संस्कृत भाषेमधला प्रत्येक शब्द हा धातुज असतो. म्हणजेच‌ विशिष्ट धातुंपासून तो प्रक्रिया होऊन निर्माण होतो. म्हणजेच या सर्व शब्दांची मूल प्रकृती म्हणजे धातु आहेत. आणि हे मत आमचं स्वत:चे नसून वर दिलेलं महर्षि श्रीयास्काचार्य नि भगवान महर्षि पतंजलीसदृश दिग्गजांचं आहे. भगवान महर्षि श्रीपाणिनींनी त्याच धातुपाठाचे‌ संकलन केलं असून त्यावर त्यांची अष्टाध्यायी सर्वांना परिचित आहेच. त्यांनी या‌ धातुंचे एकुण ११ गण केलेलं असून त्यावर भगवान महर्षि श्रीपतंजलींचे व्याकरण महाभाष्यही प्रसिद्ध आहे. त्यातलंच प्रमाण वर दिलं आहे.

याच धातुपाठामध्ये भ्वादि गण नावाचा एक गण आहे ज्यामध्ये भाषा हा शब्द 'भाष् व्यक्तायां वाचि|' (१|४०७) ह्या धातुपासून निष्पन्न होतो ज्याचा अर्थ आहे 'भाष्यते व्यक्तवागरुपेण अभिव्यंजते इति भाषा| '. व्यकीच्या वाणीरुपाने अभिव्यक्त होणारी, भाषित होणारी ती भाषा...! म्हणजेच भाषा शब्द हा मूळ धातुज असून त्याचा अर्थ काय होतो हे आपण पाहिले.

आता भाषा कशी निर्माण होते असा प्रश्न पडतो. अनेकांनी अनेक प्रकारे ह्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. पण बव्हतांश जणांनी डार्विनच्या विकासवादावर आधारित‌ मते मांडलेली असल्यामुळे ती मते अत्यंत अशास्त्रीय आहेत. नि म्हणूनंच अग्राह्य आहेत. त्यांच्या मते माणुस हा सर्वप्रथम वनामध्ये जनावरांप्रमाणे अत्यंत अप्रगत अवस्थेत राहत होता.‌ त्याला बोलायचं कसं हेदेखील माहिती नव्हतं म्हणे. मग तो हळुहळु आजुबाजुच्या पशुपक्ष्यांची वगैरे भाषा पाहून, आवाज ऐकून स्वत:चे‌ शब्द, हावभाव, संकेत वगैरे विकसित करु लागला व हळुहळु त्याला बोलायला यायला लागलं म्हणे व त्याने त्या बोलीभाषेतून भाषा‌ विकसित केल्या म्हणे. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी भाषेच्या उत्पत्तीसंबंधी इतके हास्यास्पद नि तर्कहीन सिद्धांत मांडून ठेवले आहेत‌ की बास. म्हणूनंच भाषाशास्त्रासंबंधी नि तिच्या विज्ञानासंबंधी आपल्या प्राचीन शास्त्रकारांनी जी मते मांडली आहेत ती अभ्यासणं महत्वाचं आहे. भाषेच्या अध्ययनाच्या दृष्टीने वैदिक नि तत्सम सर्व प्राचीन संस्कृत वाङ्मयाच्या आलोडनाची जितकी आवश्यकता आहे, तितकी अन्य कशाचीच नाही. आणि तीही शुद्ध भारतीय वैदिक दृष्टिकोनातून. स्फोटायन=कक्षीवान् (द्वापराच्या पूर्वीचा काळ), औपमन्यव, औदुंबरायण(विसं ३१००पूर्व) महर्षि यास्क (विसं ३१००पूर्व), महर्षि वेदव्यास (विसं ३०४४पूर्व), व्याडि(२९०० विसंपूर्व), पतंजलि (विसं१५००पूर्व), भर्तृहरि (विसं ८००पूर्व) ह्या सर्वांनीच भाषेच्या उत्पत्तीचा इतिहास अगदी अनविच्छिन्न स्वरुपामध्ये शब्दबद्ध ठेवलेला आहेच मूळातंच, जो एकमात्र सूक्ष्म तर्क-युक्त, सत्य आणि विज्ञानसिद्ध सिद्धांतारुढ आहे. यात विक्रम संवतापासून तितकी वर्षे पूर्व असा अर्थ अभिप्रेत आहे. आता विक्रम संवत कोणतं ते वाचकांना सांगायची आवश्यकता नसली तरी सांगतो. इसवी सन पूर्व ५६ ला जो विक्रमादित्य राजा सिंहासनारुढ झाला, त्याने त्याचे संवत सुरु केलं. आजचं संवत २०७८ सुरु आहे. आपण हिंदु लोक नित्याच्या‌ संकल्पामध्ये हे गातो.

आता हा इतिहास कळायचा कसा?‌ वर नावे तर सांगितली पण साहित्य कोणतं अभ्यासायचं? त्यासंबंधी निम्मलिखित विस्तार

१. समस्त शिक्षाग्रंथ(पाणिनीय शिक्षा, याज्ञवल्क्य शिक्षा वगैरे) आणि त्यांची व्याख्या किंवा त्यावरील भाष्ये
२. समस्त संस्कृत‌व्याकरणशास्त्र तथा त्यावरील व्याख्या
३. मीमांसा ग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
४. निरुक्तग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
५. वैदिक शाखा, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद
६. प्रातिशाख्य आणि त्यावरील व्याख्या
७. भरत नाट्यशास्त्र नि त्यावरील व्याख्या
८. प्राकृत-पालि-अपभ्रंश व्याकरणावरील ग्रंथ नि त्यावरील व्याख्या

संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी, भाषा विज्ञान अभ्यासण्यासाठी इतकं सर्व अभ्यासणं आवश्यक आहे. आमचं दुर्दैव हे आहे की इतकं सर्व साहित्य आमच्याकडे असतानाही आह्मांस‌ ते अभ्यासु वाटत‌ नाही. आमच्या संस्कृत दिनाच्या तीन व्याख्यानांत संक्षेपाने हा विषय आह्मीं मांडला होता मागील वर्षी. भारतीय इतिहासाकडे विशुद्ध भारतीय दृष्टिकोनातून पाहणं आह्मांला जोपर्यंत जमणार नाही, तोपर्यंत आमच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबणार नाहीच.

आता संस्कृत भाषेचं नामकरण...

महत्वाचा प्रश्न पडतो की संस्कृत भाषेला संस्कृत हेच नाव का दिलं गेलं? अनेकांचा असा भ्रम आहे की संस्कृत ही संस्कार होऊन झालेली भाषा आहे म्हणून तिला संस्कृत म्हणतात. म्हणजे वर विकासवादाचे‌ जे मत मांडलं त्यानुसार आधीच्या अनेक बोलीभाषा किंवा अशुद्ध भाषांवर संस्कार होऊन परिशुद्ध झालेली भाषा म्हणजे संस्कृत होय असा अत्यंत हास्यास्पद नि भ्रममूलक‌‌ सिद्धांत बव्हतांश भाषाविद् मांडताना दिसतात. अगदी आरंभीच‌ सांगायचं तर संस्कृत ही‌ संस्कार होऊन निर्माण झालेली भाषा मूळीच नाही. मग तिला संस्कृत‌ हे नाव का दिलं गेलं? त्याचे उत्तर आहे

संस्कृतं नाव दैवी वागन्वाख्याता महर्षिभि:|
आचार्य दंडी - काव्यादर्श

महाकवी दंडी म्हणतात‌ की संस्कृत‌नामक दैवी वाणी जींवर महर्षींनी अनुव्याख्यान केलं. म्हणजे काय? तर इथे दैवी वाणी म्हणजे प्रत्यक्ष‌ वेद जिच्यापासून आपल्या ऋषि-महर्षींनी मानुषी वाणी निर्माण केली. म्हणूनंच तिला संस्कृत‌ हे नाव दिलं गेलं. वेद स्वत: सांगतो की

दे॒वीं वाच॑मजनयन्त दे॒वास्तां वि॒श्वरू॑पाः प॒शवो॑ वदन्ति|
ऋग्वेद ८|१००|११

अर्थ - देव ज्या‌ दिव्य वाणींस प्रकट करतात, तीच साधारण मनुष्य‌ लोक बोलतात...

इथे पशवो वदन्ति असा शब्द आला आहे.‌ पशवो म्हणजे पशु असा अर्थ नसून मनुष्य प्रजा असा आहे. कारण वैदिक साहित्यामध्ये अनेकठिकाणी पशु शब्द हा मनुष्यासाठी वापरला आहे.

अगदी महर्षि वेदव्यासांनीही श्रीमन्महाभारतामध्ये

*अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा|*
*आदौ वेदमयी दिव्या‌ यत: सर्वा: प्रवृत्तय:|*
शान्तिपर्व २३२|२४ - चित्रशाळा प्रेस संस्करण, पुणे

अनादि अशी जी नित्य अशी वाणी जी स्वयंभु म्हणजे ईश्वराने प्रवृत्त केली, ती आद्य अशी वेदवाणी जिच्यापासून सर्व काही प्रकट झाले आहे. मनुस्मृतीमध्ये हेच सांगताना

सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्|
वेदशब्देभ्य: एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे|

वेदांतल्या शब्दांवरूनंच नंतरच्या काळात सर्व वस्तुंची व्यक्तींची ठिकाणांची संस्थांची नावे दिली गेली कारण वेद हेच सर्वात आरंभीचे ज्ञान आहे. पृथ्वीला पृथ्वी हे नाव वेदांतल्या शब्दांवरूनंच दिलं गेलं. मानवाला मनुर्वभ ह्या वेदमंत्रावरूनंच मानव हे नाव दिलं गेलं इत्यादि. ज्यांना वेदांचा दु:स्वास आहें असात्म्य(एलर्जी) आहे, स्वत:ला मानव म्हणणं बंद करावं.

सर्व प्राचीन ऋषि-महर्षि, शास्त्रकार भाष्यकार सर्वांची एकमुखाने संमती आहे की वेद हे अनादि अपौरुषेय‌ तथा नित्य आहेत.‌ मानवसृष्ट्यारंभी ईश्वराने चार ऋषींच्या अंत:करणांत दिलेलं ज्ञान म्हणजे वेद...! जर वेद सर्वात पहिलं ज्ञान असेल तर स्वाभाविक आहे वेद ज्या भाषेत‌ असतील तीच मानवाची आद्यभाषा असणार. पण विकासवादी हे मानत नाहीत कारण त्यांना हे सत्य स्वीकारायचं साहस‌ नाही. आणि त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीयही हे मान्य करत नाहीत. कारण बव्हतांशांना असं वाटतं की हे मान्य केलं तर आपलं हसु होईल. म्हणजे 

तुज आहे तुजपाशी, परि तु जागा भूललासीं|

हीच आपली अवस्था आहे. विकासवाद का खोटा आहे हे हळुहळु आह्मीं दाखवुच. अस्तु प्रथम लेखांकात इतकंच...!

पुढील लेखासाठी क्रमश:

#संस्कृतभाषा_इतिहास_निर्मिती_वेद_भाषाविज्ञान_विकासवाद_डार्विन_व्याकरणशास्त्र


No comments:

Post a Comment