आधी जे मित्र कमावलेत ते टिकवायला शिका...
एकेकाळी अत्यंत प्रगाढ मैत्रीत असलेले लोक पुढे जाऊन एकमेकांना अंतरतात. मला खरंतर काहीवेळा हसु येतं ह्या लोकांचं आणि काहीवेळा कीवही येते व काहीवेळा आश्चर्यही वाटतं. अर्थात ह्याला तशी कारणं असुही शकतात, नाही असं नाही. पण बव्हतांश वेळाच अगदी क्षुल्लक कारणांवरून लोकांची मैत्री तुटते. केवळ संवादाचा अभाव, अहंकार नि तज्जन्य परस्परांविषयीची अंतराची भावना हीच मैत्री तुटायला कारणीभूत असते. यात संवादाचा अभाव हे मुख्य कारण असतं...
एकमेकांच्या एखाद्या किंवा अनेक गोष्टी न पटायला सुरुवात झाली की संवाद तुटतो व तिथून मैत्री संपत जाते. मूळात एखाद्याच्या सर्वच गोष्टी आपल्याला पटायलाच हव्यात हा अट्टाहास तरी का? स्वभाववैचित्र्य असतंच तसं आचारवैचित्र्यही मान्य करावंच लागेल. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना:...! अगदी एकमेकांवर अत्यंत प्रेम असलेले नवरा-बायकोही एकमेकांच्या सर्वच गोष्टी पटणाऱ्या स्वभावाच्या असतात असेही नव्हे पण तरीही त्यांचा संसार होतोच ना? समजून घेणे हा प्रकार असतोच ना?
मग मैत्रीत हे का होत नाही? एखाद्याची एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर त्याला तसं सांगावं पण ते सांगतानाही कळकळ असावी, अहंकार नसावा. भाषा सौम्य असावी व त्यातून त्याला आपली चुक उमजेल हा हेतु असावा. यात भाषा फार महत्वाचं काम करते. पण तरीही काहीवेळा समोरचा खरंच चुकत असेल व त्याच्या भल्याकरिता आपण त्याला तो किंवा ती चुकतोय किंवा चुकतेय हे त्याला प्रामाणिकपणे सांगितलं तरी तो ऐकत नाही. मग ह्यातून दुरावा वाढतो व मैत्रीत अंतर येते.
मग हे थांबवायचं तरी कसं?
काहीवेळा खरंच पर्याय नसतोच कारण समोरचा ऐकूनंच घेत नसेल तर विषय संपतोच. अशावेळी स्वत: जमत नसेल तरी दुसऱ्याकडून सांगून पहावं पण तरीही जमत नसेल तर मग विषय सोडून द्यावा. पण जर काही उपाय असेल, आशा असेल तर प्रयत्न करून पहावा. आणि ते संवादाच्या अभावाने जमणार नाही. अहंकाराने तर नाहीच. मी का बोलु हा अहंकार मैत्रीत चालत नसतो. तो आला की मैत्री तुटते. बोलायला हवं, स्पष्ट बोलायला हवं पण भाषा मृदु हवी. भले आपली चूक नसली तरी काहीवेळा माघार घ्यायला हवी. तरंच मैत्री टिकु शकते...!
तुट वाद संवाद तो हितकारीं|
समर्थ उगाचंच म्हणत नाहीत..
अहंकार हा सर्व गोष्टींचा मारक आहे. शहाणा माणुस त्याला दूरंच ठेवतो.
ह्यात आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे नि:स्वार्थता...! मैत्रीत स्वार्थ आला की ती फार काळ टिकत नाही. स्वार्थ संपला की ती संपते. मूळात अशा मैत्रीस मैत्री म्हणावं का असा प्रश्न येतो. भले काहीवेळा स्वार्थाने केलेली मैत्रीही टिकत असेलही. पण ते फार अपवादात्मक...! पण भले स्वार्थाने एकत्र आलाही असाल तरीही स्वार्थ संपल्यावर पुढे नि:स्वार्थी मैत्री टिकायला हवी. तरंच त्याला अर्थ आहे...
हेतु कोणताही असो, मैत्री टिकवता आली पाहिजे. त्यासाठी मैत्रीची भावना शुद्ध हवी....!
महाभारतांत वनपर्वामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनांस म्हणतात
ममैव त्वं तवैवाहं ये मदीयास्तवैव ते|
तु माझा आहेस नि मी तुझा आहे.. जे माझं आहे ते तुझं आहे व तुझं ते माझं आहे...
भवदीय...
#मैत्रीदिन_मित्र_सखा_संवाद_भगवान_श्रीकृष्ण_सुदामा_अर्जुन_महाभारत
No comments:
Post a Comment