आयुष्यांतला पहिला विश्वदिग्विजयी प्रेरणास्त्रोत! ह्यात जोडलेल्या चित्रांतले ते डोळे पहा! पाहताक्षणीच हे डोळे एका योग्याचे आहेत हे कुणांसही कळेल, त्यासाठी देवेंद्रनाथ असायची आवश्यकता नाहीच. ते दोन डोळे...!इथे भाषाप्रभु पु भा आठवतात...!
इयत्ता आठवीत कवठेकर प्रशालेत नुकताच प्रवेश घेतल्यावर एका स्पर्धेसाठी वाचलेलं स्वामीजींचं छोटंसं चरित्र, त्यानंतर नववीत बालमित्र चिदानंद कडून घेतलेले राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग नि श्रीठाकुरांचे दीर्घ चरित्र नि तिथून आरंभ झालेलं चारित्र्यनिर्मितीचं एक सत्र! नित्य ध्यानधारणा, एकपाठी होण्यासाठी न्यूनतम १२ वर्षे नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रताच्या पालनासाठीची कसून तयारी, स्वामीजींची व्याख्यानं मूळ इंग्रजीतूनंच मुखोद्गत करण्यासाठीची धडपड, पुढे पुण्यपत्तनी आल्यावर मनुष्यनिर्माण नि राष्ट्रपुनरुत्थानाच्या प्रेरणेने विवेकानंद केंद्राचं कार्य, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु वै. श्रीसोनोमामांच्या भाषेत हिंदु तत्वज्ञानाची नुसती प्रस्तावना म्हणून दहा खंडांचं समग्र विवेकानंद वाचन, मेरी लुईस बर्कचे सहा खंड, एस एन धरांचे तीन चरित्रात्मक खंड, स्वामीजींच्या सार्ध शती समारोहानिमित्त पुण्यातल्या अनेक महाविद्यालयांमध्ये युवकवर्गांस इंग्रजीतून विवेकानंदांवर आवाहन, १०,०००हून अधिक युवक-युवतींशी केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष विवेकानंद पोहोचवणं, सार्ध शतीच्या समारोपांस १२ जानेवारी, २०१४ मध्ये सावरकर क्रांतिमंदिरामध्ये स्वामीजींच्या विश्वदिग्विजयांवरंच आयुष्यांतलं पहिलंवाहिलं अत्यंत वेगांत केलेलं व्याख्यान, त्यानंतर कैक वर्षांची मनोकामना पूर्ण होत्साता केंद्राच्या समर्थ भारत शिबीरापश्चात् २८-२९ डिसेंबरला शिलास्मारकांवर तासन्तास केलेली ध्यानधारणा, तिथून पुढे आजपर्यंतची गत आठ वर्षांतली वेदांपासून सावरकरांपर्यंतची ८५च्या समीप प्रकट व्याख्यानं, तीही चारही भाषांमधून - मराठी, हिंदी, इंग्रजी नि संस्कृत...!
विवेकानंद - भिनत जाणारी पाच अक्षरे
पावित्र्याच्या तेजाने तळपणारा, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेला, मृगेेंद्राचे सामर्थ्य नसनसांत स्फुरलेला, पौरुषाने मुसमुसलेला, दीनदलितांबद्दल ह्रदयांत अपार करुणा असणारा एक योद्धा संन्यासी...! वेदांचा प्रखर अभिमानी, महर्षि दयानंदांप्रमाणेच वेदांचा अधिकार सर्वांस आहे असे यजुर्वेदाच्या आधारे प्रतिपादणारा वेदनिष्ठ, धर्म हीच भारताची जीवनशक्ती आहे असे ठासून सांगणारा पण हे करूनही धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या काही कुप्रथांवर मात्र धर्माला कुठेही धक्का न लागु देता प्रहार करणारा कर्ता धर्मसुधारक, स्त्रियांना केवळ शिक्षण द्या, त्यांचा उद्धार त्या स्वतः करतील असे सांगणारा खरा स्त्रीसुधारक, आजच्या भाषेत फेमिनिस्ट, तथाकथित उच्चवर्णीय ब्राह्मणांच्या काही चुकांसाठी त्यांच्यावर रोष करणारा पण त्यांना निजकर्तव्याचा बोध देण्यासाठी श्रीकुमारिलभट्टपादांचे उदाहरण देत ब्राह्मणत्व हाच हिंदुधर्माचा आदर्श आहे असे दुसरीकडे सांगणारा, एकीकडे अद्वैती मेंदु नि इस्लामी शरीर असे म्हणणारा तर दुसरीकडे राजयोगामध्ये इस्लामची नि पैगंबराची कठोर शब्दांमध्ये पोलखोल करणारा, ख्रिस्त्यांना त्यांच्याच देशांत जाऊन भारतामध्ये येऊन धर्मांतर कराल तर धमकावणारा धर्ममार्तंड, एक हिंदु परधर्मात गेला तर एक हिंदु कमी झाला असे नसून हिंदुधर्माचा एक शत्रु वाढला असे प्रतिपादणारा हा परमश्रद्धेय हिंदुत्वाग्रही, हिंदु हा शब्द उच्चारतांच अंगामध्ये वीजेची लहर उसळायला हवी असे ठासून सांगणारा हिंदुत्वनिष्ठ, विदेशांत जाऊन आपल्या असामान्य भाषाप्रभुत्वाने नि विशुद्ध चारित्र्याने वैदिक धर्माचा डंका पिटवणारा पण इथे भारतात आल्यावर इथल्या भारतीयांना प्रसंगी काही चुका सांगणारा व पाश्चात्य तंत्रज्ञान, आधुनिकता नि भारतीय तत्वज्ञान ह्या सर्वांचा तौलनिक अभ्यास मांडून दोन्हींचा समन्वय करूनही स्वधर्माचा, स्वसंस्कृतीचा, न्याय्य परंपरांचा, हितकारी रुढींचा तितकाच अभिमानाने छाती फुगविणारा एक राष्ट्रीयत्वाचा अभिमानी युवक, अंती वेदांत हाच जगाचा भावी धर्म होईल असे निक्षून मांडणारा आत्मज्ञानी, निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झालेला एक व्यावहारिक वेदान्ती!!!
काय लिहावं ह्या विश्वदिग्विजयी युवकाविषयी....???
किती लिहावं???
केंद्राच्या उद्देश्याप्रमाणे मनुष्यनिर्माणासाठी नि राष्ट्र पुनरुत्थानासाठी स्वामीजी वाचावेच लागतील. ज्यांना स्वामीजी अभ्यासायचे आहेत त्यांनी निदान त्यांची भारतीय व्याख्याने (Lectures from Columbo to Almora) आधी वाचावीत, मग अन्य साहित्य वाचलं तरी चालेल. वर बव्हतांश साहित्याचा उल्लेख केलाच आहे तो आमचा अहंकार पोसण्यासाठी नव्हे तर विवेकानंद साहित्याची ओळख व्हावी ह्यासाठी...!
स्वामीजींच्या साहित्यामध्ये काही ठिकाणी परस्परविरोध नि सदोष विधाने निश्चित आहेत पण ज्याने समग्र अभ्यासलेत तो भ्रमित होणार नाही. कारण त्यांच्या साहित्यातले संदर्भ मोडून तोडून मांडून बुद्धिभेद केलाच जातोय. अखंड सावधान असावे!
अर्थात आठवीपासून सुरु झालेला हा प्रवास आयुष्यभराचा आहे...
प्राचार्यांच्या भाषेत यासाठीच बोलणे ऐकणे.....!
म्हणूनंच
सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयं।
काल जयंतीनिमित्त स्वामीजींना अभिवादन करण्यासाठी हे गीत नुकतंच काल गायलं आहे, ते इथे श्रवण करावं...चुका आहेतंच मान्य...
https://youtu.be/GdLbqFIsd20
भवदीय
पाखण्ड खण्डिणी
#स्वामी_विवेकानंद_विश्वदिग्विजय_विवेकानंदकेंद्र_शिलास्मारक_हिंदुत्व_वेदाभिमान_राष्ट्रीयत्व
No comments:
Post a Comment