*संप्रदायपूर्वक अध्ययन म्हणजे गुरुमुखातून अध्ययन का महत्वाचं आहे???*
कायंय की शास्त्रवचनांवर, ऋषीमुनींच्या वचनांवर आप्त म्हणून दृढ श्रद्धा ठेवण्यासाठी आपल्याही अंत:करणाची तितकी साधनेने सिद्धता व्हावी लागते. अहंकार तसाही आपल्याला हे करु देतंच नाही. आमच्या वेदोक्त धर्माविषयी आमच्या प्राचीन ऋषिमुनींनी जे काही सिद्धांत मांडून ठेवलेले आहेत ते आधी अभ्यासण्याची नि ते समजून-उमजून घेऊन प्रसंगी अत्यंत डोळसपणे नि तर्कशुद्धपणे त्यांची चिकीत्साही करून योग्यवेळी आपल्या साधनेने आपल्याला त्यांची यथार्थता पटायला लागते ही गोष्ट सहजसाध्य नसते. ती योग्यता यायला वेळंच लागतो. मूळात आपल्या शास्त्रामध्ये कुठल्याही गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवायला सांगितलेलाच नाहीये. अरे जिथे गुरुलाही गुरु मानण्यापूर्वी तपासून घ्यायला सांगितलंय व गुरु केल्यावरही त्याच्याकडून आपण सत्शास्त्रांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक ब्रह्मचर्य्यपूर्वक अध्ययन केल्यापश्चात् समजा तो गुरुच शास्त्रविरुद्ध आचरण करु लागला तर त्यालाही त्याची चूक निदर्शनांस आणून देण्याची आज्ञा जिथे सांगितली आहे (उन्मार्गगामिनं श्रेष्ठं अपि वेदान्त पारगं| स्कन्दपुराण) अशा आपल्या प्राणप्रिय वैदिक हिंदु धर्मामध्ये शब्दप्रामाण्यवादांस अतिरेक आहे व बुद्धिप्रामाण्यवादांस नाकारलं आहे असे समजणं हे किती आततायीपणाचे आहे हे सूज्ञाच्या लक्ष्यीं आल्याशिवाय राहणार नाही.
वेद कधी प्रकट झाले, वेदांचा काळ कोणता, वेदांची लिपी कोणती, वेदांची भाषा कोणती, आपला इतिहास नेमका कधीपासूनचा या सर्व प्रश्नांची उत्तरे जिज्ञासुला जेंव्हा पडायला लागतात, तेंव्हा तो आपल्या आपल्या परीने ह्याचे समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. भारतीय इतिहासाचीच नव्हे तर विश्व इतिहासाची चिकीत्सा करताना, जिज्ञासा शमविताना मनुष्याला वेदांकडे वळावेच लागते. हे वेद समजून घ्यायचे असतील तर वर म्हटल्याप्रमाणे संप्रदायपूर्वक म्हणजे गुरुमुखातून अध्ययन आवश्यक आहे. ते केल्याशिवाय वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान होणं असंभव आहे. आता हे असंच का ह्याचे साधं उत्तर हे आहे की ज्या ज्या शास्त्राचे किंवा ज्ञानशाखेचं आपण अध्ययन करतो, त्यात्या ज्ञानशाखेची जी अभ्यासपद्धती आहे तिचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणूनंच भगवान महर्षि पतंजलींनी
*ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदोऽध्येयो ज्ञेयश्च इति। पातंजल महाभाष्य - पस्पशाह्निकम्*
ब्रह्म म्हणजे वेद जाणण्याची इच्छा करणाऱ्याने असे का असे न विचारता म्हणजेच निष्कारण सहा वेदांगांसहित वेदाध्ययन करावं.
ही सहा वेदांगे कोणती ह्यांवर आह्मीं आमच्या दोन वर्षांपूर्वीच्या वेद परिचय नामक फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत परिचयात्मक विस्तारपूर्वक विवेचन केलं आहे. तिथे पहावे. छंद, कल्प, शिक्षा, निरुक्त, ज्योतिष आणि व्याकरण..!
हे एवढं कोण करणार???
करत नाही म्हणूनंच आपली शास्त्रवचनांवर श्रद्धा बसत नाही. आपल्या पूर्वजांची वचने आपल्याला थोतांड वाटायला लागतात. ह्याबाबतीतलं मार्गदर्शक एक द्रष्टव्य उदाहरण म्हणजे आदरणीय लोकमान्यांचे..!
*लोकमान्यांनी १८९४ मध्ये ओरायन लिहून व पुढे १८९९ मध्ये आर्क्टिक होम लिहून वेदांचा काळ काही सहस्त्रवर्षे मागे नेण्याचा त्यांच्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांचा हेतु शुद्ध होता पण पद्धत का योग्य नव्हती ते पाहुयांत. खरंतर आह्मीं ह्यावर मागे विस्तारपूर्वक हिंदीतून लिहिलं आहे. असो. पुढे ते १९०० मध्ये वाराणसीला परमपूज्य श्रीदक्षिणामूर्ती स्वामी नामक एका सत्पुरुषाला भेटायला गेले, तेंव्हा वेदकालनिर्णय व एकुणंच वैदिक सिद्धांताविषयी त्यांचा स्वामीजींशी संवाद म्हणा शास्त्रार्थ म्हणा झाला. त्यात स्वामींना लोकमान्यांनी वेदांचा काल, त्याची भाषा, त्याची लिपी, त्याचा शब्दनिर्णय, उत्पत्ती वगैरे ज्या काही शंका विचारल्या, त्या सर्वांचे समाधान स्वामींनी करूनही शेवटी लोकमान्य म्हणतें झाले की*
लोकमान्य - *आपण म्हणता त्याप्रमाणें वेदांचें अनादि अपौरुषेयत्व बुद्धींस पटत नाहीं*
स्वामीजी - *संप्रदायपूर्वक शास्त्राध्ययन नाही, हेंच त्याचें कारण*
समग्र लोकमान्य टिळक - खंड ६वा
हा संवाद काही संक्षेपांत आह्मीं हिंदीमध्ये अनुवादित केला होता. संपूर्ण मूळ मराठी संवाद पुन्हा इथे जोडला आहे...
सांगण्याचं तात्पर्य काय? लोकमान्यांची निंदा करणं? मूळीच नाही.
मग???
राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्यांसारख्या लोकोत्तर पुरुषाला जर स्वामी असा उपदेश करत असतील तर आपल्यासारख्या अज्ञानी मनुष्याने काय चिंता वहावी? आपण वेदांकडे वळण्यापूर्वी काय करावं?? वेद समजून घेण्यासाठी काय करावं???
गुरुमुखातून अर्थात संप्रदायपूर्वक सहा वेदांगांसहित वेदाध्ययन करावं. पण हे करण्यासाठी न्यूनतम बारा पंधरा वर्षांचा तरी कालावधी लागेल. खरंतर जास्तीच लागेल पण त्यातही न्यूनतम धरलाय. पण मग हे आज संभवंच नसेल तर काय करावं? तर ज्यांनी हे केलंय त्यांनी वेदांविषयी काय लिहून ठेवलंय ते वाचावं. आता असे आप्त नेमके कोण आहेत, त्यांची व्याख्या काय हे पुढे पाहुयांत...!
क्रमश:...
लवकरंच...!
भवदीय...
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#वेदकालनिर्णय_वेदाध्ययन_भाषा_लिपी_उत्पत्ती_संस्कृत_लोकमान्यटिळक






No comments:
Post a Comment