अथर्ववेदामध्ये एक मंत्र आहे.
ॐ अन्ति॒ सन्तं॒ न ज॑हा॒त्यन्ति॒ सन्तं॒ न प॑श्यति । दे॒वस्य॑ पश्य॒ काव्यं॒ न म॑मार॒ न जी॑र्यति ॥
अथर्ववेद - १०.८.३२
(त्या)(देवस्य) देवाचे (काव्यं) काव्य (पश्य) पहा (यत् - जे) (न ममार) कधीच मरतही नाही, नाश पावत नाही, (न जीर्यति) कधी जीर्णही होत नाही.
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांच्या श्रीभावार्थदीपिकेची अर्थात श्रीज्ञानेश्वरीची परवाची जयंती...
खरंतर श्रीज्ञानेश्वरीवर अत्यंत अधिकारवाणीने बोलावं, लिहावं, प्रकटावं, चिंतन करावं ते आमच्या गुरुवर्य श्रीसाखरे परंपरेने, गुरुवर्य श्रीदेगलुरकर परंपरेने, गुरुवर्य श्रीसिद्धरस परंपरेने, गुरुवर्य श्रीसोनोमामांच्या परंपरेने किंवा गुरुवर्य वै. वा ना उत्पात किंवा वारकरी संप्रदायांतले अधिकारी असे ज्ञात-अज्ञात (विस्तारभयास्तव) सत्पुरुष. मजसारख्या पढतमूर्खाने श्रीमाऊलींविषयी किंवा तिच्या श्रीज्ञानेश्वरीविषयी काही लिहायसाठी धजावणं हे जरी 'धृष्टता' ह्या प्रकारांत मोडत असलं तरी त्या श्रीमाऊलीच्याच शब्दांत सांगायचे तर
*राजहंसाचे चालणें। भूतलीं जाहलीया शहाणें। आणिक काय कोणें। चालवेचिं ना।*
ह्या सर्व अधिकारी श्रीगुरुचरणांच्या ठायीं विनम्र दंडवत करून श्रीमाऊलींच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आहे.
भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्यामध्ये वेदापौरुषेयत्व मांडलं आहे, त्यावर श्रीवाचस्पति मिश्रांच्या श्रीभामती प्रकाशच्या मराठी अनुवादामध्ये ममहापोपाध्याय श्री कस्तुरेगुरुजींनी भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा नि कर्णापाटव ह्या चार दोषांपासून मूक्त असा केवळ एकंच ग्रंथराज आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष संहितारुपी चतुर्वेदभगवान असे म्हटलं आहे. अर्थात इथे आह्मांस अभिप्रेत वेद म्हणजे केवल संहिता अर्थात मंत्र बरंका. ब्राह्मणग्रंथ नव्हे ते तसं का ह्यावर आह्मीं आजपर्यंत अनेकवेळा मांडलं आहे. ह्या चार दोषांच्या विवेचनासाठी जिज्ञासूंनी गुगल करावे.
तो चतुर्वेदभगवान ज्याप्रमाणे 'न ममार न जीर्यति' अशा अजर नि अमर अशा स्वरुपाचा आहे, ज्या ईश्वराची ती वाणी आहे, त्याचेच ते शब्दब्रह्मस्वरुप आहे की जे त्यासारखंच अनादि अनंत नित्यसिद्ध आहे. उपरोक्त मंत्रामध्ये 'देवस्य पश्य काव्यं' म्हटलंय त्या देवाचे काव्य पहा. इथे देव हा शब्द ईश्वर ह्याच अर्थाने आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता आहे???
आता इथे वेदांना काव्य का म्हटलं असावं हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. विस्तारभयास्तव...
त्या चतुर्वेदभगवानापश्चात् 'निर्दोषवर्णवपु' असा ग्रंथ म्हणून श्रीमाऊलीने ज्या योगेश्वर भगवान श्रीकृष्ण मुखपद्मविनिःसृता अशा श्रीमद्भगवद्गीतेची थोरवी गायिलीं आहे, त्याच श्रीगीतेवर श्रीमाऊलींनी 'श्रीभावार्थदीपिका' नावाचं महाराष्ट्री साहित्यसरस्वतीच्या गळ्यांतील मंगळसूत्र रचावं नि ते आमच्या मराठीभाषेंतंच रचावं हे आमचं कवण भाग्य!
गीतेचं वर्णन करताना श्रीमाऊली म्हणते की
हें ज्ञानामृताची जाह्नवीं। हें आनंदचंद्रीची सतरावीं। विचारक्षीरार्णवाची नवीं। लक्ष्मीं जे हें।
इथे श्रीमाऊलीने सतरावीं असा शब्द का योजिला असावा? आमच्या अल्पमतीप्रमाणे चार वेद, षट्दर्शने नि षट्वेदाङ्गे ही सोळा धरून सतरावी ती श्रीगीता असे कदाचित माऊलींना अभिप्रेत असावं. आमची अल्पबुद्धी आहे, आह्मीं जर चुकत असु तर उपरोक्त विद्वानांनी ही चूक निदर्शनांस आणून द्यावी ही विनंती... श्रीमाऊली पुढे म्हणतें की
गीता हे सप्तशती। मंत्रप्रतिपाद्य भगवती। मोहमहिषा मुक्ती। आनंदलीं असें।
मोहमहिषासुराला ठार मारून अर्थात त्यांस मूक्ती देऊन संसारपथश्रांत जीवांना जिने श्लोकाक्षरद्राक्षलतेचा मांडव जणु घातलेला आहे, अशा त्या श्रीगीतेवरील ही भावार्थरुपी टीका ही जणु श्रीगीतेवरील 'वार्त्तिक' आहे असे आमचे परमादरणीय गुरुवर्य श्रीकिसन महाराज साखरे महाराज म्हणतात ते किती यथार्थ आहे. इथे वार्त्तिक म्हणजे काय ह्यावर मागे लिहिलंच आहे. विस्तार करत नाही.
उक्तानुक्तद्विरुक्तानां चिन्ता यत्र प्रसज्यते।
तं ग्रन्थं वार्त्तिकं प्राहुर्वार्तिकज्ञा मनीषिणः।
परशरोपपुराण
अशी वार्त्तिक शब्दाची व्याख्या आहे. विस्तारभयास्तव मागील लेख पहावेत.
चतुर्वेदभगवानांस श्रीमाऊलींनी निर्दोषवर्णवपु का म्हणावं? इथे वर्ण म्हणजे अक्षर, चार ब्राह्मणक्षत्रियादि वर्ण नव्हे. तर ती ईश्वराची वाङ्मयीन मूर्ती इतकंच त्याचे महत्व नसून तर उपरोक्त चारही दोषांपासून ती मूक्त ह्या अर्थाने श्रीमाऊलीं तींस 'निर्दोषवर्णवपु' असे म्हणते. आणि श्रीगीतेविषयीही श्रीमाऊलीचा तोच अभिप्राय आपल्याला श्रीज्ञानेश्वरींत दृष्टोत्पत्तींस येते. श्रीमाऊली त्याहीपुढे जाऊन म्हणतें की वेदभगवान केवळ तीनंच वर्णांच्या ठायी लागल्याने त्यांस जे उणेपण आलं, ते श्रीगीतेने दूर केलं. अर्थात ह्यांस वेदांची कुठेही निंदा नसून उलट थोरवीच आहे. आणि इथे हेही सांगणं आवश्यक आहे की वेदभगवान पूर्वीतरी सर्वांच्याच कर्णी होता पण मधील काळात तो केवळ त्रैवर्णिकांनाच प्राप्त झाल्याने श्रीगीता भगवंताला सांगावी लागली असा भाव आहे. वास्तविक वेदांचा अधिकार सर्वांस होता हे आह्मीं मागे अनेकवेळा सिद्ध केलं हे जे सर्वास ज्ञातंच आहे. मूळ वेदांस ते उणेपण नव्हतंच पण ते कालांतराने आले, ते का आलं का विषय इथे नाही.
त्याच श्रीगीतेवर श्रीमाऊलीने वार्त्तिक स्वरुपामध्ये भावार्थदीपिका रचावी व तीहीं तितकीच निर्दोषवर्णवपु असावीं ह्यात ते नवल काय??? प्रत्यक्ष योगेश्वर भगवान श्रीकृष्णंच श्रीमाऊलींच्या रुपाने पुनर्प्रकट झाल्यावर काय वेगळं घडणार??? त्याच श्रीज्ञानेश्वरींस उपरोक्त वेदमंत्र तंतोतंत लागु करावयाचा अट्टाहास हा तरी धृष्टतेचा प्रकार ठरणार नाहीच.
जिथे प्रत्यक्ष वेदांनाच काव्य म्हटलंय तिथे श्रीगीता व श्रीज्ञानेश्वरींसही काव्य म्हणण्यांस कोणताच प्रत्यवाय नाही. म्हणून वर म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष श्रीमाऊलींनीच संक्षेपाने कवित्वाची लक्षणे सांगताना
वाचे बरवें कवित्व ।कवित्वीं बरवें रसिकत्व ।रसिकत्वीं परतत्व ।स्पर्श जैसा ।
ज्ञानेश्वरी - १८-३४७
असे म्हटलंय.
अथ काव्यलक्षणम् ।
आमच्या प्राचीन शास्त्रकारांनी काव्य शब्दाची मीमांसा करताना फार विस्तार केला आहे. साहित्यशास्त्रकार श्री मम्मटाचार्यांनी
तद्दोषौ शब्दार्थौ सगुणावलंकृति।
अर्थ - अदोष म्हणजे निर्दोष, सगुण म्हणजे गुणयुक्त आणि क्वचित अलंकारयुक्त शब्दार्थ म्हणजे काव्य होय.
तर संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी मंगलाचरणामध्ये वेदस्वरुप सांगताना अर्थात वेदांचे अपौरुषेयत्व सूचित करताना काव्याचे लक्षण ही ध्वनित केलंय. ते म्हणतात
हे शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।
ह्यात निर्दोष शब्दरचना व लावण्याने नटलेली अर्थ शोभा हे काव्याचे प्रधान अंग सांगितलंय.
यांतल्या शब्दब्रह्म, अशेष, सुवेष, वर्णवपुनिर्दोष ह्या चार शब्दांवर चार स्वतंत्र लेख लिहावे असा विषय आहे. हे लिहायचा मोह ह्यासाठीच की श्रीमाऊली ही शब्दसम्राट आहे, शब्द निवडावे तर तिनेच व ते योग्य ठिकाणी चपखल योजावें तर तिनेच!
ह्याचेच पुढे चिंतन रसगंगाधरकार श्रीजगन्नाथ पंडितांनी करताना
रमणीयार्थं प्रतिपादक: शब्द: काव्यम् ।
अर्थ - रमणीय अर्थ प्रतिपादन करणारी शब्द रचना म्हणजे काव्य होय.
साहित्यदर्पणकार आचार्य श्रीविश्वनाथाच्या साहित्यसुधासिन्धु ह्या ग्रंथाचं इथे स्मरण होतं. तो लिहितो
जायते परमानन्दो ब्रह्मानन्दो सहोदर: ।
यस्य श्रवणमात्रेण तद्वाक्यं काव्यं उच्चते ।
काव्य कशांस म्हणावं ? विश्वनाथ लिहितो की ज्याच्या श्रवणमात्रानेच ब्रह्मानंदासह त्याचा सहोदर परमानंदांसही आपण प्राप्त होतो, त्यांस काव्य म्हणावं.
श्रीमाऊलींच्या रचनेचे वैशिष्ट्य हेच आहे की उपरोक्त दोन्हीं आपणांस प्राप्त झाल्याचे समाधान लाभतं. म्हणूनंच श्रीज्ञानेश्वरीचे चिंतन, मनन, निधिध्यासन अर्थात प्रत्यक्ष अधिकारी गुरुमुखातून श्रवण महत्वाचे...
आता श्रीमाऊलींची श्रीज्ञानेश्वरीही निर्दोषवर्णवपु का???
ज्यांनी श्रीज्ञानेश्वरी एकदा का होईना आयुष्यांत वाचली आहे, तो तिच्या प्रेमात आकंठ बुडतोच हे निर्विवाद आहे. श्रीमाऊली ही शब्दसम्राट आहे ह्याचे कारण सर्व शब्दभांडार किंवा जणु ते शब्दब्रह्म तिच्यापुढे मान खाली तुकवून अक्षरशः उभे राहते कारण शब्दसाम्राज्याच्या सिंहासनावरंच ती प्रत्यक्ष आरुढ आहे. म्हणूनंच श्रीमाऊलीच्या शब्दवैभवाचे वर्णन करताना आह्मांस मोह होतो तो महर्षि श्रीपतंजलींच्या व्याकरण महाभाष्याचा. समस्त वैय्याकरण्यांचा जणु पिताच असे जे भगवान महर्षि श्रीपाणिनी त्यांच्या सूत्रांविषयी किंवा त्यांनी निर्माण केलेल्या एकुणच व्याकरणवाङ्मयाविषयी श्रीपतंजली त्यांच्या व्याकरण महाभाष्यांत प्रथम अध्यायांतल्या प्रथम पादांतल्या प्रथम सूत्रांवर भाष्य करताना जे लिहितात, ते असे
'प्रमाणभूत आचार्यो दर्भपवित्रपाणिः शुचाववकाशे प्राङ्मुख उपविश्य महता प्रत्नेन सूत्राणि प्रणयति स्म । तत्राशक्यं वर्णेनाप्यनर्थकेन भवितुं, किं पुनरियता सूत्रेण?'
अर्थ - प्रमाणभूत असे दर्भपवित्रपाणि म्हणजे हातीं दर्भ धारण केलेल्या आचार्य श्रीपाणिनींनी अवकाशसमयामध्ये प्राचीनमुख उपविष्ट होऊन महान प्रयत्नपूर्वक अशा ज्या सूत्रांचे प्रणयन केलं, की ज्यांमध्ये एका वर्णाचेही अनर्थक असणे संभव नाही, मग एका सूत्राची ती काय गोष्ट???
संक्षेपांत सांगायचे तर भगवान श्रीपाणिनींनी रचलेल्या सूत्रांमध्ये एका वर्णामध्ये म्हणजे एका अक्षरामध्येही किंचितसाही दोष नाही ना त्यांमध्ये काही अनर्थकता आहे, मग त्या संपूर्ण सूत्राविषयी काय लिहावं???
इथे महर्षि श्रीपतंजलि नि भगवान श्रीपाणिनींची क्षमा मागून लिहावंसं वाटतं की
"स्वतः प्रमाणभूतवेदज्ञानपवित्रह्रदय आचार्यो श्रीज्ञानेश्वरः शुचो समाधौ प्रणिधाय भावार्थदीपिकायाः प्रणयनं कृतवान्, तत्राशक्यं वर्णेनाप्यनर्थकेन भवितुं, किं पुनरेकेनाsपि चरणेन?"
"स्वतः प्रमाणभूत अशा वेदज्ञानाने ज्यांचे अंतःकरण पवित्र झालं आहे अशा आचार्य श्रीज्ञानोबारायांनी शुद्ध समाधीमध्ये प्रणिधान करून भावार्थदीपिकेचे प्रणयन केलं, त्यामध्ये एका वर्णाचे म्हणजे अक्षराचेही अनर्थक असणं संभव नाही, तर पूर्ण चरणाचे निरर्थक होण्याची गोष्टंच कुठे येते???"
शब्दसम्राट श्रीमाऊलींंच्या चरणी उपरोक्त सर्व गुरुमाऊलींच्या चरणी विलंबाने का होईना ही आमच्या अल्पबुद्धींस सुचलेली एक शब्दसुमनांजली...
त्वदीय वस्तु तुभ्यमेव समर्पयामि।
भवदीय
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#श्रीज्ञानेश्वरी_जयंती_श्रीज्ञानेश्वर_वेदापौरुषेयत्व_पाणिनी_पतंजली_वेदाङ्गे_श्रीगीता_भगवान_श्रीकृष्ण