महापुरुषांची पत्नी होणं सोप्पं काम नसतं....
त्यातही बाबासाहेबांसारख्या अत्यंत वादळी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिमत्वाशी संसार करणं हे तर त्याहून कठीण...
अत्यंत धर्मनिष्ठ व तितकीच पतिव्रता स्त्री...
आपला नवरा काय आहे, तो कोणत्या उंचीचा आहे हे तींस ज्या प्रकारे ज्ञात होते ते कळून घ्यायचे असेल तर एका घटनेकडे पहावं लागेल...
१९३२ साली गोलमेज परिषदेहून बाबासाहेब परत आल्यावर ज्यावेळी त्यांचा भव्य सत्कार ते बोटीतून उतरल्यावरंच जेंव्हा सुरु झाला, त्यावेळी असंख्य हार त्यांच्या गळ्यात होते. पण सर्वात शेवटीचा हार जो होता तो रमाईंचा होता. तत्कालीन जनता पत्राचे संपादक श्री बापुसाहेब सहस्त्रबुद्धे (मनुस्मृती जाळणारा एकमेव ब्राह्मण) ह्यांनी त्यावेळच्या रमाईंच्या ज्या आठवणी टिपल्या आहेत, त्या महत्वाच्या आहेत. त्यांनी रमाईंना दोन प्रश्नांवर बोलायला सांगितलं
१ त्यांनी बाबासाहेबांना सर्वात शेवटी हार का घातला?
२ हार घातल्यावर त्या बाबासाहेबांच्या पायाकडे का पाहत होत्या? (इतर सर्वजण बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहत होते)
तसं त्यांना सभेत बोलायची सवय नव्हतीच. यापूर्वी त्या एकदाच बोलल्या होत्या. त्यामुळे त्या गडबडल्या खऱ्या पण बोलायला उभारल्यावर त्यांनी जे काही उत्तर दिलंय, ते चिंतनीय आहे. त्या म्हणाल्या...
१. बाबासाहेबांचं दर्शन सर्वसामान्यांना कधीकाळीच होत होते म्हणून त्या सर्वांना मी ती संधी प्राप्त व्हावी म्हणून मी सर्वात शेवटी हार घातला...
२. माझ्या पतिराजांनी ज्या गोरगरीबांच्या, दीन-दलितांच्या उद्धाराचे कंकण बांधलं आहे, त्यांची मी धर्मपत्नी आहे, म्हणून त्या कंकणांस कुणाची दृष्ट लागु नये म्हणून मी त्यांच्या चरणांकडे पाहत होते...
खरंतर ह्यावर अधिक काही लिहावं ह्याची आवश्यकता नाही पण तरीही शीर्षकातल्या दोन शब्दांसाठी आणखी विवेचन
बिनमरणाचा नवरा...
रमाईंनी लहानपणी आईवडिलांकडून भगवान शंकर-पार्वतीची कथी ऐकली होती. पार्वतीमातेने 'बिनमरणाचा नवरा हवा' असा अट्टाहास धरला. आता असा नवरा घोर तपाशिवाय, उपासनेशिवाय कुणाला मिळणार? कोण असणार भगवान शंकराशिवाय? म्हणून तिच्या आईने सांगितल्यानुसार तिने त्याचीच आराधना केली. ह्या कथेचा माता रमाईंच्या मनावरही परिणाम झाला व त्यांनी त्यांच्या आईला विचारलं की मला असा बिनमरणाचा नवरा मिळेल काय?आईने तेच उत्तर दिलं की,
"पार्वतीसारखे कष्ट उपसून तप करावं लागेल."
ह्यावर माता रमाई उत्तरल्या की
*"मग मी करीन तप व भोगील हालअपेष्टा ! काढीन मी उपासतपास व मिळवीन मी 'बिनमरणाचा नवरा'!"*
हा प्रसंग का सांगितला???
पतिनिष्ठा काय असते हे आजच्या आपल्या सगळ्या पिढींस तर कळावंच पण धर्मनिष्ठाही कळावी...
ह्या महान स्त्रींस आयुष्य तसं अल्प लाभलं. जर त्या आणखी जगत्या तर कदाचित पुढच्या काही धर्मांतरासारख्या गोष्टी घडल्या नसत्या...
जाता जाता...
माता रमाईंना आमच्या पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाचे दर्शन घ्यायची फार इच्छा होती पण बाबासाहेबांनी ते घेऊ दिलं नाही. धनंजय कीरांनी त्यावर लिहिलं आहे. असो...
तरीही त्या दोघांच्या चरणी अभिवादन...
माता रमाईंस विशेष अभिवादन...
भवदीय...
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#माता_रमाई_आंबेडकर_जयंती_पार्वतीशंकर_धर्मनिष्ठा
No comments:
Post a Comment