*शंकराचार्य...ही पाच अक्षरे ऐकली म्हणजे कर्णी आली की जणु पंचप्राण त्याठिकाणी एकवटल्यासारखे वाटते. अर्थात ही पाच अक्षरे म्हणजे जणु वैदिक हिंदुधर्माचा पंचप्राणंच आहेत.*
पूज्यपाद श्रीआचार्यांविषयी लिहायची माझी तरी योग्यता नाही. कारण आचार्यांच्या केवल चिंतनानेच अंतःकरणांत अश्रुंचा पूर येतो. खुंटला शब्द अशी अवस्था येते...तरीही गेल्या वर्षभरामध्ये आचार्यांची १९ संस्कृत नि इंग्रजी अनुवादित चरित्रे अभ्यासून माझ्या अल्पमतींस जे काही कळलं, ते संपूर्ण मांडण्याचा प्रयत्न यद्यपि ह्या लेखामध्ये संभव नसला तरी शीघ्रातिशीघ्र यावर येऊच. ती वेळ अर्थात आलीच आहे.
ह्या सर्व चरित्रचिंतनातून भगवत्पाद पूज्यनीय श्रीमच्छंकराचार्यांच्या चरित्राचा कालपट निम्नलिखित पद्धतीने मांडता येणं संभव आहे. आह्मीं यापूर्वीही यावर लिहिलंच आहे पण ते फारंच संक्षेपाने. ही कालनिर्णयात्मक सूची पूज्यनीय श्रीभगवत्पादाचार्यांनीच स्थापिलेल्या श्रीशारदापीठाच्या अनुसारंच आहे. व उपरोल्लेखित १९ चरित्रांच्या अन्वये... अर्थात आमचा हा प्रयत्न
*फोडिलें फांडार, धन्याचा हा माल।*
*मी तों हमाल, भार वाहें।*
इतकाच आहे.
*भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांची उद्या २५३०वी जयंती... इसवी सन पूर्व ५०९ ते इसवी सन पूर्व ४७७ हा त्यांचा काल. ती ५०९ अधिक आजची २०२१ वर्षे. एकुण २५३०वी जयंती...*
*श्रीशारदापीठानुसार पूज्यपाद श्रीआचार्यांचा जीवनक्रम*
जन्म - वैशाख शुद्ध पंचमी - युधिष्ठिर शक २६३१
उपनयन संस्कार - चैत्र शुक्ल नवमी - युधिष्ठिर शक २६३६
संन्यास - कार्तिक शुक्ल एकादशी - युधिष्ठिर शक २६३९
गुरु श्रीगोविंदपादाचार्यांकडे शिक्षण पूर्ण - फाल्गुन शुक्ल द्वितीया - युधिष्ठिर शक २६४०
श्रीबद्रिकाश्रमामध्ये भाष्य पूर्ण - ज्येष्ठ वद्य अमावस्या - युधिष्ठिर शक २६४६
श्रीज्योतिर्मठाची संस्थापना - तत्रैव
ह्या ज्योतिर्मठाच्याच २५००व्या महोत्सवाची पत्रिका माझ्याकडे होती. मी त्यावर चार वर्षांपूर्वी लेख लिहिला होता.
श्रीमंडनमिश्रांशी शास्त्रार्थ - मार्गशीर्ष वद्य तृतीया - युधिष्ठिर शक २६४७
श्रीशारदामठाची स्थापना - कार्तिक वद्य त्रयोदशी - युधिष्ठिर शक २६४८
श्रीशृंगेरी मठाची स्थापना - फाल्गुन शुक्ल नवमी - युधिष्ठिर शक - २६४८
श्रीमंडनमिश्रांस संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण श्रीसुरेश्वराचार्य - चैत्र शुक्ल नवमी - युधिष्ठिर शक २६४९
सुधन्वा नावाच्या राजाशी संपर्क व त्याला वैदिक धर्मात पुनः आणणे - मार्गशीर्ष शुक्ल दशमी - युधिष्ठिर शक २६४९
श्रीसुरेश्वराचार्यांस श्रीशारदापीठांवर आरोहण - माघ शुक्ल सप्तमी -युधिष्ठिर शक २६४९
दिग्विजयाचा आरंभ - वैशाख शुक्ल तृतीया - युधिष्ठिर शक २६५०
श्रीतोटकाचार्यांचे आगमन - श्रावण शुक्ल सप्तमी - युधिष्ठिर शक २६५३
श्रीहस्तामलकांचे आगमन - आश्विन शुक्ल एकादशी - युधिष्ठिर शक २६५४
श्रीतोटकाचार्य आणि श्रीहस्तामलकांचे अनुक्रमे श्रीज्योतिर्मठ आणि श्रीशृंगेरी इथे आरोहण - पौष शुक्ल पौर्णिमा - युधिष्ठिर शक २६५४
श्रीगोवर्धन मठाची स्थापना - वैशाख शुक्ल दशमी - युधिष्ठिर शक २६५५
श्रीपद्मपादाचार्यांचे श्रीगोवर्धन मठांवर आरोहण - तत्रैव
दिग्विजय सुरुच - भाद्रपद पौर्णिमा - युधिष्ठिर शक २६५५ ते
श्रीशारदापीठांवरील अंतिम निवास - पौष अमावस्या - युधिष्ठिर शक २६६२
निजधामगमन - कार्तिक पौर्णिमा युधिष्ठिर शक २६६३
*कलियुगाचा आरंभ इसवी सन पूर्व ३१०२, १८ फेब्रुवारी. म्हणजे आजपासून ५१२३ वर्षे पूर्व. यापूर्वी ३८ वर्षे भर घातली की युधिष्ठिर शकाचा आरंभ. म्हणजेच इसवी सन पूर्व ३१४०.*
*आता आचार्यांचा जन्म युधिष्ठिर शक २६३१ म्हणजे ह्या ३१४० मधून २६३१ वजा केली...इसवी सन पूर्व ५०९ ठरतो..म्हणजेच आजपासून २५३० वर्षांपूर्वाचा...*
अस्तु।
उद्या आलोच तर युट्युबचैनलवर लाईव्ह येऊच...निश्चित नाही. विचार आहे पाहु....
भवदीय...
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#भगवत्पूज्यपाद_श्रीमच्छंकराचार्य_जयंती_शांकरदेशिक_शंकरविजय_युधिष्ठिरशक_कलियुग
No comments:
Post a Comment