वेत्ति पारं सरस्वत्या लतानाम गानसरस्वती।
लतानाम गानसरस्वत्याः पारं वेत्ति सरस्वती।
श्रीमधुसूदन सरस्वतींची क्षमायाचना करून आज म्हणावंसं वाटतं की
श्रीसरस्वतीची थोरवी गानसरस्वती लतादीदींच जाणतात व गानसरस्वती लतादीदींची थोरवी प्रत्यक्ष श्रीसरस्वतीच जाणते....
दीपावलीच्या भल्या पहाटे उठावं व अभ्यंगस्नान उरकून सूर्योदयापर्यंत गायत्री करत संध्याही उरकून घ्यावी व प्रा. राम शेवाळकरांचं 'ज्ञानदेव म्हणे' ऐकायला घ्यावं. 'ॐ नमोजी आद्याच्या' आरंभीचे त्यांचे चिंतन श्रवण करून गानसरस्वतीच्या (...इथे माझी लेखणी खरी थांबली होती कारण पुढचे शब्द काहीच सुचत नव्हते) अधरामृतातून कैवल्यचक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांच्या भावार्थदीपिकेच्या त्या अद्वितीय मंगलाचरणाचे ते तीन शब्द ऐकण्यासाठी जणु कर्णांच्या ठायीं सर्व शक्ती एकवटाव्यात. परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीसाठी व्याकुळ झालेल्या जीवात्म्याची कोकिळेच्या आर्तस्वरांनी आरंभ झालेली ती अभंगावली, त्या सावळ्यासुंदर कासेपीतांबरु श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी अभिभावित होत, ह्रदयरुपी भुंग्याने प्रकट केलेल्या गुंजारवाने ऋणुझणु करत विश्वाचें आर्त मनी प्रकटत, तो सोनियाचा दिवस जणु पाहत, वृत्तीची निवृत्ती आपणां सकट होत अवघेचिं वैकुंठ जणु चतुर्भूज होत नि अंती सौभाग्यसुंदरु अशा त्या बापरखुमादेवीवरुच्या साक्षात्काराने त्या आत्मतत्वाचा तो मोगरा फुलंत फुलंत अंती त्या विश्वेश्वरांस तोषविण्यासाठी त्या श्रीमाऊलींने ते पसायदान मागत तो वाग्यज्ञ सुसंपन्न करींत त्या विश्वस्वधर्मसूर्याचे दर्शन घडवावं....
शब्दसृष्टीचा जणु ईश्वरंच अशा त्या श्रीज्ञानराज माऊलीने आत्मानुभूतीने शब्दब्रह्मामध्ये संबद्ध केलेली ही अभंगरचना ज्या शब्दांतही न मांडता येणाऱ्या दिव्यानुभूतीचा संस्पर्श श्रोत्यांस घडविते, ती ज्या गानसरस्वतीने गायिलीं तिचं वर्णन म्या पामराने काय करावं??? आजपासून ती प्रत्यक्ष त्या आळन्दीवल्लभ श्रीज्ञानेशासंच तो सर्व अभंगनाद ऐकवंत नसेल कशावरून???
शिवकल्याण राजा...
तीनशे वर्षे! तीनशे वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधःकारांत चाचपडंत होता....
मला सव्वाशे वर्षांचे आयुष्य हवंय, शिवचरित्र ब्रह्मांडापल्याड नेण्यासाठी म्हणत आयुष्याची १०० वर्षे शिवचरित्राचा पोत नाचवत जो गोंधळी नुकताच शिवलोकांस आपल्या आराध्य दैवतांस कायमचं भेटण्यासाठी कैलासगमन करता झाला, त्यांच्या उपरोक्त धीरगंभीर निवेदनाने श्रोत्यांच्या कर्णीं जणु सर्व प्राण एकवटावेंत नि हिंदुपदपातशाह हिंदवीस्वराज्यसंस्थापक श्रीशिवप्रभुंच्या चरित्राचे जणु सारंच असे 'प्राणीमात्र जालें दुःखी पासून ते शिवकल्याण राजा'पर्यंत असलेलं ११ गीतांचं ते ध्वनिमुद्रित शिवभारत ज्या गानसम्राज्ञीच्या स्वरांनी आरंभ होतं नि अंतही पावतं, ते ऐकत असताना तिच्या मुखातून ऐकलेल्या अन्य सहस्त्रावधी गीतांचा विसरही आपणांस पडल्याशिवाय राहणारही नाही इतके माधुर्य तींमध्ये आहे...ह्यात काही अत्युक्ती वाटावीं असे आह्मांस तरी वाटत नाही...!
जयोस्तुते...
स्वातंत्र्याच्या सूर्याची ती आरती ज्या महाकवी अशा प्रत्यक्ष कविकुलगुरुचा वारसा चालविणाऱ्या क्रांतिसूर्याच्या लेखणीतून उदयांस आली, ते स्वतंत्रतेचे महन्मंगल स्तोत्र जिच्या मुखांतून स्वरबद्ध झालं, त्या गानकोकिळेचा तो स्वर आज स्वर्गी त्या हिंदुराष्ट्रपतींसही तृप्त करत नसेल कशावरून???
ने मजसीं नें...
मातृभूमीच्या विरहाने ओथंबलेले ते सागरसूक्त ज्या मातृभक्त विनायकाच्या शब्दप्रतिभेचा सर्वोत्तम आविष्कार ठरलं, ती मातृवंदना ज्या दीदींनी भावंडासमवेत गायिलीं, ती दीदी आज नसली तरी त्या गीताने ती अमर आहेच...
भेटीं लागें जीवा लागलीसें आस...
जिच्या अधरद्वयांतून लक्षावधी सूर गेली ९ दशके प्रकटली आहेत, तिने गायिलेल्या असंख्य गीतांचे चिंतन करण्यासाठी सरस्वतीच्या लेखणीतली शाईही संपावी, अशा त्या स्वरसम्राज्ञीने ही आयुष्यभर केलेली स्वरसाधनाही त्या अनंताच्या भेटीसाठीच असावी. *संतश्रेष्ठ जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या आत्मानंदपरिप्लुत अभंगसमुद्रांतली ही त्यांच्या उपास्यदेवतेच्या प्राप्तीसाठी असलेली विरहोत्कटतेची परिसीमा गाठणारी रचना ऐकताना ती गाणारीही जो जीव ओतून ती गातें, ते श्रवण करून आज तिची तीं आर्तता त्या श्रीविठ्ठलापर्यंत पोहोचलीं व त्याने तिला त्याच्या..*
सुंदर ते ध्यान उभे विटेंवरी...
अशा सगुण रुपाचे दर्शन तेच तिचें सर्वसुख बनवलं.....
ती लता आज मूक्त जाहलीं....
तिच्या असंख्य श्रवणीय नि तितक्यांच चिंतनीय गीतांमधल्या आह्मांस आमच्या व्यक्तिगत जीवानमध्ये सर्वांत जास्त भावलेल्या स्वराविष्कारांविषयीची आमची ही शब्दरुप भावांजली...
भवदीय
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#लतामंगेशकर_श्रीविठ्ठल_श्रीज्ञानेश्वरमाऊली_श्रीतुकोबाराय_छत्रपतिशिवाजीमहाराज_सावरकर_बाबासाहेबपुरंदरे
अतीव सुन्दरं लेखनम्
ReplyDelete